गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, February 25, 2026

●#गझलगंधर्व_सुधाकर_कदम● -डॉ.राम पंडित,मुंबई.


#गझलनवाज #महाराष्ट्राचे_मेहदी_हसन #आद्य_मराठी_गझलगायक,#संगीतकार,#कवी,#लेखक. अशा विविध संबोधनांनी मराठी गझल रसिकांना परिचित असलेले सुधाकर कदम...





.          महाराष्ट्रातील गझलविधा खेडोपाडी रुजविण्याचे महत्कार्य स्व.सुरेश भटांसोबत फक्त गझलनवाज सुधाकर कदम यांनीच केले.वऱ्हाडातील आर्णी या छोट्या गावातून हा गझल फकीर गावोगावी भटांच्या गझला चालीसह पोहोचवीत होता तेव्हा आजचे नामवंत भावगीत गायक कोळी गीतांवर गुजराण करीत होते.जेव्हा सुधाकर कदम आर्थिक विवंचनेत होते तेव्हा सुरेश भटांनी  स्वखर्चाने आपल्यासोबत महाराष्ट्रभर गझल वाचन-गायनाचा कार्यक्रम करण्याची गळ घातली अन् कदमही आढेवेढे न घेता,कारणे न देता त्यांच्या सोबतीचे फकीर बनले.गाठीशी चांगली नोकरी असताना तिच्या बळावर अथवा अन्य निकषांवर गायन कार्यक्रम मिळविणे,त्यानंतर आर्थिक स्थैर्याची खात्री झाल्यावर व थोडे बहुत नाव झाल्यावर कलेला वाहून घेणे हे कलेच्या क्षेत्रात नेहमीच घडते.पण तदपूर्वीच नोकरी सोडून गायनासाठी आवकाची पर्वा न करता ,न कंटाळता,न वैतागता शेवटपर्यंत संघर्षरत राहणारे सुधाकर कदम हे एकमेव गायक होय.

           सुरेश भटांनी लेखी स्वरूपात ज्यांना गझलनवाज या उपाधीने गौरविले आहे ते एकमेव सुधाकर कदमच आहेत.शाहीर सुरेशकुमार वैराळकरांच्या आयोजनाखाली झालेल्या पुण्याच्या भरत नाट्य मंदिर येथे आयोजित एका भव्य समारंभात त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्र जाधव व प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते #गझलगंधर्व ही उपाधी बहाल करण्यात आली.या प्रसंगी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी,रसिकराज उल्हासदादा पवार व अनेक मान्यवर उपस्थित होते. पण कदमांना त्या पदव्या मिरविण्याचा हव्यास नसावा.त्यांच्या अनेक हिंदी-उर्दू गझल,गीतांवरील स्वरलिपी काका हाथरसीच्या #संगीत  कार्यालयाच्या ग्रंथात अंतर्भूत आहेत.त्यावरून #पंडित  ही उपाधी ते सहजपणे लावू शकतात पण ही पदवी शासन दरबारातून किंवा विद्यापीठातून मिळत नाही हे सर्वश्रुत आहे.अशी पदवी स्वयंघोषितच लावतात.स्वतःला बिरुद चिटकवून घेण्याचा त्यांना तिटकारा आहे.

          सुधाकर कदमांचा आवाज,शास्त्रीय संगीताची जाण व गझल ही शब्दप्रधान गायकी आहे या गोष्टींचे भान व रागात गझल बांधण्याचे कसब हे गुण भटांना भावले व त्यामुळेच भटांनी त्यांना सोबत घेतले.

           सुधाकर कदमांच्या गझलगायनाने प्रेरित होऊन विदर्भातील अनेक गायक गझलगायनकडे वळले.त्यातील राजेश उमाळे,मदन काजळे, विजय गटलेवार, भीमराव गुलाबराव पांचाळे ही नावे नमूद करता येईल. कदमांच्या शैलीचा शिक्का आपणावर बसू नये म्हणून काही गायकांनी शब्दांपेक्षा सरगम व वाद्यवृंदाच्या पेशकशीचा आधार घेत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला.कवीचे गझलेतील भाव तिच्यातील शब्दांद्वारे व आपल्या स्वर व सुरांच्या सहाय्याने रसिक श्रोत्यांच्या मनबुद्धीत संप्रेषित करणे हे गझलगायकाचे आद्य कर्तव्य आहे.(शब्दांना गौण मानून आलापांद्वारे आपले नैपुण्य प्रदर्शित करणे नव्हे.)याचा अनेक लब्धप्रतिष्ठित गवैयांना विसर पडतो 

           सुधाकर कदमांनी सरकार दरबारी पायऱ्या झिजवून अनुदान-याचक बनून जलसे केले नाहीत की आपले गायन क्षेत्र सोडून गझल लेखन क्षेत्रात लुडबुड केली नाही.खरे तर ते लेखक कवीही आहेत.तालवृत्तांएवढेच त्यांना छंदवृत्तांचेही ज्ञान आहे,पण त्यांनी शिष्यवर्ग घडवला तो आपल्या गायन क्षेत्रातच.

           सांदिपनी बनून आश्रमासाठी माधुकरी मागण्याचीही त्यांना आवश्यकता भासत नाही हे विशेष.

          वडील पांडुरंगपंत हे संगीत तज्ञ व संवादिनी वादक असल्याने सुधाकर कदमांना संगीताची गोडी लागणे स्वाभाविकच होते.त्यांनी सुधाकर कदमांना पुरुषोत्तम कासलीकर यांच्याकडे शिकण्यास पाठविले.अल्पावधीतच संगीत विशारद ही पदवी कदमांनी श्रेष्ठ श्रेणीत प्राप्त केली.

'#अशी_गावी_मराठी_गझल' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी विविध ठिकाणी,विविध गावी केले.

           कदम म्हणतात,मराठी गझल जशी उर्दूकडून आली तशीच गझलगायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.त्यांनी आपली गायन शैली मेहदी हसन,फरीदा खानम,गुलामअली,जगजितसिंह यांच्या गायकीवरून तयार झाली हे प्रामाणिकपणे मान्य केले आहे.वडिलांचे वारकरी भजन,गायन व शिवरंजनी ऑर्केस्ट्रामधील संगीत संयोजन व अकॉर्डियन,सोबत तबला,मेंडोलिन,सरोद,संतूर इत्यादी वाद्यांवर त्यांनी प्राविण्य मिळवले.एवढेच नव्हे तर मुलगा तबला वादक व दोन्ही मुलींना गायक म्हणून घडविले.

           सुधाकर कदमांना बंदिश तयार करणे ही संकल्पना,हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो.ते म्हणतात गझल वाचता वाचता आतल्या आत खळखळ सुरू होऊन एखादी सुरावट बाहेर येते,ती खरी बंदिश असते.ती आपली नसते...आपण फक्त माध्यम असतो.आलेल्या चाली (म्हणजे उर्दूतील आमद) आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते.शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर दाद हमखास मिळते.

           वरील निष्कर्ष सुधाकर कदमांच्या प्रदीर्घ रियाज, अवलोकन,अध्ययन यातून उतरले आहेत हे सहज लक्षात येईल.गझलगायक संगीतकार असूनही त्यांनी आपल्या तालिमीत शिष्य गायक तयार करून त्यांना आपल्या गायनाच्या कार्यक्रमात संधी दिली हे मी फक्त कदमांच्या बाबतीत अनुभवले.एवढेच नव्हे तर गायनाची वर्कशॉप घेण्याची त्यांना गरजही भासली नाही.ते मूलतः कवी व लेखक असल्याने गझल सृजनाचे वर्कशॉप घेऊन मिळकत करणे त्यांना अशक्यही नव्हते.पण गझल गायनाला निष्ठा वाहिल्यामुळे गझलकरांच्या क्षेत्रात चमकोगिरी करून स्वतःचे स्तोम माजविणे व त्या बळावर शासनाकडे गझल भंडारा घालण्यासाठी हात पसरणे त्यांना उचित वाटले नाही.

           गझलच्या नावाखाली एखादी संस्था काढून दरवर्षी गझल उरूस भरवणे चोहीकडे चालले असताना अशा मोहाला कदम बळी पडले नाहीत ही स्पृहणीय बाब होय.त्यासाठी लागणारी लाचारी,संधिसाधुत्व,दूरदृष्टी ठेऊन मैत्री जोडण्याचे कसब (गरज संपतच तोडण्याची चलाखी) इ.चा अभाव असल्याने ते अर्थार्जनात मागे पडले असावेत,पण त्यांना या गोष्टीची खंत नाही.

           गझल लेखन ही आता विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी राहिली नाही.या पूर्वार्ध वाक्याचा उत्तरार्ध असा की,गझल गायन ही आता विशिष्ट व्यक्तींचीही मक्तेदारी उरलेली नाही.डॉ.राजेश उमाळे,दत्तप्रसाद रानडे,विजय गटलेवार,दिनेश अर्जुना,सुरेश दंडे,मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे,रसिक जानोरकर,गायत्री गायकवाड गुल्हाने,राहुलदेव कदम,मदन काजळे,डॉ.सुशील देशपांडे,कल्पिता उपासनी,सचिन डाखोरे,मोहन भिवरकर,आदित्य फडके,

इत्यादी कदमांचे प्रसंशक व शिष्य यांनी माझे हे म्हणणे सत्य ठरविले आहे.

           सुरेश भटांच्या 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची' या गझलेसाठी भूपाळीचे स्वर कदमांना खुणावीत होते.पण अधीर या शब्दासाठी उचित सुरावट आढळेना अन् अवचित भूपाळीत अंतर्भूत नसलेला शुद्ध निषाद त्यांच्या मनात हजर झाला अन् तापलेल्या अधीर पाण्याची ही दुसरी ओळही स्वरबद्ध झाली.हा किस्सा इथे उद्धृत करण्यामागे हेतू एवढाच की कदमांपासून गझलगायनाची प्रेरणा घेणाऱ्या व अन्य गायकांनी हे जाणावे की, खरी चाल ,बंदिश ही आपण बांधली अशी गर्वोक्ती व्यर्थ आहे.

                 इथे एक किस्सा नमूद करतो...

नबाब संत रहीम हे अत्यंत दानशूर होते तेवढेच विनम्रही होते.दोन हात उंचावून याचकांना दान देताना त्यांची दृष्टी जमातीकडे लावलेली असे.यावर गंग कवीने विचारले, 

               सीखे कहां नबाबजूं ऐसी देनी देन

          ज्यों ज्यों कर उंचा करा त्यों त्यों नीचे नैन

रहीम उतरले,

          देन हार कोई और है भेजत सो दिन रैन

             लोग भरम हम पै धरे यात नीचें नैन

नामवंतांनी '#देन_हार_कोई_और_है' याचं भान ठेवणं आवश्यक आहे अन् '#याते_निचें_नैन' ही वृत्ती बाणवणेही गरजेचे आहे.

           सुधाकर कदमांचा परिवार गायन क्षेत्रातच आहे.त्यांचा मुलगा व दोन्ही मुली शिष्य परिवारातच मोडतात.आपण गझलगायन इतरांना शिकवलं तर आपल्याला सरपास करून ते आपल्याहून अधिक विख्यात होतील अशा भयगंडाने शिकू इच्छिणाऱ्यांना त्यांनी कधी विन्मुख पाठविले नाही.गायकांना विद्यादानाची उदारवृत्ती कदमांनी आपल्यात रुजवली आहे.त्यामुळेच आपल्या नॅरेशन्स त्यांनी प्रकाशित करून नवोदित गझलकारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

            ख्यालगायक एखादा राग पेश करताना जी शब्दरचना वापरतो त्या रचनेचा कवी बरेचदा त्यास ज्ञात नसतो. ती रचना त्याला परंपरेने प्राप्त झाली असते.इथे रागाची पेशकश प्रमुख असते.सहसा काव्य संप्रेषित होतेच असे नाही,पण गझलगायनात शब्द हे प्रधान असतात.गायक संगीतकार गझलेला स्वरसाज चढवीत असतो.(सुरावटीवरही गझल पाडून देणारे अनेक महाभाग असतीलही कदाचित अशांना गायनानुकूल न म्हणता गायनानुकूल गझलकार म्हणावे लागेल.) काही गझलगायक (गझलकारास त्याची गझल गायल्याचे मानधन तर देतच नाहीत.) गझल गाताना त्या गझलेच्या कवीचे नावदेखील मैफिलीत सांगण्याचे औदार्य दाखवीत नाहीत.एवढेच नव्हे तर त्याची गझल गाताना अन्य गझलकाराचे शेरही नाव न घेता घुसडतात.हे अनुचित व अनैतिक वर्तन म्हणावे लागेल.सुधाकर कदमांच्या मैफिलीत गझलकाराचा आवर्जून उल्लेख होतो.एवढेच नव्हे ते आपल्या साथीदारांचाही पूर्ण परिचय करून देतात.या गोष्टी गायकाबद्दल श्रोत्यांना अनुकूल मत नोंदविण्यास सहाय्यक ठरतात.गायकाच्या व्यक्तिमत्वाशी एक जमेची बाजू ठरते.विशेषतः कदमांसारखे आकर्षक व्यक्तिमत्व नसेल अशांनी ही बंधने अवश्य पाळावी. त्याने त्याचा दिलदारपणा श्रोत्यांना जाणवून अन्य न्यूनतेकडे दुर्लक्ष होईल.

           खरे तर सुधाकर कदम यांचा गौरव ग्रंथ त्यांची गझल गायनातील ज्येष्ठता व स्थान लक्षात घेता फार पूर्वीच यायला हवा होता,पण बाजारात ओरिजनल वस्तू महाग असते व चायनामेड स्वस्त व विपुल प्रमाणात उपलब्ध असते,त्यामुळे चायनाचे तकलादू प्रॉडक्ट् लवकर खपते हेच खरे.

           गझलगायक, गझलकार व गझल रसिकांनी हा ग्रंथ वाचणे अगत्याचे आहे.जेणेकरून या क्षेत्रात पारंगत म्हणून पाय रोवायचा असेल तर किती आर्थिक ,मानसिक व संघर्षाला सामोरा जाणे क्रमप्राप्त आहे हे समजेल.इथे शॉर्टकट नाही हे लक्षात येईल.खोट्या नाण्यांच्या या क्षेत्रात आपले खणखणीत नाणे जाणकारालाच ओळखता येते हेही ध्यानात येईल.

'मौनी' मधून...


 रसिकहो,

      आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने माझ्या #सांगीतिक_कारकिर्दीला या वर्षी, म्हणजे २०२६ ला बरोबर ६१ वर्षे होत आहेत. १९६५ ला ऑर्केस्ट्रा पासून सुरू झालेली वाटचाल आपणा सर्व रसिक चाहत्यांच्या आशीर्वादाने,प्रेमाने व शुभेच्छांनी #अकॉर्डिअन वादक,आकाशवाणी मान्यताप्राप्त #गायक,#मेंडोलीन वादक,#सरोद वादक,#संगीत_शिक्षक, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचा #केंद्र_व्यवस्थापक,#संगीतकार,#कवी,#लेखक ते मराठी गझल गायकी महाराष्ट्राला देऊन ती रुजविण्यासाठी सुरेश भटांसोबत संपूर्ण आयुष्य घालवले म्हणून महाराष्ट्र जेसीजतर्फे '#पायोनीअर_ऑफ_मराठी_गझल_गायकी', (मराठी गझल गायकीचे जनक)  '#शान_ए_ग़ज़ल',#कलादूत '#गझल_गंधर्व','#साहित्य_निष्ठा_जीवन_गौरव',यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनाचे #अध्यक्षपद पंडित #कुमार_गंधर्व_स्मृती पुरस्कार,#गझल_साधना व #गझलमित्र पुरस्कार असे अनेक स्वर्णमयी टप्पे घेत घेत २०२६ पर्यंत पोहोचली.आज वयाच्या सत्त्याहत्तरीतही त्याच जोमाने काम करण्याची ऊर्जा आपण सतत देत आहात,त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! कायम आपल्या ऋणात..

आपलाच

सुधाकर कदम

सरगम

      विदर्भातील रसिले #गझलगायक म्हणून सुधाकरजी कदम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरूपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे.

     यवतमाळ जवळील आर्णी येथील #गांधर्व_संगीत_विद्यालयाचे ते प्राचार्य आहेत.त्यामुळे संगीत संवर्धनाचे,अध्यापनाचे त्यांचे कार्य सतत सुरू असते.संगीताची ओळख,जाण विद्यार्थ्यांना करून देतानाच #गीतमंच,#एक_सूर_एक_ताल, #कविता,


#गायन,वगैरे अनेक उपक्रमही त्यांच्या नावावर जमा आहेत.आणि हे सारे करता करताच विद्यार्थ्यांकरता त्यांनी अनेक सुंदर स्वररचना तयार केल्या.यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमधून ही गाणी समूह स्वरूपात सादर होत असतात.

       '#सरगम' या पुस्तकात विद्यार्थ्यांना गाता येतील व सहज समजतील अशा सुलभ व मधुर स्वररचना श्री.कदम यांनी पेश केल्या आहेत.मराठीतील नामवंत कवींच्या उत्तम काव्यरचनांना त्यांनी संगीतबद्ध केले आहे.महाराष्ट्रातील सर्व संगीत शिक्षकांनी प्रस्तुत रचना सरगम मार्गदर्शनानुसार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या,तर संपूर्ण संगीत जगतासाठी तो एक प्रशंसनिक उपक्रम ठरू शकेल निःसंशय!

           'सरगम'ला प्रस्तावना देण्यात #यशवंत_देव व पं. #हृदयनाथ_मंगेशकर यांनी कुठेही कमतरता ठेवली नाही.शब्दांची कुठलीही कंजुषी केलेली नाही.परंतु पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते संलग्न व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक नव्हे अनिवार्य असते.त्याबाबतीत मात्र संगीताच्या दुनियेतील मान्यवरांचे अपेक्षित सहकार्य सरगम प्रसारणासाठी लाभलेले नाही हे कटू सत्य आहे.सुधाकरजी कदम यांची धडपड केवळ 'सरगम' प्रकाशनापुरती नसून,ते पुस्तक संगीतोपासक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे ही आहे.अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कवींच्या सुंदर व लोकप्रिय रचना निवडताना त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय पानोपानी येतो.संपूर्ण गीत लिपीबद्ध करताना वाद्यवृंदासाठी आवश्यक असलेला स्वरसमूह देखील वेगवेगळा लिपीबद्ध केलेला आहे.एकूण,पाश्चात्य पद्धतीप्रमाणे ऑर्केस्ट्रा संचातील प्रत्येक वाद्यांसाठी केलेली स्वतंत्र स्वरबद्धता त्यांनी या पुस्तकात वापरली आहे.आज अगदी लहानसहान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगीत हा विषय शिकवला जातो.त्यामुळे संगीताची जुजबी ओळख विद्यार्थ्यांना करून देणे; त्यासाठी संगीत शिक्षकांना अतिशय उपयोगी ठरणारे असे हे पुस्तक आहे.संगीत जगताच्या प्रथम पायरीवर पाऊल ठेवताना सर्वांसाठी मौलिक ठरणारी सुधाकर कदमांची ही 'सरगम' आहे.

           'सरगम' निर्मिती विद्यार्थ्यांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्हावेत,धार्मिक,प्रांतिक व भाषिक विवादीत्व संपून त्यांची शक्ती राष्ट्रउभारणीच्या विधायक कार्यास लागावी या उच्च  हेतूने केली असल्याचे कदम यांनी पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रातील तमाम संगीत शिक्षकांनी ही गीते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली तरच माझ्या प्रयत्नाचे चीज होणार आहे,अन्यथा... हे अंतरीच्या गाण्यातील उद्गारही यात व्यक्त झालेले आहेत.सरगम निर्मितीसाठी प्रोत्साहित करणाऱ्या पं. #जितेंद्र_अभिषेकींपासून संगीत क्षेत्रातील  अनेक दिग्गजांचे जे प्रोत्साहन त्यांना वेळोवेळी लाभले,त्या सर्वांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख प्रस्तावनेत आहे.यावरून सरगमची श्रेष्ठ मौलिकता सिद्ध होते.

           कविवर्य कुसुमाग्रज,विंदा करंदीकर,गौतम सुत्रावे,वा.गो.मायदेव,द.ना.गवाणकर,गोविंद, शंकर बडे,वसंत बापट,संत तुकडोजी महाराज,बहिणाबाई चौधरी,शिवा राऊत,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे, शंकर वैद्य,कलीम खान,विजय देशमुख,गजेश तोंडरे,सौ. मंगला पत्की,कृष्णराव भट्ट,माया भट्टाचार्य, नर्मदाप्रसाद खरे,रवी शुक्ल,इ.नामवंत कवींच्या रचनांना संगीताच्या उपासकांनी,विद्यार्थ्यांनी अधिक लोकाभिमुख करावे म्हणून हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच,पण अनुकरणीयही.

            'सरगम'ची मौलिकता फार मोठी आहे.पण सरगमची खरी उपयुक्तता शाबीत होण्यासाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी उदार मानसिकता व संपूर्ण सहकार्य सर्वार्थाने आवश्यक व अपेक्षित आहे.भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात आगामी सव्वीस जानेवारीपासून या पुस्तकानुरूप विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावभक्तीयुक्त रचनांची ओळख व त्यांच्या फुलणाऱ्या गायकीतून त्याचे प्रसारण झाल्यास 'सरगम' निर्मितीमागील लेखकाचा उद्देश संपूर्णतः फलद्रुप होऊ शकेल.शिक्षक क्षेत्रातील व सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सरगमची दखल खऱ्या अर्थाने घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी तसेच दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शाळाशाळांतून वितरीत करावी इतकाच मानस प्रस्तुत सरगम समीक्षालेखनाचा आहे.आर्णीसारख्या महानगरांपासून दूर असलेल्या ठिकाणच्या एका गुणी,विद्वान,मान्यवर संगीत प्राचार्यांच्या प्रस्तुत 'सरगम'चे स्वागत व उपयोग तमाम रसिक व शासनासाठी एक फार मौलिक उपलब्धी आहे हेच खरे!


-मधुरिका गडकरी

'सूरसुधा' दिवाळी अंक

रविवार दि. १ नोव्हेंबर १९९७

मुखपृष्ठ - बळी खैरे

------------------------------------------------

मधुरिका गडकरी

४९,फ्रेंड्स ले-आउट नं.४ 

रवींद्र नगर,नागपूर २२

-------------------------------------------------





संगीत आणि साहित्य :