गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, April 27, 2012

सध्याचे पुणे लोकमतचे संपादक अनंत दीक्षित यांनी १९८२ मधील कोल्हापूरच्या मैफलीचे केलेले समीक्षण...



       स्वरांचे चांदणे,चांदण्यांचे स्वर... अनंत दीक्षित.

     यवतमाळ जिल्यातील आर्णी या गावातले सुधाकर कदम हे एक गाणारं झाड आता हळू हळू महाराष्ट्रात पसरू लागलं आहे.सुरेश भटांची गझल मुळातच एक लावण्य असलेली गझल आहे.त्यांच्या गझला जेव्हा सुधाकर कदम सादर करतात तेव्हा चांदण्यात चांदणे साडावे तसा एक आगळा मोहोर सभागृहात पसरत जातो.
     कोल्हापूरच्या मिड टाऊन रोटरी क्लबच्या वतीने ही गझल मैफल परवाच शाहू स्मारक भवनात झाली.कदम तसे कोल्हापूरला आता नवे नाहीत.सुरेश भटांबरोबर गेल्या महिन्यातच त्यांनी एक मैफल रंगविली होती.त्यावेळी जे अतृप्त होते त्यांचे "मागचे जुने देणे,टाळणे बरे नाही",या भावनेने रोटरी क्लबने हा कार्यक्रम केला होता.
     मराठी गझल गायनाचा एक संपुर्ण कार्यक्रम तसा नवाच आहे.गझलच्या सर्व पायर्‍यांवरील अमृतांची फुले श्रोत्यांपर्यंत पोहचविणे हे एक कसबच असते.त्या दृष्टीने कदम यांची मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे. 
     उत्तरेकडे जेव्हा मुशायरे होतात तेव्हा हजारो माणसे गझलच्या स्पंदनाचे माधुर्य लुटतात.त्यांचा अदम्य उत्साह कधी-कधी सकाळीच चंद्र घेऊन येतो.या अर्थानं मराठी माणूसही रसिकतेच्या बाबतीत कमी नाही.मराठी माणूसही कोठेही,कधीही कलदार असाच आहे,त्यामुळे या अनोख्या कार्यक्रमाचे चांगले स्वागत होते.
     गायकीतलं फारसं कळत असो वा नसो सुरेश भट यांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे सूर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येते.एकदा ही गझल तुमच्या मनात थुयी थुयी नाचू लागली की तुमच्यात एक लाजवाब पिंगा सुरू होतो.
      "मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली
      हाय, लाजणार्‍याने जागणे बरे नाही..."

]यासारखी मुलायम गझल हे कदम यांच्या अदाकारीचे वैशिष्ट् घेऊनच येते.किंवा

      "लागले वणवे  इथे  दाही दिशांना
      एक माझी आग मी विझवू कशाला..."

या सारखी अनामिक चिंता तुम्हाला गहराईत नेऊन सोडते.

      "हेच का स्वातंत्र्य ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले
      हेच का ते स्वप्न ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले..."

सुरेश भटांचा प्रश्न कदम यांच्या सुरातून आकार गेऊन येतो.शब्दातून आलेला आकार मुळात भक्कम आहे.त्यावर साजही तेवढाच भक्कम आहे.
     गझलतज्ञ किंवा गायकीचे तज्ञ कदम यांच्या कार्यक्रमातील वजा-बाक्या मांडू शकतील.तशा जागाही असतील.परंतू एक नवा सूर आज गझलसाठी येतोय ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे.तरीही अगदी अनोख्या माणसालाही एक कुणकुण लागते.हा कार्यक्रम आणखी आखीव व्हावा.सातत्याने त्यावर मेहनत घेतली आहे,याच्या स्पष्ट खुणा दिसायला हव्यात.साचेबंदपणाचा धोका टाळायला हवा.
     या मैफिलीच्या इतर अंगांचा विचार केला नाही तर ते अन्याय्य होईल.सर्वप्रथम तुमच्या मनात घर करते ते ती लतीफ अहमद यांची सारंगी.रिमझिम बरसात होत असताना मोराचं नृत्य जसं रोमांचकारी असतं तसं या मैफलीत लतीफ अहमद यांची सारंगी रोमांचकारी आहे.नक्षत्रांनी जागा पकडाव्यात तसे त्यांचे सूर कानात जातात.
     दुसरे आहेत तबला वादक शेखर सरोदे.या माणसाचा जन्मच तबल्यासाठी झालाय असं दिसतं.तबल्यातून एक एक मोहक सौंदर्य बाहेर काढण्याचं कसब आहे.त्यात हिसके आहेत,भोवरे आहेत,लपंडाव आहे आणि बरंच काही.त्यांच्या बोटांची किमया अजब आहे.जागा रिकामी दिसली की तबला आणि सारंगीची या मैफलीतली झूंज अफलातून आनंद देणारी आहे.

दै.सकाळ
कोल्हापुर
१६ ऑगष्ट १९८२


Tuesday, April 24, 2012

स्वर-लयीचा गुलमोहर : सुधाकर कदम...राम जोशी



स्वर-लयीचा गुलमोहरसुधाकर कदम 

 (गांधर्व संगीत विद्यालय (आर्णी,जि.यवतमाळ.) रौप्य महोत्सव विशेषांक १९९९ मधून साभार...)



          सुधाकर कदम म्हणजे संगीतानंदात रममाण झालेलं व्यक्तिमत्व. त्यांनी संगीताच्या प्रांगणात सुरू केलेल्या कार्याला पंचवीस वर्षे एवढा दीर्घ कालावधी लोटला, म्हणजेच हे रौप्य महोत्सवी वर्ष. त्या निमित्त त्यांचा गौरव व विविध कार्यक्रम केले जात आहेत ही गोष्ट आनंददायी आहे़.संगीताच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा हा गौरव करणं हे समजपुरुषांच कर्तव्य आहे़. त्या निमित्त त्या व्यक्तिच्या कार्यकर्तृत्वाचेसिंहावलोकन होत असते, त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते, मार्गदर्शन होत असते़,
मी कोल्हापुर सारख्या, विदर्भापासून खूप दूर असलेल्या गावी राहणारा. पण त्यांची भेट-सहवास काही काळापुरताच लाभला़. पण तेवढ्या थोडक्या सहवासांनी आम्ही मनोमनी एकत्र आलो व दोघांत निखळ मैत्री निर्माण झाली़. 
       त्याचं असं झालं, सुमारे १२/१४ वर्षापूर्वी कवीश्रेष्ठ सुरेश भटांच्या कविता-गझल सादर करण्यासाठी कदमांनी महाराष्ट्र पादाक्रांत केला. त्यावेळी त्यांचा कार्यक्रम कोल्हापुरला रसिकांच्या उपस्थितीत झाला.मलानिमंत्रण होते़. कार्यक्रम चांगला झाला, मी चांगलाच प्रभावित झालो़.
सुरेश भटांच्या गझलांची नवलाई, अनुरूप स्वर रचना व खास पध्दतीची पेशकश. तशात तबल्याच्या साथीला शेखर सरोदे तर सारंगीवर लतीफ अहमद खांसाहेब़. असा अनोखा सांगितिक योग जुळून आला़. पुढे पुढे जाऊन ओळख करुन घेणे हा माझा स्वभाव नसल्यामुळं भेट घेतली नाही. पण हा कलाकार आणि त्यांनी गायिलेल्या गझला मात्र मनात कायमच्या घर करुन राहिल्या़. ‘या नवा सूर्य आणू चला यार हो / सूर्य केव्हाच अंधारला यार हो’ हे हृदयाला भिडणारं भटाचं विद्रोह काव्य. ‘चेहरा गुलाबान झाकणे बरे नाही’ ही हळुवार - मलमली गझल. यांच्या प्रेमातच पडलो़. ह्या कलाकाराची भेट व्हावी असं मनोमनी वाटायचं आणि तसा योग जुळून आला. सुमारे एक तपानंतर; शिवाजी विद्यापीठ-संगीत विभागात मी मानद अध्यापक म्हणून काम करीत होतो़. गेल्यावर्षी सुगम संगीतासाठी कदमांची चार दिवसांची कार्यशाळा ठेवली होती. त्या चार दिवसांच्या छोट्या कालावधीत आम्ही एकत्र आलो, खूप गप्पा गाणी बजावणी झाली व बर्‍याच दिवसांची मनातली इच्छा पूर्ण झाली़. स्नेहाचे भावबंध निर्माण झाले़. कदमांनी घरगुती कार्यक्रमात अनेक भावगीते, गझला मनसोक्त ऐकविल्या. त्यांच्या स्वररचना व त्यांचे सादरीकरण यांचा प्रभाव होताच तो अधिकच वाढला़ .त्यांच्या स्वररचना वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक असल्यानं त्याबाबत लिहावं अस सारखं मनात यायचं.तो योग रौप्य महोत्सवानिमित्त आला हा माझ्या दृष्टीने सुयोग आहे, भाग्ययोग आहे़.
     सुधाकर कदम हे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे़ ते शास्त्रीय संगीत गायक आहेत. संगीत शिक्षक आहेत. समाजकर्ते आहेत. लेखणी बहाद्दरही आहेत. पण त्यांचा माझा जो संबंध आला तो सुगम संगीत स्वररचनाकार व गायक म्हणूऩ. त्यामुळे तद्विषयक त्यांच्या रसिल्या सांगितीक व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्ऩ.
सुगम संगीत हा संगीताचा एक अनुपम व मनोहारी असा प्रकाऱ. नाव जरी सुगम असलं तरी जाता जाता सहजी आत्मसात करावं इतकं ते खचितच सुगम नसतं. उलट दुर्गमच असतं. शब्दप्रधान गायकीच्या ह्या प्रकाराला शब्द हे प्राणतत्व तर स्वर हे माध्यम़. त्याला घाट येतो तो ताल-लयीमुळं. इथं शब्दांसाठी स्वर पायघड्या घालतात. साहजिकच पहिला मान काव्याचा. (पर्यायानं कवीचाही.) त्यातल्या आशय, भाव-भावना श्रोत्यांपर्यंत पोहचविणं हे कार्य संगीताचं असतं. गीताच्या आशयाचीअभिव्यक्ती संगीतातून होणं अपेक्षित असतं. किंबहुना काव्य बोलतं करणं हे संगीतकाराचं काम. यासाठी सुगम संगीतात काव्याचा आशय-विषय व भावना याची उत्तम जाण स्वररचनाकाराला असणं जसं आवश्यक,तितकंच महत्व काव्यानुकूल संगीत रचनेला; म्हणजेच चाल लावण्याला असतं. सुधाकर कदम हा काव्याची उत्तम जाण असणारा संगीतकार असल्यानं ते कवितेला अत्यंत पोषक व समर्पक असा स्वरसाज चढवून प्रत्येक कविता आपल्या संगीत रचनेनं श्रीमंत करतात. ते स्वतः कवी असल्यामुळे ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ ह्या उक्तीला साजेसं स्वरचातुर्य त्यांच्याकडे आहे़.
शास्त्रीय संगीताचे व्यासंगी साधक असल्यामुळे कदमांच्या स्वररचनेचा पाया हा राग/रागिणीवर आधारीत असणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांच्या स्वररचना भारदस्त व दर्जेदार वाटतात, त्या चीप पॉप्युलॅरीटीच्या कॅटॅगिरीतल्या नव्हेत़.
स्वररचनेसाठी त्यांनी अनेक राग/रागिण्यांची मुक्त हस्त चंदनी बरसात केली आहे़. शेकडो कवितांना स्वरांच्या चांदण्यांत न्हाऊ घातलं आहे़. तथापि जागेच्या मर्यादेचं भान ठेवण्यासाठी काही निवडक गाणी व स्वररचनांचा आस्वाद घेणं रास्त ठरेल़.
यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़.
कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़.

‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी प्रिये तुझ्याच साठी’

दादर्‍यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़.

‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो,
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’

ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज्‌ सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़.
          संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़.
संगीतकार हाच खर्‍या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़.
‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’ हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़.
प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या ‘जवळ येता तुक्या दूर सरतेस तू / ऐनवेळी अशी काय करतेस’ तू ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्‍याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़.
‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं.
सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्‍या आहेत म्हणूनच त्या भावतात़.
कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़.
एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती. निर्मळ आनंद देणारी हमी़. तसं पाहू गेल्यास प्रत्येक संगीतकार अशी गोड फसवणूक करीत असतो़. कारण त्याचा स्वतःचा असा एक बाज असतो.लाडका स्वर समुह असतो. आणि तो बहुसंख्य चालीत डोकावतोच़ किंबहुना त्यामुळेच संगीतकार कोणते आपण ओळखत असतो़. तीच त्याची ओळख असते. हा नियम जवळ जवळ सर्वच संगीतकारांना लागू असतो. असं थोडसं धाडसी विधान इथे नोंदवितो़. ह्या सर्व बाबी मिळूनच त्याची स्टाईल बनत असते. सुधाकर कदमांची सुद्धा अशी एक खास स्टाइल आहे. पण त्यात कोणा जानेमाने संगीतकाराची नक्कल किंवा अनुकरण नाही. त्यांचा बाज हा खुद्‌द त्यांचाच बाज आहे हे विशेष.आणि तो अस्सलही आहे़.
‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही/ चेहरा गुलाबानं झाकणे बरे नाही’, आली हांसत आली पहाट़... मेंदी भरल्या’, ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची, तापलेल्या अधीर पाण्याची’, ‘सूर्य केव्हाच अंधारला यार हो’ ह्या चारही गझला वेगवेगळ्या भाव-भावनांच्या. प्रत्येक गझल अत्यंत रसरशीत आहे़. सर्वच चाली प्रामुख्याने भूप ह्या लोकप्रिय रागांत बांधल्या आहेत. पण प्रत्येक स्वररचनेत मनोहारी वैचित्र्य व काव्याला पूर्ण न्याय दिला गेलाय़. पैकी ‘हे तुझे अशा वेळी’ ही तर मास्टर पिस रचना मानावी लागेल़. माझी स्वतःची तर ही अत्यंत प्रिय रचना आहे़.
यमन प्रमाणे ह्या चारही रचनांत भूप रागाच्या अनेक सौंदर्यस्थळांचं मुक्त व डोळे भरुन दर्शन घडतं. मोरांनी सप्तरंगी पिसांचा रंगीबेरंगी पिसारा फुलवावा त्या प्रमाणे भूप रागाचा भरगच्च फुलोरा सुधाकर कदमांनी विलक्षणरीत्या फुलविला आहे़.त्यांत यमनच्या निषादचा केलेला सुखद उपयोग, शब्दांची केलेली फेक, गझलच्या अंगानी केलेली गायकी हे सर्व सविस्तर लिहिणं म्हणजे तो एक स्वतंत्र लेखाचा किंवा भाषणाचा विषय आहे़, म्हणून इतकाच स्पर्श इथे पुरेसा आहे़.
यमन, भूप ह्या सर्वसामान्य लोकप्रिय रागांचा चातुर्यपूर्ण उपयोग करून कदमांनी सुंदर सुंदर रचना दिल्या. त्यातील सौंदर्यकण, सौंदर्य स्थळे निर्देशित करण्याचा प्रयत्न केला़. ह्याखेरीज इतर अनेक रागांत त्यांनी अशाच विपूल रचना मासिकांना दिल्या आहेत़ त्या सर्वांचा रसास्वाद इथे नोंदविणे शक्य नाही.तरी ‘आज मी जे गीत गातो’ ‘आम्ही असे दिवाणे’ किंवा भूपश्री मधील ‘कुठलेच फुल आता’ आणि शिखर अध्याय म्हणजे ‘रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा’ ही सुरेश भटांची खास गझल ह्या सर्वच गीत व गझलांना कदम यांनी अत्यंत सुरेल चाली देऊन सुधारसपान घडविले आहे़.
संगीत रचनाकार, स्वतः गायक असणं हे भाग्याचं लक्षण. कारण तो आपल्या हृदयात घर करून राहिलेली चाल खर्‍या अर्थी समर्थ गळ्यातून श्रोत्याच्या हृदयात पोचवितो. त्या अर्थानं कदमांच्या रचनाच भाग्यवान म्हणाव्या लागतील़ कारण सुधाकर कदम हे स्वतः मुलायम आवाजाचे, शब्दार्थानुसार गाणी प्रभावीरीत्या सादर करणारे गायक असल्याने त्यांच्या चाली व काव्यांचं सोनं होतं. नेमक्यावेळी नेमक्या शब्दावर जोर देणं, जरूर तिथं हळुवार शब्दस्वर उच्चार, प्रसंगी स्वरांचा जोरदार लगाव, स्वरांवरील न्यास, ठेहराव ह्या द्वारे ते आपलं गायन अत्यंत प्रभावी करतात़. ताल व सुरांवर त्यांचा चांगलाच काबू आहे़. तालाच्या अंगानं सुरेख गीत मांडणी करतात़.
शास्त्रीय संगीताचा अभ्यास, रियाज व आवाज कमविला असल्यामुळे गाण्यातील भारदस्तपणा सहज नजरेत भरतो़. सुगम संगीत गायक/गायिका स्वतः हार्मोनियमवादक असेल तर दुधात साखर असा योग असतो़. वर्ज्य, विकृत, अशा बर्‍याचशा स्वरांना काबूत ठेवण्यासाठी व इन्स्टंट स्वर बदल करण्यासाठी हार्मोनियम अत्यंत उपयुक्त असते़. सुधाकर कदमांचा हार्मोनियमवरचा हात अत्यंत तयार व सॉप्ट आहे. गायनाच्या रंगतीत त्यामुळे निश्चितच भर पडते़. कडव्यामधील म्युझिक पिसेस (इंटरल्युट) ते उत्तम प्रकारे वाजवितात़ त्या रचनाही मेलोडीयस असतात़.
गायन करताना स्वर आलापी, स्वर विस्तार व सरगमचा रास्त वापर ह्या बाबी गाणं नटविण्या-सजविणार्‍यासाठी हव्यातच़. कदमांची सरगम मांडणी बहुत खुबसुरत असते. वानगी दाखल ‘गरे निरेपगरेसा निध धनि सागमग मपधधनीध मपमपग, गपगरेसारे, निरेमगरे निसा’ ही सरगम पहावी़.
असे हे सव्यसाची संगीतकार गायक सुधाकर कदम हे विदर्भाचं एक भूषण आहे़. नाटक आणि संगीताचं विदर्भाशी फार पूर्वीपासूनच स्नेहनातं आहे़. अनेक मान्यवर कलावंत ह्या भूमीनं महाराष्ट्राला दिले़.
पंचवीस वर्षांची दीर्घकालीन संगीत वाटचाल कदमांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे़. अर्थातच हा प्रवास खाच खळग्यांनी, वेडवाकड्या वळणांनी, प्रसंगी काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ करणारा असून सुद्धा हे सर्व अडथळे धीरोदात्तपणे पार करणार्‍या सुधाकर कदमांच्या हातून आणखी सुंदर सुंदर चाली निर्माण व्हाव्यात. त्यांची संगीत सेवा अशीच अखंड सुरू रहावी, अशा शुभेच्छा ह्या प्रसंगी मी माझ्या ह्या मृदू स्वभावाच्या व माणसासाठी आसुलेल्या मित्राला देतो़. तत्पुर्वी मनातील एक खंत नमुद करतो, भले विदर्भाने ह्या कलाकाराचं भरपूर कौतुक केलं असेल पण उर्वरीत महाराष्ट्रात ह्या कलाकाराला त्याच्या योग्यतेप्रमाणं प्रोजेक्ट केले गेले नाही. प्रथितयश गायक/गायिकांनी अभिमानाने गावी अशी त्यांची स्वररचना असूनही हे कां घडलं नाही हे एक कोडं आहे.

*********************************************************************************
अँडव्होकेट राम जोशी
 गायक नट,संगीत समीक्षक
१ जानेवारी १९९९
पुष्पक १४ वी गल्ली, राजारामपुरी-४१६ ००८ कोल्हापुर फोन नं ५२४६६२
*********************************************************************************

यमन रागातील एक लाइट मूडचे अनिल कांबळे यांचे गीत...

जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू 
ऐन वेळी असे  काय  करतेस तू...


Saturday, April 21, 2012

’...फिर पानी दे मौला’

    ’...फिर पानी दे मौला’ 
     
          उर्दू गझल मध्ये स्वररचनेच्या बाबतीत जगगजितसिंग यांनी जेवढे प्रयोग केले तेवढे आपल्या देशात कोणीच केले नाही.आणि त्यामुळेच जगजितसिंग यांची कमतरता भारतीय रसिकांना सतत जाणवणार आहे.मियामल्हार सारखा वर्षा ऋतुमध्ये गायिल्या जाणार्‍या रागात पाण्यासाठी अल्लाह ची करूणा भाकण्याचे काम जगजितच करू जाणे.  शास्त्रीय गायकांना जो परिणाम साध्य करण्याकरिता आलापी,बडाख्याल ते छोटा ख्याल इतके सव्यापसव्य करावे लागते ते न करता  कोरसने करून रसिकांना तो परिणाम देणे हे एर्‍या-गबाळ्याचे काम नोहे. यात मी शास्त्रीय गायकांना क्मी लेखतो असा गैरसमज कोणी करून घेऊ नये.कारण मियामल्हारमधील छोटा ख्याल सुरू झाल्यानंतर भीमसेनजींच्या विजेच्या गडगडासारख्या कडकणार्‍या ताना आणि स्वरांचे बेहेलावे एखाद्या धबधब्याखाली बसल्यावर अंगावर पडणार्‍या जलप्रपाताप्रमाणे चिंब-चिंब करून टाकायचे.पण तेथे चिंब होण्याकरीता ’चातक’ बनून वाट बघावी लागायची.येथे मात्र एकदम बरसातच...
          ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल मेहदी हसन यांनी मियामल्हार मध्येच त्यांच्या ढंगात पेश केली.तिचाही बाज वेगळाच आहे.या दोन्ही गायकांची खासियत म्हणजे त्यांचा खर्ज.मंद्र सप्तकातील त्यांची कारागिरी सरळ हृदयाला भेदून जाणारी जाणारी आहे.मग जगजित यांचे ’फिर पानी दे मौला’ असो की मेहदी हसन यांचे’मुझसे खफा हो बैठा’ असो...
          चित्रपटांमध्येही या रागाचा तुरळक प्रयोग झालेल आहे.वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं,वाणि जयराम यांनी गायिलेल ’बोल रे पपीहरा..’ हे गाण अतिशय सुंदर आणि लोकप्रिय झालेलं गाणं...परंतू मला मन्ना डे यांच्या प्रायव्हेट अल्बमधील ’नाच रे मयूरा...’हे गीत अतिशय आवडलं.
           आज आपण जगगितसिंग यांनी गायिलेली निदा फाज़ली यांची ’गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला’ ही गझल ऐकू या...यातील व्हायोलिन आणि बासरी या दोनच वाद्याचा वापर हे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.त्यातल्या त्यात व्हायोलिन तर थेट भिडणारेच...तसेच नेहमीचा केरवा ताल येथे वेगळ्या पण गझलेला पूरक पद्धतीने शब्दांसोबत चालत (ठुमकत-ठुमकत) आपल्या समोर आलेला दिसून येतो.हे ही जग्गूभाईंचे वैशिष्ठ्य आहे...
             याच रागातील मेहदी हसन यांनी गायिलेली  फरहत शहज़ात यांची अतिशय सुंदर अशी  ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल ज्यांना रागविस्ताराच्या आलापासह (Live) ऐकायची असेल त्यांनी माझ्या www.gazalgazal.blogspot.com या blog ला भेट द्यावी. 


"...phir paani de maulaa" 

garaj baras pyaasi dharati par phir paani de maulaa
chidiyo ko daane, bachcho ko gud_dhaani de maulaa


do aur do kaa jod hameshaa chaar kahaan hotaa hai?
soch-samajh vaalo ko thodi naadaani de maulaa


tere hote koyi kisi ki jaan kaa dushman kyo ho
jine vaalo ko marane ki aasaani de maulaa


phir murat ke baahar aakar chaaro or bikhar jaa
phir mandir ko koi mira divaani de maulaa
  

phir roshan kar zahar kaa pyaalaa, chamakaa nayi salibe
jhutho ki duniyaa me sach ko taabaani de maulaa


 Nida Fazli

Tuesday, April 17, 2012

बातचित "Katyanchi Makhmal"... on 94.3 Radio One with MJ Suhrud — गझल गंधर्व Sudhakar Kadam के साथ |

रेडिओ वन वरील एमजे सुहृद यांनी घेतलेली ’काट्यांची मखमल’ या मराठी गझल अल्बम वरील मुलाखत...भाग १ 
गायक-सुरेश वाडकर,वैशाली माडे

Tuesday, April 10, 2012

जवळ-जवळ ३० वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील कवी-गायक-वादक कलावंतांना घेऊन तयार केलेलं हे वर्‍हाडी गीत आपल्या सेवेत सादर करीत आहे...



सांगु कशी राया तुले नाही वाचता ये मले
आलं पतुर तुह्य तं आता दाखवू कोनाले ?

नाही शायेत मी गेली नाही कवाच शिकली
आता पटलं बाइ व मी तं खरच फसली
आता आठोनीत काय मन उगिच हे भुले !

वाटे माही मले लाज, सिक्सनंच खरा साज
चुकी झाली जरी माही जाइन सिकाले व आज
जवा येइन वाचता, सुख वाटन जिवाले...

जवा सिकीन मी साया तोह पतुर रे राया
मी त वाचीन यकली फुलारून येइ काया
निर्‍या इचारान बाइ, मन भलकसं फुले

गायिका-वैशाली पुल्लीवार
गीत-शंकर बडे
संगीत-सुधाकर कदम

*शब्दार्थ*
मले=मला
पतुर=पत्र
शायेत=शाळेत
आठोनीत=आठवणीत
सिकाले=शिकायला
जवा=जेव्हा
साया=शाळा
तोह=तुझं
यकली=एकटी
निर्‍या=फक्त
इचारान=विचाराने

"काट्यांची मखमल" या माझ्या मराठी गझलच्या अल्बम मधील ’गंमत आहे...’ या सुंदर गझलचा काही अंश..





संगीत आणि साहित्य :