गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, December 31, 2011

"कुठलेच फूल आता मजला पसंत नाही..."





         अबके हम बिछडे तो शायद कभी ख्व्वाबों मे मिले...’ अतिशय तरल काव्य आणि त्याला साजेशी बंदिश,असे फार कमी योग येतात... यालाच दुग्ध-शर्करा योग म्हणत असावे.मला तरूण वयातच या गझलने इतकी भुरळ पाडली पाडली,की आज साठी नंतरही तिचा दरवळ हृदयात दरवळत आहे.या गझलची बंदिश अप्रसिद्ध अशा कोमल धैवत भूपया रागात आहे.हे नाव कोमल रिषभ आसावरीरागाच्या धर्तीवर मी ठेवले आहे. ’भूपरागातील शुद्ध धैवत कोमल केला की हा राग तयार होतो.स्वर आहेत...सा रे ग प सां,सां प ग रे सा.यालाच आपल्याकडे भूपेश्वरी किंवा कृष्णरंजनी असे नाव दिल्या गेल्याचे कुठल्यातरी एका पुस्तकात वाचण्यात आले. त्यावरून मी पं.भातखंडे यांच्या संगीतावरील समग्र ग्रंथांचा धांडोळा घेतला असता कुठेही या नावाच्या रागांचा उल्लेख आढळला नाही.तसेच संगीत कार्यालय (हाथरस ऊ.प्र.) येथून प्रसिद्ध झालेल्या राग-कोषया ग्रंथातही या रागांचा तसेच सुरावटीचा उल्लेख दिसला नाही.या ग्रंथाचे लेखक वसंतअसून संपादन लक्ष्मीनारायण गर्ग यांचे आहे.यात उत्तर व दक्षिण भारतीय ५०० रागांचे संपुर्ण वर्णन आहे.अर्थात एखाद्या नविन सुरावटीला काही तरी नाव द्यायचे म्हणून शिवरंजनीच्या धर्तीवर कृष्णरंजनी,भूपेश्वरी वगैरे वगैरे..शात्रीय संगीतातील.
 विद्वानांनी यातील कोणते तरी एक नाव पक्के करावे,म्हणजे नावा बाबतचा भ्रम राहणार नाही.
         (भूपातील गांधार कोमल केला की शिवरंजनी नामक अतिशय सुरेल, पण शास्त्रीय गायकांना
भूपासारखाच न पेलणारा राग तयार होतो.या रागाचा हिंदी चित्रपटात संगीतकारांनी अतिशय सुंदर उपयोग केला आहे.’ओ बसंती पवन पागल...’,’दिल के झरोखे में तुझको बिठाकर...’,’ओ मेरे सनम ओ मेरे सनम,दो जिस्म मगर इक जान है हम...’,’जाने कहाँ गये वो दिन...’ ही त्याची काही सुरेल उदाहरणे...)

         या रागाची मूळ निर्मिती कुठली ते कळत नाही. मेहदी हसनच्या "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्व्वाबों मे मिले..." या गझलच्या बंदिशीमुळे आपल्याकडे याची लागण झाल्याचे दिसून येते. याचा पहिला बळी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर होय. इतके लोभस स्वर...विव्हल आळवणी करणारे...आणि काळजाला भिडणारे शब्द...अशा जीवघेण्या सुरावळीच्या मोहात न पाडणारा विरळाच...! तर हृदयनाथांनी या रागाच्या सुरावटीचा उपयोग सुरेश भटांच्या...

"मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात लाभला निवांत संग..."


या रचनेकरीता करून, लाताबाईचा मधाळ आवाज घेतला...कलिजा खल्लास...!

           अबके हम बिछडे...’ आणि मालवून टाक...’ शब्द-स्वरांच्या दृष्टीने इतक्या उच्च स्तराच्या होत्या, की त्यानंतर या रागाला भिडण्याचा हिंमत कोणी करेल असे वाटत नसतांनाच अज़िज़ नाज़ाँ या कव्वालाने "चढता सूरज धिरे धिरे ढलता है ढल जायेगा..." या कव्वालीला याच रागाचा स्वरसाज चढवून वेगळे विश्व निर्माण केले.त्या काळात ही कव्वाली आणि अज़िज़ नाज़ाँ कव्वालीच्या क्षेत्रात तळपत होते.गंमत बघा ! स्वर तेच पण गायक, संगीतकार त्याला कशा प्रकारे प्रस्तूत करुन , कसे-कसे
वातावरण निर्माण करू शकतात ते...! ’अबके हम बिछडे...’ आणि मालवून टाक...’ ची तरलता येथे संपून जाते...तरीही ही कव्वाली लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचते.असो...
                                                                                                                                                                           याच दरम्यान म्या पामरानेही प्रयत्न केला.गझल होती...


       "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,
       कळते मला अरे हा माझा वसंत नाही...".


कवी सुरेश भटच...

          या गझलच्या बंदिशीमागची पार्श्वभूमि थोडक्यात सांगतो,कारण त्यामागे एक चांगला,ऐकण्यालायक किस्सा आहे...! या गझलची पहिली चाल मी किरवाणीया रागात जरा उडत्या अंगाने बसविली होती.भटांना ती ऐकविल्यावर म्हणाले,’सुधाकरराव (नविन नविन ओळख असल्यामुळे सुरवातीला ते मला असे संबोधायचे,) तुम्ही एका घरंदाज बाईला तमाशात नाचविले...! मी अवाक...क्षणभर मला काही कळलेच नाही...पण लगेच लक्षात आले की काहीतरी चुकले...माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून भटच म्हणाले, ’सुधाकरराव गझलचा मूड आणि तुमची चाल याचा काही ताळमेळ नाही ना राजे हो,थेच त जमाले पाह्यजे ना "! असे म्हणून त्यांच्या जवळच्या मेहदी हसन,फ़रीदा खानम आणि ग़ुलाम अली अशा तीन ध्वनिफिती,टेपरेकॉर्डरसह दिल्या आणि "याचा अभ्यास करा म्हणजे जमेल" असे उद्गारले..! या प्रसंगानंतर काही महिन्यांनी म्या पामराने केलेली ही बंदिश...! सुरेश भटांना खूप आवडलेली...या वरूनच त्यांनी मला ’महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन’ हा किताब दिला असावा,असे मला वाटते.खरे म्हणजे मेहदी हसन समोर मी ’किस झाड की पत्ती’ आहे,हे मला माहीत आहे.म्हणूनच मी महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन’,’गझलनवाज’,’गझल गंधर्व’ वगैरे उपाध्या नावामागे शक्य तोवर लावत नाही.माझी ’औकात’ मला माहित असल्यामुळे म्हणा किंवा ही मंडळी किती मोठी आहे हे मला कळत असल्यामुळे म्हणा,मला ते आवडत नाही.असो...तर म्या पामराने केलेली ही बंदिश कितपत जमली ते आपण ठरावावे.हे ठरवितांना तिकडे स्वरांचा बादशहा मेहदी हसन....इकडे गानकोकिळा लता मंगेशकर....आणि मी....विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या वीस हजार लोकवस्तीच्या गावातला ,मराठी गझल गायकीची ओळख करून देण्यासाठी सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर वणवणणारा साधा संगीत शिक्षक...हे समिकरण लक्षात घ्यावे.
           आज आपण वरील तीनही रचनांचा आस्वाद घेऊ या...खरा क्रम मेहदी हसन,लता मंगेशकर आणि सुधाकर कदम असा ठेवला होता.परंतू वरील दिग्गजांना ऐकल्यावर सुधाकर कदमांना कोण ऐकणार ? त्यातही ध्वनिमुद्रण ८० च्या दशकातील एका कार्यक्रमाचे...जुन्या कँसेटवरून उतरविलेले... म्हणून क्रम बदलला.प्रथम सुधाकर कदम,नंतर मेहदी हसन आणि शेवटी लता मंगेशकर असा क्रम लावला.(शक्कर की जलेबी खाने के बाद गुड़ की जलेबी कौन खाएगा ? इससे अच्छा पहले गुड़ की जलेबी खिला दो...!) ऐका तर...... पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात (१५ जुलै १९८२) गायिलेली गझल...


"कुठलेच फूल आता मजला पसंत नाही......"


कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही




जमवूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना
इतुका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही




मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही





थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे
रस्त्यास वाहणा-या कसलीच खंत नाही



मी रंग पाहिला या मुर्दाड मैफिलीचा
कुठल्याच काळ्जाचा ठोका जिवंत नाही


संगीतकार,गायक - सुधाकर कदम
गझल- सुरेश भट

(सूचना - मी गायिलेल्या रचना परवानगी शिवाय जाहीर कार्यक्रमात गाऊ नये.)

No comments:





संगीत आणि साहित्य :