गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, May 20, 2023

राग बागेश्री...



    सखी मन लागे ना'...एकदम संगीत विद्यालयातील विद्यार्थी दशेतील 'ते' दिवस आठवले.हा बागेश्रीतील मोठा ख्याल व 'कौन गत भई' छोटा ख्याल इतकेच...त्या वेळी ख्यालातील शब्दांचा अर्थ कळण्याचे दिवस नव्हते.अर्थ समजावून सांगण्याची गरज वाटणारे शिक्षकही नव्हते.आणि समजा समजावून सांगितला तरी तो कळण्याचे वय पण नव्हते. दुसऱ्या परीक्षेला बसणाऱ्या कुमार वयातील मुलाला 'सखी मन लागे ना' कसे कळणार?
    जेव्हा संगीतकार म्हणून मी काम करायला लागलो तेव्हा मला बागेश्री रागाचा आवाका कळला. मला बागेश्री राग एखाद्या एकत्र कुटुंबातील आबालवृद्धांचे लाड पुरविणाऱ्या कुटुंब प्रमुखासारखा वाटतो.पाण्याचे जसे आहे ना? 'जिस मे मिलाओ वैसा',तसे बागेश्री रागाचे आहे.कोणत्याही 'रसा'तील गाणे असो वा शास्त्रीय संगीतातील गायक/वादक असो. तो त्यांच्याशी एकरूप होणारच.ज्यांचा जसा वकूब असेल तसा बागेश्री आपल्या समोर येतो.किशोरी आमोणकरांचा बागेश्री व्याकुळ करतो.अमीर खां साहेबांचा बागेश्री गंभीर वाटतो.बडे गुलाम अली खां साहेबांचा बागेश्रीमधील तराणा खासच आहे.मध्य/द्रुत लयीतील सरगम ऐकणीय आहे.पंडित जसराजांचा बागेश्री सरगमसह केलेल्या स्वरांच्या भरावामुळे अगदी वेगळा भासतो.कौशिकीने गायिलेला बागेश्री लडिवाळ वाटतो.उस्ताद राशीद खान यांचा बागेश्री घरंदाज वाटतो. पंडित व्यंकटेश कुमारांच्या बागेश्रीत आळवणी दिसून येते.जावेद बशीरने गायिलेल्या बागेश्रीत विनवणी दिसते. कुमार गंधर्वांचा बागेश्री श्रोत्यांना झुलवत ठेवतो.अश्विनी भिडे,वीणा सहस्रबुद्धे,ऋजुल पाठक,गणपती भट,मंजुषा पाटील,पंडित राजन-साजन मिश्र,ओंकार दादरकर,विलियम डे,फरीद हसन-मोहम्मद अमन (जुगलबंदी), विघ्नेश ईश्वर (कर्नाटक),एम.डी. राजनाथन (कर्नाटक) या प्रत्येकाने गायिलेला बागेश्री वेगवेगळी अनुभूती देतो.
    
    पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीतून निघणारे बागेश्रीचे स्वर आर्त वाटतात.पंडित रविशंकर आणि उस्ताद अल्लारखां यांची धमार तालातील बागेश्रीची जुगलबंदी,उस्ताद राशीद खान (सितार), डॉ.एम.राजन (व्हायोलिन),एम.कार्तिकेयन (नागस्वरम) ,रामन बालचंद्रन (वीणा), राकेश चौरसिया (बासरी),  उस्ताद विलायत खान (सितार),अभिषेक बोरकर (सरोद),पुर्बयान चॅटर्जी (सितार) अत्यंत श्रवणीय आहे.मला वाटते बहुतेक गायक/वादकांनी कधी ना कधी बागेश्री राग गायीला/वाजविला असेलच.
    हा राग काफी थाटातून उत्पन्न झाला असून यात गांधार व निषाद स्वर कोमल व बाकी स्वर शुद्ध आहेत.वादी मध्यम,संवादी षड्ज.आरोहात रिषभ पंचम वर्ज असल्यामुळे जाती औडव-संपूर्ण आहे.रात्री गायिल्या जाणाऱ्या भावपूर्ण रागात याची गणना होते.
    ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीत गायक/वादकात हा राग प्रिय आहे.त्यापेक्षाही चित्रपट व सुगम संगीतामध्ये संगीतकारांचा आवडता आहे हे खालील उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.पण ज्या प्रकारे नियमानुसार राग शुद्धता शास्त्रीय संगीतामधील गायक/वादक पाळतात तशी शुद्धता काही अपवाद वगळल्यास इतर गायन शैलीत पाळल्या जात नाही.
    ●हिंदी ...
    'कैसे कटे रजनी',बंगाली चित्रपट 'शुदिस्ता पाशन' गायक अमीर खान.'चाह बरबाद करेगा' चित्रपट-शाहजहान.'जाग दर्दे इश्क जाग' चित्रपट-अनारकली.'फिर वोही शाम' चित्रपट-जहाँआरा.'हम से आया न गया' चित्रपट-देख कबीर रोया. 'आजा रे परदेसी',घडी घडी मोरा दिल धडके' चित्रपट-मधुमती.'राधा ना बोले ना बोले ना बोले रे' चित्रपट-आझाद.'दूर रहकर न करो बात करीब आ जाओ' चित्रपट-अमानत.'आओ आओ नंद के लाला' चित्रपट-रंगोली.'बेदर्दी दगाबाज' चित्रपट-ब्लफ मास्टर.'माई री मैं का से कहूँ'(बागेश्री/मालगुंजी)चित्रपट-दस्तक.'सांवली सलोनी तेरी झील सी आंखे' चित्रपट-हम सब चोर है.'अब घर आ जा' चित्रपट-हासिल.'मेरा चांद मुझे आया है नजर' चित्रपट-ये है मुंबई मेरी जान.'ऐसा क्यूँ होता है' चित्रपट-इश्क विश्क.'कहना ही क्या' चित्रपट-बॉंबे.'चाहतों का सिलसिला' चित्रपट-शब्द.'भरे नैन' चित्रपट-रा.वन.'फिर छिडी रात बात फूलों की' चित्रपट-बरसात १९८२.'सीने मे जलन' चित्रपट-गमन.
    ●उर्दू गझल...
    'कैसे कैसे लोग हमारे दिल को जलाने आ जाते है','दिल की बात लबों पर लाकर अब तक हम दुख सहते है','एक नये मोड पे ले आये है हालात मुझे'-मेहदी हसन.'चमन में रंगे बहार उतरा','दर्दे दिल दर्दे आशना जने'-गुलाम अली,'तुम नहीं गम नहीं शराब नहीं','अब कोई बात भी मेरी'-जगजीत सिंह.
    ●मराठी...
    'केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर','रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले'-सुमन कल्याणपूर.'ओळखिले मी तुला','कंठातच रुतल्या ताना','जय शारदे वागेश्वरी','नाम घेता तुझे गोविंद',वनवास हा सुखाचा','तरुण आहे रात्र अजुनी'-आशा भोसले.'घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा'-लता मंगेशकर.'पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी'-पं. जितेंद्र अभिषेकी.'माझा भाव तुझे चरणी'-पं. भीमसेन जोशी.
    ●नाट्यगीते...
    'प्रेम नच जाई','आता रंग देई मना','प्रियकर वश मजला'-बाल गंधर्व.'बहुत दिन नच भेटलो सुंदरीला'-छोटा गंधर्व.'धवल लौकिका'-प्रभाकर कारेकर.'घुमत ध्वनी का हा'-शरद जांभेकर.

     मी नुकतेच माझे एक गीत बागेश्रीमध्ये स्वरबद्ध केले.माझा एक जिवलग मित्र कोविड काळात निघून गेला तेव्हा सुचलेली ही रचना मयूर महाजन या युवा गायकाने गायिली आहे. युट्युबच्या 'गीत-गझलरंग' या चॅनलवर आपण ही रचना ऐकू शकता.शब्द आहेत...

कशी वेदना विसरायची...सांग मला तू
कशा सावरू अश्रू धारा...सांग मला तू

आनंदाचे सोंग करावे लागत नाही
या दुःखाचे काय करावे...सांग मला तू

गुन्हा असा की अजाणता मन गुंतत गेले
कसे सोडवू या गुंत्याला...सांग मला तू

काळोखाच्या दरीत मन हे घुसमटलेले
कसा दूर अंधार करावा...सांग मला तू
   
किती अनोखे असे बंध हे शतजन्माचे
का सलतो हा रोज दुरावा...सांग मला तू
  
 "कशी वेदना..." युट्युब लिंक...
https://youtu.be/IF-nDzQssEg


 

वेदनेचा सूर...नवीन अलबम लवकरच रसिकांच्या सेवेत...


 

Sunday, May 14, 2023

दरबारी कानडा



     दरबारी कानडा हा राग नायकी,शहाणा,सुघराई, सुहा, कौशी,अभोगी,हुसेनी या कानडा प्रकारातीलच एक राग आहे.प्राचीन राजदरबारात हा प्रकार जास्ती गायिल्या गेल्यामुळे ह्याला दरबारी कानडा म्हणत असावे.प्राचीन ग्रंथात दरबारी कानडा या रागाचा उल्लेख सापडत नाही.याचा उल्लेख मध्यकालीन म्हणजे मोगल काळातील साहित्यामध्ये सापडतो.आजची प्रचलित संगीत पद्धती व प्राचीन संगीत पद्धतीमध्ये बराच फरक आहे.या फरकाचे थोडे -फार आकलन भरत मुनींचे 'नाट्यशास्त्र', मतंग मुनींचे 'बृहद्देशी', पंडित शारंगदेवांचे 'संगीत रत्नाकर' या प्राचीन ग्रंथांमधून होते.
     उत्तर भारतावर जस-जशी परकीय आक्रमणे होत गेली.तस-तसा मूळ भारतीय संगीतावरही ज्या ज्या विभागातून आक्रमणकारी येत गेले त्या त्या विभातील संगीताचा थोडा-फार परिणाम होत गेला.मात्र सगळ्यात जास्ती परिणाम  'खिलजी'च्या कालखंडात भारतात आलेल्या कवी/संगीततज्ज्ञ अमीर खुसरो (जन्म १२५३,मृत्यू १३२५) यांच्यामुळे झाला.उत्तर भारतीय संगीतामधील त्यांचे योगदान खूप महत्वाचे मानले जाते.खुसरो हे पहिले मुस्लिम कवी होते,ज्यांनी त्यांच्या काव्यात हिंदी शब्दांचा मोकळेपणे वापर केला.भारतीय भाषेसाठी 'हिंदवी' हा शब्द सर्वप्रथम त्यांनी वापरला.हिंदवी व फारसी भाषा एकत्र घेऊन केलेल्या कवितांमुळे त्यांना 'खडी बोली'च्या अविष्काराचे श्रेय दिल्या जाते.संपूर्ण आयुष्य राजाश्रयात घालविणाऱ्या खुसरोंनी साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातही भरीव योगदान दिले.भारतीय आणि इराणी रागांचे सुंदर मिश्रण करून 'ज़िल्फ़' (झिलफ),'साजगिरी' वगैरे रागांना जन्म दिला.तसेच 'कव्वाली' (सुफी भक्ती गायन शैली), 'सतार', 'तबला' ही त्यांचीच देण मानतात.आजही गायिल्या जात असलेली खुसरोची लोकप्रिय गीते खाली देत आहे.
     
१) ऐ री सखी मोरे पिया घर आए
२) परदेसी बालम धन अकेली मेरा बिदेसी घर आवना 
३) मेरे महबूब के घर रंग है री 
४) छाप तिलक सब छीन्हीं रे 
५) बहुत कठिन है डगर पनघट की
६) आ घिर आई दई मारी घटा कारी
७) ज़िहाल-ए मिस्कीं मकुन तगाफ़ुल
८) दैया री मोहे भिजोया री शाह निजम के रंग में
९) सकल बन फूल रही सरसों 
१०)तोरी सूरत के बलिहारी, निजाम
११)अम्मा मेरे बाबा को भेजो री 
१२)बहोत रही बाबुल घर दुल्हन 
१३)दुसुख़ने
१४)जब यार देखा नैन भर
१५)मोरा जोबना नवेलरा भयो है गुलाल
१६)ढकोसले या अनमेलियाँ 
१७)जो पिया आवन कह गए अजहुँ न आए 
१८)बहुत दिन बीते पिया को देखे 
१९)काहे को ब्याहे बिदेस 
२०)हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल 
२१)जो मैं जानती बिसरत हैं सैय्या 

    या कालखंडानंतर मुख्यपणे विचार करावा लागतो तो ग्वाल्हेरचे राजा मानसिंह तोमर यांच्या काळाचा.१४८६ ते १५१५ हा तो काळ. राजा मानसिंह स्वतः एक साहित्यिक व संगीततज्ञ होते.त्यांनी अनेक दोहे,चौपाया, कवितांसोबत अनेक छंदांची रचना केली.'मान कौतूहल' नामक ग्रंथामध्ये तत्कालीन धृपदांचा संग्रह केला.या 'मान कौतुहल'चे फारसी भाषांतर फकीरुल्ला सैफ खाँ यांनी केले. मानसिंगांची पत्नी मृगनयनी ही सुद्धा संगीत प्रेमी व संगीताची जाणकार होती.(मी स्वतः गुजरी महालाला भेट दिली तेव्हा त्यांचा संगीत कक्ष पाहिला.)मानसिंहांच्या दरबारात त्या काळातील प्रसिद्ध साहित्यिक व संगीतकार बक्शू, महमूद लोहंग, नायक पांडे, देवचंद्र, रतनरंग, माणिक कवी, गोविंदास, नाभादास, हरिदास,कर्ण,गोपाल नायक,भगवंत,रामदास वगैरे वगैरे.'भक्तमाल' नावाचा ग्रंथही याच काळात लिहिल्या गेला. त्यांनी सावंती,लीलावती,षाडव,
मानशाही,कल्याण आदी रागांमध्ये गीत रचना केल्या.अगदी सुरवातीच्या काळात तानसेन व बैजू बावरा यांचे दरबारी गायक असल्याची नोंद आहे.यानंतर काही काळ मियाँ तानसेन  रेवा संस्थानचे दरबारी गायक होते.त्यानंतर ते अकबराचे दरबारी गायक बनले.मियाँ तानसेन संगीत सम्राट होते.त्यांनी अनेक धृपदांची निर्मिती करून त्यात रागांची विशेषता सांगितली आहे.संगीताचे पारिभाषिक शब्द जसे:-ग्राम,श्रुती,मूर्च्छना,सप्तक,स्वरअसे सांगीतिक शब्द घेऊन "सप्त सूर तीन ग्राम" अशा रचना केल्या.सतत राजदरबारात गायिल्या गेलेल्या या कानडा प्रकाराला दरबारी कानडा हे नाव पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा राग जितका राजे-रजवाड्यांना आवडायचा तितकाच सर्वसामान्यांनासुद्धा आवडायचा,अजूनही आवडतो.

     थोडे विषयांतर झाले,पण हा इतिहास सांगणेही गरजेचे होते...कारण दरबारी राग मियाँ तानसेनाने लोकप्रिय केला असे म्हटल्या जाते म्हणून. असो! तर आपण पुन्हा येऊ या दरबारी कानडा या रागावर...
प्राचीन काळी 'कर्णाट' नामक राग प्रचलित होता.त्याचाच अपभ्रंश कानडा, कान्हडा झाला असे पंडित भावभट्ट म्हणतात.१५५० च्या राजस्थानी चित्रकलेतही याचा उल्लेख असल्याचेही कळते. तोच धागा पकडून पंडित भातखंडे यांनीही एका श्लोकात तसा उल्लेख केला आहे...
     
     "अपभ्रंशस्तु कर्णाटशब्दस्य कानडा जने /
      दरबारीति यवनैर्गीतावाद्राजसंसदि...//"

(याची उत्पत्ती कर्नाटक संगीतामधून झाल्याचाही एक प्रवाद आहे.कर्नाटकातील 'यक्षगान' राजनृत्यात राग 'कणाद' म्हटल्या जातो.त्यावरून कानडा शब्द आल्याचे सांगितल्या जाते.)

    तर असा हा दरबारी राग आसावरी थाटातून उत्पन्न झाला असून यात गांधार,धैवत,निषाद हे स्वर कोमल व बाकी स्वर शुद्ध आहेत.हा राग मध्यरात्री गायिल्या जातो.
    
    "ऋषभ: सम्मतो वादी, संवादी पंचम मत: /
     गानं सुनिश्चितं चास्य तृतीय प्रहरे निशि...//"
                                       -पंडित भातखंडे
                                    
अवरोह वक्र असून कोमल गांधार व कोमल धैवतावरील आंदोलने हे दरबारीचे खास वैशिष्ठय आहे.हा तसा 'अडाणा' व 'जौनपुरी' या रागांना जवळचा आहे.बहुतेक शास्त्रीय गायक/वादकांनी गायिलेल्या,वाजविलेल्या दरबारी कानडा या रागाची लोकप्रियता पाहून , हा कानडा प्रकाराचा राजा आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.उस्ताद अमीर खान,पंडित जसराज,पंडित भीमसेन जोशी यांनी गायिलेला दरबारी मला विशेषकरून आवडलेला आहे.गंभीर प्रकृती असलेला हा राग आपणास ऐकताना वेगळ्याच विश्वात घेऊन जातो.हा राग जितका शास्त्रीय गायक/वादकांमध्ये प्रिय आहे तितकाच चित्रपटातील संगीतकारांचा व गझल गायकांचाही प्रिय आहे.हे खालील उदाहरणांवरून लक्षात येईल.
     'हम तुम से मोहब्बत कर के सनम रोते ही रहे'...मुकेश. चित्रपट-आवारा, 'दिल जलता है तो जलने दे'...मुकेश. चित्रपट-पहली नजर, 'तोरा मन दरपन कहलाए'...आशा भोसले, चित्रपट-आशा.'ओ दुनिया के रखवाले'...रफी,चित्रपट-बैजू बावरा.'मैं निगाहे तेरे चेहरे से हटाऊ कैसे'...रफी,चित्रपट-आप की परछाईयां.'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है'...चित्रपट-शहीद.'तू प्यार का सागर है'...रफी,चित्रपट-सीमा.'कोई मतवाला आया मेरे द्वारे'...लता,चित्रपट-लव्ह इन टोकियो.'मुझे तुम से कुछ भी न चाहिए'...मुकेश,चित्रपट-कन्हैय्या.'याद में 'तेरी जाग जाग के हम'...रफी-लता,चित्रपट-मेरे मेहबूब.'टूटे हुए ख्वाबों ने'...रफी,चित्रपट-मधुमती.'उड जा भंवर माया कमल'...मन्ना डे, चित्रपट-रानी रुपमती.'झनक झनक तोरी बाजे पायलिया'...मन्ना डे, चित्रपट-मेरे हुजूर.'मोहब्बत की झुटी कहानी पे रोए'...लता,चित्रपट-मुगले आजम.'गुजरे है आज इश्क मे हम उस मकाम से'...रफी,चित्रपट-दिल दिया दर्द लिया.'तेरी दुनिया मे दिल लगता नहीं'...मुकेश,चित्रपट-बावरे नैन.'अब कहां जाए हम'...मन्ना डे, चित्रपट-उजाला.'रहा गर्दीशों मे हरदम'...रफी,चित्रपट-दो बदन.'अगर मुझसे मोहब्बत है'...लता, चित्रपट-आपकी परछाईयां.'है इसी मे प्यार की आबरु'...लता,चित्रपट-अनपढ.'बहुत प्यार करते है तुमसे सनम'...अनुराधा पौडवाल, चित्रपट-साजन.
     काही हास्यरसाची गाणी पण दरबारीमध्ये आहेत...
     'प्यार की आग मे तन बदन जल गया'...'लपक झपक तू आ रे बदरवा'...मन्ना डे, चित्रपट-जिद्दी.
     
     काही उर्दू गझला...
'मेरे हमनफस मेरे हमनवा'...बेगम अख्तर.
'कू-ब-कू फैल गयी बात शनासाई सी'...मेहदी हसन.'चोरी कहीं खुले ना नसीमे बहार की'...मुख्तर बेगम.'दिले मुझतरीब को समझाया बहोत'...फरीदा खानम.'हंगामा है क्यो बरपा'...'मैं नजर से पी रहा हूँ'...गुलाम अली.'चाहत मे किया दुनियादारी'...गुलबहार बानो.'कुछ होश भी है दस्ते जुनू देख क्या हुवा'...जगजीत सिंह.

     मराठीत त्या मानाने गाणी नसल्यातच जमा आहे.'दिनरात तुला मी किती स्मरू'...(भावगीत) सुमन कल्याणपूर.'तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा'...हे लताने गायिलेले व दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेले भावगीत.
आणि 'रजनीनाथ हा नभी उगवला'...छोटा गंधर्व,(छोटा गंधर्वांचा विदर्भात कार्यक्रम असला की मला हार्मोनियमच्या साथीला घ्यायचे.त्यामुळे त्यांनी चित्रपटासाठी गायिलेले 'रजनीनाथ' मला प्रत्यक्ष त्यांचे तोंडून ऐकण्याचे सौभाग्य लाभले.) 'मृगनयना रसिक मोहिनी'...वसंतराव देशपांडे.
     वरीलपैकी काही गाणी/गझला दरबारी रागात तर काही दरबारी रागावर आधारित आहेत.वरील गीत/गझलांचा सर्व ठेवा युट्युबवर उपलब्ध आहे.आवडेल ते ऐकावे.
     तरी पण उर्दू गझलमधील शकील बदायुनी यांची संगीतकार खैय्याम यांनी स्वरबद्ध केलेली 'मेरे हमनफस मेरे हमनवा' ही बेगम अख्तर यांनी गायिलेली गझल इतकी लोकप्रिय झाली की सुरावट तीच ठेवून अनेक गायक/गायकांनी आपापल्या परीने मूळ पद्धतीने व आधुनिक पद्धतीने गायिली आहे.यात फरीदा खानम,प्रतिभा सिंह बघेल,अली सेठी,किरण शुक्ला, कुमार शर्मा,आसिफ अली,सखावत खान, महिरी बोस, मुहम्मद अली खान,सारा रजा खान,संगीता बॅनर्जी,माधव अग्रवाल, विधी शर्मा,श्रुती पाठक, अली रजा हे कलाकार आहेत.बेगम अख्तर नंतर यातील मला भावलेली गायिका म्हणजे 'फरीदा खानम'!
(तीच ती...'आज जाने जी जिद ना करो' गाणारी.) फरीदा खानमचा बाजच आगळा वेगळा आहे.ऐकून बघा,नक्की आवडेल.
https://youtu.be/wFpK90fPA3A
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.१४ मे २०१२३


 

Thursday, May 11, 2023

जेव्हा मला कळेना...#गझलगंधर्व


 

स्वरलयीचा गुलमोहर...राम जोशी.



     सुधाकर कदम म्हणजे सांगीतानंदात रममाण झालेले व्यक्तिमत्व. त्यांनी आर्णी येथील संगीताच्या प्रांगणात लावलेल्या संगीत विद्यालयास पंचवीस वर्षे एवढा दिर्घ कालावधी लोटला. म्हणजेच हे (१९९९) रौप्य महोत्सवी वर्ष.त्यानिमित्त त्यांचा गौरव व विविध कार्यक्रम केले जात आहेत ही गोष्ट आनंददायी आहे.

     संगीताच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा हा गौरव करणे समाजपुरुषाचे कर्तव्य आहे.यानिमित्त त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचे सिंहावलोकन होत असते, त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते,मार्गदर्शन  होत असते.

     मी कोल्हापूरसारख्या,विदर्भापासून खूप दूर असलेल्या गावी राहणारा. पण त्यांची भेट सहवास काही काळापूरताच लाभला.पण तेवढ्या थोडक्या सहवासांनी आम्ही मनोमन एकत्र आलो व दोघात निखळ मैत्री निर्माण झाली.त्याचे असे झाले,१९८२ मध्ये कविश्रेष्ठ सुरेश भटांच्या कविता गझल सादर करण्यासाठी कदमांनी महाराष्ट्र पादाक्रांत केला.त्यावेळी त्यांचा कार्यक्रम कोल्हापूरला रसिकांच्या उपस्थितीत झाला.मला निमंत्रण होते,कार्यक्रम चांगला झाला,मी चांगलाच प्रभावित झालो.

      सुरेश भटांच्या गझलांची नवलाई,अनुरूप स्वररचना व खास पद्धतीची पेशकस. तशात तबल्याच्या साथीला हैदराबादच्या उस्ताद शेख दाऊद खान यांचे शिष्य शेखर सरोदे तर सारंगीवर उस्ताद लतीफ अहमद खान साहेब.असा हा सांगीतिक योग्य जुळून आला.पुढे पुढे जाऊन ओळख करून घेणे हा माझा स्वभाव नसल्यामुळे भेट घेतली नाही.पण हा कलाकार आणि त्यांनी गायिलेल्या गझला मात्र मनात कायमच्या घर करून राहिल्या.'सूर्य केव्हच अंधाराला यार हो,या नवा सूर्य आणू चला यार हो' हे हृदयाला भिडणारे विद्रोही काव्य,'चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही', ही हळुवार मलमली गझल यांच्या प्रेमातच पडलो.या कलाकाराची प्रत्यक्ष भेट व्हावी असे मनोमनी वाटायचे आणि तो योग जुळून आला.सुमारे एक तपानंतर शिवाजी विद्यापीठ संगीत विभागात मी मानद अध्यापक म्हणून काम करीत होतो.तेव्हा (१९८८) सुगम संगीतासाठी कदमांची चार दिवसांनी कार्यशाळा ठेवली होती.त्या चार दिवसांच्या छोट्या कालावधीत आम्ही एकत्र आलो.खूप गाणी बजावणी झाली व बऱ्याच दिवसांची मनातली इच्छा पूर्ण झाली.स्नेहाचे भावबंध निर्माण झाले.कदमांनी या वेळी घरगुती कार्यक्रमात अनेक गीते व गझला मनसोक्त ऐकविल्या.त्यांच्या स्वररचना वैशिष्ठयपूर्ण व आकर्षक असल्याने त्याबाबत लिहावे असे सारखे मनात यायचे. तो योग त्यांनी स्थापन केलेल्या संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आला हा माझ्या दृष्टीने सुयोग आहे.भाग्ययोग आहे.

      सुधाकर कदम हे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे.ते शास्त्रीय संगीत गायक आहेत.संगीत शिक्षक आहेत.समाजकर्ते आहेत.लेखणीबहाद्दरही आहेत.पण त्यांचा माझा जो संबंध आला तो सुगम संगीत स्वररचनाकार व गायक म्हणून.त्यामुळे तद्विषयक त्यांच्या रसिल्या सांगीतिक व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.

      सुगम संगीत हा संगीताचा एक अनुपम व मनोहारी प्रकार.नाव जरी सुगम असले तरी जाता जाता सहजी आत्मसात करावे इतके ते खचितच सुगम नसते.उलट दुर्गमच असते.शब्दप्रधान गायकीच्या ह्या प्रकाराला शब्द हे प्राणतत्व तर स्वर हे माध्यम.पहिला मान काव्याचा.(पर्यायाने कविचाही.) त्यातल्या आशय, भाव-भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे हे कार्य संगीताचे असते.गीताच्या आशयाची अभिव्यक्ती संगीतातून होणे अपेक्षित असते. किंबहुना काव्य बोलते करणे हे संगीतकाराने काम.यासाठी सुगम संगीतात काव्याचा आशय,विषय व भावना याची उत्तम जाण स्वररचनाकाराला असणे जसे आवश्यक, तितकेच महत्व काव्यानुकूल संगीत रचनेला;म्हणजे चाल लावण्याचा असते.सुधाकर कदम हा काव्याची उत्तम जाण असणारा संगीतकार असल्याने ते कवितेला अत्यंत पोषक व समर्पक असा स्वरसाज चढवून प्रत्येक कविता आपल्या संगीतरचनेने श्रीमंत करतात.स्वतः कवी असल्यामुळे 'जे न देखे कवी ते देखे रवी' या उक्तीला साजेसे स्वरचातुर्य त्यांच्याकडे आहे.

     शास्त्रीय संगीताचे व्यासंगी साधक असल्यामुळे कदमांच्या स्वररचनेचा पाया हा राग/रागिणीवर आधारित असणे स्वाभाविक आहे.त्यामुळेच त्यांच्या स्वररचना भारदस्त व दर्जेदार वाटतात.त्या चीप पॉप्युलॅरिटीच्या कॅटॅगिरीतल्या नव्हेत.स्वररचनेसाठी त्यांनी अनेक राग/रागिण्यांची मुक्तहस्त चंदनी बरसात केली आहे.शेकडो कवितांना स्वरांच्या चांदण्यात न्हाऊ घातले आहे.तथापि जागेच्या मर्यादेचे भान ठेवण्यासाठी काही निवडक गाणी व स्वररचनांचा आस्वाद घेणे रास्त ठरेल.

     यमन हा रागच असा की,कोणाही संगीतकाराने त्याच्या प्रेमात पडावे.कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत.प्रत्येक मूर्ती स्वतंत्र आहे.प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे,रंग आहे,रूप आहे,व्यक्तिमत्व आहे.

      कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात.

               सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी

                गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी...

      दादऱ्यातल्या या बंदीशीची यमनमधील ही रचना.अगदी साधी.सुगम संगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथे अपेक्षित असते ते श्रवणसौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथे शुद्ध यमन शोधण्याची धडपड करू नये.कारण तो यमन कल्याणाशी क्षणात दोस्ती करतो आणि दोन्ही मध्यमांच्या आशा हळुवार लगावांची प्रचिती आली की, उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच राहत नाही ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली आहे व घेतो आहे.

                   मी असा त्या बसरीचा सूर होतो

                    नेहमी ओठांपुनी मी दूर होतो...

      या गझलची चालही अशीच आहे.ध्रुवपदातली (मतल्यातली) दुसरी ओळ (ज्याला क्रॉसलाईन म्हणतात)  तिची ठेवण व स्वरसमूहाची रचना अत्यंत मोहक आहे.त्यातील 'सूर होतो' इथं तारसप्तकातला षड्ज सूर ह्यासाठी तारषड्जाचा हळुवार पण भरीव लागाव व रूपक तालाचा एक पूर्ण जादा आवर्तन जो दीर्घ कसलं मुक्काम ठेवतो तो अतिसुंदर लागतो.संगीत रचनाकाराकडे नुसता सांगीतिक अलंकारांचा साठा असून चालत नाही तर स्वरपोशाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो.

      संगीतकार हाच खऱ्या अर्थाने रचना समर्थपणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो.हा अनुभव मास्तर कृष्णराववांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, रासम कदम, यशवंत देव यांच्यापर्यंत येतो.सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत. 'सूर होतो' इथं शब्दकला आणि स्वरमाधुर्य असा सुरेख समन्वय झालाय.

     सांज घनाच्या मिटल्या ओळी' हे अतिशय हळुवार भावना उलगडून दाखविणारे सरस काव्य, कदम यांनी बंदिशही यमनमध्येच बांधलीय. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस 'क्षितिजावरती' इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा कॅरेकटरच बदललाय,असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे 'क्षितिज' या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्याय नाही हे त्वरित पटते.पुरीयाचे होणारे दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळे सुरेख जुळून आलेय.प्रसिद्ध कवी अनिल कांबळे यांच्या 'जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू,ऐन वेळी अशी काय करतेस तू' ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे.यमनमधील अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना,खेमट्याच्या अंगाने लागणारा दादऱ्याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही आशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे.सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास 'ऐन वेळी अशी काय' ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमूहरचना म्हणावयास हरकत नाही.'सामग, सामगधप' वगैरे. अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे.

     'तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही' ही सुद्धा यमन मधीलच रचना आहे.यमन ह्या एकाच रागातल्या चारही रचना त्यांनी मला एकापाठोपाठ एक ऐकवल्या पण खासियत अशी की; त्यात तोच तोचपणा नाही.स्वररचनेची पठडी ठरीव स्वरूपाची नाही.त्यात आहे पूर्णत: वेगळेपण,हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचे वैशिष्टय मानले जाते.

      सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला, ध्रुवपदाला खास महत्व आहे.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात.त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असते ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला.कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे.मुखड्याच्या चालीला अनुरुप अशी किंबहुना त्याचे सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करून अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते.तसे नसेल तर पूर्ण  चालच फसते.अनेक संगीतरचनांमध्ये हे दोष दिसतात.संगीतकाराला इथे आपली प्रज्ञा ओतावी लागते.सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणाऱ्या आहेत, म्हणूनच भावतात.कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते?,कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणे म्हणजे हळूच मधाचे बोट चाखण्यासारखे गोड मधुर असते.अर्थातच शेवटचे कडवे हे सर्वार्थाने हायलाईट असते.तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात.एकाच यमनाची ही विविध रूपे, विविध रंग, त्यांचा वेगवेगळा ढंग आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असे आमच्या भोवती टाकले की आम्ही स्वतः जाणकार असूनही फसलो. मग लक्षात आले की,ही यमनी फसवणूक होती,पण ही फसवणूक गोड होती.निर्भेळ होती,निर्मळ आनंद देणारी होती.तसे पाहू गेल्यास प्रत्येक संगीतकार अशी गोड फसवणूक करीत असतो.कारण त्याचा स्वतःचा असा एक बाज असतो.लाडका स्वरसमूह असतो आणि तो बहुसंख्य चालीत डोकावतोच किंबहुना त्यामुळेच संगीतकार कोण ते आपण ओळखत असतो, असे थोडेसे धाडसी विधान इथे नोंदवितो.या बाबी मिळूनच त्याची 'स्टाईल' बनत असते.सुधाकर कदमांची सुद्धा अशी एक खास स्टाईल आहे.पण त्यात कोण्या जानेमाने संगीतकाराची नक्कल किंवा अनुकरण नाही.त्यांचा बाज हा खुद्द त्यांचाच बाज आहे हे विशेष आणि तो अस्सलही आहे.

     'हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही/चेहरा गुलाबाचे झाकणे बरे नाही', 'आली हासत आज पहाट...मेंदी भरल्या', 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची/तापलेल्या अधीर पाण्याची', 'सूर्य केव्हाच अंधाराला यार हो' या चारही रचना वेगवेगळ्या भाव-भावनांच्या.प्रत्येक रचना अत्यंत रसरशीत आहे.सर्वच चाली प्रामुख्याने भूप या लोकप्रिय रागात बांधल्या आहेत. पण प्रत्येक स्वररचनेत मनोहारी वैचित्र्य व काव्याला पूर्ण न्याय दिला गेलाय.पैकी 'हे तुझे अशा वेळी' ही तर मास्टरपीस रचना मानावी लागेल.माझी स्वतःची तर ही अत्यंत प्रिय रचना आहे.

     यमनप्रमाणे या चारही रचनात भूप रागाच्या अनेक सौंदर्यस्थळांचे मुक्त व डोळे भरून दर्शन घडते.मोरांनी सप्तरंगी पिसांचा रंगीबेरंगी पिसारा फुलवावा त्याप्रमाणे भूप रागाचा भरगच्च फुलोरा सुधाकर कदमांनी विलक्षणरीत्या फुलविला आहे.त्यात यमनच्या निषादचा केलेला सुखद उपयोग, शब्दांची केलेली फेक, गझलच्या अंगांनी केलेली गायकी हे सर्व सविस्तर लिहिणे म्हणजे तो स्वतंत्र लेखाचा किंवा भाषणाचा विषय आहे, म्हणून इतकाच स्पर्श पुरेसा आहे.

     यमन, भूप, या सर्वमान्य लोकप्रिय रागांचा चातुर्यपूर्ण उपयोग करून कदमांनी सुंदर सुंदर रचना दिल्या. त्यातील सौंदर्यकण, सौंदर्यस्थळे निर्देशित करण्याचा प्रयत्न केला याखेरीज इतर अनेक रागात त्यांनी अशाच विपुल रचना मासिकांना दिल्या आहेत.त्या सर्वांचा रसास्वाद इथे नोंदविणे शक्य नाही.तरी 'आज मी जे गीत गातो', 'आम्ही असे दिवाणे', किंवा भूपश्री मधील 'कुठलेच फूल आता' आणि शिखराध्याय म्हणजे 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' ही सुरेश भटांची खास गझल या सर्वच गीत व गझलांना कदम यांनी अत्यंत सुरेल चाली देऊन सुधारसपान घडविले.

      संगीत रचनाकार, स्वतः गायक असणे हे भाग्याचे लक्षण.कारण तो आपल्या हृदयात घर करून राहिलेली चाल खऱ्या अर्थी समर्थ गळ्यातून श्रोत्यांच्या हृदयात पोचवितो.त्या अर्थाने कदमांच्या रचनाच भाग्यवान म्हणाव्या लागतील.कारण सुधाकर कदम हे स्वतः मुलायम आवाजाचे , शब्दनुसार गाणी प्रभावीरीत्या सादर करणारे गायक असल्याने त्यांच्या चाली व काव्याचे सोने होते.नेमक्या वेळी नेमक्या शब्दावर जोर देणे, जरूर तिथे हळुवार शब्दस्वर उच्चार, प्रसंगी स्वरांचा जोरदार लगाव, स्वरांवरील न्यास, ठेहराव याद्वारे ते आपले गायन अत्यंत प्रभावी करतात.ताल व सुरांवर त्यांचा चांगलाच काबू आहे.तळाच्या अंगाने सुटेख गीत मांडणी करतात.

     शास्त्रीय संगीताचा अभ्यास, रियाज व आवाज कमविला असल्यामुळे गाण्यातील भरदस्तपणा सहज नजरेत भरतो. सुगम संगीत गायक/गायिका स्वतः हार्मोनियमवादक असेल तर दुधात साखर असा योग असतो.वर्ज्य, विकृत, अशा बऱ्याचशा स्वरांना काबूत ठेवण्यासाठी व इन्स्टंट स्वरबदल करण्यासाठी हार्मोनियम अत्यंत उपयुक्त असते. सुधाकर कदमांचा हार्मोनियमचा हात अत्यंत तयार व सॉफ्ट आहे.गायनाच्या रंगतीत त्यामुळे निश्चितच भर पडते.कडव्यांमधील म्युझिक पिसेसब(इंटरल्युड) ते उत्तम प्रकारे वाजवितात.त्या रचनाही मेलोडीयस असतात.

     गायन करताना स्वर आलापी,स्वरविस्तार व सरगमचा रास्त वापर या बाबी गाणे नटविण्या-सजविणाऱ्यांसाठी हव्यातच.कदमांची सरगम मांडणी बहुत खुबसुरत असते.वानगीदाखल...'गरे निरेपगरेसा निध धनि सागमग मपधधनिध मपमपग,गपगरेसारे,निरेमगरेनिसा' ही सरगम पहावी.

     असे हे सव्यसाची संगीतकार सुधाकर कदम विदर्भाचे एक भूषण आहे.नाटक आणि संगीताचे विदर्भाशी फार पूर्वीपासूनच स्नेहनाते आहे.अनेक मान्यवर कलावंत या भूमीने महाराष्ट्राला दिले.

     आर्णी येथील संगीत विद्यालयाची पंचवीस वर्षांची दीर्घकालीन वाटचाल कदमांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.अर्थातच हा प्रवास खाचखळग्यांनी, वेड्यावाकड्या वळणांनी, प्रसंगी काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ करणारा असूनसुद्धा हे सर्व अडथळे धीरोदत्तपणे पार करणाऱ्या सुधाकर कदमांच्या हातून सुंदर सुंदर चाली निर्माण व्हाव्यात.त्यांची संगीत सेवा अशीच अखंड सुरू राहावी, अशा शुभेच्छा मी माझ्या या मृदू स्वभावाच्या व माणसासाठी आसुसलेल्या मित्राला देतो.तत्पूर्वी मनातील एक खंत नमूद करतो, भले विदर्भाने या कलाकाराचे भरपूर कौतुक केले असेल पण उर्वरित महाराष्ट्रात या कलाकाराला त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रोजेक्ट केले गेले नाही.प्रतिथयश गायक,गायिकांनी अभिमानाने गावी अशी त्यांची स्वररचना असूनही हे का घडले नाही हे एक कोडे आहे.


मानद प्राध्यापक

श्री शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूर


(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी,रौप्यमहोत्सवी विशेषांक,

१९९९ मधून...)

Tuesday, May 9, 2023

गझल गायकीचा वारकरी...डॉ.किशोर सानप


      सुधाकर कदम, मूळ यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील (कदमांचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या) दोनोडा या खेडे गावातील. वर्धा जिल्ह्यातील खरंगणा (गोडे) या मामांच्या (आजोळी) गावी १३ नोव्हेंबर १९४९ ला जन्मलेला उमदा गायक माणूस. बाप पांडुरंग, वारकऱ्याचं घराणं. खुद्द पांडुरंग बाप अनवट चालीत भजनं गात असे. गायनाचा पांडुरंगी गळा आणि वारकरी गायनाची परंपरा सुधाकरला बाळकडूच्या रूपातच मिळाली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावी संगीत शिक्षकाची नोकरी केली.
आर्णीसारख्या खेडेगावांतून महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्रातल्या रसिकराजांवर गझल गायकीची मोहिनी घालणारा सुधाकर म्हणजे गझलनवाज, #गझलगंधर्व, गझलचा स्वरताज, सुधाकर गझल गायकीसाठी, आपलं अख्खं आयुष्य साधना, तपश्चर्या करून; गझलांना स्वरसाज देताना, धुंदीत आणि गुंगीतच जगला. रमला. खरं तर सुधाकरचा अवतार सुफियाना गायकालाच शोभणारा. चेहऱ्यावर कारुण्यभाव, जगातलं दुःख नष्ट व्हावं ही चिंता. मानेवर वाढवलेल्या केसांच्या बटांची शाही झालर, गहुवर्णी देहयष्टी. जणू आपल्याच धुंदीत गाणारा फकीर, आपल्याच मस्तीत आणि धुंदीत जगला आणि रमलाही. खरंतर सुधाकर म्हणजे, गझल गायकीचा वारकरीच. अजूनही त्याचा रियाज, गायकी आणि गायकीची वारी थांबलेली नाही.

     गायन हा सुधाकरचा श्वास आहे. प्राण आहे. आत्मा आहे. गझलेच्या देहातला श्वास, आत्मा गायनाच्या स्वरानं उजागर करण्याच्याच साधनेत रत असलेला हा कलावंत आहे. म्हणूनच कवी सुरेश भट, संगीतकार यशवंत देव, राम पंडीत, पत्रकार अनंत दीक्षित, कवी श्रीकृष्ण राऊत आदिंसह सर्वदूर रसिकांनीही सुधाकर कदमच्या गझल गायकीला हृदयात अढळ स्थान दिलं आहे. #आद्य_मराठी_गझल_गायक आणि #गझलनवाज म्हणून समाजानं त्याचा गौरवही केला आहे.

     सन १९७५ पासून तर आजतागायत सुधाकर कायम गझल गायकीचा रियाझ करीतच आहे. '#अशी_गावी_मराठी_गझल' या गझल गायनाचे शेकडो धुंद करणारे कार्यक्रम सुधाकरनं आजवर केले आहेत. खुद्द सुरेश भटांनी सुधाकरच्या गझल गायन कार्यक्रमात गझलांचं निवेदन केलं आहे. सुरेश भटांनी गझलेला शब्द दिला. मराठीत गझल अजरामर केली. सुरेश भटांच्याही आधी माधवराव पटवर्धनांनी गज्जलांजली (१९३५) पहिल्यांदा मराठीत आणली. पुढे मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकरांसह अनेक दिग्गज कवींनीही गझलचा प्रभाव लक्षात घेऊन गझल लेखनात उमेदवारी केली. परंतु मराठी रसिकांच्या हृदयावर साम्राज्य केले ते गझलसम्राट सुरेश भट आणि गझलराज कवी श्रीकृष्ण राऊत यांच्या हृदयस्पर्शी गझलांनीच. मराठी गझलला लोकप्रिय आणि रसिकमान्य करण्यात या दोन्ही कवींचं योगदान अनन्यसाधारण आहे. गझलेला दिलेल्या शब्दांना अस्सल स्वरांची गायकी दिली ती आद्य मराठी गझल गायक सुधाकर कदम यांनी.

     सुरेश भटांची गझल आणि सुधाकरची गायकी, असा दीर्घ प्रवास विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात झालेला आहे. विशेष म्हणजे गझलसम्राट विदर्भपुत्र सुरेश भटांनी गझलेला दिलेल्या शब्दांना स्वरांचा साज चढविण्याचे महत्कार्य विदर्भपुत्र सुधाकर कदमांनीच सुरुवातीच्या काळात केले. सुरेश भटांच्या लोकप्रियतेला सुधाकरनं स्वरांची सलामी दिली. गझल गायकीत सुधाकरने आपले अनन्यसाधारण स्थानही कमावले. मराठी गझल गायकीची सन १९७५ पासूनच सुरूवात करून मराठी गझल गायकीला भूमीही उपलब्ध करून दिली. पुढे विदर्भातील अकोल्याचे गझलनवाज भीमराव पांचाळेनी गझल गायकीत सर्वदूर चार चांद लावले. याच पाऊलवाटेवर राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार, माधव भागवत, रफिक शेख यांनीही गझल गायन क्षेत्रांत गायकी विकसित केली आहे. सुधाकरनं मराठी गझल गायकीची वहिवाट निर्माण केली, हे त्याचे योगदान मराठी गझल गायन क्षेत्रांत अलौकिक मानायला हरकत नाही.

     खुद्द सुधाकर गझल गायनाबाबत म्हणतो, गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकारांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या सुरावटी तयार कराव्या लागतात. संगीत हे केवळ तंत्र नसून अंतर्मनातून स्फुरणारी ती एक शक्ती असून ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. मात्र त्यासाठी
तपश्चर्या करणे आवश्यक असते. कोणतीही कलासिध्दी अंत:करणाला पिळवटून निष्काम साधनेनंच प्राप्त करता येतं. खरंतर कलासाधना ही मुळात ईश्वराचीच भक्ती असते.सुधाकर कलेला ईश्वरप्राप्तीचे साधन मानतो. खरेतर कलेला ईश्वररूप मानणारा हा कलावंत कलेश्वराचाच भक्त आहे. कलेच्या भक्तीतूनच तो कलेचे अद्वैत साध्य करतो.सुधाकरला कलेचे अद्वैत साधले आहे. कलेच्या भक्तीतून गायकीच्या मुक्तीकडे त्याने
आजवर प्रवास केला आहे.

     कलेला पांडुरंग मानणारा हा स्वरांचा वारकरी आहे. पांडुरंगपुत्र आहे. सुधाकरला पांडुरंगानंच जन्म दिला. ज्याचा बापच पांडुरंग, त्याच्या कलाभक्तीला कोण अवरोध करणार? स्वरांचा सुधा-कर कलेचं दैवत पांडुरंगाची भक्ती करतो. गझल गायकीचं पंढरपूर निर्माण करणारा सुधाकर गझलेच्या पांडुरंगाचा निस्सिम वारकरी आहे. केला अभिमान पावठणी, ही वृत्ती अंगी बाणल्यामुळे कमालीची नम्रता, लिनता त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देताना दिसते. कलावंताला अभिमानच पचवता येत नाही. अभिमान सोडून बाकीचं सर्वकाही पचवता येतं. सुधाकर कदम हा कलावंतांचं मानबिंदू तर आहेच, परंतु कलासाधक म्हणून तो आजवर जगत आला. जगत राहील यावरही विश्वास आहे..

     कलावंताला पूर्णत्वाचा ध्यास असतो. पावठणी तुडविल्याशिवाय कोणताही कलावंत कलेच्या पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही, सुधाकर कलावंत आणि कलासाधक म्हणून कलेला,

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । 
कर कटावर ठेवोनिया ||

     मानूनच एकाग्रचित्तानं स्वरांची नवनवोन्मेषशाली निर्मिती करतो. शब्दांचे अर्थविश्व स्वरांच्याच नजाकतीतून उलगडून दाखविण्यासाठीही तो कायम साधनारत असतो. सुधाकर कलेला पांडुरंग मानतो.

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार |
मज विश्वंभर बोलवितो ॥

किंवा

माझे सर्व भांडवल ।
बोलविले बोल पांडुरंगे ।।

     असंच मानतो. म्हणूनच, कलेचे अद्वैत किंवा कलेच्या पूर्णत्वाला पोहोचण्याची कलासाधकाच्या मुक्तीची वाट त्याला सापडली आहे. सुधाकर गायन कलेचा वारकरी आहे. कलामुक्तीच्या परमोच्च वाटेवरून प्रवास करणारा अस्सल कलासाधक आहे.

     सन १९८० ते १९८३ या चार वर्षात सुधाकर कदम आणि कवी सुरेश भटांनी 'अशी गावी मराठी गझल' हा तीन तासांचा गझल गायनाचा कार्यक्रम पहिल्यांदा सुरू करून सर्वदूर लोकप्रिय केला. संगीतकार यशवंत देव यांनी आणि अनेक गझलकार, कवी, पत्रकार, चाहत्यांनी सुधाकरचा गौरवही केला. सन १९८१ मध्ये गझल गायनाची पहिलीवहिली ध्वनिफित भरारी या नावानं आली. सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, सतीश डुंबरे यांच्या गझलांना नव्यानव्या चाली आणि स्वरांजली देऊनच; अणूरेणू या थोकडा, सुधाकर आकाशाएवढा अशी भरारी सुधाकरनं संगीत आणि गायन क्षेत्रात घेतली. सुधाकरनं अनेकांच्या गझलांना स्वतःच्या चाली दिल्या. स्वयंभू स्वरही दिले. बहुतांश सुधाकरनं सुरेश भटांच्या गझलांना मात्र स्वरसाज चढविला. मराठीत ताकदीनं गझल लिहिणाच्या श्रीकृष्ण राऊतांच्याही गझलांना स्वर आणि आवाज दिला. कवीच्या शब्दांच्या खोलीत दडलेला आशय आणि अर्थाना, सुधाकरनं गायकीतून उजागर केले. कवीच्या शब्दतळाशी जाणे सोपे नव्हते. सुधाकर कवींच्या शब्दतळाशीच नव्हे तर शब्दडोहापर्यंत पोहून येतो. नंतरच तो शब्दांना स्वर आणि सांगितिक रचनांचा ईश्वरी सांजशृंगार चढवून रसिकांसमोर सादर करतो. मंत्रमुग्ध होणे कसे असते? हे सुधाकरच्या गझल गायकीने मैफिलींनी मराठी रसिकांना शिकविले. सुधाकर हा गझलेच्या सुरांनी संबंध परिसराला रोमांचित करणारा आणि मंत्रमुग्ध करणारा कलावंत आहे.

     सुधाकर कदम १९६५ (ऑर्केस्ट्रा) पासून अथकपणे जीवाची आणि तब्यतेची पर्वा न करता कलासाधना करीतच आहे. नव्या चाली आणि नवे सूर देण्याची त्यांची तळमळ अस्सल असते. सुधाकरच्या गायकीचा आजवर मोठा गौरवही झाला आहे. स्वरराज छोट्या गंधर्वांनी सन १९७५ मध्येच, मराठी गझल गायकीच्या नवीन वाटेचा वाटसरू संबोधून चाळीस वर्षांपूर्वीच सुधाकरचं कलावंतपण उमेदीतच भक्कम मानलं होतं. पंडित जितेंद्री अभिषेकींनी, सुधाकरच्या सातत्य आणि परिश्रमपूर्वक कलासाधनेला यशाची गुरुकिल्ली मानली. गझलसम्राट कवी सुरेश भटांनी सन १९८१-८२ मध्येच सुधाकरला 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन' आणि 'गझलनवाज' ह्या मौलिक उपाधींनी गौरविले. गजानन वाटवेंनी, 'मला आवडलेला गझलिया', तर डॉ. यु. म. पठाणांनी, 'मराठी गझलेस स्वरसाज चढविणारा कलावंत' म्हटले. मा. सुधाकरराव नाईकांनी, 'शब्दस्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार' म्हणून गौरव केला. समाजाच्या आणि संस्कृतीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सुधाकरच्या गझल गायकीचा आजवर गौरवच केला आहे.

     सन १९८३ ते आजतागायता सुधाकरला अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनीही गौरवांकित केले गेले. समाजगौरव पुरस्कार, संगीतभूषण पुरस्कार, मॅन ऑफ दि इअर, आऊटस्टँडिंग यंग पर्सन, कलादूत, कलावंत, शान-ए-गझल, गझलगंधर्व, गझल गंगेच्या तटावर, भट गझल पुरस्कार, महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार. सुधाकरचे म्युझिक अल्बमही दरम्यानच्या काळात गाजले. खपलेही. #भरारी  (मराठी गझलांचा पहिला अल्बम), #झुला  (पाठ्यपुस्तकातील कविता), #अर्चना  (भक्तिगीत), #खूप_मजा_करू  (बालगीतं), #काट्यांची_मखमल (मराठी गझल) तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी गीतांची स्वरलिपी #सरगम , #फडे_मधुर_खावया (विविध विषयांवरील ललित लेखसंग्रह)#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा आणि #काळोखाच्या_तपोवनातून  हे काव्यसंग्रह ही पुस्तकेही सुधाकरच्या कलासाधना आणि कलालेखणीतून साकार झाली आहेत.

     गौरवानं धुंद होण्यापेक्षा सुधाकरला कलासाधनेतच धुंद होता आलं. गौरव आणि मानसन्मानांनी सुधाकर मोहरला नाही. उलट सुधाकरचे स्वर अधिक मोहरले. कलावंताला गौरवानं मोहरण्यापेक्षा कलेतच अधिकाधिक मोहरता-फुलता-बहरता आलं पाहिजे. सुधाकरला हे जमलं. सुधाकरला कलेची वारी करणारा वारकरी होणं जमलं. खूप कलावंतांना कलावंत तर होता येतं. परंतु कलेचा वारकरी होणं नाहीच जमत. सुधाकर याही अंगाने स्वतःचं वेगळेपण जपत आला आहे. कलेशी कुठलीही तडजोड त्याने केली नाही. कलावंत म्हणून तो कधी याचक बनला नाही. सुधाकर कलासाधकच बनला. कलावंतांच्या तडजोडी कायम नाकारत कलेच्या धुंदीत, गुंगीतच आपल्या स्वरांचं अस्सल इमान त्याला एकाकीपणातही जपता आलं. इमान जपणारा कलावंत आजच्या मानसन्मानासाठी हपापलेल्या कलावंतांच्या जगात शोधूनही कुणी सापडत नाही. सुधाकर त्याला अपवाद आहे.

      सुधाकर हा जसा एक लोकप्रिय गायक आणि कलावंत आहे. तसाच तो अत्यंत हळवा.. संवेदनशील, कनवाळू माणूसही आहे. बरेचदा कलावंतांना आपलं माणूसपणच टिकवता येत नाही. कला आणि अहंकार टिकविता टिकविता माणूसपण केव्हा गळून पडले, हेही कळत नाही. सुधाकरने माणूसपणही टिकविल. माणूस म्हणून कुटुंबावर-समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटूंबावर समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटुंबावर अगाध प्रेम केलं. या माणसाला कधी राग येतो का? कधी अहंकार जागा होतो का? कधी हा कलेचं मार्केटिंग करू शकतो का? असे अनेक प्रश्न आम्हा मित्रमंडळीत कायम उपस्थित होतात. अस्सल वैदर्भिय वऱ्हाडी बोलीतून, काय गड्या किती दिवसांनी तुला भेटता आलं? अशी सुरूवात करणार. समाजातल्या सर्वच स्तरांतल्या लोकांशी जवळीक साधून, सुधाकर असंच अघळपघळ बोलून, गळ्यात हात टाकणार. पाठीवर शाबासकी देणार. सर्व बिरूदे विसरून प्रेम करणे सुधाकरला जमले.

     सुधाकर म्हणजे बोलघेवडा. पटकन् लहान मुलासारखा घरात विरघळून जाणार.. लेकराबाळांसह सर्वांशीच युगायुगाचे नाते मानून बोलणार. सुधाकरच्या अंत:करणात एक कुटुंबवत्सल माणूस आणि निरामय प्रेम करणारा सहोदर मित्र दडलेला आहे. जिवघेण्या आजारातून परतल्यावर तो गंमतीनेच मृत्यूच्या दाढेने काबूत घेतल्यावर आपण कसे मृत्यूशी झुंजलो आणि मृत्यूला पराभूत करून मित्रांना भेटायला आलो, हेही सांगणार. सुधाकर कदम म्हणजे एक आनंद. आनंदाचे डोह, आनंदाची पर्वणी, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. सुधाकरच्या मुली, पत्नी, निषादही सुधाकरचेच शोभणारे वत्सल आणि प्रेमळ रूप. सबंध महाराष्ट्रातच सुधाकरचे मैत्रमंडळ. जेथे जातो तेथे तूच माझा सांगाती, हीच वृत्ती सुधाकरला जगण्याची ऊर्जा देणारी आहे.

     सुधाकरने गझल गायनाची सार्वजनिक सुरूवात सन १९७५ नंतर केली. सन १९८० ते १९९० पर्यंत सुधाकर गझल गायक म्हणून गझलनवाज, शान-ए-ग़ज़ल बनला. सन १९९० नंतर गझल गायनाच्या क्षेत्रांत अन्यही अनेक कलावंत उमेदवारी करू लागले. सुधाकरला उमेदवारी करण्याची आणि टिकविण्याची गरजच नव्हती. सुधाकर तर मराठी गझलांना स्वरसाज देणारा आद्य अभिजात कलावंत माणूस. गझलांना चाली, ताल, लय, अर्थघनता, नवस्वर देणारा स्वरसम्राट. गायकाच्या जातकुळीत जन्मून, कलेची वारी करणारा पांडुरंगमय कलासाधक. कलेचा वारकरी जेव्हा कलासाधनेतून पांडुरंगमय होतो, तेव्हाच कला आणि कलावंताचं अद्वैत साकार होते. कोणत्याही कलावंताचं अंतिम ध्येय कलेच्या मुक्तीचा आनंद अनुभवणे असते.

आनंदाचे डोही आनंद तरंग । 
आनंदचि अंग आनंदाचे ॥
काय सांगो झाले काहीचियेबाही ।
आता पुढे चाली नाही आवडीने ॥ 

     या अद्वैतानंदाच्या स्थितीत कलासाधनेचा आनंद लुटणे, हे परमभाग्य ज्याला मिळाले, त्या कलावंताचे नाव आहे, गझलनवाज, गझलगंधर्व, गझलस्वरताज, गझलगायक सुधाकर कदम. कलेचा परम वारकरी. गझल गायकीचाही पांडुरंगमय पांडुरंगपुत्र सुधाकर कदम.


 

Monday, May 8, 2023

राग सारंग


     सारंग हा एक आगळा वेगळाच राग आहे.या रागाचे अनेक प्रकार आहेत.जसे:- वृंदावनी सारंग,मधमाद सारंग, मियाँ की सारंग,लंकादहन सारंग,बडहंस सारंग,नूर सारंग वगैरे वगैरे. यातील काही सारंग प्रकारच प्रचलित आहेत.त्यातही गौडसारंग या रागाचा सारंग प्रकाराशी 'नामसाधर्म्या' शिवाय कुठलाच संबंध नाही
     सारंग या राग समूहाचा प्रमुख राग 'वृंदावनी सारंग' असावा. याला कधी कधी फक्त सारंग म्हणूनही संदर्भित केल्या जातो.सारंग रागाची मुळं प्राचीन लोकसंगीतशी जोडलेली दिसतात.त्यामुळे हा राग संपूर्ण देशात लोकप्रिय असल्याचे दिसून येते.वृंदावनी सारंग रागाचा आरोह सा रे म प नि सां, अवरोह सां कोमल नि प म रे सा.असा आहे.यात दोन्ही निषादांचा प्रयोग केल्या जातो.तर मधमाद सारंग रागात फक्त कोमल निषादाचाच प्रयोग करतात.'मेघ' आणि 'मधमाद' सारंग रागाचे स्वर सारखे असल्यामुळे गाताना खूप काळजी घ्यावी लागते.बहुतेक सारंग प्रकार काफी थाटातून उत्पन्न झालेले दिसतात.पण शुद्ध सारंग हा राग त्यातील तीव्र मध्यमामुळे एकदम वेगळा पडतो आणि उठून दिसतो. ढाचा सारंगचाच पण वेगळी अनुभूती देणारा हा एक लोकप्रिय राग आहे.हा तसा शामकल्याण रागाच्या अगदी जवळचा आहे.गायक/वादकांनी योग्य अवधान न बाळगल्यास शुद्ध सारंगचा शामकल्याण व शामकल्याणचा शुद्ध सारंग व्हायला वेळ लागत नाही.हे दोन्ही राग कल्याण थाटातून उत्पन्न झाले आहेत.     

     हिंदी/मराठी चित्रपट, भावगीत,नाट्यगीत या सर्व माध्यमांमध्ये सारंग प्रकार विपुलपणे वापरल्या गेला आहे.'जादुगर सैंय्या छोड मोरी बैंय्या' चित्रपट-नागिन, 'आजा भंवर सुनी डगर','झननन झन झननन झन बाजे पायलिया' चित्रपट-रानी रुपमती, ''कहां से आये बदरा' चित्रपट-चष्मे बद्दूर,'झुटी मुटी मितवा आवन बोले' चित्रपट-रुदाली,'कारे कारे बादरा जा रे जा रे बादरा मेरी अटरिया ना शोर मचा' चित्रपट-भाभी,'मेरी जां बल्ले बल्ले' चित्रपट-काश्मीर की कली,'अगर तुम मिल जाओ जमाना छोड देंगे हम' चित्रपट-जहर,'कजरा मोहब्बत वाला' चित्रपट-किस्मत, 'मै तो भूल चली बाबूल का देस' चित्रपट-सरस्वतीचंद्र, 'घुमर घुमर' चित्रपट-पद्मावत, मराठीत 'संथ वाहते कृष्णामाई' हे चित्रपटगीत व 'साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची' हे नाट्यगीत वगैरे वृंदावनी सारंग रागावर आधारित आहेत.      

      'आ लौट के आजा मेरे मीत' चित्रपट-रानी रूपमती, 'अखियों के झरोखों से','कोंपले फिर फूट आयी' उर्दू गझल-मेहदी हसन, 'जुल्फ बिखरा के निकले वो घर से' गझल-अहमद/महमद हुसेन, 'बन्ना रे' राजस्थानी लोकगीत, 'पिछे पिछे आ जा' पंजाबी लोकगीत.'साहेब है रंगरेज चुनरी मेरी रंग डारी' कबीराचे भक्तीगीत' गायक-शेखर सिंग, 'यारा सिली सिली' चित्रपट-लेकिन,भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' हे अरुण दातेंनी गायिलेले भावगीत वगैरे गाणी मधमाद सारंग रागावर आधारित आहेत.     

     'ओ सांवरे आ जा प्यार के लिए' चित्रपट-निजी सचिव, ''दैरो हरम मे बसने वालो' 'गझल-जगजीत सिंग, 'सावन रुत आये देखो बलम' पिया बसंती-नॉन फिल्मी, 'दिल-ए-नादां तुझे हुवा क्या है' गझल-मेहदी हसन, 'नमन उन्हे' कवी रामधारी सिंह-गायक सुरेश वाडकर, 'छोटासा बालमा' चित्रपट-रागिनी, रामदास कामतांनी गायिलेलं  'निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे' हे भक्तीगीत ही सारी गाणी शुद्ध सारंग रागावर आधारित आहेत.

     या मेलोडीअस गाण्यांव्यतिरिक्त 'बेबी को बास पसंद है','जग घुमैया' सुलतान,'बेदा पार' फुकरे, 'बीडी जलाय ले' ओंकारा, 'डंकिला' मनकर्णिका, 'हम का पीनी है','मुन्नी बदनाम हुई' दबंग, 'मां दा लाडला' दोस्ताना, 'ठरकी छोकरो' पीके, 'ऐंवयी ऐंवयी' बँड बाजा बारात... ही गाणी सुद्धा सारंग प्रकारावर आधारित आहेत.    

      मी शुद्ध सारंग रागात दिलीप पांढरपट्टे यांची एक मराठी गझल 'तुझ्यासाठीच मी...' या वैशाली माडेच्या आवाजातील अल्बम करिता स्वरबद्ध केली.सोपे शब्द व सोपी स्वररचना आहे.मतला व पहिला शेर शुद्ध सारंगवर आधारित असून त्यातील 'सुख जरी आसपास घुटमळले' या शेरातील 'सुख' शब्द उचलताना काळजीपूर्वक उचलावा लागतो.कारण ताल आहे खेमटा... पहिली मात्रा सोडून उचलला तरच सम गाठता येते. अन्यथा सम सुटलीच म्हणून समजावी.दुसरा शेर मध्य सप्तकातील गांधार ते मंद्र सप्तकातील पंचम अशा प्रकारे शामकल्याणची झलक घेऊन येतो.त्यामुळे गझलची रंगत वाढते. तरुणाईला आवडणारी ही गझल आपण युट्युबवर ऐकू शकता
प्रेम अपुले नवे नवे होते
जे तुला ते मला हवे होत
https://youtu.be/FcNxVwily_g
-------------------------------------------------------------------------
।    दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार.दि.७/५/२००३


 

Wednesday, May 3, 2023


 

जळलो धुपापरी मी...मराठी गझल.


 

#वेदनेचा_सूर


 

शेवटी हे दुःख माझे...


 

राग मालकौंस

.      क्या भला मुझको परखने का नतीजा निकला" मेहदी हसन खाँ साहेबांनी गायीलेली मुज़फ्फर वारसी यांची  ही गझल मी अंदाजे ४५ वर्षांपुर्वी मनसोक्त ऐकली ती सुरेश भटांमुळे.या गझलची बंदिश मालकौंस या सुंदर आणि लोकप्रिय रागात आहे.गायक,वादक,संगीतकार यांचाही हा अत्यंत आवडता राग आहे.बिसमिल्ला खाँ साहेबांनी शहनाईवर वाजविलेल्या मालकौंसाची ध्वनिमुद्रिका आजही सीडी च्या रुपात मंगल कार्यात वाजत असते.बैजू बावरा या चित्रपटातील रफी साहेबांनी गायीलेले "मन तरपत हरि दरशन को आज" हे गाणे आजही टवटवीत आहे.नवरंग चित्रपटातील "आधा है चंद्रमा रात आधी,रह न जाए तेरी मेरी बात आधी" आणि "तू छुपी है कहाँ मै तडपता यहाँ","आये सुर के पंछी आये" चित्रपट सुरसंगम', "दीप जलाये जो गितों के मैने" चित्रपट 'कलाकार, "पंख होते तो उड आती रे' चित्रपट 'सेहरा',"मुझे ना भुला" चित्रपट 'सुवर्ण सुंदरी', "बलमा माने ना" चित्रपट 'ऑपेरा हाऊस', "पग घुंगरू बोले छननन छन" चित्रपट 'देव कन्या',"अखियन संग अखियां लागे आज" चित्रपट 'बडा आदमी',"ओ पवन वेग से उडने वाले घोडे" चित्रपट 'जय चित्तोड',"निर्बल से लडाई बलवान की" चित्रपट 'तुफान ओर दिया', वगैरे गाणीही मालकौंस रागातीलच आहे.संगीत नाटकांमध्येही या रागाचा मुक्तपणे वापर केलेला दिसतो.रणदुंदुभी नाट्कातील "दिव्य स्वातंत्र्य रवी",मृच्छकटीक मधील "तेचि पुरूष दैवाचे" वगैरे-वगैरे."अणुरणिया थोकडा,तुका आकाशाएवढा"हा भीमसेनांच्या आवाजातला अभंग ही त्याची उदाहरणे...असा हा श्रीमंत राग मालकौंस...या रागात सा ग म ध नि असे फक्त पाचच स्वर लागतात.गांधार,निषाद,धैवत हे स्वर कोमल आहेत.बस्स...पण या पाच स्वरांमधील जादू वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलीच असेल....

          वरील सर्व गाणी अतिशय कर्णमधुर आहेत यात काही वादच नाही.प्रत्येक संगीतकार,गायक,वादकांनी आपापल्या प्रतिभेनुसार हा राग लोकांसमोर ठेवला.परंतू या सगळ्यांपेक्षा वेगळ्या अंगाने जाणारी बंदिश हे या गझलचे वैशिष्ठ्य आहे.त्यातही अंतर्‍यात केलेली कलाकुसर हृदयाला भिडणारी आहे.या गझलची माझ्या आयुष्यात वेगळी अशी जागा आणि आठवण आहे.सुरेश भटांशी मैत्री झाल्यानंतर त्यांनी मला सर्वप्रथम "हा ठोकरुन गेला" आणि "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही" या दोन गझला मला स्वरबद्ध करायला दिल्या.यावेळी मी ऑर्केस्ट्रा सोडून नुकताच आर्णी (जि.यवतमाळ) या खेड्यात संगीत शिक्षक म्हणून रुजू झालो होतो.भर ’ज्वानीचा’ की काय म्हणतात असा तो काळ होता.१५/२० दिवसानंतर नागपुरला धनतोलीच्या त्यांच्या निवासस्थानी या दोन्ही गझलांना बसविलेल्या चाली ऐकविल्या."ठोकरुन"ची चाल त्यांना आवडली.परंतु "कुठलेच फूल" ला बसवलेली किरवाणी रागातील उडती चाल त्यांना बिलकुल आवडली नाही.त्यांचा स्वभाव तसा अतिशय फटकळ आणि मिश्किल असल्यामुळे ते मला म्हणाले" सुधाकरराव तुमची ही चाल म्हणजे एखाद्या घरंदाज बाईला तमाशात नाचवण्याचा प्रकार झाला आहे!"...त्यांना काय म्हणायचे आहे हे मला क्षणभर समजले नाही.पण काही तरी चुकल्याचे लक्षात आले.माझा गोंधळलेला चेहराबघून त्यांनी एक भली मोठी लोखंडी ट्रंक उघडली,त्यात खच्चून कॅसेट्स भरलेल्या होत्या. त्यातल्या ३/४ कॅसेट्स मला दिल्या.(सुरेश भट त्यांच्या संग्रहातील कॅसेट्स आणि पुस्तके कोणालाही देत नसत.या बाबतीतले त्यांचे विचार अतिशय परखड व ठाम होते.) परंतू कॅसेट ऐकण्याकरीता माझ्याकडे टेपरेकाँर्डर नव्हते.म्हणून त्यांना कोणीतरी भेट दिलेले त्यांच्याजवळचे एकमेव टेपरेकॉर्डर मला दिले आणि गझल गायकीचा अभ्यास करायला सांगितले.ते सगळे घेऊन मी आर्णीला आलो.(त्यानंतर हीच गझल भूपेश्वरी रागात स्वरबद्ध करून गायिलो तेव्हा त्यांनी मला #महाराष्ट्राचे_मराठी_मेहदी_हसन  ही उपाधी दिली.) माझ्यासाठी हा फार मोठा आणि मोलाचा खजिना होता.कारण रेडिओवर त्याच्या मर्जीने लागलेल्या गझला कधी-मधी ऐकणे आणि कॅसेटवरून सतत ऐकणे यात खूप फरक आहे.आज इंटरनेटमुळे एका क्लिक वर हवे ते सापडते.तेव्हा मात्र एखादे आवडीचे गाणे ऐकायचे असेल तर दिवसभर रेडिओ कानाला लावून बसावे लागायचे.
नशीब की त्या काळात छोटेखानी ट्रांझिस्टर रेडिओ उपलब्ध होते.हे सगळे सांगायचे कारण असे की,यातील मेहदी हसनच्या कॅसेटमध्ये कधीकाळी पाकिस्तान रेडिओवरून ऐकलेली काळीज कापणारी आणि सुरावटीचा खूप विचार करायला लावणारी वरील गझल त्यात होती.आम्ही शिकलेलो मालकौंस वेगळा होता आणि हा मालकौंस काही वेगळाच भासत होता.मालकौंस मधील बहुतेक रचना षड्जापासून सुरू होतात.याला काही अपवाद असतीलही पण ठोकळमानाने हा परिपाठ आहे. परंतू या गझलची सुरवात मध्य सप्तकातील कोमल निषादापासून झाली आहे.पुढे ’परखनेका’ या शब्दांसोबतचा स्वरगुच्छ आणि ’ने’ या अक्षरावरील मध्यमाला घासून जाणारी सम....अरारारारा....................काळजाची चाळणच.....लाजवाब ! पुढे ’नतीजा निकला’वरील तार षड्जापर्यंत जाऊन वापस षड्जावर येणारी सुरावट...माशाल्ला ! आपण ऐका....एक वेगळे स्वरशिल्प आपल्यासमोर येईल.

          मुज़फ़्फ़र वारसी यांच्या या गझलमधील एक एक शेर जसा दमदार आहे.तसेच खाँ साहेबांचे सादरीकरणही कलदार आहे.अंतर्‍यामध्ये त्यांनी मुर्छना पद्धतीचा अतिशय सुंदर प्रयोग करून सोहनी या रागाचा आभास निर्माण केला आहे.त्या वेळी ’क्या बात है................’ असे आपसुकच तोंडातून निघून जाते.वास्तविक पाहता मालकौंस आणि सोहनी हे दोन्ही राग सगळ्याच बाबतीत परस्पर विरोधी आहेत.दोन्ही रागात एकही साम्यस्थळ नाही.तरी पण हे त्यांनी केले...अगदी बेमालुमपणे.तुम्ही कधी आम्रखंड खाल्ले आहे का ? बस...नेमके तसेच...आम्रखंड खातांना श्रीखंड खाण्याचा आनंद मिळतो.त्यात आमरसाची जी थोडी-थोडी वेगळी चव जिभेला जाणवत राहाते पण नकळत...तसलच काहीतरी हे ’प्रकरण’ आहे.ऐकल्यावर त्याची लज्जत आपणास कळेललच......ऐका तर..."क्या भला..."

क्या भला मुझको परखने का नतीजा निकला
ज़ख्म-ए-दिल आपकी नज़रों से भी गहरा निकला

तोडकर देख लिया आइना-ए-दिल तूने
तेरी सूरत के सिवा और बत क्या निकला

जब कभी तुझ को पुकारा मेरी तनहाई ने
बू उडी फूलसे,तस्वीर से साया निकला

कोइ मिलता है तो अब अपना पता पूछता हूं
मैं तेरी खोज में तुझ से भी परे जा निकला

तिश्नगी जम गयी पत्थर की तरहा होटोपर
डूबकर भी तेरी दरिया से मैं प्यासा निकला

शायर - मुज़फ़्फ़र वारसी
आवाज़ - मेहदी हसन

Youtyub link...
https://youtu.be/1_Kpmw9GHDY
------------------------------------------------------------------------

दैनिक उद्याचा मराठवाडा,नांदेड.रविवार दि.३० एप्रिल २०२३


 

राग यमन भाग २

.                                  #राग_रंग 
 (राग #यमन -भाग २. दै.उद्याचा मराठवाडा.दि.२३/४/२०२३)

'सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी प्रीये तुझ्याचसाठी...'

दादर्‍यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़.

‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो,
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’

ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज्‌ सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़. संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़. संगीतकार हाच खर्‍या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़.
‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’
हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़. प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या

‘जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू
ऐनवेळी अशी काय करतेस तू'

 ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्‍याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़. ‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं. सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्‍या आहेत म्हणूनच त्या भावतात़. कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़. एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती.")

     यमन हा अभंगापासून तॊ लावणीपर्यंत सर्व प्रकारात रंगतो म्हणा किंवा रंगवितो म्हणा !मराठीमध्ये जवळ-जवळ सर्वच संगीतकारांनी यात स्वररचना केली आहे.त्याची यादी करतो म्हटले तर तो एक मोठा लेखच होईल.तरी पण काहींचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही.’धुंदी कळ्यांना...’, ’का रे दुरावा...’, ’पराधीन आहे जगती...’, ’तोच चंद्रमा...’, ’पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा...’, ’कबीराचे शेले विणतो...’, ’सुखकर्ता दुखहर्ता...(आरती)’, ’जिथे सागरा धरणी मिळते...’, ’जीवनात ही घडी...’, ’शुक्र तारा...’, ’तिन्ही सांजा सखे मिळाल्या...’, सोबतच अनेक नाट्यगीतेही यात आहेत.त्यातील अभिषेकी बुवांनी मत्स्यगंधा नाटकाकरीता रचलेले स्वरशिल्प ’देवाघरचे ज्ञात कुणाला...’ हे मला अतिशय भावले.गायक आहेत रामदास कामत. हिंदी चित्रपटसृष्टीतही यमन ने धुमाकूळ घातला आहे.सैगलच्या ’मैं क्या जानू क्या जानू रे...’ पासून तर आता-आताच्या ’तुम दिल की धडकन हो....’पर्यंत...यातील उल्लेखनीय गाणी आहेत...’मन रे तू काहे न धीर धरे...’, ’जिया ले गयो...’, ’जा रे बदरा बैरी जा...’, ’वो हँसके मिले हमको...’, ’पान खाये सैयाँ...’, ’इस मोडपर आते है...’, ’चंदन सा बदन...’, ’आँसू भरी है ...’, ’जब दीप जले आना...’ अशी किती गाणी घ्यावीत...............? उर्दू ग़ज़ल मध्ये ’रंजिश ही सही....’ही ग़ज़ल म्हणजे मैलाचा दगड आहे.सोबतच ’वो मुझसे हुये...’, ’शाम-ए-फ़िराक...’ ह्या गझला आणि ’आज जाने की ज़िद ना करो...’ ही फ़रीदा खानम यांनी गायिलेली रचना म्हणजेही कळसच आहे.यात ’मरीज़े मुहब्बत...’, ’दिलवालों क्या देख रहे हो' ह्या ग़ुलाम अलीच्या गझला आपला वेगळा रंग दाखवितात.’क्युँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...’ (शोभा गुर्टू), ’तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...’ (इकबाल बानो), ’आपका इंतज़ार कौन करे...’(शुमोना राय) या गझलाही अतिशय श्रवणीय आहेत. उर्दू गझल गायनातील मेहदी हसन साहेबांनी गायिलेली अहमद फ़राज़ यांची ’रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...’ या गझलने लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले.(खरे म्हणजे हे ’मोहब्बत’ या १९७२ सालच्या पाकिस्तानी सिनेमातील गाणे (ग़ज़ल) असून,याचे संगीतकार निसार बज़्मी हे आहेत.पण खाँ साहेबांनी महफिलीत गाऊन या रचनेचे सोने केले.)या गझल सोबतच यमन रागाचीही लोकप्रियता (गझल गायनाचे संदर्भात) परमावधीला पोहचली.
    मूलतःच गोड असलेल्या या रागात मी गझलकार दिलीप पांढरपट्टे यांची "तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते" ही नाजूक,तरल मराठी गझल स्वरबद्ध केली होती. दिलीपचे शब्द आणि वैशाली माडेचा गोड,मधाळ आवाज आणि शब्दांना साजेशी विनवणी करणारी बंदिश असा उच्चतम कोटीचा संगम यात झाला आहे.गांधारावरून सुरू होणारी बंदिश 'माझे' या शब्दावर मंद्र सप्तकात तीव्र मध्यमावरून 'छेडले' या शब्दाला मध्य सप्तकातील पंचमाची साथ घेऊन  'होते' या शब्दावर येते तेव्हा या मिसऱ्याची लज्जत आणखी वाढते.या कारागिरी नंतर यमन मध्ये नसलेला कोमल गांधार घेऊन दुसऱ्या शेरात केलेले  स्वरांचे नक्षीकाम भल्या-भल्यांना मोहवून टाकते.त्यामुळे या गझलमध्ये जे एक आर्जव आहे ते यमन मुळे पुर्णत्वाने दाखविल्या गेले आहे.
ही गझल युट्युबवर आपण ऐकू शकता...

तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते
तुझ्यासाठीच स्वप्नांचे दिवे मी लावले होते

जगाच्या सर्व शपथा मी जरी त्या मोडल्या होत्या
तुला जे जे दिले ते ते वचन मी पाळले होते

मनाच्या खोल डोहाच्या तळाशी ठेवले जपुनी
निखारे धुंद श्वासांचे तुझ्या जे पेटले होते

फुलांचा हा ऋतू सुद्धा जसा आला तसा गेला
तुझ्यासाठी किती गजरे उगा मी माळले होते

●गझल ऐकण्यासाठी युट्युब लिंक...
https://youtu.be/WFr4P07iQb0


 





संगीत आणि साहित्य :