गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, February 28, 2021


 

सुधाकर कदम - रजनी करकरे-देशपांडे

.            गायक_वादक_संगीतकार ‘सुधाकर कदम’ 
           -करवीर कोकिळा सौ़. रजनी करकरे-देशपांडे

     १९८२ च्या सुमारास सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. आणि हा कार्यक्रम आंबा टॅनीन ऍंन्ड पोल्सन उद्योगाचे व्यवस्थापक श्री़ वा़. रा़. राजंदेकर ह्या माणूसवेड्या व संगीतप्रेमी व्यक्तीने आखला होता़. श्री राजंदेकर मला आपली मानसकन्या मानत होते. त्यामुळे ह्या कार्यक्रमास मला आवर्जून बोलावण्यात आले़. मी ही एक गायिका आहे. गझल हा उर्दू-हिन्दी भाषेतला प्रसिद्ध गायन प्रकाऱ. मराठीत गझलेला मानाचे स्थान देण्याचे काम कविवर्य सुरेश भट ह्यांनी केले़. आणि सुरेश भटांच्या गझलेबद्दल व्यक्तिशः मला प्रेम असल्यामुळे व त्यांच्याच जवळजवळ सर्व गझला व गीते सुधाकर कदम गाणार आहेत असे समजल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची एक वेगळी उत्सुकता मनात होतीच़. कदमांनी सर्व गीते गझल स्वतःच स्वरबद्ध केल्या होत्या़. चाली आकर्षक, अर्थाला अनुरुप अशा होत्या़. विशेष म्हणजे कार्यक्रमात ते स्वतःच निवेदन करत होते. त्यामुळे नीटनेटकेपणा होता़. एरवी निवेदक कंटाळवाणे बोलून श्रोत्यांना नकोसे करू शकतो़. एकूण कार्यक्रम चांगला झाला व कदमाबद्दल कौतुक वाटले़. एकच व्यक्ती हार्मोनियम वाजवते, गाते, बोलते व संगीतही देऊ शकते, हे वेगळेपण होतेच़. गझल, ठुमरी ह्या प्रकारच्या गायनाला तबला साथ फार तयारीची लागते. पुण्याचा शेखर सरोदे नामक एक तरुण तबलजी कदमानी साथीला आणला होता़. तबला साथी मुळे कार्यक्रम बहारदार झाला़. कार्यक्रमानंतर ओळखही झाली आणि नंतर पत्रव्यवहाराने ती दृढ झाली़. कोल्हापुरातील पहिल्या कार्यक्रमापासून माझी ओळख झाल्याने ते परत आले तेव्हा माझे घरी राजंदेकर बाबाबरोबर आले़. यावेळी संगीत गप्पा- एकमेकांचे संगीतातील नवीन उपक्रम ह्यातूनच एक स्नेहबंध जुळत गेला़. पुढे अधुन मधुन एकमेकांची विचारपूस करणे, नवीन वार्ता कळवणे वगैरे देवाण घेवाण सुरू झाली़. सुरेश भट, नारायण कुळकर्णी कवठेकर आणखी काही वैदर्भीय कवी यांच्या एकत्रीत परिचयाचे दुवे जुळले़.
 सुधाकर कदम यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावचे़. त्यांच्या परिचयामुळेच हे गांव कळले. त्यांचे काम ही कळले़. गाण्याबरोबरच हार्मोनियम, सरोद वादनातील त्यांची गती कळली़. तब्येतीच्या तक्रारी झेलत संगीत साधनेचे काम ते नेटाने करताना आढळले़. १९९६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ललितकला मानद शिक्षिका म्हणून मी काम करत असल्याने कदमांविषयी डॉ़. भारती वैशंपायन ह्यांच्याशी बोलून, सुधाकर कदमांना सुगम संगीताची कार्यशाळा घेण्यास निमंत्रण दिले़. ह्याच सुमारास श्री कदमांचे ‘सरगम’ हे शालोपयोगी विविध गीत प्रकारांच्या स्वरलिपीचे पुस्तकही पाहण्यात आले. त्यातील एक दोन गीते सामुदायिकरित्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवली़. ह्या निमित्ताने दोन तीन दिवस सौ़. कदमांसह ते विद्यापीठ गेस्टरुममध्ये राहिले़. त्यांची शिकविण्याची सुंदर धाटणी, प्रसन्न व्यक्तिमत्व ह्यामुळे विद्यार्थी वर्ग खुश होता़. समुहगीते चांगल्यातर्‍हेने तयार झाली़. चाली सोप्या पण आकर्षक होत्या़. सहसा गायक व संगीतकार एकत्र मिळत नाहीत. पण कदमांचे ठायी हा दुर्मिळ योग आहे़. त्यांनी मलासुध्दा बर्‍याच सुरेख चाली देऊन गाणी सांगितली आहेत़. नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला़. संपूर्ण महाराष्ट्रभर असे गीत प्रचाराचे कार्य करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्णार्थाने साकार झालेले नाही़. सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे सततचे सहकार्य अपेक्षित आहे़.
 मला आमच्या या कलाकाराचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे़. आर्णी सारख्या गावात राहुनही त्यांनी मोठे प्रचारकार्य केले आहे़. सामाजिक बांधिलकी जपली आहे़. पुण्या-मुंबईत वास्तव्य असते तर अशा कलाकाराचे अधिक चीज झाले असते़. संगीताबरोबरच चित्रकलेचे अंग ही कदमांकडे आहे़ जिथे संगीत असते तिथे चित्रकलाही जुळ्या बहिणीप्रमाणे हजर असते़. अशा या कलाकाराचा परिचय मला राजंदेकर बाबामुळे जवळून झाला. व संगीत स्नेहबंध दृढ झाले ह्याचा मनाला फार संतोष वाटतो़.

३५/जी३ प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटी, रंकाळा पार्क, कोल्हापूर
----------------------------------------------------------------------
(प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' मधून...)


 

 


 

कलादूत - आशिष ढबाले



        ’शुन्यातून विश्व निर्माण करणे’ प्रत्येकालाच जमते असे नाही.परंतू सुधाकर कदम याला अपवाद आहेत.
आर्णीसारख्या छोट्याशा गावात राहूनही त्यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आपला रसिक वर्ग निर्माण केला.आज सुधाकर कदम यांना विविध क्षेत्रातील मान्यवर ओळखतात.याला कारण त्यांचे विस्तारलेले कार्यक्षेत्र !वारकरी संप्रदायात रमणारे वडील पांडुरंगजी कदम यांचेकडून संगीताचे बाळकडू मिळालेल्या तसेच भाग्योदय कला मंडळाच्या ’शिवरंजन’ ऑर्केस्ट्रापासून (१९६५) संगीताची कारकीर्द सुरू करणाऱ्या सुधाकर कदम यांनी केवळ गायक म्हणून मर्यादित न राहता ऑर्गन,हार्मोनियम,मेंडोलिन,तबला,सरोद ही वाद्येही अपार मेहनत घेऊन आत्मसात केली.नागपुर आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व वादक झालेत.
         आर्णीच्या महंत दत्तराम भारती विद्यालयात (१९७२) संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी संगीताचे वाळवंट असलेल्या या गावात गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना केली.पालक व विद्यार्थ्यांमध्ये संगीतप्रेम निर्माण करण्याकरीता पं.पलुस्कर व पं.भातखंडे यांच्य़ा पुण्यतिथी निमित्त संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले.वाढती विद्यार्थी संख्या व पालकांचा प्रतिसाद पाहून सुधाकर कदम यांनी विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा म्हणून स्वतःच्या खिशाला खार लावून छोट्या स्वरूपात कार्यक्रम करण्यास सुरवात केली.सादरीकरणाबरोबरच विद्यार्थ्यांना भविष्याचे दृष्टीने फायद्याचे रहावे या करीता त्यांना संगीताच्या विविध परीक्षांना बसविण्यास सुरवात केली.त्यासाठी महत्प्रयासाने अखिल भारतीय संगीत महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्र मिळवले.(१९७३ ते २००३ पर्यंत त्यांनी केंद्र व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.)
         नौकरी,संसार,संगीत वर्ग.स्वतःचा रियाज या सर्व गोष्टी सांभाळीत त्यांनी संगीताचा प्रसार व प्रचार वाढविण्याच्या दृष्टीने वर्तमानपत्रातून संगीतविषयक लेखन सुरू केले.त्याचबरोबर हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रकाशित होणाऱ्या भारतीय संगीताला वाहिलेल्या एकमेव अशा “संगीत” मासिकाकरीता “नग़्म-ए-ग़ज़ल’ व “प्रसारगीत” या स्तंभाकरीता संगीत संयोजन व स्वरलिपी तसेच मुंबईच्या “नादब्रह्म”,”संगीत अध्यापक” या त्रैमासिकांकरीता लेख.सांगीतिक शब्दकोडे,विविध कवींच्या मराठी-हिंदी गीतांना चाली लावून त्याची स्वरलिपी प्रसिद्ध करणे सुरू केले.
         महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रमा करीता फिरताना आलेले गमतीशीर अनुभव मांडण्याकरीता नागपुरच्या तरूण भारत या दैनिकात “विषयांतर” या सदरासाठी स्फूट लेखन केले.इयत्ता १ ते १० वी च्या
पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून शैक्षणिक दृक-श्राव्य साधन म्हणून ’झुला’ नामक ऑडिओ-व्हिडिओ कॅसेटची निर्मिती केली.नागपुर आकाशवणीच्या “ग्रामीण कला क्षेत्र” या कार्यक्रमाकरीता लोकगीतांचे संगीत नियोजन करून कार्यक्रम दिलेत.पुण्याच्या बालचित्रवाणी करीता समुहगीते संगीतबद्ध केली.यवतमाळ जिल्ह्यावरील माहितीपटाचे शिर्षक गीत स्वरबद्ध करून निवेदनही केले.आकाशवाणी पुणे करीता “अशी गावी मराठी गझल” या कार्यक्रमाचे विशेष ध्वनिमुद्रण १९८२ मध्ये करण्यात आले.यवतमाळ जिल्हा प्रौढ साक्षरता अभियानांतर्गत तयार झालेल्या “अक्षरगाणी” या साक्षरतापर गीतांच्या ध्वनीफितीचे संगीत दिग्दर्शनही केले.
          कवितांची ऑडिओ व व्हिडिओ विकत घेणे प्रत्येकाला सोईचे नाही ही, जाणीव ठेवून त्यांनी “एक सूर-एक ताल” नामक राष्ट्रीय एकात्मतापर गीतांचे पुस्तक प्रकाशित केले.अतिशय महत्वाचे व महत्वाचे म्हणजे सार्क देशाच्या “राष्ट्रीय संगीत” या ग्रंथात सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केलेल्या तीन हिंदी गीतांचा समावेश होणे, हे महाराष्ट्रवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.
          सुधाकर कदम यांनी केवळ स्वार्थी दृष्टीकोन न ठेवता परिसरातील कलावंतांना मंच मिळावा म्हणून “सरगम” संस्थास्थापन केली.नाट्यप्रेमी लोकांना
एकत्र करून “अभिनय” या संस्थेची स्थापना करून कित्येक वर्षे विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले.भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थी तयार करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेच्या वतीने होणाऱ्या “गीतमंच” द्वारे मार्गदर्शक म्हणून अनेक वर्षे हजारो विद्यार्थ्यांकडून शिबीराद्वारे गीतमंचाची गीते बसवून घेतली.यात त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक गाणी होती.त्यातील कुसुमाग्रजांचे ’महाराष्ट्रगीत’ महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी अजूनही गात आहेत.तसेच “अशी गावी काविता” हा शैक्षणिक कार्यक्रमही जिल्हाभर यशस्वीपणे राबविला.
नेहरू युवक केंद्र यवतमाळाच्या सहाय्याने अनेक सांस्कतिक कार्यक्रमात सहभाग.यातील महत्वाचा म्हणजे पंजाबातील जगरांव येथील नुकतेच ’ब्ल्यू स्टार’ ऑपरेशन झाले असताना अतिरेक्यांची दहशत असतानाही तेथे जावून राष्ट्रीय एकात्मता शिबीराकरीता त्यांनी दिग्दर्शित केलेला “महाराष्ट्र दर्शन” हा कार्यक्रम होय.
          माहूरगडावर ललिता पंचमीच्या संगीत महोत्सवाचे आयोजन व निवेदन अशा दोन्ही भूमिका त्यांनी अनेक वर्षे निभावल्या.यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या १९९३ मध्ये जवळ पास १३०० शिक्षकांना “एक सूर-एक ताल” या मोहिमे अंतर्गत कविता गायनाचे प्रशिक्षण दिले.परंतू 
मुळातच अती संवेदनशील असणाऱ्या या कलावंताने संगीता सोबतच समाजकार्यातही तितक्याच मोठ्या प्रमाणात झोकून दिले.जनसामान्यातील स्वच्छ 
प्रतिमेमुळे हा कलाकार येथेही अग्रेसर राहिला.आपल्या परिसरात अल्पबचतीचे महत्व पटवून देऊन वृक्षारोपणासारखे राष्ट्रीय उपक्रम आपल्या युवा सोबत्यांच्या सहकार्याने राबविले.गरीब होतकरू विद्यार्थ्यांना संगीत साहित्य उपलब्ध करून दिले.शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यास प्रोत्साहन देऊन जनमानसात अभिरुची वाढविली.
           जवळ जवळ ११ वर्षे पत्रकारिता केली.आर्णी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष स्थानही त्यांनी अनेक वर्षे भूषविले.”कलावैदर्भी” या संस्थेद्वारे विविध क्षेत्रातील लोकांना सन्मानित केले.या सगळ्या धबडग्यात शालोपयोगी गीतांच्या स्वरलिपीचे “सरगम” व तरूण भारत वृत्तपत्रातील विषयांतर सदरात प्रकाशित झालेल्या स्फूट लेखांचे “फडे मधुर खावया...” ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली.यातील “सरगम” या पुस्तकाला इचलकरंजी फाऊंडेशानचा ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्कारही मिळाला.
        अशा या मनस्वी कलावंताच्या संगीत व मराठी गझल गायनातील योगदानाची दखल घेऊन अनेक संस्थांनी पुरस्कृत केले.पण विदर्भातील कलावंत पुण्या-मुंबईत गेल्याशिवाय विदर्भातील जनता त्यास मोठा कलावंत मानत नाही.हे आमचे दुर्दैव... एक वर्षापूर्वी हा वैदर्भीय कलावंत पुण्यात स्थायीक होऊन कार्यक्रम,म्युझिक अल्बम द्वारे कार्यरत झाला.गायक,संगीतकार,पत्रकार,लेखक,कवी,शिक्षक,
समाजसेवक अशा अनेक भूमिका लीलया पार पाडणाऱ्या या कलाकारास “कलादूत” पुरस्कारा निमित्त विदर्भातील सर्व रसिकांच्या हार्दिक शुभेच्छा !

(कलादूत पुरस्काराच्या निमित्त)
दैनिक लोकदूत,यवतमाळ.दि.२१.११.२००४
____________________________________________
डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित आणि #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून ...



 

सरगम - मधुरिका गडकरी



      विदर्भातील रसिले गझलगायक म्हणून सुधाकरजी कदम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरूपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे.यवतमाळजवळील आर्णी येथील गांधर्व संगीत विद्यालयाचे ते प्राचार्य आहेत.त्यामुळे संगीत संवर्धनाचे,अध्यापनाचे त्यांचे कार्य सतत सुरू असते.संगीताची ओळख,जाण विद्यार्थ्यांना करून देतानाच गीतमंच,एक सूर एक ताल, कविता,गायन,वगैरे अनेक उपक्रमही त्यांच्या नावावर जमा आहेत.आणि हे सारे करता करताच विद्यार्थ्यांकरता त्यांनी अनेक सुंदर स्वररचना तयार केल्या.यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमधून ही गाणी समूह स्वरूपात सादर होत असतात.
       'सरगम' या पुस्तकात विद्यार्थ्यांना गाता येतील व सहज समजतील अशा सुलभ व मधुर स्वररचना श्री.कदम यांनी पेश केल्या आहेत.मराठीतील नामवंत कवींच्या उत्तम काव्यरचनांना त्यांनी संगीतबद्ध केले आहे.महाराष्ट्रातील सर्व संगीत शिक्षकांनी प्रस्तुत रचना सरगम मार्गदर्शनानुसार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या,तर संपूर्ण संगीत जगतासाठी तो एक प्रशंसनिक उपक्रम ठरू शकेल निःसंशय!
           'सरगम'ला प्रस्तावना देण्यात यशवंत देव व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कुठेही कमतरता ठेवली नाही.शब्दांची कुठलीही कंजुषी केलेली नाही.परंतु पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते संलग्न व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक नव्हे अनिवार्य असते.त्याबाबतीत मात्र संगीताच्या दुनियेतील मान्यवरांचे अपेक्षित सहकार्य सरगम प्रसारणासाठी लाभलेले नाही हे कटू सत्य आहे.सुधाकरजी कदम यांची धडपड केवळ 'सरगम' प्रकाशनापुरती नसून,ते पुस्तक संगीतोपासक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे ही आहे.अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कवींच्या सुंदर व लोकप्रिय रचना निवडताना त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय पानोपानी येतो.संपूर्ण गीत लिपीबद्ध करताना वाद्यवृंदासाठी आवश्यक असलेला स्वरसमूह देखील वेगवेगळा लिपीबद्ध केलेला आहे.एकूण,पाश्चात्य पद्धतीप्रमाणे ऑर्केस्ट्रा संचातील प्रत्येक वाद्यांसाठी केलेली स्वतंत्र स्वरबद्धता त्यांनी या पुस्तकात वापरली आहे.आज अगदी लहानसहान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगीत हा विषय शिकवला जातो.त्यामुळे संगीताची जुजबी ओळख विद्यार्थ्यांना करून देणे; त्यासाठी संगीत शिक्षकांना अतिशय उपयोगी ठरणारे असे हे पुस्तक आहे.संगीत जगताच्या प्रथम पायरीवर पाऊल ठेवताना सर्वांसाठी मौलिक ठरणारी सुधाकर कदमांची ही 'सरगम' आहे.
           'सरगम' निर्मिती विद्यार्थ्यांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्हावेत,धार्मिक,प्रांतिक व भाषिक विवादीत्व संपून त्यांची शक्ती राष्ट्रउभारणीच्या विधायक कार्यास लागावी या उच्च  हेतूने केली असल्याचे कदम यांनी पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रातील तमाम संगीत शिक्षकांनी ही गीते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली तरच माझ्या प्रयत्नाचे चीज होणार आहे,अन्यथा... हे अंतरीच्या गाण्यातील उद्गारही यात व्यक्त झालेले आहेत.सरगम निर्मितीसाठी प्रोत्साहित करणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकींपासून संगीत क्षेत्रातील  अनेक दिग्गजांचे जे प्रोत्साहन त्यांना वेळोवेळी लाभले,त्या सर्वांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख प्रस्तावनेत आहे.यावरून सरगमची श्रेष्ठ मौलिकता सिद्ध होते.
           कविवर्य कुसुमाग्रज,विंदा करंदीकर,गौतम सुत्रावे,वा.गो.मायदेव,द.ना.गवाणकर,गोविंद, शंकर बडे,वसंत बापट,संत तुकडोजी महाराज,बहिणाबाई चौधरी,शिवा राऊत,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे, शंकर वैद्य,कलीम खान,विजय देशमुख,गजेश तोंडरे,सौ. मंगला पत्की,कृष्णराव भट्ट,माया भट्टाचार्य, नर्मदाप्रसाद खरे,रवी शुक्ल,इ.नामवंत कवींच्या रचनांना संगीताच्या उपासकांनी,विद्यार्थ्यांनी अधिक लोकाभिमुख करावे म्हणून हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच,पण अनुकरणीयही.
            'सरगम'ची मौलिकता फार मोठी आहे.पण सरगमची खरी उपयुक्तता शाबीत होण्यासाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी उदार मानसिकता व संपूर्ण सहकार्य सर्वार्थाने आवश्यक व अपेक्षित आहे.भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात आगामी सव्वीस जानेवारीपासून या पुस्तकानुरूप विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावभक्तीयुक्त रचनांची ओळख व त्यांच्या फुलणाऱ्या गायकीतून त्याचे प्रसारण झाल्यास 'सरगम' निर्मितीमागील लेखकाचा उद्देश संपूर्णतः फलद्रुप होऊ शकेल.शिक्षक क्षेत्रातील व सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सरगमची दखल खऱ्या अर्थाने घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी तसेच दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शाळाशाळांतून वितरीत करावी इतकाच मानस प्रस्तुत सरगम समीक्षालेखनाचा आहे.आर्णीसारख्या महानगरांपासून दूर असलेल्या ठिकाणच्या एका गुणी,विद्वान,मान्यवर संगीत प्राचार्यांच्या प्रस्तुत 'सरगम'चे स्वागत व उपयोग तमाम रसिक व शासनासाठी एक फार मौलिक उपलब्धी आहे हेच खरे!

रविवार दि. १ नोव्हेंबर १९९७
------------------------------------------------
मधुरिका गडकरी
४९,फ्रेंड्स ले-आउट नं.४ 
रवींद्र नगर,नागपूर २२
-------------------------------------------------

प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' मधून...




 





संगीत आणि साहित्य :