हुरहुरणारा सांज सावळा आर्त असा मारवा...
अंतरआत्मा ढवळुन काढी स्वर गहिरा कारवा'
-सुधाकर कदम
शास्त्रीय संगीत गाणाऱ्या/वाजविणाऱ्या कलाकारांचा हा आवडता राग आहे.पण सुगम संगीत व चित्रपट संगीतामध्ये या रागाचा वापर फार कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येते.गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेताना हुरहुर लावणार्या मारवा रागाची तोंड ओळख संगीत विद्यालयात झाली होती.पण खरा मारवा कळायला नंतर बराच काळ जावा लागला. मारव्याच्या स्वरातील हुरहुर ऐन तारुण्यात असताना हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या अरूण दाते यांच्या आवाजातील ’स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या शंकर वैद्य यांच्या भावगीताने करून दिली.स्वरगंगेमधील ’वचन दिले तू मला’ यातील ’मला’ या शब्दावर लागलेला तार सप्तकातील कोमल रिषभ,पुढे 'ओळखले का मला' यातील षड्ज सोडून इतर स्वरांशी खेळत षड्जावर स्थिरावणार 'मला', जन्म जन्मांतरीच्या ओढीची वेगळीच अनुभूती देऊन गेला.सोबतच ’सुमन कल्याणपुर यांनी गायिलेले मंगेश पाडगावकरांचे ’शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ पण कानात रुंजी घालत होते.संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी अंतऱ्यामध्ये विविध सुरावटींचा वापर करून वेगळाच आयाम दिला.अमरावतीचे मित्र राजेंद्र सगणे यांचेकडे ही (78 ची तबकडी) रेकॉर्ड होती.त्यांच्या लग्नानिमित्त तीन दिवसांच्या मुक्कामात ती इतक्यांदा ऐकली की, खराब होऊ नये म्हणून घरच्यांनी आमच्यावर बंदी घातली.
मग पुन्हा मारव्याची आळवणी नव्याने सुरू केली.या दरम्यान माझ्या गुरुजींचे गुरूजी आदरणीय छोटा गंधर्व यवतमाळला आलेत.झाडीपट्टीत त्यांचा कार्यक्रम होता.नागपुरवरून पुढे जायचे होते.जाता जाता गुरूजींकडे (यवतमाळ) मुक्कामी आलेत...(तसे ते नेहमीच यायचे) मला कळल्याबरोबर मी आर्णीहून यवतमाळला पोहोचलो.कारण मला माहित नाही पण ऋषीतुल्य छोटा गंधर्वांचा माझ्यावर खूप जीव होता.विदर्भातील बहुतेक कार्यक्रमात हार्मोनियमच्या साथीला ते मला न्यायचे.तसेच ते इकडेही मला सोबत घेऊन गेले.कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरा लावून त्यांचा स्वरांशी लडिवाळ खेळ सुरू होता.छोटा गंधर्व,तानपुरा,हार्मोनियम आणि मी....अशातच माझ्या डोक्यात मारव्याचा किडा वळवळायला लागला...आणि हिया करून विषय काढलाच.त्यांनी अतिशय बाळबोध प्रकाराने "स्वत:चे घर नसून मजेत राहणारा माणूस म्हणजे मारवा",असे सांगून षड्जाचा कमीत कमी प्रयोग करून मारवा कसा गावा हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले.हे सांगत असताना मुर्छना पद्धतीने यात भूप,मालकौंस,दुर्गा या रागांच्या छटा पण अतिशय सोप्या पद्धतीने दाखविल्या.तो सर्व सोहळा अजूनही माझ्या डोक्यात अगदी ताजा आहे.
सूर्यास्ताचे वेळी गायिल्या जाणारा हा राग आपले अपुरेपण सतत दाखवित राहतो.तरी पण मारव्याची ओढ का लागते ते कळत नाही.यात पंचम स्वर नाही.षड्ज खूपच कमी.दोन्ही स्थीर स्वरांनी दुरावा ठेवल्यामुळे तर मारवा हळवा वाटत नसेल ना? तसा विचार केला तर हीच सुरावट असूनही पुरीया व सोहोनी वेगळे वाटतात.पण मारवा मात्र हळवाच वाटतो.याचे मुख्य कारण म्हणजे षड्ज जो येतो तो खंबीरपणे न येता कोमल रिषभाच्या संगतीने येतो.कदाचित त्यामुळेच हळवा वाटत असावा.हा राग म्हणजे ऐकवत नाही व ऐकल्याशिवाय राहावत नाही असा आहे.
कवी लोकांनाही 'मारवा' नावाचे फार आकर्षण आहे.कुणाच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक तर कुणाच्या कवितेत वेगवेगळे संदर्भ घेऊन हा शब्द वापरल्याचे अनेकदा दिसून येते.तसेच मारवा हे एका सुगंधी वनस्पतीचे पण नाव आहे.अल मारवा शहरात मक्केजवळ ही वनस्पती सापडते.
मारवा हा स्वतःचे घर नसलेल्या माणसा सारखा आहे.कोमल रिषभ व शुद्ध धैवतात खेळणारा मारवा षड्जावर लवकर विसावत नाही.याला मराठीने जेवढा आधार दिला तेवढा हिंदी चित्रपटसृष्टीने दिला नाही,असे आजवरच्या माझ्या ऐकण्यावरून वाटते.एक 'पायलिया बावरी' हे खुमार बाराबंकवी यांनी लिहिलेले 'साज और आवाज' या चित्रपटातील नौशाद यांनी स्वरबद्ध केलेले व लता मंगेशकरांनी गायिलेले गाणे मारवा रागात आहे.बाकी मारवा रागावर आधारित असेच म्हणावे लागेल.'कान्हा रे कान्हा' चित्रपट -टॅक्सी ड्रायव्हर. 'सांज ढले गगन तले' चित्रपट-उत्सव. 'माई री मै का से कहूँ अपने जिया की' चित्रपट-दस्तक. 'मेरा परदेसी ना आया' चित्रपट-मेरे हमसफर. 'सगरे जगत का इक रखवाला' चित्रपट-नास्तिक.'सांझ भई घर आ जा रे पिया' गायिका-लता. 'साथी रे भूल न जाना मेरा प्यार' चित्रपट-कोतवाल साब. 'तुमने क्या क्या किया है हमारे लिए' चित्रपट-प्रेमगीत. '
'एरी सखी मैं अंग अंग आज रंग डार दू' वेबसिरीज 'बँडेड'च्या शेवटच्या इपिसोडमधील भजन.
उर्दू गझल...
'शाम के सांवले चेहरे को निखारा जाये' - हुसैन बक्श.
'गर्मिये हसरते नाकाम से जल जाते है' - मेहदी हसन.
'तमाम उम्र तेरा इंतजार हमने किया' -गुलाम अली.
'जब से उसने शहर को छोडा' - राजकुमार रिझवी.
'अक्सर दिल में दर्द उठा है रात के पिछले पहरों में' -हमीद अली खान
'मेरा मुझ में किछ नहीं जो कुछ है जो तेरा' -भाई बालविसिंग...(कीर्तन सेवा)
'गाईये गणपती जग वंदन' -रत्नेश दुबे
कव्वाली 'अल्ला मोहम्मद चार यार' नुसरत फतेह अली.
'मावळत्या दिनकरा' -लता मंगेशक. 'हे करुणाकरा ईश्वरा कृपादान मज दे' - रामदास कामत.'रसिका मी कैसे गाऊ गीत' - अनुराधा पौडवाल.
१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन व मेंडोलिन वादन, नंतर गझल गायनाचे कार्यक्रम,सततचा प्रवास,जागरण, वेळी-अवेळी खाणे,अतिरिक्त रियाज यामुळे १९९५ नंतर 'व्होकल कॉर्ड्स'चा त्रास सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी माझे गझल गायनाचे जाहीर कार्यक्रम बंद करण्यास सांगितले.१९९५ नंतर मी फक्त संगीत दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले.ते आजतागायत सुरू आहे.सध्या माझ्या स्वररचनांवर आधारित मराठी गीत-गझलांचा कार्यक्रम 'सरगम तुझ्याचसाठी' या शिर्षकांतर्गत पंडित जितेंद्र अभिषेकीचे शागिर्द पंडित मोहनजी दरेकर यांचा शिष्य मयूर महाजन करतो आहे.माझ्या संगीत दिगदर्शनाखाली सुरेश वाडकर,पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे,वैशाली माडे,दिनेश अर्जुना,संगीतकार यशवंत देवांची शिष्या रसिका जानोरकर,अविनाश जोशी,वैशाली पुल्लीवार,भैरवी-रेणू कदम,भाविक राठोड,उत्कर्षा शहाणे,आदित्य फडके,प्रशांत कदम,गायत्री गायकवाड गुल्हाने,प्राजक्ता सावरकर शिंदे,कल्पिता उपासनी वगैरे प्रतिथयश व नवोदित गायक/गायिका गायिले आहेत,गात आहेत.
सुरेश भटांच्या हयातीतच त्यांची 'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही' ही गझल मारवा रागात स्वरबद्ध झाली होती.'शब्दानुरूप बंदिश कशी असावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही गझल होय' असे ते म्हणायचे.दुसरी गझल ज्येष्ठ गझलकारा ज्योती बालिगा राव यांची 'शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला' ही काही महिन्यांपूर्वी कल्पिता उपासनी या नवोदित गायिकेच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केली.कल्पिता खूप छान गायिली.या दोन्ही गझलात छोटा गंधर्वांनी सांगितल्या प्रमाणे वरील रागांच्या थोड्या फार छटा आपणास दिसतील.ही त्यांची देण आहे.'जगत मी' मधील दुसर्या ओळीतील ’तुटलो’ या शब्दासाठी वापरलेला कोमल मध्यम आणि त्यासोबत येणारी भूपेश्वरी व भिन्नषड्ज रागाची सुरावट आपणास ’तुटण्याची’ अनुभूती निश्चित देईल.इतकेच नव्हे तर ’जुळलोच नाही’ यासाठी वापरलेल्या कोमल धैवता सोबतची सुरावट ’न जुळण्याचा’ आभास निर्माण करते...ह्या दोन्ही गझला माझ्या 'गीत-गझलरंग' या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत.
https://youtu.be/sVWmZQ1hNIM
'शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला'
ऐका तर सुरेश भटांची आवडती स्वररचना व माझी आवडती गझल...जगत मी आलो.
https://youtu.be/OFc4d99SCyY
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
गायक - मयूर महाजन
गझल - सुरेश भट
संगीत - सुधाकर कदम
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.४ जून २०२३
No comments:
Post a Comment