गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, November 28, 2011

क्या भला मुझको परखने का नतीजा निकला...

          
          मेहदी     हसन खाँ साहेबांनी गायीलेली मुज़फ्फर वारसी यांची ही गझल मी अंदाजे ३५/३६ वर्षांपुर्वी मनसोक्त ऐकली ती सुरेश भटांमुळे.या गझलची बंदिश मालकौंस या सुंदर आणि लोकप्रिय रागात आहे.गायक,वादक,संगीतकार यांचाही हा अत्यंत आवडता राग आहे.बिसमिल्ला खाँ साहेबांनी शहनाईवर वाजविलेल्या मालकौंसाची ध्वनिमुद्रिका आजही सीडी च्या रुपात मंगल कार्यात वाजत असते.बैजू बावरा या चित्रपटातील रफी साहेबांनी गायीलेले "मन तरपत हरि दरशन को आज" हे गाणे आजही टवटवीत आहे.नवरंग चित्रपटातील "आधा है चंद्रमा रात आधी,रह जाए तेरी मेरी बात आधी" आणि "तू छुपी है कहाँ मै तडपता यहाँ" ही गाणीही मालकौंस रागातीलच आहे.संगीत नाटकांमध्येही या रागाचा मुक्तपणे वापर केलेला दिसतो.रणदुंदुभी नाट्कातील "दिव्य स्वातंत्र्य रवी",मृच्छकटीक मधील "तेचि पुरूष दैवाचे" वगैरे-वगैरे."अणुरणिया थोकडा,तुका आकाशाएवढा"हा भीमसेनांच्या आवाजातला अभंग ही त्याची उदाहरणे...असा हा श्रीमंत राग मालकौंस...या रागात सा नि असे फक्त पाचच स्वर लागतात.गांधार,निषाद,धैवत हे स्वर कोमल आहेत.बस्स...पण या पाच स्वरांमधील जादू वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलीच असेल....

         
वरील सर्व गाणी अतिशय कर्णमधुर आहेत यात काही वादच नाही.प्रत्येक संगीतकार,गायक,वादकांनी आपापल्या प्रतिभेनुसार हा राग लोकांसमोर ठेवला.परंतू या सगळ्यांपेक्षा वेगळ्या अंगाने जाणारी बंदिश हे या गझलचे वैशिष्ठ्य आहे.त्यातही अंतर्‍यात केलेली कलाकुसर हृदयाला भिडणारी आहे.या गझलची माझ्या आयुष्यात वेगळी अशी जागा आणि आठवण आहे.सुरेश भटांशी मैत्री झाल्यानंतर त्यांनी मला सर्वप्रथम "हा ठोकरुन गेला" आणि "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही" या दोन गझला मला स्वरबद्ध करायला दिल्या.यावेळी मी आँर्केस्ट्रा सोडून नुकताच आर्णी (जि.यवतमाळ) या खेड्यात संगीत शिक्षक म्हणून रुजू झालो होतो.भरज्वानीचा की काय म्हणतात असा तो काळ होता.१५/२० दिवसानंतर नागपुरला धनतोलीच्या त्यांच्या निवासस्थानी या दोन्ही गझलांना बसविलेल्या चाली ऐकविल्या."ठोकरुन"ची चाल त्यांना आवडली.परंतु "कुठलेच फूल" ला बसवलेली किरवाणी रागातील उडती चाल त्यांना बिलकुल आवडली नाही.त्यांचा स्वभाव तसा अतिशय फटकळ आणि मिश्किल असल्यामुळे ते मला म्हणाले" सुधाकरराव तुमची ही चाल म्हणजे एखाद्या घरंदाज बाईला तमाशात नाचवण्याचा प्रकार झाला आहे!"...त्यांना काय म्हणायचे आहे हे मला क्षणभर समजले नाही.पण काही तरी चुकल्याचे लक्षात आले.माझा गोंधळलेला चेहराबघून त्यांनी एक भली मोठी लोखंडी ट्रंक उघडली,त्यात खच्चून कँसेट्स भरलेल्या होत्या. त्यातल्या / कँसेट्स मला दिल्या.(सुरेश भट त्यांच्या संग्रहातील कँसेट्स आणि पुस्तके कोणालाही देत नसत.या बाबतीतले त्यांचे विचार अतिशय परखड ठाम होते.) परंतू कँसेट ऐकण्याकरीता माझ्याकडे टेपरेकाँर्डर नव्हते.म्हणून त्यांना कोणीतरी भेट दिलेले त्यांच्याजवळचे एकमेव टेपरेकाँर्डर मला दिले आणि गझल गायकीचा अभ्यास करायला सांगितले.ते सगळे घेऊन मी आर्णीला आलो.माझ्यासाठी हा फार मोठा आणि मोलाचा खजिना होता.कारण रेडिओवर त्याच्या मर्जीने लागलेल्या गझला कधी-मधी ऐकणे आणि कँसेटवरून सतत ऐकणे यात खूप फरक आहे.आज इंटरनेटमुळे एका क्लिक वर हवे ते सापडते.तेव्हा मात्र एखादे आवडीचे गाणे ऐकायचे असेल तर दिवसभर रेडिओ कानाला लावून बसावे लागायचे.नशीब की त्या काळात छोटेखानी ट्रांझिस्टर रेडिओ उपलब्ध होते.हे सगळे सांगायचे कारण असे की,यातील मेहदी हसनच्या कँसेटमध्ये कधीकाळी पाकिस्थान रेडिओवरून ऐकलेली काळीज कापणारी आणि सुरावटीचा खूप विचार करायला लावणारी वरील गझल त्यात होती.आम्ही शिकलेलो मालकौंस वेगळा होता आणि हा मालकौंस काही वेगळाच भासत होता.मालकौंस मधील बहुतेक रचना षड्जापासून सुरू होतात.याला काही अपवाद असतीलही पण ठोकळमानाने हा परिपाठ आहे. परंतू या गझलची सुरवात मध्य सप्तकातील लोमल निषादापासून झाली आहे.पुढेपरखनेका या शब्दांसोबतचा स्वरगुच्छ आणिने या अक्षरावरील मध्यमाला घासून जाणारी सम....अरारारारा....................काळजाची चाळणच.....लाजवाब ! पुढेनतीजा निकलावरील तार षड्जापर्यंत जाऊन वापस षड्जावर येणारी सुरावट...माशाल्ला ! आपण ऐका....एक वेगळे स्वरशिल्प आपल्यासमोर येईल.


         
मुज़फ़्फ़र वारसी यांच्या या गझलमधील एक एक शेर जसा दमदार आहे.तसेच खाँ साहेबांचे सादरीकरणही कलदार आहे.अंतर्‍यामध्ये त्यांनी मुर्छना पद्धतीचा अतिशय सुंदर प्रयोग करून सोहनी या रागाचा आभास निर्माण केला आहे.त्या वेळीक्या बात है................’ असे आपसुकच तोंडातून निघुन जाते.वास्तविक पाहता मालकौंस आणि सोहनी या हे दोन्ही राग सगळ्याच बाबतीत परस्पर विरोधी आहेत.दोन्ही रागात एकही साम्यस्थळ नाही.तरी पण हे त्यांनी केले...अगदी बेमालुमपणे.तुम्ही कधी आम्रखंड खाल्ले आहे का ? बस...नेमके तसेच...आम्रखंड खातांना श्रीखंड खाण्याचा आनंद मिळतो.त्यात आमरसाची जी थोडी-थोडी वेगळी चव जिभेला जाणवत राहाते पण नकळत...तसलच काहीतरी हेप्रकरण आहे.ऐकल्यावर त्याची लज्जत आपणास कळेललच......ऐका तर..."क्या भला
..."


क्या भला मुझको परखने का नतीजा निकला
ज़ख्म--दिल आपकी नज़रों से भी गहरा निकला

तोडकर देख लिया आइना--दिल तूने
तेरी सूरत के सिवा और बत क्या निकला

जब कभी तुझ को पुकारा मेरी तनहाई ने
बू उडी फूलसे,तस्वीर से साया निकला

कोइ मिलता है तो अब अपना पता पूछता हूं
मैं तेरी खोज में तुझ से भी परे जा निकला

तिश्नगी जम गयी पत्थर की तरहा होटोपर
डूबकर भी तेरी दरिया से मैं प्यासा निकला


शायर - मुज़फ़्फ़र वारसी
आवाज़ - मेहदी हसन





संगीत आणि साहित्य :