गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, June 14, 2023

उर्दू गझल गायकीचा शहेनशहा मेहदी हसन...


    आज जगप्रसिद्ध गझल गायक मेहदी हसन खान साहेबांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) आहे. त्यांचा  जन्म १८ जुलै १९२७ ला भारतातील झुंझुनू जिल्ह्यातील लुना या राजस्थातील एका गावात व मृत्यू १३ जून २०१२ ला पाकिस्तानातील कराचीमध्ये झाला.विभाजनाचे वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झाले होते.वडील उस्ताद अझीम खान व काका उस्ताद इस्माईल खान परंपरागत धृपद गायक होते.त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तातच वंशपरंपरेने आले होते.खान साहेबांच्या पंधरा पिढ्या संगीताशी जोडलेल्या होत्या.म्हणजेच खान साहेब सोळाव्या पिढीतील गायक होते.वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या बंधुसोबत त्यांनी धृपद व ख्याल गायन सादर केले.

शास्त्रीय,उपशास्त्रीय व गझल गायनात त्यांचा हातखंडा होता.त्यांचा पाकिस्तान टीव्ही वरील पहिला कार्यक्रम १९५२ मध्ये झाला."नजर मिलते ही दिल की बात का चर्चा ना हो जाए" हे त्यांचे चित्रपटातील पहिले गाणे होते.चित्रपट होता 'शिकार',कवी यजदानी जालंधरी, संगीतकार असगर अली व एम हुसेन.

     तसेच चित्रपटातील पहिली गझल होती "गुलों में रंग भरे बादे नौबहार चले" शायर फ़ैज अहमद फ़ैज,संगीत राशीद यांचे.

    लता मंगेशकरांसोबत त्यांची दोन गाणी आहेत.एक मदन मोहन यांच्या संगीत दिगदर्शनाखाली गायिलेले 'नैनो में बदरा छाए' मधील एक अंतरा आणि मेहदी हसन यांनी संगीत दिलेल्या 'सरहदें' या अल्बम मधील 'तेरा मिलना बहुत अच्छा लगता है'

दोन्ही गाण्यांची लिंक...

१. https://youtu.be/ad6Scios6zc

नैनो में बदरा...

२. https://youtu.be/Do9Q7TwHoCA

तेरा मिलना बहुत अच्छा...

         जगभर उर्दू गझल गायन लोकप्रिय करणारा हा कलावंत आयुष्याच्या शेवटापर्यंत गात राहिला.आपल्या संपूर्ण आयुष्यात ठुमरी/गीत/गझल अश्या ५४ हजार रचना ते गायिले.जवळ जवळ साठ वर्षे आवाज सांभाळून त्याच दमाने गात राहणे तोंडाचा खेळ नाही.

      त्यांच्या या सांगीतिक कार्याबद्दल पाकिस्तान सरकारने त्यांना 'तमगा-ए-इम्तियाज','प्राईड ऑफ परफॉर्मेन्स',

'हिलाल-ए-इम्तियाज' तसेच भारत सरकारने 'सहगल अवार्ड' देऊन सन्मानित केले आहे.

     खान साहेबांचा शिष्यवर्ग पण छोटा नाही.त्यात प्रामुख्याने परवेज मेहदी,तलत अजीज,राजकुमार रिजवी,गुलाम अब्बास,सलामत अली,अफजल,मुन्नी सुभानी, रेहान अहमद खान,सविता आहुजा,शमशाद हुसेन चांद, शहनवाज बेगम (बांगला देश),यास्मिन मुश्तरी (बांगला देश) आणि हरिहरन ही नावे येतात.

           त्यांचे गझल गायन म्हणजे शब्द-सुरांची अप्रतिम उधळण असायची."दिल की बात लबों पर लाकर, अब तक हम दुख सहते थे" हबीब जालीब यांची ही गझल काफी थाटावर आधारित आहे.पण त्यातीलच "बीत गया सावन का महिना मौसम ने नजरे बदली" हा शेर गाताना मध्यमाला षड्ज करून पहाडी रागाच्या स्वरांनी 'सावन'चा इतका मस्त फिल दिला की,कितीही ऐकले तरी समाधान होत नाही.....क्या बात हैं!

    मुजफ्फर वारसीची "क्या भला मुझको परखने का नतीजा निकला" या गझलची बंदिश मालकौंस रागात आहे.पण पुढे शेरात दोन्ही गांधार,दोन्ही निषादाचा प्रयोग करुन  केलेला अविर्भाव-तिरोभाव अतिशय मनभावन आहे.मालकौंस राग कुठे सोहनी राग कुठे,पण हे स्वरांचे धनुष्य पेलून प्रत्यंचा चढवलीच...

         अहमद फराज यांची '"अब के हम बिछडे" ही गझल व बंदिशही तशीच...या सुरावटीचा मोह हृदयनाथ मंगेशकरांसोबतच मलाही पडला.व "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग,राजसा किती दिसात लाभला निवांत संग" ही सुंदर रचना हृदयानाथांनी व "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,कळते मला अरे हा माझा वसंत नाही" ही गझल मी स्वरबद्ध केली.

    रईस खान साहेबांनी भैरवी रागात स्वरबद्ध केलेलं चित्रपटातील गीत "मैं खयाल हूँ किसी और का,मुझे सोचता कोई और है" जेव्हा कार्यक्रमात गातात तेव्हा त्यातील "सुबहो न मिल सकी" या ओळींवर ललित रागाच्या स्वरांची पखरण करतात तेव्हा जाणकारांच्या अंगावर रोमांच उठतो.ती आर्तता काळजात सरळ घुसते.

      "कभी मेरी मुहब्बत कम न होगी,लुटाने से दौलत कम न होगी" या पाकिस्तानी चित्रपटातील गीतावर बेतलेली खमाज रागातील "मुहब्बत करने वाले कम न होंगे,तेरी महफिल में लेकिन हम न होंगे" ही ठाय लयीतील गझल अफलातूनच आहे.यातील "जमाने भर के गम" या शेरात मिया मल्हारची झलक दाखवणारी सुरावट,"अगर तू इत्तेफाकन मिल भी जाए" या शेरात केलेली विविध रागांच्या स्वरांची उधळण अतिशय रंजक आहे.

      मेहदी हसन यांनी जितक्या विविध रागात गझल गायिल्या तितक्या इतर कुणी गायिल्याचे दिसत नाही.(थोडा अपवाद गुलाम अली).

● गुलों में रंग भरे... झिंझोटी.

● शोला था जल बुझा हूँ...किरवाणी.

● एक बस तू ही नहीं...मियाँ मल्हार.

● ज़िंदगी में तो सभी प्यार किया करते है...भीमपलासी.

● दिल की बात लबों पर लाकर... बागेश्री.

● दिल में अब तेरे भुले हुए गम याद आते है...भूपाल तोडी

● मैं होश मे था...,   

    फिर उस जुल्फ की बात    चली...चारुकेशी.

● आपको भूल जाये हम इतने तो बेवफा नहीं...,

    इन कदर मस्तम् (फारसी)... सिंधभैरवी.

● ताजा हवा बहार की दिलका मलाल ले गयी... जैजवंती.

● जीना पडा है मौत की सूरत न पूछिए...बसंत मुखारी.

● दिल-ए-नादां तुझे हुवा क्या है...शुद्ध सारंग.

● रौशन जमाले यार से है अंजुमन तमाम...पटदीप.

● दुनिया किसी के प्यार में जन्नत से कमी नहीं... भूप.

● कोंपले फिर फूट आए...सारंग.

● कू ब कू फैल गई बात... दरबारी.

● मै खयाल हूँ किसी और का...भैरवी.

● रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामां हो गये...काफी थाट.

● जब उस जुल्फ की बात चली...बसंत मुखारी.

● बात करनी मुझे मुश्किल...पहाडी.

● ये मौजज़ा भी मोहब्बत कभी दिखाए मुझे...मधकौंस

   (जोग)

● रंग पैराहन का खुशबू जुल्फ लहराने का नाम...

   सा ग तीव्र म प कोमल नि सां

   सां कोमल नि प तीव्र म ग रे सा

● जो चाहते हो वो कहते हो...नट भैरव

● फूल ही फूल खिल उठे है मेरे पैमाने मे...गौडमल्हार.

● इक खलिश को हासिले उम्रे रवां...दहा थाटात न बसणारी सुरावट.

● मेरी तरहा सरे महफिल उदास था वो भी...कल्याण     थाटावर आधारित.

● मेरी आहों में असर है के नहीं देख तो लू...जनसंमोहिनी.

● तेरी खुशी से अगर गम मे भी खुशी न हुयी...मधुवंती.

● मोहब्बत करने वाले कम न होंगे...खमाज.

● बहुत बुरा है मगर...ललित.

● यूँ न मिल मुझसे खफा हो जैसे...बिलावल आणि     लखनवी भैरवी.

● तेरी महफिल से ये दिवाना चला जायेगा...शिवरंजनी

● देखे भाले दोस्त हमारे ये जाने पहचाने लोग... रागेश्री.

● रंजिश ही सही... यमन.

● गो जरासी बात पर बरसों के याराने गये...दहा थाटात न बसणारी सुरावट.

● अबके हम बिछडे....भुपेश्वरी.

●  जब तेरे नैन मुस्कुराते है... भारतीय संगीत पद्धतीच्या दहा थाटात न बसणारी सुरावट.


पुढे खान साहेबांच्या गायकी विषयी त्यांच्याच तोंडूनच ऐका...

मुलाखतीची लिंक

https://youtu.be/KBscPu-iXt4

--------------------------------------------------------------------------

    दैनिक उद्याचा मराठवाडा,मंगळावर दि.१३ जून २०२३



 


 





संगीत आणि साहित्य :