मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी
भवतालच्या नजरांस या चुकवून मी येऊ कशी
कुठल्या घराचा उंबरा खिळवून मजला ठेवतो
तुझिया करी उल्केपरी निखळून मी येऊ कशी
आली अचानक कोठुनी ही शीळ चंदेरी तुझी
माझ्या मनाच्या पायऱ्या उतरून मी येऊ कशी
माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती
आयुष्य हे की पिंजरा निसटून मी येऊ कशी
-ज्योती राव बालिगा
No comments:
Post a Comment