गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, February 12, 2022

मराठी गझलगायकीला पडलेलं स्वप्न...प्रा.जैमिनी कडू

        सन १९६५-६६! अकरावीपुढील शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी मला अमरावतीच्या नमुना विभागातील श्री. गंगारामजी भगत (दादा) यांच्याकडे ठेवले होते. अमरावती शहरातील भगत परिवार म्हणजे चालते बोलते लॉजिंग-बोर्डिंग होते. तत्कालीन प्रख्यात बलवंत ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे ते एक भागीदार. त्या काळचे अमरावती शहर म्हणजे कापूस, ज्वारी व न्याचे प्रख्यात माहेरघर. त्यामुळे मध्यप्रदेशचा बहुतांश व्यापार अमरावतीमधून चालत असे. अमरावती ते बुऱ्हाणपूर, इटारसी, मुलताई, खंडवा, भोपाळ अशा बलवंत बसेस चालत. त्यामुळे भगत कुटुंबाचा सामाजिक परिवारही मोठाच होता. रोजच चार-पाच पाहुणे दादांकडे मुक्कामाला असत. स्वयंपाकघर सतत चालू असे. दादांचे धाकटे चिरंजीव नारायणराव, कमलाताई त्याच्या सुविद्य पत्नी दोघेही स्वभावाने अक्षरशः सज्जनपणाचा कळस. येणाऱ्या प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत होई अन् येणारा जेवूनच जायचा, अशा या भगत परिवारात मला शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले.

     या भगत कुटुंबातील आमच्या कमलाकाकूंचा नातेवाईक असलेला सुधाकर कदम नावाचा समवयीन मुलगा अधूनमधून मुक्कामाला यायचा. अत्यंत रेखीव, सुहास्यवदनी, गव्हाळा रंग, मध्यम उंची, डौलदार कुरळे केस, उठावदार व्यक्तिमत्त्व. सुधाकरची पहिले भेट झाली ती याच वर्षी. आम्ही दोघेही कलाप्रेमी असल्याने बहुधा आमची भेट मैत्रीत बदलली. सुधाकरच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला सदाबहार गायकीची नैसर्गिक देणगी लाभलं होती तर माझ्या व्यक्तिमत्त्वाला प्रखर वक्तृत्वाची नैसर्गिक देणगी लाभली होती. यवतमाळातील शिवरंजन ऑर्केस्ट्राचा सर्वेसर्वा म्हणजे सुधाकर अन् अमरावतीमधील बोडे बंधूंच्या आराधना ऑर्केस्ट्रामध्ये मी मंचसंचालक. सुधाकरचे वडील पांडुरंगजी कदम हे कृषी (कुणबी) संस्कृती, सभ्यता व व्यवस्थेतील एक बऱ्यापैकी प्रस्थापित शेतकरी. वारकरी संप्रदायाचे नैसर्गिक लाभलेल्या सुरेल आवाजात भजन गाणारे. माझे वडील भाऊसाहेब कडू हेही याच संस्कृतीतील एक नामवंत शिक्षक. ही सारी पार्श्वभूमी कदाचित आमच्या गाढ मैत्रीचे सूत्र असावे. अजून एक म्हणजे चळवळ्या स्वभाव. यवतमाळच्या कलाक्षेत्रातला चळवळ्या सुधाकर तर अमरावतीच्या साहित्यनाट्य क्षेत्रातला चळवळ्या मी. मुंबईच्या चित्रपटसृष्टीत येऊन काही करण्याची दोघांचीही इच्छा. कधीच पूर्ण न झालेली. शिक्षणपूर्ती नंतर उदरनिर्वाहासाठी सुधाकर आर्णीला श्री. दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत झाला.मी ही पदवीनंतर नोकरीच्या शोधात नागपूरला आलो.त्यामुळे काही काळ भेटीगाठी थांबल्या.           

     याच काळात माझी सुरेश भटांची भेट झाली.अमरावतीपासून ओळख असल्यामुळे त्यांनी विचारपूस केली आणि मी बेरोजगार आहे हे कळल्याबरोबर त्यांनी त्यांच्या 'बहुमत' नामक साप्ताहिकात संपादकत्वाचे काम दिले.त्यावेळी ते खामल्यात राहत असत.

     सुधाकर आर्णीला श्री.महंत दत्तराम भारती विद्यालयात स्थिरावला.मी अमरावती सोडून नागपूरला आलो, रोजगाराच्या शोधार्थ अन् पत्रकार म्हणून स्थिरावलो. संगीत शिक्षक होऊन सुधाकर शिक्षक म्हणून मर्यादित राहिला नाही.आर्णीत गांधर्व संगीत विद्यालय स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे दालन खुले करून दिले.त्यासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्रही मिळवले व आर्णी सोडेपर्यंत ३१ वर्षे ते चालविले.शिवजयंती उत्सव समिती स्थापन करून शिवसेना शाखेची मुहूर्तमेढही रोवली.त्याच्या प्रयत्नाने विदर्भातील पहिला-वहिला आमदार श्रीकांत मुनगिनवारच्या रूपाने त्याने शिवसेनेला दिला.पत्रकारीतही केली.अभिनय कला मंडळाची स्थापना करून एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले.कलावंत मेळावे,मराठी गझल गायन स्पर्धा,संगीत विद्यालयाचा वार्षिकोत्सव असे विविध उपक्रम राबवून युवा विश्वाच्या व्यक्तिमत्व विकासाची चळवळ राबवित राहिला.पण गझलगायकी मात्र सोडली नाही. सुधाकरने शिवसेनेचा आमदार व्हायचे ठरविले असते तर दिग्रस विधानसभा मतदार संघातून (विदर्भातून पहिलाच) शिवसेनेचा आमदार म्हणून हमखास विजयी झाला असता.पण राजकारणापेक्षा नैसर्गिक लाभलेले  अन् चिरस्थायी असलेले गीत-संगीताचे क्षेत्र त्याने सोडले नाही.राजकारण कायमचे मागे पडले.इकडे मी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार व्हायचे ठरवले असते तर एका वजनदार काँग्रेसी नेत्याच्या शब्दावर इंदिरा काँग्रेसचा आमदार झालो असतो.परंतु भांडवलदाराच्या पैशावर त्याचा चमचा होण्याचे नाकारले.पत्रकार व पुढे शिक्षक म्हणूनच कार्यरत राहिलो.सुधाकर व माझ्या व्यक्तिमत्वातली ही साम्यस्थळे आजवरच्या मैत्रीतील अतूट धागे आहेत.फरक इतकाच की, सुधाकर पुण्यात जाऊन संगीत क्षेत्रातील त्याची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहिला व मी नागपुरात राहिलो.

       सुधाकरला मी 'मराठी गझल गायकीला पडलेले स्वप्न' म्हणतो. सुधाकर अव्वल दर्जाचा संगीतप्रेमी. संगीतातील वादन कलेपासून अन्य सर्व घटकांचे त्याचे ज्ञान विलक्षण असेच होते. वयाच्या १० व्या वर्षापासून तबला वादनाचे धडे घेत, वडिलांकडून हार्मोनियम धडे घेतल्यामुळे १६ व्या वर्षी यवतमाळच्या शिवरंजन या ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन वाजवायला लागला. तसेच तो नागपूर आकाशवाणीचा मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झाला, सरोद-संतूरसारखी वाद्ये सुध्दा तो लिलया हाताळत असे. अशातच विदर्भ साहित्य संघाने नव्यानेच संगीत विभाग सुरू करायचे ठरवले. उद्घाटनानिमित्त गडकरी सभागृहात सुधाकरचा कार्यक्रम ठरविण्यात आला.यावेळी सुधाकरने एक तास सरोद वादन व एक तास गायन असा कार्यक्रम केला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा म्हणजे सुरेश भट होते.(अमरावतीत असताना सुरेश भटांच्या हाताखाली वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी मला दीर्घ काळ मिळाली. तसेच त्यांच्या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकाचा संपादक होतो.) सुधाकरने गायिलेली शंकर बडे यांची गझल व बंदिश त्यांना खूप आवडली. माझ्या माहितीप्रमाणे तो मराठी गझल गायनाचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग होता. या प्रयोगला दादांनी मनापासून दाद दिली.

      त्याच्या गायकीला अनुवांशिकतेची साथ असली तरी आजच्या त्याच्या गायकीला त्याच्या परिश्रमाची,प्रयोगाची पार्शवभूमी आहे. मराठी शिक्षण क्षेत्रातील पहिला असा संगीत शिक्षक की, ज्याने पाठ्यक्रमातील कवितांना चाली लावून विदयार्थ्यांना शिकविले. मराठी गझल कशी गावी, हे त्याने प्रभावीरीत्या सिद्ध केले.गीत-संगीतातील सर्व बारकावे हेरून,गझलमधील भावार्थाला प्राशन करून शब्दरूप द्यायचे अन् शब्दशक्तीला बाधा पोहचू न देता आपल्या गायकीतून सादर करायचे तेव्हा रसिक श्रोत्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे उद्गार बाहेर यायचा, वाहव्वा! मी गझलश्रवणप्रेमी आहे.परंतू गझलेतील काव्य-शास्त्रीय संगीत-शास्त्रीय ज्ञानाचा यत्किंचितही गंध नसलेला गझलश्रवणप्रेमी आहे.गझल ऐकताना कर्णमाध्यमातून मेंदू व हृदय यांना भावणाऱ्या अलौकिक अशा भावना शब्दशक्तिमधील उच्चार अभिव्यक्तीत उणीव असेल तर बाधित होतात, याचा अनुभव घेतलेला. सुधाकर हा कौटुंबिक सदस्य असल्याने कौटुंबिक गझल मैफली झडत असत. त्यावेळी अलौकिक प्रत्यय अनुभवता येत असे. अशा अलौकिक गायकीच्या सुधाकरला मराठी गझलसाम्राट सुरेश भटांनी दिलेल्या पावतीचा मी जिवंत साक्षीदार आहे. 

     सुधाकरच्या आवाजातून त्यानेच स्वरबध्द केलेली भटांची 'कुठलेच फूल आता मजला पसंत नाही, ही गझल जेव्हा घनदाट रानातील झुळझुळणाऱ्या झऱ्यासारखी बाहेर पडली तेव्हा भटांनी त्याला '#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन' म्हटल्याचे याची देही याची डोळा मी पाहिले आहे. 

(कुठलेच फूल आता मजला पसंत नाहीची youtube link...

https://youtu.be/fnibDhN5x7o) 

     त्यानंतर 'सुरेश भटांची गझल व सुधाकरची गायकी' एक समीकरणच झालेले अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवले. सुरेश भटांची गझल अन् सुधाकरची अनुरूप स्वररचना,संगीतसाथ म्हणजे अलौकिक सांगीतिक अनुभव.

'सूर्य केव्हाच अंधाराला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो'

 हा सुरेश भटांचा प्रत्ययकारी विद्रोह तेवढ्याच प्रत्ययकारी अदाकारीने सुधाकरच्या गझलगायकीतून कानावर यायचा. तेव्हा रसिक भावविभोर न झाला तरच नवल. विद्रोह हा पोवाड्यातून अधिक परिणामकारकरीत्या अभिव्यक्त होतो.तो विद्रोह सुधाकर आपल्या गझल गायकीतून उत्कटपणे सादर करू शकत होता,अशा गझल गायकीतून शृंगार अन् करूण रसातली गझल रसिक श्रोत्यांच्या पसंतीला न उतरली तरच.

            सुधाकरमध्ये एक कवी पण दडलेला आहे.

'सरगम तुझ्याचसाठी,गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी'

ही त्याची रचना '#सरगम_तुझ्याचसाठी' या त्याच्या बंदिशींवर आधारित कार्यक्रमामधून त्याच्या मुली भैरवी,रेणू सादर करायच्या.सुधाकर हा शास्त्रीय संगीतातील योगी.त्यामुळे त्याच्यातील कवी संगीतमय कविता प्रसवणारा. नैसर्गिक सौंदर्यभावाची देणगी लाभलेल्या मायेने आपल्या गोंडस मुलाला साजशृंगाराने सजवून त्याचे सौंदर्य अधिक खुलवावे,तसे सुधाकरचे त्याच्याच काव्याबाबत .हा रसाविष्कार त्याच्या गझलगायकीतही रसरसून भरलेला आहे.कवी,कुशल संघटक, संगीतकार,गायक,संगीतकार,शिक्षक आणि पत्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या सुधाकरलाही अखेर सांस्कृतिक विषमतेचा बळी व्हावे लागलेच.अक्षरशः पुण्यात राहूनसुद्धा कृषी संस्कृती,सभ्यता व व्यवस्थेतही कोहिनूर पैदा होतात,आहेत,झालेत.परंतू कोळसा खाणीतील कोळशाला जशी रत्नाची पारख नसते,तसेच या व्यवस्थेतील प्रज्ञावंतांचे होते.कृषी व्यवस्थेला नैसर्गिक उत्पादन करण्याची कला ठाऊक असते,मात्र त्या नैसर्गिक उत्पादनाचे कृत्रिम मार्केटिंग करण्याची कला अवगत नसते.परिणामी कृषकाचा गहू खाणाऱ्याला जितका माहीत होतं नाही,तितका 'टाटाचा बाटा' माहीत होतो.दूध उत्पादक कृषकाचे दूध त्याच्या व त्याच्या गायी-म्हशीच्या नावे ओळखल्या जात नाही.ते 'हल्दिराम' वा 'दिनशॉ' च्या नावाने ओळखले जाते.तसे काही सुधाकरचे झाले आहे.

      सुधाकर आणि माझ्यातील आणखी एक साम्यस्थळ म्हणजे आम्ही दोघांनीही आंतरजातीय विवाह केला आहे.माझी बायको कलार समूहातील,सुधाकरची बायको आमच्या प्रिय सुलभा वहिनी या ब्राह्मण समूहातील.माझी बायको 'कुणबी' होऊ शकली नाही,पण मूळच्या ब्राह्मण असलेल्या सुलभा वहिनी अगदी सुलभ रित्या 'कुणबी' झाल्या.जातीने नव्हे प्रवृत्तीने.ब्राह्मण तरुणीशी आंतरजातीय विवाह करणाऱ्या बहुजन तरुणांची अवस्था कशी होते,हे मी अनुभवून आहे. म्हणूनच मला सुलभा वहिनींचा खूप खूप अभिमान आहे की, त्यांनी सुधाकरचे जीवनसाथी होण्याचे ज्या दिवशी निश्चित केले त्याच दिवशी आपले ब्राह्मण्य सुलभरीत्या त्यागले अन्  कुणबित्व स्वीकारले. सुधाकर आज जे काही मिळवू शकला त्यात सुलभा वहिनींचा वाटा तितकाच आहे, जितका गझलगायकीत संगीताचा.सुधा-सुलभा या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या जीवनात ज्या दोन गझलांनी आणि एका अभंगाने जन्म घेतला, त्या भैरवी अन्  रेणू या पोरी व निषाद हा पोरगा.तिघेही स्वरसंगीत घेऊनच जन्मले अन् आपल्या पित्याच्या स्वरसंगीतमय जीवनातील अविभाज्य असे घटक होऊन राहिलेत.मराठी गझलगायकीला पडलेले 'सुधाकर कदम' नावाचे स्वप्न आज अत्यंत कृतकृत्य जीवन जगत आहे.मणक्यांच्या दुखण्यामुळे थोडा वेग कमी झाला असला तरी आवेग कमी झालेला दिसत नाही. हे त्याच्या एकामागून एक रसिकांच्या सेवेत येत असलेल्या अल्बम्सवरून दिसते आहे. अशीच दीर्घतम संगीतसेवा त्याच्याकडून घडण्यासाठी दीर्घायुरारोग्यासाठी निसर्गाजवळ प्रार्थना करतो.


५,आर.एम.एस.कॉलनी,

मानेवाडा रोड

नागपूर.





संगीत आणि साहित्य :