सुधाकर कदम, मूळ यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील (कदमांचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या) दोनोडा या खेडे गावातील. वर्धा जिल्ह्यातील खरंगणा (गोडे) या मामांच्या (आजोळी) गावी १३ नोव्हेंबर १९४९ ला जन्मलेला उमदा गायक माणूस. बाप पांडुरंग, वारकऱ्याचं घराणं. खुद्द पांडुरंग बाप अनवट चालीत भजनं गात असे. गायनाचा पांडुरंगी गळा आणि वारकरी गायनाची परंपरा सुधाकरला बाळकडूच्या रूपातच मिळाली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावी संगीत शिक्षकाची नोकरी केली.
आर्णीसारख्या खेडेगावांतून महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्रातल्या रसिकराजांवर गझल गायकीची मोहिनी घालणारा सुधाकर म्हणजे गझलनवाज, #गझलगंधर्व, गझलचा स्वरताज, सुधाकर गझल गायकीसाठी, आपलं अख्खं आयुष्य साधना, तपश्चर्या करून; गझलांना स्वरसाज देताना, धुंदीत आणि गुंगीतच जगला. रमला. खरं तर सुधाकरचा अवतार सुफियाना गायकालाच शोभणारा. चेहऱ्यावर कारुण्यभाव, जगातलं दुःख नष्ट व्हावं ही चिंता. मानेवर वाढवलेल्या केसांच्या बटांची शाही झालर, गहुवर्णी देहयष्टी. जणू आपल्याच धुंदीत गाणारा फकीर, आपल्याच मस्तीत आणि धुंदीत जगला आणि रमलाही. खरंतर सुधाकर म्हणजे, गझल गायकीचा वारकरीच. अजूनही त्याचा रियाज, गायकी आणि गायकीची वारी थांबलेली नाही.
गायन हा सुधाकरचा श्वास आहे. प्राण आहे. आत्मा आहे. गझलेच्या देहातला श्वास, आत्मा गायनाच्या स्वरानं उजागर करण्याच्याच साधनेत रत असलेला हा कलावंत आहे. म्हणूनच कवी सुरेश भट, संगीतकार यशवंत देव, राम पंडीत, पत्रकार अनंत दीक्षित, कवी श्रीकृष्ण राऊत आदिंसह सर्वदूर रसिकांनीही सुधाकर कदमच्या गझल गायकीला हृदयात अढळ स्थान दिलं आहे. #आद्य_मराठी_गझल_गायक आणि #गझलनवाज म्हणून समाजानं त्याचा गौरवही केला आहे.
सन १९७५ पासून तर आजतागायत सुधाकर कायम गझल गायकीचा रियाझ करीतच आहे. '#अशी_गावी_मराठी_गझल' या गझल गायनाचे शेकडो धुंद करणारे कार्यक्रम सुधाकरनं आजवर केले आहेत. खुद्द सुरेश भटांनी सुधाकरच्या गझल गायन कार्यक्रमात गझलांचं निवेदन केलं आहे. सुरेश भटांनी गझलेला शब्द दिला. मराठीत गझल अजरामर केली. सुरेश भटांच्याही आधी माधवराव पटवर्धनांनी गज्जलांजली (१९३५) पहिल्यांदा मराठीत आणली. पुढे मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकरांसह अनेक दिग्गज कवींनीही गझलचा प्रभाव लक्षात घेऊन गझल लेखनात उमेदवारी केली. परंतु मराठी रसिकांच्या हृदयावर साम्राज्य केले ते गझलसम्राट सुरेश भट आणि गझलराज कवी श्रीकृष्ण राऊत यांच्या हृदयस्पर्शी गझलांनीच. मराठी गझलला लोकप्रिय आणि रसिकमान्य करण्यात या दोन्ही कवींचं योगदान अनन्यसाधारण आहे. गझलेला दिलेल्या शब्दांना अस्सल स्वरांची गायकी दिली ती आद्य मराठी गझल गायक सुधाकर कदम यांनी.
सुरेश भटांची गझल आणि सुधाकरची गायकी, असा दीर्घ प्रवास विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात झालेला आहे. विशेष म्हणजे गझलसम्राट विदर्भपुत्र सुरेश भटांनी गझलेला दिलेल्या शब्दांना स्वरांचा साज चढविण्याचे महत्कार्य विदर्भपुत्र सुधाकर कदमांनीच सुरुवातीच्या काळात केले. सुरेश भटांच्या लोकप्रियतेला सुधाकरनं स्वरांची सलामी दिली. गझल गायकीत सुधाकरने आपले अनन्यसाधारण स्थानही कमावले. मराठी गझल गायकीची सन १९७५ पासूनच सुरूवात करून मराठी गझल गायकीला भूमीही उपलब्ध करून दिली. पुढे विदर्भातील अकोल्याचे गझलनवाज भीमराव पांचाळेनी गझल गायकीत सर्वदूर चार चांद लावले. याच पाऊलवाटेवर राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार, माधव भागवत, रफिक शेख यांनीही गझल गायन क्षेत्रांत गायकी विकसित केली आहे. सुधाकरनं मराठी गझल गायकीची वहिवाट निर्माण केली, हे त्याचे योगदान मराठी गझल गायन क्षेत्रांत अलौकिक मानायला हरकत नाही.
खुद्द सुधाकर गझल गायनाबाबत म्हणतो, गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकारांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या सुरावटी तयार कराव्या लागतात. संगीत हे केवळ तंत्र नसून अंतर्मनातून स्फुरणारी ती एक शक्ती असून ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. मात्र त्यासाठी
तपश्चर्या करणे आवश्यक असते. कोणतीही कलासिध्दी अंत:करणाला पिळवटून निष्काम साधनेनंच प्राप्त करता येतं. खरंतर कलासाधना ही मुळात ईश्वराचीच भक्ती असते.सुधाकर कलेला ईश्वरप्राप्तीचे साधन मानतो. खरेतर कलेला ईश्वररूप मानणारा हा कलावंत कलेश्वराचाच भक्त आहे. कलेच्या भक्तीतूनच तो कलेचे अद्वैत साध्य करतो.सुधाकरला कलेचे अद्वैत साधले आहे. कलेच्या भक्तीतून गायकीच्या मुक्तीकडे त्याने
आजवर प्रवास केला आहे.
कलेला पांडुरंग मानणारा हा स्वरांचा वारकरी आहे. पांडुरंगपुत्र आहे. सुधाकरला पांडुरंगानंच जन्म दिला. ज्याचा बापच पांडुरंग, त्याच्या कलाभक्तीला कोण अवरोध करणार? स्वरांचा सुधा-कर कलेचं दैवत पांडुरंगाची भक्ती करतो. गझल गायकीचं पंढरपूर निर्माण करणारा सुधाकर गझलेच्या पांडुरंगाचा निस्सिम वारकरी आहे. केला अभिमान पावठणी, ही वृत्ती अंगी बाणल्यामुळे कमालीची नम्रता, लिनता त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देताना दिसते. कलावंताला अभिमानच पचवता येत नाही. अभिमान सोडून बाकीचं सर्वकाही पचवता येतं. सुधाकर कदम हा कलावंतांचं मानबिंदू तर आहेच, परंतु कलासाधक म्हणून तो आजवर जगत आला. जगत राहील यावरही विश्वास आहे..
कलावंताला पूर्णत्वाचा ध्यास असतो. पावठणी तुडविल्याशिवाय कोणताही कलावंत कलेच्या पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही, सुधाकर कलावंत आणि कलासाधक म्हणून कलेला,
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावर ठेवोनिया ||
मानूनच एकाग्रचित्तानं स्वरांची नवनवोन्मेषशाली निर्मिती करतो. शब्दांचे अर्थविश्व स्वरांच्याच नजाकतीतून उलगडून दाखविण्यासाठीही तो कायम साधनारत असतो. सुधाकर कलेला पांडुरंग मानतो.
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार |
मज विश्वंभर बोलवितो ॥
किंवा
माझे सर्व भांडवल ।
बोलविले बोल पांडुरंगे ।।
असंच मानतो. म्हणूनच, कलेचे अद्वैत किंवा कलेच्या पूर्णत्वाला पोहोचण्याची कलासाधकाच्या मुक्तीची वाट त्याला सापडली आहे. सुधाकर गायन कलेचा वारकरी आहे. कलामुक्तीच्या परमोच्च वाटेवरून प्रवास करणारा अस्सल कलासाधक आहे.
सन १९८० ते १९८३ या चार वर्षात सुधाकर कदम आणि कवी सुरेश भटांनी 'अशी गावी मराठी गझल' हा तीन तासांचा गझल गायनाचा कार्यक्रम पहिल्यांदा सुरू करून सर्वदूर लोकप्रिय केला. संगीतकार यशवंत देव यांनी आणि अनेक गझलकार, कवी, पत्रकार, चाहत्यांनी सुधाकरचा गौरवही केला. सन १९८१ मध्ये गझल गायनाची पहिलीवहिली ध्वनिफित भरारी या नावानं आली. सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, सतीश डुंबरे यांच्या गझलांना नव्यानव्या चाली आणि स्वरांजली देऊनच; अणूरेणू या थोकडा, सुधाकर आकाशाएवढा अशी भरारी सुधाकरनं संगीत आणि गायन क्षेत्रात घेतली. सुधाकरनं अनेकांच्या गझलांना स्वतःच्या चाली दिल्या. स्वयंभू स्वरही दिले. बहुतांश सुधाकरनं सुरेश भटांच्या गझलांना मात्र स्वरसाज चढविला. मराठीत ताकदीनं गझल लिहिणाच्या श्रीकृष्ण राऊतांच्याही गझलांना स्वर आणि आवाज दिला. कवीच्या शब्दांच्या खोलीत दडलेला आशय आणि अर्थाना, सुधाकरनं गायकीतून उजागर केले. कवीच्या शब्दतळाशी जाणे सोपे नव्हते. सुधाकर कवींच्या शब्दतळाशीच नव्हे तर शब्दडोहापर्यंत पोहून येतो. नंतरच तो शब्दांना स्वर आणि सांगितिक रचनांचा ईश्वरी सांजशृंगार चढवून रसिकांसमोर सादर करतो. मंत्रमुग्ध होणे कसे असते? हे सुधाकरच्या गझल गायकीने मैफिलींनी मराठी रसिकांना शिकविले. सुधाकर हा गझलेच्या सुरांनी संबंध परिसराला रोमांचित करणारा आणि मंत्रमुग्ध करणारा कलावंत आहे.
सुधाकर कदम १९६५ (ऑर्केस्ट्रा) पासून अथकपणे जीवाची आणि तब्यतेची पर्वा न करता कलासाधना करीतच आहे. नव्या चाली आणि नवे सूर देण्याची त्यांची तळमळ अस्सल असते. सुधाकरच्या गायकीचा आजवर मोठा गौरवही झाला आहे. स्वरराज छोट्या गंधर्वांनी सन १९७५ मध्येच, मराठी गझल गायकीच्या नवीन वाटेचा वाटसरू संबोधून चाळीस वर्षांपूर्वीच सुधाकरचं कलावंतपण उमेदीतच भक्कम मानलं होतं. पंडित जितेंद्री अभिषेकींनी, सुधाकरच्या सातत्य आणि परिश्रमपूर्वक कलासाधनेला यशाची गुरुकिल्ली मानली. गझलसम्राट कवी सुरेश भटांनी सन १९८१-८२ मध्येच सुधाकरला 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन' आणि 'गझलनवाज' ह्या मौलिक उपाधींनी गौरविले. गजानन वाटवेंनी, 'मला आवडलेला गझलिया', तर डॉ. यु. म. पठाणांनी, 'मराठी गझलेस स्वरसाज चढविणारा कलावंत' म्हटले. मा. सुधाकरराव नाईकांनी, 'शब्दस्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार' म्हणून गौरव केला. समाजाच्या आणि संस्कृतीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सुधाकरच्या गझल गायकीचा आजवर गौरवच केला आहे.
सन १९८३ ते आजतागायता सुधाकरला अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनीही गौरवांकित केले गेले. समाजगौरव पुरस्कार, संगीतभूषण पुरस्कार, मॅन ऑफ दि इअर, आऊटस्टँडिंग यंग पर्सन, कलादूत, कलावंत, शान-ए-गझल, गझलगंधर्व, गझल गंगेच्या तटावर, भट गझल पुरस्कार, महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार. सुधाकरचे म्युझिक अल्बमही दरम्यानच्या काळात गाजले. खपलेही. #भरारी (मराठी गझलांचा पहिला अल्बम), #झुला (पाठ्यपुस्तकातील कविता), #अर्चना (भक्तिगीत), #खूप_मजा_करू (बालगीतं), #काट्यांची_मखमल (मराठी गझल) तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी गीतांची स्वरलिपी #सरगम , #फडे_मधुर_खावया (विविध विषयांवरील ललित लेखसंग्रह)#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा आणि #काळोखाच्या_तपोवनातून हे काव्यसंग्रह ही पुस्तकेही सुधाकरच्या कलासाधना आणि कलालेखणीतून साकार झाली आहेत.
गौरवानं धुंद होण्यापेक्षा सुधाकरला कलासाधनेतच धुंद होता आलं. गौरव आणि मानसन्मानांनी सुधाकर मोहरला नाही. उलट सुधाकरचे स्वर अधिक मोहरले. कलावंताला गौरवानं मोहरण्यापेक्षा कलेतच अधिकाधिक मोहरता-फुलता-बहरता आलं पाहिजे. सुधाकरला हे जमलं. सुधाकरला कलेची वारी करणारा वारकरी होणं जमलं. खूप कलावंतांना कलावंत तर होता येतं. परंतु कलेचा वारकरी होणं नाहीच जमत. सुधाकर याही अंगाने स्वतःचं वेगळेपण जपत आला आहे. कलेशी कुठलीही तडजोड त्याने केली नाही. कलावंत म्हणून तो कधी याचक बनला नाही. सुधाकर कलासाधकच बनला. कलावंतांच्या तडजोडी कायम नाकारत कलेच्या धुंदीत, गुंगीतच आपल्या स्वरांचं अस्सल इमान त्याला एकाकीपणातही जपता आलं. इमान जपणारा कलावंत आजच्या मानसन्मानासाठी हपापलेल्या कलावंतांच्या जगात शोधूनही कुणी सापडत नाही. सुधाकर त्याला अपवाद आहे.
सुधाकर हा जसा एक लोकप्रिय गायक आणि कलावंत आहे. तसाच तो अत्यंत हळवा.. संवेदनशील, कनवाळू माणूसही आहे. बरेचदा कलावंतांना आपलं माणूसपणच टिकवता येत नाही. कला आणि अहंकार टिकविता टिकविता माणूसपण केव्हा गळून पडले, हेही कळत नाही. सुधाकरने माणूसपणही टिकविल. माणूस म्हणून कुटुंबावर-समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटूंबावर समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटुंबावर अगाध प्रेम केलं. या माणसाला कधी राग येतो का? कधी अहंकार जागा होतो का? कधी हा कलेचं मार्केटिंग करू शकतो का? असे अनेक प्रश्न आम्हा मित्रमंडळीत कायम उपस्थित होतात. अस्सल वैदर्भिय वऱ्हाडी बोलीतून, काय गड्या किती दिवसांनी तुला भेटता आलं? अशी सुरूवात करणार. समाजातल्या सर्वच स्तरांतल्या लोकांशी जवळीक साधून, सुधाकर असंच अघळपघळ बोलून, गळ्यात हात टाकणार. पाठीवर शाबासकी देणार. सर्व बिरूदे विसरून प्रेम करणे सुधाकरला जमले.
सुधाकर म्हणजे बोलघेवडा. पटकन् लहान मुलासारखा घरात विरघळून जाणार.. लेकराबाळांसह सर्वांशीच युगायुगाचे नाते मानून बोलणार. सुधाकरच्या अंत:करणात एक कुटुंबवत्सल माणूस आणि निरामय प्रेम करणारा सहोदर मित्र दडलेला आहे. जिवघेण्या आजारातून परतल्यावर तो गंमतीनेच मृत्यूच्या दाढेने काबूत घेतल्यावर आपण कसे मृत्यूशी झुंजलो आणि मृत्यूला पराभूत करून मित्रांना भेटायला आलो, हेही सांगणार. सुधाकर कदम म्हणजे एक आनंद. आनंदाचे डोह, आनंदाची पर्वणी, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. सुधाकरच्या मुली, पत्नी, निषादही सुधाकरचेच शोभणारे वत्सल आणि प्रेमळ रूप. सबंध महाराष्ट्रातच सुधाकरचे मैत्रमंडळ. जेथे जातो तेथे तूच माझा सांगाती, हीच वृत्ती सुधाकरला जगण्याची ऊर्जा देणारी आहे.
सुधाकरने गझल गायनाची सार्वजनिक सुरूवात सन १९७५ नंतर केली. सन १९८० ते १९९० पर्यंत सुधाकर गझल गायक म्हणून गझलनवाज, शान-ए-ग़ज़ल बनला. सन १९९० नंतर गझल गायनाच्या क्षेत्रांत अन्यही अनेक कलावंत उमेदवारी करू लागले. सुधाकरला उमेदवारी करण्याची आणि टिकविण्याची गरजच नव्हती. सुधाकर तर मराठी गझलांना स्वरसाज देणारा आद्य अभिजात कलावंत माणूस. गझलांना चाली, ताल, लय, अर्थघनता, नवस्वर देणारा स्वरसम्राट. गायकाच्या जातकुळीत जन्मून, कलेची वारी करणारा पांडुरंगमय कलासाधक. कलेचा वारकरी जेव्हा कलासाधनेतून पांडुरंगमय होतो, तेव्हाच कला आणि कलावंताचं अद्वैत साकार होते. कोणत्याही कलावंताचं अंतिम ध्येय कलेच्या मुक्तीचा आनंद अनुभवणे असते.
आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ॥
काय सांगो झाले काहीचियेबाही ।
आता पुढे चाली नाही आवडीने ॥
या अद्वैतानंदाच्या स्थितीत कलासाधनेचा आनंद लुटणे, हे परमभाग्य ज्याला मिळाले, त्या कलावंताचे नाव आहे, गझलनवाज, गझलगंधर्व, गझलस्वरताज, गझलगायक सुधाकर कदम. कलेचा परम वारकरी. गझल गायकीचाही पांडुरंगमय पांडुरंगपुत्र सुधाकर कदम.
No comments:
Post a Comment