गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, February 2, 2024

●दुःख माझे देव झाले●


     याच काळात गझलगायक सुधाकर कदम आणि त्यांची तबल्यावर साथ करणारे शेखर सरोदे यांची भेट झाली. शब्द, छंद, सूर आणि ताल यांची घट्ट मैत्री जमली. सुधाकर कदम सालाबादप्रमाणे नवरात्रात माहूर गडावर हजेरी लावायला जाणार होते. दुर्धर आजाराने अपंगत्व आलेल्या माझ्यासारख्याला गड चढणे अशक्य होते. पण म्हणतात ना! मित्र आणि आत्मविश्वास काहीही करू शकतो. सुधाकर आणि शेखर यांनी त्यांच्या हाताची पालखी केली. मला बसवले आणि आम्ही मैत्रीचा माहूर गड सर केला. रेणुका मातेच्या चरणी पोहचलो. गड चढायला सुरुवात करतानाचे दुःख, शिखरावर पोहचता पोहचता देव झाले होते. भावना शब्दबद्ध झाल्या- ‘दुःख माझे देव झाले’.  पुढे हीच गझल सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केली. त्यांच्या हरेक गझल मैफिलीत ती आवर्जून गायली जायची. त्यांच्या १९८२ मध्ये आलेल्या 'भरारी' शीर्षकाच्या कॅसेट मध्ये ती समाविष्ट केली गेली. पुढे ही गझल 'लोकमत' च्या रविवार पुरवणीत १२ ऑगस्ट १९८४ ला प्रकाशित झाली. माझ्या गझलेचा प्रवास चिंतनातून लेखन, लेखनानंतर प्रकाशन, आणि त्यांचे गायन असा संथ गतीने सुरू होता. वाचल्या जाणारी गझल आता गुणगुणल्या जाऊ लागली होती. 
सुधाकर कदमांचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी गझल गायनाचे कार्यक्रम होत होते. आता नागपुरातील धनवटे रंगमंदिर गाजवावे अशी त्यांची इच्छा होती. योग जुळून आला. दिनांक १५ जून १९८४ ला धनवटे रंगमंदिरात भारदस्त आवाजाचे धनी सुधाकर कदम यांनी सूर लावला- 

'दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
आरती जी गात आहे तीच माझी वेदना'
(गझल ऐकण्यासाठी लिंक 
https://youtu.be/DBcwSSSmbw0 )
आणि माझ्या ‘दुःखाचा देव’ मराठी माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात विराजमान झाला. ‘तरुण भारत’च्या ‘मध्यमा’ पुरवणीत या मैफिलीचा वृत्तांत वामन तेलंग यांनी सविस्तर लिहिला. 
सुरेश भटांच्या गझलेसोबत माझीही गझल गायली जात आहे याचे समाधान होते.
□ श्रीकृष्ण राऊत

●२०२१ च्या 'नायक' दिवाळी अंकातील श्रीकृष्ण राऊतांचा लेख...
..........................................................................


 





संगीत आणि साहित्य :