गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, February 22, 2024

//विनम्र अभिवादन//

●ना कोणी गुरू ना कोणी शिष्य ●गुरू महात्म्य तर नाहीच नाही ●ना पुष्यामृत योग ना गुरू दक्षिणा ●ना पंचांग ना यज्ञयाग विधी उपास तापास ●ना अवतार ना संचित ना जन्म पूर्वजन्म ●ना शिष्यावळ ना दोरा गंडा ताईत विभूती ●ना संस्थाने जमीनी ट्रस्ट उद्योग ●ना चमत्कार ना फळ आशिर्वाद साधा सरळ सोपा जीवनमार्ग शिक्षण विज्ञानाची कास माणूसपण आणि विवेकाची खाण फाटका असूनही महान समाजसुधारक गाडगे बाबा जयंती

वऱ्हाडी बोलीभाषा दिवस...

अवांतर...____✍️____



     कवी/कवयित्री म्हणजे शब्दरूपी कोळशाच्या खाणीचे मालक/मालकीण. या खाणीतून ते काव्य रुपी हिरा बाहेर काढतात.संगीतकार या हिऱ्याला पैलू पाडून चमकदार बनवतो.आणि संगीत संयोजक आकर्षक असे स्वरांचे कोंदण तयार करून पैलू पडलेल्या काव्यरूपी हिऱ्याला अधिक आकर्षक करतो.ह्या तिघांचे समसमा योगदान असले तर एकूण काम उच्च दर्जाचे होते.एक जरी कमी पडला तर त्याचा दर्जा कमी झाल्याचे दिसून येते.हे आपण हिंदी,मराठी चित्रपट गीते,गझल,भावगीते,नाट्यगीते,भक्तिगीते ऐकताना नेहमी अनुभवतो.काही गीतांचे शब्द सुंदर असतात पण सुरावट चांगली नसते.काही सुरावटी सुंदर असतात पण शब्द इतके चांगले नसतात.तर काही वेळा हे दोन्ही चांगले असले नि संगीत संयोजन चांगले नसले तरी त्या गाण्याची प्रत कमी झालेली दिसते.
       आपलेही तसेच आहे.जन्म झाल्यावर आई,वडील आणि गुरू आपल्याला पैलू पाडण्याचे काम करतात. आपल्यातील कला-गुणांची कदर करणारा योग्य संयोजक जर भेटला तर आपलेही जीवन आनंदी बनून सुकर होते.हे सूत्र सर्व क्षेत्रातील लोकांना लागू आहे.त्यासाठी माणसातील हिऱ्याला आपण हिरा आहो हे कळायला हवे.अथवा त्याला तशी जाणीव करून द्यायला हवी.तसेच पैलू पाडत असतानाच्या वेदना सहन करण्याची शक्ती त्याच्यात हवी.तरच तो चमकदार बनतो. त्यांनतर कोंदणाचा प्रश्न येतो.आणि हाच प्रश्न आयुष्यात महत्वाचा ठरतो.
      अनेकदा खाणीतील हिऱ्याला पैलू न पाडल्या गेल्यामुळे आयुष्यभर कोळसा म्हणूनच आयुष्य काढण्याचे वाटयाला आल्याचेही दिसून येते. याला काय म्हणावे ?
● चार गाणी, चार प्रकार...ऐका... फरक कळेलच.😊
#sudhakarkadamscomposition


 

Wednesday, February 21, 2024

आठवणीतील शब्द स्वर...

   (लेखांक २७)
     ग्रीष्म ठेवलास तू अता, श्रावणास पांघरून जा

       मराठी गझल गायकीच्या सुरवतीच्या काळात #सुरेश_भट  आणि मी महाराष्ट्रात दौरे करत असताना अधून मधून सुरेश भटांची सासुरवाडी असलेल्या सदाशिव पेठेतील पुण्याच्या पंतांच्या गोटातील चिरेबंदी वाड्यात नवोदित गझलकरांच्या मैफली जमायचा.पुण्यातील आजचे नावाजलेले बहुतेक गझलकार त्यावेळी नवोदित होते.आणि गाणारा मात्र एकमेव मी.त्यामुळे माझ्याशी सगळ्यांचीच घसीट असायची.त्यावेळी मी रमण रणदिवे,इलाही जमादार,अनिल कांबळे, प्रदीप निफाडकर,संगीता जोशी,म.भा. चव्हाण वगैरेंच्या गझला स्वरबद्ध केल्या होत्या.कार्यक्रमात पण गात होतो.तो काळच काही वेगळा होता.सर्वजण मराठी गझलने पछाडलेले होते.माझा मुक्काम जरी सुरेश भटांच्या सासुरवाडीला असायचा तरी नाश्ता, जेवण मला बाहेर करावे लागायचे.भटांना बाहेर जेवायची हुक्की आली तर त्यांच्या सोबत एखादवेळी मी सोबत असायचो.त्यामुळे नवोदित गझकारांनी दिलेले निमंत्रण मी अगत्याने स्वीकारायचो.या काळात अनिल,प्रदीपच्या घरचा पाहुणचार मी चाखला आहे.
     माझ्या म.सा.प.च्या कार्यक्रम अगोदर ९ जून १९८२ ला '#गझल_संध्या' या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील पहिला मराठी गझल मुशायरा म.सा. प.ने घडवून आणला होता. अडीच तास चाललेल्या या मुशायऱ्यात तेव्हाचे नवोदित राजेंद्र शहा,ज्योती बालिगा,प्रदीप निफाडकर,सतीश इनामदार,इलाही जमादार,अनिल कांबळे,रमण रणदिवे हे सहभागी झाले होते. समारोप  सुरेश भटांच्या गझलांनी झाला होता. या मुशायऱ्याचे खुमासदार सूत्र संचालन मराठी आणि उर्दू शेरोशायरी पेरत डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी केले होते.
     १५ जुलै १९८२ चा पुण्याच्या महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेला #अशी_गावी_मराठी_गझल हा मराठी गझल गायनाचा संपूर्ण तीन तासाचा महाराष्ट्रातील पहिला ऐतिहासिक कार्यक्रम मी पैसे संपत आल्यामुळे अलका टॉकीजसमोरील हॉटेलमधील सकाळच्या नाश्त्यावर केला.रात्रीचे जेवण त्यावेळचे सहाय्यक पोलीस कमिशनर श्री उत्तरावर यांचेकडे घेतल्याचे आठवते.मुशायरा व गझल गायन या दोन्ही कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी जबरदस्त दाद दिली होती.माझ्या कार्यक्रमा नंतर जवळ जवळ तीन ते चार मिनिट टाळ्यांचा कडकडाट होत होता.ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट व कार्यक्रम अवडल्याची पावती होती.
     या काळापर्यंत वरील सगळे गझलकार एक असल्याप्रमाणे वागायचे.पण जस-जसे नाव होत गेले तस-तसे सर्वजण आपापले वेगळेपण जोपासायला लागले.२००३ मध्ये पुण्याला स्थायिक झालो तेव्हा ही बाब मला प्रकर्षाने जाणवली. म्हणून सगळयांना एकत्र आणण्यासाठी मी #गझलकट्टा  सुरू केला.काही जण सहभागी झाले.काहींना यात फारसे गम्य दिसले नाही.नवोदित मात्र यात रस घेत होते. समीर चव्हाण आणि निषाद कदम आयोजनांसाठी कष्ट घ्यायचे.मुली भैरवी आणि रेणू त्यांना सहकार्य करायच्या.समीर नोकरी निमित्त पुणे सोडून गेल्यावर सर्व (आर्थिक आणि शारीरिक) भार निषादवर येऊन पडला. समीर पुणे सोडून गेल्यानंतर काही महिने आमचा कट्टा चालला.आर्थिक आणि शारीरिक भाराच्या बाबतीत एकपात्री व्हायला लागल्यावर निषादने अंग काढून घेतले.या गझलकट्ट्याचा एक फायदा झाला तो असा की, अनेक नवोदित गझलकारांच्या गझला स्वरबद्ध झाल्या.
गझलकट्ट्याचा नियमच असा होता की,दर महिन्याला गझलकाराने नवीन गझल सादर करायची. व मी काही गझला स्वरबद्ध करून (भैरवी,रेणू,व्हायोलिनिस्ट जांभेकरांची मुलगी श्रद्धा यांच्याकडून) सादर  करायच्या.रेणू,भैरवी लग्नानंतर कानपूर,दिल्ली निघून गेल्या.माझ्या स्वररचना गाऊन घ्यायला कोणीच नसल्यामुळे शेवटी गझलकट्टा बंद झाला.
     तर सांगायचा मुद्दा हा की, पंतांच्या गोटातील वाड्यात जेव्हा एकत्र जमायचे तेव्हा सुरेश भटांच्या गझलांसह महाराष्ट्रातील इतरही नवोदित गझलकरांच्या अनेक गझला स्वरबद्ध केल्या होत्या.त्याच काळात सतीश डुंबरेची एक छोट्या बहरची गझल मी स्वरबद्ध केली होती.अनेक कार्यक्रमात सादरही केल्याचे आठवते.अशाच एका कार्यक्रमातील कॅसेटवर केलेले ध्वनिमुद्रण मला मिळाले.ते आपल्यासमोर सादर करीत आहे. ऐका, आवडल्यास तुमची.नावडल्यास माझी...

छोटी बहर

जायचेच ना निघून जा
सावलीसही धरून जा

ग्रीष्म ठेवलास तू अता
श्रावणास पांघरून जा

का अजून वाट पाहशी
वाट वेगळी करून जा

तो तुझा प्रवेश संपला
रंग तेवढे पुसून जा

ठेच खायच्या वयात तू
नीट उंबरा बघून जा

तबला-विठ्ठल क्षीरसागर #viththalkshirsagar
●headphone or earphone please...
#sudhakarkadamscomposition


 

पद्म श्री सुरेश वाडकरांचे मनोगत...

.  आजीवासन स्टुडिओ,मुंबई, दि.२८ जानेवारी २०२४
    (चर्चा,ध्वनिमुद्रण आणि सुरेशजींचे मनोगत.)








 

ये न ये असे गडे चांदणे...

 खास व्हॅलेंटाईन डे आणि वसंत पंचमी निमित्त मी स्वरबद्ध
केलेली गझलकारा ज्योती बालिगा राव यांची सुरमई भेट...
विशेष म्हणजे गायिका प्राजक्ता सावरकर शिंदेचे पद्म श्री सुरेश वाडकरांसोबतचे हे पहिले युगल गीत आहे.आणि ती सुद्धा सुंदर गायिली.या गझलनुमा गीताचे सुंदर संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले असून मिक्सिंग, मास्टरिंग अजय अत्रे यांनी केले आहे.ध्वनिमुद्रण पंचम स्टुडिओ, पुणे. ऐका तर...

ये न ये असे गडे चांदणे पुन्हा पुन्हा
हो न हो कधी असे जागणे पुन्हा पुन्हा...

का जपून बोलशी ? शब्द शब्द तोलशी ? 
हे असे न व्हायचे  बोलणे पुन्हा पुन्हा...

माझिया मनातला चंद्र मी तुला दिला
का अनोळखी तुझे वागणे पुन्हा पुन्हा...

सांग एकदा मला ही तुझी कशी  कला?
जाळणे पुन्हा पुन्हा. टाळणे पुन्हा पुन्हा...

दुःख जीवनातले काय मी न सोसले?
हे तुझे न सोसवे  हासणे पुन्हा पुन्हा...

बासरी - संदीप कुलकर्णी
गिटार - राधिका अंतुरकर

 
#Sureshwadkar  #सुरेश_वाडकर 

●headphone or earphone please...


 

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक २८)

.                            -हुकलेली संधी-

     पन्नास पंचावन वर्षांपूर्वी एच. एम.व्ही.कंपनीची यवतमाळ जिल्ह्याची डीलरशिप दीपक देशपांडेचा मोठा भाऊ अरुण देशपांडे याच्या 'अरुण रेडिओ' कडे होती.एच. एम.व्ही च्या सर्व ध्वनिमुद्रिका अरुण रेडिओ मार्फत जिल्ह्यात वितरित व्हायच्या.दीपक आमच्या ऑर्केस्ट्रात तबला वाजवायचा.त्या कालखंडात सुगम संगीतावर योग्य प्रकारे तबला वाजवणारा यवतमाळातील एकमेव कलाकार म्हणजे दीपक. ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस संपल्यानंतर कधी-मधी रात्री दिपकच्या माध्यमातून नवीन आलेली एखादी रेकॉर्ड ऐकत बसायचो.'शिवकुमार शर्मा (संतूर), हरिप्रसाद चौरसिया (बासरी), ब्रजभूषण काबरा (गिटार) यांची 'कॉल ऑफ दि व्हॅली'  ही 'लॉंग प्ले रेकॉर्ड' आली असता कितीतरी पारायणं अरुणला कळू न देता आम्ही गुपचूप केली. त्याच कालखंडात माझ्या मुंबई वाऱ्या सुरू होत्या.माझा साळा हेमंत चांदेकर (त्यावेळी लग्न व्हायचे होते,प्रेम प्रकरण सुरू होते.) याला त्याच वेळी (अंदाजे १९७०/७१)  कॅनरा बँकेच्या मुंबई शाखेत नौकरी मिळाली होती. एकदा मुंबईला गेलो असता एच. एम.व्ही.च्या कार्यालयात जाऊन आम्ही (मी आणि हेमंत) यवतमाळचे डीलर 'अरुण रेडिओ' कडून आल्याची थाप मारून ध्वनिमुद्रण ऐकायची इच्छा व्यक्त केली.डीलर म्हटल्यानंतर तेथील अधिकाऱ्याने एका कर्मचाऱ्याला वरच्या मजल्यावरील स्टुडिओत घेऊन जाण्यास सांगितले.स्टुडिओमध्ये  प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेल्या एका बंगाली गाण्याचे ध्वनिमुद्रण होणार होते.त्याची प्रॅक्टीस सुरू होती.आम्ही डीलर असल्याचे हेमंतदांना सांगून स्टुडिओत बसायची परवानगी घेतली.गायिका त्यांची मुलगीच होती.त्यावेळी 'ट्रॅक' पद्धत नव्हती.गायक वादक एकत्र प्रॅक्टीस करायचे.प्रॅक्टीस 'ओके' झाली की ध्वनिमुद्रण सुरू व्हायचे. तर थोड्याच वेळात ध्वनिमुद्रणाला सुरवात झाली.वादकांमधील अकॉर्डियन वादकाच्या चुकीमुळे टेक वर टेक होत होते.मी पण यवतमाळच्या ऑर्केस्ट्रात अकॉर्डियन वाजवायचो.त्यामुळे 'त्या' अकॉर्डियन प्लेअरला जमत नसलेल्या पीसचे नोटेशन माझ्या डोक्यात आले व मी ते सहज वाजवू शकलो असतो.'मी वाजवून बघू का' असे विचारायची उत्कट इच्छा झाली होती.पण  रिटेक मुळे त्रस्त झालेल्या हेमांतदांच्या त्रस्त चेहऱ्याकडे पाहून विचारायची हिंमत झाली नाही.त्यांच्या समोर मी बच्चा होतो.शेवटी एकदाचे ध्वनिमुद्रण संपले व आम्ही तेथून निघून आलो.बाहेर आल्यावर  बोलत बोलता  हेमंतला म्हटले, अकॉर्डियनचा 'तो' पीस मी सहज वाजवू शकलो असतो'. त्यावर हेमंत म्हणाला 'तू तिथेच का बोलला नाही.मी तशी विनंती हेमंत कुमार यांना केली असती.अरे,हे जर तू केले असतेस तर कदाचित तुझ्या मुंबईतील कामाची सुरुवात झाली असती.' पण माझ्या भिडस्त स्वभावामुळे म्हणा किंवा आपल्याकडून दुसरा कलाकार अपमानित होऊ नये या विचाराने म्हणा माझी एक संधी हुकली.


 

Friday, February 2, 2024

●दुःख माझे देव झाले●


     याच काळात गझलगायक सुधाकर कदम आणि त्यांची तबल्यावर साथ करणारे शेखर सरोदे यांची भेट झाली. शब्द, छंद, सूर आणि ताल यांची घट्ट मैत्री जमली. सुधाकर कदम सालाबादप्रमाणे नवरात्रात माहूर गडावर हजेरी लावायला जाणार होते. दुर्धर आजाराने अपंगत्व आलेल्या माझ्यासारख्याला गड चढणे अशक्य होते. पण म्हणतात ना! मित्र आणि आत्मविश्वास काहीही करू शकतो. सुधाकर आणि शेखर यांनी त्यांच्या हाताची पालखी केली. मला बसवले आणि आम्ही मैत्रीचा माहूर गड सर केला. रेणुका मातेच्या चरणी पोहचलो. गड चढायला सुरुवात करतानाचे दुःख, शिखरावर पोहचता पोहचता देव झाले होते. भावना शब्दबद्ध झाल्या- ‘दुःख माझे देव झाले’.  पुढे हीच गझल सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केली. त्यांच्या हरेक गझल मैफिलीत ती आवर्जून गायली जायची. त्यांच्या १९८२ मध्ये आलेल्या 'भरारी' शीर्षकाच्या कॅसेट मध्ये ती समाविष्ट केली गेली. पुढे ही गझल 'लोकमत' च्या रविवार पुरवणीत १२ ऑगस्ट १९८४ ला प्रकाशित झाली. माझ्या गझलेचा प्रवास चिंतनातून लेखन, लेखनानंतर प्रकाशन, आणि त्यांचे गायन असा संथ गतीने सुरू होता. वाचल्या जाणारी गझल आता गुणगुणल्या जाऊ लागली होती. 
सुधाकर कदमांचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी गझल गायनाचे कार्यक्रम होत होते. आता नागपुरातील धनवटे रंगमंदिर गाजवावे अशी त्यांची इच्छा होती. योग जुळून आला. दिनांक १५ जून १९८४ ला धनवटे रंगमंदिरात भारदस्त आवाजाचे धनी सुधाकर कदम यांनी सूर लावला- 

'दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
आरती जी गात आहे तीच माझी वेदना'
(गझल ऐकण्यासाठी लिंक 
https://youtu.be/DBcwSSSmbw0 )
आणि माझ्या ‘दुःखाचा देव’ मराठी माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात विराजमान झाला. ‘तरुण भारत’च्या ‘मध्यमा’ पुरवणीत या मैफिलीचा वृत्तांत वामन तेलंग यांनी सविस्तर लिहिला. 
सुरेश भटांच्या गझलेसोबत माझीही गझल गायली जात आहे याचे समाधान होते.
□ श्रीकृष्ण राऊत

●२०२१ च्या 'नायक' दिवाळी अंकातील श्रीकृष्ण राऊतांचा लेख...
..........................................................................


 





संगीत आणि साहित्य :