टीव्ही वरी चाले
स्वप्नांचा व्यापार
तरिही अपार
लोकप्रिय...
वास्तवापासोनि
जरि फारकत
तरी बघतात
सर्वजण...
प्रत्येक मालिका
फरफटतात
कारवाया ऊत
येवोनिया...
मनोरंजनाच्या
नावे, फालतुच्या
काळ्या करणीच्या
कथा दावि...
’क’च्या मालिकांनी
सुरवात झाली
आणि बदलली
रूचि सारी...
स्थानिक लेखक
आणि कलाकार
लावितात पार
या मालिका...
मूळ कथानक
ताणोनि ताणोनि
करिती अळणी
दिग्दर्शक...
नाव असो काही
कथानक तेचि
वास्तविकतेचि
ऐसी-तैसी...
एका भागामध्ये
अर्ध्या जाहिराती
बाकीची भरती
खोगिरांची...
मोठा टीआरपी
त्यास जाहिराती
अशी सारी नीति
आजकाल...
प्रेक्षक बिचारे
मनोरंजनाचा
गल्लाभरू ’ठेचा’
पचविती...
भाषा व्याकरण
रसातळा नेई
पालखीचे भोई
मराठीच्या...
सुधाकर कदम
गुरूवार-७.९.१२