गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, December 31, 2011

"कुठलेच फूल आता मजला पसंत नाही..."





         अबके हम बिछडे तो शायद कभी ख्व्वाबों मे मिले...’ अतिशय तरल काव्य आणि त्याला साजेशी बंदिश,असे फार कमी योग येतात... यालाच दुग्ध-शर्करा योग म्हणत असावे.मला तरूण वयातच या गझलने इतकी भुरळ पाडली पाडली,की आज साठी नंतरही तिचा दरवळ हृदयात दरवळत आहे.या गझलची बंदिश अप्रसिद्ध अशा कोमल धैवत भूपया रागात आहे.हे नाव कोमल रिषभ आसावरीरागाच्या धर्तीवर मी ठेवले आहे. ’भूपरागातील शुद्ध धैवत कोमल केला की हा राग तयार होतो.स्वर आहेत...सा रे ग प सां,सां प ग रे सा.यालाच आपल्याकडे भूपेश्वरी किंवा कृष्णरंजनी असे नाव दिल्या गेल्याचे कुठल्यातरी एका पुस्तकात वाचण्यात आले. त्यावरून मी पं.भातखंडे यांच्या संगीतावरील समग्र ग्रंथांचा धांडोळा घेतला असता कुठेही या नावाच्या रागांचा उल्लेख आढळला नाही.तसेच संगीत कार्यालय (हाथरस ऊ.प्र.) येथून प्रसिद्ध झालेल्या राग-कोषया ग्रंथातही या रागांचा तसेच सुरावटीचा उल्लेख दिसला नाही.या ग्रंथाचे लेखक वसंतअसून संपादन लक्ष्मीनारायण गर्ग यांचे आहे.यात उत्तर व दक्षिण भारतीय ५०० रागांचे संपुर्ण वर्णन आहे.अर्थात एखाद्या नविन सुरावटीला काही तरी नाव द्यायचे म्हणून शिवरंजनीच्या धर्तीवर कृष्णरंजनी,भूपेश्वरी वगैरे वगैरे..शात्रीय संगीतातील.
 विद्वानांनी यातील कोणते तरी एक नाव पक्के करावे,म्हणजे नावा बाबतचा भ्रम राहणार नाही.
         (भूपातील गांधार कोमल केला की शिवरंजनी नामक अतिशय सुरेल, पण शास्त्रीय गायकांना
भूपासारखाच न पेलणारा राग तयार होतो.या रागाचा हिंदी चित्रपटात संगीतकारांनी अतिशय सुंदर उपयोग केला आहे.’ओ बसंती पवन पागल...’,’दिल के झरोखे में तुझको बिठाकर...’,’ओ मेरे सनम ओ मेरे सनम,दो जिस्म मगर इक जान है हम...’,’जाने कहाँ गये वो दिन...’ ही त्याची काही सुरेल उदाहरणे...)

         या रागाची मूळ निर्मिती कुठली ते कळत नाही. मेहदी हसनच्या "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्व्वाबों मे मिले..." या गझलच्या बंदिशीमुळे आपल्याकडे याची लागण झाल्याचे दिसून येते. याचा पहिला बळी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर होय. इतके लोभस स्वर...विव्हल आळवणी करणारे...आणि काळजाला भिडणारे शब्द...अशा जीवघेण्या सुरावळीच्या मोहात न पाडणारा विरळाच...! तर हृदयनाथांनी या रागाच्या सुरावटीचा उपयोग सुरेश भटांच्या...

"मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात लाभला निवांत संग..."


या रचनेकरीता करून, लाताबाईचा मधाळ आवाज घेतला...कलिजा खल्लास...!

           अबके हम बिछडे...’ आणि मालवून टाक...’ शब्द-स्वरांच्या दृष्टीने इतक्या उच्च स्तराच्या होत्या, की त्यानंतर या रागाला भिडण्याचा हिंमत कोणी करेल असे वाटत नसतांनाच अज़िज़ नाज़ाँ या कव्वालाने "चढता सूरज धिरे धिरे ढलता है ढल जायेगा..." या कव्वालीला याच रागाचा स्वरसाज चढवून वेगळे विश्व निर्माण केले.त्या काळात ही कव्वाली आणि अज़िज़ नाज़ाँ कव्वालीच्या क्षेत्रात तळपत होते.गंमत बघा ! स्वर तेच पण गायक, संगीतकार त्याला कशा प्रकारे प्रस्तूत करुन , कसे-कसे
वातावरण निर्माण करू शकतात ते...! ’अबके हम बिछडे...’ आणि मालवून टाक...’ ची तरलता येथे संपून जाते...तरीही ही कव्वाली लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचते.असो...
                                                                                                                                                                           याच दरम्यान म्या पामरानेही प्रयत्न केला.गझल होती...


       "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,
       कळते मला अरे हा माझा वसंत नाही...".


कवी सुरेश भटच...

          या गझलच्या बंदिशीमागची पार्श्वभूमि थोडक्यात सांगतो,कारण त्यामागे एक चांगला,ऐकण्यालायक किस्सा आहे...! या गझलची पहिली चाल मी किरवाणीया रागात जरा उडत्या अंगाने बसविली होती.भटांना ती ऐकविल्यावर म्हणाले,’सुधाकरराव (नविन नविन ओळख असल्यामुळे सुरवातीला ते मला असे संबोधायचे,) तुम्ही एका घरंदाज बाईला तमाशात नाचविले...! मी अवाक...क्षणभर मला काही कळलेच नाही...पण लगेच लक्षात आले की काहीतरी चुकले...माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून भटच म्हणाले, ’सुधाकरराव गझलचा मूड आणि तुमची चाल याचा काही ताळमेळ नाही ना राजे हो,थेच त जमाले पाह्यजे ना "! असे म्हणून त्यांच्या जवळच्या मेहदी हसन,फ़रीदा खानम आणि ग़ुलाम अली अशा तीन ध्वनिफिती,टेपरेकॉर्डरसह दिल्या आणि "याचा अभ्यास करा म्हणजे जमेल" असे उद्गारले..! या प्रसंगानंतर काही महिन्यांनी म्या पामराने केलेली ही बंदिश...! सुरेश भटांना खूप आवडलेली...या वरूनच त्यांनी मला ’महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन’ हा किताब दिला असावा,असे मला वाटते.खरे म्हणजे मेहदी हसन समोर मी ’किस झाड की पत्ती’ आहे,हे मला माहीत आहे.म्हणूनच मी महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन’,’गझलनवाज’,’गझल गंधर्व’ वगैरे उपाध्या नावामागे शक्य तोवर लावत नाही.माझी ’औकात’ मला माहित असल्यामुळे म्हणा किंवा ही मंडळी किती मोठी आहे हे मला कळत असल्यामुळे म्हणा,मला ते आवडत नाही.असो...तर म्या पामराने केलेली ही बंदिश कितपत जमली ते आपण ठरावावे.हे ठरवितांना तिकडे स्वरांचा बादशहा मेहदी हसन....इकडे गानकोकिळा लता मंगेशकर....आणि मी....विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या वीस हजार लोकवस्तीच्या गावातला ,मराठी गझल गायकीची ओळख करून देण्यासाठी सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर वणवणणारा साधा संगीत शिक्षक...हे समिकरण लक्षात घ्यावे.
           आज आपण वरील तीनही रचनांचा आस्वाद घेऊ या...खरा क्रम मेहदी हसन,लता मंगेशकर आणि सुधाकर कदम असा ठेवला होता.परंतू वरील दिग्गजांना ऐकल्यावर सुधाकर कदमांना कोण ऐकणार ? त्यातही ध्वनिमुद्रण ८० च्या दशकातील एका कार्यक्रमाचे...जुन्या कँसेटवरून उतरविलेले... म्हणून क्रम बदलला.प्रथम सुधाकर कदम,नंतर मेहदी हसन आणि शेवटी लता मंगेशकर असा क्रम लावला.(शक्कर की जलेबी खाने के बाद गुड़ की जलेबी कौन खाएगा ? इससे अच्छा पहले गुड़ की जलेबी खिला दो...!) ऐका तर...... पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात (१५ जुलै १९८२) गायिलेली गझल...


"कुठलेच फूल आता मजला पसंत नाही......"


कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही




जमवूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना
इतुका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही




मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही





थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे
रस्त्यास वाहणा-या कसलीच खंत नाही



मी रंग पाहिला या मुर्दाड मैफिलीचा
कुठल्याच काळ्जाचा ठोका जिवंत नाही


संगीतकार,गायक - सुधाकर कदम
गझल- सुरेश भट

(सूचना - मी गायिलेल्या रचना परवानगी शिवाय जाहीर कार्यक्रमात गाऊ नये.)

अब के हम बिछडे...

मालवून टाक दीप...

Thursday, December 29, 2011

’एक प्रार्थना...’

         आमच्या गझल कट्ट्यात सादर झालेली डॉ.  .अनंत ढवळे यांची खालील गझल माझी अतिशय आवडती आहे.माझ्या दृष्टीने शब्द आणि स्वरांचा सुंदर मेळ यात जमला आहे.ध्वनिचित्रमुद्रण इतके चांगले नाही परंतू कळण्या इतपत नक्कीच आहे.या गझलची बंदिश तयार झाल्याबरोबर दोन-तीन दिवसातच सादर केल्यामुळे सादरीकरणात कच्चेपणा आहे.कारण सतत गात राहिल्या शिवाय पक्केपणा येत नाही.आणि दर महिन्यात नविन रचना देण्याचे आव्हान संगीतकट्ट्यामुळे गझलकार,संगीतकार आणि गायकांसमोर असायचे. यामुळे प्रत्येकाला,आपल्याला काहीतरी नविन द्यायचे आहे या प्रेरणॆने कोणाचे लिहून व्हायचे,कोणाची चाल बसवणे सुरू असायचे.कोणाची गाण्याची तयारी सुरु असायची.या निमित्ताने सर्वजण एकत्र यायचे.सगळे काही नविन असल्यामुळे त्यातल्या त्रुटी कळायच्या,एकमेकांशी चर्चा व्हायची.एकूणच बढीया माहौल तयार झाला होता.पण.....

          उत्स्फुर्तपणे झालेली या गझलची बंदिश कोण्या एका रागात आहे असे सांगता येत नाही.कारण कुठे-कुठे शब्दागणिक तर कुठे-कुठे ओळींगणिक वेगवेगळ्या सुरावटी यात आलेल्या आहेत.माझ्या बहुतेक चाली आतून आलेल्या आहेत.कधी त्या एखाद्या रागाला धरुन तर कधी उन्मुक्त....ही चाल उन्मुक्त आहे.कुठे पटदीपरागाचा भास होतो.तर लगेच भीमपलासीचीछाया त्यावर पडलेली दिसते.मध्येच तीव्र मध्यमचमकुन जातो.अंतर्‌यामध्ये आणखीनच वेगळी सुरावट येऊन सरोवराचे गूढउलगडण्याचा प्रयत्न केल्या जातो.’पाऊस आलाह्या शब्दांसाठी झालेला कोमल धैवताचा प्रयोग लक्षणीय वाटतो.’फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा" या शब्दांची आर्तता स्वरांद्वारे व सुरांद्वारे दाखविण्यासाठी केलेला भैरवीचा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहे,असे या कार्यक्रमाचे सूत्र संचलन करणारे पुण्यातील सुप्रसिद्ध गझलकार म.भा.चव्हाण यांनी यावेळी काढले.हे माझ्यासाठी संगीतकार म्हणून प्रेरणा देणारे होते.

         माझ्या दोन्ही मुली भैरवी आणि रेणू लग्न होऊन दिल्ली,कानपुर येथे स्थायिक झाल्या.जावई समीर चव्हाण गणित विश्वात रमणारे असूनही मराठी गझल लिहिण्याचा त्यांचा व्यासंग कौतुकास्पद आहे.ते पुण्यात असेपर्यंत निषाद आणि ते गझल कट्ट्याचे आयोजनाकरीता झटायचे.समीर IIT कानपुरला प्रोफेसर म्हणून रुजू झाले नि गझलकट्टा बंद पडला.पुन्हा सुरु व्हावा ही ईच्छा आहे.परंतु एका व्यक्तीच्या इच्छेने होणारी ही गोष्ट नाही.जगन्नाथाच्या रथाप्रमाणे सगळ्यांचे हात लागले तरच हे शक्य आहे.असो...

गझल ऐकू या.....................................................




एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली


काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली



कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले


प्रतिबिंबाची वलये नुसती हलत राहिली



जुन्या दिसांची साद घेऊनी पाऊस आला


गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली



फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा


दिवस मात्र वर्षांची शकले फुटत राहिली




गायिका-भैरवी कदम देव

गझलकार-डॉ.अनंत ढवळे

संगीत-सुधाकर कदम

तबला-निशाद कदम

व्हायोलिन-प्रमोद जांभेकर

हार्मोनिअम-दस्तुर्खुद्द




         

Monday, December 26, 2011

हिरवे हिरवे गर्द चिमुकले...



वृंदावनी सारंग रागातीलच हे एक वेगळ्या ’मूडचे’ २००७ मध्ये स्वरबद्ध केलेले



’खूप मजा करू...’ 
या बालगीताच्या अल्बम मधील निसर्ग गाणे...

हिरवे हिरवे गर्द चिमुकले
दाट धुक्यांनी हळु पांघरले
बेट नव्हे ते नंदनवन जणू
निळ्या जांभळ्या जळात वसले

हिरवे हिरवे...

या बेटाचा समुद्र गहिरा
लाटांमधुनी खेळे वारा
हलति होड्या डुलती नौका
सोडुन थोडा दूर किनारा

हिरवे हिरवे...

तिथली झाडे अन फुलवेली
रंग सृष्टीचे मोहक ल्याली
क्षणात हसती,क्षणी कुजबुजती
जाणुन पक्षांची मधुबोली

हिरवे हिरवे...

सुंदर तिथला हिरवा डोंगर
मेघ चुंबितो त्याचे शिखर
पायथ्याशी त्या घरे चिमुकली


पलिकडे ते पवित्र मंदिर

हिरवे हिरवे...




गायिका-नेहा दाऊदखाने


Friday, December 23, 2011

सावळा घनशाम रे...


           या गीताची बंदिश वृंदावनी सारंग या रागात आहे.याचे आरोहावरोह असे...सा रे म प नि सां,सां नि प म रे सा.असे आहेत.अवरोहात नि हा स्वर कोमल आहे.दुपारी गायिला जाणारा हा एक गोड राग आहे.या आणि याचाच भाऊ मधमाद सारंग या रागात अनेक चित्रपट गीते,भावगीते,भक्तिगीते आणि गझल आहेत.

         'जादुगर सैयाँ,छोड मोरी बैयाँहे नागिन’ (१९५४) या चित्रपटातील हेमंतकुमार यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लताबाईंनी गायिलेलं त्या काळात अतिशय गाजलेलं गाणं वृंदावनी सारंग या रागातच आहे.’रानी रुपमती’ (१९५९) या चित्रपटातील एस.एन.त्रिपाठी यांनी संगीतबद्ध केलेले भरत व्यास यांचे आ लौटके आजा मेरे मीत...’ हे गीत मधमाद सारंग या रागात आहे.याच चित्रपटातील रफी-लता यांनी गायिलेले झननन झन झननन झन बाजे पायलिया...’ हे अती सुंदर गीत वृंदावनी सारंग रागात आहे. ’संथ वाहते कृष्णा माई...’ हे ग.दि.मां.चे.दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेले आणि सुधीर फडके यांनी गायिलेले सर्वांगसुंदर गीतही वृंदावनी सारंग या रागात आहे.एवढेच नव्हे तर कजरा मोहब्बतवाला,अखियों मे ऐसा डाला...’ हे किस्मत’ (१९६८) या चित्रपटातील ओ.पी.नैय्यर यांनी संगीत दिलेलं आणि आशाबाईंनी गायिलेलं धडकेबाज गाणंही वृंदावनी सारंग याच रागात आहे.

         मी ही थोडा वेगळा प्रयत्न करून पाहिला.यातील घनया शब्दावरील बारिकशी सुरावट आणि दुसर्‌या कडव्यात याच्या जवळच्याच देसरागाच्या सुरावटीचा उपयोग करून गोडवा आणण्याचा प्रयत्न केला...आपणास आवडले तर बघा...

शाम घन घन शाम माझा सावळा घनशाम रे
जन्म ज्याला वाहिले मी श्वास गाती नाम रे

एकटी मी चालताना धाव घेतो श्रीहरी
जागवी आलोक माझ्या श्रांतलेल्या अंतरी
पूजिते मी पाउलांना होऊनी निष्काम रे

वादळी नौकेस माझ्या तोच आहे रे किनारा
तोच माझ्या वेदनेची थांबवीतो अश्रुधारा
नम्र माझ्या पापण्यांची पूजने अविराम रे

तोच येथे धाव घेतो दुःख माझे तोच हरतो
तो सुखाचे रूप आहे तो मनाला शांतवीतो
शब्द झाले तीर्थ माझे प्राण पावन धाम रे

गायिका-रेणू कदम चव्हाण
गीत-आशा पांडे
संगीत-सुधाकर कदम

(’स्वरानंद प्रतिष्ठानआयोजित, ’अर्चनाया भक्तिगीतांच्या अल्बमचा लोकार्पण सोहळा,यशवंतराव चव्हाण ,पुणे.२००६)



Sunday, December 18, 2011

"मिलकर जुदा हुए तो..."




         "मिलकर जुदा हुए तो न सोया करेंगे हम..." ही क़तील शिफ़ाई यांची,जगजीत-चित्रासिंग यांनी गायिलेली सुंदर गझल ’तोडी’ नामक रागात अतिशय वेगळ्या प्रकारे,रागस्वरूपाला धक्का न लावता बांधलेली आहे.तोडी रागाची अनेक रुपं आहेत.त्यात आपल्या सारख्या रसिक मंडळींनी खोलात जाण्यात काही अर्थ नाही.कारण तो सुद्धा लेखाचा एक वेगळा विषय आहे.या रागात सा रे ग म ध नि असे स्वर लागतात.(अवरोहात पंचम स्वराचा वापर काही गायक करतात.)यातील रिषभ,गांधार,धैवत स्वर कोमल असून मध्यम तीव्र आहे.गानसमय सकाळचा आहे...अर्थात ही वेळ फक्त शास्त्रीय गायन,वादन करणा‌र्‌यांसाठीच आहे.कारण या रागातील जेवढी काही चित्रपट व चित्रपटाबाहेरची गीते,भावगीते,भक्तिगीते आहेत ती सर्वकाळ गोड वाटतात,हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.

           तोडी राग जवळ-जवळ प्रत्येक गायक-वादकाने गायिला-वाजविला असावा.पं.भीमसेन जोशींच्या तोडीतील ताना, मेघांच्या गडगडटाला आव्हान देणार्‌या होत्या.तर प्रत्येक स्वराचे महत्व जाणून त्याचा अतिसुंदर विस्तार किशोरीबाईंच्या गाण्यात दिसून येतो.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला ’मेलोडी’ म्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.

         अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते ’आशिर्वाद’ या चित्रपटातील ’एक था बचपन...’ हे गाणे.त्यानंतर ’भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेल अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग ’अगा करूणाकरा...’ हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच ’पिंजरा’ या चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं ’कशी नशीबानं थट्टा आज मांडली...’हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.’अमर प्रेम’ या चित्रपटातील ’रैना बीती जाए...’ याचा मुखडाही याच रागात आहे.
साबरी बंधुंनी गायिलेली ’अल्ला हे अल्ला...’ ही कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.त्यांनी दुसर्‌या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांना बुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या ’सूफी’ संगीताची ’खरी’ ओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसा प्रयोग अनूप जलोटा यांनी ’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’ या गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.
          माझ्या मते गानसमयापेक्षाही त्या त्या रागातील स्वरांचा उपयोग संगीतकार कशा प्रकारे करतो,गायक-गायिका कशा प्रकारे प्रस्तुती करते आणि वाद्यमेळ कसा जमतो यावर श्रोत्यांची आवड-निवड ठरत असावी.तसे नसते तर तोडी रागातील गाणी सकाळ सोडून इतर वेळी कानाला गोड लागलीच नसती.काही-काही गोष्टी परंपरेने ठरवून-ठरवून डोक्यात भरविल्या जातात त्यातलाच गानसमय हा प्रकार असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.असो...हा वादाचा मुद्दा आहे.

          आपण आज जगजित-चित्रासिंग यांनी तोडी रागात बांधलेली ’मिलकर जुदा हुए तो ना सोया करेंगे हम...’ ही गझल ऐकणार आहोत.या गझलच्या मतल्याची पहिली ओळ मध्य सप्तकातील कोमल धैवतावरून सुरू होऊन मंड्र सप्तकातील निषादावर सुटते.आणि येथूनच पुढे गंमत सुरू होते,ती अशी की निषादावर मुर्छना करून दुसर्‌या पूर्ण ओळीत ’भूप’ रागाची छाया दाखवित पुन्हा कोमल धैवतापासून पहिली ओळ सुरू होते.अशी गंमत प्रबुद्ध संगीतकारच करू शकतो.ऐर्‌या-गैर्‌याचे ते काम नोहे.येथे जगजितसिंग यांच्यातला संगीतकार येथे प्रकर्षाने दिसतो,त्यामुळेच आमचा जीव त्याचेवर जडतो.आणि तो गेल्यावर डोळे भरून येतात.

          या गझलमधील प्रत्येक शेरात (कडव्यात) मतल्यामध्ये (ध्रृवपदामध्ये) न घेतलेला ’पंचम’ स्वर घेऊन एक वेगळी अनुभूती देण्याची योजनासुद्धा अतिशय तरल अशी आहे.तसेच यात पारंपारिक पद्धती प्रमाणे गायकी न दाखविता एकदम ’लाइट मूड’मध्ये जास्ती वाद्यांचा वापर न करता हळुवारपणे दोघांनी ही गझल सादर केली.तालवाद्य घटम,गिटार आणि सेक्सॉफोनचा अतिशय सुंदर उपयोग यात करण्यात आला आहे.विविध प्रकारच्या वाद्यांचा,कोरसचा वापर करण्याचा पायंडा जगजितसिंग यांनी पाडला.पण हे करतांना शब्दांकडे दुर्लक्ष केले नाही.अशा या गुणी संगीतकार,गायकाची ही गझल आपणास निश्चितच आवडेल याची मला खात्री आहे...(कदाचित ही गझल आपण ऐकलीही असेल.)



मिलकर जुदा हुए तो ना सोया करेंगे हम

इक दूसरे की याद में रोया करेंगे हम



आँसू छलक छलक के सतायेंगे रातभर

मोती पलक पलक में पिरोया करेंगे हम



जब दूरियों की आग दिलों को जलाएगी

जिस्मों को चांदनी में भिगोया करेंगे हम



गर दे गया दग़ा हमे तुफ़ान भी क़तील

साहिल पे कश्तियों को डुबोया करेंगे हम





क़तील शिफ़ाई


(खाली दोन VDO दिले आहेत.पहिल्या ’मिलकर...’ आहे.दुसर्‌यामध्ये मध्ये क़ैसर-उल-जाफ़री यांची ’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे...’ ही अनूप जलोटा यांनी गायिलेली,तोडी रागातीलच गझल आहे.ही गझल जलोटांनी गायकी अंगाने विविध विवादी स्वरांचा उपयोग करत-करत अतिशय चांगल्या प्रकारे नटविली आहे.ही सुद्धा आपणास आवडेलच...)

"मिलकर जुदा हुए तो न सोया करेंगे हम..."









’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे...’

Saturday, December 10, 2011

’दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...’




            मिर्झा गालिब यांची ही गझल म्हणजे म्हणजे दर्दी रसिकांच्या काळजातील जीवघेणी कळ आहे,असे मला वाटते.प्रत्येक माणसाच्या मनात दिल--नादाँ तुझे हुआ क्या है...’ ही भावना कधी ना कधी उद्भवतेच.अशा वेळी आखिर इस दर्द की दवा क्या है...’ हा ही प्रश्न उभा राहतोच.उदासलेल्या मनाला ही गझल त्यामुळेच अतिशय जवळची वाटते.या गझलच्या लोकप्रियतेच्या बाबतीत विचार केला तर,हिच्या इतकी लोकप्रियता दुसर्‌या कोणत्या गझलच्या वाट्याला आली असेल असे मला वाटत नाही.चित्रपटांमध्येही या गझलचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.१९४३ मध्ये हंटरवालीकी बेटी’,१९४९ मध्ये अपना देश’,१९५४ मध्ये मिर्झा गालिब’,आणि पाकिस्थानातील मिर्झा गालिबया चित्रपटांमध्ये ही गझल चित्रपट गीतांच्या स्वरुपात अनुक्रमे पुष्पा हंस’,’तलत-सुरैय्याआणि मल्लिका--तरन्नुम नुरजहान यांनी ही गझल गायिली आहे.या व्यतिरिक्त शाहिदा परविन,सुमन कल्याणपुर,परवेज़ मेहदी,जगजित-चित्रा,शुमोना राय बिस्वास,पिनाज मसानी आबेदा परविन आणि मेहदी हसन यांनी या गझलला आपापल्या परीने गायकीचा रंग देवून सजविली आहे.या मध्ये शुमोना राय बिस्वास आणि मेहदी हसन यांनी गायिलेली गझल मला विशेष करून आवडली.शुमोनाची गझल गायकी इतकी सुंदर असतांनाही तिचे नाव रसिकांना पाहिजे त्या प्रमाणात माहित नाही याचे नवल वाटते.तिचा ’dagha-sung by Shumona Roy Biswas' हा अल्बम म्हणजे रसिकांना खरोखरच मेजवानी आहे.ही गायिका इतकी सुंदर गाते की ऐकत राहावे असे वाटते.
          खालील VDO मध्ये शुमोना राय बिस्वास आणि मेहदी हसन यांनी गायिलेली संपुर्ण गझल आहे.शुमोनाची बंदिश पटदीप रागावर आधारित असल्यासारखी वाटते,पण लगेच त्यात इतरही रागांचा उपयोग केल्यामुळे एका रागाचे नाव सांगता येणार नाही.मेहदी हसन यांची बंदिश शुद्ध सारंगया रागात बांधलेली आहे.हा माझा आवडता राग आहे.सारंगाच्या इतर प्रकारापेक्षा हा वेगळाच आहे.याला शुद्ध सारंग का म्हणतात हे ही एक कोडेच आहे.कारण कोणत्याच सारंग प्रकारात न लागणारा तीव्र मध्यमया मध्ये लागतो.या रागाचा गानसमय शास्त्रीय व्याख्येनुसार दुपारचा आहे.पं.जसराजजींनी गायिलेला शुद्ध सारंग मनभावन असून,छोटा ख्याल तर लाजवाबच.संगीतकार ओ.पी.नैय्यर यांनी आशा भोसलेच्या आवाजातील छोटासा बालमा...’या गाण्यात केलेला या रागाचा वापर अवर्णनीय आहे.तसा उपयोग चित्रपट संगीतात अभावानेच आढळतो.या नंतर तसे स्वरशिल्प मेहदी हसन यांनीच उभे केले आहे.त्यातील दोन्ही मध्यमांचा उपयोग तरक्या बात है....!’(याच रागातील हरिहरन यांनी गायिलेली ज़ब्ते ग़म का सिला न दे जाना...’ही गझल रसिकांनी जरूर ऐकावी.म्हणजे शुद्ध सारंगशी आपली मैत्री पटकन होते.)चला तर ऐकू या...दिल--नादाँ......


दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्द की दवा क्या है

हम है मुश्ताक और वो बेज़ार
या इलाही ये माजरा क्या है

मैं भी मुह मे ज़ुबान रखता हूँ
काश पुछो  की मुद्दा क्या है

जबकी तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा अय खुदा क्या है

ये परी   चेहरा   लोग कैसे है
गमज़ा-ओ-इश-आ-ओ अदा क्या है

सब्ज़ा-ओ-गुल कहाँ से आये है
अब्र क्या चीज़ है,हवा क्या है

हमको उनसे वफ़ा की है उम्मीद
जो नही जानते वफ़ा क्या है

जान तुमपर निसार करता हूँ
मैं नही जानता वफ़ा क्या है

मैने माना की कुछ नहीं ग़ालिब
मुफ़्त हात आये तो बुरा क्या है

ग़ालिब / शुमोना राय बिस्वास, मेहदी हसन
,


’दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...’

Saturday, December 3, 2011

"रंज की जब गुफ़्तगू होने लगी..."


           जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाही. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील संगीत, काव्य,चित्रकला हया कलेचे रुप महत्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे.असे क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.
कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न होवून तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. ) आपल्या इंद्रियाद्वारे सौंदर्यास्वाद घेणे. ) आंतरिक अनुभूती ३) त्यात स्वत; हरवणे. यापैकी एका तरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. शब्द, छंद, अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे स्वर, ताल, लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे संगळे कलाकाराच्या आत उर्मी रुपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफ़ड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो,चित्र असो,एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच.

           एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की  , हे अमक्याने निर्माण केले,ते अमक्याने निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहित नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे.शास्त्रीय संगीतातील महत्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही.याचे कारण मी वर लेलेल्या वक्तव्यात आहे.

           आजचा आपला विषय आहे. राग भूप... या रागात पाचंच स्वर आहेत. सा रे ग ध प... सर्व स्वर शुध्द. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पुर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वैगरे वैगरे... परंतू खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफ़िलीतही हा राग फ़ार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायकसुध्दा त्याच्या वाटेला जात नाही. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतू खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या सहेलामुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल आँफ दी व्हँली"तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...

           भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी हरे रामा हरे कृष्णाया चित्रपटातील कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोर कुमार लता मंगेशकर. या रागात स्वरबध्द केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहे त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरब्ध्द केलेले व लताबाईनी गायिलेले भाभी की चुडियाया चित्रपटातील ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भुपाळी सुध्दा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दुर करणारी आहे. भुपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय द्दृष्ट्या सायंकाळचा आहे.तसेच लव्ह इन टोकियोया चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरब्ध्द केलेले आणि लताबाईनी गायिलेले सायोनारा...’ हे गाणे ही याच रागात आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे रिषभावरमुर्छना केली की मधमाद सांरग’, ’गांधारावरमुर्छना केली की मालकौंस’, ’पंचमावरमुर्छना केली की दुर्गाराग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.

           या वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर येणा-या भूपात रंज की जब गुफ़्तगू होने लगी,आपसे तुम तुमसे तू होने लगीही दाग़ यांची गझल गुलामअली गायले आहेत. मतला पूर्णपणे भूपात बांधला आहे. अंत-यातील...काही शेर भूपाला कल्याणाची जोड देऊन इतक्या सुंदर रीतीने सादर केले की तोंडून आपोआपच वाहव्वा निघून जाते. तानांच्या छोट्या छोट्या लडया,वरच्या पंचमापर्यंतची रुपक तालाशी खेळत खेळत केलेली स्वरांची कलाकुसर आपल्याला थक्क करते. सोबतच सुरेल नोटेशनसह विविध प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण तिहाया,विवादी स्वर घेऊन विविध रागाच्या छटा दाखवून वाढवलेली रंजकता,मक्त्यामध्ये केलेले जयजयवंती रागाचे लोभस मिश्रण गुलामलीच्या परिपूर्ण गायकीची ग्वाही देते.या गझल सोबतचा तारिक हुसैन यांचा तबला म्हणजे सोने पे सुहागा...’! असा तबला भारतातील गझलच्या साथीदारांकडून ऐकायला मिळत नाही.यात त्यांनी टाकलेल्या तबल्याच्या विविध विधा,तुकडे,मुखडे आणि वेगवेगळ्या तिहाया हे दुसरे फार मोठे आकर्षण यात आहे.(मी स्वतः १९५८ ते १९६३ मध्ये यवतमाळला पं.दादासहेब पांडे यांचेकडून तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असल्यामुळे तबल्या विषयी लिहू शकलो.) त्यामुळे राग जरी एकच असला तरी पण त्याची विविध रुपे आपल्यासमोर उभी राहतात.मला जर गझल गायन ऐकायला का आवडते ? असा कोणी प्रश्न केला तर, गझलमध्ये काव्य,संगीत आणि ताल या तिन्हीची मजा घेता येतेहे माझे उत्तर राहील....
   
                                                                                
          या गझलचा मतला इतका सुंदर आहे. की उर्दू न जाणणाराही या काव्याच्या मोहात पडेल. पंरतू पुढील शेर कु--कू, दु--दू अशा शब्दांनी भरल्यामुळे आमच्यासारख्या गावरान माणसाच्या टाळक्यात दाग़ शिरत नाही.फ़क्त गुलामअलीच लक्षात राहतो आणि भावतो. तरी पण आपसे तुम, तुमसे तू, होने लगी..." हे मात्र अंतर्मनात कायम रुंजी घालत राहाते. ऐका तर ... रंज की जब गुफ़्तगू होने लगी ......

रंज की जब गुफ़्तगू होने लगी
आपसे तुम,तुम से तू होने लगी

चाहिए पैगामबर दोनो तरफ
लुत्फ़ क्या जब दु--दू होने लगी

मेरी रुसवाई की नौबत आ गयी
उनकी शोहरत कु--कू होने लगी

ना उम्मीदी बढ गयी है इस क़दर
आरज़ू की आरजू होने लगी

अब के मिलकर देखिए क्या रंग है
फिर हमारी जुस्तजू होने लगी

दाग़ इतराते हुए फिरते है आज
शायद उनकी आबरू होने लगी
दाग़




Monday, November 28, 2011

क्या भला मुझको परखने का नतीजा निकला...

          
          मेहदी     हसन खाँ साहेबांनी गायीलेली मुज़फ्फर वारसी यांची ही गझल मी अंदाजे ३५/३६ वर्षांपुर्वी मनसोक्त ऐकली ती सुरेश भटांमुळे.या गझलची बंदिश मालकौंस या सुंदर आणि लोकप्रिय रागात आहे.गायक,वादक,संगीतकार यांचाही हा अत्यंत आवडता राग आहे.बिसमिल्ला खाँ साहेबांनी शहनाईवर वाजविलेल्या मालकौंसाची ध्वनिमुद्रिका आजही सीडी च्या रुपात मंगल कार्यात वाजत असते.बैजू बावरा या चित्रपटातील रफी साहेबांनी गायीलेले "मन तरपत हरि दरशन को आज" हे गाणे आजही टवटवीत आहे.नवरंग चित्रपटातील "आधा है चंद्रमा रात आधी,रह जाए तेरी मेरी बात आधी" आणि "तू छुपी है कहाँ मै तडपता यहाँ" ही गाणीही मालकौंस रागातीलच आहे.संगीत नाटकांमध्येही या रागाचा मुक्तपणे वापर केलेला दिसतो.रणदुंदुभी नाट्कातील "दिव्य स्वातंत्र्य रवी",मृच्छकटीक मधील "तेचि पुरूष दैवाचे" वगैरे-वगैरे."अणुरणिया थोकडा,तुका आकाशाएवढा"हा भीमसेनांच्या आवाजातला अभंग ही त्याची उदाहरणे...असा हा श्रीमंत राग मालकौंस...या रागात सा नि असे फक्त पाचच स्वर लागतात.गांधार,निषाद,धैवत हे स्वर कोमल आहेत.बस्स...पण या पाच स्वरांमधील जादू वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलीच असेल....

         
वरील सर्व गाणी अतिशय कर्णमधुर आहेत यात काही वादच नाही.प्रत्येक संगीतकार,गायक,वादकांनी आपापल्या प्रतिभेनुसार हा राग लोकांसमोर ठेवला.परंतू या सगळ्यांपेक्षा वेगळ्या अंगाने जाणारी बंदिश हे या गझलचे वैशिष्ठ्य आहे.त्यातही अंतर्‍यात केलेली कलाकुसर हृदयाला भिडणारी आहे.या गझलची माझ्या आयुष्यात वेगळी अशी जागा आणि आठवण आहे.सुरेश भटांशी मैत्री झाल्यानंतर त्यांनी मला सर्वप्रथम "हा ठोकरुन गेला" आणि "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही" या दोन गझला मला स्वरबद्ध करायला दिल्या.यावेळी मी आँर्केस्ट्रा सोडून नुकताच आर्णी (जि.यवतमाळ) या खेड्यात संगीत शिक्षक म्हणून रुजू झालो होतो.भरज्वानीचा की काय म्हणतात असा तो काळ होता.१५/२० दिवसानंतर नागपुरला धनतोलीच्या त्यांच्या निवासस्थानी या दोन्ही गझलांना बसविलेल्या चाली ऐकविल्या."ठोकरुन"ची चाल त्यांना आवडली.परंतु "कुठलेच फूल" ला बसवलेली किरवाणी रागातील उडती चाल त्यांना बिलकुल आवडली नाही.त्यांचा स्वभाव तसा अतिशय फटकळ आणि मिश्किल असल्यामुळे ते मला म्हणाले" सुधाकरराव तुमची ही चाल म्हणजे एखाद्या घरंदाज बाईला तमाशात नाचवण्याचा प्रकार झाला आहे!"...त्यांना काय म्हणायचे आहे हे मला क्षणभर समजले नाही.पण काही तरी चुकल्याचे लक्षात आले.माझा गोंधळलेला चेहराबघून त्यांनी एक भली मोठी लोखंडी ट्रंक उघडली,त्यात खच्चून कँसेट्स भरलेल्या होत्या. त्यातल्या / कँसेट्स मला दिल्या.(सुरेश भट त्यांच्या संग्रहातील कँसेट्स आणि पुस्तके कोणालाही देत नसत.या बाबतीतले त्यांचे विचार अतिशय परखड ठाम होते.) परंतू कँसेट ऐकण्याकरीता माझ्याकडे टेपरेकाँर्डर नव्हते.म्हणून त्यांना कोणीतरी भेट दिलेले त्यांच्याजवळचे एकमेव टेपरेकाँर्डर मला दिले आणि गझल गायकीचा अभ्यास करायला सांगितले.ते सगळे घेऊन मी आर्णीला आलो.माझ्यासाठी हा फार मोठा आणि मोलाचा खजिना होता.कारण रेडिओवर त्याच्या मर्जीने लागलेल्या गझला कधी-मधी ऐकणे आणि कँसेटवरून सतत ऐकणे यात खूप फरक आहे.आज इंटरनेटमुळे एका क्लिक वर हवे ते सापडते.तेव्हा मात्र एखादे आवडीचे गाणे ऐकायचे असेल तर दिवसभर रेडिओ कानाला लावून बसावे लागायचे.नशीब की त्या काळात छोटेखानी ट्रांझिस्टर रेडिओ उपलब्ध होते.हे सगळे सांगायचे कारण असे की,यातील मेहदी हसनच्या कँसेटमध्ये कधीकाळी पाकिस्थान रेडिओवरून ऐकलेली काळीज कापणारी आणि सुरावटीचा खूप विचार करायला लावणारी वरील गझल त्यात होती.आम्ही शिकलेलो मालकौंस वेगळा होता आणि हा मालकौंस काही वेगळाच भासत होता.मालकौंस मधील बहुतेक रचना षड्जापासून सुरू होतात.याला काही अपवाद असतीलही पण ठोकळमानाने हा परिपाठ आहे. परंतू या गझलची सुरवात मध्य सप्तकातील लोमल निषादापासून झाली आहे.पुढेपरखनेका या शब्दांसोबतचा स्वरगुच्छ आणिने या अक्षरावरील मध्यमाला घासून जाणारी सम....अरारारारा....................काळजाची चाळणच.....लाजवाब ! पुढेनतीजा निकलावरील तार षड्जापर्यंत जाऊन वापस षड्जावर येणारी सुरावट...माशाल्ला ! आपण ऐका....एक वेगळे स्वरशिल्प आपल्यासमोर येईल.


         
मुज़फ़्फ़र वारसी यांच्या या गझलमधील एक एक शेर जसा दमदार आहे.तसेच खाँ साहेबांचे सादरीकरणही कलदार आहे.अंतर्‍यामध्ये त्यांनी मुर्छना पद्धतीचा अतिशय सुंदर प्रयोग करून सोहनी या रागाचा आभास निर्माण केला आहे.त्या वेळीक्या बात है................’ असे आपसुकच तोंडातून निघुन जाते.वास्तविक पाहता मालकौंस आणि सोहनी या हे दोन्ही राग सगळ्याच बाबतीत परस्पर विरोधी आहेत.दोन्ही रागात एकही साम्यस्थळ नाही.तरी पण हे त्यांनी केले...अगदी बेमालुमपणे.तुम्ही कधी आम्रखंड खाल्ले आहे का ? बस...नेमके तसेच...आम्रखंड खातांना श्रीखंड खाण्याचा आनंद मिळतो.त्यात आमरसाची जी थोडी-थोडी वेगळी चव जिभेला जाणवत राहाते पण नकळत...तसलच काहीतरी हेप्रकरण आहे.ऐकल्यावर त्याची लज्जत आपणास कळेललच......ऐका तर..."क्या भला
..."


क्या भला मुझको परखने का नतीजा निकला
ज़ख्म--दिल आपकी नज़रों से भी गहरा निकला

तोडकर देख लिया आइना--दिल तूने
तेरी सूरत के सिवा और बत क्या निकला

जब कभी तुझ को पुकारा मेरी तनहाई ने
बू उडी फूलसे,तस्वीर से साया निकला

कोइ मिलता है तो अब अपना पता पूछता हूं
मैं तेरी खोज में तुझ से भी परे जा निकला

तिश्नगी जम गयी पत्थर की तरहा होटोपर
डूबकर भी तेरी दरिया से मैं प्यासा निकला


शायर - मुज़फ़्फ़र वारसी
आवाज़ - मेहदी हसन





संगीत आणि साहित्य :