गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, September 2, 2023

राग_रंग (लेखांक २२) दुर्गा...

स्त्रीलिंगी नाव असलेल्या 'कलावती','सरस्वती','बागेश्री', 'धनाश्री','मधुवंती','रागेश्री' 'सावनी','भैरवी' अशापैकीच एक राग 'दुर्गा'! नाव जरी स्त्रीलिंगी असले तरी ह्या रागांना 'ही' राग न म्हणता 'हा' राग असे पुल्लिंगीच संबोधल्या जाते.ही पण एक गंमत आहे. हा राग बिलावल थाटातून निर्माण झालेला मधुर राग आहे.बिलावल थाटाने भारतीय शास्त्रीय संगीताला मोहून टाकणारे खूप राग बहाल केले आहेत.त्यातीलच अतिशय साधा,सोपा पण गोड असा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ‘दुर्गा’ हा राग आहे. बिलावल थाटाचे पूर्वीचे ग्रंथातील नांव, ‘धीरशंकराभरण’ हेआहे. या थाटातून बावीस रागांची निर्मिती होते, असे ग्रंथकार सांगतात. रात्री गायल्या जाणाऱ्या रागातील लोकांना आवडणारा, मधुर वाटणारा हा राग आहे. या रागाची प्रकृती गंभीर म्हणता येणार नाही, किंवा चंचल म्हणता येणार नाही. कर्नाटक संगीतातील ‘शुद्ध सावेरी’ या रागाशी साधर्म्य सांगणारा हा राग, मात्र दोन्ही रागांचे चलन वेगळे आहे. कर्नाटक संगीतातून जरी हा राग आला असला, तरी उत्तर हिंदुस्थानी संगीतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे.खरे म्हणजे संगीताच्या शैली जरी भिन्न असल्या तरी भेद केवळ दोनच असते. ते म्हणजे,चांगले वा वाईट.म्हणून शैलींमुळे नाही तर खास विशेष गुणांनी कलांना महान बनविल्या जाते असे म्हटले तर वावगे होणार नाही. संगीताचा मुख्य आधार नाद आहे.ज्याला मनुष्य आपल्या कंठाद्वारे व विविध वाद्यांद्वारे उत्पन्न करतो.या नादाचे नियम काही सिद्धांतानुसार करण्यात आले असून, या सिंद्धांताच्या आधारावर संगीतातील सात स्वरांची निश्चिती करण्यात आली आहे.आणि तेच संगीत कलेचा प्राण आहे.संगीताचे मुख्य माध्यम स्वर आणि लय हे आहे.हे माध्यम अतिशय आंतरिक आहे.आपणाला यास बाहेरून एकत्र करायची गरज पडत नाही.तसेच संगीतामध्ये दोन अशा विशेषता आहे,की ज्या दुसर्‌या कोणत्याच कलांमध्ये नाहीत.त्यातील एक आहे ’काकु’.काकु हा शब्द ’के’ धातुपासून उत्पन्न झाला आहे.ज्याचा अर्थ आहे ’लोकोपतापयोः...’ म्हणजे ध्वनीची हृदयापासून निघणारे सुक्ष्मभाव व्यक्त करण्याची क्षमता...! ही शक्ती किंवा क्षमता फक्त ध्वनी किंवा स्वरातच आहे,शब्दात नाही.दुसरी विशेषता ही आहे,की ध्वनीमध्ये कर्षण (ताणणे)गूण आहे.याला आपण कितीही मात्रांपर्यंत ओढू (ताणू) शकतो.शब्दाला जर जास्ती ओढ दिली तर शब्दत्वाची हानी होऊन त्याचे ध्वनीत परिवर्तन होते.या दोन विशेषत्वामुळे संगीतामध्ये जी सुक्ष्म भाव व्यक्त करण्याची शक्ती येते ती अन्य कोणत्याच कलांमध्ये नाही.स्वरांमध्ये जो सलगपणा (Immediacy) आहे तो अन्य कोणत्याच माध्यमात नाही.शब्दाच्या भावाभिव्यक्तित अडथळा येऊ शकतो परंतू स्वरांच्या भावामध्ये तो येत नाही.ही एक सरळ भाषा आहे.जिचा उपयोग पशु-पक्षी सुद्धा करतात.ध्वनीचे वैशिष्ठ्य म्हणजे ती एका हृदयातून निघते आणि दुसर्‌या हृदयात पोहोचते..शब्दांना समजणे कठीण जाऊ शकते पण स्वर म्हणजे मानवाची मातृभाषा आहे.त्याची अभिव्यक्ती हृदयातून होते आणि त्यामुळेच या भाषेने पशु-पक्षी सुद्धा प्रभावित होतात..असो! दुर्गा रागात गांधार व निषाद वर्ज असल्यामुळे याची जाती औडव औडव आहे.यात सर्व स्वर शुद्ध आहेत.वादी स्वर धैवत असून संवादी स्वर रिषभ आहे.गानसमयरात्रीचा पहिला प्रहर. हा पूर्वांगप्रधान राग आहे.संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक-वादक अत्यंत सोप्या अशा या रागातून काय अप्रतिम चित्र उभे करतात,ते त्यांच्या गायन,वादनातून दिसून येते.या रागातली 'गावत दुर्गा रागिनी’ हे पं. शंकरराव व्यास, यांनी रचलेले लक्षणगीत व "सखी मोरी रुमझुम...' ही प्रसिद्ध बंदिश शास्त्रीय संगीताच्या रसिकांनी नक्कीच ऐकली असेल.सा रे म प ध सा इतक्याच स्वरात रंगणाऱ्या या रागात विविध स्वरांच्या मुर्छना केल्या तर वेगवेगळे राग आपणास दिसून येतात.जसे:- धैवताला षड्ज मानून दुर्गा रागाचे स्वर घेतले असता 'मालकौंस', रिषभाला षड्ज केल्यास 'धानी', मध्यमाला षड्ज केल्यास 'भूप', पंचमाला षड्ज केल्यास 'मधमाद सारंग'! विभिन्न स्वरांपासून आरंभ होणाऱ्या सप्तकाच्या क्रमशः आरोहावरोहाला 'मुर्छना' असे म्हणतात.संगीतातील 'ग्राम' ही संकल्पना मुर्छना पद्धतीचा आधार आहे. या रागात चित्रपट किंवा इतर गीते फारशी नाहीत.पण जी काही आहेत ती श्रवणीय आहे.तसे पाहिले तर शास्त्रीय संगीत व चित्रपट संगीताचा उद्देश केवळ मनोरंजन असल्याचे दिसून येते.फरक इतकाच की शास्त्रीय संगीत कठीण नियमाच्या साखळीत बांधून रसिकांसमोर येते.या उलट चित्रपट संगीत हलक्या-फुलक्या पद्धतीने आणि चित्रीकरणासह लोकांसमोर आल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते व लोकप्रिय होते.जरी चित्रपटातील गाण्यांचा शास्त्रीय संगीत हा बेस असला तरी मनोरंजनाच्या शर्यतीमध्ये शास्त्रीय संगीत चित्रपट संगीताच्या मानाने मागेच राहते.म्हणजेच फक्त श्राव्यपेक्षा दृक माध्यमांद्वारे संगीत आबाल-वृद्धांच्या अंतर्मनापर्यंत थेटपणे पोहोचते असे बर्नार्ड शा (१९२५ चे नोबेल पुरस्कार साहित्य विजेता महान नाटककार व कुशल राजनीतिज्ञ मानवतावादी व्यक्तित्व), हर्बर्ट रीड (एक इंग्रजी कला इतिहासकार, कवि, साहित्यिक आलोचक आणि दार्शनिक होते),प्लेटो (प्रसिद्ध दार्शनिक) या पाश्चात्य तज्ज्ञांचे म्हणणे बरोबर आहे असे वाटते. दुर्गा राग बहुतेक आजी,माजी कलाकारांनी गायीला व आपापल्या वाद्यांवर अतिशय सुंदर रीतीने सादर केला आहे.याचे सर्व व्हीडिओ युट्युबवर असल्यामुळे आपण बघू शकता. ● चित्रपट गीते... 'ऐ बादे सबा आहिस्ता चल' हेमंत कुमार.चित्रपट-अनारकली.संगीत-सी.रामचंद्र (१९५३). 'ओ दूर के मुसफिर हमको भी साथ ले ले रे' रफी. चित्रपट-उडन खटोला. संगीत-नौशाद (१९५५). 'वृन्दावन का कृष्ण कन्हैया सबकी आंखों का तारा' चित्रपट-मिस मेरी.संगीत-हेमंत कुमार (१९५७). 'चंदा रे मोरी पतीया ले जा' लता,मुकेश.चित्रपट-बंजारन. संगीत-परदेसी (१९६०). 'गीत गाया पत्थरोंने' आशा भोसले,किशोरी आमोणकर,महेंद्र कपूर. चित्रपट-गीत गाया पत्थरोंने.संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६४). 'जानेवाले ओ मेरे प्राण तेरी खुशी है मेरी बहार' आशा भोसले.चित्रपट-गीत गाया पत्थरोंने.संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६४) 'हम ईंतजार कंटेंगे तेरा कयामत तक' रफी,आशा.चित्रपट-बहू बेगम.संगीत-रोशन (१९६७). 'सावन का महिना पवन करे सोर'लता,मुकेश. चित्रपट-मिलन.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल.(१९६७). 'जीवन से ना हार जीनेवाले' गायक,संगीतकार-किशोर कुमार.चित्रपट-दूर का राही (१९७१). 'कहां तक ये मन को अंधेरे छलेंगे' किशोर कुमार.चित्रपट. बातों बातों में.संगीत-राजेश रोशन (१९७९). 'तू इस तरहा से मेरी जिंदगी में शामिल है' मनहर उधास. चित्रपट-आप ऐसे तो न थे.संगीत-उषा खन्ना (१९८०) ●हिंदी... 'हे राम हे राम' भजन-जगजीत सिंग. 'देवी भजो दुर्गा' भजन-मीता पंडित. 'जय जय जय दुर्गे मां भवानी' गायक-डॉ.रामगोपाल त्रिपाठी. ●मराठी... 'कर हा करी धरीला शुभांगी' संगीत नाटक 'संशय कल्लोळ'. 'चंद्रिका ही जणू' संगीत नाटक 'मानापमान'. 'या लता शिकविती गीत' संगीत नाटक 'धाडिला राम तिने का वनी' गायक- नारायणराव बोडस. 'केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा' -सुमन कल्याणपूर. 'पायो जी मैंने राम रतन धन पायो' 'केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली' आशा.सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर. --------------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि.३ सप्टेंबर २०२३.

काट्यांची मखमल..

नुसत्याच तुझ्या हसण्याने...





संगीत आणि साहित्य :