गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, July 29, 2023

राग-रंग...लेखांक १७



     कलावती आणि जनसंमोहिनी हे दोन राग इतके जवळचे आहेत की,सर्वसामान्यांना या दोहोतील फरक कळणे कठीणच! दोन्ही राग अतिशय गोड आहेत.हे दोन्ही राग दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमधील (कर्नाटक) आहेत.
यांच्या गोडव्यामुळे हे दोन्ही राग उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये स्वीकारल्या गेले व लोकप्रियही झालेत.यांचा थाट खमाज असून निषाद सोडून बाकी स्वर शुद्ध आहेत.कलावतीमध्ये रिषभ नाही.कलावतीमध्ये रिषभ घेतला की जनसंमोहिनी होतो.यात रिषभाचा प्रयोग कल्याण अंगाने होतो.जनसंमोहिनी रागाचे मूळ नाव 'शिव कल्याण' असल्याचेही बोलल्या जाते.
       'कोई सागर दिल को बहलाता नहीं' मी ऑर्केस्ट्रामध्ये असतानाच्या काळातील अफाट लोकप्रियता मिळविलेले 'दिल दिया दर्द लिया' या चित्रपटातील हे गीत.घरगुती मैफलीमध्ये मी हमखास गायचो. समोर तरुण मुली असल्या तर एकदम आर्तपणे गायिल्या जायचे. हे गाणे कलावती रागात असल्याचे प्राथमिक ज्ञान तेव्हा मला मिळाले.यात जनसंमोहिनी राग पण आहे हे मला फार उशिरा कळले.या नंतर मुंबईचा जावई या चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता,
जीव वेडावला' या रामदास कामतांनी गायिलेल्या गाण्याने आम्हा (त्या काळातील) तरुण मंडळींना वेड लावले होते.कित्येक वर्षे ही दोन गाणी घरगुती मैफलीत हमखास गायचोच.पण खऱ्या अर्थाने मला कलावती कळला तो प्रभा अत्रे यांच्या 'तन मन धन तो पे वारू'या चिजेने.
एकतालातील ही चीज बाराव्या मात्रेपासून सुरू होते.'न' वरील सम ऐकणाऱ्यास एकदम बांधून ठेवते.त्यांची गाण्याची पद्धत आणि चिजेतील बोलाप्रमाणे येणारी सुरावट अत्यंत मोहमयी.आजही ती चीज तरुणच वाटते.तसेच डॉ.वसंतराव देशपांडे यांनी गायिलेली झपतालातील 'ये हो काहे' सुद्धा अतिशय श्रवणीय असल्यामुळे ती माझी आवडती होती.आलापी,
सरगम,तानांचा अतिशय योग्य वापर करून समेवर येण्याची त्यांची पद्धत अतिशय वेगळी होती.ताल त्यांच्या अंगात इतका भिनला होता की, कुठल्याही मात्रेपासून तान सुरू करुन तबलजीला इशारा करून त्यालाही मोकळे सुटायची खूण करायचे.आणि दोघेही जेव्हा धाडकन समेवर यायचे तेव्हा 'जोर का झटका जोर से'च लागत होता.तालाशी मस्तवालपणे खेळत गाणे ही त्यांची खासियत होती.तबला वादक पांडुरंग मुखडे आणि वसंतरावांची अशी जुगलबंदी सवाई गंधर्वमध्ये मी ऐकली आहे.दोघेही समेवर आले की अंगावर सर्रर्रर्रर्रर्रकन काटा यायचा. त्यावेळी ते नटभैरव गायिले होते.त्यानंतर काही महिन्यातच हे जग सोडून गेले.अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायिलेली 'शिवनंदन गजानन' ही रुपकमधील चीज सुद्धा माझी आवडती आहे.कलावती आणि जनसंमोहिनी राग अनेक गायक/गायिकांनी गायीला व वादकांनी वाजविला आहे.पं. रवीशंकर (सतार) पं. हरिप्रसाद (बासरी) झरीन दारुवाला (सरोद) यांचा जनसंमोहिनी श्रवणीय आहे.तसेच
हरिप्रसाद चौरसिया और झाकिर हुसैन (बासरी-तबला),कृष्णा भट आणि झाकीर हुसेन (सतार-तबला), संदीप मिश्रा,अमित मिश्रा (सितार - सारंगी)'जोनाथन वोयर और शॉन मेटिवत्स्की (संतूर आणि तबला), उस्ताद रफाकत अली खान आणि छोटा उस्ताद बख्त अली खान यांनी गायिलेल्या कलावतीमध्ये छोट्या बख्त अलीने कमाल केली आहे. नुसरत फतेह अली खान यांनी कलावती रागात गायिलेल्या 'तन मन तुम पे वारू' या त्रितालातील बंदीशीत घेतलेल्या विविध प्रकारच्या तिहायासह,वेगवान सरगम अत्यन्त आश्चर्यकारक आणि श्रवणीय आहे.हे तेच करू जाणे!

चित्रपटातील गाणी वा भावगीते एक विशिष्ठ रागात पूर्णतः बांधलेली नसतात.ती केवळ त्या रागावर आधारित असतात.खालील गाण्यांमध्ये काही कलावती रागावर तर काही जनसंमोहिनी रागावर आधारित आहे.या रागातील स्वरांव्यतिरिक्त इतर स्वरांचाही वापर रंजकता वाढविण्यासाठी या गाण्यांमध्ये केला जातो.
● चित्रपट गीते...
'पिया नहीं आये',अमानत अली,नूरजहां. चित्रपट-
दरवाजा.'हाये रे वो दिन क्यों ना आये', लता.संगीतकार-पं. रवी शंकर,चित्रपट-अनुराधा.'आयी परी रंगभरी किसने पुकारा', आशा भोसले.चित्रपट-दो फूल.'आ जा रे मेरे प्यार', लता.चित्रपट-ऊंचे लोग. 'कोई सागर दिल को बहलता नहीं', (जनसंमोहिनी आणि कलावतीचे मिश्रण) रफी.चित्रपट-दिल दिया दर्द लिया.'सुन चंद मेरी ये दास्तान', मुकेश.चित्रपट-नागज्योती.'काहे तरसाये जियरा', आशा भोसले,उषा मंगेशकर.   चित्रपट-चित्रलेखा.'ना तो कारवां की तलाश है' (या कव्वालीच्या फक्त सुरवातीलाच कलावती दिसतो,कडव्यांमध्ये विविध रागांचा प्रयोग केला आहे.) रफी,मन्ना डे,आशा भोसले,सुधा मल्होत्रा.चित्रपट-बरसात की रात.'सुबह और शाम काम ही काम',लता.चित्रपट-
उलझन.'कभी तो मिलोगे जीवन साथी', चित्रपट-सती सावित्री.'वही उड़ी उड़ी घटाएं हैं एक तुम नहीं हो तो कुछ नहीं', मुकेश.चित्रपट-मेरा घर मेरे बच्चे.'सनम तू बेवफा के नाम से मशहूर हो जाये', लता.चित्रपट-खिलौना.'भजन बिना चैन न आये राम', चित्रपट-रफु चक्कर.'अगर दिलबर की रुसवाई'लता.चित्रपट-खिलोना.'मै का पिया बुलावे अपने मंदिरवा', लता.चित्रपट-सूर संगम.'वो घटा सावरी थोडी थोडी बावरी' चित्रपट-अभिनेत्री.'है अगर दुश्मन  दुश्मन जमाना गम नहीं' रफी,लता.चित्रपट-हम किसी से कम नहीं.'ये तारा वो तारा हर तारा', उदित नारायण.
चित्रपट-स्वदेस'जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो' रुपकुमार राठोड,सोनू निगम.चित्रपट-सरफरोश.
● मराठी गाणी...
'अनंता अंत नको पाहू' -माणिक वर्मा.'भाव विणेवर आठवणींच्या तारा मी छेडिते' -सुलोचना चव्हाण.
'प्रथम तुज पाहता', रामदास कामत. चित्रपट-मुंबईचा जावई.'प्रिया आज माझी नसे साथ द्याया' -सुधीर फडके.
'दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी' -आशा भोसले.'गोविंदा निन्ना' -उन्नीकृष्णन (कर्नाटक)
        ● जनसंमोहिनी रागावर आधारित मी एक माझीच गझल स्वरबद्ध केली आहे.गायक आहे मयूर महाजन.पहिल्या ओळीत जनसंमोहिनी स्पष्ट दिसतो.पुढे वेगवेगळे राग दिसायला लागतात.
जीवना सांभाळतो मी तू दिलेल्या प्राक्तनाला
का उगाची दुःख सारे दाखवावे या जगाला

मांडलेला डाव सारा पाहिला मोडून मी ही
अन् समोरी येत गेला जीवनाचा रंग काळा

सोबती गेले जिवाचे राहिलो मी एकटा
लागता झड आठवांची दाटुनी येतो उमाळा

जीवघेणे वागताती आपुले परके असे का
वंचना साऱ्या जगाची सोसवेना काळजाला

युट्युब लिंक....
https://youtu.be/99hi7chw-Aw
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'मंथन' पुरवणी,रविवार दि.३० जुलै २०२३.


 

सोसण्याचा सूर...सरोद ध्वनीमुद्रण...अभिषेक बोरकर.



 

Saturday, July 15, 2023

राग-रंग...लेखांक १६.बिहाग.



लट उरझी सुरझा जा बालम
हाथो में मेहंदी लगी मोरे बालम
     एकाच रागातील एकच चीज विविध गायकांनी गायिल्यावर वेगळी वाटणे ही शास्त्रीय संगीतामधील एक वेगळीच मजा आहे.तसेच एकाच घराण्यातील विविध गायक सुद्धा जेव्हा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने गातात तेव्हाही प्रत्येकाच्या गाण्यात वेगळेपणा दिसतो.किराणा घराण्याचेच उदाहरण घेतले तर (किराना घराण्याचे नामकरण उत्तर प्रदेशातील मुज़फ्फरनगर जिल्ह्यातील एक तहसीलीचे गाव 'कैराना' (जो सध्या जिल्हा शामलीमध्ये आहे) पासून झाल्याचे मानतात.हे उस्ताद अब्दुल करीम खाँ चे (१८७२-१९३७) जन्मस्थान पण आहे, जे विसाव्या शतकातील  किराना शैलीचे सर्वाधिक महत्वपूर्ण भारतीय संगीतज्ञ होते. यांनाच किराना घराण्याचे वास्तविक संस्थापक मानल्या जाते.) त्यांच्या पासून ते आजच्या गायकांच्या गायकीचा विचार केला तर काही साम्यासह बरीच तफावत पण दिसते.अर्थात दर पिढीगणिक हा बदल होणे हे नैसर्गिक आहे.उस्ताद अमीर खान साहेबांच्या गायकीचा मोठा प्रभाव मेवाती घराण्याचे पंडित जसराज यांच्या गायकीवर असल्याचे दिसून येते.सद्य काळात प्रत्येक घराण्यातील चांगल्या बाबी आत्मसात करून आपली गायकी प्रगल्भ करण्याचा प्रयत्न सध्याच्या पिढीतील गायक करीत आहे.ही बाब अभिनंदनीय व अनुकरणीय आहे असे मला वाटते.अनेक घराण्याच्या उस्ताद व पंडितांनी सुद्धा याला मान्यता दिली आहे. तसे तर भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत सिद्धांतांच्या बाबतीत लिहिणे फार कठीण काम आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे लिखित संकेतांची कोणती एक निर्धारित व औपचारिक पद्धती नाही.मुळात भारतीय संगीत एक श्रवण परंपरा आहे, त्यामुळेच लिखित स्वरूपातून खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणा अथवा ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही.म्हणूनच शास्त्रीय संगीताला गुरूमुखी विद्या म्हणतात. असो! प्रस्तावना बरीच लांबली आहे.
     आज आपण बिहाग रागविषयी जाणून घेणार आहोत.
     (सर्वप्रथम जेव्हा बिहाग नाव ऐकले तेव्हा जोरात हसू आले.छोट्याशा खेड्यातून आलेलो मी...खेड्यातला कुचिनपणा अंगात भिनलेला.त्यामुळे मनातल्या मनात  बिहाग शब्दाची फोड (संधी विग्रह) वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे हसू आवरले नव्हते.या हसण्यामुळे मार बसला नाही.पण भरपूर शिव्या खाव्या लागल्या,त्या गुपचूप खाऊन घेतल्या.चिजांच्या बाबतीतही त्यातील न कळणारे शब्द ऐकून वेगवेगळे अर्थ काढल्यामुळे अनेकदा इतर विद्यार्थ्यांसमोर (विशेषतः विद्यार्थिनींसमोर) अनेकदा अपमानित व्हावे लागायचे.शब्दच तसे असायचे...देस मधील 'रब गुना गाय रे तू मना' यातील 'रब'चा अर्थ न लागल्यामुळे व पुढील 'गाय' चा अर्थ 'दूध देणारी गाय असा अर्थ काढून,पुढील 'काहे भटकत फिरे निसदिन' यातील फक्त गाय व भटकणे हे कळल्यामुळे जो अर्थ काढायचा तो काढून मोकळा व्हायचो.शिकविणारे गुरुजी अर्थ सांगण्याच्या भानगडीत न पडता फक्त शिकविण्याचे काम करायचे.बिहाग मधीलच 'जब ते बिछुरे लालन' ह्या चिजेचा अर्थ १० ते १५ वयोमान असलेले विद्यार्थी सांगू शकतील काय? तिलक कामोद मधील 'चंचल चित चोर चतुर अटक मोसे गुईया' या द्रुपदाचा अर्थ काढताना हसू येणार नाही तर काय?भैरव मधील 'धन धन मुरत कृष्ण मुरारी' मधील धन म्हणजे संपत्ती हा अर्थ काढून 'कृष्ण खूप श्रीमंत असल्यामुळे धन मुरवत होता'असे काही बाही डोक्यात यायचे.खरे म्हणजे शिकविणाऱ्यांनी चिजेच्या अर्थासह शिकवायला हवे.पण तसे फारसे घडत नसावे.निव्वळ पोपटपंची असायची. अर्थात त्यातून राग स्वरूप कळायचे हे मात्र तितकेच खरे.चिजा मात्रा डोक्यावरून जायच्या. 'बालमुवा माईरी' बहार,'मोर मोर मुसकात जात' मालकौंस, 'छों छननन छों छननन बिछुवा बाजे' (माझ्या डोक्यातील प्रश्न 'बिच्छू वाजणार कसा?') जौनपुरी. 'लाल मोरीचू s s नरभी s जे s गी' कामोद मधील धमार.एक चीज तर महाराष्ट्रातील आणि त्यातही माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थासाठी अजूनच अनाकलनीय... 'तेंडेरे कारन मेंडेरे यार' मला फक्त 'मेंढरं' माहीत.त्या वयात न कळणाऱ्या चिजांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणून गुरुजनांनी शिष्यांना अर्थ कळतील अशाच चीजा शिकवाव्या. किंवा शिकवत असलेल्या चिजांचा अर्थ तरी सांगावा. असे जरी मी म्हणत असलो तरी शास्त्रीय संगीत हाच इतर सर्व शैलींचा पाया आहे,हे ही तितकेच खरे आहे. मी आर्णी (जि. यवतमाळ) येथे ३१ वर्षे संगीत विद्यालय चालविले,अणि विद्यार्थ्यांना कळतील अशा चिजा शिकविणे किंवा न कळणाऱ्या चिजांचा अर्थ सांगणे हे बंधन पाळले.शास्त्रीय संगीतातील प्राचीन अस्पष्ट आणि निरर्थक साहित्यात बदल सध्या अपेक्षित आहे.आज आपल्या देशात चित्रपट संगीत अत्यंत लोकप्रिय आहे.कारण ते रस आणि भाव या दृष्टीने अधिक परिणामकारक आहे.त्यावर कितीही ताशेरे ओढले तरी संगीताच्या प्रसाराचे श्रेय मधल्या काळातील चित्रपट सांगिताला द्यावेच लागते.असो!
     बिहाग राग बिलावल थाटातून उत्पन्न होतो. या रागाची गम्मत अशी आहे की,हा दोन पद्धतीने गायिल्या जातो.एकात फक्त कोमल मध्यम व दुसऱ्यात दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.  आरोहात रिषभ,धैवत लागत नाही.म्हणजे वर्ज आहे.अवरोहात सातही स्वर लागतात, म्हणून याची जाती औडव-सम्पूर्ण आहे. यात सर्व स्वर शुद्ध आहेत.
अवरोहातील तीव्र मध्यम या रागाची रंजकता वाढवते. वादी स्वर गांधार आणि संवादी स्वर निषाद आहे.शास्त्रीय माहितीनुसार रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी गायिल्या जाणार हा एक अतिशय मधुर राग आहे. या रागाचा व्यापक स्वरूपातील प्रचलित काळ सोळावी शताब्दी आणि चौदा ते अठराव्या शताब्दीतील वैष्णव काळातील लोकगीतांवरून आपल्या लक्षात येतो. या रागाचा उपयोग रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक गीतांमध्ये आणि विविध बंगाली व उत्तर भारतीय रचनांमध्ये केल्या गेला आहे.भारतीय चित्रपटात तर याचा अतिशय सुंदर रितीने वापर केला आहे. असे म्हणतात की,बिहाग आपल्या असंख्य रुपात प्रेमाचा राग आहे.आनंद,उदासी,आशा,निराशा, शृंगार वगैरे सर्व अनुभूती यातून प्रकट होते.बिहागचे काही प्रकार :-नट बिहाग,बिहागडा,मारू बिहाग.
     युट्युबवर पं. रविशंकर,उस्ताद अली अकबर खान,उस्ताद बडे गुलाम अली खान,गिरीजा देवी,उस्ताद अमीर खान,पं. भीमसेन जोशी,पं. जसराज,पं. कुमार गंधर्व,पं. वसंतराव देशपांडे,किशोरी आमोणकर,पं. हरिप्रसाद चौरसिया,वीणा सहस्रबुद्धे,पं. निखिल बॅनर्जी,पं. नयन घोष,डागर बंधू,डॉ. अश्विनी भिडे देशपांडे,उस्ताद राशीद खान,पं.अजय चक्रवर्ती, पं. व्यंकटेश कुमार,पं. कैवल्य कुमार गुरव,पं. उल्हास कशाळकर,कौशिकी चक्रवर्ती,केदार बोडस,देवप्रिया आणि सुस्मिता चटर्जी,देवशीष भट्टाचार्य,गंधार भालेराव,इंद्राणी चौधरी वगैरेंनी गायिलेला वा आपापल्या वाद्यांवर सादर केलेला बिहाग उपलब्ध आहे.!
     ●हिंदी गाणी...
'ऐ दिले बेकरार क्यूँ?' सैगल.चित्रपट-शहाजहान.
'सुहानी घडिया बीती जाय' पारूल घोष.मिलन १९४६.(बिहाग आणि हमीर रागाचे मिश्रण) 'मेरी लाडली रे मेरी लाडली' लता.चित्रपट-अंदाज. 'हमारे दिल से ना जाना' लता. चित्रपट-उड़न खटोला 'तुम तो प्यार हो सजना' लता,रफी. चित्रपट-सेहरा. 'तेरे सुर और मेरे गीत' लता.चित्रपट-गूंज उठी शहनाई.(यात बिस्मिल्ला खान साहेबांनी सर्वप्रथम चित्रपटासाठी शहनाई वादन केले.) 'बन के चकोरी गोरी झूम झूम नाचो री' मुकेश.चित्रपट-हम मतवाले नौजवान. 'झूम झूम कर चली अकेली' हेमंत कुमार.चित्रपट-ताज. 'दिल जो न कह सका वो ही राजे दिल' रफी.चित्रपट-भीगी रात. 'चलेंगे तीर जब दिल पे' लता,रफी.चित्रपट-कोहिनूर. 'बोलीये सुरीली बोलियां' मिताली, सुलक्षणा पंडित.चित्रपट-गृह प्रवेश 'पिया बावरी' आशा.चित्रपट-खूबसुरत. 'बीती ना बितायी रैना' लता,भपेंद्र.चित्रपट-परिचय. 'कोई गाता मैं सो जाता' येसूदास.चित्रपट-आलाप.'जिंदगी के सफर में' किशोर कुमार.चित्रपट-आप की कसम.'तेरे प्यार में दिलदार' लता.चित्रपट-मेरे मेहबूब.'सुनो सजना पपीहे ने' लता.चित्रपट-आये दिन बहार के.'माना तुम बेहद हसीन हो' येसुदास.चित्रपट-टूटे खिलौने. 'ओह कदल कनमनी से' चित्रा, एआर रहमान.चित्रपट-मलारगल कातें.  सत्यजीत रे यांच्या १९५८ मधील 'जलसागर' या चित्रपटातील एका दृश्यात सुरबहार वादक वाहिद खान यांनी २९.५० ते ३१.५८ इतका वेळ बिहाग राग वाजविला आहे.'दिल चीज क्या है आप मेरी' आशा भोसले.चित्रपट-उमराव जान.यात बिहाग दिसतो. 'तुझे जीवन की डोर से बांध लिया है' लता,रफी.चित्रपट-असली नकली
कैसे सुख सोएं' रोंकिनी गुप्ता.चित्रपट-आंखों देखी.
'पत्ता पत्ता बुटा बूटा हाल हमारा जाने है' -अली रजा.
'कहूँ का से शरम की है बात' दादरा.बेगम अख्तर.
'काहे सताओं मोहें शाम' ठुमरी.पंडित जगदीश प्रसाद.
    ● मराठी...
(सुगम संगीतातील गीते एखाद्या रागावर आधारित असू शकतात.पण संपूर्ण गाणे त्याच रागावर असेल असे नाही.अनेक रागांच्या छटा त्यात दिसू शकतात.)
'अंगणी पारिजात फुलला' -मधुवंती दांडेकर.'मम आत्मा गमला' बालगंधर्व.नाटक-स्वयंवर.'मोडू नका वाचनास नाथा' सुधीर फडके.गीत रामायण.'लग्नाला जातो मी' अनंत दामले.नाटक-संगीत सौभद्र.'ही माला विमला कां जोडी' पं. भार्गवराम आचरेकर.नाटक-सत्तेचे गुलाम.'सकल चराचरि या तुझा असे' पं. जितेंद्र अभिषेकी.नाटक-भावबंधन
-------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,मंथन पुरवणी.रविवार दि.१६ जुलै २०२३.


 

फुलांशी मैत्री...


Friday, July 14, 2023

राग-रंग,लेखांक १५.किरवाणी



     सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील पं. शिवकुमार शर्मा यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला संगतीसोबत संतुरवर सादर केलेला किरवाणी व मेहदी हसन यांच्या 'शोला था जल बुझा हूँ' या गझलमधील किरवाणी रागाने मला अक्षरशः पछाडले होते. अजूनही युट्युबवर या दोघांना ऐकत असतो.पंडितजी आणि उस्तादजी म्हणजे संगीतातील गणितज्ञच.संतुरच्या गोड ध्वनीलहरींसोबत विविध प्रकारच्या लयकाऱ्या,तिहाया आणि त्यास तोडीस तोड झाकिरभाईचा तबला म्हणजे 'सोने पे सुहागा'.तसेच मेहदी हसन यांच्या जव्हारदार मुलायम आवाजातील गझलचचे शब्द व स्वरांची जादूगरी जादू करणारच ना!      
     तर असा हा किरवाणी  मूलतः दक्षिण भारतीय राग आहे.पण उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये इतका रुळला की दक्षिणोत्तर फरकच राहिला नाही.गायकांपेक्षा वादकांनी याला एकदम हृदयाशी धरले.चित्रपट संगीत,गझल,ठुमरी यात किरवाणी जास्ती रमला म्हणा किंवा किरवाणीने यांच्यावर जादू केली म्हणा.रोनू मुजुमदार (बासरी), निखिल बॅनर्जी (सतार) आशा अनेक वादकांनी आपल्या वाद्ययंत्रावर व चित्रपटातील संगीतकारांनी आपल्या संगीत दिग्दर्शनात किरवाणी राग भरपूर वापरला आहे.संपूर्ण जातीच्या या रागात गांधार, धैवत स्वर कोमल व बाकी स्वर शुद्ध आहेत.हा राग उत्तर भारतीय थाट पद्धतीच्या कोणत्याच थाटात बसत नाही.
     अमक्या रागाचे स्वर अमक्या रसाचे असतात.असे म्हणण्यात मला तरी गम्य वाटत नाही.प्रत्येक रागात शृंगार,वीर,भक्ती,शांत,विरह रसाची गाणी आपल्याला बघायला मिळतात.ती कमाल संगीतकाराची असते.खालील चित्रपट गीते व भावगीते पहिली तर आपणास हे कळून येईल.
     सुगम संगीतामध्ये राग नियमाला थोडेसे डावलून इतर स्वर घेण्याचा खटाटोप केल्या जातो. पण त्यामुळे गाण्यांची लज्जत वाढते. बारकाईने पाहिल्यास किरवाणीमधील खालील गाण्यात  कधी शुद्ध धैवत,शुद्ध गांधार व कोमल निषाद यांचाही वापर करून चालीचा गोडवा वाढवलेला दिसतो.खरे म्हणजे ऐकताच हृदयाला स्पर्श करेल तेच खरे गाणे! मग ते शास्त्रीय असो वा अशास्त्रीय.मी आजही शास्त्रीय,सुगम,चित्रपट गीते,ऊर्दू गझल,कव्वाली,पाश्चात्य या सर्व प्रकारचे संगीत ऐकतो,आनंद घेतो.

● चित्रपट गीते...
'ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा',किशोर कुमार.चित्रपट-दिल्ली का ठग. 'तुम बिन जाऊं कहां',रफी-किशोर.चित्रपट-प्यार का मौसम.'बेकरार दिल तू गाये जा',किशोर कुमार.चित्रपट-दूर का राही.'मेरा दिल ये पुकारे आ जा',लता.चित्रपट-नागिन.'का करू सजनी आये न बालम', येसुदास. चित्रपट-स्वामी.'ये समा समा है ये प्यार का', लता.चित्रपट-जब जब फुल खिले.'आनेवाला पल जानेवाला है',किशोर कुमार. चित्रपट-गोलमाल.'रिमझिम गिरे सावन', किशोर कुमार.चित्रपट-मंजिल.'ये रात भीगी भीगी ये मस्त हवाये',लता-मन्ना डे. चित्रपट-चोरी चोरी.'चली जा छोड के दुनिया',लता.चित्रपट-हम लोग.'गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं', किशोर कुमार.चित्रपट-लाल पथ्थर.'ओ निंद न मुझकोआये', लता-हेमंत कुमार.चित्रपट-पोस्ट बॉक्स ९९९.'मेरी भिगी भिगी सी पलकों पे रह गये', किशोर कुमार.चित्रपट-अनामिका.'कहे झूम झूम रात ये सुहानी',लता.लव्ह मॅरेज.'दिल के अरमाँ आंसूओ मे बह गये', सलमा आगा.चित्रपट-निकाह.'मेरी निंदो मे तुम मेरी खव्वाबो मे तुम', किशोर कुमार.चित्रपट-नया अंदाज.'पुकारता चला हूँ मैं', रफी.चित्रपट-मेरे सनम'आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं', आशा भोसले.चित्रपट-
'मैं प्यार का राही हूँ', आशा,रफी.चित्रपट-एक मुसफिर एक हसीना.'याद न जाये बिते दिनो की', रफी.चित्रपट-दिल एक मंदिर.'एक राधा एक मीरा',लता.चित्रपट-राम तेरी गंगा मैली.'मैं शायर तो नहीं',शैलेंद्र सिंग. चित्रपट-बॉबी.
'तू सफर मेरा तू ही मंजिल मेरी', अर्जित सिंग.चित्रपट-ऐ दिल है मुश्किल.'नजर जो तेरी लागी मैं दिवानी हो गयी', श्रेया घोषाल.चित्रपट-बाजीराव मस्तानी.'तुमको पाया है के जैसे खोया हूँ', सोनू निगम.चित्रपट-ओम शांती ओम.
'तोसे नैना लागे', क्षितिज-शिल्पा.चित्रपट-अन्वर.'अंग लगा दे रे', आदिती पौल-शैल हाडा.गोलीयों की रास लीला-राम लीला.'हर तरफ तू ही दिखे', शान-महालक्ष्मी अय्यर.

●उर्दू गझल...
'शोला था जल बुझा हूँ'-मेहदी हसन. 'ऐ हूस्ने बेपर्वा तुझे शबनम कहूँ शोला कहूँ', 'पारा पारा' -गुलाम अली. 'बेसबब बात बढाने की जरूरत क्या है' -जगजीत सिंग. 'हाथ मे लेके मेरा हाथ ये वादा कर लो' -हरिहरन.

●मराठी गाणी...
'अवमानीता मी झाले' -नाट्यगीत. 'सूर सुख खणी', नाटक-संगीत विद्याहरण. 'डोळ्यामधले आसू पुसती ओठांवरले गाणे' -सुधीर फडके. 'ही चिकमोत्याची माळ', -निरुपमा डे. 'विसर गीत विसर प्रीत' - सुधीर फडके.'अशी पाखरे येती' -सुधीर फडके.'तिन्ही लोक आनंदाने भरूनि गाउ दे' -सुधीर फडके'एकाच या जन्मी जणू',आशा भोसले.चित्रपट-आपली माणसं .'जिवलगा कधी रे येशील तू ?' आशा भोसले.-सुहासिनी.'तुझी प्रीत आज कशी स्मरू'.आशा भोसले.चित्रपट- अपराध.'सांग कधी कळणार तुला', सुमन कल्याणपूर,महेंद्र कपूर.चित्रपट-अपराध.
'सैराट झालं जी',अजय-चिन्मयी. चित्रपट-सैराट.'दिल की तपिश है आफताब', राहुल देशपांडे. चित्रपट-कट्यार काळजात घुसली. 

●Melodies fusion...
'Voice of the moon' anoushka shankar france 2014,Rag kirwani on satar- with sanjeev shankar (shehnai),danny keane (cello & piano),ayanna vitter,johnson (vocal-piano-celli),pirshanna thevarajah (indian percussion), manu delago (hang-drums-percussion).

'Kirwani' anoushka shankar. Live 2019.

'The best of firdaus orchestra with anoushka shankar'-expo 2020 dubau.
अवश्य ऐकावे.यात किरवाणी रागावर आधारित धून आहेत. युट्युबला सतार वादन ऐकताना मला अचानक सापडलेली सामुग्री.

●मराठी गझल गायकीच्या सुरवातीच्या काळात (१९८१/८२) मी डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची
"दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
आरती जी गात आहे तीच माझी अर्चना..."
ही गझल किरवाणीमध्ये स्वरबद्ध केली होती.त्यानंतर
२००६ मध्ये मीरा सिरसमकर या कवयित्रीच्या बालगीतांचा 'खूप मज्जा करू' शिर्षकाचा एक अलबम पुण्याच्या 'फाऊंटन म्युझिक कंपनी'ने बनविला होता.संगीत दिगदर्शन माझे होते.त्यात किरवाणी रागावर आधारित एक सुंदर पाऊसगाणे आहे.गायिका नेहा दाऊदखाने सिन्हा हिने अप्रतिम गायिलेले हे गाणे आपण माझ्या 'गीत-गझलरंग' या युट्युब चॅनलवर ऐकू शकता.ऐका, आणि घरातील बाल गोपालांसह आपणही आनंद घ्या.

रिमझिम रिमझिम पाऊस आला
भिरभिर भिरभिर वारा सुटला
या रे नाचू या, थेंब टपोरे झेलू या
झेलू या झेलू या झेलू या

लख लख लख लख विजा चमकल्या
ढगांमधे ढम् ढोल वाजला
कटडम कटडम गारा पडल्या
भिजून सारे वेचू या
या रे नाचू या, थेंब टपोरे झेलू या
झेलू या झेलू या झेलू या

वाटांमधुनी पाणी आले
जागो जागी तळे साचले
इथले तिथले मार्गही अडले
शाळेचे तर रस्ते बुडले
पाटी दफ्तर घेऊ या
या रे नाचू या, थेंब टपोरे झेलू या
झेलू या झेलू या झेलू या

'रिमझिम'ची युट्युब लिंक...
https://youtu.be/zK7Mnj-YblA
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'मंथन' पुरवणी.रविवार दि.९ जुलै २०२३

 

मज सांग...



मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी
भवतालच्या नजरांस या चुकवून मी येऊ कशी

कुठल्या घराचा उंबरा खिळवून मजला ठेवतो
तुझिया करी उल्केपरी निखळून मी येऊ कशी

आली अचानक कोठुनी ही शीळ चंदेरी तुझी
माझ्या मनाच्या पायऱ्या उतरून मी येऊ कशी

माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती
आयुष्य हे की पिंजरा निसटून मी येऊ कशी

-ज्योती राव बालिगा

 

Sunday, July 2, 2023

राग-रंग, लेखांक १४.


     चारुकेशी 

     चारुकेशी हा राग दक्षिणेकडून उत्तरेकडे आलेला एक अतिशय गोड राग आहे.दक्षिण भारतीय पंडित व्यंकटमखी यांच्या गणितीय बाहत्तर थाट प्रणालीतील सव्वीसाव्वा थाट आहे.कर्नाटक संगीतातील 'मुथुस्वामी दीक्षितार स्कुल'मध्ये याला 'तरंगिनी' म्हणतात.(चारुकेशीचा अर्थ सुकेशा किंवा सुंदर केशसंभार असलेली स्त्री असा पण काढता येतो.) धैवत,निषाद कोमल आणि इतर स्वर शुद्ध असलेला संपूर्ण जातीचा हा राग आता उत्तर भारतीय संगीतामध्ये पण मस्त रुळला आहे.पण याला उत्तर भारतीय संगीत पद्धतीमधील कोणत्या थाटात बसवावे हा प्रश्नच आहे!
      
      मुळात उत्तर भारतीय गायन/वादन पद्धती व उत्तर भारतीय गायन/वादन पद्धती अतिशय भिन्न आहेत.उत्तर भारतीय पद्धतीमध्ये गायक/वादकांना आपल्या कलाविष्काराला भरपूर वाव असल्यामुळे त्याला मनाप्रमाणे राग मांडणी करून गाता येते.दक्षिण भारतीय पद्धतीमध्ये कलाकारांना ज्या रचना लिहून ठेवल्या आहेत त्या परंपरेने गाव्या/वाजवाव्या लागतात.(काही कलाकार अनेक उत्तर भारतीय राग उत्तर भारतीय पद्धतीने सादर करतानाही दिसतात.)

      जागतिक संगीतामधील सप्तक म्हणजे एक चमत्कार आहे.शेतकऱ्याप्रमाणे मशागत करून सात स्वर पेरत जा व आपापल्या कल्पनेप्रमाणे विविध सुरावटींचे पीक घेत रहा. जमिनीतून येणाऱ्या पिकाप्रमाणे अविरत चालणारी प्रक्रिया आहे ही.अर्थात ही जमीन सुपीक करण्यासाठी संगीताचे विशुद्ध शिक्षण,मेहनत व रियाजाचे खत यात घालावे लागते.तसेच शुद्ध सोने मिळविण्यासाठी जसे तप्त मुशीतून जावे लागते .तसे यातून तावून सुलाखून निघाल्यावर मग सोन्याप्रमाणे चकाकणाऱ्या स्वरांच्या लगडी निर्माण होतात.शेतकरी जशी पोटाची भूक भागवतो तशी माणसाची मानसिक भूक हे अस्सल संगीत भागवत असते.कुठल्याही देशाचे वा प्रांताचे असो.संगीत हे संगीतच असते.पाश्चात्य संगीतामध्ये दक्षिण भारतीय संगीताप्रमाणे संगीतकारांनी ज्या रचना करून ठेवल्या त्या रचना जशाच्या तशा सादर कराव्या लागतात. अर्थात अशा रचना करणारे संगीकार उच्च कोटीचे असतात.नव्या नव्या कल्पना साकार करून नवनव्या सुरावटी तयार करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे असते.
      आपले राग म्हणजे खरोखरच एक चमत्कार आहे…एकाच रागात शब्दानुरूप सुरावटी दिल्या तर वेगवेगळ्या भावाभिव्यक्ती करता येते. भले त्या रागाचा गानसमय कोणताही असो. “पुछो ना कैसे मै ने रैन बिताई” हे मन्ना डॆंच्या आवाजातील चित्रपटगीत अहिर भैरव रागात स्वरबद्ध केले आहे.हे गीत केव्हाही ऐका कानाला गोडच वाटते.गानसमयाप्रमाणे विचार केला तर हे फक्त सकाळीच गोड वाटायला हवे…पण तसे होत नाही.याचाच अर्थ असा की गानसमयापेक्षा शब्दांना योग्य तो स्वरसाज चढणे आवश्यक असते.मग तो राग कोणताही असो.याच रागात शंकर जयकिशन या महान संगीतकार जोडीने “बाजे पायल छम छम होके बेकरार” हे वेगळ्या बाजाचे गाणे कंपोज केले आहे.(भलेही ते रॉन उडविन या पाश्च्यात्य संगीतकाराच्या मूळ रचनेवर बेतलेले असू दे) पण ही दोन गाणी केव्हाही ऐकली तरी चांगलीच वाटतात.पिढ्या न पिढ्या अमुक राग अमुक वेळीच गायिल्या जावा हे बिंबवल्यामुळे राग-गानसमयाच्या संदर्भात मेंदूत सगळा केमिकल लोचा झाला असावा,असे मला वाटते….
      सुगम संगीतामध्ये काव्यातील शब्दांचे भाव आणि त्याला अनुरूप केलेली सुरावट यांचं एक नातं असतं. काव्यानुरूप सुरावट असली की,काव्यातील शब्दांनुसार प्रेम,
शृंगार,विरह,कारुण्य,भक्ती,आळवणी,विनवणी असे सर्व भाव रसिकांच्या हृदयापर्यंत थेट पोहोचतात.म्हणून काव्यानुरूप सुरावट असणे महत्वाचे असते.यात शास्त्रीय संगीतातील रागाच्या गानसमयापेक्षा काव्यातील शब्दांना प्राधान्य असल्यामुळे रसिकवर्ग, शब्द आणि स्वरांचा समसमा आनंद घेऊ शकतात.मग ती धून कोणत्याही रागात असो!
     खालील प्रतिथयश व नवोदित कलाकारांनी सादर केलेला चारुकेशी युट्युबवर उपलब्ध आहे...    
पं. रविशंकर, पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा पं. अजय पोहनकर, उस्ताद शाहिद परवेज, उस्ताद राशीद खान, संजीव अभ्यंकर,पं. अजय चक्रवर्ती, पं. तेजेंद्र मुजुमदार, संदीप रानडे, डॉ. एल.सुब्रमण्यम (कर्नाटक पद्धती), चारुकेशी वर्णम (कर्नाटक) प्रतिभा सारथी,वंदना कृष्णमूर्ती, डॉ. जयंती कुमारेश (वीणा), श्री आर.कुमारेश (व्हायोलिन) कर्नाटक पद्धती,
'पिया मोरा रे' हा कौशिकीने गायिलेला दादरा मला खूप आवडतो. सरोज यांनी वाजविलेली दिलरुबा या वाद्यावरील चारुकेशी  धून पण ऐकण्यासारखी आहे.(याचीच तारशहनाई करून पण वाजविल्या जाते.) दीपक पंडित (व्हायोलिन) आणि पारस नाथ (बासरी) यांची जुगलबंदी पण श्रवणीय आहे.
●हिंदी गाणी...
'इक तू जो मिला सारी दुनिया मिली', लता. 'एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है' (एकाच रागातील आनंदी आणि दुःखी गाणं) चित्रपट-हिमालय की गोद मे.
'है मेरे साथ तेरी वफा मैं नहीं तो क्या', लता.चित्रपट-हिंदुस्थान की कसम.'छोड दे सारी दुनिया किसीं के लिए', लता.चित्रपट-सरस्वतीचंद्र. 'है इसी में प्यार की आबरु', लता.चित्रपट-'अकेले है चले आओ जहां हो' रफी. चित्रपट-राज. 'शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम', आरती मुखर्जी, जसपाल सिंग.चित्रपट-गीत गाता चल.
'बैया ना धरो ओ बलमा', लता.चित्रपट-दस्तक. 'वो भुली दासतां लो फिर याद आ गयी', लता. चित्रपट-संजोग.         'कोई जब तुम्हारा हृदय तोड दे', मुकेश.चित्रपट-पूरब और पश्चिम. 'बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है', लता.चित्रपट- आरजू . 'जो हमने दासतां अपनी सुनाई आप क्यूँ रोये',लता.चित्रपट-वोह कौन थी. 'मुहब्बत के सुहाने दिन,जवानी की हसीं राते', रफी. चित्रपट-मर्यादा. 'किसी राह में किसी मोड पर कहीं चल न देना तु छोडकर', लता,मुकेश.चित्रपट-मेरे हमसफर  'तेरे नैना क्यूँ भर आये', लता.चित्रपट-गीत. 'झूठ बोले कौवा काटे', लता,शैलेंद्र सिंग.चित्रपट-बॉबी.'बेखुदी मे सनम',लता,रफी.
चित्रपट-हसीना मान जायेगी. 'और इस दिल में क्या रक्खा है', आशा भोसले,सुरेश वाडकर.चित्रपट-इमानदार. 'मेघा रे मेघा रे', लता,सुरेश वाडकर. चित्रपट-प्यासा सावन. 'धरती सूनहरी अंबर नीला', लता, उदित नारायण.चित्रपट-वीर झारा. 'तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है', कुमार शानु,
साधना सरगम. चित्रपट-दिवाना. 'आहिस्ता आहिस्ता निंदिया तू आ', उदित नारायण,साधना सरगम.चित्रपट-
स्वदेस. 'आज दिल पे कोई जोर चलता नहीं', लता.
चित्रपट-मिलन 'चलो सजना जहां तक घटा चले', लता.
चित्रपट-मेरे हमदम मेरे दोस्त.'जाने जाना ओ जाने जाना', महेश गढवी, सपना मुखर्जी.चित्रपट-जाँबाज 'जब तक सांसे चलेंगी', सवाई भट्ट.चित्रपट-सांसे. 'प्यार क्या होता है',कविता कृष्णमूर्ती,उदित नारायण. 'दिल तो है दिल दिल का ऐतबार क्या कीजे', लता. चित्रपट-मुकद्दर का सिकंदर. 'ये मेहंदी के बुटे इनके रंग अनोखे', उदित नारायण,अलका याज्ञीक. चित्रपट-हमको तुमसे प्यार हैं.

'कितक दिन हरि सुमिरन बिन खोये',पं. जितेंद्र अभिषेकी.
'सुन चरखे दि मिठी मिठी कूक', नुसरत फतेह अली. 
झिना झिना झीना रे उडा गुलाल' अर्जित सिंग.
'ओ कडी आ मिल सावल यार वे' कमाल खान.  

'मैं होश मे था तो फिर ऊस पे मर गया कैसे', 'तुम आये हो न शबे इंतजार गुजरी है', 'अब दिल की तमन्ना को अश्कों मे बहाते है','जब उस जुल्फ की बात चली' मेहदी हसन.
'ऐसा लगता है जिंदगी तुम हो',चित्रा सिंग.
'दुःख की लहर ने छेडा होगा','पापी पपीहा बोले,ऎसे मे जी ना डोले',गुलाम अली.
●मराठी...
'अवघे पावन पंढरपूर', पं. जितेंद्र अभिषेकी.
'ऋतू बरवा,ऋतू हिरवा', आशा भोसले.
'खेळ मांडला', अजय गोगावले  चित्रपट-नटरंग.
'हे सुरांनो चंद्र व्हा', अर्चना कान्हेरे.नाटक-ययाती देवयानी.
(संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी असल्यामुळे त्यांनी गायिलेले जास्ती भावते.)
'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी',सुरेश वाडकर.
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'मंथन' पुरवणी.रविवार २ जुलै २०२३


 





संगीत आणि साहित्य :