गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, June 26, 2023

हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे

 कोरस व वेस्टर्न तालवाद्यांचा वापर करून संगीबद्ध केलेली 

'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे,
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे'

ही माझीच  गझल प्राजक्ता सावरकर शिंदेच्या आवाजात सादर करीत आहे. संगीत संयोजन मिलिंद गुणे यांचे असून ध्वनिमुद्रण पुण्याच्या पंचम स्टुडिओत केले आहे.मिक्सिंग व मास्टरिंग अजय अत्रे यांनी केले.मराठी गझल गायकीतील हा पहिलाच प्रयोग आहे.आवडणे,नावडणे हा आपला हक्क आहे.त्यामुळे  मनमोकळ्या प्रतिक्रिया अपेकक्षित.


 

राग पुरिया कल्याण

         #राग_रंग १३                   

     मारवा थाटोत्पन्न पुरिया कल्याण हा राग यमन आणि पुरिया मिळून बनला आहे.त्यामुळे याचे नाव पुरिया कल्याण असे पडले आहे.ढोबळमानाने पूर्वांगात पुरिया व उत्तरांगात यमन असे याचे रूप असून यात दोन रागाचे मीलन घडवणारा पंचम स्वर अतिशय महत्वाचा आहे.कोमल रिषभ व तीव्र मध्यम असलेला हा राग गायक आणि वादकांचा अतिशय आवडता आहे. अशा प्रकारे एक वा अधिक रागाचे मिश्रणातून तयार झालेल्या रागास मिश्र राग म्हणतात.पण हे मिश्रण रंजकच असायला हवे.हे मात्र निश्चित! (हे मिश्रण ज्या कुणी केले असेल त्याला साष्टांग दंडवत) भैरव बहार, हिंडोल बहार, बागेश्री बहार,भूप कल्याण ,केदार नट,सुहा कानडा,सुहा बिलावल,जैत कल्याण,तिलक कामोद,यमन कल्याण,जलधर केदार,गौड मल्हार,जयंत मल्हार,गौड सारंग,कामोद नट,हमीर नट,जोग कौंस,मधु कौंस,मेघ मल्हार,कौशी कानडा, बसंत बहार,अहिर भैरव,नट भैरव,नट बिहाग वगैरे वगैरे ही मिश्र रागांची उदाहरणे आहेत. (असाच एक, दोन रागांचे मिश्रण वाटणारा 'गोरख कल्याण' नावाचा राग आहे.पण यात कल्याण कुठेच दिसत नाही.) गायक वादकांना मिश्र रागात आपली कला मांडताना भिन्न प्रकारच्या दोन रागांची रंजक मांडणी करण्यास खूप वाव असतो.तसे हे काम अत्यंत कौशल्याचे आहे यात वाद नाही.एक मात्र खरे की असे राग गायिल्याने गायकाची स्वरावरील हुकूमत दिसून येते,हे मात्र नक्की.
      संगीतामध्ये रागांची रचना रसोत्पत्तीसाठीच झाली असावी असे म्हणतात.पण फक्त स्वरांनी रसोत्पत्ती कशी होणार? त्यासाठी शब्द पण हवे ना! संगीताला काव्याची जोड दिल्याशिवाय ते समाजमनावर प्रभाव पाडू शकत नाही.उत्कृष्ट काव्य कशाला म्हणावे यावरील एक संस्कृत श्लोक मला सापडला.तो असा:-
   
    सुस्वरं सुरसं चैव सुरागं मधुराक्षरम् |
    सालंकार सप्रमाणं च षड्वर्ग्य गीतलक्षणं ||
   
पूर्वीच्या काळी धृपद गायकीमध्ये विविध प्रकारचे काव्य असायचे. रागाईतकेच शब्दांना पण त्या काळी खूप महत्व असावे असे तानसेन रचित राजा मानसिंगांची प्रशंसा असलेल्या खालील धृपदावरून दिसून येते.

      छत्रपति मान राजा, तुम चिरंजीव रहौ जौलो ध्रुव मेरू तारो |
      चहूं देस से गुनीजन आवत, तुम पै धावत सबहिं को जग उज्यारौ ||
      तुमसे जो नहीं और कासे जाय कहूँ दौर, मोये रक्षा करन हारौ |
      देस करोरन गुनीजन कौं अजाचक किये तानसेन प्रति पारौ ||
     
      राजे रजवाड्याची प्रशांसाच धृपदात नसायची.तर नखशिखांत अंग वर्णन,ऋतू वर्णन वगैरे काव्य पण असायचे.हे तानसेनाच्याच खालील धृपदावरून लक्षात येते.
     
      झुमि झुमि आवत नैना भारे तिहारे | विथुरी अलकै स्याम घन सी लागत
      झपकि झपकि उधरि जात मेरे जान तारे | अरुन बरन नैना ता मैं लाल लाल
      दोरे तापर यह मौज वारि वारि डारै | तानसेनि कौं प्रभु सदाई छके रहत
      कोकिल की धुनि मोहिं बिन अंजन का रै |
     
त्या मानाने ख्याल गायकीत शब्दांपेक्षा स्वरांना जास्ती महत्व देत असल्याचे दिसते.अर्थात काही मान्यवर गायक याला अपवाद असतीलही.पण बहुतेक गायक स्वरमांडणीकडेच लक्ष देत असल्याचे दिसून येते.जुन्या ग्रंथात श्रुतीची दिप्ता,आयता, मृदू,मध्या व करुणा अशी वर्गवारी केली आहे.पण निरनिराळ्या रागांचा रसांशी संबंध लावण्याच्या कामी या वर्गवारीचा उपयोग होईल असे वाटत नाही.तसेच...

    सरी विरेद्भुते रौद्रे धो बीभत्से भयानके |
    कार्यो गति तू करूणे हास्यशृंगारयोर्मपौ ||
   
स्वर आणि रस यांचा संबंध दाखविणारा असा एक संस्कृत श्लोक आहे.पण तेवढ्यावरून राग व रसाचा संबंध ठरविता येत नाही.ते काहीही असले तरी संगीताचा मुख्य उद्देश आनंद निर्मिती हाच आहे.
    मला जसराजजींचे गाणे खूप आवडायचे.त्यांनी गायिलेल्या पुरीया कल्याणने मला अक्षरशः वेड लावले होते.यवतमाळला आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये उत्तम जुळे म्हणून गायक व हार्मोनियम वादक मित्र होता.जसराजजींचे त्याच्याशी नातेसंबंध असल्यामुळे मुंबईला गेला की त्यांना भेटायचा. त्याचेसोबत मी सुध्दा दोन तीनदा पंडितजींकडे जाऊन आशीर्वाद घेऊन आलो. तरुणपणीच्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत मी बहुतेक त्यांच्या बंदिशी गायचो.
                                    ●
             -सुधाकर कदम यांची धुंद मैफल-
               यवतमाळ ता.२२     (वार्ताहर)
                    'प्रीत मोरी लागी तुमसंग' ह्या
               गोरख कल्याण रागातील मोठ्या
               ख्यालाने सुरवात करून लगेच
               छोटा ख्याल 'नेक कृपा कर आये'
               गाऊन सुधाकर कदम यांनी
               संगीताच्या धुंद मैफलीत रंग भरला.
               येथील 'रविवासरीय चर्चा मंडळाने
               हा तीन तासांचा कार्यक्रम आयोजित
               केला होता.'घेई छंद मकरंद' 'दिव्य
               स्वातंत्र्य रवी' ही नाट्यपदं व 'जाको
               मन लाग्यो शाम' हे सुरदासाचे भजन
               गाऊन तर रसिकांना श्री कदम यांनी
               अक्षरशः वेड लावले.आणि शेवटी पं.
               जसराज यांची प्रसिद्ध भैरवी 'सांवरे
               रंग राची' त्यांनी गायिली.
                      संगीताच्या या बेहोष मैफिलीस
                साथ दिली अविनाश जोशी,भास्कर
                घोटकर,रतन जोशी,विनोदकुमार वाढई
                यांनी तर हार्मोनियम आणि तबल्याची
                बहारदार साथ केली अनुक्रमे श्री.विनायक
                भिसे आणि श्री.बाबा खोतकर यांनी.
                      श्री.कदमांचा परिचय व उपस्थितांचे
                 आभार प्रदर्शन श्री.विजय राणे यांनी
                 केले.
             ● तरुण भारत,नागपूर.दि.२३ मार्च १९८७        
                                     ●     
              
त्यांचा किंवा पं.जितेंद्र अभिषेकींचा गंडाबंद शागिर्द व्हायची खूप इच्छा होती.पण आर्थिक परिस्थितीमुळे हे जमले नाही.परंतू या दोन्ही पंडितांच्या व छोटा गंधर्वांच्या सहवासाने  बऱ्याच गोष्टी शिकलो.त्या आजही कामी येत आहेत.
     उस्ताद अमीर खान, पंडित भीमसेन जोशी,रोशनआरा बेगम, प्रभा अत्रे,गीता गुलवडी, उस्ताद राशीद खान,पं. जगदीश प्रसाद,पं.अजय चक्रवर्ती, व्यंकटेशकुमार,कैवल्य कुमार गुरव,गुलाम हसन खान,विनिता गुप्ता,संगीता बंदोपाध्याय,पं. विजय कोपरकर,संजीव अभ्यंकर,मनाली बोस,कौशिकी चक्रवर्ती,ध्रुव शर्मा,पं. रविशंकर,सहाना बॅनर्जी,संजय देशपांडे (सतार), पं. रामनारायण,दिलशाद खान (सारंगी), पं. हरिप्रसाद चौरसिया,आश्विन श्रीनिवासन,पं. अजय शंकर प्रसन्ना (बासरी),उस्ताद अमजद अली (सरोद),पं. शिवकुमार शर्मा,नंदकिशोर मुळे (संतूर),पं. आनंतलाल आणि पार्टी (शहनाई), प्रवीण गोडखिंडी आणि रफिक खान (बासरी सतार जुगलबंदी) पुरिया कल्यामधील हे सर्व सध्या नेटवर उपलब्ध आहे.
     ●चित्रपट गीतांमध्ये पुरिया कल्याण रागावर आधारित गाणी नसल्यातच जमा आहे.
'तोरी जय जय करतार', उस्ताद अमीर खान.चित्रपट-बैजू बावरा.
'मेरी सांसों को महका रही है', लता.चित्रपट-बदलते रिश्ते.
      ●मराठीमध्ये ही दोन गाणी आहेत.
'गुरू एक जगी त्राता' -सुधीर फडके.
पंडित जितेंद्र अभिषेकींनी स्वरबद्ध केलेले 'मुरलीधर शाम हे नंदलाल', अतिशय गोड असे नाट्यगीत रामदास कामत यांनी अतिशय सुंदर गायिले आहे. नाटक-कट्यार काळजात घुसली.
        मी नुकताच 'काट्यास फूल आले' हा रविप्रकाश चापके या गझलकाराच्या मराठी गझलांचा अलबम केला आहे.त्यातील एक गझल पुरिया कल्याण रागावर आधारित आहे.या गझलमध्ये पुरिया कल्याण सोबत मारवा पण आपणास दिसेल.फक्त दुसऱ्या मिसऱ्यात रंजकता वाढविण्यासाठी कोमल मध्यमाचा उपयोग केला आहे.हा मध्यम पहिल्या मिसऱ्यात शेवटी तीव्र मधमावर जाताना घासून गेल्याचा पण भास होतो.दुसऱ्या शेरातील आलापात मारवा स्पष्टपणे दिसतो.हा राग मारवा थाटातीलच असल्यामुळे हा आलाप खटकत नाही.गायक आहे मयूर महाजन.यातील उस्ताद लियाकत अली खान यांची सारंगी,निनाद दैठणकरांचे संतूर आणि  पांडुरंग पवार यांचा तबला ऐकण्यासारखा आहे.
युट्युबवच्या 'गीत-गझलरंग' या चॅनलवर ही गझल आपण ऐकू शकता.

        जळलो धुपापरी मी मज सांगता न आले
        माझ्या परी फुलांना गंधाळता न आले...
       
        क्रोधास हाय केव्हा फेकून मौन मारू
       आम्हा नजाकतीने का भांडता न आले

        मृत्यो तुलाच वेड्या मी मारलेच नसते
        थांबून ये म्हणालो तुज थांबता न आले

         आजन्म मी खेळलो मी मस्तीत विस्तवाशी
         लाचार त्या चितेला मज जाळता न आले
        
युट्युब लिंक.....
https://youtu.be/QJx6Txf6o60
-------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,नक्षत्र पुरवणी. दि.२५ जून २०२३


 

Saturday, June 17, 2023

राग झिंझोटी...



     झिंझोटी रागाच्या बाबतीत माझी एक अतिशय हृद्य आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते.त्या वेळी मी ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन वाजवायचो. ऑर्केस्ट्राच्या खोलीत कुणी कधी वाजवत नसलेले मेंडोलीन होते. मी तबला,हार्मोनियम,अकॉर्डिअन वाजवीत असल्यामुळे.हे तंतुवाद्य आपल्याला कधीच जमणार नाही म्हणून त्याला कधीच हातात घेतले नाही.दुर्दैव म्हणा की सुदैव, ऑर्केस्ट्राचे निवेदक (विदर्भातील प्रसिध्द वऱ्हाडी कवी) शंकर बडेने त्याचे गावातील शाळेच्या नवीन खोल्या बांधण्यासाठी मदत करायची म्हणून 'दिवा जळू दे सारी रात' हे नाटक बसवायला घेतले.संगीतकार मी होतो. तालमी सुरू झाल्या नि मी आजारी पडलो. आजारपणातील वेळ घालविण्यासाठी ऑर्केस्ट्रातील मेंडोलीन घरी बोलविले.व त्यावर अलंकार घोटणे सुरू केले.आठ दिवसात हात छान रुळला व वाजविण्यात मजा यायला लागली.त्यामुळे पुढे मला जे जे राग माहीत होते त्याचा रियाज सुरूच ठेवला.तशातच नाट्यप्रयोगाच्या दोन दिवस अगोदर माझ्यासोबतचा व्हायोलिनिस्ट आजारी पडला.मग काय? नाटकातील गंभीर प्रसंगी मेंडोलीनचे सूर कामी आले.प्रयोग चांगल्या प्रकारे यशस्वी झाला.
     त्याकाळी यवतमाळच्या नेहरू युवक केंद्रातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात माझा फार मोठा वाटा असायचा. असाच एक कार्यक्रम यवतमाळच्या नगर भवनात आयोजित करण्यात आला होता.गायन,वादनाच्या या कार्यक्रमात मी मेंडोलीनवर एक धून वाजविली.कार्यक्रमाला यवतमाळातील संगीत प्रेमींसह संगीत दर्दी पण होते.त्यात बडे गुलामली खान साहेबांचे शिष्य अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख पंडित मनोहरराव कासलीकरही होते.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलवले व 'तू आज जी धून वाजविली ती कोणत्या रागात होती?' असा प्रश्न केला.त्यावेळी मी जरी तबला,हार्मोनियम,अकॉर्डिअन वाजवीत होती तरी संगीत शिकत होतो.म्हणजे विद्यार्थी दशाच होती.मी केव्हा तरी रेडिओवर ऐकलेल्या गतीची पहिली ओळ डोक्यात होती,ती वाजवून पुढे त्या सुरावटीला अनुसरून स्वरांचे गुच्छ तयार करून पाच मिनिटात वादन संपविले असल्यामुळे राग वगैरे माहीत नव्हता. त्यामुळे 'मला माहित नाही' असे उत्तर देऊन खाली मान घालून गप्प बसलो.तेव्हा त्यांनी मला रागाचे नाव सांगितले 'झिंझोटी'! आणि डोक्यावर हात ठेवून ,'छान वाजवतोस.थोडा जास्ती आणि डोळस रियाज कर' असे सांगून निघून गेले.त्यांच्या या वाक्यावरून मी पुढे दोन वर्षे 'डोळस' रियाज करून नागपूर आकाशवणीचा मान्यताप्राप्त मेंडोलीन वादक झालो.तेव्हापासून झिंझोटी राग कायमचा डोक्यात बसला तो आजतागायत.
      यवतमाळ येथीलच झिंझोटी रागाचा एक किस्सा ऐविल्याशिवाय राहावत नाही...आमच्या टोळक्यात एक पात्र सोडून बहुतेक सर्वजण संगीतप्रेमी होते.त्यामुळे गावात कुठेही संगीत मैफल असली की आम्ही तेथे जायचो. 'त्या' एकालाही संगीताची गोडी लागावी म्हणून त्याला सुद्धा सोबत घेऊन जायचो.पण तो थोड्याच वेळात झोपायचा व घोरायला लागायचा. त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे तेथून आमची हकालपट्टी व्हायची.तरी पण आम्ही त्या 'घोरी'ला 'अघोरी' बनविण्याचा चंगच बांधला होता. एकदा यवतमाळातील प्रसिद्ध वकीलाकडे एका खांसाहेबांची मैफल असल्याचे कळले.आम्ही त्या 'घोरी'सह आमचा मोर्चा तिकडे वळविला.कुप्रसिद्धीमुळे आम्हाला सगळ्यात शेवटी बसण्याची कशीबशी अनुमती मिळाली.खान साहेबांनी मैफलीत कुणीही झिंझोटी राग गात नाही,पण आज मी गाणार आहे.असे म्हणून मोठ्या ख्यालाला हात घातला. थोड्याच वेळात आमचा मित्र झोपण्याच्या बेतात आला.तो झोपू नये म्हणून आम्ही त्याला मधून मधून टोचण्या द्यायला लागलो.कारण खान साहेब झिंझोटी राग मस्त रंगवून अतिशय उत्कृष्टपणे सादर करीत होते.छोटा ख्याल संपेपर्यंत आमचा मित्र स्वतःच्या झिंज्या उपटण्याच्या बेतात आला होता. छोटा ख्याल संपल्यानंतर खान साहेबांनी 'मै तोड लायी राजा' हा दादरा सुरू केला.वेगवेगळ्या सुरवटींनी ही ओळ ते सजवीत होते.मैफल मस्त रंगली होती.रसिकांकडून वाह व्वा ची बरसात सुरू होती.आम्ही पण गुंगलो होतो.अशा प्रकारे जवळ जवळ दहा मिनिटे 'मै तोड लायी राजा' गायिल्या नंतर जेव्हा पुढे 'जमुनवा की डाली' असे त्यांच्या तोंडून आले तसा आमचा घोरी मित्र करवादला 'इत्ती देर मे तो मै अक्खा पेड उखाडकर लाता था...'! यानंतर काय घडले असेल याची कल्पना तुम्ही करू शकता.असो!
      झिंझोटी हा खमाज थाटोत्पन्न क्षुद्र प्रवृत्तीचा राग मानल्या जातो.(क्षुद्र प्रवृत्तीचे वा हलक्या प्रकारचे मानल्या गेलेले पिलू,मांड वैगेरे राग मांडायला व गायकाला डोक्यात घ्यायला बरेच परिश्रम करावे लागतात.तरी पण त्यांना क्षुद्र म्हणून का हिणवल्या गेले कळत नाही.खरे तर ज्यावरून शास्त्रीय संगीत निर्माण झाले त्या लोकगीतांच्या सुरावटी आहेत.) बहुतेक क्षुद्र प्रवृत्तीचा मानला गेलेल्या या रागात मानवी वृत्तीच्या सर्व भावना व्यक्त करण्याची क्षमता आहे हे खालील चित्रपट गीतांच्या यादीवरून आपल्या लक्षात येईल.बहुतेक गायक हा राग मैफिलीत गात नाही असे म्हणतात.पण वादक आणि संगीतकार मात्र या रागावर फिदा असल्याचे दिसून येते..
      
      कोमल मनि झिंझूटी है , चढ़त न लगे निषाद ।
      कहूँ कोमल गन्धार है , ध – ग संवादि – वादि ।।
     – राग चन्द्रिकासार
     
    झिंझोटीचे दोन प्रकार आहेत.एकात दोन्ही गांधाराचा प्रयोग होतो.दुसऱ्यात फक्त शुद्ध गांधाराचा प्रयोग होतो.यातील शुद्ध गांधाराचा झिंझोटी लोकप्रिय आहे.हा हलका आणि चंचल प्रकृतीचा राग असल्याचे म्हटल्या जाते.का? ते माहीत नाही.माझ्या मते कुठलाच राग हलका नसतो.तुमच्यात रंगविण्याची कुवत असेल तर कोणताही राग रंगविता येतो.हे उस्ताद फ़ैय्याज खान, उस्ताद निसार हुसेन खान,पंडित नारायणराव व्यास,कुमार गंधर्व,पंडित जितेंद्र अभिषेकी,पंडित राजन साजन मिश्र,पंडित अजय पोहनकर,किशोरी आमोणकर,मालिनी राजुरकर,उस्ताद राशीद खान,उस्ताद डागर बंधू,गुंधेचा बंधू,पंडित दिनकर कैकिणी,पंडित हनुमान सहाय,अश्विनी भिडे देशपांडे ('पतिदेवन महादेव' माझ्या अतिशय आवडीचे आहे.),पंडित जानोरीकर,पंडित राजशेखर मन्सूर,अरुण कशाळकर,शुभा मुद्गल,रघुनंदन पणशीकर,पंडित तुषार दत्त,शाश्वती मंडल,प्रचला आमोणकर,पूजा बाक्रे,शुभंकर डे,पंडित कौशिक भट्टाचार्य,ब्रजेश्वर मुखर्जी,श्रीमती देवी,मौमिता मित्रा,षड्ज अय्यर,सबिना मुमताज इस्लाम,मुकुल कुलकर्णी,शराफत हुसेन खान वगैरे गायक, गायिकांनी रंगविलेल्या झिंझोटीवरून लक्षात येते.
    आता आपण हिंदी चित्रपटसृष्टीचा आढावा घेऊ या...
झिंझोटी रागावर आधारित इतक्या विविध मूडची इतकी गाणी,गझला दुसऱ्या कुठल्या रागावर आधारित मी तरी पाहिल्या नाहीत.
'सो जा राजकुमारी सो जा', के.एल.सहगल.चित्रपट-जिंदगी.
'पिया बिन नहीं आवत चैन', के.एल.सहगल.तिमिर बरन, चित्रपट-(जुना)देवदास
'चली बन के दुल्हन उनसे लागी लगन',
लता. चित्रपट-सुबह का तारा.
'जा जा रे जा बालमवा', लता.चित्रपट-बसंत बहार
'छुप गया कोई रे दूर से पुकार के,दर्द अनोखे हाय दे गया प्यार के', लता.चित्रपट-चंपाकली.
'तेरी आंखों के सिवा दुनिया में रक्खा क्या है', रफी. चित्रपट-चिराग.
'रहते थे कभी उन के दिल मे', लता. चित्रपट-ममता.
'दिल के टुकडे हुए और जिगर लूट गया' लता.चित्रपट-सन ऑफ इंडिया.
'बदली बदली दुनिया है मेरी' महेंद्र कपूर.चित्रपट-संगीत सम्राट तानसेन.
एक रात मे दो दो चांद खिले', मुकेश-लता. चित्रपट-बरखा.
'ता थै तत थै', आशा भोसले.चित्रपट-तेरे मेरे सपने.
'फिरतेरी कहानी याद आई,फिर तेरा फसाना याद आया', लता.चित्रपट-दिल दिया दर्द लिया.
'संसार से भागे फिरते हो', लता.चित्रपट-चित्रलेखा.
'जाऊं कहां बता ये दिल दुनिया बडी है संगदिल', मुकेश. चित्रपट-छोटी बहन.
'जो गुजर रही है मुझपर उसे कैसे मैं बताऊं', रफी. चित्रपट-मेरे हुजूर.
'इक हसीं शाम को दिल मेरा खो गया', रफी. चित्रपट-दुल्हन एक रात की.
'कैसे कटेगी जिंदगी...' (अनरिलीज्ड मदन मोहन)
'कोई हमदम न रहा कोई सहारा न रहा', किशोर कुमार. चित्रपट-झुमरू.
'जिंदगी का सफर है ये कैसा सफर', किशोर कुमार. चित्रपट-सफर.
'ये लाल रंग कब मुझे छोडेगा', किशोर कुमार. चित्रपट-प्रेम नगर.
'सखी रे पी का नाम,नाम न पुछो',लता.चित्रपट-सती सावित्री.
'आज है प्यार का फ़ैसला', लता. चित्रपट-लीडर.
'हम आज कहीं दिल खो बैठे', मुकेश. चित्रपट-अंदाज.
घुंगरू की तऱ्हा बजता ही राहा हूँ मैं',किशोर कुमार. चित्रपट-चोर मचाये शोर.
'जो गुजर रही है मुझपर', रफी.चित्रपट-मेरे हुजूर.
'दो दिल टूटे दो दिल हारे', लता.चित्रपट-हीर रांझा
'क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार मे' रफी आणि 'मोसे छल किये जा',रफी-लता,चित्रपट-गाईड.(धून एक,गाणी दोन)
'रात निखरी हुई,जुल्फ बिखरी हुई', मुकेश. चित्रपट-हम हिंदुस्थानी.
'तेरा मेरा साथ रहे' लता.चित्रपट-सौदागर.
'क्या खबर क्या पता क्या खुशी है गम है क्या', किशोर कुमार. चित्रपट-साहेब
'मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया',किशोर कुमार. चित्रपट-कोरा कागज
'सजी नहीं बारात तो क्या,आयी ना मिलन की रात तो क्या', किशोर कुमार. चित्रपट-बिन फेरे हम तेरे
'मेरे मेहबूब तुझे मेरी मुहब्बत की कसम', रफी. चित्रपट-मेरे मेहबूब.
'तुमने किसीं की जान को जाते हुए देखा है,वो देखो मुझ से रुठकर मेरी जान जा रही है', रफी. चित्रपट-राजकुमार.
'मुझे दर्दे दिल का पता न था मुझे आप किस लिए मिल गये', रफी. चित्रपट-आकाशदीप.
'तुम मुझे यूं भुला न पाओगे', रफी. चित्रपट-पगला कहीं का.
'जिंदगी जिंदगी मेरे घर आ ना', अनुराधा पौडवाल. चित्रपट-दुरीयां
'सुनी रे नगरिया' लता. चित्रपट-उपहार.
'रिमझिम बरसता सावन होगा रफी',लता.चित्रपट-जीवन मृत्यू.

'पिया बिन नहीं आवत चैन' ही अब्दुल करीम खां साहेबांनी गायिलेली अप्रतिम ठुमरी प्रसिद्धआहे.हीच ठुमरी (जुन्या) देवदास या चित्रपटात के.एल.सैगल यांनी गायिली आहे.आणि पुढे रोशनआरा बेगम, लक्ष्मीशंकर, पंडित भीमसेन जोशी, फरीद हसनसह अनेक गायक/गायिकांनी गायिली आहे.

'देख तो दिल की जाँ से उठता है', 'आंखे सज्जादा', 'नावक अंदाज', 'हुवा जो तीरे नजर', 'गुलों में रंग भरे बादे नौ बहार चले','देखे भाले दोस्त हमारे' गायक-मेहदी हसन
'मैं नजर से पी रहा हूँ', गझल-गुलाम अली
'दिल परेशान है क्या किया जाये' गझल.गायक-कनिष्क सेठ.
'साहिब तेरी बंदिया बंदिया के चंगिया' - नूरजहां आणि  नुसरत फतेह अली.
      मराठी सुगम संगीतमध्ये मात्र झिंझोटीचा फारसा वापर झालेला दिसत नाही.
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,दि. १८ जून २०२३


 

Friday, June 16, 2023

सुधाकर कदमांनी शब्द/स्वरसंपदा... शाहीर सुरेशकुमार वैराळकर.


       आजमितीस सुधाकरच्या नावावर लेखक/कवी म्हणून ’#फडे_मधुर_खावया…’ (स्फूट लेख), ’#सरगम’ (स्वरलिपी), ’#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा' 

व '#काळोखाच्या_तपोवनातून' (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच ’#भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), '#अर्चना’ भक्तिगीते (टी सिरीज)', '#खूप_मजा_करू’ बालगीते (फाऊंटॆन म्युझिक कं), ’#काट्यांची_मखमल’ मराठी गझल (युनिव्हर्सल म्युझिक कं), ’#तुझ्यासाठीच_मी...’ मराठी गझल ( युनिव्हर्सल म्युझिक कं), ह्या कॅसेट,सीडीज सोबतच '#रे_मना' (गीत-गझल) हा अल्बम spotify, gana. com, youtube ह्या ऑडिओ चॅनल्सवर आहे.आणि #गझल_गुलाबो व #वेदनेचा सूर हे दोन अलबम  लवकरच येत आहे.

        सुधाकरनेच स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्दू गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, कल्पिता उपासनी,आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी त्याने स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत भापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊर,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोषी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके,ज्योती बालिगा,किरण पिंपळशेंडे,चंदना सोमाणी, संदीप गावंडे व दस्तुरखुद्द सुधाकर कदम हे आहेत.

        आणि उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध करण्याचे खूप मोठे काम त्याने केले आहे....

आयुष्याच्या अत्यंत समृद्ध टप्प्यावर माझा हा कलंदर मित्र उभा आहे.त्याला आरोग्यपूर्ण,समृद्ध दीर्घ आयुष्य लाभॊ यासाठी माझ्या शुभेच्छा...!

-शाहीर सुरेशकुमार वैराळकर 

संस्थापक अध्यक्ष

सुरेश भट गझल मंच

पुणे 

-----------------------------------------------

.                 #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना

#मराठी_गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.भास आभासावरी मन-रविप्रकाश चापके

५३.जळलो धुपापरी मी-             "      

५४.जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे-     "

५५.मला आठवे ना तुला भेटल्याचे-        "

५६.प्रतिक्षा प्रार्थना झाली-             "

५७.माझी गझल गुलाबो-              "

५८.असे पत्र आता तुला मी लिहावे-            "

५९काट्यास फूल आले-रविप्रकाश चापके

६०.जीवना सांभाळतो मी-सुधाकर कदम

६१.आसवांनी मी मला-सुरेश भट

६२.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

६३. शेवटी हे दुःख माझे-ज्योती बालिगा

६५. मज सांग आज तुझ्याकडे-ज्योती बालिगा

६६. जेव्हा मला कळे ना-संदीप गावंडे

६७. लिहावे किती मीच माझ्या मनावर-किरण पिंपळशेंडे

६७. शब्दांनाही सूर भेटता मिठीत हरखे गाणे-चंदना सोमाणी

६८. वेदनेचा सूर देउन काळजाला-सुधाकर कदम


#मराठी_गीते

१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट

२.पहाटे पहाटे-                "

३.मी असा आहे कलंदर-    "

४.गे मायभू-                     "

५.तसे किती काटे रुतले-     "

६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर

७.झोपडीच्या झापाम्होरं-                 "

८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज

९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे

१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद

११.सकाळ-उ.रा.गिरी

१२.मराठी हजल-शिवजी जवरे

१३.मन-बहिणाबाई

१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर

१५.घोडा (बालगीत) शांता शेळके

१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे

१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत

१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे

१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे

२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे

२१.ये मंत्राची घुमवित वीणा-   "

२२.शक्ती दे तू आज मजला-   "

२३.दयासागरा-                      "

२४.तुझीच सुमने-                   "

२५.करुणा अपार आहे-           "

२६.वेद झाले वेदनांचे-              "

२७.तूच माझे गीत कोमल-         "

२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम

२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर

३०बारीकराव-                    "

३१.रिमझिम पाऊस-            "

३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "

३३.बागेतल्या फुलांशी मैत्री-   "

३४.रानातले पक्षी-                 "

३५.थेंब-                              "

३६.इवलसं बी-                     "

३७.खूप मजा करू-                "

३८.उठ उठ सह्याद्रे

३९.आभाळ वाजलं

४०.पीक खुशीत डोलतय सारं

४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी

४२.क्षेत्र डहेगाव-         "

४३.सकल जीवांचा करी जो सांभाळ-       "

४४.वेडे वाकुडे गायन-               "

४५.भाव गंगा वाहे पूर-                "

४६.देव माझा मी देवाचा-            "

४७.पाहीन मी देवा चरणी राहीन-  "

४८.तुझिये पाहता चरण-            "

४९.टाळ मृदंगाचा ध्वनी-             "

५०.आम्हा योगियाचा छंद-           "

५१.गुरू मायबाप-                      "

५२.गुरुकृपे मज समाधी लागली-   "

५३.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे

५४.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे

५५.आर्त गाण्यातून फुलता-सुधाकर कदम

५६.हा भाव भावनांचा-                 "

५७.इंद्रियात न्हाता सारी इंद्रायणी-   "

५८.जीवनाची एकतारी-                "

५९.काकडारतीच्या वेळी-              "

६०.कशी वेदना विसरायाची-          "

६१.स्पर्शून एकदा तू-                    "

६२.रे मना तुज काय झाले-            "

७३. आभाळाचे गर्द निळेपण या डोळ्यांना यावे-गजेश तोंडरे


#उर्दू_ग़ज़ल

१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र

२.दिल लगाया है तो नफरत-     "

३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़

४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे

५.गयी लज्जत पिलाने की-         "

६.तू मेरी दुश्मन नहीं-कलीम खान

७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र 

८.मैं झुकाऊं सर कहीं भी-           "

९.सब में रहकर भी जुदा लगता है तू-   "

१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी

११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी

----------------------------------------------------

#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील 'नग़्म-ए-ग़ज़ल' आणि 'प्रसार गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...


#उर्दू_ग़ज़ल

१.

छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६

२.

पत्थरों के शहर में....         "                 नवम्बर १९८६

३.

इतने करीब मेरे...        मोहन वर्मा 'साहिल'  मार्च  १९९०

४.

किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी.   अप्रैल १९९० 

५.

कोई बात बने...             श.न.तरन्नुम ...       मई  १९९०

६.

मत पुछिए...                  शेरजंग गर्ग...    जुलाई १९९०

७.

दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०

८.

वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा...     मार्च  १९९१

९.

उनकी गलियों से....अशोक अंजुम...         अप्रैल १९९१

१०.

 ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी...  जून  १९९१

११.

आज सदीयों की घनी...कलीम खान...        जून १९९२

१२.

जलाए जब तुम्हे शबनम...   "                 सितंबर १९९२

१३.

आदमी गुज़रता है...किरन भारती...        अक्तूबर १९९२

१४.

हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते...                मई १९९३

१५.

हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी...    नवंबर १९९३

१६.

करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ...      अक्तूबर १९९३

१७.

ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी...                मई १९९४

१८.

बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'...               सितंबर १९९५

१९.

चाक दामां है...अल्लाम 'खिजर'...          अक्तूबर १९९५

२०.

चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'...    दिसंबर १९९५

२१.

तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद...  मार्च १९९६

२२.

आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी...          अगस्त १९९६

२३.

वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७


#गीत


१.

अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे...     अगस्त १९८६

२.

जय जय भारती... वल्लभेश दिवाकर...    अगस्त १९९०

३.

 गदराई उमरिया...शंकर दीक्षित...             अप्रैल १९९१

४.

तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर...           मई १९९१

५.

दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज...    जून १९९१

६.

रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम...  अगस्त १९९१

७.

उम्र पल पल ... श्रद्धा पराते...                अक्तूबर १९९१

८.

जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'...      मार्च १९९२

९.

परमेश आनंद धाम हो...पथिक...             अप्रैल १९९२

१०.

ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा...        जुलाई १९९२

११.

सह्यो न जाय...श्रद्धा पराते...                 अक्तूबर १९९२

१२.

ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा...        नवंबर १९९२

१३.

अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल...       दिसंबर १९९२

१४.

देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२

१५.

चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य...            मई १९९३

१६.

सतरूप प्रभो अपना... पथिक...                  जून १९९३   

१७.

राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल...      सितंबर १९९३

१८.

तू दयालू दीन मैं... तुलसीदास...             सितंबर १९९३

१९.

गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास...  अक्तूबर १९९३

२०.

ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना...      नवंबर २९९३

२१.

गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी...            मार्च १९९४

२२.

ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर...                अप्रैल १९९५

२३.

जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४

२४.

राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल...    जून १९९४

२५.

तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते...         अगस्त १९९४

२६.

आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र...     अक्तूबर १९९४

२७.

उड रे पखेरू  ...शाह हुसेन...                  दिसंबर १९९४

२८.

वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५

२९.

तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६

३०.

रात का पथ... मधुर शास्त्री...                       मई १९९६

३१.

पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६

३२.

पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६


-निषाद कदम

--------------------------------------------------------------------------

#रे_मना या अल्बम मधील माझ्या स्वरबद्ध कविता आता खालील ऑडिओ चॅनल्सवर ऐकू शकता...

1. https://open.spotify.com/album/4tYdLiPmpUNaCnHCNl7iPD?si=mrNcn-wxTReSE2KEbyBt-A&utm_source=native-share-menu

2. https://gaana.com/album/re-mana-marathi

3. https://music.youtube.com/playlist?list=OLAK5uy_lGoVuVZaWLb4CvQ1Qd4NvrYdJYAFGeVEs&feature=share

Wednesday, June 14, 2023

उर्दू गझल गायकीचा शहेनशहा मेहदी हसन...


    आज जगप्रसिद्ध गझल गायक मेहदी हसन खान साहेबांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) आहे. त्यांचा  जन्म १८ जुलै १९२७ ला भारतातील झुंझुनू जिल्ह्यातील लुना या राजस्थातील एका गावात व मृत्यू १३ जून २०१२ ला पाकिस्तानातील कराचीमध्ये झाला.विभाजनाचे वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झाले होते.वडील उस्ताद अझीम खान व काका उस्ताद इस्माईल खान परंपरागत धृपद गायक होते.त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तातच वंशपरंपरेने आले होते.खान साहेबांच्या पंधरा पिढ्या संगीताशी जोडलेल्या होत्या.म्हणजेच खान साहेब सोळाव्या पिढीतील गायक होते.वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या बंधुसोबत त्यांनी धृपद व ख्याल गायन सादर केले.

शास्त्रीय,उपशास्त्रीय व गझल गायनात त्यांचा हातखंडा होता.त्यांचा पाकिस्तान टीव्ही वरील पहिला कार्यक्रम १९५२ मध्ये झाला."नजर मिलते ही दिल की बात का चर्चा ना हो जाए" हे त्यांचे चित्रपटातील पहिले गाणे होते.चित्रपट होता 'शिकार',कवी यजदानी जालंधरी, संगीतकार असगर अली व एम हुसेन.

     तसेच चित्रपटातील पहिली गझल होती "गुलों में रंग भरे बादे नौबहार चले" शायर फ़ैज अहमद फ़ैज,संगीत राशीद यांचे.

    लता मंगेशकरांसोबत त्यांची दोन गाणी आहेत.एक मदन मोहन यांच्या संगीत दिगदर्शनाखाली गायिलेले 'नैनो में बदरा छाए' मधील एक अंतरा आणि मेहदी हसन यांनी संगीत दिलेल्या 'सरहदें' या अल्बम मधील 'तेरा मिलना बहुत अच्छा लगता है'

दोन्ही गाण्यांची लिंक...

१. https://youtu.be/ad6Scios6zc

नैनो में बदरा...

२. https://youtu.be/Do9Q7TwHoCA

तेरा मिलना बहुत अच्छा...

         जगभर उर्दू गझल गायन लोकप्रिय करणारा हा कलावंत आयुष्याच्या शेवटापर्यंत गात राहिला.आपल्या संपूर्ण आयुष्यात ठुमरी/गीत/गझल अश्या ५४ हजार रचना ते गायिले.जवळ जवळ साठ वर्षे आवाज सांभाळून त्याच दमाने गात राहणे तोंडाचा खेळ नाही.

      त्यांच्या या सांगीतिक कार्याबद्दल पाकिस्तान सरकारने त्यांना 'तमगा-ए-इम्तियाज','प्राईड ऑफ परफॉर्मेन्स',

'हिलाल-ए-इम्तियाज' तसेच भारत सरकारने 'सहगल अवार्ड' देऊन सन्मानित केले आहे.

     खान साहेबांचा शिष्यवर्ग पण छोटा नाही.त्यात प्रामुख्याने परवेज मेहदी,तलत अजीज,राजकुमार रिजवी,गुलाम अब्बास,सलामत अली,अफजल,मुन्नी सुभानी, रेहान अहमद खान,सविता आहुजा,शमशाद हुसेन चांद, शहनवाज बेगम (बांगला देश),यास्मिन मुश्तरी (बांगला देश) आणि हरिहरन ही नावे येतात.

           त्यांचे गझल गायन म्हणजे शब्द-सुरांची अप्रतिम उधळण असायची."दिल की बात लबों पर लाकर, अब तक हम दुख सहते थे" हबीब जालीब यांची ही गझल काफी थाटावर आधारित आहे.पण त्यातीलच "बीत गया सावन का महिना मौसम ने नजरे बदली" हा शेर गाताना मध्यमाला षड्ज करून पहाडी रागाच्या स्वरांनी 'सावन'चा इतका मस्त फिल दिला की,कितीही ऐकले तरी समाधान होत नाही.....क्या बात हैं!

    मुजफ्फर वारसीची "क्या भला मुझको परखने का नतीजा निकला" या गझलची बंदिश मालकौंस रागात आहे.पण पुढे शेरात दोन्ही गांधार,दोन्ही निषादाचा प्रयोग करुन  केलेला अविर्भाव-तिरोभाव अतिशय मनभावन आहे.मालकौंस राग कुठे सोहनी राग कुठे,पण हे स्वरांचे धनुष्य पेलून प्रत्यंचा चढवलीच...

         अहमद फराज यांची '"अब के हम बिछडे" ही गझल व बंदिशही तशीच...या सुरावटीचा मोह हृदयनाथ मंगेशकरांसोबतच मलाही पडला.व "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग,राजसा किती दिसात लाभला निवांत संग" ही सुंदर रचना हृदयानाथांनी व "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,कळते मला अरे हा माझा वसंत नाही" ही गझल मी स्वरबद्ध केली.

    रईस खान साहेबांनी भैरवी रागात स्वरबद्ध केलेलं चित्रपटातील गीत "मैं खयाल हूँ किसी और का,मुझे सोचता कोई और है" जेव्हा कार्यक्रमात गातात तेव्हा त्यातील "सुबहो न मिल सकी" या ओळींवर ललित रागाच्या स्वरांची पखरण करतात तेव्हा जाणकारांच्या अंगावर रोमांच उठतो.ती आर्तता काळजात सरळ घुसते.

      "कभी मेरी मुहब्बत कम न होगी,लुटाने से दौलत कम न होगी" या पाकिस्तानी चित्रपटातील गीतावर बेतलेली खमाज रागातील "मुहब्बत करने वाले कम न होंगे,तेरी महफिल में लेकिन हम न होंगे" ही ठाय लयीतील गझल अफलातूनच आहे.यातील "जमाने भर के गम" या शेरात मिया मल्हारची झलक दाखवणारी सुरावट,"अगर तू इत्तेफाकन मिल भी जाए" या शेरात केलेली विविध रागांच्या स्वरांची उधळण अतिशय रंजक आहे.

      मेहदी हसन यांनी जितक्या विविध रागात गझल गायिल्या तितक्या इतर कुणी गायिल्याचे दिसत नाही.(थोडा अपवाद गुलाम अली).

● गुलों में रंग भरे... झिंझोटी.

● शोला था जल बुझा हूँ...किरवाणी.

● एक बस तू ही नहीं...मियाँ मल्हार.

● ज़िंदगी में तो सभी प्यार किया करते है...भीमपलासी.

● दिल की बात लबों पर लाकर... बागेश्री.

● दिल में अब तेरे भुले हुए गम याद आते है...भूपाल तोडी

● मैं होश मे था...,   

    फिर उस जुल्फ की बात    चली...चारुकेशी.

● आपको भूल जाये हम इतने तो बेवफा नहीं...,

    इन कदर मस्तम् (फारसी)... सिंधभैरवी.

● ताजा हवा बहार की दिलका मलाल ले गयी... जैजवंती.

● जीना पडा है मौत की सूरत न पूछिए...बसंत मुखारी.

● दिल-ए-नादां तुझे हुवा क्या है...शुद्ध सारंग.

● रौशन जमाले यार से है अंजुमन तमाम...पटदीप.

● दुनिया किसी के प्यार में जन्नत से कमी नहीं... भूप.

● कोंपले फिर फूट आए...सारंग.

● कू ब कू फैल गई बात... दरबारी.

● मै खयाल हूँ किसी और का...भैरवी.

● रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामां हो गये...काफी थाट.

● जब उस जुल्फ की बात चली...बसंत मुखारी.

● बात करनी मुझे मुश्किल...पहाडी.

● ये मौजज़ा भी मोहब्बत कभी दिखाए मुझे...मधकौंस

   (जोग)

● रंग पैराहन का खुशबू जुल्फ लहराने का नाम...

   सा ग तीव्र म प कोमल नि सां

   सां कोमल नि प तीव्र म ग रे सा

● जो चाहते हो वो कहते हो...नट भैरव

● फूल ही फूल खिल उठे है मेरे पैमाने मे...गौडमल्हार.

● इक खलिश को हासिले उम्रे रवां...दहा थाटात न बसणारी सुरावट.

● मेरी तरहा सरे महफिल उदास था वो भी...कल्याण     थाटावर आधारित.

● मेरी आहों में असर है के नहीं देख तो लू...जनसंमोहिनी.

● तेरी खुशी से अगर गम मे भी खुशी न हुयी...मधुवंती.

● मोहब्बत करने वाले कम न होंगे...खमाज.

● बहुत बुरा है मगर...ललित.

● यूँ न मिल मुझसे खफा हो जैसे...बिलावल आणि     लखनवी भैरवी.

● तेरी महफिल से ये दिवाना चला जायेगा...शिवरंजनी

● देखे भाले दोस्त हमारे ये जाने पहचाने लोग... रागेश्री.

● रंजिश ही सही... यमन.

● गो जरासी बात पर बरसों के याराने गये...दहा थाटात न बसणारी सुरावट.

● अबके हम बिछडे....भुपेश्वरी.

●  जब तेरे नैन मुस्कुराते है... भारतीय संगीत पद्धतीच्या दहा थाटात न बसणारी सुरावट.


पुढे खान साहेबांच्या गायकी विषयी त्यांच्याच तोंडूनच ऐका...

मुलाखतीची लिंक

https://youtu.be/KBscPu-iXt4

--------------------------------------------------------------------------

    दैनिक उद्याचा मराठवाडा,मंगळावर दि.१३ जून २०२३



 


 

Sunday, June 11, 2023

मल्हार...


बहुत प्रकार अपुल्या देशी मल्हाराचे

मज वेड असे पण आंनद मल्हाराचे

 -सुधाकर कदम

     मल्हार प्रकार वर्षाकालीनआहे असे मानतात.पण का? याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.या राग प्रकाराचा पाऊस किंवा पावसाळ्याशी तसा काहीच संबंध नसावा असे मला वाटते.'दीप' रागाच्या संदर्भात जशी मिथके पेरली तशीच मल्हार प्रकारामध्ये सुद्धा पेरल्या गेली आहेत.जर 'मल्हार' प्रकारातील गायनामुळे पाऊस पडत असेल तर अवर्षणग्रस्त भागात जाऊन कुणी मल्हार गाऊन पाऊस का पाडत नाही?आणि हा प्रकार पावसाळ्यातच का गातात? इतर ऋतूमध्ये तो गायिल्या जात नाही काय?असे अनेक प्रश्न मला पडले आहे.(दीप राग गायिल्याने दिवे पेटतात, अंगाचा दाह होतो आणि मेघमल्हार  गायीला की दाह शांत होतो.तसेच ताना-रिरी नावाच्या दोन भगिनी नदीवर घागर भरताना झालेल्या डुबुक डुबुक आवाजातून मेघ मल्हाराचे स्वर मिळणे', हे वैज्ञानिक कसोटीवर कसे तोलायचे? रागांना काळ-वेळात बांधणे मला अनैसर्गिक वाटते.तानसेन 'संगीत सम्राट' होते हे मान्य! (मी ग्वाल्हेरला जाऊन त्यांच्या मजारी समोर नतमस्तक झालो होतो.) पण त्यांचा मोठेपणा अधिक गडद करण्यासाठी असली मिथके तयार करणे मला तरी योग्य वाटत नाही.बरे, तानसेनाच्या अगोदर किंवा नंतर हा चमत्कार घडल्याचा कुठेच उल्लेख नाही.) मुळात कोणताही राग व सुरावटी भक्कम तयारीनिशी केव्हाही चखलपणे गायिल्या/वाजविल्या गेल्या तर त्या गोड वाटणारच! तसे नसते तर सुगम संगीतात झालेल्या अनेक रचना बारमाही गोड वाटल्याच नसत्या.यावर शास्त्रीय संगीतातील शास्त्री सहमत होणार नाही.पण त्यांनीही यावर जरा डोळसपणे विचार करायला हरकत नाही.यात मी शास्त्रीय गायकांना किंवा अभ्यासकांना कमी लेखतो असा गैरसमज कोणी करून घेऊ नये.कारण इतर गायनशैली सुद्धा शास्त्रीय संगीताचाच आधार घेते हे खरे आहे. पण शास्त्रीय संगीताची निर्मिती लोकसंगीतामधूनच झाली हे पण तेवढेच सत्य आहे.आणि ते केव्हाही गोडच वाटते.

     मल्हाराचे अनेक प्रकार आहेत.शुद्ध मल्हार,पट मल्हार,मेघ मल्हार,सूर मल्हार,गौड मल्हार,नायकी मल्हार,कानडा मल्हार,मीराबाई की मल्हार,धुलिया मल्हार,चरजू की मल्हार वगैरे वगैरे. 'मियाँ की मल्हार' त्यातीलच एक पण लोकप्रिय राग आहे.मल्हार 'देस अंग','कानडा अंग','गौड अंग' अशा तीन अंगाने गातात.दक्षिण भारतीय मल्हारचा उत्तर भारतीय मल्हारशी स्वरांच्या दृष्टीने तिळमात्रही संबंध नाही.मल्हार प्रकारावर अनेक प्रबंध लिहिल्या गेले. संशोधन झाले.या संदर्भात संशोधकांनी आपापली मते मांडली.'मेघ' रागासोबत 'मल्हारी' हे नाव पण समोर आलेले दिसते.तसेच महाराष्ट्रात 'मल्हारी मार्तंड' नावही प्रचलित आहे.पण या दोन्हीचा मल्हार राग प्रकाराशी तसा काहीही संबंध नाही.

     मल्हार प्रकारातील अनेक मल्हार लोकप्रिय आहेत.पण मला अतिशय भावला तो किशोरी आमोणकरांचा 'आनंद मल्हार.' आणि तो त्याच गाऊ जाणे.पंडित भीमसेन जोशींचा मियामल्हार ऐकणीयच... मोठा ख्याल झाल्यावर छोट्या ख्यालामधील विजेच्या गडगडासारख्या कडकडणार्‍या ताना आणि स्वरांचे बेहेलावे एखाद्या धबधब्याखाली बसल्यावर अंगावर पडणार्‍या जलप्रपाताप्रमाणे चिंब-चिंब करून टाकायचे.पण तेथे चिंब होण्याकरीता ’चातक’ बनून वाट बघावी लागायची.सुगम संगीत वा गझल गायन ऐकताना ही वाट बघण्याची प्रक्रिया म्हणा किंवा अंतराय म्हणा कमी लागतो.अर्थात सुगम संगीत वा गझल गायकी आणि शास्त्रीय गाणे बजावणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.पण गझल गायकी म्हणजे 'गागर मे सागर' असे मोठमोठे गायक सुद्धा म्हणायचे.

    

     आता हेच बघा ना ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल मेहदी हसन यांनी मियामल्हार मध्येच त्यांच्या ढंगात पेश केलेली गझल असो वा जगजीत सिंग यांची 'फिर पानी दे मौला' असो...दोघांचाही बाज वेगवेगळा आहे.या दोन्ही गायकांची खासियत म्हणजे त्यांचा खर्ज.मंद्र सप्तकातील त्यांची कारागिरी सरळ हृदयाला भेदून जाणारी आहे.मग जगजित यांचे ’फिर पानी दे मौला’ असो की मेहदी हसन यांचे’मुझसे खफा हो बैठा’ इथे मात्र एकदम बरसातच!असो...

 ●हिंदी

          चित्रपटांमध्येही या रागाचा तुरळक प्रयोग झालेल आहे.वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं,वाणि जयराम यांनी गायिलेल गुड्डी चित्रपटातील ’बोल रे पपीहरा..’ हे अतिशय सुंदर आणि लोकप्रिय झालेलं गाणं...परंतू मला मन्ना डे यांच्या प्रायव्हेट अल्बमधील ’नाच रे मयूरा...’हे गीत अतिशय आवडतं.'लपक झपक तू आ रे बदरवा' (मल्हार रागावर आधारित मन्ना डेंनी गायिलेले विनोदी गीत) चित्रपट-बुटपॉलिश.'ना ना ना बरसो बादल' (मियाँ मल्हार) चित्रपट-सम्राट पृथ्वीराज चौहान. 'भय भंजन वंदना सुनो हमारी' (मियाँ मल्हार) चित्रपट-बसंत बहार.'करो सब निछावर'(मियाँ मल्हार) चित्रपट-सह्याद्री की लडकी. 'नाच मेरे मोर जरा नाच' (मियाँ मल्हार) चित्रपट-तेरे द्वार खडा भगवान. 'बरसो रे बरसो रे' (मेघ मल्हार) चित्रपट-तानसेन.'दुख भरे दिन बिते रे भैय्या' (मेघ मल्हार) चित्रपट-मदर इंडिया.'तन रंग लो जी आज मन रंग लो' (मेघ मल्हार) चित्रपट-कोहिनूर.'हाले दिल युं उन्हें सुनाया गया' (मियाँ मल्हार) चित्रपट-जहांआरा. 'अंग लग जा बालमा' चित्रपट-मेरा नाम जोकर.'छायी बरखा बहार,पडे अंगना फुहार' (सूर मल्हार) चित्रपट-चिराग.'बोल रे पपिहरा' (मियाँ मल्हार) चित्रपट-गुड्डी. 'कहां से आये बदरा' (मेघ मल्हार)

'बिजुरी चमके बरसे मेहा' (मियाँ मल्हार)'बरसों रे मेघा मेघा (मेघ मल्हार) चित्रपट-गुरू. 'घिर घिर आये बदरिया' (मियाँ मल्हार) चित्रपट-सरदारी बेगम. 'बादल उमड बढ आये' (मियाँ मल्हार) चित्रपट-साज.'काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ'...लगान.'मल्हार' (अल्बम) मियाँ मल्हार,

गायक-मामे खान,मनीषा अग्रवाल.'मेरे ती गिरीधर गोपाल' लता मंगेशकर. (मियाँ मल्हार).'घन गरजत बादर आये'

(मियाँ मल्हार,कोक स्टुडिओ) आयेशा ओमर,फ़रिहा परवेज,झारा मदानी.

●मराठी

'आज कुणीतरी यावे' (मियाँ मल्हार) चित्रपट- मुंबईचा जावई. 'घन घन माला' (मियाँ मल्हार) चित्रपट-वरदक्षिणा. 'जन पळभर म्हणतील हाय हाय' (मियाँ मल्हार) भावगीत.

'जिवलगा कधी रे येशील तू' चित्रपट-सुवासिनी.'सावन घन गरजे बजाये' नाटक पंडितराज जगन्नाथ,गायक-प्रसाद सावकार. 'माना मानव वा परमेश्वर' (मियाँ मल्हार) सुधीर फडके.(याचे गीतकार आणि संगीतकार विदर्भातील अमरावतीचे मनोहर कवीश्वर होते.) 'कुहू कुहू कुहू येईल साद' अनुराधा पौडवाल. 'मेघा नको बरसू अता' जयंत मल्हार रागावर आधारित अप्रतिम मराठी गीत.अल्बम-घन घुंघुरवाळा आला.गायिक-अपर्णा बिवलकर. वरील सर्व गाणी मल्हार प्रकारांवर आधारित आहेत.

      आज आपण जगगितसिंग यांनी गायिलेली निदा फाज़ली यांची ’गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला’ ही गझल ऐकू या...यातील व्हायोलिन आणि बासरी या दोनच वाद्याचा वापर हे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.त्यातल्या त्यात व्हायोलिन तर थेट भिडणारेच...तसेच नेहमीचा केरवा ताल येथे वेगळ्या पण गझलेला पूरक पद्धतीने शब्दांसोबत चालत (ठुमकत-ठुमकत) आपल्या समोर आलेला दिसून येतो.हे ही जग्गूभाईंचे वैशिष्ठ्य आहे...

       याच रागातील मेहदी हसन यांनी गायिलेली  फरहत शहज़ात यांची अतिशय सुंदर अशी  ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल ज्यांना रागविस्ताराच्या आलापासह (Live) ऐकायची असेल युट्युबवर जाऊन सर्च करावी व आनंद घ्यावा.

       

(शास्त्रीय गायक/वादकांची 'स्पेसिफिक' अशी नावे सांगण्याची गरज नाही.कारण नेटवर सहज सापडतात.पण सुगम संगीतातील नावे सांगावी

लागतात.)

-------------------------------------------------------------------------

दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.११ जून २०२३


Saturday, June 10, 2023

मराठी गझल...मज सांग...

  • ज्येष्ठ गझलकारा ज्योती बालिगा यांची खालील गझल भैरवी रागात स्वरबद्ध झाली असून, यात शुद्ध गांधार, शुद्ध धैवत आणि शुद्ध निषादाचा वापर करून बंदिश रंजक व शब्दांना न्याय देणारी करण्याचा प्रयत्न केला आहे.मतला दिपचंदी तालात व शेर रूपक तालात निबद्ध असलेल्या या गझलची सुरवातच कोमल धैवतासोबत शुद्ध गांधार घेऊन होते.दुसऱ्या मिसऱ्यात एकाच स्वरांची कोमल व तीव्र रूपे एकामागे एक आल्यामुळे (माझ्या मते) ऐकायला सोपी व गायला कठीण असलेली ही रचना प्राजक्ता सावरकर शिंदेंनी अतिशय समर्थपणे पेलून अगदी सुरेल आणि हळुवारपणे गायिली आहे.    
  •  सादर आहे ..
मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी
भवतालच्या नजरास या चुकवून मी येऊ कशी

कुठल्या घराचा उंबरा खिळवून मजला ठेवतो
तुझिया करी उल्केपरी निखळून मी येऊ क

आली अचानक कोठुनी ही शीळ चंदेरी तुझी
माझ्या मनाच्या पायऱ्या उतरून येऊ कशी

माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती
आयुष्य हे की पिंजरा निसटून मी येऊ कशी


 

Saturday, June 3, 2023

राग मारवा...



हुरहुरणारा सांज सावळा आर्त असा मारवा...
अंतरआत्मा ढवळुन काढी स्वर गहिरा कारवा'
-सुधाकर कदम

     शास्त्रीय संगीत गाणाऱ्या/वाजविणाऱ्या कलाकारांचा हा आवडता राग आहे.पण सुगम संगीत व चित्रपट संगीतामध्ये या रागाचा वापर फार कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येते.गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेताना हुरहुर लावणार्‍या मारवा रागाची तोंड ओळख संगीत विद्यालयात झाली होती.पण खरा मारवा कळायला नंतर बराच काळ जावा लागला. मारव्याच्या स्वरातील हुरहुर ऐन तारुण्यात असताना हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या अरूण दाते यांच्या आवाजातील ’स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या शंकर वैद्य यांच्या भावगीताने करून दिली.स्वरगंगेमधील ’वचन दिले तू मला’ यातील ’मला’ या शब्दावर लागलेला तार सप्तकातील कोमल रिषभ,पुढे 'ओळखले का मला' यातील षड्ज सोडून इतर स्वरांशी खेळत षड्जावर स्थिरावणार 'मला', जन्म जन्मांतरीच्या ओढीची वेगळीच अनुभूती  देऊन गेला.सोबतच ’सुमन कल्याणपुर यांनी गायिलेले मंगेश पाडगावकरांचे ’शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ पण कानात रुंजी घालत होते.संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी अंतऱ्यामध्ये विविध सुरावटींचा वापर करून वेगळाच आयाम दिला.अमरावतीचे मित्र राजेंद्र सगणे यांचेकडे ही (78 ची तबकडी) रेकॉर्ड होती.त्यांच्या लग्नानिमित्त तीन दिवसांच्या मुक्कामात ती इतक्यांदा ऐकली की, खराब होऊ नये म्हणून घरच्यांनी आमच्यावर बंदी घातली.
     मग पुन्हा मारव्याची आळवणी नव्याने सुरू केली.या दरम्यान माझ्या गुरुजींचे गुरूजी आदरणीय छोटा गंधर्व यवतमाळला आलेत.झाडीपट्टीत त्यांचा कार्यक्रम होता.नागपुरवरून पुढे जायचे होते.जाता जाता गुरूजींकडे (यवतमाळ) मुक्कामी आलेत...(तसे ते नेहमीच यायचे) मला कळल्याबरोबर मी आर्णीहून यवतमाळला पोहोचलो.कारण मला माहित नाही पण ऋषीतुल्य छोटा गंधर्वांचा माझ्यावर खूप जीव होता.विदर्भातील बहुतेक कार्यक्रमात हार्मोनियमच्या साथीला ते मला न्यायचे.तसेच ते इकडेही मला सोबत घेऊन गेले.कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरा लावून त्यांचा स्वरांशी लडिवाळ खेळ सुरू होता.छोटा गंधर्व,तानपुरा,हार्मोनियम आणि मी....अशातच माझ्या डोक्यात मारव्याचा किडा वळवळायला लागला...आणि हिया करून विषय काढलाच.त्यांनी अतिशय बाळबोध प्रकाराने "स्वत:चे घर नसून मजेत राहणारा माणूस म्हणजे मारवा",असे सांगून षड्जाचा कमीत कमी प्रयोग करून मारवा कसा गावा हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले.हे सांगत असताना मुर्छना पद्धतीने यात भूप,मालकौंस,दुर्गा या रागांच्या छटा पण अतिशय सोप्या पद्धतीने दाखविल्या.तो सर्व सोहळा अजूनही माझ्या डोक्यात अगदी ताजा आहे.
       सूर्यास्ताचे वेळी गायिल्या जाणारा हा राग आपले अपुरेपण सतत दाखवित राहतो.तरी पण मारव्याची ओढ का लागते ते कळत नाही.यात पंचम स्वर नाही.षड्ज खूपच कमी.दोन्ही स्थीर स्वरांनी दुरावा ठेवल्यामुळे तर मारवा हळवा वाटत नसेल ना? तसा विचार केला तर हीच सुरावट असूनही पुरीया व सोहोनी वेगळे वाटतात.पण मारवा मात्र हळवाच वाटतो.याचे मुख्य कारण म्हणजे षड्ज जो येतो तो खंबीरपणे न येता कोमल रिषभाच्या संगतीने येतो.कदाचित त्यामुळेच हळवा वाटत असावा.हा राग  म्हणजे ऐकवत नाही व ऐकल्याशिवाय राहावत नाही असा आहे.
     कवी लोकांनाही 'मारवा' नावाचे फार आकर्षण आहे.कुणाच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक तर कुणाच्या कवितेत वेगवेगळे संदर्भ घेऊन हा शब्द वापरल्याचे अनेकदा दिसून येते.तसेच मारवा हे एका सुगंधी वनस्पतीचे पण नाव आहे.अल मारवा शहरात मक्केजवळ ही वनस्पती सापडते.
      मारवा हा स्वतःचे घर नसलेल्या माणसा सारखा आहे.कोमल रिषभ व शुद्ध धैवतात खेळणारा मारवा षड्जावर लवकर विसावत नाही.याला मराठीने जेवढा आधार दिला तेवढा हिंदी चित्रपटसृष्टीने दिला नाही,असे आजवरच्या माझ्या ऐकण्यावरून वाटते.एक 'पायलिया बावरी' हे खुमार बाराबंकवी यांनी लिहिलेले 'साज और आवाज' या चित्रपटातील नौशाद यांनी स्वरबद्ध केलेले व लता मंगेशकरांनी गायिलेले गाणे मारवा रागात आहे.बाकी मारवा रागावर आधारित असेच म्हणावे लागेल.'कान्हा रे कान्हा' चित्रपट -टॅक्सी ड्रायव्हर. 'सांज ढले गगन तले' चित्रपट-उत्सव. 'माई री मै का से कहूँ अपने जिया की' चित्रपट-दस्तक. 'मेरा परदेसी ना आया' चित्रपट-मेरे हमसफर. 'सगरे जगत का इक रखवाला' चित्रपट-नास्तिक.'सांझ भई घर आ जा रे पिया' गायिका-लता. 'साथी रे भूल न जाना मेरा प्यार' चित्रपट-कोतवाल साब. 'तुमने क्या क्या किया है हमारे लिए' चित्रपट-प्रेमगीत. '
'एरी सखी मैं अंग अंग आज रंग डार दू' वेबसिरीज 'बँडेड'च्या शेवटच्या इपिसोडमधील भजन.
उर्दू गझल...
'शाम के सांवले चेहरे को निखारा जाये' - हुसैन बक्श.
'गर्मिये हसरते नाकाम से जल जाते है' - मेहदी हसन.
'तमाम उम्र तेरा इंतजार हमने किया' -गुलाम अली.
'जब से उसने शहर को छोडा' - राजकुमार रिझवी.
'अक्सर दिल में दर्द उठा है रात के पिछले पहरों में' -हमीद अली खान
'मेरा मुझ में किछ नहीं जो कुछ है जो तेरा' -भाई बालविसिंग...(कीर्तन सेवा)
'गाईये गणपती जग वंदन' -रत्नेश दुबे
कव्वाली 'अल्ला मोहम्मद चार यार' नुसरत फतेह अली.

'मावळत्या दिनकरा' -लता मंगेशक. 'हे करुणाकरा ईश्वरा कृपादान मज दे' - रामदास कामत.'रसिका मी कैसे गाऊ गीत' - अनुराधा पौडवाल.
     १९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन व मेंडोलिन वादन, नंतर गझल गायनाचे कार्यक्रम,सततचा प्रवास,जागरण, वेळी-अवेळी खाणे,अतिरिक्त रियाज यामुळे १९९५ नंतर 'व्होकल कॉर्ड्स'चा त्रास सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी माझे गझल गायनाचे जाहीर कार्यक्रम बंद करण्यास सांगितले.१९९५ नंतर मी फक्त संगीत दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले.ते आजतागायत सुरू आहे.सध्या माझ्या स्वररचनांवर आधारित मराठी गीत-गझलांचा कार्यक्रम 'सरगम तुझ्याचसाठी' या शिर्षकांतर्गत पंडित जितेंद्र अभिषेकीचे शागिर्द पंडित मोहनजी दरेकर यांचा शिष्य मयूर महाजन करतो आहे.माझ्या संगीत दिगदर्शनाखाली सुरेश वाडकर,पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे,वैशाली माडे,दिनेश अर्जुना,संगीतकार यशवंत देवांची शिष्या रसिका जानोरकर,अविनाश जोशी,वैशाली पुल्लीवार,भैरवी-रेणू कदम,भाविक राठोड,उत्कर्षा शहाणे,आदित्य फडके,प्रशांत कदम,गायत्री गायकवाड गुल्हाने,प्राजक्ता सावरकर शिंदे,कल्पिता उपासनी वगैरे प्रतिथयश व नवोदित गायक/गायिका गायिले आहेत,गात आहेत.
       सुरेश भटांच्या हयातीतच त्यांची 'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही' ही गझल मारवा रागात स्वरबद्ध झाली होती.'शब्दानुरूप बंदिश कशी असावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही गझल होय' असे ते म्हणायचे.दुसरी गझल ज्येष्ठ गझलकारा ज्योती बालिगा राव यांची 'शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला' ही काही महिन्यांपूर्वी कल्पिता उपासनी या नवोदित गायिकेच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केली.कल्पिता खूप छान गायिली.या दोन्ही गझलात छोटा गंधर्वांनी सांगितल्या प्रमाणे वरील रागांच्या थोड्या फार छटा आपणास दिसतील.ही त्यांची देण आहे.'जगत मी' मधील  दुसर्‍या ओळीतील ’तुटलो’ या शब्दासाठी वापरलेला कोमल मध्यम आणि त्यासोबत येणारी भूपेश्वरी व भिन्नषड्ज रागाची सुरावट आपणास ’तुटण्याची’ अनुभूती निश्चित देईल.इतकेच नव्हे तर ’जुळलोच नाही’ यासाठी वापरलेल्या कोमल धैवता सोबतची सुरावट ’न जुळण्याचा’ आभास निर्माण करते...ह्या दोन्ही गझला माझ्या 'गीत-गझलरंग' या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत.
     https://youtu.be/sVWmZQ1hNIM
     'शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला'
    
     ऐका तर सुरेश भटांची आवडती स्वररचना व माझी आवडती गझल...जगत मी आलो.
https://youtu.be/OFc4d99SCyY

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

गायक - मयूर महाजन
गझल - सुरेश भट
संगीत - सुधाकर कदम
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.४ जून २०२३


 





संगीत आणि साहित्य :