गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, September 16, 2023

राग-रंग (लेखांक २४) केदार

"Music is a higher revelation than all wisdom and philosophy" Ludwigvan Beethoven. केदार हा एक प्राचीन राग आहे,राग केदार, ज्याला केदारा पण म्हटल्या जाते. शिवाच्या (शंकर,महादेव) नावावरून हे नाव ठेवल्याचेही बोलल्या जाते.ज्यात ख्याल, ठुमरी, ध्रुपद अशा शास्त्रीय गीत प्रकारच्या विभिन्न शैलीं सोबतच यावर इस आधारित हल्के शास्त्रीय गीत सुद्धा सामिल आहे. गुरु ग्रंथ साहेबानुसार राग केदारा (ਕੇਦਾਰਾ) मनाला आत्माच्या वास्तविक चरित्राला अवगत करते. (थोडे विषयांतर होईल पण हे मांडणे मला आवश्यक वाटते.मी मागील लेखात लोक संगीता विषयी बोललो होतो.जगातील सर्व देशातील लोकसंगीताचा अभ्यास केला तर सर्वत्र काही ना काही साम्य आढळतेच.हंगेरीच्या जिप्सी समुदायातील लोकगीतांमध्ये 'शिवरंजनी' रागाचे स्वर सापडतात.सैबेरीयाच्या लोकसंगीतात 'सिंदूरा', रशियाच्या स्योलेन्सखमध्ये 'भूपाली',दून नदीच्या आसपास 'दुर्गा', किवमध्ये 'झिंझोटी','गुणकली','जौनपुरी',येरवानमध्ये जोगिया.मंगोलियाच्या राष्ट्रीय वाद्यवृन्दामध्ये 'भूपाली','धानी','मालकौंस','मेघ' आणि 'दुर्गा' रागांचे दर्शन झाल्याचे 'संगीत चिंतामणी'कार आचार्य बृहस्पती यांनी त्यांच्या ग्रंथात नमूद करून ठेवले आहे.यावरून संगीताला भाषेचे बंधन नसते हे लक्षात येते.एखादी गोष्ट माहीत नसणे हा काही अपराध नाही,पण माहिती असून मुद्दाम त्याकडे लक्ष न देणे वा माहिती असून खोटे ठरविणे हे मात्र अत्यंत वाईट आहे.संगीताचे बाबतीत नीर क्षीर विवेक बुद्धीने त्या त्या बाबींचे विश्लेषण करायला हवे.जगात सर्वत्र सात स्वर मान्य आहेत.या स्वरांच्या संवादातून प्राचीन काळी त्या त्या प्रांतात अनेक सुरावटी तयार झाल्या.त्या लोकसंगीताच्या स्वरूपात आजही जिवंत आहेत.) केदार राग आपल्या समोर प्रत्येक वेळी गंभीर,जटिल, समृद्ध, मादक, सुखदायक,प्रणयी आणि उत्थानकारी अशा वेगवेगळ्या रुपात आपल्या समोर येतो.रागदारी ही लोकरीच्या गुंडाळ्यासारखी आहे.धागा ओढत जा स्वेटर विणत जा...प्रत्येक क्षणाला नवनवीन वीण. ज्याची जशी मेहनत तशी त्याची कलाकुसर.प्रत्येकाचा पोत वेग-वेगळा.यात कल्पनाशक्तीला पण भरपूर वाव असतो. कलाकारी केली तर खरंच हे अफाट काम आहे. केदारमधील मी सर्वप्रथम शिकलो ती 'सोच समझ मन मीत पिहरवा' त्यावेळी 'सोचण्याची' व समजण्याची कुवत नसल्यामुळे अर्थ कळला नाही.पण राग स्वरूप कळून आले.त्यातील स्वरांची गोडी कळून आली.स्वरांचं एक बरं असतं.शब्द मिळाले तरी छान, न मिळाले तरी छान. सोबतीला शब्दच हवेच असा काही आग्रह नसतो.आणि आलेच तर नाही पण म्हणत नाही.तसे नसते तर वाद्यसंगीत रसिकप्रिय झालेच नसते.तसेच शब्द स्वरांची सांगड तर कुणालाही आवडणारच ना! 'कान्हा रे,नंद नंदन' ही केदारमधील माझी आवडती अशी एक लडिवाळ चीज आहे.ज्या कोणी ही बंदिश केली त्याला साष्टांग दंडवत.हा सायंकाळी उशिरा गायिल्या जाणाऱ्या रागांमध्ये सगळ्यात लोकप्रिय रागांपैकी एक आहे.ज्या कोणी केदार रागाची रचना केली,त्याच्या सांगीतिक जाणिवेची व बुद्धिमत्तेचे कौतुक करावेसे वाटते.१७ व्या शताब्दीतील ग्रंथांनुसार केदार राग मोगल कालीन संगीतकारांचा आवडता असून मैफलीतील प्रमुख रागापैकी एक होता,असे संगीत विद्वानांचे मत आहे. केदार रागाला दक्षिण भारतीय संगीत पद्धतीने पण स्वीकारले आहे.ज्याला 'केदारम्' म्हटल्या जाते.यात अनेक संगीतकारांच्या कलाकृती आजही आपण ऐकू शकतो.जसे त्रिमूर्ती संगीतकार श्री मुत्थुस्वामी दिक्षितार यांचे 'आनंद नटाना प्रकाशम्'.याच्यासारखाच कर्नाटकातील हमीर कल्याण आहे. केदार रागाचे अनेक प्रकार आहे. शुद्ध केदार,चांदनी केदार, मलुहा केदार, जलधर केदार, सावनी केदार, बसंती केदार, केदार बहार, नट केदार, आनंदी केदार, शाम केदार, तिलक केदार वगैरे वगैरे.यातील रसिकप्रिय असे काहीच प्रकार आहेत.पं.भातखंडेंच्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीनुसार केदार रागाचे चार प्रकार महत्वाचे मानले गेले आहे. १.शुद्ध केदार,२.चांदनी केदार, ३. मलुहा केदार आणि ४. जलधर केदार. ● जलधर केदार गाणाऱ्यांमध्ये पं.रामाश्रय झा 'रामरंग', पं.गणपतराव बेहरे,गंगुबाई हंगल, पं. सी.आर.व्यास, पं. डी. व्ही.पलुस्कर, पं. भीमसेन जोशी.● मलुहा केदार :- पं. सी.आर.व्यास,उस्ताद अली अकबर खान (सरोद),डॉ. लालमणी मिश्र (वीणा),उस्ताद विलायत हुसेन खान,उस्ताद लताफत हुसेन खान,पं.के.जी.गिंडे, उस्ताद शराफत हुसेन खान,पं. भीमसेन जोशी,पं. अरुण द्रविड.निशांत पनीक्कर.● चांदनी केदार :- उस्ताद अमीर खान, बसवराज राजगुरू, श्रुती सडोलीकर,पं. बुधादित्य मुखर्जी (सतार),उस्ताद विलायत खान-उस्ताद इम्रत खान (सतार),उस्ताद शाहिद परवेज (सतार),उस्ताद तन्वीर अहमद खान.● बसंती केदार-यात बसंत आणि केदार रागाचे मिश्रण असावे हे स्पष्टपणे दिसते.हा राग उस्ताद अल्लादिया खान साहेबांनी प्रचलित केला असे म्हणतात.उच्च कोटीचे सादरीकरण पं. मल्लिकार्जुन मन्सूर, केसरबाई केरकर,मोगुबाई कुर्डीकर,मास्टर कृष्णराव, किशोरी अमोणकर.● नट केदार :- पं. राम मराठे, मोगुबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर.● केदार बहार :- पं. एस.एन. रातांजनकर. ● तिलक केदार (तिलक कामोद व केदार रागाचे मिश्रण) :- मास्टर कृष्णराव. ● श्याम केदार (श्याम कल्याण व केदार रागाचे मिश्रण) :- अब्दुल हलीम जाफर खान, निखिल बॅनर्जी (सतार). ● आनंदी केदार (नंद व केदार रागाचे मिश्रण).● मांड केदार :-बसवराज राजगुरू.● आडंबरी केदार :- मल्लिकार्जुन मन्सूर ● विविध गायक/वादकांनी सादर केलेला केदार युट्युबवर उपलब्ध आहे.उस्ताद बडे गुलाम अली खान,पं. भीमसेन जोशी, जयश्री पाटणकर,मालिनी राजूरकर,पं. शिवकुमार शर्मा (संतूर),रोनू मुजुमदार (बासरी),पं. निखिल बॅनर्जी (सतार),पं. बुद्धदेव दासगुप्ता (सरोद),रहीम फहीमुद्दीन डागर (धृपद),पं. राजन साजन मिश्र,पं. वसंतराव देशपांडे,उस्ताद राशीद खान,किशोरी आमोणकर,पद्मा तळवलकर,अश्विनी भिडे,पं. सत्यशील देशपांडे,अरुण कशाळकर,पं.उल्हास कशाळकर,पं.व्यंकटेश कुमार,पं.अजय चक्रवर्ती,अनुपमा भागवत (सतार),कौशिकी चक्रवर्ती,जयतीर्थ मेवूंडी,अपूर्वा गोखले,ओंकार दादरकर,सावनी शेंडे,मौमिता मित्रा,राजेंद्र कुलकर्णी (बासरी),सुचिष्मीता दास,मनाली बोस,पुर्बायन चटर्जी (सतार),पं. पिनाकीन व्यास वगैरे वगैरे... केदारमधील तराण्यावर एक नृत्य पण उपलब्ध आहे. ● केदार रागावर आधारित चित्रपट गीते... 'पंछी बावरा चांद से प्रीत लगाये' खुर्शीद. चित्रपट-भक्त सूरदास (१९४२). 'उठाये जा उनके सितम' लता.चित्रपट-अंदाज. संगीत-नौशाद (१९४९). 'मैं पागल मेरा मनवा पागल' तलत महमूद. चित्रपट-आशियाना. संगीत-मदन मोहन (१९५२). 'साजन बिना निंद न आवे' लता.चित्रपट-मुनीमजी.संगीत-एस.डी. बर्मन (१९५५). 'हमको मन की शक्ती दे मन विजय करे' वाणी जयराम.चित्रपट-गुड्डी.संगीत-वसंत देसाई (१९७१). 'दरशन दो भगवान नाथ मोरी अखियां प्यासी रे' मन्ना डे, हेमंत कुमार,सुधा मल्होत्रा.चित्रपट-नरसी भगत.संगीत-रवी.(१९५७). 'बेकस पे करम किजीए' लता.चित्रपट-मुगले आजम.संगीत-नौशाद.(१९६०). 'कान्हा जा रे लता,मन्ना डे. चित्रपट-बूट पॉलिश, तेल मॉलिश.संगीत-चित्रगुप्त (१९६१). 'आप यूं ही अगर हम से मिलते रहे देखीये एक दिन प्यार हो जायेगा' लता,रफी.चित्रपट-एक मुसफिर एक हसीना.संगीत-ओ.पी.नय्यर (१९६२). 'किसी की याद' रफी.चित्रपट-जहांआरा. संगीत-मदन मोहन (१९६४). 'इतने करीब आके भी क्या जाने किस लिए' तल महमूद,मुबारक बेगम.चित्रपट-शगून.संगीत-खय्याम (१९६४). 'जाओ रे जोगी तुम जाओ रे' लता.चित्रपट-आम्रपाली.संगीत-शंकर जयकिशन (१९६४). 'मिल जा रे जाने जाना' लता.चित्रपट-बेनजीर. संगीत-एस.डी. बर्मन (१९६४). 'आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है'-किशोर, लता.चित्रपट-घर.संगीत-आर.डी. बर्मन (१९७८). 'बोले तो बांसुरी सही' येसुदास.चित्रपट-सावन को आने दो. संगीत-राजकमल.(१९७९). 'पल दो पल का साथ हमारा' रफी,लता.चित्रपट-द बर्निंग ट्रेन.संगीत-आर.डी. बर्मन (१९८०). 'हर वक्त तेरे हुस्न का होता है समा और' महेंद्र कपूर.चित्रपट-चिंगारी.संगीत-रवी (१९८९). ● गैर फिल्मी.... 'भुली बिसरी चंद उमीदे' गझल -मेहदी हसन. 'ख़ब्रुम रसीदु आईएम शब' फ़ारसी कव्वाली.नुसरत फ़तेह अली खान - भाग १ , भाग 2 'भगवद्गीतेतील मंत्र' -जितेन्द्र अभिषेकी. 'गोकुल में बाजत शाम बधाई' भक्तीगीत. पं. जसराज. 'कब की खडी जमुना' भक्तिगीत. परवीन सुलताना. ● मराठी चित्रपट गीते... 'ही कुणी छेडिली तार' आशा भोसले,पं. वसंतराव देशपांडे.चित्रपट-गुळाचा गणपती.संगीत-पु.ल.देशपांडे. 'तुझी नि माझी फुलली प्रीती' आशा भोसले,वसंतराव देशपांडे.चित्रपट-वैजयंता.संगीत-वसंत पवार. 'नवीन आले साल आजला' आशा भोसले. चित्रपट-तू सुखी रहा.संगीत-वसंत पवार. 'आज मी आळविते केदार' मधुबाला जव्हेरी.चित्रपट-अवघाची संसार. संगीत-वसंत पवार. 'गा रे कोकिळा गा' आशा भोसले.चित्रपट-बायकोचा भाऊ. संगीत-वसंत प्रभू.(सुरवात हमीर सारखी वाटते) 'दिवा लाविते दिवा' आशा भोसले.चित्रपट-तू सुखी रहा.संगीत-वसंत पवार. 'प्रभूपदास नमित दास' नांदी. गायक-रामदास कामत,प्रकाश घांग्रेकर, भालचंद्र पेंढारकर,अरविंद पिळगांवकर.नाटक-पुण्यप्रभाव. 'वालीवध ना खलनिर्दालन' सुधीर फडके.गीत रामायण. 'सत्यम् शिवम् सुंदरा' उत्तरा केळकर. चित्रपट-सुशिला.संगीत-राम कदम (१९७८) --------------------------------------------------------------------------- दै. उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी. दि.१७.९.२०२३




संगीत आणि साहित्य :