गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, August 21, 2024

वर्तमानपत्रीय...यवतमाळ साहित्य सम्मेलन...







 

यवतमाळ जिल्हा साहित्य सम्मेलन, अध्यक्षीय भाषण...

 रविवार दि.१८ ऑगष्ट २०२४...

     सर्वप्रथम वऱ्हाडी कवी सुहास राऊत आणि अशोक मारावार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या संमेलनास माझ्या हार्दिक शुभेच्छा जाहीर करतो.


     यवतमाळ जिल्ह्यात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे.कारण यवतमाळ जिल्हा इतिहास संशोधक,साहित्यिक,

संगीतकार,लेखक,कवी यांची खाण आहे.इतकेच नव्हे तर राजकारण व समाजकारणातही यवतमाळ जिल्हा मागे नाही.आपल्या जिल्ह्याला फार मोठी परंपरा आहे.मुळात विदर्भ भूमीच फार प्राचीन आहे.महाभारतात उल्लेख असलेले रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर विदर्भात आहे.आणि अशा या विदर्भात आपले यवतमाळ आहे.

     प्रत्येक शहराचा आणि जिल्ह्याचा अभ्यास करतांना किंवा त्याबाबत माहिती घेतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्या त्या जिल्ह्याला शहराला एक इतिहास असतो. यवतमाळ शहराला देखील इतिहासाची अशीच किनार लाभलेली आहे. या भागाने अनेक राजे महाराजांचा उदयास्त पहिला आहे. मौर्य , सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव वगैरे वगैरे, अकबराच्या दरबारातील इतिहासकार अबुल फजल याने लिहिलेल्या 'आईना-ए-अकबरी' मध्ये 'यवत' चा उल्लेख आढळतो तो 'योत' असा अपभ्रंश होऊन.

    पुढे १८५३ ला यवतमाळ जिल्हा ब्रिटीशांच्या सत्तेखाली आला.

१९०३ ला यवतमाळला हैदराबादच्या निजामाने करारावर घेतले होते. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.

     यवतमाळचे पहिले पत्रकार पृथ्विगीर हरिगीर गोसावी हे होते.त्यांनी 'हरिकिशोर' हे साप्ताहिक सुरू केले.पुढे चालून गोसावी आणि त्यांचा संप्रदाय' या शीर्षकाचा ग्रंथ लिहिला त्यामुळे यवतमाळच्या सुरुवातीच्या साहित्यिकांमध्ये यांचं नाव घेतलं जातं.

     लोकनायक बापूजी अणे यांचं संस्कृत भाषेतील १२ हजार श्लोकांचं 'तिलकयशोर्णव' नावाचं तीन खंडात  लिहिलेलं महाकाव्य आणि 'अक्षर माधव' त्यांच्या साहित्यसेवेची साक्ष देतं.

     प्रसिद्ध संशोधक य. खु. देशपांडे यांनी इतिहास संशोधनासोबतच, सांकेतिक लिपीचा केलेला अभ्यास आणि 'महानुभावी मराठी वाङ्मय', 'राजे उदारामांचा इतिहास' हे ग्रंथ लिहिले आहे.

     प्र. रा. देशमुख यांच्या 'ऋग्वेद आणि सिंधू संस्कृती' या मराठी व इंग्रजी भाषेतील आवृत्तीला देश-परदेशात लोकमान्यता मिळाली आहे.

     प्रसिद्ध कवी,कादंबरीकार पांडुरंग श्रावण गोरे यांचे 'वाणीचा हुरडा' व 'बोबडे बोल' हे काव्य संग्रह आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर लिहिलेली 'कात टाकलेली नागीण' ही कादंबरी प्रसिद्ध आहे.वऱ्हाडी बोलीमध्ये विशेषत: वऱ्हाडी ठसक्यात जेव्हा वऱ्हाडी संस्कार, रूढी-परंपरा, भलावण तसेच वऱ्हाडी वातावरण सांगितले जाते,; तेव्हा वऱ्हाडी गीत तयार होते -' असं ते म्हणायचे.माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे घरी यायचे.त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा माझ्यावर निश्चितच प्रभाव आहे.

     भाऊसाहेब पाटणकर हे यवतमाळातील गाजलेलं एक नाव आहे.त्यांचे 'दोस्तहो' आणि 'जिंदादिली' हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.भाऊसाहेबांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते.गणेशोत्सव,दुर्गोत्सवात आमचे कार्यक्रम व्हायचे.

     यवतमाळात नाट्यचळवळ पण जोरात होती.मला आठवते त्या प्रमाणे आशाताई बर्वे या चळवळीच्या प्रमुख होत्या.त्यांनी बसविलेल्या 'दिवा जळू दे सारी रात' या नाटकाला मी संगीत  दिले होते.दुसरे नाटक होते 'चांदणे शिंपीत जा' शिवाजी रंग मंदिर या संस्थेने बसविलेल्या या नाटकात 'हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली' हे गाणे होते....ते गाणे पियानोच्या पार्श्वसंगीताससह रेकॉर्ड करायचे होते.यवतमाळात पियानो फक्त बिब्लिकल सेमीनरीमध्येच.म्हणून येथील चर्च मध्ये जाऊन माझ्या सहगायिका प्रमोदींनी मॅथ्यू यांच्या आवाजात रेकॉर्ड केले.

     दिघेकर, हरीश मानधना,जयंत भट,राजा सराफ ,श्रीकृष्ण मिश्रा,प्रवीण जानी,शशी देशपांडे,अशोक एकबोटे,राजन टोंगो, रोहिणी टोंगो,शंकरराव सांगळे,स्नेहलता 

बोबडे, बक्षी,अशोक आष्टीकर,महेश पटेल,गोपाळ पाटील,जयंत वर्मा,सुहास वराडपांडे, प्रशांत गोडे ,मुन्ना गहरवाल सतीश पवार ,अमित राऊत ,रवी ढगे ,अमर गुल्हाने, राजाभाऊ भगत, सदानंद देशपांडे ,

प्रशांत बनगिनवार ,काशिनाथ लाहोरे ,अजय शेटे हे चळवळीचे जुने नवे मानकरी.

     शरच्चंद्र टोंगो हे ही यवतमाळचेच.आमचे ते 'सर' होते.त्यांची स्वीकार' कादंबरी व 'नव्या डहाळ्या, नवे खोपे' हे नाटक गाजले होते.

     कासलीकर गुरुजी ,पनके गुरुजी,दादा पांडे यांनी यवतमाळातील संगीत क्षेत्र जिवंत ठेवून विद्यादानाचं फार मोठं कार्य केलं आहे.संगीत क्षेत्रातील माझी जडण-घडण वरील मंडळीमुळे व साहित्यिक जडण-घडण आदरणीय पांडुरंग गोरे काका,टोंगो सर, कळणावत सर यांच्यामुळे झाली आहे.आणि लेखक , कवी म्हणून घडविण्यात तरुण भारतचे संपादक मित्रवर्य स्व. वामन तेलंग यांचा फार मोठा वाटा आहे.

    प्राचार्य राम शेवाळकर यांनी विपुल साहित्य निर्मिती केली ओजस्वी, प्रवाही, प्रबोधनपर आणि रसपूर्ण व्याख्यानांसाठी ते प्रसिद्ध होते.

     'भाग्योदय कला मंडळ' संचालित यवतमाळातील पहिला आर्केस्ट्रा आम्ही १९६५ मध्ये स्थापन केला होता.या ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम विदर्भच नव्हे तर मराठवाड्यात सुद्धा गाजले होते.

     प्रसिद्ध वऱ्हाडी कवी माझा जिवलग मित्र शंकर बडे याचं वऱ्हाडी कवितेच्या क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचा 'बॅलिस्टर गुलब्या' हा प्रहसनात्मक एकपात्री प्रयोग महाराष्ट्रभर गाजला.विशेष म्हणजे हे नाव आर्णीच्या एका कार्यक्रमा नंतर मीच ठरवून यावर एक लेख लोकसत्तामधून प्रसिद्ध केला होता.शीर्षक होते ' 'ब्यालिस्टर' शंकर बडे.

     आर्णीला असताना माझ्या कवितांची सुरुवात विडंबन गीतांनी झाली.पुढे पुण्याला गेल्यावर नवीन काही सुचले की वृत्तबद्ध करून फेसबुकवर टाकायचो.तेथील प्रतिसाद माझ्यासाठी उर्जादायी ठरला, व तेथून माझ्या काव्यप्रवासाला सुरवात झाली.माझी पहिली रचना होती...


"सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी, प्रीये तुझ्याचसाठी..."

नंतर षडाक्षरी,अष्टाक्षरी,कविता,गझल असे बरेच काही प्रकार उतरत गेले.


चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात

राबतो शेतात। सालोसाल...

जीवापलीकडे। मेहनत करी

तरीही भाकरी। मिळेचि ना...

ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी

लिही कादंबरी। मुंबईत...


      वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून  आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर  व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा, कादंबरी, कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून  त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा मोठा विरोधाभास आहे! 


"घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल

कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल"


      शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या  वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती  म्हणून संबोधणे हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये सर्वप्रथम मी केले असावी असे मला वाटते.  सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती तशी 'कष्टवती' !    

मी शेतकरी कुटुंबातील असून माझ्या आयुष्यातील बराचसा काळ ग्रामीण भागात गेला आहे.


अवघं लाघव हिरवं तुडुंब

द्यावी वाटे येथे मनालाही डूब

भरल्या  शेताच दर्शन घडता

सृष्टीपुढे झुके आपसुक माथा


     बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून  ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे. 


"ना मी कृष्णा ना तू राधा

का व्हावी गे सावळ बाधा ?"


      ही राधा-कृष्णाची प्रीत आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर मी कवितेत करतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार यावरील दोन ओळी बघा... 


"ना महाभारत, न रामायण तरीही

जानकी अन् द्रोपदी लागे पणाला"


    मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे  असे तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी  आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू बनल्याचे कुठे कुठे दिसून येते.म्हणून जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे मला आवर्जून वाटते. शब्दाचे ऋण मानावे, 


आकळेल अर्थ

घालता आवर्त

एका एका आर्त

शब्दाचा तो...


शब्दाचा तो भाव

समजून घेता

संपेल आर्तता

मनातील... 


    कविता,कथा, कादंबरी फक्त ग्रांथिक भाषेतच असावी असे काही नाही.ग्रांथिक म्हटल्या जाणारी भाषा बोलीतूनच जन्माला आली आहे.तिची श्रीमंती बोलीभाषेमुळेच वाढली व वाढत आहे. विदर्भाचाच विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यात गमतीशीर असा थोडा फार फरक पडलेला दिसतो.आपली मायबोलीच जेव्हा पन्नास कोसावर 'चाल' बदलते, तेव्हा तर आणखीनच गंमत येते. बुलढाणा जिल्ह्यात 'ळ'चा उच्चार 'ड' असा केल्या जातो. त्यामुळे डाळीला दाड, केळीला केडी, फळाला फड, गुळाला गुड, तळ्याला तडे म्हटल्या जाते. तेथील डॉक्टर लोक या लोकांना 'अर्धी गोडी सकाडी व अधीं गोडी संध्याकाडी उकडलेल्या पाण्यासोबत घ्या' असे गंमतीने सांगतात. हाच 'ळ' अमरावती जिल्ह्यात 'य' बनतो. तेव्हा गुळाचा गुय, केळाचे केय होते. तिकडे झाडीपट्टीत तर आणखीनच वेगळे काम आहे तेथे 'ळ'चा 'र' होतो व 'ज' 'च' चा उच्चार ज्य, च्य होतो. 'बाजारात जाशील तर तुरीची डाळ व चांगला गूळ आणशील' हे वाक्य 'बज्यारात ज्याशीन त तुरीची डार अन् च्यांगला गूर आनज्यो' असे रूप घेते.

    सर्वश्री द.बा. महाजन,बाबाजी दाते,आबासाहेब पारवेकर,बाबासाहेब घारफळकर,बळीरामपंत एकबोटे,,हरितक्रांतीची बीजे पेरणारे वसंतराव नाईक,सुधाकरराव नाईक,जवाहरलालजी दर्डा,भूगर्भ शास्त्रज्ञ वामनराव मेत्रे,सदाशिवराव ठाकरे,डॉ.भास्कर टेंबे, वा.ना.देशपांडे, दामले वकील,अरुण हळबे, डॉ.रमाकांत कोलते,शामा कोलाम,दीपक शिंदे,आजीबाई बनारसे,विदर्भवीर जांबुवंतराव धोटे,डॉ.बाबासाहेब नंदुरकर,दादासाहेब वगारे,मायदेवी भालचंद्र,डॉक्टर काणे,डॉ.शैलजा रानडे, गोविंद देशपांडे, गौतम सूत्रावे,माधव सरपटवार,शरद पिदडी, भाऊ मांडवकर, शिवा राऊत, दिनकर दाभाडे, मूळचे अकोल्याचे पण गेल्या चार वर्षांपासून पुसदवासी झालेले ज्येष्ठ गझलकार मित्र श्रीकृष्ण राऊत, दिलीप अलोणे, नीलकृष्ण देशपांडे, कलीम खान, मिर्झा रफी बेग, गजेश तोंडरे,रवी चापके, पुनीत मातकर, जयंत चावरे, विद्या खडसे, आनंद  गायकवाड ,प्रा. सागर जाधव, सिध्दार्थ  भगत,मसूद पटेल, गजानन वाघमारे सुरेश गांजरे, रमेश घोडे, विनय मिरासे,स्मिता गोरंटीवार, मीनाक्षी गोरंटीवार,आरती पद्मावार,कविता शिरभाते, निशा डांगे,अल्पना देशमुख - नायक, सोनल गादेवर,अशोक राणा,  विवेक कवठेकर, नितीन पखाले, मोरेश्वर चरेगावकर, अजय देशपांडे, स्वानंद पुंड,अ.भा. ठाकूर,देवेंद्र पुनसे यांनी आपापल्या क्षेत्रात लक्षणीय काम करून यवतमाळ जिल्हा सर्व दृष्टीने संपन्न केला आहे.

     संमेलन म्हणजे फक्त वाद नसतात, साहित्यातलं राजकारणही नसतं. मला वाटतं नवीन विचार पेरणारी प्रेरणास्थळं म्हणून आपण या संमेलनाकडे पाहावं. हा चष्मा सकारात्मकतेचा असला तरच पुढच्या काळात या मंथनातून साहित्यातील नव्या सृजनाचं 'अमृत' येणाऱ्या पिढीला मिळत राहते.एखाद्या लेखकाच्या लेखनउर्मीला ऊर्जा आणि लेखनविषयांना विविधता मिळण्यासाठी कर्तृत्ववान आणि सर्वमान्य असणाऱ्या असामान्य व्यक्तीने केलेले आवाहन महत्त्वाचा प्रेरणास्रोत ठरते.

आणि शेवटी....

हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे

असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे


कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे

खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे


सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे

पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे


मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या

म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे


हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही

कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे ?


-गझलगंधर्व सुधाकर कदम







संगीत आणि साहित्य :