गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, July 10, 2019

मला भावलेला संगीतकार...पद्मश्री सुरेश तळवलकर.

('चकव्यातून फिरतो मौनी ' मधील तालयोगी पद्मश्री  सुरेश तळवळकरांचा लेख...)
.
-मला भावलेला संगीतकार-
.
श्री सुधाकर कदम यांचे चिरंजीव श्री निषाद कदम माझ्या निकटतम शिष्यांपैकी एक आहेत.त्यामुळे माझा आणि सुधाकरजी यांचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा स्नेह आहे.मी सुधाकरजींचे काम फार जवळून ऐकले आहे.अनेकदा त्यांनी केलेल्या रचनांचा मनसोक्त आनंद घेतला आहे.
प्रत्येक कलाकार त्याच्या कामामध्ये आपल्यामधील कल्पकतेनुसार वैविध्यता आणायचा आटोकाट प्रयत्न करत असतो.सुधाकरजी यांच्या रचना ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, त्यांच्या संगीत रचनांमध्ये विविधता आहे.प्रत्येक रचनेला स्वतंत्र अशी एक ओळख आहे.एका रचनेसारखी दुसरी रचना नाही.ही विविधता आणत असताना,ते ती रचना यांत्रिक किंवा कोरडेपणाकडे झुकू देत नाहीत.सुधाकरजी त्यांच्या रचनांमध्ये एक प्रकारचा हळवेपणा,ओलेपणा जपल्याची जाणीव देतात.गझल या प्रकारामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असणे गरजेचे असते.अशी रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयाला भिडते,याची जाणीव सुधाकरजींना आहे.त्यांना असलेली ही जाणीव ते त्यांच्या रचनांमधून श्रोत्यांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचवतात.त्यांच्या रचनांमधील ’संवेदनशीलता’ मनाला भिडते.संगीत रचनेमध्ये भावनिकता ही फार महत्वाची आहे,जी सुधाकरजींच्या रचनांमध्ये जाणवते.
गझल काव्यातून आलेला भावार्थ,त्या काव्याला असलेली लयीची नादमयता,ही सुधाकरजींना अगोदरच जाणवलेली असल्यामुळे ते त्यास संगीत देत नाहीत तर ते त्यांच्याकडून घडले जाते.सुधाकरजींच्या गझल रचनांमध्ये एकाचवेळी खुलेपणा आहे आणि तितकाच हळूवारपणाही आहे.असे फार कमी वेळा ऐकायला मिळ्ते.संगीताच्या दृष्टीकोनातून खुलेपणा आणि हळूवारपणा ही एकमेकांविरोधी तत्वे आहेत.पण सुधाकरजींच्या रचनांमध्ये खुलेपणा व हळूवारपणा या दोन्हीही गोष्टींचा सुरेल संगम ऐकायला मिळतो.
सुधाकरजींनी त्यांच्या रचनांसाठी वेगवेगळ्या तालांचा चपखल वापर केला आहे.कधी रुपक तर कधी दादरा-केरवा तर कधी अप्रचलित ११ मात्रांचा ताल अशा वेगवेगळ्या तालांमध्ये त्यांनी रचना केलेल्या आहेत.अशा अवघड आणि अप्रचलित असलेल्या बौद्धिक तालांचा वापर करताना गझलचे मर्म समजल्या जाणार्‍या भावनिक तरलतेवर ते कोठेही विपरीत परिणाम होऊ देत नाहीत.
सुधाकरजींच्या रचनांचा शास्त्रीय संगीताशी घनिष्ट संबंध आहे.गझल गायनाच्या परंपरेमध्ये गझल गायकाला सादरीकरण करताना रचनेपेक्षा वेगळा सांगीतिक विस्तार करण्याचे स्वातंत्र्य असते.सुधाकरजींच्या गझल रचना पूर्णपणे स्वतंत्र असूनसुद्धा त्यांच्या रचनांमध्ये गझल गायकाला मुक्तपणे गाण्यासाठी वाव असतो.तो त्याच्या मनाने गाऊ शकतो.
संगीताच्या सर्व प्रकारांमध्ये मग ते शास्त्रीय असो,उपशास्त्रीय असो किंवा सुगम संगीत असो,’अस्थाई’ अतिशय महत्वपूर्ण असते.अस्थाईला सुगम संगीतामध्ये धृवपद असेही म्हणतात.संगीत रचनेमध्ये अस्थाई परत परत गायली जावी असे वाटणे हे ती सांगीतिक रचना उत्कृष्ट असल्याचे द्योतक आहे.सुधाकरजींच्या सर्व रचना या प्रकारामध्येच समाविष्ट असतात. अस्थाई जितकी सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असेल तितका तिचा विस्तार करणे सोपे जाते.अस्थाई परत परत गावी असे वाटणे म्हणजेच त्याची धून होणे असे मला वाटते.आणि अशा प्रकारे धून झालेली कोणतीही रचना श्रोत्यांच्या ओठांवर तरळत राहते.सुधाकरजींच्या अनेक सांगीतिक रचना मी ऐकल्या आहेत.त्याचा आनंद घेतला आहे.
जेवढी अस्थाई सांगीतिक दृष्ट्या परिपूर्ण तेवढी ती रचना विस्तार करायला गायकाला जास्त वाव मिळ्तो.अशा प्रकारची सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली अस्थाई ही त्या रचनेची ताकद बनते.अस्थाईतील शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन त्या शब्दांना यथायोग्य सांगीतिक वृत्तामध्ये (मीटर) बसवणे हे फार बौद्धिक काम आहे.सुधाकरजींनी हे शिवधनुष्य अतिशय लीलया पेलले असून अशा प्रकारची बौद्धिक चमक त्यांच्या अनेक रचनांमध्ये ऐकायला मिळ्ते.त्यांच्या रचनांमध्ये स्वरवैचित्र्यही पहायला मिळ्ते.(ज्या प्रमाणे शास्त्रीय संगीतामध्ये जोड रागांची संकल्पना आहे त्याप्रमाणे) अशी सांगीतिक रचना करणे ही एक बौद्धिक क्रिया आहे.पण या बौद्धिक क्रियेमध्ये सुद्धा गझलमधील भावनिक तरलतेवर विपरित परिणाम होणार नाही याचे अतिशय योग्य भान त्यांनी ठेवलॆ आहे.सुधाकरजींना त्यांच्या रचनांमध्ये शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक संतुलन अतिशय उत्कृष्टपणे आणि कलात्मकतेने जमलेले आहे.
गझल हा प्रकार प्रामुख्याने काव्य प्रकार असूनसुद्धा त्याचे संगीतमय सादरीकरण हे शास्त्रीय संगीताच्या खूप जवळ जाणारे असते.शिवाय गझलच्या संगीतमय सादरीकरणाच्या रिवाजामध्ये तबला वादकाला त्याचे काम करण्याची संधी उपलब्ध असते.त्यामुळे गझल गायकाबरोबर तबला वादक कोण आहे,त्याची पात्रता काय आहे याची पण गझल गायन ऐकणार्‍या श्रोत्यांना उत्सुकता असते.गझलच्या सांगीतिक रचनेची जी अस्थाई (धृवपद) असते ती जरी,बरोबर वाजणार्‍या तालाशी गणिती किंवा ठॊस संबंध दाखविणारी नसली तरी त्यामध्ये त्या तालाच्या आवर्तनाची आकृती सक्षमपणे उभी अहात असते.अशा अस्थाईचे वारंवार सादरीकरण लेहेर्‍या इतके सक्षम असल्यामुळे तबला वादकाला त्याचे काम सादर करण्याची संधी मिळते.सुधाकरजींच्या रचनांमध्ये सुद्धा ही खासियत दिसून येते.
मी गेले तीन-चार वर्ष त्यांनी केलेल्या अनेक संगीत रचना ऐकल्या आहेत.त्या मला मनापासून भावल्या आहेत.सुधाकरजींच्या गझला या शास्त्रीय संगीतातील बंदिशींसारख्याच विस्तारक्षम असून,अशा संगीत रचना ताकदीने उभा करणारा कंपोझर म्हणून सुधाकरजींकडे आदराने पाहिले जाते.त्यांचा बराच मोठा काळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेला.विदर्भ,यवतमाळ या परिसराला कवी,साहित्यिक,कलाकार अशा मंडळींचा वारसा लाभला आहे.सुधाकरजींनी बर्‍याच काळापर्यंत प्रसिद्ध कवी,गझलकार कै.सुरेश भट यांच्या समवेत व्यतीत केला.कै.भट हे एक प्रभावी आणि आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते.त्यांच्यासारख्या प्रतिभाशाली व्यक्तीच्या सहवासातून सुधाकरजींनी मराठी गझल ही सर्वमान्य श्रोत्यांपर्यंत पोहचवली.
सुधाकरजींना त्यांच्या वाढदिवसाबद्दल मन:पूर्वक शुभेच्छा!

शब्दांकन : मोहना रामदास पळसुले

संदर्भ : श्री सुधाकरजींनी स्वरब्द्ध केलेल्या गझलांचे इतर गायकांनी केलेले कार्यक्रम तसेच ’काट्यांची मखमल’,’तुझ्यासाठीच मी…’ आणि ’अर्चना’ हे अल्बम.
...................................................






संगीत आणि साहित्य :