गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, October 3, 2026

'जे न देखे रवी... (खुसखुशीत)

               

     'जे न देखे कवी' ही उक्ती किती सार्थ आहे ते आमच्या येथील एका कवीच्या 'अक्षरांच्या वेदनेची वैखरी क्षितिजावरी, अक्षरांचे जोंधळे  दळते जनी जात्यावरी' या ओळींवरून कळते.काही वर्षांपूर्वी राबविलेल्या महाराष्ट्र 

शासनाच्या प्रौढ साक्षरता मोहिमेमुळे अनेक कवींना आपल्या सुप्त गुणांची जाणीव होऊन ते कविता करायला लागले होते.त्यापैकी काहींनी आपल्या मेहनतीने संभाजीनगर, मुंबई ते दिल्ली अशी मुसंडी मारली.साक्षरता मोहिमेचे इतर फायदे काय आहेत ते न पाहता कलावंतांच्या दृष्टीने विचार केला, तर त्यांचा मात्र या मोहिमेमुळे खूप फायदा होऊन ते लोकांच्या नजरेपुढे आले.

    'कवी जन्माला यावा लागतो' असे म्हणतात. म्हणजेच 'घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही!' वरील ओळी वाचल्यावर खरेच कवी जन्माला यावा लागतो? हा प्रश्न मला पडला.आता जन्मजात कवी कोणता व नंतर बनलेला कवी कोणता हे कसे ओळखावे हाही प्रश्नच आहे.कारण कवी काही एकाच प्रकारचे असतात असे नाही.प्रत्येकाचा बाज वेगळा असतो, जातकुळी वेगळी असते.जसे:- मुक्तछंदी कवी, छंदी (फंदी) कवी, पापड कवी,पावशा कवी (पावसावर लिहिणारा), गझल कवी, द्रोही-विद्रोही कवी, राजकवी, लोककवी, हास्य कवी, व्यंग कवी, रड कवी,शिमग्या कवी (फक्त शिमग्यालाच आपले कवित्व पाजळणारा), दीर्घ कवी, चौर्य कवी (दुसऱ्यांच्या कविता चोरून आपल्या नावावर खपवणारा), प्रस्थापित कवी,नवकवी आणि शेवटी शीघ्र कवी.(यात काही प्रकार सुटले असतील तर त्या त्या कवींनी मला उदार हृदयाने क्षमा करावी.)

     कवी आणि कविता यांचा संबंध फक्त कविता होईपर्यंतच असतो,असे आम्हाला वाटते. कारण प्रत्यक्षात तसा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला, तर निराशाच पदरी पडते.प्रेमकाव्य करणारा प्रेमात पडलेलाच असतो असे नाही.समरगीते लिहिणाऱ्याला समरांगण माहीतीच असेल असे नाही.गझल लिहिणारा कवी 'उमर खैय्यामच्याच' वंशातला असेल असेही नाही.तरी पण सर्वसाधारणपणे असेच असते असेही नाही.वऱ्हाडात धुमाकूळ घालणारा वऱ्हाडी हास्य कवी मिर्झा रफी अहमद बेग हा त्याच्या कवितांप्रमाणेच,स्वभावानेही विनोदी होता.लोकांना हसवणे किती कठीण काम आहे हे हसवणाऱ्यांनाच विचारावे.

त्यातल्या त्यात आपले दुःख सदैव पोटात घेऊन (किडनी स्टोन)  लोकांना हसवणे हे तर अतिशय कठीण.पण आपल्या वेदना विसरून रसिकांना आपल्या वेदना विसरायला लावताना त्याला मी पाहिले आहे.

          कवी हा समाजाला काही तरी देणे देतो असे म्हणतात.(नेमके काय देतो हे मला अजूनपर्यंत कळले नाही.) त्यामुळे त्याला समाजात एक वेगळे असे आदराचे स्थान प्राप्त झालेले दिसून येते.याच लालसेपोटी  आमच्यासारखे न-कवीही कवी होण्याचा प्रयत्न करतात व आपला सार्वत्रिक बँडबाजा वाजवून घेतात.

           समाजात कवी म्हणून आपल्यालाही आदराचे स्थान मिळावे म्हणून आम्ही सर्वप्रथम खादीचा लांबलचक बंगाली शर्ट व पायजमा शिवला.सोबत स्लीपरही आणली. या वेशाला पूर्णत्व येण्यासाठी शबनम आवश्यक असते, म्हणून तीही घेतली.एवढ्याने भागले नाही म्हणून दाढीही वाढविली व आपल्याच तंद्रीत असल्यासारखे वावरणे सुरू केले. पण लोकही चतुर.नुसत्या वेशांतराला ते भाळले नाही. म्हणून आम्ही मग कविता करायला तंद्री लावून बसलो. आमची ही थेरं सौभाग्यवती तटस्थपणे बघत होती. कारण आपला नवरा किती 'नवटंक्या' आहे हे तिला चांगल्या प्रकारे माहीत होते. लोकांनीच कुठे तरी हात दाखविल्याशिवाय हे सर्व थांबणार नाही हेही तिला  ठाऊक होते.(कवीची बायको असल्याच्या वेदना कवीच्या बायकोलाच माहीत.)

          तर मित्रहो! आम्ही कविता करायला बसलो पण 'आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? (आडे आणि पोहरे हे आडनाव या म्हणीवरून तर आले नाही ना?) खूप प्रयत्न करूनही नवीन काहीच न सुचता जुन्याच ऐकलेल्या कविता नजरेसमोर यायला लागल्या.

असे जवळ जवळ पंधरा दिवस निघून गेले. पण नवनिर्मीतीसाठी लागणारी प्रतिभाच जागृत होईना. शेवटी सगळ्या कवींच्या रचना वाचून काढायचे ठरवले.सरळ बाजारात जाऊन सापडतील तेवढे कवितासंग्रह व भक्तिगीतांची व भावगीतांची पुस्तके घेऊन आलो. आणि कविता पाडणे सुरू केले.


१. तुज सगुणा म्हणू की चांगुणा गं

     सगुणा चांगुणा मज दोघी आवडी गं


२. घराची तिजोरी, कुटुंबची ठेवा

    सर्व मिळुनी खाऊ देवा, रोज सुका मेवा

    पिती रोज दूध कुत्री, मांजरीही घरची

    कुणाही न वाटे कधीही, भीती मालकाची

    घरोघरी याच सुखाचा, वसो नित्य ठेवा

    सर्व मिळुनी खाऊ देवा रोज सुका मेवा...


३. भरून आहे पात्र अजुनी, बेवड्या निजलास का रे?

     एवढ्यातच झिंगुनी, तू असा पडलास का रे ?


     सांग, या मोसंबीच्या बंपराला काय सांगू?

     उमलला अंगांगी पेला आणि तू चिमलास का रे?


    ओठ झाले बंद का रे? श्वास झाले कुंद का रे?

    बोल बाजेच्या उरावर तू असा पडलास का रे?


    उसळती गुत्त्यात सगळ्या, 'गावरानी' धुंद लाटा

    तू रिकाम्या बाटलीसम कोरडा झालास का रे?


४. आजकाल रात्री लवकर झोपतात सारे,

     मी उगीच झिजवित बसतो नखांचे किनारे


     मला हीच पटली वस्ती, किती धुंद इथली मस्ती;

     इथे थाप देण्याआधी उघडतात दारे!


     कधी तरी तेव्हा चुकलो, एकदाच तेथे घुसलो;

     हळुच बाप पुसतो माझा 'तू इथे कसा रे?'


     वरील प्रकारच्या अनेक 'आशयघन' कविता आम्ही रचल्या व वर्तमानपत्राकडे पाठविल्या.पण नवोदितांची कदर करतील ती वर्तमानपत्रे कसली? काहींनी 'साभार परत'च्या शिक्क्यासह त्या वापस पाठविल्या, तर काहींनी तेवढेही सौजन्य दाखविले नाही.तरी पण आम्ही हिंमत न हारता, सर्व वर्तमानपत्राच्या संपादकांच्या नाकावर टिच्चून , एका कवीमित्राच्या लग्याने कविसंमेलनात वर्णी लावून घेतली.पण हाय रे दैवा! येथेही आमचे नशीब आडवे आले. आमच्या वऱ्हाडी शब्दकळेवर लोकांनी गदारोळ करून आम्हाला संमेलनातून हुसकावून लावले.तेव्हापासून आम्ही कवितेकडे बघणे सोडून दिले,लिहिणे वाचणे तर दूरच.

------------------------------------------------------------

दै. विदर्भ मतदार. रविवार पुरवणी दि. ४/९/२०२६

Friday, October 2, 2026

#भूप रागावर आधारित भक्तीगीत... आणि भूप रागावरील माझे विवेचन.



       जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाही. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील संगीत, काव्य,चित्रकला हया कलेचे रुप महत्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे.असे  क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.
        कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न होवून तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. १) आपल्या इंद्रियाद्वारे सौंदर्यास्वाद घेणे. २) आंतरिक अनुभूती ३) त्यात स्वत; हरवणे. यापैकी एका तरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. शब्द, छंद, अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे स्वर, ताल, लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे संगळे कलाकाराच्या आत उर्मी रुपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफ़ड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो,चित्र असो,एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच.    
        एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की, हे अमक्याने निर्माण केले,ते अमक्याने निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहित नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे.शास्त्रीय संगीतातील महत्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही.याचे कारण मी वर केलेल्या वक्तव्यात आहे.
       आजचा आपला विषय आहे. राग भूप... या रागात पाचंच स्वर आहेत. सा  रे ग ध प... सर्व स्वर शुध्द. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पूर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वगैरे वगैरे... परंतू खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफ़िलीतही हा राग फ़ार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायकसुध्दा त्याच्या वाटेला जात नाही. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतू खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या ’सहेला’ मुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल ऑफ दी व्हॅली”तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...
      भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी ’हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ’कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोर कुमार लता मंगेशकर. या रागात स्वरबध्द केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहे त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरब्ध्द केलेले व लताबाईनी गायिलेले ’भाभी की चुडिया’ या चित्रपटातील ’ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भुपाळी सुध्दा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दुर करणारी आहे. भुपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय द्दृष्ट्या सायंकाळचा आहे.तसेच ’लव्ह इन टोकियो’ या चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरब्ध्द केलेले आणि लताबाईनी गायिलेले ’सायोनारा...’ हे गाणे ही याच रागात आहे. मी सुद्धा पाठयपुस्तकातील कवितांच्या झुला या कॅसेटमध्ये 'धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान' याच रागात स्वरबद्ध केली आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ’रिषभावर’ मुर्छना केली की ’मधमाद सांरग’, ’गांधारावर’ मुर्छना केली की ’मालकौंस’, ’पंचमावर’ मुर्छना केली की ’दुर्गा’ राग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.'दिल हूम हूम करे' हे लताबाईंनी गायिलेले रुदालीमधील अप्रतिम गाणे भूप रागातच आहे.
      या वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर येणा-या भूपात  ’रंज की जब गुफ़्तगू होने लगी,आपसे तुम तुमसे तू होने लगी’ ही दाग़ यांची गझल गुलामअली गायले आहेत. मतला पूर्णपणे भूपात बांधला आहे. अंत-यातील...काही शेर भूपाला कल्याणाची जोड देऊन इतक्या सुंदर रीतीने सादर केले की तोंडून आपोआपच वाहव्वा निघून जाते. तानांच्या छोट्या छोट्या लडया,वरच्या पंचमापर्यंतची रुपक तालाशी खेळत खेळत केलेली स्वरांची कलाकुसर आपल्याला थक्क करते. सोबतच सुरेल ’नोटेशन’सह विविध प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण तिहाया,विवादी स्वर घेऊन विविध रागाच्या छटा दाखवून वाढवलेली रंजकता,मक्त्यामध्ये केलेले जयजयवंती रागाचे लोभस मिश्रण गुलाम अलीच्या परिपूर्ण गायकीची ग्वाही देते.या गझल सोबतचा तारिक हुसैन यांचा तबला म्हणजे ’सोने पे सुहागा...’! असा तबला भारतातील गझलच्या साथीदारांकडून ऐकायला मिळत नाही.यात त्यांनी टाकलेल्या तबल्याच्या विविध विधा,तुकडे,मुखडे आणि वेगवेगळ्या तिहाया हे दुसरे फार मोठे आकर्षण यात आहे.(मी स्वतः १९५८ ते १९६३ मध्ये यवतमाळला दादासाहेब पांडे यांचेकडून तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असल्यामुळे  तबल्या विषयी लिहू शकलो.) त्यामुळे राग जरी एकच असला तरी पण त्याची विविध रुपे आपल्यासमोर उभी राहतात.मला जर गझल गायन ऐकायला का आवडते ? असा कोणी प्रश्न केला तर, "#गझलमध्ये '#काव्य','#संगीत' आणि '#ताल' या तिन्हीची मजा घेता येते" हे माझे उत्तर राहील....
          
गझलगंधर्व
सुधाकर कदम
पुणे

Thursday, October 1, 2026

श्रेष्ठ कलाकार, श्रेष्ठ माणूसही! दिलीप पांढरपट्टे

     सुधाकर कदम यांचा माझा स्नेहसंबंध सुमारे पंधरा वर्षांचा आहे आणि दिवसेंदिवस हा स्नेह वाढतच आहे हे मी सुरुवातीलाच आनंदाने सांगू इच्छितो.

माझ्या आठवणीप्रमाणे ते मुंबईत बांद्र्याला झालेल्या गझल संमेलनात मला पहिल्यांदा भेटले.

     यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीहून ते लांबलचक आणि खडतर प्रवास करून मुंबईच्या या संमेलनात गझल सादर करण्यासाठी आले होते. त्यांची ही तळमळ आणि गझलसाठी प्रसंगी शारीरिक आणि मानसिक त्रास सोसण्याची तयारी मला तेव्हा खूपच भावली होती.

(त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास तेव्हाही होता, हे लक्षात घेतले तर त्यांच्या या प्रवासातले त्यांचे धाडस लक्षात येते.)

     त्याच संमेलनात 'शब्द झाले सप्तरंगी' या माझ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन झाले होते. तो संग्रह मी त्यांना आवर्जून भेटही दिला होता.या घटनेला सात-आठ वर्षे उलटून गेली आणि सुधाकरजींचा एके दिवशी

अचानक फोन आला. दरम्यानच्या काळात ते निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले होते आणि माझ्या काही गझलांना त्यांनी चाली लावल्या होत्या हे मला त्यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणातून कळले. त्यांच्या गायनाबद्दल आणि संगीतकार म्हणून असलेल्या त्यांच्या मातब्बरीबद्दल मला आधीपासूनच आदर होता. त्यामुळे या फोनमुळे मी साहजिकच हरखून गेलो आणि त्यांच्या चालींमध्ये त्यांच्याच आवाजात त्या गझला ऐकण्याची उत्सुकता वाटू लागली. यथावकाश आमची भेटही झाली; आणि त्या भेटीची #मैफल  कशी झाली ते कळलेच नाही. पुण्यातल्या वारजे इथल्या

त्यांच्या घरी पुढे अशा अनेक मैफली जमल्या. त्यांच्या कुटुंबियांच्या स्नेहशील स्वभावामुळे त्यांच्या घरी बसलो की, वेळ कापरासारखा उडून जातो हा अनुभव मला नेहमीच येतो.

     सुधाकरजी हे केवळ #गायक व #संगीतकार  नाहीत; तर ते एक चांगले वाचक आणि लेखकही आहेत. '#फडे_मधुर_खावया' या त्यांच्या छोटेखानी गद्य पुस्तकात अनेक खुमासदार लेख आहेत. त्यातून त्यांच्या बहुश्रुतेचे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याच्याउमद्या वृत्तीचे प्रत्यंतर येते.

     '#काट्यांची_मखमल' आणि '#तुझ्यासाठीच_मी' या दोन गझल अल्बममध्ये माझ्या गझलांना त्यांनी संगीतबध्द केले आहे. सुरेश वाडकर आणि वैशाली माडे या लोकप्रिय गायक-गायिकांनी या गझल गायिल्या आहेत. सुधाकरजींनी या दोघांकडून ज्या कौशल्याने या गझला गाऊन घेतल्या आहेत, ते केवळ थक्क करणारे आहे. त्यांच्या आजवरच्या संगीतसाधनेचा आणि व्यासंगाचा पुरा अर्क या गझल अल्बममध्ये उतरला आहे असे निश्चितपणे म्हणता येते.

     यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात बहुतेक सर्व आयुष्य व्यतीत झाल्यामुळे त्यांना मुंबई-पुण्याचा फारसा 'वारा' लागलेला नाही हे त्यांना भेटल्यावर एक-दोन मिनिटांतच कुणालाही सहज पटेल. प्रसिध्दीची फारशी सोय नसल्याने आणि त्यासाठी अंगी असावे लागणारे #तंत्र  ही त्यांच्याकडे नसल्याने ते म्हणावे तितके प्रसिध्दीच्या झोतात आले नसतीलही, पण तो त्यांचा पिंडच नाही असे मला वाटते. त्याची त्यांना फार खंतही नाही.कारण तो त्यांचा स्वभाव नाही. जीवन समरसून जगण्यावर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे आयुष्यात काय मिळाले, काय नाही याचा ते फारसा विचार करीत नाहीत, कधी केलाच,तर तो स्थितप्रज्ञतेने किंवा साक्षीभावानेच करताना ते दिसतात.

'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया,

हर फिक्रको धुएँमे उडाता चला गया'

अशा भावनेने जगणारा हा #कलंदर कलावंत आहे. 

म्हणून मला ते एक श्रेष्ठ #कलाकार  वाटतात आणि एक श्रेष्ठ माणूसही! 


- डॉ.दिलीप पांढरपट्टे

---------------------------------------------------------------------

●डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित गझलगंधर्व सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून...

गांधीजयंती... सुरेश भट.


 

म.गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन...


 

कविता... लालसा जोवरी.


 

Tuesday, September 29, 2026

दुःखाशी नाते जडता जडता जडते...

 .                                 


                                 -मैत्र-

१९६५ ते ७५ ऑर्केस्ट्रातील दगदग (त्यावेळी आमच्याकडे रेकॉर्ड प्लेअर वा टेपरेकॉर्डर नसल्यामुळे दुपारभर रेडिओवर हव्या त्या गाण्याची वाट बघत बसणे. ते लागले तर जीवाचे कान करून ऐकणे व कडव्यामधील म्युझिकचे लक्षात राहतील तेवढे पिसेस लक्षात ठेवणे.त्याची प्रॅक्टीस करणे.नंतर रात्री सर्व कलाकारांसोबत पुन्हा प्रॅक्टीस करणे.म्हणजे अकॉर्डिअन खांद्यावरच्या खांद्यावरच असायचे.आणि असे रोज चालायचे.)त्यातच, आकाशवाणी नागपूरचा मान्यताप्राप्त गायक,मेंडोलीन वादक असल्यामुळे दर दोन/तीन महिन्यात कार्यक्रम असायचा. त्याची प्रॅक्टीस. त्यानंतर तीन वर्षे सुरेश भटांसोबतची एस टी ने महाराष्ट्र भ्रमंती,#मराठी_गझल चे माझे एकल कार्यकम,ते पण एस टीचा प्रवास करतच,रात्री बेरात्री खाणे,जागरण,गाण्याचा अतिरिक्त रियाज,सरोद वादन,सकाळची शाळा करून सायंकाळी ४ ते रात्रीचे १० वाजेपर्यंत संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांना बैठक मारून  शिकविणे,समाजकारण,राजकारण...

या सगळ्या उपदव्यापामुळे मला पाठीच्या दुखण्यासोबतच व्होकल कॉर्ड्सचा पण त्रास सुरू झाला .त्यामुळे १९९० नंतर जाहीर मैफलीतून गाणे बंद केले.म्हणून मग मी स्वरबद्ध  केलेल्या गीत-गझलांचा कार्यक्रम माझ्या मुली भैरवी व रेणू करायला लागल्या होत्या.तबला संगत निषाद व हार्मोनियम संगत मी करायचो.२००३ ला पुण्याच्या अनिल कांबळे या गझलकार मित्राने त्याच्या "#पोएट्री_फाउंडेशन' संस्थेद्वारे एस.एम.जोशी सभागृहात #सरगम_तुझ्याचसाठी हा मुलींचा कार्यक्रम आयोजित केला होता.सूत्र संचालन अकोल्याचे प्रसिद्ध कवी #नारायण_कुळकर्णी_कवठेकर यांनी केले होते.या कार्यक्रमात मनोहर रणपिसेंची सुंदर प्रकारे स्वरबद्ध झालेली हळवीशी रचना दोघींनी सादर केली होती.तीच रचना मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे यांच्या आवाजात पदरमोड करून नुकतीच रेकॉर्ड केली आहे.गोड करून घ्यावी.ही नम्र विनंती.

●mobile REC... headphone please


दुःखाशी नाते, जडता जडता जडते

हे मैत्र अनोखे, घडता घडता घडते


घुटमळत राहते, फांदीवर स्वप्नांच्या

पाखरू प्रितीचे, उडता उडता उडते


डोळ्यात असावे सहज कधी का येती

भरतीचे पाणी, भरता भरता भरते


प्रेमात मनाच्या सुरेल जुळती तारा

हृदयास हृदय पण भिडता भिडता भिडते


-मनोहर रणपिसे

Monday, September 28, 2026

हृदयी फुलली फुले...

 


.                            हृदय दिनानिमित्त एक आठवण...                   

     सत्तरच्या दशकात दहावी लोअर व अकरावी हायर मॅट्रिक असल्यामुळे दहावी नंतर सरळ महाविद्यायात प्रवेश मिळायचा.पहिल्या वर्षाला 'प्रि युनिव्हर्सिटी' म्हणायचे.त्यावेळी यवतमाळला दोन महाविद्यालये होती.१.अमोलकचंद महाविद्यालय व २.वाणिज्य (हे दाते कॉलेज म्हणून प्रसिद्ध होते) महाविद्यालय.माझी दहावीतील हुशारी पाहून (म्हणजे आत्मपरीक्षण करून आपल्या लायकीप्रणे) अमोलकचंद महाविद्यालयात प्रवेश घेतला.कारण बावाजी दातेंचे महाविद्यालय अत्यंत कडक शिस्तीचे असल्याचे संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होते. माझा व शिस्तीचा बालपणापासूनच छत्तीसचा आकडा होता.अर्थात अमोलकचंदमध्ये शिस्त नव्हती असेही नाही.त्यावेळी खेरकर नावाचे प्राचार्य होते.अतिशय कडक.राउंडवर निघाले की कॉरिडॉर मधील विद्यार्थ्यांना कुठे लपावे ते कळत नसे.सारे दानाफान व्हायचे.

    तर अशा पद्धतीने माझे ऑर्केस्ट्रा सोबतच महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले.माझे नशीब चांगले की माझ्यासारख्या टारगट विद्यार्थ्याला कळणावत सरांसारखे मराठी शिकविणारे प्राध्यापक मिळाले.त्यांच्या शिकविण्याच्या हातोटीमुळे इतर विषयांपेक्षा मराठीच्या तासिका मला आवडायच्या. मला वाचनाची आवड बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांनी लागलीच होती.ती कळणावत सरांमुळे सर्वंकष होत गेली.त्यावेळी वाचनभूक भागवायचे साधन म्हणजे जिल्हा ग्रंथालय वा महाविद्यालयीन ग्रंथालय.माझा दोन्हीकडे थोडा-फार वावर असायचा. संगीत,वाचन,ऑर्केस्ट्रा यामुळे महाविद्यालयीन अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे.त्याचा परिणाम असा की दर वर्षी इंग्रजीत अनुत्तीर्ण, इतर विषयात जेमतेम व संगीत विषयात प्रथम क्रमांकाचे गुण मिळून दर वर्षी प्रि युनिव्हर्सिटीचा गड कायम आपल्या हातात ठेवण्यात यशस्वी व्हायचो.दोन वर्षांनंतर आमच्या वर्गात सुलभा चांदेकर (स्व.दत्तात्रय उर्फ मामासाहेब चांदेकरांची कन्या आणि प्रसिद्ध शेतीतज्ज्ञ स्व.आनंदराव सुभेदारांची सख्खी मामेबहीण )नामक एकदम साधी सुधी दिसणारी ब्राह्मण कन्या आली.ऑर्केस्ट्राच्या बहुतेक कार्यक्रमात हजेरी लावणारी तिच्या मैत्रिणींची एक टोळी होती.टोळी प्रमुख होती रिता वर्मा (आताची सौ. संगीता सिडाना,अमृतसर).ही टोळी कॉलेजमध्ये पण होती.त्यांनी आमचे काहीही संबंध नसताना उगीचच फिरक्या घ्यायच्या म्हणून चिडवणे सुरू केले. सुलभाची आई,म्हणजे माझ्या सासूबाई सुंदर गायच्या. त्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या.स्नेहसम्मेलनात 'डोलकर' या गाण्यावर त्यांनी मुलींचे नृत्य बसविले होते.आणि हे गाणे त्यातील संगीतासह वाजविणारा यवतमाळात मी एकटाच.त्यामुळे अल्पशा मानधनावर (घरची परिस्थिती इतकी चांगली नसल्यामुळे अशीच छोटी मोठी कामे करून मी माझा खर्च चालवायचो) हे काम स्वीकारले.सोबतच त्यांना गाणे शिकविण्यासाठी घरी जाणे सुरू झाले.सुलाभाशी प्रत्यक्ष बोलणे होऊ लागले.हळू हळू ओळख वाढत गेली. व या ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले कळलेच नाही.या काळात मला या ना त्या निमित्ताने नवनवीन स्वररचना करण्याची संधी मिळायचीच.कधी नाटकाला संगीत देण्यामुळे तर कधी महाविद्यालयीन स्नेहसम्मेलनामुळे वगैरे वगैरे.याच काळात एका मासिकात की वर्तमानपत्रात खालील कविता मला मिळाली.प्रेमाची धुंदी होतीच.त्या धुंदीतच ही स्वरबद्ध झाली.वर्ष ६७/६८ असावे.म्हणून ही रचना सुलभाला अर्पण करीत आहे...

आपणही गोड करून घ्यावी!


काल अचानक सायंकाळी 

सखे तुला पाहिले

शामले, हृदयी फुलली फुले...


निळसर डोळे सरळ नासिका

घेती कुंतल स्कंधी झोका

कर्ण भूषणी हिंदोळ्यावर

मन माझे बैसले, शामले..


अवगुंठीत तू कळी कर्दळी

कशी अभावीत पूर्ण उमलली

अबोध माझे प्रीत पाखरू

प्रतीक्षेत राहिले, शामले...


भेटशील का पुन्हा अचानक

हसतील का ते डोळे भावुक

तनुतनूवर स्पर्श भासती

जे स्वप्नी पाहिले, शामले...


कवी अज्ञात

-सुधाकर कदम

●mobile REC... headphone please

Thursday, September 24, 2026

एक मुलाखत व मनोगत....पुणे.२००६

 


निमित्त ’अर्चना’ या भक्तिगीताच्या अल्बमचे लोकार्पण, यशवंतराव नाट्यगृह, पुणे.

प्रमूख अतिथी-कवी/संगीतकार सुधीर मोघे, कवी गंगाधर महांबरे.

गायक-पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे.

संगीत-सुधाकर कदम

बासरी-अमर ओक

सतार-प्रसाद गोंदकर

सिंथ- सचिन जांभेकर

तबला- राजू जावळकर

मृदंग-गोविंद भिलारे

तालवाद्य-उपेंद्र आरेकर

आयोजक-स्वरानंद प्रतिष्ठान ,पुणे.

निर्मिती-निषाद कदम


Wednesday, September 23, 2026

स्वर-लयीचा गुलमोहर... प्रा. राम जोशी (कोल्हापूर )

 



      सुधाकर कदम म्हणजे सांगीतानंदात रममाण झालेले व्यक्तिमत्व. त्यांनी आर्णी येथील संगीताच्या प्रांगणात लावलेल्या संगीत विद्यालयास पंचवीस वर्षे एवढा दिर्घ कालावधी लोटला. म्हणजेच हे (१९९९)रौप्यमहोत्सवी वर्ष.त्यानिमित्त त्यांचा गौरव व विविध कार्यक्रम केले जात आहेत ही गोष्ट आनंददायी आहे.

     संगीताच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा हा गौरव करणे समाजपुरुषाचे कर्तव्य आहे.यानिमित्त त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचे सिंहावलोकन होत असते, त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते,मार्गदर्शन  होत असते.

     मी कोल्हापूरसारख्या,विदर्भापासून खूप दूर असलेल्या गावी राहणारा. पण त्यांची भेट सहवास काही काळापूरताच लाभला.पण तेवढ्या थोडक्या सहवासांनी आम्ही मनोमन एकत्र आलो व दोघात निखळ मैत्री निर्माण झाली.त्याचे असे झाले,१९८२ मध्ये कविश्रेष्ठ सुरेश भटांच्या  गीत-गझला सादर करण्यासाठी कदमांनी महाराष्ट्र पादाक्रांत केला.त्यावेळी त्यांचा कार्यक्रम कोल्हापूरला रसिकांच्या उपस्थितीत झाला.मला निमंत्रण होते,कार्यक्रम चांगला झाला,मी चांगलाच प्रभावित झालो.

      सुरेश भटांच्या गझलांची नवलाई,अनुरूप स्वररचना व खास पद्धतीची पेशकस. तशात तबल्याच्या साथीला हैदराबादच्या उस्ताद शेख दाऊद खान यांचे शिष्य शेखर सरोदे तर सारंगीवर उस्ताद लतीफ अहमद खान साहेब.असा हा सांगीतिक योग्य जुळून आला.पुढे पुढे जाऊन ओळख करून घेणे हा माझा स्वभाव नसल्यामुळे भेट घेतली नाही.पण हा कलाकार आणि त्यांनी गायिलेल्या गझला मात्र मनात कायमच्या घर करून राहिल्या.

'सूर्य केव्हच अंधाराला यार हो,

या नवा सूर्य आणू चला यार हो'

हे हृदयाला भिडणारे विद्रोही काव्य,'

चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही',

ही हळुवार मलमली गझल यांच्या प्रेमातच पडलो.या कलाकाराची प्रत्यक्ष भेट व्हावी असे मनोमनी वाटायचे आणि तो योग जुळून आला.सुमारे एक तपानंतर शिवाजी विद्यापीठ संगीत विभागात मी मानद अध्यापक म्हणून काम करीत होतो.तेव्हा (१९९४/९५) सुगम संगीतासाठी कदमांची चार दिवसांनी कार्यशाळा ठेवली होती.त्या चार दिवसांच्या छोट्या कालावधीत आम्ही एकत्र आलो.खूप गाणी बजावणी झाली व बऱ्याच दिवसांची मनातली इच्छा पूर्ण झाली.स्नेहाचे भावबंध निर्माण झाले.कदमांनी या वेळी घरगुती कार्यक्रमात अनेक गीत व गझला मनसोक्त ऐकविल्या.त्यांच्या स्वररचना वैशिष्ठयपूर्ण व आकर्षक असल्याने त्याबाबत लिहावे असे सारखे मनात यायचे. तो योग त्यांनी स्थापन केलेल्या संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आला हा माझ्या दृष्टीने सुयोग आहे.भाग्ययोग आहे.

      सुधाकर कदम हे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे.ते शास्त्रीय संगीत  गायक आहेत. संगीत शिक्षक आहेत.समाजकर्ते आहेत.लेखणीबहाद्दरही आहेत.पण त्यांचा माझा जो संबंध आला तो सुगम संगीत स्वररचनाकार व गायक म्हणून.त्यामुळे तद्विषयक त्यांच्या रसिल्या सांगीतिक व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.

     सुगम संगीत हा संगीताचा एक अनुपम व मनोहारी प्रकार.नाव जरी सुगम असले तरी जाता जाता सहजी आत्मसात करावे इतके ते खचितच सुगम नसते.उलट दुर्गमच असते.शब्दप्रधान गायकीच्या ह्या प्रकाराला शब्द हे प्राणतत्व तर स्वर हे माध्यम.पहिला मान काव्याचा.(पर्यायाने कविचाही.) त्यातल्या आशय, भाव-भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे हे कार्य संगीताचे असते.गीताच्या आशयाची अभिव्यक्ती संगीतातून होणे अपेक्षित असते. किंबहुना काव्य बोलते करणे हे संगीतकाराने काम.यासाठी सुगम संगीतात काव्याचा आशय,विषय व भावना याची उत्तम जाण स्वररचनाकाराला असणे जसे आवश्यक, तितकेच महत्व काव्यानुकूल संगीत रचनेला;म्हणजे चाल लावण्याचा असते.सुधाकर कदम हा काव्याची उत्तम जाण असणारा संगीतकार असल्याने ते कवितेला अत्यंत पोषक व समर्पक असा स्वरसाज चढवून प्रत्येक कविता आपल्या संगीतरचनेने श्रीमंत करतात.स्वतः कवी असल्यामुळे 'जे न देखे कवी ते देखे रवी' या उक्तीला साजेसे स्वरचातुर्य त्यांच्याकडे आहे.

     शास्त्रीय संगीताचे व्यासंगी साधक असल्यामुळे कदमांच्या स्वररचनेचा पाया हा राग/रागिणीवर आधारित असणे स्वाभाविक आहे.त्यामुळेच त्यांच्या स्वररचना भारदस्त व दर्जेदार वाटतात.त्या चीप पॉप्युलॅरिटीच्या कॅटॅगिरीतल्या नव्हेत.स्वररचनेसाठी त्यांनी अनेक राग/रागिण्यांची मुक्तहस्त चंदनी बरसात केली आहे.शेकडो कवितांना स्वरांच्या चांदण्यात न्हाऊ घातले आहे.तथापि जागेच्या मर्यादेचे भान ठेवण्यासाठी काही निवडक गाणी व स्वररचनांचा आस्वाद घेणे रास्त ठरेल.

     यमन हा रागच असा की,कोणाही संगीतकाराने त्याच्या प्रेमात पडावे.कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत.प्रत्येक मूर्ती स्वतंत्र आहे.प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे,रंग आहे,रूप आहे,व्यक्तिमत्व आहे.

      कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात.

               सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी

                गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी...

      दादऱ्यातल्या या बंदीशीची यमनमधील ही रचना.अगदी साधी.सुगम संगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथे अपेक्षित असते ते श्रवणसौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथे शुद्ध यमन शोधण्याची धडपड करू नये.कारण तो यमन कल्याणाशी क्षणात दोस्ती करतो आणि दोन्ही मध्यमांच्या आशा हळुवार लगावांची प्रचिती आली की, उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच राहत नाही ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली आहे व घेतो आहे.

                   मी असा त्या बसरीचा सूर होतो

                    नेहमी ओठांपुनी मी दूर होतो...

      या गझलची चालही अशीच आहे.ध्रुवपदातली (मतल्यातली) दुसरी ओळ (ज्याला क्रॉसलाईन म्हणतात)  तिची ठेवण व स्वरसमूहाची रचना अत्यंत मोहक आहे.त्यातील 'सूर होतो' इथं तारसप्तकातला षड्ज सूर ह्यासाठी तारषड्जाचा हळुवार पण भरीव लागाव व रूपक तालाचा एक पूर्ण जादा आवर्तन जो दीर्घ कसलं मुक्काम ठेवतो तो अतिसुंदर लागतो.संगीत रचनाकाराकडे नुसता सांगीतिक अलंकारांचा साठा असून चालत नाही तर स्वरपोशाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो.

      संगीतकार हाच खऱ्या अर्थाने रचना समर्थपणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो.हा अनुभव मास्तर कृष्णराववांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, रासम कदम, यशवंत देव यांच्यापर्यंत येतो.सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत. 'सूर होतो' इथं शब्दकला आणि स्वरमाधुर्य असा सुरेख समन्वय झालाय.

     सांज घनाच्या मिटल्या ओळी' हे अतिशय हळुवार भावना उलगडून दाखविणारे सरस काव्य, कदम यांनी बंदिशही यमनमध्येच बांधलीय. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस 'क्षितिजावरती' इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा कॅरेकटरच बदललाय,असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे 'क्षितिज' या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्याय नाही हे त्वरित पटते.पुरीयाचे होणारे दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळे सुरेख जुळून आलेय.प्रसिद्ध कवी अनिल कांबळे यांच्या

'जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू,

ऐन वेळी अशी काय करतेस तू'

ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे.यमनमधील अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना,खेमट्याच्या अंगाने लागणारा दादऱ्याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही आशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे.सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास 'ऐन वेळी अशी काय' ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमूहरचना म्हणावयास हरकत नाही.'सामग, सामगधप' वगैरे. अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे.

     'तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही' ही सुद्धा यमन मधीलच रचना आहे.यमन ह्या एकाच रागातल्या चारही रचना त्यांनी मला एकापाठोपाठ एक ऐकवल्या पण खासियत अशी की; त्यात तोच तोचपणा नाही.स्वररचनेची पठडी ठरीव स्वरूपाची नाही.त्यात आहे पूर्णत: वेगळेपण,हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचे वैशिष्टय मानले जाते.

      सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला, ध्रुवपदाला खास महत्व आहे.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात.त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असते ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला.कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे.मुखड्याच्या चालीला अनुरुप अशी किंबहुना त्याचे सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करून अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते.तसे नसेल तर पूर्ण  चालच फसते.अनेक संगीतरचनांमध्ये हे दोष दिसतात.संगीतकाराला इथे आपली प्रज्ञा ओतावी लागते.सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणाऱ्या आहेत, म्हणूनच भावतात.कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते?,कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणे म्हणजे हळूच मधाचे बोट चाखण्यासारखे गोड मधुर असते.अर्थातच शेवटचे कडवे हे सर्वार्थाने हायलाईट असते.तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात.एकाच यमनाची ही विविध रूपे, विविध रंग, त्यांचा वेगवेगळा ढंग आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असे आमच्या भोवती टाकले की आम्ही स्वतः जाणकार असूनही फसलो. मग लक्षात आले की,ही यमनी फसवणूक होती,पण ही फसवणूक गोड होती.निर्भेळ होती,निर्मळ आनंद देणारी होती.तसे पाहू गेल्यास प्रत्येक संगीतकार अशी गोड फसवणूक करीत असतो.कारण त्याचा स्वतःचा असा एक बाज असतो.लाडका स्वरसमूह असतो आणि तो बहुसंख्य चालीत डोकावतोच किंबहुना त्यामुळेच संगीतकार कोण ते आपण ओळखत असतो, असे थोडेसे धाडसी विधान इथे नोंदवितो.या बाबी मिळूनच त्याची 'स्टाईल' बनत असते.सुधाकर कदमांची सुद्धा अशी एक खास स्टाईल आहे.पण त्यात कोण्या जानेमाने संगीतकाराची नक्कल किंवा अनुकरण नाही.त्यांचा बाज हा खुद्द त्यांचाच बाज आहे हे विशेष आणि तो अस्सलही आहे.

     'हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही/चेहरा गुलाबाचे झाकणे बरे नाही', 'आली हासत आज पहाट...मेंदी भरल्या', 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची/तापलेल्या अधीर पाण्याची', 'सूर्य केव्हाच अंधाराला यार हो' या चारही रचना वेगवेगळ्या भाव-भावनांच्या.प्रत्येक रचना अत्यंत रसरशीत आहे.सर्वच चाली प्रामुख्याने भूप या लोकप्रिय रागात बांधल्या आहेत. पण प्रत्येक स्वररचनेत मनोहारी वैचित्र्य व काव्याला पूर्ण न्याय दिला गेलाय.पैकी 'हे तुझे अशा वेळी' ही तर मास्टरपीस रचना मानावी लागेल.माझी स्वतःची तर ही अत्यंत प्रिय रचना आहे.

     यमनप्रमाणे या चारही रचनात भूप रागाच्या अनेक सौंदर्यस्थळांचे मुक्त व डोळे भरून दर्शन घडते.मोरांनी सप्तरंगी पिसांचा रंगीबेरंगी पिसारा फुलवावा त्याप्रमाणे भूप रागाचा भरगच्च फुलोरा सुधाकर कदमांनी विलक्षणरीत्या फुलविला आहे.त्यात यमनच्या निषादचा केलेला सुखद उपयोग, शब्दांची केलेली फेक, गझलच्या अंगांनी केलेली गायकी हे सर्व सविस्तर लिहिणे म्हणजे तो स्वतंत्र लेखाचा किंवा भाषणाचा विषय आहे, म्हणून इतकाच स्पर्श पुरेसा आहे.

     यमन, भूप, या सर्वमान्य लोकप्रिय रागांचा चातुर्यपूर्ण उपयोग करून कदमांनी सुंदर सुंदर रचना दिल्या. त्यातील सौंदर्यकण, सौंदर्यस्थळे निर्देशित करण्याचा प्रयत्न केला याखेरीज इतर अनेक रागात त्यांनी अशाच विपुल रचना मासिकांना दिल्या आहेत.त्या सर्वांचा रसास्वाद इथे नोंदविणे शक्य नाही.तरी 'आज मी जे गीत गातो', 'आम्ही असे दिवाणे', किंवा भूपश्री मधील 'कुठलेच फूल आता' आणि शिखराध्याय म्हणजे 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' ही सुरेश भटांची खास गझल या सर्वच गीत व गझलांना कदम यांनी अत्यंत सुरेल चाली देऊन सुधारसपान  घडविले.

      संगीत रचनाकार, स्वतः गायक असणे हे भाग्याचे लक्षण.कारण तो आपल्या हृदयात घर करून राहिलेली चाल खऱ्या अर्थी समर्थ गळ्यातून श्रोत्यांच्या हृदयात पोचवितो.त्या अर्थाने कदमांच्या रचनाच भाग्यवान म्हणाव्या लागतील.कारण सुधाकर कदम हे स्वतः मुलायम आवाजाचे , शब्दनुसार गाणी प्रभावीरीत्या सादर करणारे गायक असल्याने त्यांच्या चाली व काव्याचे सोने होते.नेमक्या वेळी नेमक्या शब्दावर जोर देणे, जरूर तिथे हळुवार शब्दस्वर उच्चार, प्रसंगी स्वरांचा जोरदार लगाव, स्वरांवरील न्यास, ठेहराव याद्वारे ते आपले गायन अत्यंत प्रभावी करतात.ताल व सुरांवर त्यांचा चांगलाच काबू आहे.तळाच्या अंगाने सुटेख गीत मांडणी करतात.

     शास्त्रीय संगीताचा अभ्यास, रियाज व आवाज कमविला असल्यामुळे गाण्यातील भरदस्तपणा सहज नजरेत भरतो. सुगम संगीत गायक/गायिका स्वतः हार्मोनियमवादक असेल तर दुधात साखर असा योग असतो.वर्ज्य, विकृत, अशा बऱ्याचशा स्वरांना काबूत ठेवण्यासाठी व इन्स्टंट स्वरबदल करण्यासाठी हार्मोनियम अत्यंत उपयुक्त असते. सुधाकर कदमांचा हार्मोनियमचा हात अत्यंत तयार व सॉफ्ट आहे.गायनाच्या रंगतीत त्यामुळे निश्चितच भर पडते.कडव्यांमधील म्युझिक पिसेसब(इंटरल्युड) ते उत्तम प्रकारे वाजवितात.त्या रचनाही मेलोडीयस असतात.

     गायन करताना स्वर आलापी,स्वरविस्तार व सरगमचा रास्त वापर या बाबी गाणे नटविण्या-सजविणाऱ्यांसाठी हव्यातच.कदमांची सरगम मांडणी बहुत खुबसुरत असते.वानगीदाखल...'गरे निरेपगरेसा निध धनि सागमग मपधधनिध मपमपग,गपगरेसारे,निरेमगरेनिसा' ही सरगम पहावी.

     असे हे सव्यसाची संगीतकार सुधाकर कदम विदर्भाचे एक भूषण आहे.नाटक आणि संगीताचे विदर्भाशी फार पूर्वीपासूनच स्नेहनाते आहे.अनेक मान्यवर कलावंत या भूमीने महाराष्ट्राला दिले.

     आर्णी येथील संगीत विद्यालयाची पंचवीस वर्षांची दीर्घकालीन वाटचाल कदमांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.अर्थातच हा प्रवास खाचखळ ग्यांनी, वेड्यावाकड्या वळणांनी, प्रसंगी काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ करणारा असूनसुद्धा हे सर्व अडथळे धीरोदत्तपणे पार करणाऱ्या सुधाकर कदमांच्या हातून सुंदर सुंदर चाली निर्माण व्हाव्यात.त्यांची संगीत सेवा अशीच अखंड सुरू राहावी, अशा शुभेच्छा मी माझ्या या मृदू स्वभावाच्या व माणसासाठी आसुसलेल्या मित्राला देतो.तत्पूर्वी मनातील एक खंत नमूद करतो, भले विदर्भाने या कलाकाराचे भरपूर कौतुक केले असेल पण उर्वरित महाराष्ट्रात या कलाकाराला त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रोजेक्ट केले गेले नाही.प्रतिथयश गायक,गायिकांनी अभिमानाने गावी अशी त्यांची स्वररचना असूनही हे का घडले नाही हे एक कोडे आहे.

-राम जोशी

मानद प्राध्यापक

नाट्य विभाग

श्री शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूर

--------------------------------------------------------------

(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. च्या रौप्य महोत्सवी गौरव विशेषांक १९९९ मधून )


Monday, September 21, 2026

या देहाचे देऊळ झाले... शौनक अभिषेकी.


 या देहाचे देऊळ झाले 

देहभाव ते सारे सरले 


श्वासामधुनी कीर्तन चाले 

प्राण तयाची प्रतिमा झाले 

तेजरूप त्या परमेशाचे 

अंधाराला उजळीत आले 


शब्द तयाचे भाव तयाचा 

तोच अर्थ या जाणीवांचा 

अनिष्ट सारे नष्ट कराया 

मांगल्याचे चिंतन चाले 


भावार्तीने नेत्र उजळले 

परदुःखाने कातर झाले 

दान सुखाचे देण्यासाठी 

भगवंताचे गीत गायिले 


गायक - पं. शौनक अभिषेकी 

गीत - आशा पांडे 

संगीत - सुधाकर कदम 

Sunday, September 20, 2026

ये मत्रांची घुमवित वीणा... अनुराधा मराठे


ये मत्रांची घुमवित वीणा छेड मनाचे मंजुळ तार

देहाच्या दारात लेवू दे आम्रफुलांचे मंगल हार 


आत्म्यालाही जाग येवू दे हो ज्ञानाचा साक्षात्कार 

चिरंतनाचा एक प्रवासी तुझा तयाला दे आधार 


मोहाचा अंधार जळू दे, व्यामोहाचा दीपत्कार 

अव्यक्ताला अभिव्यक्ती दे शब्द करी साकार 


अनुभूतीचे फूल फुलू दे आर्त स्वरांचा हा ओंकार 

तव नामाने अधरी काशी नयनी अमृतधार


गायिका - अनुराधा मराठे 

गीत - आशा पांडे

संगीत - सुधाकर कदम 

संगीत संयोजक - मिलिंद गुणे.


15 urdu ghazals composed by me....


 

श्याम घन घनश्याम माझा... रेणू चव्हाण



श्याम घन घनश्याम माझा सावळा घनश्याम रे 
जन्म ज्याला वाहिले मी श्वास गाती नाम रे...

एकटी मी चालताना धाव घेतो श्रीहरी 
जागवी आलोक माझ्या शांतलेल्या अंतरी 
पूजीते मी पाऊलांना होऊनी निष्काम रे...

वादळी नौकेस माझ्या तोच आहे रे किनारा 
तोच माझ्या वेदनेची थांबवीतो अश्रूधारा 
नम्र माझ्या पापण्यांची पूजने अभिराम रे...

तोच येथे धाव घेतो दुःख माझे तोच हरतो 
तो सुखाचे रूप आहे तो मनाला जाण देतो 
शब्द झाले तीर्थ माझे प्राण पावन धाम रे...

गायक - रेणू कदम 
गीत - आशा पांडे 
संगीत - सुधाकर कदम 
बासरी-अमर ओक
सतार-प्रसाद गोंदकर
सिंथ- सचिन जांभेकर
तबला- राजू जावळकर
मृदंग-गोविंद भिलारे
तालवाद्य-उपेंद्र आरेकर
आयोजक-स्वरानंद प्रतिष्ठान ,पुणे.
निर्मिती-निषाद कदम

#अर्चना​ या भक्तिगीत अल्बमच्या निमित्ताने.
यशवंतराव सभागृह,पुणे.२००६
प्रमूख अतिथी-कवी/संगीतकार सुधीर मोघे आणि कवी गंगाधर महांबरे.


माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे... भैरवी कदम


माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे

हे विश्वरूप त्याचे तो शिल्पकार आहे 


झाले अधीर जेव्हा बोलाविले तयाला 

होऊनि तोच आला गगनात मेघमाला 

तेजोमयी क्षणांचा कंठात हार आहे 


आतावरी तयाला काहीच ना दिले मी 

ना आरती तयाची ना वाहिली फुले मी 

ठेवून सूर्य साक्षी उघडीत दार आहे 


हे भावविश्व माझे त्यानेच निर्मिलेले 

शतदीप पूजनाचे त्यानेच लाविलेले 

ही वेदना तयाची डोळ्यात धार आहे 


गायिका - भैरवी कदम 

संगीत - सुधाकर कदम 

संगीत संयोजन - मिलिंद गुणे 



शक्ती दे तू आज मजला दुःख सारे वेचणारी... पं. शौनक अभिषेकी, अनुराधा मराठे


शक्ती दे तू आज मजला दुःख सारे वेचणारी

रागिणी दे दान आता आसवे शृंगारणारी 


माणसाला माणसाची जाण होऊ दे अता 

भावना भगवंत आहे गान होऊ दे अता 

यामिनी दे दान आता भावना विस्तारणारी 


अंतरी ओंकार नादे लोचनी घनश्याम हासे

प्रीतीची ही गीतगंगा सावळ्याचे रुप भासे 

ज्योत ज्योतीला मिळावी सृष्टीला तेजाळणारी 


सगुण त्याचे रूप आहे प्रगट आहे तो हरी 

भुवरी तो संत आहे सूर्य तारे अंबरी 

शब्द वीणा आज होवो तेज ते साकारणारी 


गायक - पं. शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे.

गीत - आशा पांडे

संगीत - सुधाकर कदम 



वेद झाले वेदनांचे... पं. शौनक अभिषेकी


वेद झाले वेदनांचे शब्द झाले रे ऋचा 

श्वास गाती गीत हरीचे अर्घ्य होतो आसवांचा 


मी न कोणी तो न कोणी दोन मिळुनी एक रे 

भावनेची ब्रह्मभूमी साधले अद्वैत रे

तोच माझी साधना तो दीप होतो आरतीचा 


तोच माझे श्वास आहे मीच ते निश्वास रे 

आसवे मी देत आहे दे मला तो हास रे 

शून्य माझ्या प्रांगणी तो नाद होतो बासरीचा 


लिनताही लीन झाली लोचने पाणावली 

आळविता धावला तो भावना भारावली 

फूल होतो ओंजळी तो गंध होतो अंतरीचा 


गायक - पंडित शौनक अभिषेकी 

गीत - आशा पांडे 

संगीत - सुधाकर कदम 

बासरी-अमर ओक

सतार-प्रसाद गोंदकर

सिंथ- सचिन जांभेकर

तबला- राजू जावळकर

मृदंग-गोविंद भिलारे

तालवाद्य-उपेंद्र आरेकर

आयोजक-स्वरानंद प्रतिष्ठान ,पुणे.

निर्मिती-निषाद कदम

स्थळ - यशवंतराव नाट्यगृह, कोथरूड, पुणे २००६

*headphone please 



समर्पण... अनुराधा मराठे


तुझीच सुमने तुझे निरांजन 

चरणी तुझिया तुझे समर्पण 


देह दिला तू दिधली वाणी 

तुझी गावया अमृत गाणी 

शब्द थांबले ओठांवरती 

नि:शब्द चाले रे पारायण 


दृष्टी दिली तू तुला पहाया 

अवघी सृष्टी तुझीच का या 

वनी उपवनी फुले माधुरी 

सरिता गाते करुणा कीर्तन 


तूच उगवतो तू मावळतो 

तारांगण तू अम्हास देतो 

सत्कार्माचे दिवे लावुनी 

साकारू दे प्रकाश पूजन 


गायिका - अनुराधा मराठे 

गीत - आशा पांडे 

संगीत - सुधाकर कदम

दयासागरा जगदाधारा... पं. शौनक अभिषेकी

 


दयासागरा जगदाधारा 

तुजवीण आता कुठे निवारा 


अक्षरवाणी अमृतगाणी 

डोळा झरते झरझर पाणी 

पावन मन हो गंगाधारा 

तुजवीण आता कुठे निवारा 


अखंड कीर्तन हृदयी होते 

तुझे दयाळा दर्शन होते 

खुलतो नयनी मोरपीसारा 

तुजवीण आता कुठे निवारा 


प्रेम तुझे दे घे पोटाशी 

जगी राहिलो मीच उपाशी 

करुणकृपेच्या अक्षतधारा 

तुजवीण आता कुठे निवारा 


गायक - पं. शौनक अभिषेकी

#headphone_please

Saturday, September 19, 2026

पुरस्कार (खुसखुशीत )


     आयुष्यात आपली वाहवा व्हावी, सत्कार व्हावा, एखादा तरी पुरस्कार मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते, नुसतेच वाटत नसते तर प्रत्येकजण या सुखाकरीता आसुसलेला असतो, पण काही खास लोकांच्याच नशिबी हे सर्व प्रकार असतात त्याला आपण काय करू शकतो ?

     मोठं-मोठे राजकारणी,कवी,साहित्यिक,

संशोधक,उद्योजक कुठेतरी वर्णी लागावी म्हणून राजकीय कोलांट उड्या घेवून डोंबाऱ्याचा खेळ करीत असल्याचे दिसून येते. माझा एक मित्र असाच कोल्हाट्याचा खेळ करण्यात प्रसिद्ध होता. कोणत्या तरी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा सन्मान आपल्याला मिळावा माणून त्याने निळ्या टोपीचा आश्रय घेवून काँग्रेसशी अंग संग सुरू करून, दतितोद्धारक अशी प्रतिमा निर्माण करण्याकरीता अनेक सोंगे केली. पण दलित काही फसले नाही आणि एका निवडणुकीत आपला हातही दाखविला. तसेच काँग्रेसवाल्यांनीही धतुरा दाखविला, तरी पण काँग्रेसचे शासन असेपर्यंत त्याचे लांगुलचालन सुरुच होते. एवढेच नव्हे तर ज्या काँग्रेसी पुढाऱ्याला ते शिव्या द्यायचे त्यांच्याच घरी खरकटे सावडायचेही काम त्याने केले. काही दिवसांनी काँग्रेसचे राज्य जाऊन यूतीचे राज्य आले. तर या कवी मित्राने लगेच कोलांट उडी घेवून एकदम भगवी पताका खांद्यावर घेतली व सेना भवनाच्या वाऱ्या करून 'किर्तन' करणेही सुरू केले आणि बाळासाहेबांसमोर नतमस्तक होवून काँग्रेस पक्ष किती वाईट होता यावर साहित्य निर्मीतीही सुरू केली. हे सगळे कशासाठी तर मान सन्मान, अध्यक्षपद, सत्कार, पुरस्कार या 'आत्मिक' सुखासाठी! भगवे सरकारही याला पुर्णपणे ओळखून असल्यामुळे त्याची वर्णी कुठेच लागली नाही, त्यामुळे थोड्याच दिवसात हा 'वार'करी भगवी पताका उत्तरवून भगवी-हिरवी पताका खांद्यावर घेता झाला. पण हिरवे-भगवेही त्याला ओळखून असल्यामुळे  हे घडले नाही. तर मंडळी पुरस्काराची लालसा माणसाला  किती लाचार बनवते हे आपल्या लक्षात आलेच असेल.

    आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळावा असे मलाही खूप वाटत होते. पण त्याकरीता करावे लागणारे तांगुलचालन न जमल्यामुळे, जिल्हा समितीने निवड केल्यावरही मला टाळण्यात आले.दुसऱ्या वर्षी शिक्षणाधिकाऱ्याने पुनः नाव पुढे केले.तेव्हाही मला टाळल्या गेले.खोलात जाऊन चौकशी केल्यावर कळले की, आर्णीत शिवजयंती उत्सव सुरु केल्यामुळे लागतेल्या कलमांमुळे पुरस्कारापासून वंचित करण्यात आले आहे. आपल्याच महाराष्ट्रात छत्रपतींची जयंती साजरी केल्यामुळे आपल्यावरच कलमा लागू शकतात व त्यामुळे न्यायालयाचे खेटेही ध्यावे लागतात हे माहीत नव्हते.दुसरे असे की,किरकोळ कलमा लागल्यामुळे आपल्या देशात पुरस्कारापासून वंचित केल्या जावू शकते, पण ३०२ ते ४२० पर्यंतच्या कलमा लागलेली व्यक्ती मात्र आमदार, खासदार व मंत्री होवू शकते हे पाहून तर मला माझ्या शिक्षकी पेशाची लाज वाटून आपण शिवजयंती सारखे समाज विघातक काम करण्यापेक्षा खून, मारामाऱ्या, बलात्कार, जाळपोळ वगैरेसारखी 'राष्ट्रीय' कार्य केली नाही याचे वैषम्य वाटायला लागते.

    यावरून शासकीय पुरस्कार मिळविणे ही ही एक कला आहे हे आम्हाला पटायला लागले. ज्याने काहीही न करता फक्त 'कलाबाजी' केली तो जिंकला, व जो नुसतेच कार्य करीत राहिला तो हरला। शासकीय पुरस्कार मिळविण्याकरीता समोरची व्यक्ती आदर्शच असली पाहिजे असे काही नाही. ती फक्त दर्शनीय असली तरी चालते. एकतर त्या व्यक्तीला राजकीय वजन हवे किंवा राजकीय वजन पेलण्याची क्षमता तरी हवी, तसेच लाळघोटेपणा हा ही दुसरा गुण त्याच्या रोमरोमात भिनलेला असायला पाहिजे. (हे दुसरे क्वालिफिकेशन' यात अतिशय महत्वाचे ठरते) अर्थात योग्य व्यक्तींना  पुरस्कार मिळतच नाही असेही म्हणता येत नाही. कधी मधी चुकून माकून योग्य माणसालाही पुरस्कृत केल्या जाते. पण अशी उदाहरणे कमीच! 

     पुरस्कार मिळाल्यावरही कधी कधी काय गंमत घडते बघा. आर्णीला संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना १९८६ मध्ये मला माझ्या मराठी गझल गायकीच्या क्षेत्रातील अतुल्य सांगीतिक योगदानाबद्दल नागपूरच्या मा. बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टने कै. मोतीलालजी बंग हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार (५००० रु.व शाल श्रीफळ आणि मानपत्र) जाहीर केला. पुरस्कार वितरणाचा नयनरम्य सोहळा आर्णीतच झाल्यामुळे पाहुणा व यजमान अशी दुहेरी भूमिका माझ्या वाट्याला आली, सरस्वती स्तवन, स्वागतगीत माझ्याच दिग्दर्शनाखाली सादर केल्या गेले. व थोड्याच वेळात पुरस्कार घ्यायलाही पुढे झालो. त्यामुळे आपल्या लग्नात आपणच बँड वाजवण्याचा जानंद काय असतो तो मला उपभोगायला मिळाला.

     पुरस्कारामुळे माणसाचे मोठेपण वाढते की माणसामुळे पुरस्काराला मोठेपणा येतो है अजूनपर्यंत मला कळले नाही, कारणा काही सामान्य व्यक्ती पुरस्कारामु‌ळे मोठ्या झाल्याचे व काही पुरस्कार व्यक्तीमुळे मोठे झाल्याचे मी पाहिले आहे. थोर समाजसेवकाला दंगली भडकवितांना पाहून, आदर्श शिक्षकाला मद्यपान करून गटारात लोळताना पाहून, गुणवंत कामगाराचे अवगुण पाहून, समाज गौरवाचा 'माज' पाहून, देशबंधूच्या देशविघातक कारवाया पाहून, हरिभक्त परायणाची स्त्री भक्ती पाहून, वनमित्राची आरामशीन पाहून, पर्यावरणवाद्यांचा (वृक्षमित्र) लाकडांचा धंदा पाहून, सर्वोदय वाद्याच्या अनेक खाजगी संस्था व जमवलेली माया पाहून, वेदशात्र संपन्नांचे बायाबापड्यांना नादी लावणे पाहून, व्यसनमुक्तीवाल्यांचे दारुकाम पाहून उपाध्या व पुरस्कार हे किती तकलादू असतात ते कळते. तरीपण त्याची ओढ मात्र कमी होत नाही.

---------------------------------------------------------------

दै.विदर्भ मतदार, अमरावती. रविवार दि.२०/९/२६

Monday, September 14, 2026

हिंदी दिवस के उपलक्ष मे मेरी एक रचना प्रस्तुत है!


 

तूच माझे गीत कोमल....

  


तूच माझे गीत कोमल, भाव तू उल्हास रे 

तूच माझी अर्चना, तू अंतरी विश्वास रे...


प्राण माझे फूल झाले पाऊली मी वाहिले 

तूच त्याचा गंध झाला विश्व हे गंधाळले

जागविली तूच माझ्या लोचनी अभिलाष रे 


तू ढगांच्या पार नाही, तू सदा साक्षात रे 

तू दयेची सावली तू आशयाचा हास रे 

एक तुझिया मीलनाची लागलीसे आस रे 


तू क्षमा शांतीत आहे होतसे आभास रे 

प्रात संध्या तूच आहे तूच अश्रू ऱ्हास रे 

श्वास तू घेताच माझे डोलती निश्वास रे

Saturday, September 12, 2026

मैत्री...



     एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा, अडी-अडचणीत कामी येण्याचा, वेळप्रसंगी एकमेकांना सांभाळून घेण्याचा व संकटकाळी धावून जाण्याचा अलिखित करार म्हणजे 'मैत्री'! 

     संघटन करून राहण्याची वृत्ती जेव्हापासून माणसाने जोपासली, तेव्हापासूनच नात्यांसोबत मैत्री हा प्रकारही अस्तित्वात आला असावा.

समविचारी, समआचारी व्यक्तीशीच मैत्री जुळते. कुठे ना कुठे तरी एखादा सूर जुळल्याशिवाय मैत्री होऊच शकत नाही. भिन्न भिन्न विचाराच्या व्यक्तींमधेही एखादा समान धागा मैत्री निर्माण करताना दिसतो.

      मैत्रीचे व मित्रांचे अनेक प्रकार, अनेक पद्धती आपणास दिसून येतात. त्यातील राजकीय मैत्री हा फार गहन विषय आहे.हिंदी-चिनी भाई भाई म्हणत १९६२ मध्ये युद्ध पुकारून देशाच्या उत्तर पूर्व भागाचा लचका तोडणाऱ्या चीनची मैत्री साऱ्या जगाला माहीत आहे. (सध्याही युद्ध न करता पुन्हा तोच प्रकार सुरू आहे.) पंडित नेहरू व लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मैत्रीची चर्चा आजही चवीने केली जाते. हिटलर मुसोलिनी मैत्री सुद्धा प्रसिद्ध आहे. महायुद्धाच्या काळात 'मित्रराष्ट्र' हा शब्द तर परवलीच्या शब्दाइतका महत्वाचा ठरला होता.

     कृष्ण सुदाम्याची मैत्री सर्वश्रुतच आहे. या मैत्रीला कोणते नाव द्यावे कळत नाही.धन्य तो कृष्ण व धन्य तो सुदामा! आज तर मोठ्या पदावर गेल्यावर आपल्या आईवडिलांना त्यांच्या गावरान पेहेरावामुळे ओळख न दाखवणारे महाभाग आपण बघतो.ते अशा सुदाम्याला काय ओळख दाखविणार?

     कृष्णाच्या मित्रप्रेमात गरिबी श्रीमंती आड आली नाही. तशीच कर्ण व दुर्योधनाच्या मैत्रीतही कोणत्याच बाबी आड आल्या नाहीत.पांडव आपले सख्खे भाऊ आहेत हे समजल्यावर जर कर्णाने जर दुर्योधनाचा पक्ष सोडला असता तर युद्धिष्ठिराऐवजी तोच हस्तिनापूरच्या गादीवर बसला असता. पण मृत्यू समोर दिसत असूनही त्याने मित्राशी इमान राखून मृत्यूला कवटाळले व मैत्रीची शान वाढविली.

     मित्र कसा असावा याबद्दल प्रत्येकाचे मत सारखेच असते.पण हे मत मित्राने आपल्याशी कसे वागावे याबद्दलचे असून,स्वतःवर पाळी आल्यावर मात्र यात बदलही होऊ शकतो. मैत्रीची जाण ठेवून मित्राचे उपकार स्मरून वागणाऱ्यांची, अपवाद सोडून वानवाच आहे.मतलबापुरते मैत्रीचे ढोंग करणारेच बहुतकरून दिसून येतात.तुम्हाला वापरून फेकणारी मित्राची ही जात अतिशय घातक असून केसाने गळा कापण्यात वस्ताद असते.त्यामुळे मित्रासाठी जीव देणारे वा जीव लावणारे आता इतिहासजमा झाल्यातच जमा आहे. असे जरी असले तरी पण प्रत्येकाला एका सच्च्या मित्राची सतत आवश्यकता भासत असते, हे ही तितकेच खरे!

     माणसाच्या आयुष्यात मित्राईतकेच महत्व मैत्रिणीलाही आहे. (हे बायकोला कसे समजावून सांगावे हा प्रश्नच आहे.) पण विवाहित पुरुषाला जर एखादी मैत्रीण असली तर बायको खपवून घेत नाही. (अर्थात, बायकोला जर मित्र असला तर नवराही खपवून घेत नाही.ही गोष्ट वेगळी.) मोठमोठेपुढारी,राजकारणी,नेते,साहित्यिक ,गायक,

संगीतकार,संशोधक यांना त्यांच्या क्षेत्रात प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रिणी (यांना ते 'प्रतिभा' असे म्हणतात.) त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनलेल्या दिसतात. (हे विधान सगळ्यांनाच लागू होते असे नाही.) ह्या 'प्रतिभां'च्या निकट सानिध्यामुळे बरीच मंडळी आपले ध्येय साध्य करतांना दिसून येते. (कुणाकुणाची पत्नी पण त्याची 'प्रतिभा' असू शकते.) विवाहित पुरुषांच्या मैत्रिणीमुळे त्यांच्या घरात कलह निर्माण झाल्याच्याही अनेक घटना आहेत. ते काहीही असले तरी मैत्रीण असणे ही आयुष्यातील एक सुखद अनुभूती आहे असे अनेकजण मान्य करतांना दिसतात.कोणाच्या नशिबात असते,कोणाच्या नाही! त्यामुळे उगाच जळफळाट करून घेण्यात काहीच अर्थ नाही.

     राजकीय मैत्रीबद्दल तर न लिहिलेलेच बरे. कोणता पक्ष कोणाच्या गळ्यात केव्हा गळा घालून 'चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा' हे गाणे आळवील हे सांगता येत नाही. या चुम्माचाटीमुळे पक्षांची शकलं झालेली आपण सर्वजण बघत आहोतच.राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो व कोणी कोणाचा मित्र नसतो. वेळ पाहून रंग बदलणारी ही जमात आहे. त्यामुळे यांच्यावर जास्ती लिहीण्यात काही मजा नाही.

----------------------------------------------------------------

दै. विदर्भ मतदार, अमरावती. रविवार दि. १२/९/२६

Wednesday, September 9, 2026

माझी पहिली स्वररचना...


      माझ्या संगीत दिग्दर्शनाच्या  कारकिर्दीचा प्रारंभ  वयाच्या सोळाव्या वर्षी (१९६५) ऑर्केस्ट्रा पासून सुरु झाला.सध्या २०२६ सुरू आहे.म्हणजे ६० वर्षे उलटलीत.या प्रवासात मराठी/हिंदी मिळून जवळ जवळ ३५० स्वर रचना झाल्या आहेत.त्यातील काही उत्तर प्रदेशातील #हाथरस येथून प्रकाशित होणाऱ्या '#संगीत' मासिकात स्वरलिपीसह उपलब्ध आहेत.तर काही... कॅसेट्स,सीडी,युट्युब वा अन्य 'ऑडिओ प्लॅटफॉर्म्स'वर पद्मश्री सुरेश वाडकर,अनुराधा मराठे,पं. शौनक अभिषेकी,वैशाली माडे,वैशाली सामंत,रसिका जानोरकर,मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे,राधिका ताम्हणकर देशपांडे,गायत्री गायकवाड गुल्हाने,नेहा दाऊदखाने,कल्पिता उपासनी,उत्कर्षा शहाणे,दिनेश अर्जुना,भैरवी कदम,रेणू कदम,प्रशांत कदम,आदित्य फडके,अविनाश जोशी,वैशाली पुल्लीवार,रफिक शेख,डॉ. सुशील देशपांडे, मोहन भिवरकर,सचिन डाखोरे या गायक/गायिकांच्या आवाजात उपलब्ध आहेत.नागपूर आकाशवाणीवरून सादर झालेल्या सर्व रचना रसिकांपर्यंत पोहोचल्या असतील असे नाही.ज्या रचना रसिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत,त्या पोहोचवण्याचा प्रयत्न संगीतकार म्हणून सध्या सुरू आहे. 

     खालील रचना ऑर्केस्ट्रामध्ये असताना १९६५ मध्ये स्वरबद्ध झाली.माझ्या आयुष्यातील ही पहिली स्वर रचना होय. 


चल आपण दोघे लहान होऊ या

बालपणीचा काळ सुखाचा फिरुनी पाहू या


तुझे नि माझे जग ते सुंदर होते त्या वेळी

नभी विहरती स्वैर पाखरे चिंता ना कसली

कळ्या फुलांशी कुजबुज हितगुज

फिरुनी चल करू या...


किती कहाण्या गेल्या रंगुन, गच्चीवर गप्पा

कवितांच्या कोड्यात कितीदा येत लारीलप्पा 

भातुकलीचा खेळ मजेचा, फिरुनी खेळू या...


घेऊन हाती हात उपवनी स्वच्छंदे फिरलो

उन्हात वणवण कधी भटकलो पावसात भिजलो

तरुण मनाला अजुन आवडे गारा वेचाया...


-कवी अज्ञात


(त्यावेळी कवीचे नाव लिहून ठेवावे, ही पण अक्कल नव्हती.😊)

Sunday, September 6, 2026

सुधाकरी तोडी...

     जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.

बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' हे आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी अप्रतिम गायिले आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे!

     मी सुद्धा भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये नसलेल्या एका नव्या सुरावटीत मराठी गझल स्वरबद्ध केली.या रागाला 'सुधाकरी तोडी' असे नाव दिले आहे.थाट-भैरवी, वादी स्वर-रिषभ,संवादी स्वर-पंचम.गानसमय-दिवसाचा पहिला प्रहर.

आरोह-सा कोमल रे कोमल ग प कोमल नि सां. अवरोह-सां कोमल नि प कोमल ग कोमल रे सा.आरोहावरोहात पाच स्वर असल्यामुळे शास्त्रानुसार याची जाती औडव-औडव ठरते.

#याला_मान्यता_मिळेल_की_नाही_मला_माहित_नाही. कारण मी शास्त्रीय संगीतातील पंडित,

डॉक्टर, प्राध्यापक वा कुठल्या महाविद्यालयाचा संगीत विभाग प्रमुख नाही.असो!


शब्द आहेत 

'माझी गझल गुलाबो भरते हसून प्याला, 

माझ्या नशेत अवघा जातो बुडून प्याला'. 

रसिकांना ऐकण्यासाठी युट्युब लिंक:-


बिलासखानी तोडी

     दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञ म्हणतात की,भारतीय शास्त्रीय संगीताला काही मुसलमान संगीकारांनी भ्रस्ट केले.तर काही मुसलमान संगीतकरांचे म्हणणे आहे की,मुसलमान संगीत तज्ज्ञांनी  भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी सजवले,त्यास सौंदर्यपूर्ण केले.

      इतिहास पहिला तर भारतीय व्यापाऱ्यांचे अरब व्यापाऱ्यांशी शेकडो वर्षांपासून व्यापरिक संबंध होते.हजरत मुहम्मदाच्या जन्मापूर्वीचे काही अरबी ग्रंथ रामपूरच्या 'रजा पुस्तकालयात' सुरक्षित आहेत,त्यात काही विशिष्ठ गीतांची 'स्वरलिपी' पण आहे.जी सामगायन करणाऱ्या 'गात्रवीणा विधी'ने प्रभावित आहे.यावरून हे लक्षात येते की,अरब लोक इस्लामचा उदय होण्या अगोदरपासून भारतीय स्वरविधीशी परिचित होते.दक्षिण भारताशी तर अरब व्यापाऱ्यांचा संबंध फार प्राचीन आहे.इसवी सन ८६८ मध्ये जाहज नामक एका अरबी लेखकाने भारतीय संगीताची भरपूर तारीफ केली आहे.यात विशेषकरून 'एकतारा'ची (एकतंत्री वीणा) चर्चा महत्वाची समजल्या जाते.स्पेनचा इतिहासकार काजी साइद उदलूस्मीने,ज्यात रागांच्या स्वरांचे वर्णन आहे असे भारतीय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले असा उल्लेख इसवी सन १०१७ मध्ये केला आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५७.) अमीर खुसरोने भारतीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५८.) भारतीय संगीत शिकण्यासाठी विदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असल्याचा उल्लेख 'खिलजी कालीन भारत,या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक १८० वर आहे.इसवी सन ७५३ ते ७७४ च्या मधल्या काळात अनेक भारतीय ग्रंथ अरबस्थानात नेऊन त्याचे अरबी भाषांतर करण्यात आले.त्यावेळी बगदादमध्ये खलिफा मन्सूर याचे शासन होते.खलिफा हारूनच्या (७८६ ते ८०८) काळात अनेक अरब विद्यार्थ्यांना विभिन्न विद्यांच्या अध्ययनासाठी भारतात पाठविले व भारतातील विद्वानांना बगदादला बोलविले.प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ शेख बहाउद्दीन झकेरीयाचा संगीत संप्रदाय अरबी संगीताच्या प्रभावाखाली होता.झकेरीया सुफींच्या सुहरवर्दी परंपरेचे महापुरुष होते.यांचे कार्यक्षेत्र सिंध प्रांत असल्यामुळे पंजाब आणि सिंधच्या लोकगीतांचा  या संप्रदायावर पूर्ण प्रभाव होता.खैबर खिंडीतून आलेले मुसलमान व अरबस्थानातून आलेले मुसलमान यांचा स्वभाव,चरित्र,संगीत इत्यादींमध्ये  खूप तफावत होती. भलेही दोघांचे धार्मिक संबंध असेल पण सांस्कृतिक संबंध नव्हते. अरबी संगीत आणि इराणी संगीत भिन्न आहे.अमीर खुसरोला याचे ज्ञान होते.इरानी संगीताचे चार 'उसूल' आणि 'बारा पडद्यांचा' अभ्यास असूनही त्याने भारतीय संगीतालाच श्रेष्ठ मानले आहे.चिश्ती परंपरेतील प्रसिद्ध पुरुष शेख निजामुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर खुसरोच्या ज्या रचना गायिल्या जातात, त्या सर्व भारतीय लोकधुनांवर आधारित शुद्ध भारतीय आहे.(संदर्भ - 'संगीत चिंतामणी)

       अकबराच्या दरबारात ग्वाल्हेर परंपरेचे मर्मज्ञ तसेच फारसी परंपरेचे विदेशी कलाकार पण होते.या काळची परिस्थिती संगीतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्यास अतिशय अनुकूल अशी होती. असे अबुल फजल यांच्या 'आईने अकबरी' मधील उल्लेखावरून कळून येते.या काळात अनेक प्रयोग झाले.या प्रयोगातूनच तानसेनाचा 'मियां मल्हार,'दरबारी कानडा'   

(कानडा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा समूह आहे, ज्याला कान्हडा म्हणूनही ओळखले जाते. कानडा हे नाव कर्नाटक संगीत परंपरा आणि कन्नड देशात उद्भवले असावे असे सुचवते. या गटातील राग वेगवेगळ्या थाटांचे आहेत, परंतु विशेषतः आसावरी किंवा काफी थाटाचे आहेत.कानड्याचे एकूण १८ प्रकार मानले जातात.त्यात 

शाम कानडा,मंगल कानडा, कोलाहल कानडा, मुद्रिक कानडा, नागध्वनी कानडा, टंकी कानडा, जैजवंती कानडा, गारा कानडा, काफी कानडा, बागेश्री कानडा, सुघराई कानडा, सुहा कानडा, शहाणा कानडा, अडाना कानडा, हुसैनी कानडा,अभोगी कानडा, कौशी कानडा, नायकी कानडा हे प्रकार आहेत.यातील अनेक प्रकार आज नामशेष झाले आहेत.)  

'मियां की तोडी'(गुजरी अथवा गुर्जरी तोडी,देसी तोफा,हुसैनी तोडी,आसावरी उर्फ कोमल रिषभ आसावरी असे तोडीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.)  

धोंधूचा 'धोंधू की मल्हार', चरजूचा 'चरजू की मल्हार' (मेघ मल्हार,रामदासी मल्हार,गौड मल्हार,सूर मल्हार,देश मल्हार,नट मल्हार,धुलिया मल्हार,मीरा की मल्हार असे मल्हारचे पण अनेक प्रकार आहेत).या प्रकारे नवीन राग संगीत जगताला मिळत गेले.ही परंपरा पुढेही सुरू राहिली.

     जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' ह्या आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी गायिलेल्या एका अप्रतिम गाण्यासाठी हा लेख प्रपंच केला आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे! 

     बिलासखानी रागावर आधारित एक माझेच गीत २०१८ मध्ये स्वरबद्ध केले होते..स्पॉटिफाय (spotify) युट्युब (youtube) सह इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत उपलब्ध आहे.अलबमचे शीर्षक आहे '#रे_मना!

https://youtu.be/kCYnWcTeP5o?si=6fFq1WZ2B0p86xTu


                 #मैफल 

रे मना, तुज काय झाले सांग ना!

का असा छळतो जीवाला सांग ना!


हारण्याचीही मजा घे एकदा

जिंकुनी तुज काय मिळते सांग ना!


हासुनी हसवायचा हा मंत्र घे

दुःख का कुरवळतो तू सांग ना!


सूर लावून गुणगुणावे गीत हे

ते नि तू का वेगळा रे सांग ना!


गीत/संगीत - सुधाकर कदम

गायक - मयूर महाजन

तबला - किशोर कोरडे

सरोद - नितीश पुरोहित

Saturday, September 5, 2026

मराठी गझलगायकीचे जनक

१९८१ मध्ये कविश्रेष्ठ #सुरेश_भट व गझल गायक #सुधाकर_कदम हे #मराठी_गझल_गायकी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी निघाले होते.त्याची सुरवात विदर्भापासून झाली.तेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या सुरवातीला पांढरकवडा (जि.यवतमाळ) येथे आले असता माझ्याकडे एक सुंदर #मैफिल झाली.आणि तेव्हापासून माननीय सुधाकरजी कदम या गझल गायकांची मी 'पंखा' झाले...ती आजतागायत ! त्यांच्या #तुझ्यासाठीच_मी... ' या अल्बमचे प्रकाशन झालेय या समजुतीत मी अगदी काल पर्यंतहोते...पण काल प्रकाशनाबद्दल fb वर वाचले.आणि लगेच हा अलबम विकत घेतला व त्याचे पारायण केले...हे पारायण करताना मला जे सुचले,भावलेे ते आपणा रसिकांसमोर मांडत आहे. " तुझ्यासाठीच मी... " या मराठी गझलच्या अल्बममध्ये '#गझलगंधर्व' श्री. सुधाकरजी कदम या गायक व "#पंडित" ही ऊपाधी कमीच पडावी अशा या संगीतकाराने- कवी : श्री दिलीप पांढरपट्टे व गायिका वैशाली माडे सह एक न् एक गझलेला, गाण्याला.... प्रत्येक ओळीचा व शब्दातला भाव जाणून आपल्या स्वर-साजाने नवा आलेख व आशय दिला आहे.शब्दांना वेगवगळ्या सुरावटीतून गुंफतांना एक मायाजालच आपल्याला हळूहळू आनंदात सामील करीत आपल्या कानातून थेट ह्रदयावर साम्राज्यं गाजवते ! सगळ्या रचना एकाच संवेदनशील कवीच्या असूनही लाजवाब आहेत.तरूणाईला तालासूरावर खिळवून ठेवणारी रचना---- "किती सावरावे.... कसे सावरावे" ...किती बहारदार... यातील कोरस,गिटार हलकेच जी साथ देतात व रूंजी घालून गायब होणारी फुलपाखरासारखी अकाँर्डियनची गिरकी यामुळे ऐकणाऱ्याचा खरेच झोक जातो! " तुझा भास झाला पुन्हा आडवेळी, पहाटे पहाटे जसे ऊन्ह यावे....." या ओळी तसेच कोरसचे सूरही वेगळेच रंग भरणारे आहेत ! क्या बात! याच रचनेतील "ईथे मेघ भरला...तिथे मोर फुलला, अरे ईश्वराला असे ओळखावे..." ह्या ओळी तर प्रणयातला रस व शॄंगार केवळ एका ओळीच्या चालीतून व आवजातून असे जमलेय की ईश्वरी देणगी मिळालेले हे तिघंही --- गीतकार ----संगीतकार व गायक आपणास ईश्वरी सॄजनातील तारतम्य व तन्मयताही स्वरांच्या व आवाजाच्या विविध वळणांद्वारे जागो-जागी दाखवतात. यातीलच "आसवांना टाळणे आता नको, दु:ख हे सांभाळणे आता नको..." या गझलेत शब्द....सूर...लय व तालाची हलकी रिमझिम घेऊनच अंगावर येते. "बोललो त्याला किती झाली युगे, हा अबोला टाळणे आता नको..." असे मोजके शब्द गायिका वैशाली माडे यांचे नर्म मधाळ गळ्यातून ऐकल्यावर आपले काळीज केव्हा काबिज केले गेले हे कळतही नाही ! कसबी संगीतकार सुधाकरजी यांची #नादब्रह्माशी सूर जुळलेली स्वर-रचना... "घाव ओला जरासा होता" रूपक तालाला '#वेस्टर्न_टच' देऊन साईड ऱ्हिदममध्ये चुटक्यांसह इतरही वाद्यांचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून जी झिंग आणली आहे त्याला तोड नाही....तसेच "वेदनेचा दिलासा होता" या ओळीतील 'वेदनेचा' या शब्दातील वेदना वैशालीने अश्या प्रकारे दाखविली की अंगावर सर्रर्रर्रर्रकन काटा यावा... प्रत्येक गझलेतील पुढल्या ऊत्तराच्या ओळींची गंमत लाजवाबच! सुधाकरजींची गझलेला व गीतांना नव्या नव्या, अव्वल चाली देउन अवघी मैफिल वेड्यागत आपलीशी करून घेण्याची आदत फार फार जुनी नाही तर ; केवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वीची आहे! तेच हे विदर्भातील एके काळचे अत्यंत नम्र, लोकप्रिय गायक !...........आजही तसेच अविरत,शांतपणे तेच तपस्वी दान परत संगीतकाराच्या रूपाने आपल्या ओंजळीत भरभरून घालत आहेत....दाता बनून देत आहेत............ याच अल्बमधील "असेच जगलो झुगारले या जगास जेव्हा, असाच झाला तुझा नि माझा प्रवास तेव्हा" या गझलेत सुधाकरजींनी तबला,सतार व सारंगीचे सूर अचूक स्थळे हेरून असे काही पेरलेत कि आपण नकळत #गुलामअलीच्या गझलांइतकेच एका मोहक नादमयी अंमलाखाली सूर-शब्द-ताल यांचे वारूवर आरूढ होत पुढे पुढे जातो !... एक हूरहूर लागुन रहाते......... "कळे ना मला हे कसा नेमका तू , कधी ऊन्ह होशी,कधी चंद्रमा तू..." या गझलेला अशी काही सुरावट दिली... की प्रेयसीला पडणारे गोड कोडे सूरांमूळे अलगद सुटल्याचा अफलातून प्रत्यय येतो! (ही रचना ऐकताना मला मदन मोहन या प्रख्यात संगीतकाराची प्रकर्षाने आठवण आली.) अशीच आणिक एक दुसरी हासरी गझल... "नुसत्याच तुझ्या हसण्याने जगण्याचे दु:खं वितळले, एकाच तुझ्या स्पर्शाने आभाळ मनाचे भरले...." हे विलोभनिय शब्दांचे अवकाश....तार सप्तकात ऊचलून नेणारे गर्भश्रीमंत सूर......... अगदी सहजतेने मनाचा ठाव घेउन आपला ताण विसरायला भाग पाडतात..... " अक्षरे पुसटली आणिक हरवली खुणेचि पाने, जाणुन ईशारा मी ही मग पुस्तक माझे मिटले !" कवीने अशी नर्म मर्मस्थळे अनेक जागी पेरलीत! वाद्ये तर स्वर्ग दोन बोटेच उरलाय असे वाटायला लावतील एवढी बेजोड. तरीही शब्दांना वाजवी न्याय देत देतच आपले ईमान न सोडता..पेरलीय ! असे नेमके स्वरसौंदर्य शब्दांना बहाल करणारे सुधाकरजी म्हणजे शास्त्रीय संगीताला नवा अध्याय जोडणारे कलावंत ! हा सच्चा गायक/वादक कलाकार रागांचा व तालांचा सुरेख वापर मराठी गझलेसाठी करुन हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत कलेला एक नवा साज/वसन बहाल करतोय,ही फार मोठी गोष्ट आहे. "तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते" ही रचना गझल म्हणून व कंपोझिशन म्हणून उचांकच आहे असे मला वाटते.यातील तरल भाव,हळवेअधिरे समर्पण,विलगतेची खंत,तक्रारीचा हळुवार सूर,सलत जाणारी वंचना आपल्या मनात खोलवर रुजत जाते... "जगाच्या सर्व शपथा मी जरी त्या मोडल्या होत्या, तुला जे जे दिले ते ते वचन मी पाळले होते...." यातील उरात ठसलेल दुखरा सल सुरावटीद्वारे दाखविण्यात सुधाकरजी यशस्वी ठरलेत ! या गझलच्या प्रत्येक शेरातील भाव परस्परांना जराही धक्का लागू न देता एखाद्या माहीर शल्यविशारदाच्या नजाकतीने स्वरांद्वारे हाताळत भावाभिव्यक्ती केली...या अलबम मधील बहुतेक रचना कल्याण थाटावर आधारित आहेत.पण ऐकताना मात्र हे जाणवत नाही.आणि इथेच संगीतकाराचे सारे कौशल्य प्रकर्षाने दिसून येते. "मनाच्या खोल डोहाच्या तळाशी ठेवले जपुनी, निखारे धुंद श्वासांचे तुझ्या जे पेटले होते..." यातील सुरावटीमुळे 'मनाच्या' शब्दाचे फुलपाखरू बनते व 'खोल डोह' अक्षरश: डोह बनून अंगावर काटा फुलवणारा 'अँटिक पीस' बनून जातो. याच अलबम मधील "आई असते श्रावण अविरत रिमझिमणारा" हे फार वेगळ्या सुरांसह पूजेचं ताट घेऊन येणारं,आईची महती सांगणारं सुरेख व सुरेल गीत आहे...यातील शांत सागरासारखे रुपेरी सूर संपूर्ण दिवस गोड करून जातात. सुधाकरजींनी स्वरबद्ध केलेला "#काटयांची_मखमल" हा सुरेशजी वाडकर व वैशाली माडेच्या आवाजातील असाच एक आणखी 'जानलेवा' अलबम... सुरेशजींच्या मुरलेल्या गळ्यातून संगीतकार म्हणून सुधाकरजींनी जे काही गाऊन घेतलेय ते ही अफाटच! (सुरेशजींनी अलबमच्या प्रकाशन प्रसंगी हे कबूल केल्याचे मी वाचले.तसेच कवी व संगीतकार आदरणीय यशवंतजी देव यांनी सुद्धा "#शब्द_स्वरांची_मखमल" असे या अलबम संबंधी उद्गार काढले.) यातील प्रत्येक गझल ऐकतांना हे फार प्रकर्षाने जाणवते ...... मराठीतून इतक्या देखण्या सुरावटीच्या गझला इतके दिवस का नाही दिसल्या ? हा प्रश्न पडतो.... वैशाली माडेच्या आवाजातील ही गझल हा प्रश्न अधिक तीव्र करते.... "हसू ऊमटले दु:खं भोगता,गंमत आहे, गझल मिळाली तुला शोधता,गंम्मत आहे" आणि या गझलेत उत्तर ओघानेच मिळून जाते! ......यातील व्हायोलिनच्या सुरावटीने मन शांत शांत होऊन जाते.या गझलमधील एकूण एक शेर शब्द-सूर - लय- तालाची लयलूट करणारा आहे.गिटार , सतार , व्हायलीन याची हळूवार मस्ती खऱ्या अर्थाने 'गंमत' आणून आर्ततेच्या टोकाला नेणारी आहेत...... ..... या दोन्ही अल्बमसाठी जीवतोडपणे मेहनत घेणारी सारी कलाकार मंडळी व कुटुंबीय यांना वंदन...(विशेषतः दोन्ही अलबममधील सारंगी व बासरी कायम लक्षात राहणारी आहे.)सुधाकरजींचा कायम असाच मूड व लोभ रसिकांवर राहून नवनव्या बंदिशी ऐकायला मिळो हीच सदिच्छा ! -सीमा गादे (गादेवार ) मुम्बई. chanel link https://www.youtube.com/@%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5

अध्यक्षीय भाषण, साहित्य संमेलन यवतमाळ, रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४.

सर्वप्रथम वऱ्हाडी कवी सुहास राऊत आणि अशोक मारावार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या संमेलनास माझ्या हार्दिक शुभेच्छा जाहीर करतो. यवतमाळ जिल्ह्यात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे.कारण यवतमाळ जिल्हा इतिहास संशोधक,साहित्यिक, संगीतकार,लेखक,कवी यांची खाण आहे.इतकेच नव्हे तर राजकारण व समाजकारणातही यवतमाळ जिल्हा मागे नाही.आपल्या जिल्ह्याला फार मोठी परंपरा आहे.मुळात विदर्भ भूमीच फार प्राचीन आहे.महाभारतात उल्लेख असलेले रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर विदर्भात आहे.आणि अशा या विदर्भात आपले यवतमाळ आहे. प्रत्येक शहराचा आणि जिल्ह्याचा अभ्यास करतांना किंवा त्याबाबत माहिती घेतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की त्या त्या जिल्ह्याला शहराला एक इतिहास असतो. यवतमाळ शहराला देखील इतिहासाची अशीच किनार लाभलेली आहे. या भागाने अनेक राजे महाराजांचा उदयास्त पहिला आहे. मौर्य , सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव वगैरे वगैरे, अकबराच्या दरबारातील इतिहासकार अबुल फजल याने लिहिलेल्या 'आईना-ए-अकबरी' मध्ये 'यवत' चा उल्लेख आढळतो तो 'योत' असा अपभ्रंश होऊन. पुढे १८५३ ला यवतमाळ जिल्हा ब्रिटीशांच्या सत्तेखाली आला. १९०३ ला यवतमाळला हैदराबादच्या निजामाने करारावर घेतले होते. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले. यवतमाळचे पहिले पत्रकार पृथ्विगीर हरिगीर गोसावी हे होते.त्यांनी 'हरिकिशोर' हे साप्ताहिक सुरू केले.पुढे चालून गोसावी आणि त्यांचा संप्रदाय' या शीर्षकाचा ग्रंथ लिहिला त्यामुळे यवतमाळच्या सुरुवातीच्या साहित्यिकांमध्ये यांचं नाव घेतलं जातं. लोकनायक बापूजी अणे यांचं संस्कृत भाषेतील १२ हजार श्लोकांचं 'तिलकयशोर्णव' नावाचं तीन खंडात लिहिलेलं महाकाव्य आणि 'अक्षर माधव' त्यांच्या साहित्यसेवेची साक्ष देतं. प्रसिद्ध संशोधक य. खु. देशपांडे यांनी इतिहास संशोधनासोबतच, सांकेतिक लिपीचा केलेला अभ्यास आणि 'महानुभावी मराठी वाङ्मय', 'राजे उदारामांचा इतिहास' हे ग्रंथ लिहिले आहे. प्र. रा. देशमुख यांच्या 'ऋग्वेद आणि सिंधू संस्कृती' या मराठी व इंग्रजी भाषेतील आवृत्तीला देश-परदेशात लोकमान्यता मिळाली आहे. प्रसिद्ध कवी,कादंबरीकार पांडुरंग श्रावण गोरे यांचे 'वाणीचा हुरडा' व 'बोबडे बोल' हे काव्य संग्रह आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर लिहिलेली 'कात टाकलेली नागीण' ही कादंबरी प्रसिद्ध आहे.वऱ्हाडी बोलीमध्ये विशेषत: वऱ्हाडी ठसक्यात जेव्हा वऱ्हाडी संस्कार, रूढी-परंपरा, भलावण तसेच वऱ्हाडी वातावरण सांगितले जाते,; तेव्हा वऱ्हाडी गीत तयार होते -' असं ते म्हणायचे.माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे घरी यायचे.त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा माझ्यावर निश्चितच प्रभाव आहे. भाऊसाहेब पाटणकर हे यवतमाळातील गाजलेलं एक नाव आहे.त्यांचे 'दोस्तहो' आणि 'जिंदादिली' हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.भाऊसाहेबांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते.गणेशोत्सव,दुर्गोत्सवात आमचे कार्यक्रम व्हायचे. यवतमाळात नाट्यचळवळ पण जोरात होती.मला आठवते त्या प्रमाणे आशाताई बर्वे या चळवळीच्या प्रमुख होत्या.त्यांनी बसविलेल्या 'दिवा जळू दे सारी रात' या नाटकाला मी संगीत दिले होते.दुसरे नाटक होते 'चांदणे शिंपीत जा' शिवाजी रंग मंदिर या संस्थेने बसविलेल्या या नाटकात 'हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली' हे गाणे होते....ते गाणे पियानोच्या पार्श्वसंगीताससह रेकॉर्ड करायचे होते.यवतमाळात पियानो फक्त बिब्लिकल सेमीनरीमध्येच.म्हणून येथील चर्च मध्ये जाऊन माझ्या सहगायिका प्रमोदींनी मॅथ्यू यांच्या आवाजात रेकॉर्ड केले. दिघेकर, हरीश मानधना,जयंत भट,राजा सराफ ,श्रीकृष्ण मिश्रा,प्रवीण जानी,शशी देशपांडे,अशोक एकबोटे,राजन टोंगो, रोहिणी टोंगो,शंकरराव सांगळे,स्नेहलता बोबडे, बक्षी,अशोक आष्टीकर,महेश पटेल,गोपाळ पाटील,जयंत वर्मा,सुहास वराडपांडे, प्रशांत गोडे ,मुन्ना गहरवाल सतीश पवार ,अमित राऊत ,रवी ढगे ,अमर गुल्हाने, राजाभाऊ भगत, सदानंद देशपांडे , प्रशांत बनगिनवार ,काशिनाथ लाहोरे ,अजय शेटे हे चळवळीचे जुने नवे मानकरी. शरच्चंद्र टोंगो हे ही यवतमाळचेच.आमचे ते 'सर' होते.त्यांची स्वीकार' कादंबरी व 'नव्या डहाळ्या, नवे खोपे' हे नाटक गाजले होते. कासलीकर गुरुजी ,पनके गुरुजी,दादा पांडे यांनी यवतमाळातील संगीत क्षेत्र जिवंत ठेवून विद्यादानाचं फार मोठं कार्य केलं आहे.संगीत क्षेत्रातील माझी जडण-घडण वरील मंडळीमुळे व साहित्यिक जडण-घडण आदरणीय पांडुरंग गोरे काका,टोंगो सर, कळणावत सर यांच्यामुळे झाली आहे.आणि लेखक , कवी म्हणून घडविण्यात तरुण भारतचे संपादक मित्रवर्य स्व. वामन तेलंग यांचा फार मोठा वाटा आहे. प्राचार्य राम शेवाळकर यांनी विपुल साहित्य निर्मिती केली ओजस्वी, प्रवाही, प्रबोधनपर आणि रसपूर्ण व्याख्यानांसाठी ते प्रसिद्ध होते. 'भाग्योदय कला मंडळ' संचालित यवतमाळातील पहिला आर्केस्ट्रा आम्ही १९६५ मध्ये स्थापन केला होता.या ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम विदर्भच नव्हे तर मराठवाड्यात सुद्धा गाजले होते. प्रसिद्ध वऱ्हाडी कवी माझा जिवलग मित्र शंकर बडे याचं वऱ्हाडी कवितेच्या क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचा 'बॅलिस्टर गुलब्या' हा प्रहसनात्मक एकपात्री प्रयोग महाराष्ट्रभर गाजला.विशेष म्हणजे हे नाव आर्णीच्या एका कार्यक्रमा नंतर मीच ठरवून यावर एक लेख लोकसत्तामधून प्रसिद्ध केला होता.शीर्षक होते ' 'ब्यालिस्टर' शंकर बडे. आर्णीला असताना माझ्या कवितांची सुरुवात विडंबन गीतांनी झाली.पुढे पुण्याला गेल्यावर नवीन काही सुचले की वृत्तबद्ध करून फेसबुकवर टाकायचो.तेथील प्रतिसाद माझ्यासाठी उर्जादायी ठरला, व तेथून माझ्या काव्यप्रवासाला सुरवात झाली.माझी पहिली रचना होती... "सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी गातो गझल मराठी, प्रीये तुझ्याचसाठी..." नंतर षडाक्षरी,अष्टाक्षरी,कविता,गझल असे बरेच काही प्रकार उतरत गेले. चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात राबतो शेतात। सालोसाल... जीवापलीकडे। मेहनत करी तरीही भाकरी। मिळेचि ना... ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी लिही कादंबरी। मुंबईत... वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा, कादंबरी, कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा मोठा विरोधाभास आहे! "घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल" शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती म्हणून संबोधणे हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये सर्वप्रथम मी केले असावी असे मला वाटते. सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती तशी 'कष्टवती' ! मी शेतकरी कुटुंबातील असून माझ्या आयुष्यातील बराचसा काळ ग्रामीण भागात गेला आहे. अवघं लाघव हिरवं तुडुंब द्यावी वाटे येथे मनालाही डूब भरल्या शेताच दर्शन घडता सृष्टीपुढे झुके आपसुक माथा बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे. "ना मी कृष्णा ना तू राधा का व्हावी गे सावळ बाधा ?" ही राधा-कृष्णाची प्रीत आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर मी कवितेत करतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार यावरील दोन ओळी बघा... "ना महाभारत, न रामायण तरीही जानकी अन् द्रोपदी लागे पणाला" मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे असे तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू बनल्याचे कुठे कुठे दिसून येते.म्हणून जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे मला आवर्जून वाटते. शब्दाचे ऋण मानावे, आकळेल अर्थ घालता आवर्त एका एका आर्त शब्दाचा तो... शब्दाचा तो भाव समजून घेता संपेल आर्तता मनातील... कविता,कथा, कादंबरी फक्त ग्रांथिक भाषेतच असावी असे काही नाही.ग्रांथिक म्हटल्या जाणारी भाषा बोलीतूनच जन्माला आली आहे.तिची श्रीमंती बोलीभाषेमुळेच वाढली व वाढत आहे. विदर्भाचाच विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यात गमतीशीर असा थोडा फार फरक पडलेला दिसतो.आपली मायबोलीच जेव्हा पन्नास कोसावर 'चाल' बदलते, तेव्हा तर आणखीनच गंमत येते. बुलढाणा जिल्ह्यात 'ळ'चा उच्चार 'ड' असा केल्या जातो. त्यामुळे डाळीला दाड, केळीला केडी, फळाला फड, गुळाला गुड, तळ्याला तडे म्हटल्या जाते. तेथील डॉक्टर लोक या लोकांना 'अर्धी गोडी सकाडी व अधीं गोडी संध्याकाडी उकडलेल्या पाण्यासोबत घ्या' असे गंमतीने सांगतात. हाच 'ळ' अमरावती जिल्ह्यात 'य' बनतो. तेव्हा गुळाचा गुय, केळाचे केय होते. तिकडे झाडीपट्टीत तर आणखीनच वेगळे काम आहे तेथे 'ळ'चा 'र' होतो व 'ज' 'च' चा उच्चार ज्य, च्य होतो. 'बाजारात जाशील तर तुरीची डाळ व चांगला गूळ आणशील' हे वाक्य 'बज्यारात ज्याशीन त तुरीची डार अन् च्यांगला गूर आनज्यो' असे रूप घेते. सर्वश्री द.बा. महाजन,बाबाजी दाते,आबासाहेब पारवेकर,बाबासाहेब घारफळकर,बळीरामपंत एकबोटे,,हरितक्रांतीची बीजे पेरणारे वसंतराव नाईक,सुधाकरराव नाईक,जवाहरलालजी दर्डा,भूगर्भ शास्त्रज्ञ वामनराव मेत्रे,सदाशिवराव ठाकरे,डॉ.भास्कर टेंबे, वा.ना.देशपांडे, दामले वकील,अरुण हळबे, डॉ.रमाकांत कोलते,शामा कोलाम,दीपक शिंदे,आजीबाई बनारसे,विदर्भवीर जांबुवंतराव धोटे,डॉ.बाबासाहेब नंदुरकर,दादासाहेब वगारे,मायदेवी भालचंद्र,डॉक्टर काणे,डॉ.शैलजा रानडे, गोविंद देशपांडे, गौतम सूत्रावे,माधव सरपटवार,शरद पिदडी, भाऊ मांडवकर, शिवा राऊत, दिनकर दाभाडे, मूळचे अकोल्याचे पण गेल्या चार वर्षांपासून पुसदवासी झालेले ज्येष्ठ गझलकार मित्र श्रीकृष्ण राऊत, दिलीप अलोणे, नीलकृष्ण देशपांडे, कलीम खान, मिर्झा रफी बेग, गजेश तोंडरे,रवी चापके, पुनीत मातकर, जयंत चावरे, विद्या खडसे, आनंद गायकवाड ,प्रा. सागर जाधव, सिध्दार्थ भगत,मसूद पटेल, गजानन वाघमारे सुरेश गांजरे, रमेश घोडे, विनय मिरासे,स्मिता गोरंटीवार, मीनाक्षी गोरंटीवार,आरती पद्मावार,कविता शिरभाते, निशा डांगे,अल्पना देशमुख - नायक, सोनल गादेवर,अशोक राणा, विवेक कवठेकर, नितीन पखाले, मोरेश्वर चरेगावकर, अजय देशपांडे, स्वानंद पुंड,अ.भा. ठाकूर,देवेंद्र पुनसे यांनी आपापल्या क्षेत्रात लक्षणीय काम करून यवतमाळ जिल्हा सर्व दृष्टीने संपन्न केला आहे. संमेलन म्हणजे फक्त वाद नसतात, साहित्यातलं राजकारणही नसतं. मला वाटतं नवीन विचार पेरणारी प्रेरणास्थळं म्हणून आपण या संमेलनाकडे पाहावं. हा चष्मा सकारात्मकतेचा असला तरच पुढच्या काळात या मंथनातून साहित्यातील नव्या सृजनाचं 'अमृत' येणाऱ्या पिढीला मिळत राहते.एखाद्या लेखकाच्या लेखनउर्मीला ऊर्जा आणि लेखनविषयांना विविधता मिळण्यासाठी कर्तृत्ववान आणि सर्वमान्य असणाऱ्या असामान्य व्यक्तीने केलेले आवाहन महत्त्वाचा प्रेरणास्रोत ठरते. आणि शेवटी.... हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे ? -गझलगंधर्व सुधाकर कदम सी१सी/१३,गिरीधर नगर, वारजे माळवाडी, पुणे ५८ मोबा.८८८८८५८८५० हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे... Link... https://youtu.be/RF9sXwA2BAg?si=6znjkpiPEqeq2कॅबक्स ------------------------------------------------------- वरील भाषणात अनवधानाने सुटलेली काही नावे:- अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य पेशवे सर, बब्बी पहलवान, शाहू चव्हाण पहलवान ,मूर्तिकार बनकर, चिंधे पेंटर, तबलावादक शेखर सरोदे, नगराध्यक्ष ऍडवोकेट चमेडिया, मारेगाव येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सिंहगर्जना दैनिकाचे संपादक म.बा.मेश्राम, हंटर चे संपादक दादा राऊत, चित्रकार बळी खैरे, एॅडवोकेट मधुकरराव मानकर वगैरे...

Tuesday, September 1, 2026

कविता - सापळा

श्रद्धा अंधश्रद्धा

ध्वनीप्रदूषण नको

माझा घोडा... पाठयपुस्तकातील कविता.

. संगीत शिक्षक म्हणून आर्णी (जि. यवतमाळ) येथे कार्यरत असताना केलेल्या अनेक उपद्व्यापांपैकी एक सांगीतिक उपद्व्याप म्हणजे १९८५ मध्ये इयत्ता एक ते दहावीच्या पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून शाळेत शिकविणे. नंतर जिल्हाभर शालान्तर्गत मार्गदर्शक शिबीरे आयोजित करून शिक्षक व विद्यार्थ्यांकड़ून गाउन घेणे हा होय.हा उपक्रम आमचे मुख्याध्यापक शंकरराव बुटले व तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना आवडल्यामुळे, महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक उठाव या मोहिमे अंतर्गत १९८६ मध्ये #झुला या शिर्षकांतर्गत तीन कॅसेट तयार करण्यात येऊन, तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुधाकरराव नाईक यांचे हस्ते,शिक्षण मंत्री जावेद खान यांचे उपस्थित करण्यात यवतमाळला प्रकाशन करण्यात आले. त्यातीलच ही कविता आहे 'माझा घोड़ा'! या कॅसेटचे ध्वनिमुद्रण शाळेतील विद्यार्थीनी,शिक्षक व परिसरातील कलावंत घेऊन,आहूजा कंपनीच्या डेकवर आर्णीला माझ्या चंद्रमौळी घरात,काही कविता मुख्याध्यापकांच्या घरी तर काही एका मित्राने रियाजा करीता दिलेल्या खोलीमध्ये करण्यात आले.१९६५ ते १९७५ अशी दहा वर्षे ऑर्केस्ट्रात संगीत संयोजक म्हणून काढल्यामुळे वाद्यपरिचय व वाद्यमेळ जमवण्याचा अनुभव होता तो येथे कामी आला.चाळीस वर्षांपूर्वीच ग्रामीण भागातील हा माझा प्रयत्न आपल्यासमोर ठेवत आहे... कॅसीओ वादक व रेकोर्डिस्ट अशी दुहेरी भूमिका पार पाडत हे ध्वनिमुद्रण झाले आहे. आवडणे न आवडणे तुमच्या हातात आहे... धन्यवाद! टपटप टपटप टाकीत टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली, पायी रुपेरी तोडा. उंच उभारी दोन्ही कान,ऐटीत वळवी अपुली मान मधेच केव्हा दुडकत दुडकत,चाले थोडा थोडा! घोडा माझा घाली रिंगण,उखडून टाकी सारे अंगण कोणी त्याला अडवत नाही,नदी असो की ओढा! घोडा माझा फार हुशार,पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा,कशास चाबुक ओढा? सात अरण्ये, समुद्र सात,ओलांडील हा एक दमात आला आला माझा घोडा,आधी रस्ता सोडा! गायिका - गीता पद्मावार आणि सीमा मुनगीनवार (इयत्ता ७ वी) कवयित्री - शांता शेळके संगीत - सुधाकर कदम ढोलकी - खंदारे गुरुजी (पुसद,यवतमाळ) सहकारी - गजानन घोडेराव गुरुजी,मामा मरगडे गुरुजी,अविनाश गिरी,प्रकाश करपे. ●आज घोडेराव गुरुजींचा वाढदिवस आहे.त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, August 28, 2026

विनोद

कविता


 

'इव्हेन्ट-प्रेझेंट'


 

मी सुखाचे गाव शोधत राहिलो

 


मी सुखाचे गाव शोधत राहिलो
जीवनाला शब्द टाकत राहिलो

प्रेम होते हे तुझे की वंचना...
मी स्वत:ला हे विचारत राहिलो
..............●..............
गायक-दिनेश निंबाळकर
गझल-दिलीप पांढरपट्टे
संगीत-गझलगंधर्व सुधाकर कदम
सारंगी-उस्ताद लियाकत अली खान
तबला-समीर शिवगार
हार्मोनियम-संतोष घंटे
गिटार-मिलिंद शेवरे
सूत्र संचालन-शाहीर सुरेशकुमार वैराळकर

#काट्यांची_मखमल live-kankawli 1.1.2011

#gazal  #गझल  #composition #sudhakarkadamscomposition 
#मराठीगझल #संगीतकार #sudhakarkadam








संगीत आणि साहित्य :