गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, January 28, 2023

आर्णी येथील निवासस्थान...

 .     आज दि.२८ जानेवारी २०२३... 
आर्णीचा (जि. यवतमाळ,जिथे मी ३१ वर्षे संगीत शिक्षक म्हणून काम केले.) विद्यार्थी (आणि तेव्हाचा सख्खा शेजारी) किशोर सनसेटवार याने ज्या घरी सुरेश भट येऊन माझ्याकडे राहायचे त्या घराचा व्हिडीओ मला पाठवला.(त्याच्याच शब्दात "तुमच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तू.) या चंद्रमौळी घरात मी भाड्याने राहायचो.या घराच्या समोरच्या गल्लीत खुर्ची टाकून भट बसायचे."हा असा चंद्र अशी रात फिरयासाठी" ही गझल १९८१ मध्ये या गल्लीत बसून त्यांनी लिहिली होती.आणि माझी स्वररचनाही याच घरात झाली होती.ही गझल १९८२ मध्ये अमरावतीला अरविंद ढवळे या सुरेश भटांच्या मित्राकडे पं. हृदयनाथ मंगेशकरांसमोर झालेल्या माझ्या मैफिलीत भटांनी आवर्जून गायला लावली होती.

     या घरात प्रत्येक भेटीत त्यांनी अनेक गझला लिहिल्या."उजाड वैराण वाळवंटी खळाळणार झरा मुहम्मद" ही मराठीतील पहिली 'नात' सुद्धा याच घरात भटांनी लिहिली.(१२/९/१९८१) तसेच कवी शंकर बडे, कलीम खान,मी आणि आर्णीतील गझल रसिक यांच्यातील अनेक चर्चा याच घरात रंगल्या.
     (१९८६ मध्ये माझे स्वतःचे घर झाले.२००३ पर्यंत, म्हणजे आर्णी सोडून पुण्यात स्थायिक होईपर्यंत माझे वास्तव्य या नवीन घरात होते.)
       आज किशोरने पाठविलेल्या 'त्या' घराच्या व्हिडिओमुळे अनेक सुखद-दुःखद आठवणी ताज्या झाल्यात.धन्यवाद किशोर!
-------------------------------------------------------------------------
●किशोरच्या शब्दात...
     या गल्लीतून जातांना प्रत्येकवेळेस तुमची आठवण येतेच येते... आणि आज मी हा video काढून आपणास पाठविला... लहानपणी या गल्लीतून जातांना संगीताचे सप्तसुर येथे मी अनुभवले आहे...


 

Friday, January 27, 2023

#काळोखाच्या_तपोवनातून...


      -सुधाकर कदम ह्यांची जीवननिष्ठा जपणारी कविता-

     मराठीचे #आद्य_गझलगायक  असलेले आणि '#गझल_गंधर्व' या नावाने ओळखले जाणारे सुधाकर कदम  यांच्या कवितांची ओळख  महाराष्ट्रातील काव्य रसिकांना '#मीच_आहे_येथे_फक्त_पारसा' ह्या संग्रहात द्वारे झालेलीच आहे. मुळात गायक-संगीतकार असलेले सुधाकर कदम गीतकार, गझलकार, अभंग रचनाकार, सशक्त विडंबनाकार अशा सर्व पातळीवर आपल्याला पुन्हा भेटतात ते त्यांच्या  काळोखाचा तपोवनातून ह्या दुसऱ्या काव्यसंग्रहातून, या संग्रहात सुधाकर कदम यांनी मराठीतील जवळपास सर्व काव्यप्रकार हाताळले आहेत हे विशेष.  दीर्घ आणि व्यापक असा अनुभव, सकारात्मक विचारशैली,  उस्फुर्त सृजनशीलता, शब्द सौंदर्य ह्या सोबत नेमक्या सुरांची साथ त्यामुळे कवितेला लाभलेली लयबद्धता ह्या सर्व अनुषंगाने सुधाकर कदम यांची कविता काव्य रसिकांना आकर्षून घेणारी ठरते.  पुण्यासारख्या आधुनिक शहरामध्ये राहत असले तरीही मूळ विदर्भातील रहिवासी असलेल्या सुधाकर कदम यांना ग्रामीण भागात जगणाऱ्या शेतकऱ्याच्या दुःखाची आणि वेदनेची जाणीव आहे. आपल्या कवितेमधून शेतकऱ्यांचे दुःख मांडतांना कवी म्हणतात,

 चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात
 राबतो शेतात। सालोसाल...
 जीवापलीकडे। मेहनत करी
 तरीही भाकरी। मिळेचि ना...
  ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी
 लिही कादंबरी। मुंबईत...

      वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून  आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर  व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा कादंबरी कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून  त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा विरोधाभास आपल्या कवितेतून व्यंगार्थ स्वरूपात सुधाकर कदम यांनी चपखलपणे व्यक्त केला आहे. सुधाकर कदम यांचे शेती जीवनाविषयीचे निरीक्षण फार उत्तम आहे. जेव्हा शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करतो त्यावेळी शेतकऱ्याची पत्नी  किंवा ग्रामीण शेती मातीतील स्त्री जे काम करत असते त्याबद्दल ते म्हणतात,

 घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल
 कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल

      शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या  वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती  म्हणून संबोधने हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये  सुधाकर कदम यांनी पहिल्यांदा केले असावे. सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती ह्या शब्दासोबत स्त्रीसाठी पहिल्यांदा 'कष्टवती' हा शब्द  वापरून मराठी भाषेत नव्या शब्दांची भर टाकत भाषेला समृद्ध करण्याचे कामही सुधाकर कदम करत आहेत असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरते.  कष्ट करून शेतकऱ्याला समर्थ साथ देणाऱ्या स्त्री बद्दल बोलताना म्हणतात,

 किती संकटे येऊ दे
 दूर ठेऊया दुःखाला
 तू  असता संगे माझ्या
 घरपण येई घरट्याला

       फक्त शेतकऱ्यासंदर्भातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या अर्धांगिनीच्या कार्याचा गौरव  करत स्त्रीचे महत्त्व अधोरेखित करणारी घरपण ही कविता आहे असे आपल्या लक्षात येते.
 सुधाकर कदम यांचे निसर्गभान खूप लाघवी आहे. आपल्या कवितेमध्ये आपल्या शब्दातून त्यांनी अतिशय विलोभनीय असा निसर्ग टिपला आहे. शेती आणि निसर्ग यांचा समन्वय आपल्या शब्दातून मांडताना कवी म्हणतात,

अवघं लाघव हिरवं तुडुंब
द्यावी वाटे येथे मनालाही डूब
भरल्या  शेताच दर्शन घडता
सृष्टीपुढे झुके आपसुक माथा

     बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून  ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गावरील अनिल कविता या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. अनवट सूर सारख्या कवितेमधून वर्षा ऋतूचे वर्णन श्यामरंग सारख्या कवितेतून  निसर्ग, प्रेम, राधाकृष्ण अशा अलवार संदर्भातून कवी आपला मनोभाव उलगडतात.  पाऊस,चैत्रपालवी, निसर्ग किमया अशा रचनांमधून तर जिवंत निसर्ग आपल्या शब्दातून कवींनी रेखाटला आहे. आठवण सारख्या कवितेमधून संध्या समयीच्या कातर आठवणी असताना विविध ऋतूंचे रंग पृथ्वीचे अंगण सजवतात आणि आठवणीचा न्यारा श्रावण  व्याकूळ करतो अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गाचे हे अल्हाददायक रूप असे वाचकाला भुरळ घालते.  तसेच रणरणत्या उन्हात निसर्गाचे भयावह रूप सुद्धा कधी कधी दिसून येते. रखरखत्या उन्हात दिसणारा निसर्ग टिपताना सुधाकर कदम म्हणतात,

 वेदनेला येई। उदयास्ती रंग
 रोजची दुपार। पेटवीते अंग
 देहा फुटे झरा। पाणी शोधताना
 कोस कोस धाव। वेगाने घेताना
 डोळ्यावर दाटे।  कारूण्याचे धुके
 जनावरांचेही। हंबरणे मुके

      उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी होणारी तगमग, जीवाची होणारी लाहीलाही, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल प्रवास करणारी जनता, पाण्यावाचून जनावराचे हंबरणे हे सर्व अंगावर येणारे दाहक वर्णन निसर्गाचाच एक भाग आहे. तोही तितक्याच प्रभावीपणे चितारण्याचे काम कवींनी केलेले दिसून येते. अर्थात  जिथे पाण्याचे दुर्भिक्ष  आपल्या कवितेमधून दाहकतेने कवी मांडत असतात त्याच वेळी,

डोईवर एक। दुजी कटीवर
घेउनी घागर। सुंदरी ही...

     अशा शब्दात पाणी भरायला निघालेल्या रमणीचे वर्णन सुद्धा कवी तितके स्थापनेने करत असतात. सुधाकर कदम यांनी नजाकत भरल्या अश्या प्रणय रचना काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहातून काव्यरसिकांच्या समोर ठेवल्या आहेत. कल्लोळ सारखी  प्रणयरम्य कविता गणितीय भाषेत जाते. पूर्णत्वा, वर्तुळ, लांब त्रिज्येला जोडता  अशा शब्दात  प्रणयाचे पूर्णत्व कवींनी अधोरेखित केले आहे. प्रणयरम्य कवितेमध्ये गणितीय भाषा हा एक वेगळाच प्रयोग सुधाकर कदम यांनी या कवितेत केलेला दिसून येतो. ताळेबंद, प्रेमामध्ये, अत्तराचा फाया, रेशीम रात, भुलवा अशा अनेक कविता या संग्रहात प्रणयाच्या नवीन, अल्लड आणि आल्हाददायक भावभावनासह आलेल्या आहेत.

 नसे तू राधिका। नसे मीही कृष्ण
 बासरीची तान। नसे तेथे...
 (भुलवा)

 किंवा

 ना मी कृष्णा ना तू राधा
 का व्हावी गे सावळ बाधा ?

      असे प्रश्न विचारत कवींनी राधा-कृष्णाची प्रीत शब्दांकित केली आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेत फार सहजतेने केलेला दिसून येतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार ह्याबाबत बोलत असताना कवी म्हणतात,

 ना महाभारत, न रामायण तरीही
 जानकी अन् द्रोपदी लागे पणाला

 असे सांगून मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे  असेल तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी  आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते असे ते निक्षून सांगतात. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू असल्याचे कवी आपल्या कवितेचे सांगताना म्हणतात,

सासुरवासिनी 
चाहूल घेऊन 
सडासंमार्जन 
करो लागे...

      या कडव्यामध्ये एक स्त्री आपले घर-अंगण सारवते आहे सजवते आहे. असे वर्णन दिसत असले तरी सासुरवाशीण ह्या एकाच शब्दात सासूच्या दडपणाखाली, धाकाखाली काम करणारी स्त्री आपल्या समोर उभी राहते. स्त्रीवरील अन्याय आणि अत्याचार  याप्रमाणेच आपल्या समाजातील जातिभेद अजूनही कायम आहेत. त्यालासुद्धा सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेतून वाचा फोडली आहे.

 किती प्रबोधन केले तरीही
 जात नसे त्या असती जाती

       या ओळी मधून संत काळापासून तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक विभूतींनी  जात हे संबोधन नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.  मात्र तरीही या समाजातील जातीभेद संपला नाही. 'नाठाळाचे माथी लाठी' अशी भूमिका घेतली तरी  तुकारामाचे कुणी ऐकले नाही. आणि जीवनभर विठ्ठल विठ्ठल करणाऱ्या चोखामेळ्याला जिवंतपणी तर गाभाऱ्यात प्रवेश मिळालाच नाही. आणि  मरणोत्तर  पायरीवर जागा मिळाली म्हणून धन्यता मानावी लागली. ही सर्व शोकांतिका सुधाकर  कदम यांनी आपल्या रचनेत कधी व्यंगात्मक रीतीने तर कधी सरळसोट हल्ला चढवत मांडली आहे. देवाधर्माच्या नावाने जो व्यवहार या जगात चालू आहे त्याच्यावर अनेक ठिकाणे कवींनी  शाब्दिक हल्ला चढविला आहे.

 विश्वात्मकतेला
 चौकटीत कोणी
 बांधतो अज्ञानी
 न्यूनगंडे...

      अशा अभंगरचना मधून आज अज्ञानी लोक संपूर्ण  विश्व भावनेला चौकटीमध्ये बंदिस्त करत आहे. ही जाणीव कवींना अस्वस्थ करते. जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे कवीला आवर्जून वाटते. तशी ती जाणीव त्यांनी 'रे मना' या कवितेमध्ये व्यक्त सुद्धा केलेली दिसून येते. एकंदर समृद्ध काव्यानुभूती, विविध प्रतीके प्रतिमांचा वापर, समर्पक आणि चपलख उदाहरणे, सकारात्मक जीवननिष्ठा ह्या सर्वांचा एकत्रित दस्तावेज म्हणजे काळोखाच्या तपोवनातून  हा संग्रह आहे असे म्हणावे वाटते. स्वयं प्रकाशन पुणे त्यांनी प्रकाशित केलेल्या ह्या सुंदर संग्रहाचे मुखपृष्ठ यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे प्रा.अविनाश वानखेडे यांनी तयार केलेले असून, ते अगदी समर्पक असे आहे. राम पंडित यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाची श्रीमंती वाढवते. कवितेचे बहुतांश प्रकार सुधाकर कदम यांनी या संग्रहात हाताळले आहेत. मात्र मुक्तछंद हा काव्यप्रकार यात दिसून येत नाही. कवी मुळात गायक असल्यामुळे आपल्या कविता लयबद्ध कशा होतील याचा विचार त्यांच्या अंतर्मनात असल्याने  तसे घडले असावे असे वाटते. कवी शब्दाचे ऋण मानतात, शब्द आणि कविता त्यांच्यासाठी काय आहे ते त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,

 आकळेल अर्थ
 घालता आवर्त
 एका एका आर्त
 शब्दाचा तो...
 शब्दाचा तो भाव
 समजून घेता
 संपेल आर्तता
 मनातील...

      शब्दांचा भाव म्हणजेच अर्थ समजून घेतला म्हणजे मनातील  सर्व जळमटे आणि दुःख नष्ट होतील अशी अपेक्षा कवी सुधाकर कदम यांनी व्यक्त केली असून ती यथार्थ पणे योग्य आणि रास्त आहे यात शंका नाही. सुधाकर कदम यांच्या काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

- किरण शिवहर डोंगरदिवे
 वॉर्ड नंबर 7 समता नगर मेहकर
 ता मेहकर जि बुलढाणा 443301
मोबा 7588565576

 काळोखाच्या तपोवनातून ( कविता)
 सुधाकर कदम  मो.8888858850
 स्वयं प्रकाशन पुणे
 पृष्ठ 96, किंमत 150
-------------------------------------------------------------------------
●दैनिक देशोन्नती, अकोला. २२ जानेवारी २०२३


 

 

Friday, January 20, 2023

जोगिया...



      खास संक्रांतिनिमित्त ज्येष्ठ गझलकारा ज्योती राव बालिगा यांनी  रसिकांना आज एक अनोखी भेट दिली आहे.एक अप्रतिम गझल.... 'जोगिया'. यात अलवार शब्दात दुःख गुंफले आहे.'दुःखाच्या उमलण्यासोबत सोबत जोगिया छेडणे'असो,'एकांतास आकाश मागणे असो,:जिवाच्या पाकळ्या','आसवांचे बोलणे' वगैरे वगैरे
अप्रतिमच...
      ही गझल #मारवा रागाच्या आर्त स्वरात बांधली असून,मुर्छना पद्धतीचा वापर करून गझलेतील शब्दार्थ स्वरांद्वारे पोहचविण्याचा मी प्रयत्न केला आहे.या बंदिशीमधील मुर्छनांच्या जागा हेरून मिलिंद गुणे यांनी अप्रतिम संगीत संयोजन केल्यामुळे गझलेलतील आर्तता अधिक वाढली.आणि तीच आर्तता आपल्या गायनातून गायिका कल्पिता उपासनीने अत्यन्त समर्पकपणे गझलमध्ये उतरवली आहे,हे गझलमधील 'जोगिया' या शब्दावरील 'हरकत' ऐकल्यावर कळेलच.
     एकूणच आम्ही आमच्यातील जे जे चांगले ते ते 'तिळगुळ' म्हणून आपल्यासमोर ठेवले.आपले अभिप्राय अपेक्षित.

"ऐकत जावी मस्त गझल
बोलत जावे गोड सरल..."

-सुधाकर कदम

●ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.

#मराठी_गझल #marathi #gazal #composition   #गझल

#jyotiraobaliga #shevtihedukhamajhelagaleumlayala
 #selfcompoesdgazal #marathigazal #gazalgandharv #sudhakarkadam  #sudhakarkadamghazal


 





संगीत आणि साहित्य :