गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, June 7, 2026

गझलगंधर्व सुधाकर कदम...डॉ.राम पंडित,मुंबई.

 गझलगंधर्व सुधाकर कदम

#गझलनवाज सुधाकर कदम

#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन सुधाकर कदम

अशा विविध संबोधनांनी मराठी गझल रसिकांना परिचित असलेले मराठीचे #आद्य_मराठी_गझलगायक,#संगीतकार,#कवी,#लेखक.


.          महाराष्ट्रातील गझलविधा खेडोपाडी रुजविण्याचे महत्कार्य स्व.सुरेश भटांसोबत फक्त गझलनवाज सुधाकर कदम यांनीच केले.वऱ्हाडातील आर्णी या छोट्या गावातून हा गझल फकीर गावोगावी भटांच्या गझला चालीसह पोहोचवीत होता तेव्हा आजचे नामवंत भावगीत गायक कोळी गीतांवर गुजराण करीत होते.जेव्हा सुधाकर कदम आर्थिक विवंचनेत होते तेव्हा सुरेश भटांनी  स्वखर्चाने आपल्यासोबत महाराष्ट्रभर गझल वाचन-गायनाचा कार्यक्रम करण्याची गळ घातली अन् कदमही आढेवेढे न घेता,कारणे न देता त्यांच्या सोबतीचे फकीर बनले.गाठीशी चांगली नोकरी असताना तिच्या बळावर अथवा अन्य निकषांवर गायन कार्यक्रम मिळविणे,त्यानंतर आर्थिक स्थैर्याची खात्री झाल्यावर व थोडे बहुत नाव झाल्यावर कलेला वाहून घेणे हे कलेच्या क्षेत्रात नेहमीच घडते.पण तदपूर्वीच नोकरी सोडून गायनासाठी आवकाची पर्वा न करता ,न कंटाळता,न वैतागता शेवटपर्यंत संघर्षरत राहणारे सुधाकर कदम हे एकमेव गायक होय.

           सुरेश भटांनी लेखी स्वरूपात ज्यांना गझलनवाज या उपाधीने गौरविले आहे ते एकमेव सुधाकर कदमच आहेत.शाहीर सुरेशकुमार वैराळकरांच्या आयोजनाखाली झालेल्या एका समारंभात त्यांना गझलगंधर्व ही पदवी बहाल करण्यात आली पण कदमांना त्या पदव्या मिरविण्याचा हव्यास नसावा.त्यांच्या अनेक हिंदी-उर्दू गझल,गीतांवरील स्वरलिपी काका हाथरसीच्या #संगीत  कार्यालयाच्या ग्रंथात अंतर्भूत आहेत.त्यावरून #पंडित  ही उपाधी ते सहजपणे लावू शकतात पण ही पदवी शासन दरबारातून किंवा विद्यापीठातून मिळत नाही हे सर्वश्रुत आहे.अशी पदवी स्वयंघोषितच लावतात.स्वतःला बिरुद चिटकवून घेण्याचा त्यांना तिटकारा आहे.

          सुधाकर कदमांचा आवाज,शास्त्रीय संगीताची जाण व गझल ही शब्दप्रधान गायकी आहे या गोष्टींचे भान व रागात गझल बांधण्याचे कसब हे गुण भटांना भावले व त्यामुळेच भटांनी त्यांना सोबत घेतले.

           सुधाकर कदमांच्या गझलगायनाने प्रेरित होऊन विदर्भातील अनेक गायक गझलगायनकडे वळले.त्यातील राजेश उमाळे,मदन काजळे, विजय गटलेवार, भीमराव गुलाबराव पांचाळे ही नावे नमूद करता येईल. कदमांच्या शैलीचा शिक्का आपणावर बसू नये म्हणून काही गायकांनी शब्दांपेक्षा सरगम व वाद्यवृंदाच्या पेशकशीचा आधार घेत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला.कवीचे गझलेतील भाव तिच्यातील शब्दांद्वारे व आपल्या स्वर व सुरांच्या सहाय्याने रसिक श्रोत्यांच्या मनबुद्धीत संप्रेषित करणे हे गझलगायकाचे आद्य कर्तव्य आहे.(शब्दांना गौण मानून आलापांद्वारे आपले नैपुण्य प्रदर्शित करणे नव्हे.)याचा अनेक लब्धप्रतिष्ठित गवैयांना विसर पडतो 

           सुधाकर कदमांनी सरकार दरबारी पायऱ्या झिजवून अनुदान-याचक बनून जलसे केले नाहीत की आपले गायन क्षेत्र सोडून गझल लेखन क्षेत्रात लुडबुड केली नाही.खरे तर ते लेखक कवीही आहेत.तालवृत्तांएवढेच त्यांना छंदवृत्तांचेही ज्ञान आहे,पण त्यांनी शिष्यवर्ग घडवला तो आपल्या गायन क्षेत्रातच.

           सांदिपनी बनून आश्रमासाठी माधुकरी मागण्याचीही त्यांना आवश्यकता भासत नाही हे विशेष.

          वडील पांडुरंगपंत हे संगीत तज्ञ व संवादिनी वादक असल्याने सुधाकर कदमांना संगीताची गोडी लागणे स्वाभाविकच होते.त्यांनी सुधाकर कदमांना पुरुषोत्तम कासलीकर यांच्याकडे शिकण्यास पाठविले.अल्पावधीतच संगीत विशारद ही पदवी कदमांनी श्रेष्ठ श्रेणीत प्राप्त केली.'#अशी_गावी_मराठी_गझल' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी विविध ठिकाणी,विविध गावी केले.

           कदम म्हणतात,मराठी गझल जशी उर्दूकडून आली तशीच गझलगायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.त्यांनी आपली गायन शैली मेहदी हसन,फरीदा खानम,गुलामअली,जगजितसिंह यांच्या गायकीवरून तयार झाली हे प्रामाणिकपणे मान्य केले आहे.वडिलांचे वारकरी भजन,गायन व शिवरंजनी ऑर्केस्ट्रामधील संयोजन व अकॉर्डियन,सोबत तबला,मेंडोलिन,सरोद,संतूर इत्यादी वाद्यांवर त्यांनी प्राविण्य मिळवले.एवढेच नव्हे तर मुलगा तबला वादक व दोन्ही मुलींना गायक म्हणून घडविले.

           सुधाकर कदमांना बंदिश तयार करणे ही संकल्पना,हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो.ते म्हणतात गझल वाचता वाचता आतल्या आत खळखळ सुरू होऊन एखादी सुरावट बाहेर येते,ती खरी बंदिश असते.ती आपली नसते...आपण फक्त माध्यम असतो.आलेल्या चाली (म्हणजे उर्दूतील आमद) आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते.शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर दाद हमखास मिळते.

           वरील निष्कर्ष सुधाकर कदमांच्या प्रदीर्घ रियाज, अवलोकन,अध्ययन यातून उतरले आहेत हे सहज लक्षात येईल.गझलगायक संगीतकार असूनही त्यांनी आपल्या तालिमीत शिष्य गायक तयार करून त्यांना आपल्या गायनाच्या कार्यक्रमात संधी दिली हे मी फक्त कदमांच्या बाबतीत अनुभवले.एवढेच नव्हे तर गायनाची वर्कशॉप घेण्याची त्यांना गरजही भासली नाही.ते मूलतः कवी व लेखक असल्याने गझल सृजनाचे वर्कशॉप घेऊन मिळकत करणे त्यांना अशक्यही नव्हते.पण गझल गायनाला निष्ठा वाहिल्यामुळे गझलकरांच्या क्षेत्रात चमकोगिरी करून स्वतःचे स्तोम माजविणे व त्या बळावर शासनाकडे गझल भंडारा घालण्यासाठी हात पसरणे त्यांना उचित वाटले नाही.

           गझलच्या नावाखाली एखादी संस्था काढून दरवर्षी गझल उरूस भरवणे चोहीकडे चालले असताना अशा मोहाला कदम बळी पडले नाहीत ही स्पृहणीय बाब होय.त्यासाठी लागणारी लाचारी,संधिसाधुत्व,दूरदृष्टी ठेऊन मैत्री जोडण्याचे कसब (गरज संपतच तोडण्याची चलाखी) इ.चा अभाव असल्याने ते अर्थार्जनात मागे पडले असावेत,पण त्यांना या गोष्टीची खंत नाही.

           गझल लेखन ही आता विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी राहिली नाही.या पूर्वार्ध वाक्याचा उत्तरार्ध असा की,गझल गायन ही आता विशिष्ट व्यक्तींचीही मक्तेदारी उरलेली नाही.डॉ.राजेश उमाळे,मदन काजळे,दत्तप्रसाद रानडे,विजय गटलेवार,दिनेश अर्जुना, आदित्य फडके,मयूर महाजन इ.कदमांचे प्रसंशक व शिष्य यांनी माझे हे म्हणणे सत्य ठरविले आहे.

           सुरेश भटांच्या 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची' या गझलेसाठी भूपाळीचे स्वर कदमांना खुणावीत होते.पण अधीर या शब्दासाठी उचित सुरावट आढळेना अन् अवचित भूपाळीत अंतर्भूत नसलेला शुद्ध निषाद त्यांच्या मनात हजर झाला अन् तापलेल्या अधीर पाण्याची ही दुसरी ओळही स्वरबद्ध झाली.हा किस्सा इथे उद्धृत करण्यामागे हेतू एवढाच की कदमांपासून गझलगायनाची प्रेरणा घेणाऱ्या व अन्य गायकांनी हे जाणावे की, खरी चाल ,बंदिश ही आपण बांधली अशी गर्वोक्ती व्यर्थ आहे.

           इथे एक किस्सा नमूद करतो...

नबाब संत रहीम हे अत्यंत दानशूर होते तेवढेच विनम्रही होते.दोन हात उंचावून याचकांना दान देताना त्यांची दृष्टी जमातीकडे लावलेली असे.यावर गंग कवीने विचारले, 

          सीखे कहां नबाबजूं ऐसी देनी देन

          ज्यों ज्यों कर उंचा करा त्यों त्यों नीचे नैन

रहीम उतरले,

          देन हार कोई और है भेजत सो दिन रैन

          लोग भरम हम पै धरे यात नीचें नैन

नामवंतांनी 'देन हार कोई और है' याचं भान ठेवणं आवश्यक आहे अन् 'याते निचें नैन' ही वृत्ती बाणवणेही गरजेचे आहे.

           सुधाकर कदमांचा परिवार गायन क्षेत्रातच आहे.त्यांचा मुलगा व दोन्ही मुली शिष्य परिवारातच मोडतात.आपण गझलगायन इतरांना शिकवलं तर आपल्याला सरपास करून ते आपल्याहून अधिक विख्यात होतील अशा भयगंडाने शिकू इच्छिणाऱ्यांना त्यांनी कधी विन्मुख पाठविले नाही.गायकांना विद्यादानाची उदारवृत्ती कदमांनी आपल्यात रुजवली आहे.त्यामुळेच आपल्या नॅरेशन्स त्यांनी प्रकाशित करून नवोदित गझलकारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

            ख्यालगायक एखादा राग पेश करताना जी शब्दरचना वापरतो त्या रचनेचा कवी बरेचदा त्यास ज्ञात नसतो. ती रचना त्याला परंपरेने प्राप्त झाली असते.इथे रागाची पेशकश प्रमुख असते.सहसा काव्य संप्रेषित होतेच असे नाही,पण गझलगायनात शब्द हे प्रधान असतात.गायक संगीतकार गझलेला स्वरसाज चढवीत असतो.(सुरावटीवरही गझल पाडून देणारे अनेक महाभाग असतीलही कदाचित अशांना गायनानुकूल न म्हणता गायनानुकूल गझलकार म्हणावे लागेल.) काही गझलगायक (गझलकारास त्याची गझल गायल्याचे मानधन तर देतच नाहीत.) गझल गाताना त्या गझलेच्या कवीचे नावदेखील मैफिलीत सांगण्याचे औदार्य दाखवीत नाहीत.एवढेच नव्हे तर त्याची गझल गाताना अन्य गझलकाराचे शेरही नाव न घेता घुसडतात.हे अनुचित व अनैतिक वर्तन म्हणावे लागेल.सुधाकर कदमांच्या मैफिलीत गझलकाराचा आवर्जून उल्लेख होतो.एवढेच नव्हे ते आपल्या साथीदारांचाही पूर्ण परिचय करून देतात.या गोष्टी गायकाबद्दल श्रोत्यांना अनुकूल मत नोंदविण्यास सहाय्यक ठरतात.गायकाच्या व्यक्तिमत्वाशी एक जमेची बाजू ठरते.विशेषतः कदमांसारखे आकर्षक व्यक्तिमत्व नसेल अशांनी ही बंधने अवश्य पाळावी. त्याने त्याचा दिलदारपणा श्रोत्यांना जाणवून अन्य न्यूनतेकडे दुर्लक्ष होईल.

           खरे तर सुधाकर कदम यांचा गौरव ग्रंथ त्यांची गझल गायनातील ज्येष्ठता व स्थान लक्षात घेता फार पूर्वीच यायला हवा होता,पण बाजारात ओरिजनल वस्तू महाग असते व चायनामेड स्वस्त व विपुल प्रमाणात उपलब्ध असते,त्यामुळे चायनाचे तकलादू प्रॉडक्ट् लवकर खपते हेच खरे.

           गझलगायक, गझलकार व गझल रसिकांनी हा ग्रंथ वाचणे अगत्याचे आहे.जेणेकरून या क्षेत्रात पारंगत म्हणून पाय रोवायचा असेल तर किती आर्थिक ,मानसिक व संघर्षाला सामोरा जाणे क्रमप्राप्त आहे हे समजेल.इथे शॉर्टकट नाही हे लक्षात येईल.खोट्या नाण्यांच्या या क्षेत्रात आपले खणखणीत नाणे जाणकारालाच ओळखता येते हेही ध्यानात येईल.


-डॉ.राम पंडित,मुंबई.'पद्मानंद'

४,एटलांता,सेक्टर ४०,सी वुडस-पश्चिम,

नवी मुंबई ४००७०६

मोबा.9819723756

सुधाकर कदम आणि भीमराव पांचाळे


 कविश्रेष्ठ सुरेश भटांना घराघरात पोहोचविणारे दोन महानुभाव ...

#सुधाकर_कदम आणि #भीमराव_पांचाळे


     अमरावती येथे अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाला  अमरावतीच्या मोर्शी रोडवरील  श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये प्रारंभ झाला असून दिनांक आठ ला सायंकाळी या अखिल भारतीय एल्गार गझल संमेलनाचा समारोप होणार आहे. समारोप जरी होत असला तरी या अखिल भारतीय एल्गार संमेलनामध्ये सहभागी झालेले गझलकार गीतकार रसिक गायक हा गजलेचा संदेश आपापल्या गावात आपापल्या परिसरात घेऊन जाणार आहेत. 


     आजची परिस्थिती वेगळी आहे. सोशल मीडिया बराच प्रभावी झालेला आहे. नियतकालिके पण भरपूर निघालेली आहेत आणि ते सर्व प्रकारच्या साहित्याला स्थान देत आहेत. पण सुरेश भटांचा जो काळ होता त्या काळात ही परिस्थिती नव्हती. सोशल मीडिया तर नव्हताच .पण आज जसे गजलांचे भरपूर कार्यक्रम होतात .भरपूर संमेलने होतात

 त्या प्रमाणात त्या काळात होत नव्हती. सुरेश भट लिहीत होतेस्वतः सादर करीत होते. पण त्यांच्या गजलांनाना कवितांना गीतांना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे पहिले काम जर कोणी केले असेल तर त्या माणसाचे नाव आहे सुधाकर कदम. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या या माणसाने सुरेश भटांची गझल हृदयापासून गाऊन त्याचे वेगवेगळे कार्यक्रम करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन त्यांना सुप्रसिद्ध लेखक  डॉ नरेंद्र जाधव व सिने दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते गजलगंधर्व हा  सन्मान बहाल करण्यात आला. आज गझल नवाज भीमराव पांचाळे सुरेश भटानंतर हे काम करीत आहेत. श्री भीमराव पांचाळे व श्री सुधाकर कदम यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांचा वारसा पुढे चालविला आहे .एवढेच नव्हे तर ज्याप्रमाणे सुरेश भट यांनी एक पिढी निर्माण केली त्याचप्रमाणे या दोघांनी पिढी निर्माण करण्याचे काम केले आहे. 

     सुधाकर कदम यांचे आर्णी हे तसे लहान गाव. तालुक्याचे गाव यवतमाळ जिल्ह्यातील गाव. पण या माणसाचे संगीतावर व गायनावर अफाट प्रेम होते .त्या प्रेमाची सुरुवात जरी आर्केस्ट्रा पासून झाली असली तरी त्यांना जेव्हा खरा सूर गवसला तेव्हा कविवर्य सुरेश भटांचा स्पर्श त्यांना झाला व ते भटांचे गजलांचे कवितांचे गीतांचे भक्त झाले. सुधाकररावांचे आणि भट साहेबांचे नाते जवळचे होते. एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. तासंतास सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या .पण संगीताचे आणि गायनाचे विषय रात्र रात्रभर जागून काढत होते आणि त्यामुळे सुधाकरराव कदम यांनी सुरेश भटांच्या ज्या ओळी लोकांसमोर सादर केल्या त्या लोकांनी उचलून धरल्या डोक्यावर घेतल्या .


     सुधाकर कदम यांना सुरेश भट महाराष्ट्राचे मेहदी हसन म्हणायचे. इतकी त्यांच्या शब्दात व स्वरात प्रगल्भता होती. पण ती त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नव्हती .त्यासाठी त्यांना भरपूर परिश्रम करावे लागले. भरपूर रियाज करावे लागले. तो रियाज ते परिश्रम त्यांनी आपल्या स्वरामध्ये आणि सुरामध्ये उतरविले. त्यामुळे सुधाकर कदम यांनी सुरेश भटांच्या गीतांना गजलांना कवितांना खऱ्या अर्थाने न्याय दिला.  तसे सुद्धा  सुधाकर कदम हे आर्णीला संगीत विषयाचे अध्यापक होते पत्रकारिताही करीत होते. अभिनयही करीत होते . वाद्य वाजविणे हा तर त्यांचा छंदच होता.एका अर्थाने त्या काळात सुधाकर कदम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मराठी गझल कशी गावी हे शिकावे ते सुधाकर कदम यांच्याकडूनच. सुरेश भट आणि यशवंत देव त्यांना पहिले गझल गायक म्हणून संबोधित होते आणि ते खरेही होते. कारण सुरेश भटांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेले आहे 


साधीसुधी ही माणसे 

माझ्या कवितेची धनी 


     सुधाकर कदम हे साधे सरळ ग्रामीण भागात राहणारे व्यक्तिमत्व होते .त्यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांच्या काव्यावर प्रेम केले आणि ते आपल्या स्वरांच्या आणि सुरांच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केले .अर्थातच ते लोकांना आवडले. त्याला कारणही तसेच होते .

आजच्यासारखा व्यावसायिक रंग त्या काळात शिरलेला नव्हता. कवी गायक आणि रसिक त्यांचे एक अतूट नाते होते.आज सुधाकर कदम यांनी वयाची सत्याहत्तरी गाठलेली आहे. तरीपण त्याच जोमाने त्याच अंत:करणाने ते सुरेश भटांचे आपल्या शब्दात  सुरातून गुणगान करीत असतात हे त्यांचे मोठेपण आहे. गझल संमेलनाने त्यांचा मानसन्मान केला आहे. आणि ते त्याला पात्रही आहेत. 


भीमराव पांचाळे 


     सुधाकर कदमानंतर सुरेश भटांच्या संपर्कात आले ते भीमराव पांचाळे. भीमराव पांचाळे यांनी सुरेश भटांना सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपल्या शब्दांमध्ये आपल्या स्वरांमध्ये आपल्या सुरांमध्ये प्राण ओतले.  अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव या लहानशा ग्रामीण भागात राहणारे हे व्यक्तिमत्व. पण आपल्या गझल गायनाने त्यांनी पूर्ण विश्व व्यापले आहे. गझलनवाज या उपाधीने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांची गझल पेश करण्याची अदा आगळीवेगळी आहे. ते शब्दाची फेक इतक्या सुंदर रीतीने करतात की ती रसिकांच्या काळजात जाऊन बसते. सुरेश भटानंतर गजलेचा वारसा चालविणारे गायन करून  लोकांसमोर पेश करणारे जे काही लोक आहेत त्यामध्ये भीमराव पांचाळे यांचे नाव सर्वपरिचित आहे. ठिकठिकाणी गझल संमेलन घेऊन गजलांच्या कार्यशाळा घेऊन त्यांनी सुरेश भट यांच्या गझल उपक्रमाला खतपाणी घातले आहे. आज ठिकठिकाणी गझल संमेलने कवी संमेलने नवीन नवीन गझलकार लोकांसमोर यावया लागलेले आहेत. काही काही गझलकार तर इतके दमदार आहेत की ते समोरच्या रसिकांवर मोहिनी करून जातात. अशा पिढीला विचारपीठ उपलब्ध करून देणे

 त्यांना मार्गदर्शन करणे .या कामात भीमरावांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे आणि ते महत्त्वाचे आहे. 


     सुरेश भटांनी ज्याप्रमाणे स्वतःपुरते मर्यादित न राहता इतरांनाही प्रोत्साहन दिले गजलेची बाराखडी तयार केली. ती अनेकांना पाठविली. अनेकांच्या गजला दुरुस्त करून दिल्या .त्यांना प्रोत्साहन दिले. तेच काम आज श्री भीमराव पांचाळे व श्री सुधाकर कदम करीत आहेत. मंगेशकर परिवारातील आशा भोसले लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर या लोकांनी  सुप्रसिद्ध गायक श्री सुरेश वाडकर यांनी श्री सुरेश भट यांना घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न तर केलाच आहे .पण त्याचबरोबर सुधाकर कदम आणि भीमराव पांचाळे यांनी केलेले प्रयत्न हे घराघरापर्यंत सुरेश भट यांना प्रत्यक्ष घेऊन गेलेले आहेत. 


     आता बरेच गायक कविश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या गजलांचे कार्यक्रम सादर करीत आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे शब्दसुरांच्या  झुल्यावरचे श्री सुरेश शुक्ल  दत्तप्रसाद रानडे गझलरत्न प्रा. राजेश उमाळे आमच्या अमरावतीचे श्री सुरेश दंडे पुण्याचे प्रा. डॉ. चंद्रकिरण घाटे अशी बरीच मंडळी सुरेश भटांचा कित्ता गिरवीत आहेत. आमच्या अमरावतीकरांसाठी ही गौरवाची बाब आहे. कारण की सुरेश भट हे अमरावतीचे होते आणि दि. सात आणि आठ फेब्रुवारीचे हे अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनही अमरावतीत होत आहे .त्यानिमित्त आमच्या अमरावतीच्या सुपुत्राचा संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आणि महाराष्ट्र बाहेरही हे गझलकार हे गीतकार हे  आपापल्या परीने सुरेश भटांना न्याय देत आहेत .हे निश्चितच मैलाचा दगड ठरणारे आहे. या सर्वांना माझा गझल संमेलनानिमित्त मानाचा मुजरा. 


प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे 

संचालक 

मिशन आयएएस 

अमरावती 

9890967003


 

चिता


 

मलिदा


 

अन्न


 

चैत्र पालवी


 

हव्यास


 

कुंडली


 


 





संगीत आणि साहित्य :