गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, November 26, 2018

दि.१३.११.२०१८ ला 'मौनी'च्या प्रकाशन प्रसंगी मित्रवर्य प्रशांत पेंडसे यांनी सादर केलेला स्लाईड शो...

सूत्र संचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर

शुभेच्छा-अनुराधा मराठे....



'चकव्यातून फिरतो मौनी'....

Ashish Jadhao
प्रा. श्रीकृष्ण राऊत यांची ही पोस्ट वाचल्यानंतर सुधाकर कदम यांच्याविषयी, त्यांच्या आठवणीविषयी लिहिण्याचा मोह आवरत नाहीये. मला वाटतं, मराठी गझलगायक म्हणून सुधाकर कदमांचं मोठेपण मांडण्याची हिच वेळ आहे. ही बाब खरीच आहे, सुधाकर कदम यांना पाहिजे तशी संधी आणि प्रसिद्धी त्यांच्या गायनकलेच्या किंवा सृजनशीलतेच्या काळात विदर्भात आणि तिथून मुंबई-पुण्याकडं मिळाली नाही.
- [ ] मी साधारणत: आठ वर्षांचा असेल १९८१ मध्ये खामगावच्या घरी सुधाकर कदमांची मैफल झाली. ती मैफल आणि ते दोन दिवस मला आजही लक्षात आहेत. माझ्या वडिलांचे (बी.एल.जाधव) मित्र म्हणून सुधाकर कदम, त्यांच्याबरोबर वडिलांचे लहान भावासारखे असलेले कवी कलीम खान(ज्यांच्या आर्णीच्या घरातला माझा आणि आमच्या खेड्यातल्या घरातला त्यांचा जन्म), कवी श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि शेखर सरोदे(ॲड. असीम सरोदेचे काका) असे सगळे दोन दिवस आमच्या घरी मुक्कामी होते. रात्री मैफल झाली. कदाचित ती माझी ऐकलेली पहिली मैफल आणि म्हणूनच आजही ती स्मरणात आहे. सुरेश भटांच्या मराठी गझला सुधाकर कदमांनी गायल्या होत्या. तबल्यावर शेखर सरोदे होते. कलीम खान, नारायण कवठेकर यांचं निवेदन होतं. संध्याकाळी सुरू झालेली मैफल मध्यरात्री उशिरापर्यंत चालली होती, हे मला दुसऱ्यादिवशी कळलं होतं. त्या मैफलीत एक उर्दू गझल सुधाकर कदमांनी दोनदा गायली होती. ते शब्द पाठ झाले होते, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी... नंतर कळलं ती प्रसिद्ध गझल जगजितसिंग यांची पहिली गजल होती. वडिलांकडे गजलांच्या एलपी रेकाॅर्डचा नंतर कॅसेटचा मोठा खजाना आहे. माझ्या लहानपणापासून मी गुलाम अली-मेहदी हसन-हुसेन बक्श ऐकत आलोय. त्यामुळं लहान वयातच गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणूनच सुधाकर कदमांची ती मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या मैफलीची आठवण खोलवर मनात रुजली असेल कदाचीत.
- [ ] पुढे जेव्हा मला गझल कळायला लागली, तेव्हा त्या मैफलीची रेकाॅर्डेड कॅसेट मी कित्येकदा ऐकली. (आजही सुधाकर कदमांच्या त्या रेकांर्डिंगच्या कॅसेटस् वडिलांकडे आहेत.) महान गझलकार सुरेश भट यांच्या सुरूवातीच्या काळातल्या जवळजवळ सर्वच गाजलेल्या गझला सुधाकर कदमांनी त्या मैफलीत स्वत:च्या चालीत गायल्या होत्या. नंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि काही गझलनवाजांच्या मराठी गझला ऐकल्या तेव्हा तर सुधाकर कदम यांच्या गझल गायकीचं, त्यांच्या सृजनशिलतेचं, त्यांच्या मखमली आवाजाचं मोठेपण प्रकर्षानं जाणवलं. कुठेही उगाचच स्वर लांबवणे किंवा स्वरच्छल नाही की कुठे उगीच काही वेगळी हरकत घेतल्याचा आव. शास्त्रीय संगितातल्या रागदारीत राहून शब्दांना न्याय्य न्याय देणारी गझलगायकी, हेच सुधाकर कदमांच्या गझलगायनाविषयीचं माझं ठाम मत आहे. मला गझल आणि गायकी समजून-उमजून ऐकण्याचा चांगला कान देवानं दिलाय, म्हणूनही मी म्हणत असेल. त्यामुळेच कलेच्या बाजारीकरणाच्या जगात सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यात सुधाकर कदम कमी पडले, हेही आवर्जून सांगावं लागेल. तो त्यांचा की परिस्थितीचा की विदर्भातल्या आडमार्गाला असलेल्या आर्णीसारख्या केवळ नावालाच तालुका असलेल्या गावाचा दोष आहे, याचा विचार मी जेव्हा मुंबईतल्या प्रसारमाध्यमामधला आघाडीचा पत्रकार म्हणून करतो, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, हे लक्षात येतं.
- [ ] आज कवी प्रा.श्रीकृष्ण राऊत यांची सुधाकर कदम यांच्यावरील ही खालची सुरेख पोस्ट वाचल्यावर आपसूकच ३८ वर्षांपासून मनात दाटलेल्या आठवणींना लिहितं करावंसं वाटलं....
-आशिष जाधव
·
आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज...
Dr.Shrikrishn Raut डॉ श्रीकृष्ण राऊत
१९८० ते १९९० हे दशक मराठी कवितेत ख-या अर्थाने ‘गझल दशक’ होते. असं म्हणावयाला हरकत नाही.मंगेश पाडगावकरांचा 'गझल'(१९८१) सुरेश भटांचा ’एल्गार’ (१९८३) खावर यांचा 'गझलात रंग माझा '(१९८५)आणि 'माझिया गझला मराठी'(१९८६)आणि श्रीकृष्ण राऊत यांचा 'गुलाल'(१९८९) हे गझलसंग्रह याच दशकात प्रकाशित झालेत.ह्याच दशकात सुरेश भटांच्या ’रंग माझा वेगळा’, ’एल्गार’ ह्या कार्यक्रमांना अगदी तिकिट विकत घेऊन रसिक श्रोत्यांनी गर्दी केली.मराठी गझलचा प्रचार-प्रसार करणारं एक गझलव्रत ह्या काळात सुरेशभटांनी घेतलं होतं. गावोगावच्या नव्याने लिहू लागलेल्या गझलकारांना पत्रातून-प्रत्यक्ष भेटीत सुरेश भट त्यांना इस्लाह देत. मेनका, लोकमत, लोकसत्ता इ. नियतकालिकात नवोदितांच्या गझलांना प्रसिद्धी देणारी सदरे ह्याच दशकात प्रसिद्ध होत होती.गझलने भारावलेल्या सांस्कृतिक वातावरणाची दखल घेण्यासाठी ठाण्याच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात ’गझलचे मराठी कवितेवर आक्रमण’ असा परिसंवाद ठेवल्या गेला.
१९८० - १९९०ह्या दशकाच्या आरंभीच टेप रेकॉर्डर आणि कॅसेट संस्कृती आम होऊ लागली होती.'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है' ही गुलाम अलींची गझल एवढी लोकप्रिय झाली की तिला 'निकाह' चित्रपटात बॅकग्राऊंडला का होइना पण स्थान मिळाले. मराठी गझलगायनाच्या जन्मासाठी आवश्यक असे सांस्कृतिक पर्यावरण तयार झालेले होते. संगीताची उत्तम जाण असलेले सुरेश भट मराठी गझलेच्या प्रसारासाठी गुणी गझलगायकाच्या शोधात होते.त्याच दरम्यान त्यांची सुधाकर कदमांची भेट झाली आणि मराठी गझल गायनकलेला पहिला गायक-संगीतकार मिळाला.
प्रस्तुत ग्रंथातील तीन लेख ह्या संदर्भात अतिशय महत्वाचे आहेत.
1.'सुरेश भटांसोबतचे दिवस ' ह्या सुधाकर कदम ह्यांच्या लेखात १९७७- ७८ ला झालेल्या सुरेश भटांच्या पहिल्या भेटीपासूनच्या बारीक-सारीक घटनांचा सविस्तर तपशील आपल्याला वाचायला मिळतो.भट आता हयात नाहीत आपल्या करिअरसाठी त्यांच्या नावावर 'काहीही ' खपवण्याचे प्रयत्न काही व्यावसायिक कलावंतांनी केलेत.त्यामुळे हा तसाच प्रकार असावा अशी शंका येणे रास्त आहे.पण दुस-या बाजुने त्या काळातली सुरेश भटांनी सुधाकर कदमांना लिहिलेली पत्रे वाचली की ह्या शंकाचे निरसन होते.त्यातल्या काही महत्वाच्या पत्राच्या फोटो इमेजेस ह्या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.त्या काळात पु.ल.देशपांडे,व.पु.क¬ाळे यांच्या कथाकथनाच्या आणि सुरेश भटांच्या काव्यगायनाची कॅसेट पुण्याच्या अलुरकर कॅसेट कंपनीने काढली होती.त्या कॅसेट कंपनीकडून सुरेश भटांच्या गझला सुधाकर कदमांच्या चालीत काढण्याचे चालले होते.अरेंजर म्हणून आनंद मोडक सहाय्य करतील असा उल्लेख १९.१२.८१ ला सुरेश भट यांनी लिहिलेल्या पत्रात आहे.
कुठल्या तरी कारणाने ही कॅसेट निघाली नाही.पण तो पर्यंत सुरेश भट यांच्या दहा-बारा गझलांच्या चाली सुरेश भटांना आवडतील अशा गझलगायन शैलीत सुधाकर कदमांनी तयार केल्या होत्या.
2.'माझी मराठी गझलगायकी' ह्या आपल्या दुस-या लेखात सुधाकर कदमांनी आपल्या वडिलांकडून १९५८ ला हार्मोनियम शिकले. नंतर तबला,गिटार,सरोद अशी वाद्ये शिकल्याचा उल्लेख आहे.मी तेव्हापासूनच गझल गायला सुरुवात केली होती.असेही ते म्हणू शकले असते.पण त्या गोष्टीला काही अर्थ नाही.स्वतःच्या परिपक्व चाली घेऊन आपला जाहीर कार्यक्रम ज्या दिवशी पहिल्यांदा सादर करता ते तुमचे रसिकमान्य असलेले पहिले गझलगायन ह्याची नम्र जाणीव त्यांना आहे.
3.'मराठी गझलगायनाविषयी थोडेसे'ही सुरेश भटांची प्रतिक्रिया 'केसरी'त प्रकाशित झालेली आहे.सुधाकर कदमांचे गझलगायन हे भावगीत गायनापेक्षा कसे वेगळे आहे.हे सुरेश भट यांनी अधोरेखित केले आहे. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प मध्ये झालेल्या सुधाकर कदमांच्या 'अशी गावी मराठी गझल' ह्या कार्यक्रमाचे निवेदन दस्तुरखुद्द सुरेश भट ह्यांनी केले होते.त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचा फोटो ह्या ग्रंथात दिलेला आहे.तसेच ह्या कार्यक्रमातील सुरेश भट यांच्या निवेदनासह सुधाकर कदमांनी गायिलेल्या इतर अनेक गझला-गीतेही अभ्यासक - संशोधकांसाठी यु ट्युबला उपलब्ध आहेत. सुधाकर कदम हे 'महाराष्ट्राचे मेहदी हसन'आहेत असा अभिप्राय सुरेश भट यांच्या हस्ताक्षरात ह्या ग्रंथात आपल्याला सापडतो.
सुधाकर कदम तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी सारख्या आडवळणाच्या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून नोकरी करायचे. त्यांच्या प्रेमाखातर सुरेश भट अनेकदा
आर्णीला मुक्कामी रहायचे. 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची '(दि. ९/९/¬८१-आर्णी)'हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी' (दि. १२/९/८१-आर्णी) 'येणारा दिवस मला हेटाळत हसणारच'( ३०/१२/¬ ८१-काठोडा) ह्या प्रसिध्द गझला आणि 'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद '( १२/९/८१ -आर्णी) ही प्रसिद्ध नात सुरेश भटांनी आर्णी-काठोडा मुक्कामातच लिहिल्या आहेत. भटांच्या हस्ताक्षरातील ह्या रचनांचे फोटो ह्या ग्रंथात आहेत.
त्यातील गझलसंहिते सोबतच स्वरांच्या काही नोटेशनच्या नोंदी सुधाकर कदमांच्या हस्ताक्षरात आढळतात. गझल लेखनासोबतच त्या गझलची चाल बांधण्याच्या प्रक्रियेत भट आणि कदम हे दिग्गज एकाचवेळी सहभागी असण्याचा तो सुवर्णक्षण होता.
ह्या कालखंडात असे भाग्य सुधाकर कदमांशिवाय अन्य गायकाला लाभले नाही.
म्हणूनच हा ग्रंथ आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज ठरतो.
अगदी बालपणी तबला,संवादिनी अशी वाद्ये शिकणारे सुधाकर कदम पुढे गायनाकडे वळले.गायनासोबत पुढे मेंडोलिन,अॅकाॅर्डियन¬,संतुर,सरोद अशी वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा झाला.गायन की वादन ह्या द्वैतातून त्यांना पं.जितेन्द्र अभिषेकी बुवांनी सोडवले.आणि त्यांची गायनाची वाट नक्की झाली. वरील सर्व वाद्यांच्या वादनप्रभुत्वाने त्यांना संगीतकार म्हणून परिपक्व केले.
सुधाकर कदम हे भाग्यवान आहेत, ते ह्या अर्थानं की त्यांचे गुरुवर्य
पुरुषोत्तम कासलीकर ह्यांचा लेख जसा ह्या ग्रंथात आहे तसाच त्यांची शिष्या सीमा काशेट्टीवार ह्यांचाही लेख आहे.कोणत्याही कलेत कलावंताचे योगदान हे त्या कलावंताच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढीशी सांधलेले असते. ह्या दुव्यालाच आपण परंपरा म्हणतो.अशा परंपरेच्या संदर्भातच त्या कलावंताच्या योगदानाचे मूल्यांकन होऊन त्या कलावंताचे ऐतिहासिक स्थान प्रस्थापित होत असते.ह्या दृष्टीने मला हे दोन्ही लेख त्यातील प्रामाणिक भावनाभिव्यक्तीच्या अंगाने अघिक मोलाचे वाटतात.
यशवंत देव, अशोक पत्की,सुरेश वाडकर,वैशाली माडे,अनुराधा मराठे ह्या संगीत आणि गायन क्षेत्रातील नामवंतानी सुधाकर कदमांच्या चालींचा मुक्तकंठाने केलेला गौरव हा प्रस्तुत ग्रंथाचा आत्मा आहे.
राम जोशी,सौ.रजनी करकरे-देशपांडे,सीमा गादेवार,मधुरिका गडकरी ह्या संगीतातल्या जाणकारांनी,सुधाकर कदमांनी बांधलेल्या गझलांच्या बंदिशीतले संगीतसौंदर्य आस्वादकतेने त्यांच्या लेखात अनावरित केले आहे. हे सर्व लेख अभ्यासकांनी,रसिकांनी¬ मुळातूनच वाचावेत असे आहेत.
१९८० ते १९९० ह्या दशकातील सुधाकर कदमांच्या मराठी गझलगायनाच्या कारकिर्दीचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या दोन मान्यवरांनी लिहिलेले लेख ह्या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्ता विशद करणारे शीलालेख ठरावेत इतके मौल्यवान आहेत.ते दोन मान्यवर आहेत ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित आणि ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर.
ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षितांनी वेगवेगळ्या निमित्ताने दोन लेख लिहिलेत.त्यातला पहिला लेख दै.सकाळ मध्ये लिहिला,त्याला निमित्त होते सुधाकर कदमांच्या कोल्हापूरात संपन्न झालेल्या गझलमैफिलीचे .दुसरा अग्रलेख दै.लोकमत मध्ये त्यांनी लिहिला त्याला निमित्त होते सुधाकर कदमांना पुण्यात 'गझलगंधर्व' उपाधी प्रदान करण्यात आली,त्या सोहळ्याचे.
ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे मराठी गझलच्या उगमाचा,विकासाचा आणि संवर्धनाचा चालता-बोलता इतिहास आहेत.सुरेश भट-सुधाकर कदमांच्या अनेक मैफिलींचे नेटके निवेदन त्यांनी केले आहे.अगदी सुरेश भटांच्या मांडीला मांडी लावून प्रथमतः मराठी गझलगायनाची मुहूर्तमेढ रोवणा-या सुधाकर कदमांचे योगदान वैराळकरांनी आपल्या लेखात अधोरेखित केले आहे.
कदमांच्या वाढदिवशी १३ नोव्हेंबर २००९ ला नेटवरील 'गझलकार' ब्लाॅगवर त्यांचा एक विशेषांक मी संपादित करून प्रकाशित केला होता.त्यातील सर्व लेख ह्या ग्रंथात समाविष्ट आहेत.तसेच प्रस्तुत ग्रंथाच्या निमित्ताने तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर,डॉ.राम पंडित,डॉ.किशोर सानप,शाहिर सुरेशकुमार वैराळकर,दिलीप पांढरपट्टे,म.भा.चव्हाण,दत्ता जाधव ह्यांनी लिहिलेल्या लेखांनी हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.
इंटरनेटचे तंत्रज्ञान सुधाकर कदमांसारख्या कितीतरी कलावंतांसाठी वरदान ठरले आहे. 'गझलगंधर्व' (www.gazalgazal.blogspot.com) हा कदमांचा ब्लॉग नेटवर आहे. त्यात बेगम
अख्तर -मेहदी हसन - गुलाम अली -मधुराणी -जगजित सिंग यांच्या गझलांविषयी गायन कलेच्या अंगाने कदमांनी लिहिलेले लेख आहेत.१९८६ ते १९९६ या काळात
हाथरसच्या 'संगीत ' मासिकातील 'नग्म- ए - ग़ज़ल ' आणि 'अपने अपने गीत ' ह्या दोन सदरात उर्दू -हिन्दी गझल - गीतांना कदमांनी लावलेल्या चालींची नोटेशन्स प्रसिद्ध झाली होती . ती अभ्यासकांना त्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळतात. तसेच कदमांनी गायिलेल्या गझला - गीते यू ट्युबवर रसिकांसाठी पहायला-ऐकायला उपलब्ध आहेत.
इंटरनेट नसते तर कदमांच्या योगदानाचा हा अमूल्य खजिना काळाच्या पोटात कधीच गडप झाला असता.
वादन-गायन-लेखन अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या सुधाकर कदमांच्या कारकिर्दीचा आलेख वाचकांसमोर मांडताना मला संपादक म्हणून समाधान आहे.
आणि
मित्र म्हणून अभिमानही.
प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत
जठारपेठ,
अकोला

Thursday, November 15, 2018



’चकव्यातून फिरतो मौनी’ सुधाकर कदम सन्मानग्रंथ प्रकाशन,१३.१.२०१८


                                      
                                                                   ’चकव्यातून फिरतो मौनी’या सुधाकर कदम सन्मानग्रंथाचे प्रकाशन प्रसंगी डावीकडून-कवी समीर चव्हाण,शाहीर सुरेशाकुमार                                                                             वैराळकर,तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर,उल्हासदादा पवार,सुधाकर कदम,डॉ.विकास कशाळकर,पं.पाण्डुरंग मुखडे,निषाद कदम

                                      
                                                                मनोगत व्यक्त करताना गझलगंधर्व सुधाकर कदम

                                      

                                                               
                                       
                                                         मातोश्रींचे आशिर्वाद घेताना गझलगंधर्व

गझल गायन-सुधाकर कदम
                                        
                                                                   गझल गायन-रेणू चव्हाण
                                                                  गझल गायन-मयूर चव्हाण

मनोगत - महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांचे


Tuesday, July 31, 2018

.'पारसा'....

लवकरच प्रकाशित होत आहे...'पारसा'....(काव्यसंगह) अक्षरमानव प्रकाशन.


बंजारा....








संगीत आणि साहित्य :