सारंग हा एक आगळा वेगळाच राग आहे.या रागाचे अनेक प्रकार आहेत.जसे:- वृंदावनी सारंग,मधमाद सारंग, मियाँ की सारंग,लंकादहन सारंग,बडहंस सारंग,नूर सारंग वगैरे वगैरे. यातील काही सारंग प्रकारच प्रचलित आहेत.त्यातही गौडसारंग या रागाचा सारंग प्रकाराशी 'नामसाधर्म्या' शिवाय कुठलाच संबंध नाही
सारंग या राग समूहाचा प्रमुख राग 'वृंदावनी सारंग' असावा. याला कधी कधी फक्त सारंग म्हणूनही संदर्भित केल्या जातो.सारंग रागाची मुळं प्राचीन लोकसंगीतशी जोडलेली दिसतात.त्यामुळे हा राग संपूर्ण देशात लोकप्रिय असल्याचे दिसून येते.वृंदावनी सारंग रागाचा आरोह सा रे म प नि सां, अवरोह सां कोमल नि प म रे सा.असा आहे.यात दोन्ही निषादांचा प्रयोग केल्या जातो.तर मधमाद सारंग रागात फक्त कोमल निषादाचाच प्रयोग करतात.'मेघ' आणि 'मधमाद' सारंग रागाचे स्वर सारखे असल्यामुळे गाताना खूप काळजी घ्यावी लागते.बहुतेक सारंग प्रकार काफी थाटातून उत्पन्न झालेले दिसतात.पण शुद्ध सारंग हा राग त्यातील तीव्र मध्यमामुळे एकदम वेगळा पडतो आणि उठून दिसतो. ढाचा सारंगचाच पण वेगळी अनुभूती देणारा हा एक लोकप्रिय राग आहे.हा तसा शामकल्याण रागाच्या अगदी जवळचा आहे.गायक/वादकांनी योग्य अवधान न बाळगल्यास शुद्ध सारंगचा शामकल्याण व शामकल्याणचा शुद्ध सारंग व्हायला वेळ लागत नाही.हे दोन्ही राग कल्याण थाटातून उत्पन्न झाले आहेत.
हिंदी/मराठी चित्रपट, भावगीत,नाट्यगीत या सर्व माध्यमांमध्ये सारंग प्रकार विपुलपणे वापरल्या गेला आहे.'जादुगर सैंय्या छोड मोरी बैंय्या' चित्रपट-नागिन, 'आजा भंवर सुनी डगर','झननन झन झननन झन बाजे पायलिया' चित्रपट-रानी रुपमती, ''कहां से आये बदरा' चित्रपट-चष्मे बद्दूर,'झुटी मुटी मितवा आवन बोले' चित्रपट-रुदाली,'कारे कारे बादरा जा रे जा रे बादरा मेरी अटरिया ना शोर मचा' चित्रपट-भाभी,'मेरी जां बल्ले बल्ले' चित्रपट-काश्मीर की कली,'अगर तुम मिल जाओ जमाना छोड देंगे हम' चित्रपट-जहर,'कजरा मोहब्बत वाला' चित्रपट-किस्मत, 'मै तो भूल चली बाबूल का देस' चित्रपट-सरस्वतीचंद्र, 'घुमर घुमर' चित्रपट-पद्मावत, मराठीत 'संथ वाहते कृष्णामाई' हे चित्रपटगीत व 'साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची' हे नाट्यगीत वगैरे वृंदावनी सारंग रागावर आधारित आहेत.
'आ लौट के आजा मेरे मीत' चित्रपट-रानी रूपमती, 'अखियों के झरोखों से','कोंपले फिर फूट आयी' उर्दू गझल-मेहदी हसन, 'जुल्फ बिखरा के निकले वो घर से' गझल-अहमद/महमद हुसेन, 'बन्ना रे' राजस्थानी लोकगीत, 'पिछे पिछे आ जा' पंजाबी लोकगीत.'साहेब है रंगरेज चुनरी मेरी रंग डारी' कबीराचे भक्तीगीत' गायक-शेखर सिंग, 'यारा सिली सिली' चित्रपट-लेकिन,भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' हे अरुण दातेंनी गायिलेले भावगीत वगैरे गाणी मधमाद सारंग रागावर आधारित आहेत.
'ओ सांवरे आ जा प्यार के लिए' चित्रपट-निजी सचिव, ''दैरो हरम मे बसने वालो' 'गझल-जगजीत सिंग, 'सावन रुत आये देखो बलम' पिया बसंती-नॉन फिल्मी, 'दिल-ए-नादां तुझे हुवा क्या है' गझल-मेहदी हसन, 'नमन उन्हे' कवी रामधारी सिंह-गायक सुरेश वाडकर, 'छोटासा बालमा' चित्रपट-रागिनी, रामदास कामतांनी गायिलेलं 'निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे' हे भक्तीगीत ही सारी गाणी शुद्ध सारंग रागावर आधारित आहेत.
या मेलोडीअस गाण्यांव्यतिरिक्त 'बेबी को बास पसंद है','जग घुमैया' सुलतान,'बेदा पार' फुकरे, 'बीडी जलाय ले' ओंकारा, 'डंकिला' मनकर्णिका, 'हम का पीनी है','मुन्नी बदनाम हुई' दबंग, 'मां दा लाडला' दोस्ताना, 'ठरकी छोकरो' पीके, 'ऐंवयी ऐंवयी' बँड बाजा बारात... ही गाणी सुद्धा सारंग प्रकारावर आधारित आहेत.
मी शुद्ध सारंग रागात दिलीप पांढरपट्टे यांची एक मराठी गझल 'तुझ्यासाठीच मी...' या वैशाली माडेच्या आवाजातील अल्बम करिता स्वरबद्ध केली.सोपे शब्द व सोपी स्वररचना आहे.मतला व पहिला शेर शुद्ध सारंगवर आधारित असून त्यातील 'सुख जरी आसपास घुटमळले' या शेरातील 'सुख' शब्द उचलताना काळजीपूर्वक उचलावा लागतो.कारण ताल आहे खेमटा... पहिली मात्रा सोडून उचलला तरच सम गाठता येते. अन्यथा सम सुटलीच म्हणून समजावी.दुसरा शेर मध्य सप्तकातील गांधार ते मंद्र सप्तकातील पंचम अशा प्रकारे शामकल्याणची झलक घेऊन येतो.त्यामुळे गझलची रंगत वाढते. तरुणाईला आवडणारी ही गझल आपण युट्युबवर ऐकू शकता
प्रेम अपुले नवे नवे होते
जे तुला ते मला हवे होत
https://youtu.be/FcNxVwily_g
-------------------------------------------------------------------------
। दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार.दि.७/५/२००३
No comments:
Post a Comment