गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, April 16, 2023

सुरेश भट आणि मी...

 
          माझी आणि भटांची पहिली भेट मुंबईला झाली. मी आणि शंकर बडे त्या वेळी मुंबानगरीत हात पाय मारत होतो. १९७७-७८ ची घटना असावी. दिवसभर दूरदर्शन, एच.एम.व्ही संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची भेट अशी भटकंती करुन थकलेल्या अवस्थेत रात्री पंढरीनाथ सावंतांकडे खास माशाच्या कोकणी कालवणाचे जेवण झाल्यावर चर्चा सुरू असताना अचानक पंढरीनाथ सावंतांनी सुरेश भट मुंबईत असल्याचे सांगितले. आम्ही दुसरे दिवशी भटांना भेटायला आमदार निवासात पोहचलो. शंकरची भटांशी नुकतीच ओळख झाली होती. त्याने माझी ओळख करून दिली. लगेच भटांनी सवयीप्रमाणे ‘‘गाऊन दाखवा’’ असा आदेश दिला. बिना साथीने मला जसे जमेल तसे गाऊन दाखवले, हे प्रकरण इथेच संपले. त्यानंतर नागपुरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ गडकरी सभागृहात माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते.या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी सरोद वादन केले. त्यानंतर मराठी-उर्दू गझला सादर केल्या. माझ्या स्वररचना भटांना आवडल्या. इथून आमची मैत्री सुरु झाली. सुरुवातीला त्यांनी ‘हा ठोकरुन गेला’ ‘कुठलेच फुल आता पसंत नाही’ अशा आणखी तीन गझला स्वरबद्ध करायला दिल्या. एक महिन्यानंतर नागपूरला चक्कर झाली तेव्हा त्यांना ‘ठोकरुन’ व ‘पसंत नाही’ या दोन गझला ऐकवल्या. ‘ठोकरुन’ची बंदिश त्यांना आवडली. पण ‘पसंत नाही’ वर मात्र ‘तू घरंदाज बाईला तमाशात नाचवले’ अशा शेरा मारला. (नंतर याच गझलच्या बंदीशीवरून मला '#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन' ही उपाधी पण दिली.) त्यावरुन काहीतरी चुकल्याचे लक्षात आले. माझा पडलेला चेहरा पाहून गझलची शब्दानुरुप बंदिश कशी असायला हवी हे कळावे म्हणून मेहदी हसन, फरीदा खानम, गुलामअली यांच्या ध्वनिफिती देऊन त्यांच्या गायकीचा अभ्यास करायला सांगितले. तो पर्यंत मी अनेक गाणी बसविली होती, अनेक नाटकांना संगीत दिले होते. दहा वर्षांचा ऑर्केस्ट्राचा अनुभव होता. तरी सतत वर्षभर या ध्वनिफितीतील बंदिशी, शब्दोच्चार, शब्दानुसार स्वररचना, शब्दफेक, भावाभिव्यक्ती याचा अभ्यास केला आणि नंतर आमचा मराठी गझला महाराष्ट्रभर पोहचवण्याचा ऐतिहासिक दौरा #अशी_गावी_मराठी_गझल सुरु झाला.
 
      या दरम्यान मी जसा नागपूरला जायचो,तसे भटही आर्णीला यायचे.आर्णीला गझल आणि संगीत याशिवाय दुसरी चर्चा नसायची. भटांच्या गझला, माझ्या बंदिशी आणि रंगलेल्या मैफिली असा नुसता जल्लोष असायचा. 

       भटांसोबतच्या काही वर्षांच्या सहवासात अनेक मजेदार घटना घडल्या. खरे म्हणजे ‘त्या’ आमच्यातील वैयक्तिक ठेवा  आहेत. एकदा नागपूरला गायक अनिल खोब्रागडे, कादरभाई, गायिका प्रमोदिनी क्षत्रिय, व्हायोलिन वादक प्रभाकर धाकडे वगैरे मंडळी सोबत मैफल जमविण्याचे ठरले होते. मैफल रात्री होती. मी दुपारी भटांकडे पोहोचलो. सायंकाळ झाल्यावर त्यांनी आपण जरा बाहेर जाऊ असे म्हणून व त्यांच्याकडे असलेली हार्मोनियम त्यात टाकून आम्ही निघालो. भटांचा त्या दिवशीचा मूड जरा वेगळाच वाटला. सदैव बोलणारे भट त्या दिवशी अबोल होते. जवळ-जवळ एक तास दिशाहीन भटकंती झाल्यावर हळूच म्हणाले ‘‘सुधाकर आपण कुठं तरी बसू या का?" या वेळेपर्यंत ८ वाजले होते. ९ वाजता आमची मैफल ठरली असल्यामुळे मी त्या काळजीत. पण भटांनीच कुठेतरी बसू म्हटल्यावर नाही म्हणणे शक्य नव्हते. म्हणून माझ्या साळ्याकडे-अनिल चांदेकरकडे मोर्चा वळवला. त्याच्याकडे पोहोचल्याबरोबर सौ. चांदेकरांना झुणका भाकर व पोळ्या करण्याचा हुकूम करुन भट बैठकीत एका बाजूला कागद पेन घेऊन बसले. एव्हाना रात्रीचे १० वाजले. आमच्या मैफलीचे काय झाले ते आपण समजू शकता. थोड्याच वेळात त्यांनी ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’ हा मतला मला दिला व चाल बसत गेली, तिकडे गझल पूर्ण होत गेली. रात्री दोन अडीच वाजता पूर्ण गझल लिहून मला कागद दिला व जेवण वाढायला सांगितले.आमची ठरलेली मैफल हुकली पण रात्र मात्र संस्मरणीय ठरली. या गझलने माझ्या प्रत्येक कार्यक्रमात दाद घेतली हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.

   - औरंगाबाद, देगलूर, मानवत, नांदेड असा मराठवाड्याचा दौरा आटोपून परत नागपूरला निघालो असताना भटांनी नांदेडला एक तलवार व एक कुकरी विकत घेतली. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्या दुर्दैवाने आमची एस.टी. बस मधल्या कुठल्यातरी थांब्यावर बंद पडली. एस. टी. बदलणे, त्यात सामान टाकून आसन मिळवणे या प्रकारात तलवार व कुकरी बंद पडलेल्या एस. टी. बसमध्येच राहिली. आमची बस व्हाया यवतमाळ नागपुर असल्यामुळे मी यवतमाळला उतरुन दुस-या बसने आर्णीला जाणार होतो. यवतमाळला मी बसमधून बॅग घेऊन उतरत असताना तलवार व कुकरी कुठे आहे असे भटांनी विचारले तसे मी सामान ठेवायची जागा पाहू लागलो व दोन्ही शस्त्र बंद पडलेल्या एस. टी. त राहिल्याचे लक्षात आले. ही गोष्ट मी भटांना सांगितली तसे भट मिश्किलपणे म्हणाले ‘‘कसा रे तू मराठा? साधी तलवार व कुकरी सांभाळता आली नाही!’’ मी क्षणभर विचार केला अन उत्तरलो ‘‘मी तर तलवार अन कुकरीच गमावली तुम्ही तर अख्खी मराठेशाही गमावली !’’ यावर जोरजोरात हसत त्यांनी ‘‘क्या बात है!’’ असा प्रतिसाद दिला.

         विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे दौरे आटोपल्यावर, पुण्यात ‘अशी गावी मराठी गझल’ नावाचा कार्यक्रम झाल्यावर नागपुरातील रसिक मंडळींनी धनवटे सभागृहात माझा एकट्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला मी भटांकडे गेलो. बराच वेळ गप्पाटप्पा झाल्यावर कार्यक्रमाविषयी सांगून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यावर
‘‘मी काहून कार्यक्रमाले यावं? असा प्रश्न भटांनी केला.
‘‘माझा कार्यक्रम आहे म्हणून’’ मी.
‘‘तू कोन टिकोजी लागला का?’’ भट.
‘‘टिकोजी नाही पण तुमचा कोणी तरी लागतो ना?’’ मी.
‘‘तुले तं मालूम आहे का मी ऐ-या गै-याच्या कार्यक्रमाले जात नाही!’’ भट.
अशी गंमत सुरू असताना भटांनी कपाटातली ‘अंगूर की बेटी’ काढली.  मलाही आग्रह केला परंतु दिवसाढवळ्या ‘दारूकाम’ न करण्याचे ठरवल्यामुळे ‘नाही’ म्हणालो. लगेच भट म्हणाले ‘‘आता सांग तू का म्हंतं ते!’’ यावर मी, ‘‘पिदाडांशी जास्ती बोलत नसतो’’असे म्हणताच भट खो खो करुन हसायला लागले व ‘‘लयच चालू आहे रे तू!’’ असे म्हणून पुन्हा जोरजोरात हसायला लागले.

        मराठवाडा दौ-याचे वेळी औरंगाबाद मुक्कामी लोकमत कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच भटांना गझलचा मुखडा सुचला तो मला दिला. मी चाल बसवायला लागलो व भट लिहायला लागले. चौथा शेर मला त्यांनी दिला परंतु वाचल्यानंतर त्याचा अर्थ उमगायला वेळ लागला. म्हणून मी भटांना म्हटले ‘‘हा शेर गझल मध्ये ठेवू नका, कारण याचा अर्थ पटकन ध्यानात येत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेर वाचला की ऐकणा-याला पटकन कळायला हवा." यावर भट म्हणाले ‘‘कवी कोण आहे? मी का तू? तू आपलं काम कर’’ त्यावेळी मी चूप बसलो. या प्रसंगानंतर काही महिन्यांनी पुण्याला कार्यक्रम होता. आम्ही भटांच्या सासुरवाडीत सदाशिवपेठेत मुक्कामी होतो. कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे दुपारी घरीच मैफल जमली. त्यावेळचे सर्व नवोदित गझलकार याप्रसंगी उपस्थित होते. ‘‘मी असा त्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठांपुनी मी दुर होतो’’ ही गझल गायला सुरवात केली. यमनमधील या बंदिशीत दुसरा शेर सादर करताना दोन्ही मध्यमांचा वापर केला. गझल संपल्यावर भट म्हणाले ‘‘तो दुस-या शेरात तू कोणता सुर लावला तो काही जमल्यासारखा वाटला नाही’’ माझ्या मनात औरंगाबाद खदखदत होतेच. मी लगेच म्हणालो ‘‘बावाजी संगीतकार कोण आहे? मी का तुम्ही? भटांच्या लगेच लक्षात आले व म्हणाले ‘‘वा औरंगाबादकर!’’. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो.

      सुरेश भटांमुळे मी मराठी गझल गायक झालो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्यामुळेच मला अमरावतीत झालेल्या डॉ. नईमभाईंच्या चर्चेत सहभागी होता आले. इस्लामपूर्व गझलेचा शेर नईमभाईंनी सुरेश भटांना काढून दिला या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित राहू शकलो. भटांमुळेच सुरवातीच्या काळात वर्धेसाठी शेतकरी मेळाव्यात श्री शरद पवारांसमोर कार्यक्रम करु शकलो. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशन काळात रा. सु. गवई यांचे कॉटेजवर अंतुले, जवाहरलाल दर्डा प्रभृतींसमोर कार्यक्रम सादर करु शकलो. सत्कारही स्वीकारु शकलो. शाहीर सुरेशकुमार वैराळकर या प्रसंगी हजर होते. १९८२ पासून तिकीट लावून माझे कार्यक्रम सुरू झालेत याचे श्रेयही भटांनाच आहे. ते मला तेव्हाच ‘गझलनवाज़’ म्हणायचे परंतु मेहदी हसन, गुलाम अली, जगजित सिंग सारख्या मंडळीसमोर आपण क:पदा्र्थ असल्यामुळे स्वत:ला ‘गझलनवाज़’ म्हणवून घेणे मला पटले नाही. त्याची गरजही वाटली नाही, वाटत नाही.

       आठवणींच्या गराड्यात अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. एक महत्वाची आठवण नमुद करुन संपवितो. मिरजेतील नवरात्र संगीत महोत्सवातील कार्यक्रम आटपून महाराष्ट्र एक्सप्रेसने धामणगाव-यवतमाळ असा प्रवास करुन आर्णीला साडेचार वाजता पोहोचलो. तर घरी भटांची तार येऊन पडलेली ‘‘ताबडतोब निघुन अमरावतीला ढवळेंकडे यावे, हृदयनाथ मंगेशकर येत आहेत’’ ही घटना १९८१-८२ च्या दरम्यानची असावी. त्यावेळी आर्णीहून बाहेरगावी जाण्यासाठी एकही बस नव्हती. पदर पसरून कशीबशी एकाजणाची मोटारसायकल मिळवून वासुदेव भगत या जिवलग मित्राला सोबत घेऊन अमरावतीकडे निघालो. यवतमाळच्या थोडे पुढे जात नाही तो मोटारसायकल बंद पडली. भगत हे कसलेले मेकॅनिक असल्यामुळे कसेबसे सकाळपर्यंत अमरावतीला पोहोचलो. भटांची भेट झाल्यावर रात्री ढवळेंकडे हृदयनाथांसोबत जेवण व माझी मैफल असा कार्यक्रम असल्याचे कळले. सायंकाळी ६ वाजता मंगेशकर आले. सगळ्यांशी गप्पा झाल्यावर भटांनी मला व हृदयनाथांना एका खोलीत नेऊन बसवले. आमची दर्जेदार‘व्यवस्था’करून दिली व ‘चलने दो’ चा इशारा करुन खोलीतून निघून गेले. आम्ही दोघांनी मस्तपैकी आस्वाद घेत संगीत नियोजन, बंदिशी, ध्वनीमुद्रण यावर एक दीड तास चर्चा केली. नंतर सोबत जेवण केले. मैफल जमवली. हृदयनाथ मंगेशकरांसमोर गाणे म्हणजे तोंडाचा खेळ नव्हता. परंतु भटांनी अतिशय समजुतदारपणे आमची अगोदरची ‘‘बैठक’’ जमविल्यामुळे मैफल जमवायला त्रास झाला नाही. मैफिलीनंतरही रात्री दोन वाजेपर्यंत मी आणि मंगेशकर गप्पा मारीत बसलो होतो. हे सगळे भटांमुळेच होऊ शकले.

       सर्व सामान्यापेक्षा वेगळं रसायन कवटीत घेवून जन्मलेले एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट होय. त्यांच्यामधे नेहमी एक कवी, तत्त्वज्ञ वावरायचा त्याच वेळी एक क्षणात रागावणारं, क्षणात गळ्यात पडणारं, क्षणात हसणारं, क्षणात आकांडतांडव करणार अवखळ निरागस व हट्टी मूलही त्यांच्यात हुंदडत असायचं... त्यांच्यातली मिश्किली भल्याभल्यांना कोड्यात टाकायची. सुरेश भटांच्या सहवासातील अनेक वर्षात मी त्यांच्या स्वभावाची जवळ-जवळ सर्व रुपे पाहिली. त्यातील काही रुपे आजही स्वच्छपणे समोर दिसतात. त्यांचे नवोदित गझलकारांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतांनाचे आणि त्यांच्या आकाशवाणीवरील ६५ च्या कराराकरीता केंद्र निदेशकाशी वाद घालतानाचे भट... नवीन गझल लिहीणा-यांमध्ये एखादा फार जवळीक निर्माण करणारा जर परिस्थितीने गांजला असेल तर त्याला स्वत: व आमच्या सारख्यांना सांगून धान्य पुरवणारे कुटूंबप्रमुख भट... एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तोंडावर सांगण्याचा सडेतोडपणा व आवडला तर आवर्जून सांगणारे भट... जगण्यातील बिनधास्तपणा व त्यामुळे घडणा-या प्रसंगाला तोंड देणारे बिनधास्त भट... एखाद्या विषयी कसा का होईना गैरसमज झाला तर कोणी कितीही आणि कसेही समजाऊन सांगितले तरी न ऐकता गैरसमज कायम ठेवणारे एक वेगळे भट... जेवताना किंवा काही खाताना इतरांकडे लक्ष न देता ‘‘पार्वती पते हरहर महादेव’’ करणारे लहान मुलासारखे भट... जेवणातील एखादा पदार्थ आवडला तर बनविणा-या सुगृहिणीचे/बल्लवाचार्याचे मनापासून कौतुक करून त्यांची रेसिपी समजून घेणारे खवय्ये भट... भल्या-भल्यांशी पंगा घेणारे भट... स्वत:च्या मुलाच्या- हर्षवर्धनच्या भविष्याच्या काळजीने व्यथित होणारे भट... सामाजिक कार्यात पोटतिडकीने भाग घेणारे भट... सामाजिक, राजकीय व्यंगावर रोखठोकपणे लिहिणारे भट... जेवणापेक्षाही चहा-तंबाखूवर जास्ती प्रेम करणारे भट...सुरेश भटांची अशी कितीतरी रूपं माझ्या स्मरणात  अजूनही दरवळतात.

         आमची ही मैत्री म्हणजे एक वेगळं विश्व होतं आम्ही भांडायचो, वाद व्हायचे, प्रसंगी अबोला-रुसवा सुद्धा व्हायचा. शेवटी शेवटी मतभेदांमुळे थोडा दुरावा येत गेला पण मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. त्यांच्या कडू-गोड आठवणी आणि स्वरबद्ध केलेल्या त्यांच्या चाळीस गझला व दहा गीते आजही मला साथ देत आहे. वरून फणसासारखा भासणा-या सुरेश भटांचे अंतरंग अच्छाअच्छांना कळले नाही.केवळ त्यांच्या खाण्या-‘पिण्याची’ चवीने चर्चा करणा-यांना ते कधी कळणारही नाही.या फणसातील गोड गरे चाखण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
 
-सुधाकर कदम
सी-१-सी/१३,गिरीधर नगर,वारजे-माळवाडी,पुणे-५८.
 मोबा.8888858850

(हा लेख माझा वैयक्तिक अनुभवाचा ठेवा आहे. यातील कुठल्याही घटनेचा उल्लेख कुणी स्वतःच्या लेखात करण्या अगोदर परवानगी घेणे आवश्यक.)


 

राग यमन...भाग १


      यमन रागाच्या नावावर बरेच मतभेद आहेत.काही लोक याला फारसी भाषेतील ’इमन’ चेच यमन मध्ये झालेले रुपांतर मानतात.तसेच हा राग अमीर खुस्रो नावाच्या अल्लाऊद्दीन खिलजीच्या काळातील विद्वान संगीतकाराने प्रचलित केला अशीही मान्यता आहे.एवढे मात्र निश्चित की खुस्रोच्या काळात नव-नवीन राग प्रचारात आलेत.यात फारसी,इराणी सुरावटी भारतीय रागात मिसळल्या गेल्या होत्या.गोपाल नायक हा संगीताचा प्रकांड विद्वान खुस्रोचा समकालीन आहे.दक्षिणेतील पंडीत यमन हा राग ’यमुना कल्याण’चाच एक प्रकार मानतात.या नावाचा उल्लेख दक्षिणेकडील ग्रंथांमध्ये आहे.परंतू यमुना कल्याण आणि यमन यात नावाव्यतिरिक्त काहीच साम्य नाही.उत्तर भारतीय संगीत शास्त्र (भातखंडे कृत) या ग्रंथात हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाल्याचे लिहीले आहे.पण त्यातही तथ्य वाटत नाही,हे भातखंडेंचा आदर ठेऊन नमूद करतो..(माझे हे विधान अनेकांना आवडणार नाही.)कारण प्राचिन ग्रंथांमध्ये ’यमन’ नावाच्या रागाचा कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही.तसेच कोण्या एका शब्दावरून राग आला असेल असेही वाटत नाही.कारण राग निर्मिती ही एक प्रक्रीया आहे.ती एकदम होणारी नाही...

     काही लोक याला यमन कल्याण असेही म्हणतात.पण त्यालाही तसा फारसा अर्थ नाही.यमन रागात विवादी स्वराप्रमाणे कधीतरी कोमल मध्यम लावला की तो यमन कल्याण होतो.याला सुद्धा ग्रंथात आधार नाही.अशा प्रकारे एखादा स्वर बदलून किंवा जास्तीचा लावून किंवा विवादी म्हणून एखाद्या स्वराचा प्रयोग करून तो प्रचलित करणे अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतील. ते काहीही असले तरी यमन हा राग अत्यंत लोकप्रिय आहे यात वाद नाही.मी तर त्याला ’गर्भश्रीमंत’ राग म्हणतो.यावर लिहायचे म्ह्टले तर सूर्य,समुद्र,अवकाश,धुमकेतू यावर लिहिण्यासारखे आहे.इतका मोठा आवाका असलेला दुसरा राग माझ्या तरी पाहण्यात आला नाही.तसेच माझ्या मते ’कल्याण’ ऐवजी ’यमन’ हाच थाट असायला हवा होता.यालाच शुद्ध थाट म्हणून मान्यता मिळायला हवी होती.कारण यात सातही स्वर शुद्ध म्हणजे तीव्र आहेत.शुद्ध थाट म्हणविल्या जाणार्‍या बिलावल थाटातील कोमल मध्यम व कोमल निषादाचा वापर विद्यार्थ्यांना विचारात पाडतो.(शास्त्र म्हणून तेच शिकविल्या जात असल्यामुळे यावर कोणी बोलत नाही ,ही गोष्ट वेगळी.तसेच बोलून फायदा काय ? परीक्षेत हेच लिहावे लागणार नाहीतर गूण कमी होतील !)पण यमनच्या बाबतीत असा संभ्रम रहात नाही.

     शास्त्रीय माहितीः- गेल्या २०० ते २५० वर्षांपासून चालत आलेल्या उत्तर भारतीय संगीत शास्त्रानुसार यमन राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहे.वादी स्वर गांधार असून संवादी स्वर निषाद आहे.जाती संपुर्ण असून गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. गानसमयावर या अगोदरही मी थोडक्यात लिहीले आहे या वेळी मात्र सविस्तर लिहीत आहे.खरे म्हणजे रागाचा गानसमय ठरविण्याची अशी कोणतीच साधने प्राचिन ग्रंथंमध्ये नमूद नाहीत.तरी पण रागाचा गानसमय ठरविल्या गेला आहे.कशाकरीता ? माहित नाही.जिथे प्राचिन ग्रंथातील रागांची नावे व आजच्या रागांच्या नावात साम्य नाही,स्वरात साम्य नाही तिथे गानसमय कसा आणि कोण ठरवणार ? काही तरी शास्त्रीय नियम लावायचे म्हणून लावणे या पलिकडे याला अर्थ नाही.माणसाने केव्हा गुणगुणावे,काय गुणगुणावे हे काय ठरवून होणार काय ? सध्याचा थाट पद्धतीचा विचार केला तर मधुवंतीसारखे राग तर थाट पद्धतीमध्ये बसतच नाही.मग दहा पेक्षा अकरा थाट करून त्या ११व्या थाटाला मधुवंती नाव दिले तर काय बिघडेल ? पण नाही, दहा थाटातच ठोक-पिट करून सर्व राग बसविणे...हे अनैसर्गिक वाटत नाही का ? हिंडोल,गौडसारंग,तोडी,मुलतानी या रागांमध्ये तीव्र मध्यम असून त्यांना दिवसा गायिल्या जाणारे राग म्हणून मान्यता दिल्या गेली आहे.खरे तर नियमानुसार तीव्र मध्यम असलेले राग रात्रीच गायिल्या जायला हवे. एक असाही नियम आहे की,’ग’ ’नि’ कोमल असलेल्या रागात तीव्र मध्यम लागत नाही.मग कोमल ग नि सोबत तीव्र म असलेल्या सुरावटीचा राग मधुकंस कसा ? खरे तर राग गाण्याच्या नियमाला फार पुर्वीपासूनच फाटा दिला आहे हे ’दर्पण’ या ग्रंथातील

"यथोत्काल एवैते गेया पूर्व्विधानतः /
राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् //
 
आणि ’तरंगिणी मधील

"दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानमीरीतम् /
रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते //

तसेच श्री बॅनर्जी यांच्या ’गीतसुत्रसार’ (Grammer of vocal music) ग्रंथामध्ये पान ५८ वर म्हणतात...

"हमारे यहाँ राग-रागिनियों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है,वह केवल काल्पनिक है"

     या वरूनही गानसमय प्रथेतील पोकळपणा स्पष्टपणे दिसून येतो.खरे म्हणजे स्वर समुदायात अशी काही विशेषता नाही की,ज्यामुळे त्यांना काही खास वेळी न गायिल्याने योग्य तो परिणाम साधल्या जात नाही.संगीताचा उद्देश स्वरांद्वारे भाव व्यक्त करून श्रोत्यांचे मन प्रसन्न करणे एवढाच आहे.म्हणजेच या करीता कोणत्याही विशिष्ठ अशा खास वेळेची गरज नाही.जे भाव सकाळी व्यक्त होऊ शकतात किंवा करू शकतात ते सायंकाळी किंवा रात्री का करू शकत नाही ? नक्कीच करू शकते,शकायलाच पाहीजे.’पारिजात’ या ग्रंथात भूपाली राग सकाळी गायिल्या जातो असा उल्लेख आहे.परंतू सध्या तो रात्रीकालिन मानल्या जातो.(घनःशाम सुंदरा...ही भूपाली रागातील भूपाळी सकाळी गोड वाटत नाही का ? सकाळच्या अहिर भैरव रागातील ’पु्छो ना कैसे मैने रैन बिताई..’हे चित्रपटातील गाणे रात्री मन मोहतेच ना ?) दक्षिण भारतात यमन राग सकाळी व भैरवी रात्री गायिल्या जाते.तर काहींच्या मते ललित,रामकली,तोडी वगैरे राग सायंकाळी गायिल्याने गानसिद्धी उत्तम प्रकारे होते.म्हणजेच गानसमय हा प्रकार म्हणजे लोकांवर लादलेले थोतांड आहे हे सिद्ध होते.स्वर,स्वर आहे;राग,राग आहे,केव्हाही त्याचा परिणाम सारखाच अपेक्षित आहे.

     ते काहीही असले तरी यमन राग हा सर्वांचा आवडता आहे हे मात्र खरे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे कल्पक गायक,वादक,संगीतकारांवर हा लवकर प्रसन्न होऊन वरही देऊन टाकतो.पण जर का यात भरकटला तर ’पचका’ होणे ठरलेले आहे.यमन गाता आला की सर्व राग गाता येतात असे जाणकार सांगतात.हा राग गायिला नाही असा गायक,वादक सापडणे अशक्यच ! इतका हा मधूर आहे.भारताच्या सर्व भाषा-बोलींमधील जेवढी गाणी या रागात बनली असतील तेवढी गाणी दुसर्‍या रागात तयार झालेली नसावी.सुगम संगीतकारांसाठी तर हा राग वरदानच ठरला आहे.कोणतेही भाव समर्थपणे व्यक्त करण्याची क्षमता यमन मध्ये आहे.हे एक संगीतकार म्हणून मी ठामपणे सांगू शकतो.

     (येथे मी तयार केलेल्या यमन रागाच्या विविध मूडच्या रचनांवर कोल्हापूरचे संगीत समीक्षक ऍडव्होकेट राम जोशी यांच्या लेखातील काही भाग देण्याचा मोह मला आवरत नाही.ते म्हणातात... "यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़. कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़.

‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी प्रीये तुझ्याच साठी’

 क्रमशः


 

Saturday, April 15, 2023

राग भूप



       जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाही. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील संगीत, काव्य,चित्रकला हया कलेचे रुप महत्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे.असे  क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.
        कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न होवून तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. १) आपल्या इंद्रियाद्वारे सौंदर्यास्वाद घेणे. २) आंतरिक अनुभूती ३) त्यात स्वत; हरवणे. यापैकी एका तरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. शब्द, छंद, अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे स्वर, ताल, लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे संगळे कलाकाराच्या आत उर्मी रुपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफ़ड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो,चित्र असो,एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच.    
        एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की, हे अमक्याने निर्माण केले,ते अमक्याने निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहित नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे.शास्त्रीय संगीतातील महत्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही.याचे कारण मी वर केलेल्या वक्तव्यात आहे.
       आजचा आपला विषय आहे. राग भूप... या रागात पाचंच स्वर आहेत. सा  रे ग ध प... सर्व स्वर शुध्द. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पूर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वगैरे वगैरे... परंतू खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफ़िलीतही हा राग फ़ार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायकसुध्दा त्याच्या वाटेला जात नाही. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतू खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या ’सहेला’ मुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल ऑफ दी व्हॅली”तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...
      भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी ’हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ’कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोर कुमार लता मंगेशकर. या रागात स्वरबध्द केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहे त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरब्ध्द केलेले व लताबाईनी गायिलेले ’भाभी की चुडिया’ या चित्रपटातील ’ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भुपाळी सुध्दा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दुर करणारी आहे. भुपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय द्दृष्ट्या सायंकाळचा आहे.तसेच ’लव्ह इन टोकियो’ या चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरब्ध्द केलेले आणि लताबाईनी गायिलेले ’सायोनारा...’ हे गाणे ही याच रागात आहे. मी सुद्धा पाठयपुस्तकातील कवितांच्या झुला या कॅसेटमध्ये 'धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान' याच रागात स्वरबद्ध केली आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ’रिषभावर’ मुर्छना केली की ’मधमाद सांरग’, ’गांधारावर’ मुर्छना केली की ’मालकौंस’, ’पंचमावर’ मुर्छना केली की ’दुर्गा’ राग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.'दिल हूम हूम करे' हे लताबाईंनी गायिलेले रुदालीमधील अप्रतिम गाणे भूप रागातच आहे.
      या वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर येणा-या भूपात  ’रंज की जब गुफ़्तगू होने लगी,आपसे तुम तुमसे तू होने लगी’ ही दाग़ यांची गझल गुलामअली गायले आहेत. मतला पूर्णपणे भूपात बांधला आहे. अंत-यातील...काही शेर भूपाला कल्याणाची जोड देऊन इतक्या सुंदर रीतीने सादर केले की तोंडून आपोआपच वाहव्वा निघून जाते. तानांच्या छोट्या छोट्या लडया,वरच्या पंचमापर्यंतची रुपक तालाशी खेळत खेळत केलेली स्वरांची कलाकुसर आपल्याला थक्क करते. सोबतच सुरेल ’नोटेशन’सह विविध प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण तिहाया,विवादी स्वर घेऊन विविध रागाच्या छटा दाखवून वाढवलेली रंजकता,मक्त्यामध्ये केलेले जयजयवंती रागाचे लोभस मिश्रण गुलाम अलीच्या परिपूर्ण गायकीची ग्वाही देते.या गझल सोबतचा तारिक हुसैन यांचा तबला म्हणजे ’सोने पे सुहागा...’! असा तबला भारतातील गझलच्या साथीदारांकडून ऐकायला मिळत नाही.यात त्यांनी टाकलेल्या तबल्याच्या विविध विधा,तुकडे,मुखडे आणि वेगवेगळ्या तिहाया हे दुसरे फार मोठे आकर्षण यात आहे.(मी स्वतः १९५८ ते १९६३ मध्ये यवतमाळला दादासाहेब पांडे यांचेकडून तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असल्यामुळे  तबल्या विषयी लिहू शकलो.) त्यामुळे राग जरी एकच असला तरी पण त्याची विविध रुपे आपल्यासमोर उभी राहतात.मला जर गझल गायन ऐकायला का आवडते ? असा कोणी प्रश्न केला तर, "#गझलमध्ये '#काव्य','#संगीत' आणि '#ताल' या तिन्हीची मजा घेता येते" हे माझे उत्तर राहील....
          
गझलगंधर्व
सुधाकर कदम
पुणे


 

 

राग तोडी



     गझल कोणतीही असो ती जोरकसपणे गायिलीच पाहिज
असा भ्रम बराच काळपर्यंत आपल्याकडे होता.त्यावेळी ध्वनिवर्धक नसल्यामुळे कदाचित असे गावे लागत असावे.पण हीच पद्धत पुढेही अनेक वर्षे कायम राहिली.गझलच्या शब्दार्थापेक्षा व त्यातील भावनांपेक्षा फक्त गायकीलाच महत्व दिल्याचे जुने गझल गायक/गायिकांचे गायन ऐकल्यावर प्रामुख्याने जाणवते.प्रेम, विरह,याचना,नाजूक दटावणी,सौंदर्य वर्णन,साक़ी,
शराब,मैखाना काहीही असो प्रत्येक शेर ख्यालाप्रमाणे एकसुरी,म्हणजे बंदिशीला धरून गायिल्या जायचा.अर्थात गाणारे पट्टीचे गायक/गायिका असायचे ही बाब वेगळी.पण हळू-हळू गझलमधील शब्दांकडे लक्ष देऊन त्याला अर्थानुरूप बंदिश बनवून शब्दांना सजविण्याचा प्रयत्न सुरू झाला.त्यामुळे पूर्वी गायिल्या जाणार्या क्षुद्र प्रवृत्तीच्या ठरविल्या गेलेल्या पिलू,खमाज,झिंझोटी वगैरे विशिष्ठ रागांच्या जोखडातून गझल गायकी मुक्त होऊन दरबारी,मालकौंस,सारख्या मान्यवर रागातही गझलच्या बंदिशी तयार व्हायला लागल्या.हा बदल होण्यामागे चित्रपट संगीताचा फार मोलाचा वाटा आहे.
      चित्रपट संगीत लोकप्रिय झाल्यामुळे जुन्या सर्व गझल गायक/गायिकांची मिरासदारी चित्रपटातील सुमधुर गाण्यांमुळे संपुष्टात यायला लागली होती.त्यातील नादमधुरता,शब्दानुरूप स्वर-रचना,शब्दांची फेक,स्वरांचे बेहलावे,पोषक वाद्यवृंद व गायनातील नाजुकता लोकप्रिय व्हायला लागली होती.हा फरक जाणवायला लागल्याबरोबर आपल्या देशातील अनेक गझल गायक/गायिकांनी शास्त्रीय संगीताचा मूळ गाभा कायम ठेवून वरील सर्व प्रकार आत्मसात करून गझल गायकीचा ढंगच बदलून टाकला.यात जगजितसिंग हे अग्रेसर राहिले.ज्या काळात चित्रपटातून सुद्धा मेलोडिअस गाण्यांना उतरती कळा लागली होती त्या काळात मेलोडी कायम ठेवून,कठोर आत्मपरीक्षण करत-करत त्यांनी आपली वेगळी पण लोकप्रिय शैली निर्माण केली.
"मिलकर जुदा हुए तो न सोया करेंगे हम..."
ही क़तील शिफ़ाई यांची,जगजीत-चित्रासिंग यांनी गायिलेली सुंदर गझल ’तोडी’ नामक रागात अतिशय वेगळ्या प्रकारे,रागस्वरूपाला धक्का न लावता बांधलेली आहे.तोडी रागाची अनेक रुपं आहेत.त्यात आपल्या सारख्या रसिक मंडळींनी खोलात जाण्यात काही अर्थ नाही.कारण तो सुद्धा लेखाचा एक वेगळा विषय आहे.या रागात सा रे ग म ध नि असे स्वर लागतात.(अवरोहात पंचम स्वराचा वापर काही गायक करतात.)यातील रिषभ,गांधार,धैवत स्वर कोमल असून मध्यम तीव्र आहे.गानसमय सकाळचा आहे...अर्थात ही वेळ फक्त शास्त्रीय गायन,वादन करणा‌र्‌यांसाठीच आहे.कारण या रागातील जेवढी काही चित्रपट व चित्रपटाबाहेरची गीते,भावगीते,भक्तिगीते आहेत ती सर्वकाळ गोड वाटतात,हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.
तोडी राग जवळ- जवळ प्रत्येक गायक-वादकाने गायिला-वाजविला असावा.पं.भीमसेन जोशींच्या तोडीतील ताना, मेघांच्या गडगडटाला आव्हान देणार्‌या होत्या.तर प्रत्येक स्वराचे महत्व जाणून त्याचा अतिसुंदर विस्तार किशोरीबाईंच्या गाण्यात दिसून येतो.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला ’मेलोडी’ म्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.
     अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते ’आशिर्वाद’ या चित्रपटातील
’एक था बचपन...’
हे गाणे.त्यानंतर
’भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’
हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेलं अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग
’अगा करूणाकरा...’
हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच ’पिंजरा’ या चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं
’कशी नशीबानं थट्टा आज मांडली...
’हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.’अमर प्रेम’ या चित्रपटातील
’रैना बीती जाए...’
याचा मुखडाही याच रागात आहे.
साबरी बंधुंनी गायिलेली
’अल्ला हे अल्ला...’
ही सुंदर कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.तर त्यांनी दुसर्‌या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांनबुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या ’सूफी’ संगीताची ’खरी’ ओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसा प्रयोग अनूप जलोटा यांनी
’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’
या गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.
माझ्या मते गानसमयापेक्षाही त्या त्या रागातील स्वरांचा उपयोग संगीतकार कशा प्रकारे करतो,गायक-गायिका कशा प्रकारे प्रस्तुती करते आणि वाद्यमेळ कसा जमतो यावर श्रोत्यांची आवड-निवड ठरत असावी.तसे नसते तर तोडी रागातील गाणी सकाळ सोडून इतर वेळी कानाला गोड लागलीच नसती.काही-काही गोष्टी परंपरेने ठरवून-ठरवून डोक्यात भरविल्या जातात त्यातलाच गानसमय हा प्रकार असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.असो...हा वादाचा मुद्दा आहे.

      माझ्याकडून स्वरबद्ध झालेली औरंगाबादच्या बशर नवाज साहेबांची
’न इस तरह भी ख़यालों मे कोई बस जाए’
     ही गझल तोडी रागात आहे.मतला शुद्ध तोडीमध्ये,पण अंतरा मात्र वेगवेगळ्या रागांचा अविर्भाव-तिरोभाव दाखवत मुर्छना पद्धतीने मूळ तोडीवर येतो.ही स्वरांची वेगळी मोहमयी गुंतागुंत आपणास नक्कीच भावेल.ऐका तर...

न इस तरह भी ख़यालो मे कोई बस जाए
मैं अपने आप को सोचूँ किसी की याद आए

तमाम रात रहा नींद का सफर जारी
सजे रहे किसी आँचल के मेहरबाँ साए

तुम्हारे पास पहुँचकर कुछ ऐसा लगता है
सफ़र से जैसे मुसाफिर वतन में आ जाए

वो चंद पल जो बचा लाए थे हम अपने लिए
सितम तो ये है के वो भी न हमको रास आए

हमारी जीत अलग है,हमारी हार अलग
ज़माने वालो को ये बात कौन समझाए

●ही गझल युट्युबच्या geet-gazalrang या चॅनलवर उपलब्ध आहे.
Youtube link..https://youtu.be/-c_aNx-NeSc
------------------------------------------------------------------------

दैनिक 'उद्याचा मराठवाडा', १२ एप्रिल २०२३


 





संगीत आणि साहित्य :