गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, March 27, 2024

आठवणीगील शब्द स्वर (लेखांक २९)

.                          #प्र_मुख_पा_हुणा

     माझ्या आयुष्यातील ३१ वर्षे आर्णी या गावी संगीत शिक्षक म्हणून गेली.या ३१ वर्षांत परिसरातील विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना व अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळाचे परिक्षा केंद्र', नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय' कला मंडळ, संगीत प्रेमींसाठी 'सरगम', आमची शाळा माहुरच्या दत्त शिखराचे महंत दत्ताराम भारती यांच्यामुळे सुरू झाली म्हणून 'दत्त जयंती उत्सव समिती', 'तालुका पत्रकार संघ' 'शिवजयंती उत्सव समिती' 'शिवसेना शाखा' इत्यादींची स्थापना.समाजकारण,

पत्रकारिता,वर्तमानपत्रासाठी स्फुट लेखन,मराठी गझल गायनाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम, हिंदी/मराठी कवी संमेलने,गझल गायन स्पर्धा,आकाशवाणी सांस्कृतिक संध्या,विविध सांगीतिक कार्यक्रम  अशी अनेक आयोजने वगैरे वगैरे उपद्व्याप केलेत.

     कलाकारांच्या आयुष्यात कोणत्या वेळी कोणता अनुभव वाट्याला येईल हे सांगता येत नाही.वरील सर्व प्रकारांमुळे नावारूपास आल्यावर  घडलेला एक किस्सा ऐकण्यासारखा आहे.एकदा एका महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलावणे झाले. संगीतकारांनाही चांगले दिवस येत असल्याचे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला! कार्यक्रमाच्या दिवशी मी छानसे कपडे घालून, अत्तर वगैरे फवारून समारंभस्थळी पोहचलो! तर अध्यक्षच बेपत्ता। एका तासाने अध्यक्ष आल्यावर उद‌घाटन सोहळा आटोपला. भाषणबाजी झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात आयोजकांनी मला थांबवून भावगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून माझी पदावनती करून टाकली. थोडा राग आला पण म्हटले 'चलता है।' थोड्याच वेळात स्पर्धा सुरू झाली. पण हार्मोनियम वादक नदारद ! फक्त तबल्यावर गाणे कसे म्हणावे हा प्रश्न स्पर्धकाला पडला. तेवढ्यात आयोजक पुन्हा माझ्याकडे आले व हार्मोनियम वाजवायची विनंती करायला लागले. पण मला 'पेटकर' बनविण्याचा त्यांचा धूर्त बेत हाणून पाडून मी तेथून निघून आलो. तेव्हापासून प्रमुख अतिथी पदाचा जो धसका मी घेतला. तो आजतागायत ! (काही दिवसांनी कळले की, 'पेटकर कम परीक्षक म्हणून हाताशी ठेवण्याकरिताच मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केले होते म्हणून!)





संगीत आणि साहित्य :