गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, February 4, 2012

"अल्लाह करे हम ना कभी होश में आये"



         आपल्या महाराष्ट्रात कलाकारांच्य़ा अनेक खाणी आहेत.परंतू त्या खाणीतील काही हिरे सगळ्य़ांना माहीत होतात.ज्यांना ’गॉडफादरमिळत नाही,मिडिया जवळ करीत नाही किंवा स्वाभिमानी वृत्तीमुळे अलिप्त आहतात. असे हिरे मात्र खाणीतून बाहेर निघून,पै.लू पडूनही दुर्लक्षीत राहतात.          आज अशाच एका हिर्‍याची माहिती आपणास देत आहे.तो हिरा एक अपंग स्त्री आहे.
हसत-खेळत बालपण घालविताना अचानक नियतीने पायातील बळच काढून घेऊन तिच्या काखेत कुबड्या दिल्या.तिच्या बालमनावर काय परिणाम झाला असेल ? याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो.पण ती हरली नाही.जसे जमेल तसे शालेय शिक्षण व गायनाचे धडे घॆत आपली संगीत कला विकसीत करून कोल्हापुर वासियांची करवीर कोकीळाबनली.
          कुबड्यांमध्ये देह सावरत आपल्या संगीताराधने सोबतच इतरांनाही गायन कला मिळावी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागात मानद कलाकार म्हणून मार्गदर्शनही केले.१९८२ मध्ये माझा कोल्हापुरातील पहिला कार्यक्रम रोटरी क्लबने तिकीट लावून राजर्षी शाहु महराज सभागृहात आयोजित केला होता.त्यातील रसिकांमध्ये तीसुद्धा होती.गझलची शौकीन,
स्वतः सुंदर गात असून दिलखुलास दाद देणारी...(असे चित्र आजकाल बघायला मिळत नाही.एका क्षेत्रातील आणि तेही संगीत क्षेत्रातील दोन व्यक्ती एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या पलिकडे काहीच करीत नाही.असो...’कालाय तस्मै नमः’) कार्यक्रमानंतर ती मला आवर्जून भेटली.त्यानंतर आमच्या भेटी,मैफली सुरू झाल्या.जुळून आलेले बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट झाले.ते आजही तसेच आहे.हळू-हळू तिने स्वतःला नसीमा हुरजुकसोबत अपंग संस्थेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.
         तिच्या ऐन भराच्या काळात चित्रपटात गायिली,प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे कार्यक्रमही करीत गेली.
श्रीकांत ठाकरेंसारख्या संगीतकाराच्या दिग्दर्शनाखाली गायिली.सुरेल,गोड आवाज,सुंदर गाणॆ,उत्कृष्ट मार्गदर्शन याचे भरवशावर बरेच काही करण्याचा प्रयत्न करीत गेली.या सुरेल प्रयत्नांची दखल मुंबई दूरदर्शनने घ्यावी यासाठी "शब्दांच्या पलिकडले" या तेव्हाच्या लोकप्रिय कार्यक्रमात वर्णी लागावी म्हणून खूप प्रयत्न केले.निर्मिती प्रमुखाला ऐकविण्याकरीता म्हणून खास स्टुडिओमध्य्रे ध्वनिमुद्रण करून गाणी पाठविली परंतू शासकीय पैशाने,ज्यांना प्रसिद्धीची गरज नाही अशा मोठ-मोठ्या कलाकारांना बोलावून आपली टिमकी मिरविणार्‍या दूरदर्शनने, अशा अनेक चांगल्या होतकरु कलाकारांना दूरदर्शनच्या पलिकडेच ठेवले.हा माझाही अनुभव आहे.
            "शब्दांच्या पलिकडे" सोबतच आता-आताचा ’M2G2’ चा अनुभव तसाच आहे.या कार्यक्रमात मला सहभागी करून घ्यावे म्हणून माझ्या मुलीने (भैरवी) मला न सांगता माझी संपुर्ण माहीती,पुस्तके,टी सिरिज ने काढलेला पं.शौनक अभिषेकी व अनुराधा मराठे यांच्या आवाजातील मी संगीतबद्ध केलेला अर्चनाहा भक्तिगीतांचा अल्बम वगैर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडे २००६ मध्ये पाठविला.मधुन-मधुन ती दूरध्वनीवरूनही चौकशी करीत होती.हे तिने मला २०१० मध्ये सांगितले.आजतागायत मला निमंत्रण मिळाले नाही.मधल्या काळात आमचे एक "हास्यसम्राट" मित्र येथे कार्यक्रमानिमित्त आले असता दूरदर्शनच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर तिथल्या नंदीची’ (मध्यस्थाची) सर्वप्रथम पूजा करावी लागतेअसे वक्तव्य केले.हे मला जमणे नव्हते .....
          सांगायचे तात्पर्य असे, की तुमच्याकडील कलेपेक्षा तुमच्याकडील पदाचे,पैशाचे किंवा राजकीय बल किती आहे यावर आपली किम्मत ठरते.अर्थात यालाही काही अपवाद निश्चितच आहेत.या अपवादांमुळेच आज हयात नसलेल्या अनेक कलाकारांना आपण दूरदर्शनवर बघू शकतो.पण ही फक्त चंदेरी किनार आहे,बाकी सारा काळाकुट्ट अंधार असल्याचे खालील गझल ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल.
          तर ही अशी गुणी गायिका कोण ? हा प्रश्न आपणास पडला असेल...तर ती आहे करवीर कोकिळा रजनी करकरे देशपांडे...! तिच्या आवाजात ऐका नूहनाज़िर यांची दिनकर पोवार यांनी स्वरबद्ध केलेली उर्दू गझल...
"अल्लाह करे हम ना कभी होश में आये"
         या गझलच्या बंदिशीत बागेश्री आणि गोरखकल्याण या रागांचा सुंदर उपयोग संगीतकाराने केला आहे.मुळात गोरखकल्याण म्हणजे एक गोरखधंदाच आहे. यात कल्याण कुठेच दिसत नाही.तरी पण नाव गोरख कल्याण ! असो...या गझलमध्ये कोठे गोरख ,तर कोठे बागेश्री असा आभास निर्माण करत ही गझल आपल्या समोर येते.त्यात कोमल धैवतासारख्या विवादी स्वरांचाही अतिशय सुंदर
उपयोग दिनकर पोवारांनी बंदिश करताना केला आहे.ही गझल ऐकतांना मला सतत आशबाईंचा भास होत होता.त्या काळात जर मला संगीतकार म्हणून काम मिळाले असते तर मी रजनीकडून निश्चितच गाऊन घेतले असते...





संगीत आणि साहित्य :