गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, November 2, 2026

आठवणीतील शब्द स्वर... शेखर आणि मी.








                              -तबलापटू शेखर सरोदे आणि मी-

...तेव्हा मी एक तास सरोद वादन व एक तास मीच स्वरबद्ध केलेल्या गीत-गझल गायनाचा कार्यक्रम करायचो. तबल्याच्या साथीला यवतमाळचाच, हैदराबादचे उस्ताद दाऊदखान साहेबांचा गंडाबंद शागिर्द आणि सध्याचा पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे याचा काका शेखर सरोदे हा असायचा.ऑर्केस्ट्रा बंद झाल्यावर आर्णीला नोकरी करत असतानाचा १९७६ ते १९८३ असा हा जवळ-जवळ आठ वर्षांचा कालखंड  होता.विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील #अशी_गावी_मराठी_गझल ह्या सुरेश भटांनी शीर्षक दिलेल्या व स्वतः सूत्र संचालन केलेल्या अनेक कार्यक्रमात त्याच्या तबला संगतीने रंगत यायची.शेखर पुण्यात स्थायिक झाल्यावर उत्कृष्ट तबला वादक म्हणून ओळख व्हायला लागली असताना एका कार्यक्रमातून परत येताना कार अपघातात त्याचे निधन झाले.देखणा, रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला व  मैत्रीला जपणारा अतिशय मनमिळावू,आमच्या कुटूंबातील एक भाग बनलेला जिवलग ऐन भरात असताना आम्हाला सोडून गेल्याने मित्र मंडळीला व यवतमाळकरांना फार मोठा धक्का बसला होता.त्याच्या अनेक आठवणी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत.आपल्या आयुष्यात अनेक मित्र मिळतात.पण असे जिवाला चटका लावून जाणारे दोन-चारच असतात....

●छायाचित्रांमध्ये शेखर आणि मी....

No comments:





संगीत आणि साहित्य :