गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, March 15, 2021

श्यामरंगी रंगताना....

.       'श्यामरंगी''...वाचता वाचता आलेली सुरावट...
           #भूप रागावर आधारित...ताल #रूपक
          (कृपया हेडफोन लावून ऐकावे,ही विनंती)

शामरंगी रंगताना श्याम व्हावे.. 
राधिकेने कृष्ण अधरी  विरघळावे

बासरीचे सूर कानी गुंजताना
सावळ्याच्या सावळीने  मोहरावे

होत जाता सावळी बाधा मनाला
अनलरंगी पावरीने धुंद गावे

एक राधा एक कान्हा द्वैत कुठले
दोन मन जुळता सदा अद्वैत व्हावे

गायक - मयूर महाजन
कवयित्री - मीनाक्षी गोरंटीवर
संगीत - सुधाकर कदम
तबला - निषाद कदम
मेंडोलीन - अबीर कदम


 

मराठी गझलेतील 'टायगर'...

काल (दि.१४ मार्च) सुरेश भटांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षर मानव ग्रुपवर खालील गझल टाकली असता,कारंजाचे डॉ.सुशील देशपांडे यांची आलेली बोलकी व सटीक प्रतिक्रिया...

●त्याकाळात इतके साथीदार घेऊन आपण कार्यक्रम केलेत, विशेष म्हणजे excellence सोबत कुठेच तडजोड केली नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतके जुने रेकॉर्डिंग आपण जपून ठेवले व नव्या पिढीला , 'आमचा काळ किती वैभवाचा होता' हे सप्रमाण दाखविण्याचं भाग्य आपण माझ्या पिढीला दिलं त्याबद्दल आभार।  
सुधाकर कदम म्हणजे ,हिंदी गझलेच्या वैभवाच्या काळातही मराठी गझलेला glamer मिळवून देणारा ' एकटा टायगर' होता असे अभिमानाने सांगावेसे वाटते।
८०, ८२ च्या काळात घेऊन जाणारी रचना ऐकवून पुनःश्च त्या काळातील आठवणी जाग्या केल्या बद्दल धन्यवाद।

-Sushil Deshpande


 

Tuesday, March 9, 2021

अशी गावी मराठी गझल-अजीम नवाज राही


* कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी (जि.यवतमाळ) येथील प्रख्यात मराठी गझल गायक सुधाकर कदम यांनी.प्रसिद्ध मराठी कवी कलीम खान यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा "#अशी_गावी_मराठी_गझल" 
हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला.इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत.नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.

-अजीम नवाज राही-
दै.सकाळ,नागपुर.दिं.११/११/२००९
----------------------------------------------------------------------
 * त्यांना (कलीम खान यांना) गझलेची खरी ओळख झाली ती सुधाकर कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर! कदमांच्या अनेक गझलमैफिलींचे निवेदन कलीम खान करायचे. 

-अमोल शिरसाट
दै.अजिंक्य भारत,गझलयात्रा स्तंभ
३ मार्च 2021
--------------------------------------------------------------------
         #मराठी_ग़ज़लें_भी_उर्दू_की_तरह_मधुर_होती_हैं
* इंदौर की इस अनोखी गजल निशा के दुसरे आकर्षण थे कलीम खान। सुधाकर कदमजी के संपूर्ण कार्यक्रम का संचालन अपनी मधुर आवाज और विशिष्ठ अंदाज मे कर उपस्थित मराठी भाषियों का दिल जीत लिया।

-प्रभाकर पुरंदरे
दै. चौथा संसार,इंदौर
डिसेंबर १९८९

#मराठी_गझल #गझल


 


 

Friday, March 5, 2021

अजून माझ्या मनात आहे...


 

       म.भा.चव्हाणची एक सुंदर रचना स्वरबद्ध करण्याचा प्रयत्न केला.आवडण्याचे वा न आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहेच...कृपया हेडफोन लावून ऐकावे,ही विनंती.


तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे

अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे


उगीच तू माळलीस माझ्या अंगावरती फुले जुईची

क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे


कधीच नाही मला भेटली रुपगर्विता वसंतसेना

तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या बनात आहे


गायक - मयूर महाजन

संगीत - सुधाकर कदम

तबला - निषाद कदम

मेंडोलीन - अबीर कदम

Monday, March 1, 2021

लेखा-जोखा



पुरस्कार...
"Outstanding Young Person"(१९८३),
"समाजगौरव"(१९९५),
"संगीत भूषण"(१९९६), 
"Man Of TheYear2001"(यु.एस.ए.),
"कलादूत"(२००२),
"कलावंत"(२००३), 
"शान-ए-गज़ल"(२००५),
"महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार"(२००६),
"गझल गंगेच्या तटावर..."(२००८),
"सुरेश भट पुरस्कार" आणि,"गझल गंधर्व" उपाधी(२००९) .
"जीवन गौरव" (२०१८)
____________________________________________
 
 अल्बम्स...
1. ‘भरारी’...मराठी गझल गायकीच्या इतिहासातील पहिला अल्बम.१९८३.
2. ‘झुला’ (तीन भाग) मराठी पाठ्यपुस्तकातील कविता.१९८७
3. ‘अर्चना’ (भक्तिगीते) २००६ टी सिरीज कं.
4. ‘खूप मजा करू’ (बालगीते) २००७ फाऊंटन म्य़ुझिक कं.
5. ‘काट्यांची मखमल’ (मराठी गझल) २०१२ युनिव्हर्सल म्युझिक कं.
6.‘तुझ्यासाठीच मी...’ (मराठी गझल) २०१४ युनिव्हर्सल म्युझिक कं.
 ____________________________________________

 -पुस्तके-
१. ‘सरगम’ शालोपयोगी गीतांची स्वरलिपी.(प्रस्तावना - संगीतकार यशवंत देव.)
२. ‘फडे मधुर खावया...’ निवडक (विषयांतर) लेख.
३. चकव्यातून फिरतो मौनी’ (गौरवग्रंथ)
४. ’मीच आहे फक्त येथे पारसा’ (कविता संग्रह)
५. ’फडे मधुर खावया’ची दुसरी आवृत्ती. 
_____________________________________________
ब्लॉग - www.gazalgazal.blogspot.com 
 
Facebook Page - Gazalgandharv Sudhakar Kadam
_____________________________________________
■ अशी गावी मराठी गझल" या माझ्या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...
 
● मराठी ग़ज़लों के गायक श्री सुधाकर कदम ने संगीत के कई आयामों को पार किया है.अब उन्होंने मराठी़ ग़ज़लों को आकाशवाणी तथा अन्य मंचो के जरिये जनमानस तक पहुंचाना प्ररंभ किया है.  
-दै.नवभारत,नागपुर.१९८० 
 
●पाटण- येथील नाट्यांजली संस्थेतर्फे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम पार पडला.त्यांना  शेखर सरोदे यांनी तबल्याची उत्तम साथ दिली.............
-दै.लोकमत,नागपुर.२६.९.१९८०
 
●यवतमाळ-स्थानिक विर्दभ साहित्य संघाच्या वतीने प्रख्यात गायक श्री सुधाकर कदम यांच्या गझल गायनाचा सुश्राव्य कार्यक्रम येथे नुकताच संपन्न झाला.त्यांना तबल्याची साथ शेखर सरोदे यांनी दिली व संचलन वि.सा.संघाचे अध्यक्ष जगन वंजारी यांनी केले.
-दै.लोकमत,नागपुर.१३.१०.१९८०
 
●वर्धा-स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-आँपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. 
-दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१
 
●कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात......
-दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२
 
●सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला....... 
-तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.
 
 ●सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर   सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ   स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे....
-सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ ऑगष्ट १९८२.         
 
●सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला.......
-दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.
 
● ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला......
-दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२. 
 
●मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी........
-दै.सकाळ,पुणे.
 
●गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते........
-अनंत दीक्षित,सकाळ
 
●सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले......
-दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२
 
●Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches.......
 -The Hitwad,Nagpur.23/4/1984 
 
 
●सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली..........
-दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४
 
१०.कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला. असावा...
-दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४
 
११.मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है..........
-दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९
 ____________________________________________

मान्यवरांचे आशिर्वादपर बोल... 
 
■ स्वरराज छोटा गंधर्व - "मराठी गझल गायकीच्या नवीन वाटचालीस माझा आशिर्वाद आहे."(१९७५)
 
■ पं.जितेंद्र अभिषेकी - "सातत्य आणि परिश्रम आपणास यश मिळवून देईल."(१९७७)
 
■ सुरेश भट - "महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन".(१९८१) आणि "गझलनवाज".(१९८२)
 
■ गजानन वाटवे - "मला आवडलेला गझलिया...
"(१९८३)
 
■ डा.यु.म.पठाण - "मराठी गझलेस योग्य स्वरसाज चढविला".(१९८३)
 
■ मा.सुधाकरराव नाईक - "शब्द-स्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार".(१९८५)

■"सुधाकर कदमांनी ’काट्यांची मखमल’ या अल्बमद्वारे खर्‍या अर्थाने काट्यांची मखमल करून रसिकांना तृप्त करण्याचे काम केले आहे..."
-कवी-संगीतकार यशवंत देव - 
 
■ "बर्‍याच कालावधीनंतर इतकी सुरेल गाणी मी गात आहे,यात सर्व काही आले..."
-सुरेश वाडकर -
 
■  "मेलोडी हा माझा ’विक पॉईंट’ आहे.’काट्यांची मखमल मधील सर्वच गझला मेलोडिअस आहेत.तसेच सुधाकरजींनी वैशालीकडून खूप छान गाऊन घेतले..."
 -संगीतकार अशोक पत्की -
 
■  "सुरेशजीं (वाडकर) सोबत सर्वप्रथम गाण्याची संधी सुधाकरजींनी (कदम) मला देऊन माझे एक स्वप्न पूर्ण केले...त्याबद्दल काय बोलावे कळत नाही..."
-वैशाली माडे -
 ___________________________________________
काही गायक,पत्रकार,समीक्षक,अभ्यासक,संशोधक आणि चाहत्यांच्या प्रतिक्रीया...........
 
●१९८२ च्या सुमारास सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता.व्यक्तिशः मला गझलेबद्दल प्रेम असल्यामुळे ह्या कार्यक्रमास मला आवर्जून बोलावण्यात आले होते.कदमांनी सर्व गझला स्वतः स्वरबद्ध केल्या होत्या.चाली अत्यंत आकर्षक,अर्थाला अनुरुप अशा होत्या.एकूण कार्यक्रम निटनेटका,चांगला झाला व कदमांबद्दल कौतुक वाटले.एकच व्यक्ती हार्मोनियम वाजविते,गाते,बोलते व संगीतही देऊ शकते,हे वेगळेपण होतेच.
-करवीर कोकिळा रजनी करकरे देशपांडे-  
(पार्श्वगायिका,कोल्हापुर.) 
 
 ● Tha pioneer in tha introduction of MARATHI GAZAL GAYAKI.(2003)
-Maharashtra Jaycees- 
 
 ● विदर्भातील रसिले गझल गायक म्हणून श्री सुधाकरजी कदम महाराष्ट्राला परिचित आहेत.मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरुपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे. (’सूरसुधा’दिवाळी अंक,१९९६)
-मधुरिका गडकरी- 
(ज्येष्ठ संगीत समीक्षिका,नागपुर.)
 
● आर्णीसारख्या आडगावात राहूनही सुधाकर कदमांनी आपल्या गायकीचा रंग-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला.आपले वेगळेपण ठसविण्यासाठी अनवट अशी वाट निवडली.’मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला.हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे.हिंदी-हिंदुस्थानी,मराठी या केवळ भाषा नाहीत.भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते.संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यांमुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो.गझलच्या संदर्भात ते अधिकच खरे आहे.कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे.अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाळ.सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले.ही वाट वहीवाट नव्हती.हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती.सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला.
-वामन तेलंग-
(संपादक-तरुण भारत,नागपुर) 
 कार्तिकएकादशी/१९९८
 
 ● ’हरचंद सुरीली नग़्मोंसे, जज़बात जगाए जाते है,उस वक़्त की तल्ख़ी याद करो,जब साज़ मिलाए जाते है’....
 
      एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती,किमया,करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे.माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले त्याचे गमक वरील शरामध्ये आहे.या साडेतीन दशकात मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकले.त्यांची गझल गायकी ऐकली.सुधाकर जेव्हा गझल गायकीकडे वळले त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टिकाही झाली.गझलचा आशय,अर्थ.भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे यात गझल गायकाचे कौशल्य आहे.आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा अधिक अवधान बाळगले आहे.पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून विलंबित ख्याल गायक,ज्याला अक्षर मंत्राचा साक्षात्कार झाला आहे,तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल.या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे.स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले.त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्य पुरुषोत्तम कासलीकरांकडे असायचा.यावेळी त्यांच्या घराला सम्मेलनाचे रूप यायचे.या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे असत.छोटा गंधर्व सुधाकरशी विशेष सलगीने,आपुलकीने वागत असतांना मी पाहिले आहे.अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्रात व मध्यप्रदेशात गाजली.त्यांच्या मैफिलींचे इतिवृत्त वर्तमानपत्रांतून समिक्षणात्मक रुपाने मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा.
-रसिकाग्रणी राजे मधुकरराव देशमुख-
 (माहुरगड.जि.नांदेड) 
 
 ● १९७९ ते १९८० या काळात विदर्भाचे गायक सुधाकर कदम यांनी गझलांचे अनेक लहान मोठे कार्यक्रम सुरू केल्याचे त्यांच्या मुलाखतीवरून आढळून आले.मैफिलीचा दर्जा प्राप्त करणा-या या कार्यक्रमांनी गझलचे रसिक तयार होणे सुरू झाले.गझलचा परिचय झाला.मराठी गझलची सुरवात सुरेश भटांपासून मानली तर गझल गायनाची सुरवात सुधाकर कदमांपासून मानावी लागेल.म्हणजे मराठी गझल गायकीचे वय फार फार तर ३० ते ३५ वर्षे मानावे लागेल.
-डाँ.राजेश उमाळे-
 (सुप्रसिद्ध मराठी गझलगायक,संगीतकार,संशोधक.
अमरावती.) 
 
 ● गझलसम्राट सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गायक म्हणून ज्यांचा गौरव केला .ज्यांना स्वतः सुरेश भटांनी स्वहस्ताक्षरात ’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून ३० मार्च १९८१ रोजी शेरा देऊन स्वाक्षरी केली.ज्यांना सुरेश भटांच्या सहाव्या स्मृती दिनी २००९ साली’गझलगंधर्व’या किताबाने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाँ.नरेंद्र जाधव यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.मराठी गझल गायकी महाराष्ट्रभर रुजविण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा ’तो’ कलावंत म्हणजे आर्णी गावातील साधा संगीत शिक्षक सुधाकर पांडुरंग कदम होय.
-प्रा.काशिनाथ लाहोरे-
(दै.लोकमत प्रतिनिधी.यवतमाळ)
 
● पुण्यात बांधण जनप्रतिष्ठान आणि अभिजात गझल या संस्थेच्या वतीने सुरेश भट यांचा स्मृतीदिन झाला.यावेळी जेष्ठ गझल गायक सुधाकर कदम यांना गझलगंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे.अशी गावी मराठी गझल या स्वरुपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत.गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्व असते.सांगीतिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील साधा शिक्षक माणूस साहित्याची आणि रसिकांची कशी सेवा करतो याचा आदर्श कदम यांनी उभा केला.
-अनंत दीक्षित-
 दै.लोकमत,पुणे.
(संपादकीय १७ मार्च २००९)
 
● कवीला काय म्हणायचे आहे ? काय सांगायचे आहे ? काय सुचवायचे आहे ? ते कवी कमीतकमी आणि नेमक्या शब्दात मांडतो तरी आशयाचा एखादा पैलू,अर्थाचा पदर रसिकाला गझल वाचून पुर्णपणे उलगडेलच असे नाही आणि गझलच्या बाबतीत तर ’समजणे’ हे क्रियापद किती थिटे आहे हे आपल्याला कालांतराने का होईना पण समजल्या शिवाय राहत नाही तेव्हा अर्थाच्या पूर्णत्वाकडे आणि आशयाच्या सघनतेकडे रसिकाला हळुवार सुरावटीतून घेऊन जाण्याचे काम गझल गायक आपल्या गळ्याच्या ताकदीने करीत असतो.आणि मला वाटतेगझल गायनाचं खरं सामर्थ्य यातच आहे.ही जाण सुधाकर कदमांना आहे याचा मनापसून आनंद झाला.ती जसजशी विकसित झली,तसतशी गझल त्यांना प्रसन्न झाली.
-प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत-
कवी,गझलकार,संशोधक.
(लोकमत, ’साहित्यजत्रा’ १०/७/१९८३)
 
● मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असणारा हा कलावंत आजच्या जाहिरात व शोमँनशीपच्या युगात मागे पडला ही खरी शोकांतिका आहे,मराठी गझलला त्यांनी दिलेल्या बंदिशी म्हणजे सरस्वतीने त्यांना मुक्तहस्ताने दिलेलं दान आहे.सुरेश भट सुद्धा आमच्या समोर हे मान्य करायचे.
-मनोज पाटील माहुरे-
(काठोडा,यवतमाळ.)
 
 ● सुरेश भट म्हणजे मराठी गझल हे समीकरण जसे रुढ झाले आहे तसे १९९० च्या दशकात मराठी गझल गायकी म्हणजे सुधाकर कदम हे समीकरण रुढ होते,नव्हे ख-या अर्थाने सुरवातच सुधाकर कदमांनी केली.१९८२ मध्ये पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेला ’अशी गावी मराठी गझल’ हा कार्यक्रम मराठी गझल गायकीबद्दल मार्गदर्शक ठरावा असा होता.स्वतः सुरेश भटांनी निवेदन केलेल्या या कार्यक्रमात सुधाकर कदमांनी सादर केलेल्या...

 ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही,चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’’
"झिंगतो मी कळे ना कशाला,जीवनाचा रिकामाच प्याला"
 
या सारख्या अनेक गझलांच्या बंदिशी आजही रसिकांच्या मनात रेंगाळत आहे.या कार्यक्रमानंतर कदमांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो कार्यक्रम केले.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसारख्या ग्रामीण भागात राहून त्यांनी एकलव्यासारखी साधना करून अतिशय कष्टाने मराठी गझल गायक म्हणून मान्यता मिळविली.त्या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा सलग तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही गायक नसल्याचे सुरेश भट सांगत.
-अनिल कांबळे-
(गझलकार,पुणे.)

● कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी (जि.यवतमाळ) येथील प्रख्यात मराठी गझल गायक सुधाकर कदम यांनी.प्रसिद्ध मराठी कवी कलीम खान यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा ’अशी गावी मराठी गझल’हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला.
इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत.नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.अल्पावधीत मराठी गझलेच्या प्रांतावर या प्रतिभासंपन्न गायकाचे साम्राज्य पसरले.
-अजीम नवाज राही-
 
 ●Sir, Aapanach aamhala marathi gazal aikayala shikawile, aapanach mala protsahit karun gayala shikawile. Aapanas nirogi dirghayushya labho.
-Dr. Sushil Deshpande-
Karanja lad 
 
● Marathi ghazals have great potential. Contemporary singers should sing and promote it. Hats off to Suresh Bhat ji and Sudhakar Kadam ji for their commendable job!
-Sayeed Mohiuddin... Riyadh.

 ●गझल समजू इच्छिणारासाठी मोठा खजिना !  
          अहो, आजकाल जे गझलकारांचं पीक आलंय (की तण माजलंय असं म्हणू..?) त्यांना गझल आणि गझलगायकीचा अभिन्न सम्बन्ध असतो हेच माहीत नाहीये.....! गेल्या हिवाळ्यात महाराष्ट्रात आलो असताना चुकून गझलच्या एका कार्यक्रमाला बसावं लागलं.... (तरन्नुम नव्हतीच, त्यामुळे त्या कार्यक्रमाला ’मुशायरा’ म्हणायची माझीतरी तयारी नाही.) आजूबाजूला बसलेले लोक काहीजणांच्या 
काव्यवाचनाला खुर्चीतून उसळून दाद देत होते. शेवटी एकानं न राहवून मला विचारलं की मी एकदम शान्त कसा बसलोय...? मी सांगितलं की जे काही ऐकू येतंय, त्यात शेर कुठेच नाहीयेत, हिन्दी फिल्लमचे डायलॉग असावेत तसं काहीतरी आहे हे.... आणि भलाभला संगीतकार शीर्षासन करून उभा राहिला तरी यातल्या ओळींना चाल लावू शकणार नाही..... आता यांना मी गझलेचे शेर कसे  म्हणू आणि काय दाद देऊ...?आणि अशा वेळी कविवर्य भटांनी आपली प्रत्येक रचना आपल्याला गायला लावून एका अर्थाने गझल आणि गायकीचा अभिन्न सम्बन्ध लोकांसमोर ठेवला होता, तो सगळा इतिहास आठवतो............ असो.
-स्वामीजी निश्चलानन्द (हिमाचल प्रदेश)
17 सितंबर २०१२
--------------------------------------------------------------------
प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून....


 





संगीत आणि साहित्य :