गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, December 23, 2011

सावळा घनशाम रे...


           या गीताची बंदिश वृंदावनी सारंग या रागात आहे.याचे आरोहावरोह असे...सा रे म प नि सां,सां नि प म रे सा.असे आहेत.अवरोहात नि हा स्वर कोमल आहे.दुपारी गायिला जाणारा हा एक गोड राग आहे.या आणि याचाच भाऊ मधमाद सारंग या रागात अनेक चित्रपट गीते,भावगीते,भक्तिगीते आणि गझल आहेत.

         'जादुगर सैयाँ,छोड मोरी बैयाँहे नागिन’ (१९५४) या चित्रपटातील हेमंतकुमार यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लताबाईंनी गायिलेलं त्या काळात अतिशय गाजलेलं गाणं वृंदावनी सारंग या रागातच आहे.’रानी रुपमती’ (१९५९) या चित्रपटातील एस.एन.त्रिपाठी यांनी संगीतबद्ध केलेले भरत व्यास यांचे आ लौटके आजा मेरे मीत...’ हे गीत मधमाद सारंग या रागात आहे.याच चित्रपटातील रफी-लता यांनी गायिलेले झननन झन झननन झन बाजे पायलिया...’ हे अती सुंदर गीत वृंदावनी सारंग रागात आहे. ’संथ वाहते कृष्णा माई...’ हे ग.दि.मां.चे.दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेले आणि सुधीर फडके यांनी गायिलेले सर्वांगसुंदर गीतही वृंदावनी सारंग या रागात आहे.एवढेच नव्हे तर कजरा मोहब्बतवाला,अखियों मे ऐसा डाला...’ हे किस्मत’ (१९६८) या चित्रपटातील ओ.पी.नैय्यर यांनी संगीत दिलेलं आणि आशाबाईंनी गायिलेलं धडकेबाज गाणंही वृंदावनी सारंग याच रागात आहे.

         मी ही थोडा वेगळा प्रयत्न करून पाहिला.यातील घनया शब्दावरील बारिकशी सुरावट आणि दुसर्‌या कडव्यात याच्या जवळच्याच देसरागाच्या सुरावटीचा उपयोग करून गोडवा आणण्याचा प्रयत्न केला...आपणास आवडले तर बघा...

शाम घन घन शाम माझा सावळा घनशाम रे
जन्म ज्याला वाहिले मी श्वास गाती नाम रे

एकटी मी चालताना धाव घेतो श्रीहरी
जागवी आलोक माझ्या श्रांतलेल्या अंतरी
पूजिते मी पाउलांना होऊनी निष्काम रे

वादळी नौकेस माझ्या तोच आहे रे किनारा
तोच माझ्या वेदनेची थांबवीतो अश्रुधारा
नम्र माझ्या पापण्यांची पूजने अविराम रे

तोच येथे धाव घेतो दुःख माझे तोच हरतो
तो सुखाचे रूप आहे तो मनाला शांतवीतो
शब्द झाले तीर्थ माझे प्राण पावन धाम रे

गायिका-रेणू कदम चव्हाण
गीत-आशा पांडे
संगीत-सुधाकर कदम

(’स्वरानंद प्रतिष्ठानआयोजित, ’अर्चनाया भक्तिगीतांच्या अल्बमचा लोकार्पण सोहळा,यशवंतराव चव्हाण ,पुणे.२००६)







संगीत आणि साहित्य :