गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, March 9, 2017

आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील मराठी गझल गायकीवरील मनोगत....


’मराठी गझलेचा जागतिक संचार’ ह्या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील मराठी गझल गायकीवरील सडेतोड मनोगत....
संत नामदेव सभागृह,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ....दि १३ जानेवारी २०१७.




’मराठी गझलेचा जागतिक संचार’



’मराठी गझलेचा जागतिक संचार 
ह्या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील गझल गायन....
संत नामदेव सभागृह,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.दि.१२ जानेवारी २०१७.

मारवा....

हुरहुर लावणार्‍या मारवा रागाची तोंड ओळख गाण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेताना संगीत विद्यालयात झाले होते.पण खरा मारवा कळायला नंतर बराच काळ जावा लागला.तो पर्यंत अरूण दाते यांनी गायिलेल्या ’स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या मारव्यातील भावगीताने चांगलेच पछाडले होते.सोबतच ’सुमन कल्याणपुर यांनी गायिलेलं ’शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ पण कानात रुंजी घालत होतं.पण स्वरगंगेमधील ’वचन दिले तू मला’ यातील ’मला’ ला लागलेला कोमल रिषभ काही पिच्छा सोडी ना !मग पुन्हा मारव्याची आळवणी नव्याने सुरू केली.या दरम्यान माझ्या गुरुजींचे गुरूजी आदरणीय छोटा गंधर्व यवतमाळला आलेत.झाडीपट्टीत त्यांचा कार्यक्रम होता.नागपुरवरून पुढे जायचे होते.जाता जाता गुरूजींकडे (यवतमाळ) मुक्कामी आलेत...मला कळल्याबरोबर मी आर्णीहून यवतमाळला पोहोचलो.कारण मला माहित नाही पण ऋषीतुल्य छोटा गंधर्वांचा माझ्यावर खूप जीव होता.विदर्भातील बहुतेक कार्यक्रमात हार्मोनियमच्या साथीला ते मला न्यायचे.तसेच ते इकडेही मला सोबत घेऊन गेले.कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरा लावून त्यांचा स्वरांशी लडिवाळ खेळ सुरू होता.छोटा गंधर्व,तानपुरा,हार्मोनियम आणि मी....अशातच माझ्या डोक्यात मारव्याचा किडा वळवळायला लागला...आणि हिया करून विषय काढलाच.त्यांनी अतिशय बाळबोध प्रकाराने "स्वत:चे घर नसून मजेत राहणारा माणूस म्हणजे मारवा",असे सांगून षड्जाचा कमीत कमी प्रयोग करून मारवा कसा गावा हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले.हे सांगत असताना मुर्छना पद्धतीने यात भूप,मालकौंस,दुर्गा या रागांच्या छटा पण अतिशय सोप्या पद्धतीने दाखविल्या.तो सर्व सोहळा अजूनही माझ्या डोक्यात अगदी ताजा आहे.
खालील रचना मारवा रागावरच आधारलेली आहे.यातही आपणास छोटा गंधर्वांनी सांगितल्या प्रमाणे वरील रागांच्या थोड्या फार छटा आपणास दिसतील.ही त्यांची देण आहे.तसेच दुसर्‍या ओळीतील ’तुटलो’ या शब्दासाठी वापरलेला कोमल मध्यम आणि त्यासोबत येणारी भूपेश्वरी व भिन्नषड्ज रागाची सुरावट आपणास ’तुटण्याची’ अनुभूती निश्चित देईल.इतकेच नव्हे तर ’जुळलोच नाही’ यासाठी वापरलेल्या कोमल धैवता सोबतची सुरावट ’न जुळण्याचा’ आभास निर्माण करते...ऐका तर.....



जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!


जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!


कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!


वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!



गायक-मयूर महाजन
कवी-सुरेश भट, 
संगीतकार-सुधाकर कदम, 
तबला-निषाद, कदम 
बासरी-रोहित वनकर.
की बोर्ड-कौस्तुभ पाटील.








संगीत आणि साहित्य :