गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, October 3, 2022

अर्चना..


श्रीहरी रे श्रीहरी
नाद केवळ एक घुमतो श्रीहरी रे श्रीहरी

तिमिर झाला कृष्ण आता राधिका ही शर्वरी
तारकांचे चाळ गाती श्रीहरी रे श्रीहरी

आसवांचे सूर झाले पापणीची बासरी
भाविकांचे भाव गाती श्रीहरी रे श्रीहरी

गीत गुंजित प्राण झाले शब्द केवळ श्रीहरी
श्वास विरती शब्द वरती श्रीहरी रे श्रीहरी

गायिका - अनुराधा मराठे
गीत - आशा पांडे
संगीत - सुधाकर कदम
संगीत संयोजन - मिलिंद गुणे
प्रास्ताविक - रेणुका देशकर

●क्षणचित्रे - यशवंतराव नाट्यगृह,पुणे.

#भक्तीगीत #संगीत #music #composition #गायन


 

मज कळले तू माझी...उ.रा.गिरी

.     स्व.उ.रा.गिरींचे खालील गीत मी अनेक कार्यक्रमातून गायिलो आहे.१९७५ ला ऑर्केस्ट्रा सोडल्यानंतर काही काळ गीत-गझला,सरोद वादन असे सोलो कार्यक्रम करायचो. त्यावेळी साउंड सिस्टीमवाल्याने कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले तर ते मिळायचे.पण बहुतेक एम्प्लिफायर व माईक अशीच साउंड सिस्टीम असायची.समोर मॉनिटर पण नसायचे.रसिकांची दाद मिळाली की,कार्यक्रम व्यवस्थित चालला आहे असं समजायचं.
     सुरेश भट व मी महाराष्ट्रभर फिरलो तेव्हाही अशीच परिस्थिती होती.त्यावेळी जी जी गीते व गझला कार्यक्रमात ध्वनिमुद्रित झाल्या नाही त्या त्या गाऊन पुनश्च आपल्यासमोर ठेवण्यासाठी व्होकल कॉर्ड्सचा त्रास असूनही प्रयत्न करतो आहे.कृपया गोड करून घ्या!
        ह्या गीताची सुरावट त्यातील शब्दांप्रमाणे अनेक वळणे घेणारी आहे.कुठे भैरवी, कुठे तोडी तर कुठे बिलासखानी तोडी.हे गीत माझ्या कार्यक्रमात हमखास दाद घेत असे.आता नरडं चालत नसल्यामुळे 'त्या' प्रकारचे सादरीकरण जमत नाही.पण एका संगीतकाराची बंदिश म्हणून तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता.धन्यवाद!

●Mobile REC.... headphone please

मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर
तू माझ्या गगनातुन उल्केपरी  ढळल्यावर

कळत न ही आज कुठे वनवासी वाट वळे ?
स्वप्नाच्या सरितेवर ही कुठली लाट जळे ?
हरवुन संदर्भ उभे जळ कुठल्या वळणावर

डोळ्याचे डोह दोन भरून आज आलेले
अश्रूंच्या पावसात चांद्रबिंब न्हालेले
क्रुसावर सनईच्या चंद्रकौंस खिळल्यावर

अजून कापऱ्या जळात प्रतिबिंबित आठवणी
अजून विराणी तळात गात कुणी जलराणी
एक कहाणी विझली मूक नदी काठावर
-----------------------------------------------------------------------
मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचा सुरेल कार्यक्रम गायक मयूर महाजन करतो..  
                      ● #सरगम_तुझ्याचसाठी ●



 

 

कोमल हृदयाचा रांगडा कवी...शिवा राऊत


     शिवबा रोडबाजी राउत म्हणजे आमचा शिवा राऊत होय.साधा, भोळा,निरागस शिवा, कसा जगला यापेक्षा त्याने साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा कसा उमटवला हे पाहणे महत्वाचे ठरते. सतत मुशाफिरी करणारा रांगडा शिवा स्वतःकडे जरी दुर्लक्ष करीत होता,तरी कवितेचा बाबतीत मात्र अतिशय हळवा होता. आर्णीला (जि.यवतमाळ) असताना प्रवासात जर कविता सुचली तर, सरळ आपल्या पायजाम्यावर लिहायचा.नंतर स्टँडवरून सरळ घरी माझ्याकडे येऊन त्याची एक वही होती,त्यात लिहून ठेवायचा.(ती वही मी जपून ठेवली आहे.)
      कविता सुचणे व पाडणे यात खूप फरक आहे.शिवाने कविता कधीच पाडली नाही.ती आपसूकच आलेली असायची.

अंगांगी कृष्णमिठीने
जन्माचे देऊळ सजले
गोपुरे रचावी त्याचा
हा अक्षर उत्सव चाले

मराठी कवितेला आपला वेगळा बाज देणारा शिवा सतत दुःख झेलत जगला.वेदनांच्या अंतरद्वंदात फसलेला हा विदेही कवी सध्याच्या चकचकीत जगात

मी तो या मातीची
उन्ह विराणी वो
अभंगाला टाहो
वादळाचा...

म्हणत उपेक्षित जीवन जगला.तरी शब्दकळा मात्र त्याची म्हणजे फक्त त्याचीच होती.

सायीच्या सुईने 
काढलास काटा
डोळे पाणवठा
पुनवेचा...

अशा आतडे सोलून काढणाऱ्या ओळी अभंग रूपाने इतक्या ताकदीने मांडणारा शिवा त्या काळातील एकमेव होता असे म्हटले तरी चालेल.
      यवतमाळ जिल्ह्यातील वेणी नावाच्या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या शिवा खेड्यातच वाढला.मोठा झाला व खेड्यातच संपला.त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी पाहिल्यावर त्याने हे सगळे कोठून मिळविले हा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा.यावर त्याला छेडले असता तो ही समर्पक उत्तर देऊ शकत नसे.कारण अंतर्मनात उफाळलेल्या कल्पनांना शब्द कसे दिल्या जातात हे त्यालाही कळत नव्हते, नसावे. वृत्त्ताकरिता मात्रा मोजायची त्याला कधी गरजच पडत नव्हती. जे काही यायचे ते मुळातच रेखीव,बांधीव असायचे.

स्वप्न प्रहरी धुकाळ धूसर डोंगर पसरण
जशी दुरातुन दिठीत आली भिजली गवळण
अल्याड डोंगर पल्याड गंगा
मधि मारोती गावधुरंधर
उतार भांगातुन कौलाच्या
उन्हे सांडती मोत्याचा चुर
या पूनव पहाटे आला
पाऊस कशाला बाई
ओलेसे अंगण झाले
वाऱ्याला नाचण घाई

अशी अनेक उदाहरणे देता येतील.

      एकदा असेच शिवा म्हणाला "दादासाहेब (तो मला दादा म्हणायचा) तुम्ही आकाशवाणीवर माझ्या कविता गात नाही याचे कारण काय?"
मी म्हणालो, "तुझ्या कविता समजायला जरा कठीण असतात,त्यामुळे लोकांना त्या आवडतील की नाही या भीतीपोटी मी गात नाही."
त्यावेळी शिवा काहीच बोलला नाही. ४/५ दिवसांनी मात्र माहूरच्या रेणुकादेवीवरील एक अप्रतिम रचना  मला आणून दिली व काही न बोलता निघून गेला.मी बघतच राहिलो.ती रचना होती...

घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली
उदे उदे जगदंबे गे रेणुके माऊली...

      माझ्या डोळ्यात खळकन पाणी आलं! ताबडतोब त्याच मूडमध्ये हार्मोनियम घेऊन बसलो पण योग्य अशी चाल काही सुचेना.असाच एक महिना निघून गेला.या एक महिन्यात शिवाने अवाक्षराने सुद्धा मला याबद्दल छेडले नाही.एक दिवस अचानक शिवरंजनीच्या स्वरांनी स्वतःहून या कवितेला सजवलं व मी आकाशवाणीवर (नागपूर) गायिलो.प्रसारणानंतरचा शिवाचा आनंद पाहून मला गहिवरून आले.अशा लहान सहान बाबींनी हरखून जाणारा शिवा एखाद्या निरागस बालकासारखा दिसायचा.
     लग्न झाल्यावरही कौटुंबिक पाश त्याला बांधून ठेवू शकले नाही.या मोहमयी दुनियेत त्याला फक्त एकाच गोष्टीचा मोह होता...तो कवितेचा.त्यांचेकडे बघताना मला का कोण जाणे गाडगे बाबांची आठवण व्हायची.तसे दोघांमध्ये काहीच साम्य नाही.पण मला मात्र वाटायचे...
कदाचित निरागसता व चेहरेपट्टीमुळे असू शकते.गाडगे बाबांनी कशाचाही मोह न करता समाजातील अंधश्रद्धेची जळमटं दूर करण्याचा प्रयत्न करून जनता जनार्दनची सेवा केली.तर शिवाने मोह मायेच्या पल्याड जाऊन साहित्य सेवेत स्वतः ला समर्पित केले.

किती आवर्तने एका समर्पणासाठी
आक्रंदने अधांतरी अंधार हाकाटी
भुकेमुळे ओठ ऊर अपंग पाचोळा
उभा जीव मायपाश देह लोळा गोळा

       अभंग लिहिणारा शिवा आतल्या आत दुभंगत राहिला.हा दुभंग सांध होणे   त्याला शेवटपर्यंत जमले नाही.सध्याच्या जगातील व्यवहार वाद त्याला कळला नाही.प्रसिद्धीसाठी कराव्या लागणाऱ्या लटपटी खटपटी त्याला जमल्या नाही.तो त्याचा पिंड ही नव्हता.खरे म्हणजे त्याच्या कविताच इतक्या जबरदस्त होत्या की,प्रसिद्धी त्याला शोधत यायची.नागपूरच्या तरुण भारत या वर्तमानपत्रातून वामन तेलंग यांनी शिवाला अक्षरशः उचलले व लोकांपर्यंत पोहचवले.आपल्या कविता,कथा छापून याव्या म्हणून नाना प्रकार करणाऱ्या साहित्यिकांच्या जगात शिवासारख्या सरळसोट माणसाच्या कविता कोणत्याही लाग्या बांध्या शिवाय छापून यायला लागल्या यातच शिवाच्या कवितांचे वेगळेपण दडले आहे.या हिऱ्याचे पैलू रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम दै. तरुण भारत ने त्याच्या हयातभर केले.तसेच नागपूर आकाशवाणीच्या बबन नाखले यांनीही शिवाला जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्भेळ प्रयत्न केला. दै.मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांनीही त्याला व त्याच्यातील कवीला जगवले. 
'सो कोल्ड सोफ़ॅस्टीकेटेड ' लोकांनी त्याचे मद्यपान बंद असेपर्यंतच त्याला थारा दिला.पण मित्र मंडळींनी मात्र त्याला गुण दोषांसह स्वीकारला होता.

नसे आकाशात 
दहा पाच सूर्य
रत्न शिरोधार्य
एखादेच...

      शिवाच्या कवितांवर ग्रेसांप्रमाणे दुर्बोधतेचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला.पण रसिकांनी मात्र त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीचा आणि देखण्या शब्दकळेचा भरपूर आनंद घेतला. यवतमाळ चा कवी गजेश तोंडरे म्हणतो,"शिवाचा अभंग वाचकाला प्रथम मोहवतो,नंतर काळीज सोलून काढतो."

मांडता न आला
दुःखाचा हिशेब
वारंवार नभ
साकळे वो...

नाचो येते मन
हळू गळे पिस
मयुर उदास
आनंदाचा...

     अशा ग्रेसांच्या तोडीच्या या कवीच्या कवितांवर धूळ बसत चालली आहे,ही दुःखाची गोष्ट आहे.आपापला त वा गरम करणाऱ्यांच्या या युगात शिवाचा तवा थंड व्हायला लागला आहे. जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या शिवाला मृत्यूनंतरही न्याय मिळाला नाही.यात नुकसान कोणाचे? शिवाचे की मराठी भाषेचे?
शिवाच्याच शब्दात म्हणावेसे वाटते...

नका करू कधी
मने उकिरडा
अश्वमेध काढा
मानव्याचा...

शिवाने फक्त अभंगच लिहिले असे नाही.

देठ दुखरा हात झाला,चढत गेली बांगडी
काय पुसशी मैत्रिणीला ,गोष्ट थोडी वाकडी
.
बरड भुकेल्या मुखात आचळ पिळून आला पाऊस पान्हा
पुलकित झाले डोंगर काळीज निळा सावळा झेलुन कान्हा
.
नाच पोरी नाच,तुझ्या चा लाला काच
डोळ्यात तिढा पाण्याचा पाढा
गरत्या फिरत्या तालात नाच...
.
विरहात कोंदलेले काळीज मुक्त झाले
आणि मुक्या स्वरांना बिलगून शब्द आले
.
आसवांचे मूळ कोठे ना कळे
आतल्या आतून सारे उन्मळे
.
डोळा घालून घोटाळा केला
उभ्या गावाच्या कानात गेला
पाडपिकल्या देहाची बाई
चव हा सव हुस व होई
कशी सांगू मी चारचौघी ला
.
तू करूणाकर, तूच चराचर, व्यापुनि उरला दशांगुळे
तू अविनाशी, विघ्न विनाशी, तू तेजाची सूर्यकुळे 

      एकाच आवर्तनात न फिरता अशा विविध भाव - भावनांच्या कविता शिवाने लिहिल्या.त्या महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचाव्या तसेच शिवाचा अल्पसा का होईना परिचय व्हावा यासाठी हा अल्पसा प्रयत्न....
कारण

त्यांनी आतड्याचे
सोहळे मांडले
दिले अजिर्णाला
आवतन...

- सुधाकर कदम
--------------------------------------------------------------------------
३०/३२ वर्षांअगोदर स्वरबद्ध केलेली शिवाची 

'घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली
उदे उदे जगदंबे हे रेणुके माऊली...'

गाण्याचा प्रयत्न गोड करून घ्यावा,ही नम्र विनंती...
  • ●Mobile REC...headphone please


 

जो भी तेरी गली मे आता... हनीफ़ साग़र

 






संगीत आणि साहित्य :