गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, May 12, 2024

मध्यस्थ...

 

      चाटूगिरी या एका शब्दामुळे चाटू, चमचे, पळी, सराटा बगैरे सर्व चमचा-कुळातील वस्तूंच्या बाबतीत एक वेगळाच समज मानव प्राण्यांमध्ये तयार झालो आहे. ढवळाढवळ करणाऱ्या या वस्तूंना हीन लेखण्याचा माणसाचा प्रयत्न मुळातच निषेधार्ह आहे. खरे म्हणजे हात व ज्यात ढवळाढवळ करायची त्या वस्तूमधील मध्यस्थ म्हणजे चमचा-कुळ होय. पण माणसाच्या नको तिथे ढवळाढवळ करण्याच्या सवयीमुळे व नको तिथे 'चाटूगिरी' करण्याच्या पद्धतीमुळे या मध्यस्थांवर फालतूचे आरोप लागून बदनामी होत आहे. 'चाटणे' या शब्दावरून 'चाटूगिरी' हा शब्द आला असला, तरी गरम द्रावणात फिरवल्या जाणाऱ्या पळीलाच आजकाल चाटू म्हणायला लागल्यामुळे समस्त चमचावंशज अत्यंत नाराज झाले आहेत.वास्तविक चमचा-कुलोत्पन्न समस्त वस्तूंचे मानव जातीवर असंख्य उपकार आहेत. कारण खाद्यपदार्थ तयार करताना गरम गरम पदार्थांमध्ये फक्त हीच मंडळी ढवळाढवळ करू शकते. इतरांची बिशाद नाही. ही मंडळी नसती तर माणसांचे किती हाल झाले असते ! अन्न शिजतानाच या मंडळींचा उपयोग होतो असे नाही; आजकाल तर, जेवतानाही काटे-चमचे वापरण्याचा प्रकार रूढ होत चालला आहे. केळीच्या पानावरील गरमसूत जेवण जाऊन चिनीमातीच्या 'डीश' मधील अन्न काठ्या-चमच्याने खाण्यांचे दिवस आले आहेत.

      तर अशा या हाता-तोंडाच्या मध्यस्थांवरून  माणसातील मध्यस्थांना यांची नावे देणे म्हणजे कृतघ्नपणा नव्हे का? आणि माणसातील मध्यस्थांनाही दोन्ही बाजूकडून चटके बसत नाही का? उलट हातातोंडातील मध्यस्थांना फक्त एकीकडचाच चटका बसतो. तोंड फुंकर मारायला तयार असतं. पण माणसातील मध्यस्थांना तर कोठून कसे चटके बसतील, हे सांगताच येत नाही. त्यातल्या त्यात लग्नातल्या मध्यस्थांबद्दल तर न बोललेलेच बरे !

     कचेऱ्यांमध्ये सुद्धा अशा मध्यस्थांची फार गरज असते. 'बॉस' गरम असला की मध्यस्थच त्याला थंड करू शकतात. थंड करताना त्याला बॉसची स्तुती करावी लागते. नसलेल्या गुणांची तारीफ करावी लागते. पण म्हणून काय त्याला 'चमचा' म्हणायचे ? वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणे, त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान हलविणे, भाजीपाला नेऊन देणे, सिगारेट पेटवून देणे, वाढदिवसाला घरची सर्व कामे करून भेटवस्तूही देणे, या माणूसकी, बंधुभाव, प्रेम, त्याग शिकविणाऱ्या गोष्टी अंगिकारल्याबरोबर त्याला चमचा, चाटू वगैरे उपमा देणे बरोबर आहे का ? उलट अशी माणसे आपल्याजवळ नसल्यामुळे आपले किती नुकसान होते, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा ! कारण बस, रेल्वेचे आरक्षण; शाळा-कॉलेजमधील प्रवेश,  पुढाऱ्यांच्या भेटी, साहेबाकडील जिल्हा व तहसील कचेऱ्यातील काम, कोर्टातील व पोलिस ठाण्यातली कामे आणि काळ्या बाजारातील वस्तू वगैरे मिळवायला मध्यस्थाशिवाय पर्याय नसतो. 'अडत्या' नामक एक मध्यस्थ तर धान्यबाजारातील देवाप्रमाणे असतो. शेतकरी व खरेदीदार यामधला महत्त्वाचा दुवा म्हणजे हा मध्यस्थ ! पण ह्याला अडत्या किंवा दलाल असे म्हणतात. तर मंडळी! या मध्यस्थांशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. दिल्लीत तर ह्यांनाच पॉवर-ब्रोकरही म्हणतात. अशी एकूण वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात तर राजकारणी मंडळीत प्रत्येकागणिक एक दलाल म्हणजे मध्यस्थ आढळतो. एकूण झालेल्या खरेदीमध्ये मोठ मोठे मध्यस्थ दलाली खाताना दिसून आले आहेत. पण ही दलाली मात्र देशाच्या दृष्टीने घातक ठरून सरकारी तिजोरीला मोठे खिंडार पाडणारी ठरते.  तसेच बँकांचे कर्ज न फेडता ते बुडवून पळून जाणारी मंडळी सुद्धा देशाची गुन्हेगार  आहे.या लोकांना जेरबंद करून तो पैसा का वसूल केल्या जात नाही, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो.पण त्यासाठी  लागणारा बुद्धिमान मध्यस्थ त्यांच्या जवळ नसल्यामुळे नुसताच प्रश्न उभा राहतो. आणि प्रश्न फक्त उभा राहून सुटत नसतो. तो सोडवावा लागतो. पण सोडवल्याही तेव्हाच जाऊ शकतो, जेव्हा सोडवणारी मंडळी 'चोर चोर मौसेरे भाई' नसतील तेव्हा ! राजकीय दूधभाऊ तर एका स्तनातले दूध तू पी. दुसऱ्या स्तनातले मी पितो, असे म्हणून देशाला शुष्क करीत असतात.

     सध्या निवडणूक सुरू आहे.निकाला अगोदर मतदारांना पैसे देऊन फितविण्याऱ्या व निकाल लागल्यावर निवडून आलेल्यांची खरेदी-विक्री करण्याऱ्या राजकीय मध्यस्थांचा धंदा तेजीत येऊन त्यांची चांदीच चांदी होते! 

     खरे म्हणजे प्रगल्म लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून आपणच आपला डिंडीम पिटून, मतदानाच्या अगोदरच्या दिवशी राजकीय दलालांच्या... माफ करा हं! राजकीय मध्यस्थांच्या हस्ते 'मतपरिवर्तन' (साम, दाम, दंड, भेदाने का होईना) करून आपणच आपल्या प्रगल्भ लोकशाहीचा गळा घोटत असतो. षण राजकारण करायचे म्हटले की हे सर्व करावेच लागणार ! शेषन् सारखा मध्यस्थही जिथे हात टेकतो तिथे इतरांचे काय ?

     राजकारणाचा धंदा बद करणारा, चाटूगिरीपासून पुढाऱ्यांना दूर ठेवणारा, कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणारा, भारताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्याला रोखणारा, सर्वसामान्य नागरिकांबद्दल आत्मीयता बाळगणारा मध्यस्थ या भारतवर्षी केव्हा जन्म घेईल कुणास ठाऊक!





संगीत आणि साहित्य :