गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, January 31, 2024

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक २५)


     १९७२ मध्ये आर्णीला संगीत शिक्षक म्हणून रुजू
झाल्यावर ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस, कार्यक्रम, शाळा आणि संगीत विद्यालय हा सगळा व्याप सांभाळणे कठीण व्हायला लागले.शेवटी नाईलाजाने ऑर्केस्ट्रा सोडण्याचा निर्णय घेतला.ऑर्केस्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ मी आणि  शंकर बडे आम्ही दोघे होतो.शंकरचेही लग्न झाल्यामुळे तो ही पोटापाण्याच्या व्यवस्थेला लागला होता.त्यामुळे त्यालाही बोरी अरब येथील व्यवसाय ,कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करणे कठीण होत चालले होते. शेवटी दोघांनीही १९७५ चे गणेशोत्सव,दुर्गोत्सवाचे कार्यक्रम आटपून ऑर्केस्ट्रा सोडला.आम्ही दोघे नसल्यामुळे ऑर्केस्ट्रा बंद पडला हे मात्र वाईट झाले.त्यांची खंत दोघांनाही होती,पण नाईलाज होता.
       ऑर्केस्ट्रा सुटल्यानंतर गायक गायिका अविनाश जोशी,रतन जोशी,प्रभा मॅथ्यू,तबला शेखर सरोदे,गिटार अविनाश गिरी,सूत्र संचालन शंकर चौधरी,सुरेश गांजरे यांना घेऊन मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचे कार्यक्रम सुरू केले.ऑर्केस्ट्राच्या स्थापने पासून स्वरबद्ध केलेल्या शालेय कविता,काही नाटकांना संगीत दिले होते,त्यातील गाणी,शंकर बडेने लिहिलेली वऱ्हाडी गाणी व गझला या व्यतिरिक्त विदर्भातील अनेक कवींच्या रचना असा बराच मोठा साठा माझ्याकडे होता.त्यामुळे ऑर्केस्ट्रा सोडला तरी माझी सांगीतिक वाटचाल सुरूच होती.हे सुरू असताना सुरेश भटांची भेट झाली व त्यांच्या गझल,कविता स्वरबद्ध करायला सुरुवात केली.१९७९ पर्यंत काही रचना स्वरबद्ध करून कार्यक्रमात घेणे सुरू केले होते.(यावर, त्यावेळी भरात असलेल्या नागपूरच्या 'दैनिक नागपूर पत्रिका' या वर्तमानपत्राच्या विशेष पुरवणीत सुरेश गांजरे यांनी एक लेख लिहिला होता,तो खाली दिला आहे.) तसेच सुरेश भट व माझ्या एकत्र मैफलीही सुरू झाल्या होत्या.या मैफिलीतील माझी सुरवात  नव्यानेच स्वरबद्ध झालेल्या 'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो' किंवा 'माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे' या गीताने करायचो.अशाच एका मैफिलीतील 'माझिया गीतात वेडे' चे साउंड सिस्टिमवाल्याने विविध अडथळ्यासह  केलेले ध्वनिमुद्रण आपल्या समोर ठेवत आहे.गोड करून घावे.          
------------------------------------------------------------------------
.                मराठी गझल गायक सुधाकर कदम
                                               -सुरेश गांजरे

          मराठी गझलांना स्वरबद्ध करून आपल्या सुरेल आवाजात सादर करण्याचा एक स्तुत्य उपक्रम गायक सुधाकर कदम यांनी सुरू केला आहे. विदर्भातील अनेक शहरात त्यांनी आजवर मराठी गझलांचे अनेक कार्यक्रम पेश केले आहेत.महाराष्ट्रातील गझलकारांच्या गझला सादर करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असल्याने रसिकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे.

'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो'

या सुरेश भटांच्या गीताने ते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतात.त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अप्रतिम गझला सादर होऊ लागतात.रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन आपल्या जिवाचे कान करून ऐकत असतात.

'मी गोड या स्वरांनी गातो जरी तराणे
गीतात हाय येती संदर्भ जीवघेणे...'
ही नीलकांत ढोलेची गझल,

'आम्ही असे दिवाणे आम्हास गाव नाही
आम्ही घरोघरी अन आम्हास नाव नाही'
ही शंकर बडेची गझल,

'फुलवू नकोस आता उसने गुलाब गाली'
ही पुण्याच्या रमण रणदिवेची गझल रसिकांची उत्स्फुर्त दाद घेते.
          श्री सुधाकर कदम हे संगीत विशारद असून आर्णी येथील महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतात. तेथेही त्यांनी 'गांधर्व संगीत विद्यालय' स्थापन करून आपली कलोपासना सुरूच ठेवली आहे.स्वतः कदम यांना शब्दांची चांगली 'जाण' असल्याने ते शब्द व स्वर याची उत्कृष्ट सांगड घालतात.प्रत्येक शब्दाला असलेला खास रुतबा सांभाळून  पेश केल्याने त्याची खुमारी काही औरच असते.
           सौ.प्रभा मॅथ्यू व कु.रतन जोशीसुद्धा कदमांनी स्वरबद्ध केलेल्या गझला कार्यक्रमातून पेश करतात.तबलापटू श्री.शेखर सरोदे यांच्या बोटांची जादू अप्रतिमच असते.अत्यंत परिश्रम घेऊन श्री.कदमांनी हा संच ग्रामीण भागातून उभारला.ही कौतुकाची बाब आहे.त्यांच्या शाळेचे व्यवस्थापक श्री.राजकमलजी भारती व मुख्याध्यापक श्री.बुटले गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य  त्यांना लाभते.
           हा 'गझल'चा कार्यक्रम कधी कधी अक्षरशः रात्र संपेपर्यंत चालतो.विशेषतः स्वतः कदम

'पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली'
सुरेश भट

'सखे, सांजवेळी नको दूर जाऊ'

अशा नाजूक,शृंगारिक रचना आपल्या मुलायम स्वरात खास ढंगाने सादर करून रसिकांची मने जिंकून घेतात.मधून-मधून ते उर्दू गझळसुद्धा आपल्या खास चालीमध्ये उत्कृष्टपणे सादर करतात.

'मार्गावरून माझ्या मी एकटा निघालो'

ही उ.रा.गिरी यांची गझल म्हणजे या कार्यक्रमाची भैरवी!आपल्या आवाजातील तमाम दर्द ओतून सुधाकर कदम ती पेश करतात.क्षणभरासाठी रसिकांची मने हेलावून जातात.रसिकांच्या वृत्ती गलबलून काढण्याचे सामर्थ्य त्यांच्या स्वरात असते.
          सुरेल आवाजाची देण आणि कठोर परिश्रम यामुळे अल्पावधीतच श्री.कदम यांनी गझल गायनाच्या प्रांतात आपला चांगलाच जम बसविला आहे.एक नवा पायंडा ते पाडत आहेत ही कौतुकाची बाब ठरावी.श्री.सुधाकर कदम यांना त्यांच्या अंगीकृत कार्यात उदंड यश लाभो,ग्रामीण कलावंताची ही प्रतिभा आनंददायी ठरो ही अपेक्षा.

दैनिक नागपूर पत्रिका,नागपूर.
विशेष पुरवणी,दि.४/१२/१९८०




 





संगीत आणि साहित्य :