गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, October 28, 2023

राग_रंग (लेखांक ३०) बिलासखानी तोडी (

              
     दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञ म्हणतात की,भारतीय शास्त्रीय संगीताला काही मुसलमान संगीकारांनी भ्रस्ट केले.तर काही मुसलमान संगीतकरांचे म्हणणे आहे की,मुसलमान संगीत तज्ज्ञांनी  भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी सजवले,त्यास सौंदर्यपूर्ण केले.
      इतिहास पहिला तर भारतीय व्यापाऱ्यांचे अरब व्यापाऱ्यांशी शेकडो वर्षांपासून व्यापरिक संबंध होते.हजरत मुहम्मदाच्या जन्मापूर्वीचे काही अरबी ग्रंथ रामपूरच्या 'रजा पुस्तकालयात' सुरक्षित आहेत,त्यात काही विशिष्ठ गीतांची 'स्वरलिपी' पण आहे.जी सामगायन करणाऱ्या 'गात्रवीणा विधी'ने प्रभावित आहे.यावरून हे लक्षात येते की,अरब लोक इस्लामचा उदय होण्या अगोदरपासून भारतीय स्वरविधीशी परिचित होते.दक्षिण भारताशी तर अरब व्यापाऱ्यांचा संबंध फार प्राचीन आहे.इसवी सन ८६८ मध्ये जाहज नामक एका अरबी लेखकाने भारतीय संगीताची भरपूर तारीफ केली आहे.यात विशेषकरून 'एकतारा'ची (एकतंत्री वीणा) चर्चा महत्वाची समजल्या जाते.स्पेनचा इतिहासकार काजी साइद उदलूस्मीने,ज्यात रागांच्या स्वरांचे वर्णन आहे असे भारतीय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले असा उल्लेख इसवी सन १०१७ मध्ये केला आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', 
लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५७.) अमीर खुसरोने भारतीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५८.) भारतीय संगीत शिकण्यासाठी विदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असल्याचा उल्लेख 'खिलजी कालीन भारत,या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक १८० वर आहे.इसवी सन ७५३ ते ७७४ च्या मधल्या काळात अनेक भारतीय ग्रंथ अरबस्थानात नेऊन त्याचे अरबी भाषांतर करण्यात आले.त्यावेळी बगदादमध्ये खलिफा मन्सूर याचे शासन होते.खलिफा हारूनच्या (७८६ ते ८०८) काळात अनेक अरब विद्यार्थ्यांना विभिन्न विद्यांच्या अध्ययनासाठी भारतात पाठविले व भारतातील विद्वानांना बगदादला बोलविले.प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ शेख बहाउद्दीन झकेरीयाचा संगीत संप्रदाय अरबी संगीताच्या प्रभावाखाली होता.झकेरीया सुफींच्या सुहरवर्दी परंपरेचे महापुरुष होते.यांचे कार्यक्षेत्र सिंध प्रांत असल्यामुळे पंजाब आणि सिंधच्या लोकगीतांचा  या संप्रदायावर पूर्ण प्रभाव होता.खैबर खिंडीतून आलेले मुसलमान व अरबस्थानातून आलेले मुसलमान यांचा स्वभाव,चरित्र,संगीत इत्यादींमध्ये  खूप तफावत होती. भलेही दोघांचे धार्मिक संबंध असेल पण सांस्कृतिक संबंध नव्हते. अरबी संगीत आणि इराणी संगीत भिन्न आहे.अमीर खुसरोला याचे ज्ञान होते.इरानी संगीताचे चार 'उसूल' आणि 'बारा पडद्यांचा' अभ्यास असूनही त्याने भारतीय संगीतालाच श्रेष्ठ मानले आहे.चिश्ती परंपरेतील प्रसिद्ध पुरुष शेख निजामुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर खुसरोच्या ज्या रचना गायिल्या जातात, त्या सर्व भारतीय लोकधुनांवर आधारित शुद्ध भारतीय आहे.(संदर्भ - 'संगीत चिंतामणी)
       अकबराच्या दरबारात ग्वाल्हेर परंपरेचे मर्मज्ञ तसेच फारसी परंपरेचे विदेशी कलाकार पण होते.या काळची परिस्थिती संगीतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्यास अतिशय अनुकूल अशी होती. असे अबुल फजल यांच्या 'आईने अकबरी' मधील उल्लेखावरून कळून येते.या काळात अनेक प्रयोग झाले.या प्रयोगातूनच तानसेनाचा 'मियां मल्हार,'दरबारी कानडा'   
(कानडा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा समूह आहे, ज्याला कान्हडा म्हणूनही ओळखले जाते. कानडा हे नाव कर्नाटक संगीत परंपरा आणि कन्नड देशात उद्भवले असावे असे सुचवते. या गटातील राग वेगवेगळ्या थाटांचे आहेत, परंतु विशेषतः आसावरी किंवा काफी थाटाचे आहेत.कानड्याचे एकूण १८ प्रकार मानले जातात.त्यात 
शाम कानडा,मंगल कानडा, कोलाहल कानडा, मुद्रिक कानडा, नागध्वनी कानडा, टंकी कानडा, जैजवंती कानडा, गारा कानडा, काफी कानडा, बागेश्री कानडा, सुघराई कानडा, सुहा कानडा, शहाणा कानडा, अडाना कानडा, हुसैनी कानडा,अभोगी कानडा, कौशी कानडा, नायकी कानडा हे प्रकार आहेत.यातील अनेक प्रकार आज नामशेष झाले आहेत.)  
'मियां की तोडी'(गुजरी अथवा गुर्जरी तोडी,देसी तोफा,हुसैनी तोडी,आसावरी उर्फ कोमल रिषभ आसावरी असे तोडीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.)  
धोंधूचा 'धोंधू की मल्हार', चरजूचा 'चरजू की मल्हार' (मेघ मल्हार,रामदासी मल्हार,गौड मल्हार,सूर मल्हार,देश मल्हार,नट मल्हार,धुलिया मल्हार,मीरा की मल्हार असे मल्हारचे पण अनेक प्रकार आहेत).या प्रकारे नवीन राग संगीत जगताला मिळत गेले.ही परंपरा पुढेही सुरू राहिली.
● मी सुद्धा भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये नसलेल्या एका नव्या सुरावटीत मराठी गझल स्वरबद्ध केली.या रागाला 'सुधाकरी तोडी' असे नाव दिले आहे.थाट-भैरवी, वादी स्वर-रिषभ,संवादी स्वर-पंचम.गानसमय-दिवसाचा पहिला प्रहर.आरोह-सा कोमल रे कोमल ग प कोमल नि सां. अवरोह-सां कोमल नि प कोमल ग कोमल रे सा.आरोहावरोहात पाच स्वर असल्यामुळे शास्त्रानुसार याची जाती औडव-औडव ठरते.(याला मान्यता मिळेल की नाही मला माहित नाही.कारण मी शास्त्रीय संगीतातील पंडित, डॉक्टर,प्राध्यापक वा कुठल्या महाविद्यालयाचा संगीत विभाग प्रमुख नाही.) शब्द आहेत 'माझी गझल गुलाबो भरते हसून प्याला, माझ्या नशेत अवघा जातो बुडून प्याला'. रसिकांना ऐकण्यासाठी युट्युब लिंक:-https://youtu.be/hRVkLxUFUng?si=Vk6p5c2ZdAw_PYPT
     जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' ह्या आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी गायिलेल्या एका अप्रतिम गाण्यासाठी हा लेख प्रपंच केला आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे!
● युट्युबवर उपलब्ध गायक वादकांचा बिलासखानी...
उस्ताद अमीर खान, सरस्वतीबाई राणे, पंडित जसराज, कुमार गंधर्व, जयतीर्थ मेवूंडी,पं. अजय पोहनकर,पं. राजन,साजन मिश्र, पंडिता किशोरी आमोणकर, पं. प्रभाकर कारेकर, वीणा सहस्रबुद्धे, उस्ताद राशिद खान, उस्ताद शराफत हुसेन खान, पं. अजय चक्रवर्ती, आरती अंकलीकर, अश्विनी भिडे, पं. व्यंकटेश कुमार, कैवल्य कुमार गुरव, नागेश आडगावकर, यशस्वी सरपोतदार, संजीव चिमलगी, उस्ताद फतेह अली खान. मौमिता मित्रा, पिऊ मुखर्जी, वरदा गोडबोले, कौशिकी चक्रवर्ती, पं. संजीव अभ्यंकर, भाई कमलजीत सिंग, मिता पंडित, उस्ताद बिस्मिल्ला खान-शहनाई, उस्ताद अली अकबर खान-सरोद, पं. रवी शंकर, सतार-सारंगी उस्ताद विलायत खान आणि उस्ताद मुनीर खान. उस्ताद विलायत खान-सुरबहार, पं. शिवकुमार शर्मा-संतूर, पं. हरिप्रसाद चौरसिया-बासरी, पं.निखिल बॅनर्जी, पं.कुशल दास-सतार, कला रामनाथन-व्हायोलिन, अभिषेक लाहिरी-सरोद.
● मराठी 
'रामा रघुनंदना' आशा भोसले. संगीत-दत्ता डावजेकर. 
'जायचे इथून दूर काहूर मनी' गायिका-ज्योत्स्ना मोहिले. नाटक-हे बंध रेशमाचे. 
      बिलासखानी रागावर आधारित एक गीत मी नुकतेच स्वरबद्ध केले आहे.स्पॉटिफाय (spotify) युट्युब (youtube) सह इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत उपलब्ध आहे.अलबमचे शीर्षक आहे 'रे मना!

रे मना, तुज काय झाले सांग ना!
का असा छळतो जीवाला सांग ना!

हारण्याचीही मजा घे एकदा
जिंकुनी तुज काय मिळते सांग ना!

हासुनी हसवायचा हा मंत्र घे
दुःख का कुरवळतो तू सांग ना!

सूर लावून गुणगुणावे गीत हे
ते नि तू का वेगळा रे सांग ना!

गीत/संगीत - सुधाकर कदम
गायक - मयूर महाजन
__________________________________________
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी.रविवार दि.२९/१०/२०२३.


 

Tuesday, October 24, 2023

हिंदी चित्रपटातील गझला...


     गझल (ग़ज़ल) हा अरबी भाषेतील स्त्रीलिंगी शब्द आहे.ज्याचा अर्थ 'प्रेयसीशी केलेला वार्तालाप' असा आहे.उर्दू आणि फारसी मधील कवितेच्या एका प्रकारास गझल म्हणतात. एका गझलेत कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त अकरा शेर असतात.सर्व शेर एकाच 'रदीफ़, आणि 'काफ़िया'त असतात.प्रत्येक शेरात स्वतंत्र भाव असून ते एक पूर्ण 'स्टेटमेंट' असते.गझलच्या पहिला शेराला 'मतला' व शेवटच्या शेराला 'मक्ता' म्हणतात.मक्त्यामध्ये शायर स्वतःचे नाव/उपनाव टाकतो.गझल संग्रहास 'दिवान' म्हणतात.

     गझल ही शृंगारपूरक असल्यामुळे काव्य रसिक आणि संगीत प्रेमींच्या व सुफींच्या आवडीची होती.काझी हमीदुद्दीन नागौरीचे कव्वाल महमूदने सुलतान शमसुद्दीन अल्तमश (१२१०-१२३५) याला गझल गाऊन खुश केल्याचा उल्लेख (मुसलमान और भारतीय संगीत) आहे.ग्यासुद्दीन बलबनच्या (१२६५-१२८७) मुलाने शेख बहाउद्दीन जकरियाचा मुलगा शेख कदवा याला निमंत्रित करून त्याच्याकडून अरबी गझला गाऊन घेतल्याचा उल्लेख पण आहे.कैकुबादच्या (१२८७-१२९०) काळात गल्लो-गल्ली गझल गायक उत्पन्न झाले होते.जलालुद्दीन खिलजीच्या काळात अमीर खुसरोने त्याच्या गझलातून सुंदर गायिका व सुंदर तरुणींच्या सौंदर्याचे वर्णन करीत होते.अल्लाउद्दीन खिलजीच्या (१२९६-१३१६) काळात महमूद,मुहम्मद आणि खुदादी हे गझल गायक प्रसिद्ध होते.कुतुबुद्दीन खिलजी (१३१६-१३२०),ग्यासुद्दीन तुगलक (१३२०-१३२५), आणि मुहम्मद तुगलक (१३२५-१३५१) या काळात गझल लोकप्रिय होती.फिरोज तुगलकच्या (१३५१-१३८८) काळात गझलेकडे सन्मानपूर्वक पहिल्या जात होते.

          बहमनी सुलतान मुहम्मद शाह प्रथम याच्या दरबारात खुसरोच्या गझला गाणारे तीनशे गायक होते.ई.स. १५३५ मध्ये बैजू ने हुमायूनला फारसी गझल गाऊन रिझविले होते.अकबराचा अंगरक्षक बैराम खान रामदास या गवैय्याच्या गझल गायन शैलीवर फिदा होता.बैजू व रामदास या शास्त्रीय गायकांचे गझल गायनावरही तेवढेच प्रभुत्व होते.जहांगीरने गझल गायक शौकीला 'आनंद खां' ही उपाधी दिली होती.

          तात्पर्य हे की आज सांगीतिक दृष्टीने गझलकडे तुच्छ रीतीने पहिल्या जात असेल,पण वास्तविक रुपात गझल गाणे एवढेही सरळ नाही.संगीताच्या जाणकार बादशहांनी आणि सुफींनी गझलेचा सदैव सन्मानच केला आहे.गझलांसाठी वापरले जाणारे सर्व छंद भारतीय छंद शास्त्रांतर्गत मान्यता प्राप्त आहेत.तसेच भारतीय रागांची शुद्धता राखून गाणारे गझल गायक विशिष्ट परंपरेत होत आले आहेत. विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांचे सभा पंडित लक्ष्मीनारायण यांनी आपल्या 'संगीत सूर्योदय' या ग्रंथात 'कौल' (कव्वाली) आणि 'गझल'ची चर्चा केली आहे.'कौल'चा अर्थ कथन,कौल गाणार कव्वाल.आणि कव्वालांची गानशैली 'कव्वाली'.कव्वालांच्या गानशैलीत गायिल्या जाणाऱ्या गेय रूपातील गझला म्हणजे कव्वाली.कव्वालीमध्ये तान, पलटा, जमजमा,बोलबांट, सरगम सगळे काही असायचे.प्रसिद्ध ख्यालगायक उस्ताद तानरसखान चांगले कव्वाल होते.म्हणजेच गझल आणि कव्वालीचे आदर्श रूप नेहमीच सन्मानित राहिले आहे.ज्यांची नक्कल हस्सू खान आणि हद्दू खान यांनी केली, ते प्रसिद्ध उस्ताद बडे मुहम्मद खान 'कव्वाल बच्चे' होते. म्हणजेच ग्वाल्हेरची ख्याल गायकी कव्वाल बच्चांच्या गायनाने प्रभावित होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.तरी पण जितका प्राचीन इतिहास शास्त्रीय संगीताच्या विविध शैलींचा आहे तितका गझलचा नाही.स्वातंत्र्य मिळण्या अगोदर गझल लोकप्रिय झाली होती.बराच काळ रसिकांच्या मनोरंजनासाठी कोठयांवर तवायफ गझला गात होत्या.असे जरी असले तरी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या कालखंडात मोठ मोठे गायक गझला गात असल्यामुळे जो मान त्यांना मिळायचा तो मान पुनः मिळावा म्हणून 

आज भारतीय (शास्त्रीय) संगीतकारांनी गझल गायनावर पुनः गंभीर चिंतन करणे आवश्यक आहे,असे मला वाटते. 

      हा झाला गझलचा प्राचीन इतिहास.उर्दू गझल गायकीचा आधुनिक शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या  ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात  उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या  गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातून गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांनी केली.

उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...


१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर

२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज

३. टप्पा अंगाने - बरकत अली खान

       गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.

          गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे  भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.या लेखात अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.

         सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.

●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.

●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.

(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)

उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.

           माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.

             मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... यावर लेखाच्या शेवटी अजून लिहिले आहे.

            फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.

               गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची  देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले..

              जगजित सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार  मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजित-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजित सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजित सिंग इतकी लोकप्रियता  बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही.

       भारतीय चित्रपट संगीताच्या सुरवातीच्या काळापासून तर एकोणविसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत चित्रपटांच्या गाण्यात गझलांची भरमार दिसते.अगदी सुरवातीच्या काळात तर बहुतेक चित्रपटांची पटकथा उर्दूमधेच लिहिल्या गेलेली दिसते.१९५० ते १९८० पर्यंत अतिशय सुंदर गझला चित्रपटांनी दिल्या.नंतरही येत राहिल्या पण एकट-दुकट. त्यातही काही गझला एकदम सुगम संगीताप्रमाणे स्वरसाज चढवून आल्यामुळे अपल्याला ते चित्रपटातील गीत वाटले.जसे:-'संसार से भागे फिरते हो' (चित्रलेखा),'ये हवा ये रात ये चांदनी' (संगदिल),'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' (हम दोनो) वगैरे वगैरे...आणि या उलट काही गीते गझलच्या अंगाने स्वरबद्ध झाल्यामुळे त्या गझला वाटतात.उदा:- 'रंग और नूर की बारात किसे पेश करू' (चित्रपट-गझल),'गुजरे हैं आज इश्क में हम उस मकाम से' (दिल दिया दर्द लिया).

     चित्रपटांच्या निर्मितीचा वेग वाढल्यावर चित्रपटतील संगीत निर्मितीचाही जोर वाढला.त्यात पारंपरिक शास्त्रीय व सुगम संगीत (उप शास्त्रीय) शैलींचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग सुरू झाले.त्यात गझल शैलीची परंपरा प्रकर्षाने दिसून येते.सुरवातीच्या काळात हलक्या फुलक्या स्वरूपात गझला समोर आल्या.कुंदनलाल सहगल, तलत महमूद,मोहम्मद रफी यांच्या सारख्या अनेक गायकांद्वारा चित्रपटात गायिलेल्या गझला लोकप्रिय झाल्या.सांगीतिक दृष्टीने सुद्धा ह्या श्रीमंत रचना होत्या.चित्रपट गीतांमुळे संगीत घरोघरी पोहोचले व लोकप्रिय झाले हे मान्य करावेच लागेल. खोलात जाऊन विचार केला तर शास्त्रीय संगीतापेक्षा चित्रपट गीते व गझल आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे असे दिसते.याला अनेक घटक कारणीभूत आहेत.ठुमरी-दादऱ्याप्रमाणे व एक रागात गझल गाणे असे न राहता गझलच्या अर्थानुसार,स्वभावानुसार बंदिश तयार करणे, विवादी स्वरांनी सजवणे, विविध रागांचे मिश्रण करणे,तसेच काही विशिष्ठ शब्दांना वेगवेगळ्या सुरावटींनी सजवणे,ताल आणि आलापांचा योग्य स्थानावर योग्य प्रयोग अशा विविध बाबींमुळे गझल गायन अधिक प्रगल्भ होत गेले.सध्या तर ऑर्केस्ट्रेशन,ध्वनिमुद्रण याकडे विशेष करून बारकाईने पाहून वेगवेगळे प्रयोग केल्या जात आहे.

● चित्रपटातील गझला...

'हमें तो शाम-ए-ग़म में काटनी है ज़िंदगी' नूरजहां. चित्रपट-जुगनू.(१९४७)

'उठाये जा उनके सितम' लता.चित्रपट-अंदाज़.(१९४९)

'ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल' तलत महमूद.चित्रपट-आरज़ू . (१९५०)

'दुनिया बदल गयी' शमशाद बेग़म.चित्रपट-बाबुल.(१९५०)

'हम दर्द के मारों का इतना ही फ़साना है' तलत महमूद.चित्रपट-दाग़.(१९५२)

'दिल में छुपाके प्यार का तुफान ले चले' रफी.चित्रपट-आन.(१९५२)

'ये हवा ये रात ये चांदनी तेरी इक अदा पे निसार है' तलत महमूद.चित्रपट-संगदिल.(१९५२)

'हैं सब से मधुर वो गीत' तलत महमूद.चित्रपट-पतिता.(१९५३)

'बहारें हम को ढुंढेंगी न जाने हम कहा होंगे' लता.चित्रपट-बाग़ी.(१९५३)

'इश्क़ मुझको नहीं वहशत ही सही' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब..(१९५४)

'फिर मुझे दीदा-ए-तर याद आया' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)

'दिले नादां तुझे हुवा क्या है' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)

'नुक्ता ची है ग़मे दिल' सुरैय्या.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)

'तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम' रफी.चित्रपट-प्यासा.(१९५७)

'जाना था हमसे दूर बहाने बना लिए' लता.चित्रपट-अदालत.(१९५८)

तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा' रफी.चित्रपट-आखरी दाव.(१९५८)

'युं हसरतों के दाग़' लता. चित्रपट-अदालत.(१९५८)

'उनको ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते' लता. चित्रपट-अदालत.(१९५८)

'ना हंसो हम पे ज़माने के है ठुकराए हूए' चित्रपट-गेट वे ऑफ इंडिया.

'चौदवी का चांद हो या आफ़ताब हो' रफी.चित्रपट-चौदवी का चांद.(१९६०)

'बेकसी हद से जब गुज़र जाये' आशा भोसले.चित्रपट-कल्पना.(१९६०)

'धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' सुरेय्या.चित्रपट-शमा.(१९६१)

'कभी खुद पे कभी हालात पे रोना आया' रफी.चित्रपट-हम दोनो.(१९६१)

''तेरी ज़ुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी' रफी.जब प्यार किसी से होता है.(१९६१)

'दिल ग़म से जल रहा है जले पर धुआं न हो' सुमन कल्याणपूर.चित्रपट-शमा.(१९६१)

'है इसी में प्यार की आबरु' लता.चित्रपट-अनपढ.(१९६२)

'मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया' रफी.चित्रपट-जब प्यार किसी से होता है.(१९६२)

'अब क्या मिसाल दूं मैं तुम्हारे शबाब की' रफी.चित्रपट-आरती.(१९६२)

'ज़िंदगी आज मेरे नाम से शरमाती है' रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया.(१९६२)

'जुर्म-ए-उल्फ़त पे हमें लोग सजा देते हैं' लता.

चित्रपट-ताजमहल.(१९६३)

'जरा सुन हसीना ओ नाज़नी' रफी.चित्रपट-कौन अपना कौन पराया.(१९६३)

'ज़ुल्फ की छांव में चेहरे का उजाला लेकर' आशा,रफी. चित्रपट-फिर वो ही दिल लाया हूँ.(१९६३)

'हाले दिल यूं उन्हे सुनाया गया' लता.चित्रपट-जहांआरा.(१९६४)

'वो चुप रहे तो दिल के दाग़ जलते है' लता. जहांआरा.(१९६४)

'इश्क़ की गर्मी-ए-जज़बात किसे पेश करूं' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'दिल खुश है आज ऊनसे मुलाकात हो गयी' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'मुझे ये फुल ना दे तुझे दिलबरी की कसम' रफी,सुमन कल्याणपूर.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'अदा क़ातिल नज़र बर्क़-ए-बला' आशा भोसले.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'नग़्मा ओ शेर की सौग़ात किसे पेश करूं' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'संसार से भागे फिरते हो' लता.चित्रपट-चित्रलेखा.(१९६४)

'मुझे दर्दे दिल का पता न था' रफी.चित्रपट-आकाशदीप.(१९६५)

'ये ज़ुल्फ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा' रफी.चित्रपट-काजल.(१९६५)

'छलके तेरी आंखों से शराब और जियादा' रफी.चित्रपट-आरज़ू.(१९६५)

'बहारों मेरा जीवन भी संवारों' लता.चित्रपट-आखरी खत.(१९६६)

 'न किसी की आंख का नूर हूँ' रफी.चित्रपट-लाल किला.(१९६६)

 'लगता नहीं है दिल मेरा' रफी.चित्रपट-लाल किला.(१९६६)

'भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहां जायें' रफी.चित्रपट-दो बदन.(१९६६)

'नसीब में जीसके जो लिखा था' रफी.चित्रपट-दो बदन.(१९६६)

'कोई सागर दिल को बहलाता नहीं' रफी. चित्रपट-दिल दिया दर्द लिया.(१९६६)

गुज़रे हैं आज इश्क़ में हम उस मक़ाम से' रफी.दिल दिया दर्द लिया.(१९६६)

'रहते थे कभी जिनके दिल में' लता.चित्रपट-ममता.(१९६६)

'दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब देंगे' लता.चित्रपट-बहू बेगम.(१९६७)

'मेरी ज़िंदगी के चिराग़ को तेरी बेरुख़ी ने बुझा दिया' लता. चित्रपट-जाल.(१९६७)

'मिले न फूल तो कांटों से दोस्ती कर ली' रफी.चित्रपट-अनोखी रात.(१९६८)

'हर तरफ के जज़बात का एलान है आंखें' रफी.चित्रपट-आंखें.(१९६८)

'वो ज़िंदगी जो थी अब तक तेरी पनाहों में' आशा भोसले.चित्रपट-नील कमल.(१९६८)

'मिलती है ज़िंदगी में मोहब्बत कभी कभी' लता.चित्रपट-आंखें.(१९६८)

'आज सोचा ती आंसू भर आये' लता.चित्रपट-हंसते ज़ख़्म.(१९७०)

'हम है मता-ए-कूचा ओ बाज़ार की तरह' लता.चित्रपट-दस्तक.(१९७०)

उनके ख़याल आये तो आते चले गए' रफी.चित्रपट-लाल पत्थर.(१९७१)

'चलते चलते युं ही कोई मिल गया था' लता.चित्रपट-पाकिज़ा.(१९७२)

'रस्मे उल्फ़त को निभाए तो निभाए कैसे' लता.चित्रपट-दिल की राहें.(१९७३)

'अपनी खुशी से अपना ही दिल तोडना पडा' लता. चित्रपट-कुंवारा बदन.(१९७३)

'हाल क्या है दिलों का न पूछो सनम' किशोर कुमार. चित्रपट-अनोखी अदा.(१९७३)

'संसार की हर शै का इतना ही फ़साना है' महेंद्र कपूर.चित्रपट-धुंद.(१९७३)

'देखा है ज़िंदगी को कुछ इतने करीब से' किशोर कुमार.चित्रपट-एक महल हो सपनो का.(१९७५)

'रुके रुके से क़दम रुक के बार बार चले' लता.चित्रपट-मौसम.(१९७६)

'दूर रहकर न करो बात क़रीब आ जाओ' रफी.चित्रपट-अमानत.(१९७७)

'आंखों में दिल गया अपना' आनंद कुमार.चित्रपट-सांच को आंच नहीं.(१९७९)

'ज़िंदगी में जब तुम्हारे ग़म नहीं थे' अनुराधा पौडवाल, भुपेंद्र सिंग.चित्रपट-दूरीयां.(१९७९)

'पत्थर से शीशा टकरा के' आनंद कुमार.चित्रपट-सावन को आने दो.(१९७९)

'सरकती जाये है नक़ाब आहिस्ता आहिस्ता' लता,किशोर कुमार. चित्रपट-दीदार-ए-यार.(१९८०)

'ज़िंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)

'इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)

'माना तेरी नजर में तेरा प्यार हम नहीं' सुलक्षणा पंडित.चित्रपट-आहिस्ता आहिस्ता.(१९८१)

'दिल चीज़ क्या है आप मेरी जान लिजीए' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)

'चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है' गुलाम अली.चित्रपट-निकाह.(१९८२)

'दिखाई दिये यूं के बेख़ुद किया' लता.चित्रपट-बाजार.(१९८२)

'दिल के अरमां आंसुओं में बह गए' सलमा आगा..चित्रपट-निकाह.(१९८२)

'तुमको देखा तो ये ख़याल आया' जगजीत सिंग.चित्रपट-साथ साथ.(१९८२)

'तू नहीं तो ज़िंदगी में और क्या रह जायेगा' जगजीत,चित्रा. चित्रपट-अर्थ.(१९८२)

'झुकी झुकी सी नज़र बेक़रार है के नहीं' जगजीत सिंग.चित्रपट-अर्थ.(१९८२)

'दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है' लता.चित्रपट-आखिर क्यों.(१९८५)

'किसी नज़र को तेरा इंतजार आज भी है' आशा भोसले,भुपेंद्र सिंग.चित्रपट-ऐतबार.(१९८५)

'तेरे प्यार की तमन्ना, ग़म-ए-जिंदगी के साये' महेंद्र कपूर.चित्रपट-तवायफ.(१९८५)

'तुम्हारी नज़रों में हमने देखा अजब सी चाहत झलक रही है' आशा भोसले,कुमार शानू. चित्रपट-कल की आवाज.(१९९२)

'किसी ने भी तो ना देखा निगाह भर के मुझे' पंकज उधास.चित्रपट-दिल आशना है.(१९९२)

'होश वालों को खबर क्या' जगजीत सिंग.चित्रपट-सरफ़रोश.(१९९९)

-सुधाकर कदम

गझलकार ब्लॉगवरील 'सीमोल्लंघन' विशेषांकामधून साभार...

https://gazalakar23.blogspot.com/?m=0&fbclid=IwAR3JsO3WsFyOddiinFPUWA7V2WWnWmJeVNs0FFR4Eg3_C5oA_Pqr9i7gA9Y

Saturday, October 21, 2023

राग -रंग (लेखांक २९) राग तिलंग

अनहद शब्द उपज्यो मों घट में, ता को ध्यान करू अष्ट जाम।

खरज रिषभ गांधार मध्यम पंचम धैवत, निषाद पावै जौं अति अभिराम।।

-तानसेन


नादाचे दोन प्रकार मानतात.१.आहात नाद २.सनाहत नाद. आपणास ऐकू येतो तो आहत नाद आणि जो कानाने ऐकू येत नाही त्याला प्रचारात अनाहत नाद असे म्हणतात. अनाहत नाद समस्त आहत नादाचे मूळ किंवा कारण आहे असे मानतात. अशी जरी मान्यता असली तरी आहत नादामध्ये मनाला एकाग्र करण्याची व आनंद देण्याची विलक्षण क्षमता आहे.त्यामुळे आहत नाद लोकरंजक आहे. अनाहत नाद कानाने ऐकू येत नसल्यामुळे तो लोकरंजक नाही. परंतू त्याची गोडी आणि आनंद देण्याची क्षमता आश्चर्यकारक रित्या जास्ती असल्याचे नानक,कबीर,मीरा,सूरदास यांचे मत आहे. कबीराच्या रचनांमध्ये अनेकदा अनहद नादाचा उल्लेख केल्याचे आपणास दिसून येते.इतकेच नव्हे तर पाश्चात्य साधकांमधील 'किट्स' चे खालील वाक्य सुद्धा नानक,कबीर,मीरा,सूरदास यांच्या म्हणण्याला पुष्टी देते. तो म्हणतो... "Heard melodies are sweet but those unheard are sweetest."

     संगीतामध्ये नादाचे महत्व आहेच पण इतर बाबतीतही नाद तितकाच महत्वाचा आहे.एखादा कवी जेव्हा आतून काहीतरी येत असताना एकाग्र होतो तेव्हा नव-नवीन भाव शब्दरूप घेऊन छंदामध्ये स्वतःहून येत असतात. हे येणे कुठून असते हे कवी जाणत नाही.किंवा त्याला ते माहीत नसते,कळत नाही.हे जे येणे आहे ते अनाहत नादाचे देणे असावे असे मला वाटते.भौतिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी एकाग्र होणे आवश्यक असते.जे अनाहत नादाचा माध्यमातून शीघ्र प्राप्त होते. म्हणून कलाकार हा इतरांपेक्षा वेगळा असतो. 

नास्ति नादात्परो मंत्रो न देव: स्वात्मन: पर:।

नानुसंधे: परा पूजा न हि तृप्ते: परं सुखम् ।।

असो!

      आज आपण खमाज थाटोत्पन्न तिलंग रागावर चर्चा करणार आहोत. खमाज थाटातून उत्पन्न झालेल्या सर्वच रागांवर खमाजची छाया दिसून येते.त्याला तिलंग रागही अपवाद नाही. तसेच खमाज व खमाज थाटोत्पन्न रागाचा गोडवा तर अवर्णनीयच आहे.सा ग म प नि सां, सां (कोमल) नि प म ग सा या फक्त पाच स्वरांच्या तिलंग रागावर अनेकांनी स्वरमेळाच्या उतुंग इमारती बांधल्या आहेत.भक्ती,शृंगार, विरह अशा अनेक रसांची उधळण करणारा हा राग आहे. यात रिषभ स्वर वर्ज असला तरी विवादी स्वर म्हणून जेव्हा याचा वापर होतो तेव्हा रागाचा गोडवा अजूनच वाढतो. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमधील 'हंसश्री' हा राग तिलंगशी मिळता जुळता आहे.या रागाची प्रकृती चंचल आहे असे मानतात.त्यामुळे यात ठुमरी, दादरा भजन, गीत, पद इत्यादी प्रकारचं गायिले जातात असे विद्वानांचे मत आहे.याला छेद देणारे कलाकार पण आहेत. खमाज थाटातीलच झिंझोटी राग सुद्धा असाच चंचल,क्षुद्र प्रवृत्तीचा मानल्या गेला आहे.पण यवतमाळच्या एका संगीत संमेलनात कुमार गंधर्वांनी मैफलीची सुरवातच झिंझोटी रागातील मोठ्या ख्यालाने करून रसिकांना आश्चर्यात टाकले.अर्धा तास झिंझोटी आळवला.यावरून रागात क्षुद्र,उच्च, नीच असा काही प्रकार नसतो हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.याचे ध्वनिमुद्रण बराच काळ माझ्याकडे होते.यवतमाळच्या डॉ.उमरेडकरांकडे ते अजूनही असावे. 

     मी शिकत असताना तिलंग रागातील 'तवही मंजूळ रसना' हे मराठी गाणे शिकविले होते.'नेट'वर याचा बराच शोध घेतला पण मला सापडले नाही.


● हिंदी चित्रपट गीते...

'मेरी कहानी भूलने वाले तेरा जहां आबाद रहे' रफी. चित्रपट-दीदार, संगीत-नौशाद (१९५१). 

'यही अरमान लेकरं आज अपने घर से हम निकले' रफी. चित्रपट-शाबाद, संगीत-नौशाद (१९५४). 

'मर गये हम जीते जी मालिक तेरे संसार में' लता. चित्रपट-शबाब, संगीत-नौशाद (१९५४). 

'लगन तोसे लागी बलमा' लता. चित्रपट-देख कबीरा रोया, संगीत-मदन मोहन (१९५७). 

'सखी री सून बोले पपिहा उस पार' लता,आशा. चित्रपट-मिस मेरी, संगीत-हेमंत कुमार (१९५७). 

'मुझे ऐ जिंदगी दिवाना कर दे' रफी. चित्रपट-बिंदीया, संगीत-इकबाल कुरेशी (१९६०). 

'रहते थे कभी जिनके दिल में' लता. चित्रपट-ममता, संगीत-रोशन (१९६६). 

'सजन संग काहे नेहा लगाये' लता. चित्रपट-मै नशे में हूँ, संगीत-शंकर जयकिशन (१९६९). 

'छुप गये सारे नजारे ओए क्या बात हो गयी' लता,रफी. चित्रपट-दो रास्ते, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६९). 

'इतना तो याद है मुझे' लता,रफी. चित्रपट-मेहबूब की मेहंदी, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७१). 

'मेरे दिवानेपन की भी दवा नहीं' किशोर कुमार. चित्रपट-मेहबूब की मेहंदी, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७१). 

'कैसे कहें हम प्यार ने क्या क्या खेल दिखाये' किशोर कुमार. चित्रपट-शर्मिली, संगीत-एस.डी. बर्मन (१९७१). 

'गोरी गोरी गांव की गोरी रे' लता,किशोर कुमार. चित्रपट-ये गुलिस्ता हमारा, संगीत-एस.डी. बर्मन (१९७२). 

'क्या यूंही रुठ के जाने को मोहब्बत की थी'

● युट्युबवर उपलब्ध ठुमरी,दादरा,झुला,टप्पा,भजन,माहिया,गझल...

'अब काहे को नेहा लगाये' इंदुबाला देवी. 

'तोरे नैना जादू भरे' उस्ताद बरकत अली खान.

'सजन तुम काहे को नेहा लगाये' उस्ताद अब्दुल करीम खान. 

'तोरे नैना जादू भरे' उस्ताद बडे गुलाम अली खान. 

'सुरत मोरी काहे बिसराई' सिद्धेश्वरी देवी. (पुरब अंग गायकी व बनारस घराण्याची ठुमरी). 

'काहे पिया दिन रैन' हिराबाई बडोदेकर. 

'इतनी अरज मान ले' गिरीजा देवी. 

'कते ना बिरहा की रात' बेगम अख्तर. 

'रतन हिंडोरे झुले' झुला-अलका देव मारुरकर. 

'अखियन निंद न आये' 

'ननदीया कैसे नीर भरू' पंडित ओंकारनाथ ठाकूर. 

'तेरे नैनो ने जादू डारा' उस्ताद सलामत अली खान, उस्ताद नजाकत अली खान. 

'यार दा ओ' टप्पा-मालिनी राजूरकर. 

'मोहे लिनो' त्रितालातील ठुमरी-श्रुती सडोलीकर. 

'ले चलो गोकुल धाम' पं. बसवराज राजगुरू. 

'तुम काहे को नेहा लगाय' पं. भीमसेन जोशी,उस्ताद राशीद खान. 

'कुंजन में दधी बेचन गयी' शोभा गुर्टू. 

'शाम बिन सजनी जियरा धरे नाही धीर' झपतालातील बोल-बांट ठुमरी. 

'पिया न आये शाम' हुसैन बख्श. 

 'अब काहे को नेहा लगाये' बेगम अख्तर. 

'अब ना सताओ मोहे शाम' पं. अजय चक्रवर्ती. 

'मोहे तुम बिन कलन परे' केरवा तालातील दादरा-पंडित राजन,साजन मिश्र. 

'मोरी एक हूँ न मानी' प्रभा अत्रे. 

'थके नयन रघुपती' भजन-कुमार गंधर्व. 

'धरकन जिया मोरा रे' पं. राजाभाऊ कोगजे. 

'देखो जिया बेचैन' जयतीर्थ मेवूंडी. 

'कहां गिरी रे माथे की बिडीया' दादरा-रघुनंदन पणशीकर. 

'तोरे नैना जादु भरे' जत तालातील ठुमरी-कौशिकी चक्रवर्ती. 

'देखो जिया बेचैन' दादरा-शुभा मुद्गल. 

'एरी अंखीयां रसिली तोरी शाम' पिऊ मुखर्जी. 

'एरी अंखीयां रसिली तोरी शाम' सोहिनी सिंग मुजुमदार.

'ले चलो गोकुल गांव' ओंकार दादरकर. 

'तोरे नैना जादू भरे' मौमिता मित्रा. 

'काहे मोसे नैना लगाये' अद्धा त्रितालातील ठुमरी-संदीप्ता मुखर्जी. 

'सजन तुम काहे को नेहा लगाये' मिता पंडित.

'तोरे नैना जादू भरे' अंजना नाथ. 

'सांवरे सलोने मोरे शाम' उस्ताद लछमनदास संधू. 

'सजिया अकेली दुःख दे' उस्ताद बद्रुज्जमा. 


या व्यतिरिक्त पं. बाळासाहेब पूछवाले,अनोल चटर्जी, अनिर्बन भट्टाचार्य, बेगम शिप्रा खान, नीला सिन्हा रॉय, राजोश्री भट्टाचार्य, अवंतिका चक्रवर्ती, धनंजय कौल, प्रबीर बॅनर्जी, संगीता लाहिरी. आशिम कुमार बिस्वास, रमाकांत गायकवाड,गायत्री गायकवाड, अलंक्रीता रॉय. मीनल दातार, डॉ.रागिनी सरना, अर्धेन्दू शेखर बंडोपाध्याय, सुकृत गोंधळेकर, पं. कृष्णा भट, सुश्मिता दास, राजश्री पाठक, पं. मानस चक्रवर्ती, उस्ताद देवेंदर बस्सी, 

'हम कुरबाने जाऊं' मोठा ख्याल-भाई

नरींदर सिंग बनारस. 

'किथे टकरें' पंजाबी माहिया-मेहदी हसन. 

'मैं नजर दे पी रहा हूँ ये समा बदल न जाये'  गझल-जसविंदर सिंग.

● मराठी...

'तारिणी नव वसन धारिणी' नाट्यगीत.माणिक वर्मा.नाटक-संगीत पट वर्धन, संगीत-गोविंदराव पटवर्धन. 

'प्रिया तुज काय दिसे स्वप्नात' आशा भोसले.चित्रपट-जिव्हाळा, संगीत-श्रीनिवास खळे (१९६८). 

'रसिका तुझ्याचसाठी' परवीन सुलताना. अलबम (१९६९). 

'लपविला लाल गगन मणी' संगीत नाटक-स्वयंवर, संगीत-भास्करबुवा बखले. 

'यह राम की प्रेमिका है' गायक/संगीतकार-सुधीर फडके. कवी-ग.दि.माडगूळकर. (गीत

 रामायण).

__________________________________

दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी.रविवार दि.२२/१०/२०२३.


 

Wednesday, October 18, 2023

आठवणीतील शब्द-स्वर (लेखांक ९)


                                  
    बालपण हवेसे-नकोसे

मित्रहो,
लग्नाची खरी मजा ग्रामीण भागातील लग्न कार्यातच येते.लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बैलगाड्या,त्यात चिल्ल्या-पाल्यांसह बसलेली वऱ्हाडी मंडळी,रस्त्यावरील प्रत्येक गावात शिरताना वाजणारी 'वाजंत्री',लग्नाच्या गावी पोहोचल्यावर होणारी तिथली व्यवस्था, जानवशावरील मुक्काम, पाहुण्यांचा गलबला, फाऱ्या लावून वर डहाळ्या टाकून केलेला 'एअर-कंडिशन' मंडप,  वधुपक्षाची धावपळ, लग्नानंतरच्या पंगती,लाडू खाण्याच्या शर्यती,पियक्कडांची रस्सेदार भाजीची खास तर्री वाली शेवटची 'सुवासिक' पंगत, ही सगळी मजा आता इतिहासजमा झाली आहे.बुफे युगात 'ते आले, लग्न लावले, जेवले व गेले' असे झाले आहे.
     माझ्या काकांचं लग्न मला आठवतं.वय किती ते मात्र आठवत नाही.बहुतेक पाच/सहा वर्ष असावे.त्यावेळी लग्न ठरलं रे ठरलं की पाहुण्यांची वर्दळ सुरू व्हायची ती लग्नानंतरचा सत्यनारायण आणि दुसऱ्या दिवशीची मटणाची खास पंगत आटोपल्याशिवाय संपायची नाही.डेळ-माथन,हळद असे एकामागे एक कार्यक्रम असायचे. या प्रसंगी नातेवाईकांसोबतच गावातील स्त्री पुरुष मंडळी पण असायची.काकांच्या लग्नात पण हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर नवरदेवाची वरात निघाली.लग्न वर्धा जिल्ह्यातील देवळी या गावी होते.दमनीत नवरदेव,पाठीमागे काही छकडे,बैलबंड्या,खाचरं यात वऱ्हाडी. आणि समोर डफडेवालले पैदल. गावातून निघताना डफडेवाल्यांचा गोंगाट संपला की पुढील गाव येईपर्यंत शांतता असायची.पुढच्या गावाची शिव लागली की गाव संपेपर्यंत डफडेवाले जीव तोडून वाजवायचे. असे करत करत एकदाचे लगीनगाव आले.नवरदेव व वऱ्हाडी यांच्या विश्रांतीसाठी केलेल्या एखाद्या इमारतीतील व्यवस्थेला जानोसा म्हणत.(ही व्यवस्था बहुतेक एखाद्या शाळेत केलेली असायची.)तेथे सगळ्यांची फराळ-पाण्याची व्यवस्था होती.लग्न मंडपातून नवरीकडच्या लोकांकडून निरोप आला की सर्वप्रथम मानवाईक मंडळी जायची.तिथे मंडपाबाहेर त्याचे पाय धुवून नारळ,शेला देऊन गळ्यात हार घालून स्वागत केल्या जायचे.तेथेही पानाचे तबकात सिगारेटची पाकीटं, विडीची बिंडलं फिरत असायची. नेहमी विडी पिणारे यावेळी सिगारेटचे झुरक्यावर झुरके मारतांना दिसायचे.नंतर नवरदेवाला घेऊन जाण्यासाठी नवरीचा भाऊ किंवा सख्खा भाऊ नसेल तर चुलत वगैरे भाऊ यायचा.आणि यावेळी नवरदेवाचे रुसण्याचे सोंग सुरू व्हायचे. मग रुसवा काढण्यासाठी नवरीकडचे मानवाईक येऊन रुसवा काढायचे.आणि नवरदेव एकदाचा लग्नमंडपात दाखल होऊन लग्न लागायचे.नंतर जेवणाच्या पंगती उठायच्या.शेवटची पंगत हमखास पेताड पाहुण्यांची असायची. त्यांच्यासाठी वांग्याच्या भाजीवरील तरी खास राखून ठेवलेली असायची. यानंतर निरोप समारंभ सुरू व्हायचा.याला हारा-डेरा म्हणायचे.नवरदेव नवरीने सगळ्यांच्या पाया पडणे,निघताना नवरीने घरच्यांच्या गळ्यात पडून रडणे होऊन नवरदेव नवरीसह परत निघायचा.(चौथी इयत्ता उत्तीर्ण होईपर्यंत म्हणजे १९६० पर्यंत मी एस.टी.पहिली नव्हती.जवळपासच्या गावी जायचं म्हटलं बैलगाडी एकमेव साधन असे. तसेच त्या काळात आजच्यासारखे एस.टी. चे जाळेही विणलेले नव्हते नातेवाईकांची गावे पण जवळपास असायची.जवळच्या नातेवाईकांकडे पैदल आणि दूरच्या नातेवाईकांकडे बैलगाडीने जायची पद्धत होती.)
     थोडे वय वाढल्यानंतर एखादी लग्नपत्रिका घरी येऊन पडली की, लग्नाला जायची तयारी सुरू व्हायची.कपड्यांचा वगैरे तेव्हा प्रश्न नसायचा.एक जोड रोज रोज वापरण्यासाठी व एक जोड खास कार्यासाठी असायचा. दिवाळीला शिवलेला ड्रेस पुढच्या दिवाळीपर्यंत नवाच ठेवायचा.तोपर्यंत मागच्या दिवाळीचा ड्रेस वापरायचा.त्यामुळे आमची खास तयारी म्हणजे चिंचा जमा करण्याची! लग्नघरी पोहोचलो की टिवल्या-बावल्या करत वेळ घालवणे,धिंगाणा घालणे,मारामाऱ्या करणे यात वेळ घालवायचो. पण नेमके लग्न लागायच्या वेळी मंगलाष्टकं सुरू झाली की,सजग होऊन बँडवल्यांसमोर ४/५ जण रांगेत बसायचो आणि 'वाजंत्री बहु गलबला' झाले की, सगळ्यांनी बँडवाल्यांना दिसतील, अशा प्रकारे चिंच खाणे, चोखणे सुरू करायचो.आमच्या या चिंचा प्रकारामुळे वाजंत्र्यांची  खऱ्या अर्थाने फेंssss फेंssss उडायची.या प्रकारामुळे शिव्या मिळून कधी कधी आमचाही बँड वाजायचा.पण यात मजा यायची.हळू हळू वय वाढत गेल्यावर बऱ्याच इतर गोष्टींचे ज्ञान वाढून जुन्या गमती जमती मधील मजा कमी होत गेली. पुढे स्वतःच भाग्योदय मंडळात अकॉर्डियन वाजवून 'सोफिस्टिकेटेड' बँडवाला बनलो.


 

Saturday, October 14, 2023

राग-रंग (लेखांक २८) जैजवंती.

     खमाज थाटोत्पन्न जैजवंती राग नावाप्रमाणेच अतिशय गोड,  चित्ताकर्षक व मर्मस्पर्शी आहे.कुणी याला जैजैवंती तर कुणी जयजयवंतीअसेही म्हणतात. थोडा कठीण असल्यामुळे फार कमी गायक हा राग गाताना दिसतात.याला संपूर्ण-संपूर्ण जातीचा वक्र राग असे म्हटले तरी हरकत नाही.यात अल्हैया,छाया आणि देस अंग एकमेकांत मिसळलेले दिसून येतात.अनेक गायक याला बागेश्री अंगाने पण गाताना दिसतात.परंतू देस अंगाचे (रेमपनिसां) रूप जास्ती प्रचलित आहे.या रागाचा विस्तार तीनही सप्तकात मुक्तपणे केल्या जातो.याचा गायन वादन समय रात्रीचा दुसरा प्रहर असून.वादी स्वर रिषभ व संवादी स्वर पंचम आहे.यात दोन्ही गांधार व दोन्ही निषाद स्वरांचा प्रयोग केल्या जातो.हा गारा नावाच्या रागाला जवळचा आहे.

     गुरु ग्रंथ साहेबानुसार हा राग बिलावल व सोरठ या दोन रागांमिळून बनला आहे.हा राग गुरुबानी नंतरच्या खंडात दिसून येतो.या रागात शिखांचे नववे गुरू तेगबहाद्दूर द्वारा फक्त चार भजनांची रचना केल्या गेली आहे.या भजनांना त्यांचे चिरंजीव आणि उत्तराधिकारी गुरू गोविंद साहेब सिंग यांनी १७०५ मध्ये यात जोडले होते.या रागाचा उल्लेख भारतीय शास्त्रीय संगीताच्या कुठल्याच ग्रंथात केलेला नसल्याचा उल्लेख केला आहे. रागमालामध्ये हा राग मिळत नाही. परंतु १४ व्या शताब्दीच्या सुरवातीला याला 'जावंता' नावाने ओळखल्या जात होते. सध्या खमाज थाटातील एक महत्वपूर्ण राग म्हणून याला मान्यता आहे. गुरु ग्रंथ साहेबानुसार जैजैवंती (ਜੈਜਾਵੰਤੀ) राग साधन साध्य झाल्याचा आनंद व तृप्तीची भावना व्यक्त करतो.सोबतच काही तरी गमावल्याचे दुःखही व्यक्त करतो.आनंद आणि दुःख  ह्या दोन्ही भावनांचा अतिरेक होऊ देत नाही.


     उस्ताद बडे गुलाम अली खान, उस्ताद फतेह अली खान, पं. भीमसेन जोशी, पं. कृष्णराव, पं. जसराज, पं. राजन साजन मिश्र, पं. विनायकराव पटवर्धन, पं. जगदीश प्रसाद, पं.व्यंकटेश कुमार गुरव,पं. अजय चक्रवर्ती, पं. दिनकर कैकिणी,पं.अजय पोहनकर, उस्ताद राशीद खान, पं.उल्हास कशाळकर, शुभदा मराठे,फरीद हसन, उस्ताद शराफत हुसेन खान, कौशिकी चक्रवर्ती, डॉ.निवेदिता कौर, जयश्री पाटणकर, पं. विजय कोपरकर, पं. विजय देशमुख व इतर वादकांचे व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

        मी शिकत असताना 'मोरे मंदर अब क्यों नहीं आये' ही चीज शिकविल्या गेली.पुन्हा तेच, काव्याचा भावार्थ न कळता फक्त रागरूप कळणे! मला जैजवंती राग खऱ्या अर्थाने आवडला तो पंडित जसराजजींची 'चंद्रवदन राधिका' ही झपलातील चीज ऐकल्यानंतर.व्यक्तिमत्व दरबारी होतेच पण त्यांची गाण्याची पद्धतही अतिशय आकर्षक होती.पुढे सुरेश भटांसोबत मराठी गझल गायनाचे कार्यक्रम करताना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९८२ मध्ये आयोजित केलेल्या 'अशी गावी मराठी गझल' या फक्त मराठी गझल गायकीच्या,महाराष्ट्रातील तीन तासाच्या पहिल्या वहिल्या कार्यक्रमात सुरेश भटांचीच 

'दिशा गातात गीते श्रावणाची

कुणाला याद तान्हेल्या तृणाची

ही जैजवंती रागात स्वरबद्ध केली गझल गायिलो होतो.यातील 'तान्हेल्या' या शब्दाकरिता मी जैजवंती रागात नसलेल्या कोमल धैवताचा प्रयोग करून प्रचंड दाद घेतली होती.त्याबद्दल पुण्याच्या केसरी या दैनिकाने दि.२५/७/१९८२ च्या अंकात याबद्दल "या बंदिशीतील कोमल धैवताचा रागबाह्य प्रयोग (तिरोभाव) लक्षणीय वाटला. विशेषतः 'तान्हेल्या' शब्दाच्या स्वरा-सहीत उच्चारणात तो मनावर ठसला." असा उल्लेख केला होता.गझल गायकीमध्ये असा एखाद्या शब्दाचा अर्थ अधिक सक्षमपणे रसिकांपर्यंत पोहचविण्याकरिता प्रयोग केला तर तो आवडतोच.हा माझा गझल गायक व संगीतकार म्हणून इतक्या वर्षाचा अनुभव आहे.असो!

या रागात खूप कमी गाणी आहेत.पण जी आहेत ती अगदी अफलातून...

● हिंदी चित्रपट गीते...

'हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे' लता. चित्रपट-बागी, संगीत-मदन मोहन (१९५३).           

'मनमोहना बडे झुठे' लता. चित्रपट-सीमा, संगीत-शंकर जयकिशन (१९५५). 

'बैरन हो गई रैन' मन्ना डे. चित्रपट-देख कबीरा रोया, संगीत-मदन मोहन (१९५७). 

'मौसम सुहाना दिल है दिवाना' लता. चित्रपट-सुवर्ण सुंदरी, संगीत-आदि नारायण राव (१९५७). 

'जाईए हम से खफा हो जाईए' लता. चित्रपट-चालबाज, संगीत-मदन मोहन (यात चारुकेशी पण दिसतो.) १९५८. 

'दिल का दिया जलाया' नूर जहां. चित्रपट-कोयल, संगीत-खुर्शीद अन्वर (१९५९). 

'ये दिल की लगी कम क्या होगी' लता. चित्रपट-मुगले आझम, संगीत- नौशाद (१९६०). 

'जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है' रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया, संगीत-नौशाद (१९६२)

'वो जो मिलते थे कभी हम से दिवानो की तरह' चित्रपट-अकेली मत जइयो, संगीत-मदन मोहन (१९६३). या गाण्यात तीव्र माध्यमाचा सुंदर प्रयोग केल्या गेला आहे.

'बालमवा बोलो ना बोलो ना' लता. चित्रपट-पिकनिक, संगीत-एस.मोहिंदर (१९६६). 

'सुनी सुनी साज की सतार पर' किशोर कुमार. चित्रपट-लाल पत्थर, संगीत शंकर जयकिशन (१९७१). 

'मोरे नैना बहाये नीर' लता. चित्रपट-बावर्ची, संगीत-मदन मोहन (१९७२). 

'मैं राधा तू शाम' शंकर एहसान लॉय, कमल हसन, शंकर महादेवन. चित्रपट-विश्वरूप, संगीत एहसान नुरानी,लॉय मेंडोंसा. 

गांधीजींचे आवडते भजन 'रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम' जैजवंती रागावर आधारित आहे.

दक्षिण भारतातील अनेक चित्रपटात जैजवंतीचा मुक्तहस्ताने वापर केला आहे.

● नॉन फिल्मी...

'दोस्त बन कर भी नहीं साथ निभानेवाला' -गुलाम अली.


 

पुरस्कार...



     आयुष्यात आपली वाहव्वा व्हावी, सत्कार व्हावा, एखादा तरी शासकीय पुरस्कार मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते.नुसतेच वाटत नसते तर प्रत्येकजण या सुखाकरीता आसुसलेला असतो.परंतू काही खास लोकच पात्र ठरतात, त्याला आपण काय करू शकतो ?
     खरे म्हणजे शासकीय पुरस्कारासाठी पात्र होणे ही एक फार मोठी कला आहे.ती साऱ्यांनाच जमते असे नाही.ज्याला जमली त्याला जमली.येऱ्या गबाळ्याचे ते काम नोहे.आमचा एक साहित्यिक मित्र हा खेळ करण्यात पटाईत होता.(पण....अती पटाईत असल्यामुळे कुठेच काही जमले नाही.) कोणत्या तरी मंडळाच्या अध्यक्ष पदाची संधी मिळून सन्मानित व्हावे यासाठी निळ्या टोपीचा आश्रय घेऊन  काँग्रेसशी अंग-संग सुरू केला.दलितोद्धारक अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी नको नको ती सोंगे केली.पण दलित काही फसले नाही.व काँग्रेसवाल्यांनीही धतुरा दाखवला.तरी पण काँग्रेसचे शासन असेपर्यंत त्याचे लांगुलचालन सुरूच होते.पुढे काँग्रेसचे शासन जाऊन युतीचे सरकार आले.आमच्या या मित्राने लगेच कोलांटउडी घेऊन भगवी पताका खांद्यावर घेतली.व सेना भवनाच्या वाऱ्या करून 'कीर्तन' करणेही सुरू केले.इतकेच नव्हे तर काँग्रेस पक्ष किती वाईट होता यावर साहित्य निर्मितीही सुरू केली.हे सगळे कशाकरीता तर मान-सन्मान, अध्यक्षपद, सत्कार,पुरस्कार या 'आत्मिक' सुखाकरीता. पण भगवे सरकारही याला पूर्णपणे ओळखून असल्याने त्याची कुठेच वर्णी लागली नाही.थोड्याच दिवसात हा 'वार'करी भगवी पताका उतरवून संयुक्त मोर्चाची पंचरंगी पताका खांद्यावर घेऊन फिरायला लागला...तर मंडळी शासकीय पुरस्काराची लालसा माणसाला किती लाचार बनविते हे आपल्या लक्षात आलेच असेल!
     आदर्श संगीत शिक्षकाचा राज्य/राष्ट्रीय पुरस्कार मिळावा असे आम्हासही वाटत होते.पण त्याकरीता करावे लागणारे लांगुलचालन न जमल्यामुळे जिल्हा समितीने निवड केल्यावरही आम्हाला टाळण्यात आले.खोलात जाऊन चौकशी केल्यावर कळले की,आर्णीत शिवजयंती उत्सव सुरू केल्यामुळे लागलेल्या कलमांमुळे पुरस्कारापासून वंचित करण्यात आले.
आपल्याच महाराष्ट्रात छत्रपतींची जयंती साजरी केल्यामुळे आपल्यावरच कलमा लागतात व न्यायालयाचे खेटेही घ्यावे लागतात हे कळले.तसेच साध्यासुध्या किरकोळ कलमा लागल्यामुळे आपल्या देशात पुरस्कारापासून वंचित केल्या जावू शकते,पण ३०२,४२० वगैरे पर्यंतच्या कलमा लागलेली व्यक्ती मात्र आमदार, खासदार,मंत्री होऊ शकते. हे पाहून आम्हाला आमच्या शिक्षकी पेशाची लाज वाटायला लागली.व आपण शिवजयंतीसारखे समाजविघातक काम करण्यापेक्षा खून,मारामाऱ्या,बलात्कार,जाळपोळ वगैरेंसारखी 'राष्ट्रीय' कार्ये केली नाही याचे वैषम्य वाटायला लागले.या सगळ्या अनुभवामुळे पुरस्कार मिळविणे ही सुद्धा एक कला आहे हे आम्हाला पटायला लागले.ज्याने काहीही न करता फक्त 'कलाबाजी' केली तो जिंकला.व जो नुसतेच 'कार्य' करत राहिला तो हरला.
      शासकीय पुरस्कार मिळविण्यासाठी समोरची व्यक्ती आदर्शच असली पाहिजे असे काही नाही.ती फक्त मालदार व 'दर्शनीय' असली तरी चालते.एक तर त्या व्यक्तीला चांगले राजकीय वजन हवे.किंवा राजकीय वजन पेलण्याची क्षमता तरी हवी.तसेच लाळघोटेपणा हा दुसरा गुणही त्याच्या रोमारोमात भिनलेला असायला हवा.हे दुसरे 'क्वालिफिकेशन' यात अतिशय महत्वाचे असते.अर्थात योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळतच नाही,असेही नाही.कधी-मधी, चुकून-माकून अनेक योग्य व्यक्तींनाही पुरस्कृत केल्याचे दिसून येते.पण अशी उदाहरणे कमीच!
     पुरस्कार मिळल्यावरही कधी कधी काय गंमत घडते बघा! १९९६ मध्ये आर्णीतील (यवतमाळ) माझ्या सर्वंकष कार्याबद्दल तसेच संगीत व मराठी गझल गायन क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मा. बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा कै. मोतीलालजी बंग हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा  पुरस्कार (मानपत्र व ५००० रुपये रोख) माझ्या नावे जाहीर झाला.पुरस्कार वितरणाचा नयनरम्य सोहळा आर्णीतच झाल्यामुळे पाहुणा व यजमान अशी दुहेरी भूमिका वाटयाला आली. सरस्वती स्तवन,स्वागतगीत आम्हीच सादर केले.व थोड्याच वेळात पुरस्कार घ्यायलाही पुढे आलो.त्यामुळे आपल्या लग्नात आपणच बँड वाजवण्याचा आनंद काय असतो तो आम्हाला उपभोगायला मिळाला.
      पुरस्कारामुळे व्यक्तीचे मोठेपण वाढते की, व्यक्तीमुळे पुरस्काराला मोठेपणा येतो हे अजूनपर्यंत आम्हाला कळले नाही.कारण काही सामान्य व्यक्ती पुरस्कारामुळे मोठ्या झाल्याचे तर काही पुरस्कार व्यक्तींमुळे मोठे झाल्याचे आम्ही पाहिले आहे.थोर समाजसेवकाला दंगली घडवतांना पाहून, आदर्श शिक्षकाला मद्यपान करून गटारात लोळताना पाहून, गुणवंत कामगाराचे अवगुण पाहून, समजगौरवाचा 'माज' पाहून, देशबंधूंच्या देशविघातक कारवाया पाहून, हरिभक्तपरायणाची स्त्री भक्ती पाहून, वनमित्राची आरामशिन पाहून, पर्यावरणवाद्याचा (वृक्षमित्र) लाकडाचा धंदा पाहून, सर्वोदयवाद्याच्या अनेक खाजगी संस्था व जमवलेली माया पाहून, वेदशास्त्रसंपन्नाचे बायाबापड्यांना नादी लावणे पाहून, व्यसनमुक्तीवाल्याचे दारूकाम पाहून उपाध्या व पुरस्कार किती तकलादू असतात ते कळले.तरी पण त्याची ओढ मात्र कमी होत नाही.

-सुधाकर कदम


 

Monday, October 9, 2023

उत्कट भावनेची सर्वस्पर्शी कविता

                  #काळोखाच्या_तपोवनातून

     विदर्भातील सुधाकर कदम हे प्रामुख्यानं संगीतकार, गझलगायक म्हणून सर्वविदित असले तरी एक कवी, गझलकार, गीतकार, विडंबनकार, देखील आहेत. 'मीच आहे फक्त येथे पारसा' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. प्रदीर्घ कालावधीनंतर आता त्यांचा 'काळोखाच्या तपोवनातून' हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशीत झालाय्. त्यात त्यांनी गझल, कविता, अभंग, द्विपदी, मुक्तछंद आदी काव्यप्रकार हाताळले आहेत. चिंतनात्मक कवितेबरोबरच, वरवर हलकाफुलका वाटणारा परंतु अंतर्मुख करायला लावणारा हजल विडंबन हा काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच सहजतेनं मिश्कील शैलीत अक्षरबद्ध केलाय्. त्यांच्या हजलमधील नर्मविनोद वाचकांना आवडणारा आहे. तपस्वी असल्याशिवाय काळोखाच्या तपोवनातून प्रवास नाही करता येत. भरजरी दुःखाचे चांदणे लेवून वेदनेची कोजागरी साजरी करण्याची कवीला हातोटी लाभलीय्. चिंतनाची डूब असणाऱ्या कविता अन् खट्याळपणाचा बाज या दोन्ही निरनिराळ्या बाजू एकाच वेळी वाचकांसमोर येतात. हे कदमांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे.
     गझलसम्राट सुरेश भटांचा सहवास लाभल्यानं गझलेची खरी ताकद काय असते, गीतातील तरलता, मनाला स्पर्शून जाणारा भाव याचा आदमास कवीला आलेला आहेच. कदम मुलत: संगीतकार असल्यानं गझल, गीताचा फार्म समजून घेण्याचा त्यांना फारसा प्रयास करावा लागला नाही. फाॅर्म्स हाताळताना त्यातील काव्यमूल्य हरवणार नाही. याची त्यांनी कवी म्हणून काळजी घेतलीय्. राजकीय, सामाजिक आशयाच्या कवितेबरोबरच नातेसंबंधावरही भाष्य करणाऱ्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत. निसर्गाची टवटवीत शब्दचित्रंही त्यांनी रेखाटली आहेत. जगाकडे, स्वतःकडे अन् निसर्गाकडे पाहण्याची सहजदृष्टी काळोखाच्या तपोवनातून प्रतिबिंबित होते.
     एका माणसाचं पुढं जाणं, त्यानं प्रगती करणं, दुसऱ्या माणसाला रुचत नाही, पचत नाही. त्याचे पाय ओढण्याची त्याच्यात ईर्षा असते. माणसाची जात अन् खेकड्याची जात यात फारशी तफावत नाही. इथूनतिथून त्यांची चाल वाकडीच असते. त्यात शिकार होते ती सरळमार्गी माणसाची. राजकारण असो की समाजकारण त्यातल्या चढाओढी, ओढाओढी नित्यनेमानं निदर्शनास येत राहातात. दिवसेंदिवस माणूस आत्मकेंद्रीत होत चाललंय् याची कितीतरी उदाहरणं पाहावयास मिळतात. 'छोटी बहर' मध्ये कदम म्हणतात.

माणसातील खेकडे
चालताती वाकडे

राजकारणात ज्या हवे
तेच बनती माकडे

     देवधर्म श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत कदमांची मतं अगदी ठाम अन् परखड आहेत. देवाचा निवास दगडी मंदिरात नसतो तर तो माणसाच्या हृदयमंदिरात असतो. परंतु त्याचा कुणीच शोध घेण्याचा प्रयत्न नाही करत. काबा असो की काशी, देवाला शोधण्यासाठी त्यांची निरंतर पायपीट सुरूच असते. देवाच्या शोधार्थ सुरू असलेल्या भटकंतीत देव कधीच गवसत नाही. फक्त दिखाव्याला तो बळी पडतो. अन् स्वतःची फसगत करून घेतो. 'तुझे आहे तुजपाशी' याचा त्याला नेहमीच विसर पडत आलाय. हातचं न राखता कवितेतून सत्य सांगणं, अनुभवाचं बोल पोटतिडकीनं मांडणं हे कवीचं आद्य कर्तव्यच ठरतं. अनुभवातून प्रकट झालेला हा शेर अध्यात्माचं सध्यात्म सांगणारा आहे.

काबा-काशी फिरून पाहिले
सारा फक्त दिखावा आहे

     देवाच्या अन् दैवाच्या नावानं माणसाचं शोषण केलं जातं. धनाच्या, कष्टाच्या रूपानं हे शोषण अव्यहात होत राहतं. यावर रिकामटेकडे भरपेट खात राहातात. हा अभंगही अंतर्मुख करून जातो.

रिकामटेकडे/ फुकाचे खाती
कष्टकऱ्या हाती/ टाळ देती//

     जो माणूस माणसाला प्रेम अर्पितो, दीनदुःखितांच्या व्यथांना आपल्या ओंजळीत घेतो, त्यांची फुले करतो, त्यांना दिलासा देतो, मनात मानवतावाद सदैव जिवंत ठेवतो त्यालाच चारीधामंच दर्शन घरबसल्या होतं. इथं प्रदर्शन नसतं. संताची शिकवणही याहून निराळी नाही. याच पायवाटेवरून जाणारा हा अभंग.

दीन दु:खितांना/ मदत जे करी
तेणे मुक्ती चारी/ साधियेल्या//

     माणसाला सप्तरंगी इंद्रधनुष्याचं मोठं आकर्षण असतं. त्याचं जीवन कधी एकाच रंगात रंगू नाही शकत. प्रत्येकाच्या जीवनाचे रंग निराळे, विश्व निराळे असते. जीवनात शुभ्र अन् काळा रंग सुखदुःखाचं प्रतीक म्हणून येतात. माणूस सुखाशी जसा लळा लावतो तसा दुःखाशी नाही लावत. शुभ्रता तर सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. पण दुःखाची, काळोखाची गर्द छाया नको नकोशी वाटत राहाते. माणसाला काळोखाच्या तपोवनातूनही प्रवास करता आला पाहिजे. असं कवीला वाटत राहातं.

असा कसा तुझा रंग जीवना तुझा निराळा
कधी हवासा, कधी नकोसा शुभ्र व काळा

     मातीच्या, आकाशाच्या, पाण्याच्या, हवेच्या जातीची विचारपूस माणूस नाही करत. परंतु माणसाच्या जातीची चौकशी तो हस्ते परहस्ते करत राहतो. जाती-धर्माची ठावठिकाणी ठाऊक करून घेतल्याशिवाय पुढची वाटचाल नाही करता येत. तो जात विरहीत समाजरचनेवर बोलत राहिला तरी जात त्याला गोचिडासारखी चिकटलेली असते. जातीच्या चक्रविवाहातून त्याची कधी सुटका नसते. समाजातील भयाण वास्तवाची जाणीव कदम त्यांच्या शेरातून करून देतात.

मानतो कोठे खरे तर जात आपण?
चिकटुनी बसते किती ती जन्मतः पण

     मातीतून फुल उगवते. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. आपण त्या सुगंधानं मत्त प्रसन्न होऊन जातो. परंतु हा सुगंध वाटण्यासाठी याला किती यातना कराव्या सहन लागतात. याकडं आपलं लक्ष नाही जात फुलाच्या रोपाला आधी मातीत गाडून घ्यावं लागतं. मातीचं अस्तर फाडून त्याला वर यावं लागतं. फुलांवरती हा एक प्रकारचा सुगंधी कहर असतो. निसर्गाच्या संबंधात तत्वज्ञानाची जोड देत ही सष्टाक्षरात कविता कदम अशी लिहितात.

मातीचे अत्तर
त्यास ना उत्तर
फुलांच्या वरती
सुगंधी कहर

     गझल अन् अभंगातून सामाजिक आशयाची भरगच्च मांडणी करणाऱ्या कदमांनी प्रेम या सदाबहार विषयातली चिरतरुण उत्कटताही सहजस्फर्तपणे अविष्कृत केलीय्. प्रेमामध्ये किती किती तरी तऱ्हा असतात त्या त्यांनी द्विपदीतून नेमकेपणाने सांगितल्यात.

प्रारंभाला उधळण तुझी सवय ही जुनी
झेपावते विजेसम नागमोडी कल्लोळुनी

     '#काळोखाच्या_तपोवनातून' जीवन रसाचे उत्कट दर्शन घडविताना अनेक कविता वाचकांशी सुसंवाद साधतात त्याचं कारण कदमांच्या कवितेत गेयता, प्रासादिकता अधिक प्रमाणात आहे.
     व्यंग विडंबनेतूनही समाजाचं दुःख प्रभावीपणे मांडता येतं. लोकांना जेव्हा सत्य थेटपणानं सांगण आवडत नाही तेव्हा रचनाकाराला उपरोधिक शैलीचा वापर करावा लागतो. विडंबनकार हा भाष्यकार असतो. त्याच्या भाष्याने हास्य निर्माण होत असले तरी त्यातील सल अन् पीळ कटूसत्याचा असतो. विडंबनकार अशा सत्याची रुजवात करत असतो. विडंबनात्मक हजलेचे हे शेर पाहा.

कणव न येई शेतकऱ्यांची
असले नेते त्यांच्या गाठी

आर्त भक्त म्हणावया
भोंग्यावरती 'कल्लोळे'

    सुधाकर कदमांनी जवळपास सर्वच काव्यप्रकार सैल हाताने लिहिले आहेत. गीत संगीताचं सांगीतिक नातं अतूट असतं. हे स्वतः गीतकार संगीतकार असूनही गीतांच्या बाबतीत त्यांनी हात आखडता का घेतला हे कळायला मार्ग नाही.

काळोखाच्या तपोवनातून (काव्यसंग्रह)
कवी: सुधाकर कदम
प्रकाशक: स्वयं प्रकाशन पुणे
पृष्ठे: ९५ मूल्य: १५०

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
'उत्सव' पुरवणी
दैनिक सामना,
रविवार दि.८ ऑक्टोंबर २०२३.


 

राग-रंग (लेखांक २७) बिलावल


गीतवाद्यविनोदेन कालो गच्छति धीमताम |
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा ||

अर्थात:- बुद्धिमान लोक गायन, वादन, विनोदात आपला वेळ घालवतात.आणि मूर्ख लोक निद्रा,भांडण आणि विविध व्यसनात आपला वेळ घालवतात.

      'बिलावल' थाटाचे मूळ एकोणविसाव्या शतकाच्या सुरवातीला उत्तर भारतीय संगीतात रुजले.बिलावल रागमाले मध्ये हा राग भैरव रागिणीच्या रुपात प्रगट झालेला दिसतो.परंतू आज हा बिलावल थाटाचा प्रमूख मानल्या जातो.रागमाला बिलावलला भैरवाच्या पुत्र रुपात बघतात.पण या दोन्ही रागात आज काहीच साम्य व संबंध नाही.
      उत्तर भारतातील शीख परंपरेतील रागांपैकी एक राग बिलावल आहे.आणि तो शीखांचा पवित्र ग्रंथ ,श्री गुरू ग्रंथ साहेबांचा एक भाग आहे.त्यातील प्रत्येक रागाचे नियम कडकपणे पाळल्या जातात.त्यामुळे त्यातील स्वरांची संख्या, कोणत्या स्वरांचा उपयोग कसा करायचा,त्यांची परस्पर प्रतिक्रिया काय, याचा धून रचताना उपयोग केला जाते. हे नियम पाळूनच धून रचल्या जाते.,श्री गुरू ग्रंथ साहेबात एकूण साठ रागांच्या रचना आहेत.साठ रागांच्या या साखळीत बिलावल तेहत्तीसवा राग आहे.या रागाच्या रचना पृष्ठ संख्या ७९५ ते ८५९ म्हणजेच ६४ पानांवर दिसून येते.
     बिलावल थाट भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्तर भारतीय  शैलीत वर्णन केलेल्या दहा थाटांपैकी एक आहे.यात सर्व स्वर शुद्ध आहे.यात कोमल निषादाचा प्रयोग केला अलैह्या बिलावल राग तयार होतो.याच्या अवरोहात कोमल निषादाचा अल्प प्रयोग वक्र रुपात केल्या जातो.याचा वादी स्वर धैवत आहे,पण धैवतावर न्यास केल्या जात नाही.याचे न्यास स्वर पंचम आणि गांधार आहे.या रागात धैवत गांधार संगती महत्वपूर्ण आहे.मींड स्वरूपात ती आपल्या समोर येते.पंडित विष्णु नारायण भातखण्डे कृत ‘क्रमिक पुस्तक मालिका’ 
(भाग-१)अनुसार ‘बिलावल’ थाटाचा आश्रय राग ‘बिलावल’च आहे. या थाटांतर्गत येणारे मुख्य राग :- अल्हैया बिलावल, बिहाग, देसकार, सरपरदा,मलुहा केदार, जलधर केदार, लच्छासाख, कामोद नट, केदार नट, बिहागडा, सावनी, छाया, गुणकली, दीपक, पट बिहाग, नट बिहाग, नट, हेमकल्याण, दुर्गा, शंकरा, पहाड़ी, भिन्न षड्ज, हंसध्वनि, मांड वगैरे वगैरे.या रागाचा गायन-वादन  समय सकाळचा पहिला प्रहर आहे. (संदर्भ : भातखंडे-संगीतशास्त्र (भाग १), हाथरस, १९६४)                    
        बिलावल रागाचे अनेक प्रकार आहेत.जसे:-बिलावल,अलैह्या बिलावल,देवगिरी बिलावल, कुक्कुभ बिलावल, लच्छासाख बिलावल, नट बिलावल,शुक्ल बिलावल,यमनी बिलावल वगैरे वगैरे.यातील पं. भीमसेन जोशींनी गायिलेला यमनी बिलावल व पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायिलेला शुक्ल बिलावल ऐकण्यासारखा आहे. (यमनी बिलावल रागाचा थाट  कल्याण मानला जातो.यात दोन्ही मध्यमांचा प्रयोग केल्या जातो.बाकी स्वर शुद्ध आहेत.याची जाती संपूर्ण मानल्या जाते. वादी स्वर पंचम और संवादी षडज असून,गायन समय दिवसाचा पहिला प्रहर आहे.देवगिरी बिलावल याचा समप्रकृतिक राग आहे.)
       रवींद्रनाथ टागोरांच्या 'रवींद्र संगीतात' बिलावल रागाच्या अनेक स्वरूपांचा प्रयोग केल्याचे खालील यादीवरून कळून येते.● बिलावल-अजी हेरी सोंगसर अमृतो,देखा जोड़ी दिले, देखो सोखा भूल,अरे सोम तारे देखो,ओकी सोखा मुचो अंखी,तुमी के गो सोखिरे केनो.● अलैह्या बिलावल-अजी मेघ केते गेचे,बोस अची हे,हृदयोये चिली जेगे,के रे ओय दकिचे,खोमा करो अमय,ओइ पोहेलो तिमिरोराती,प्रोभु एलेम कोथाय,संगसरेते चारिधर.● देवगिरी बिलावल-देबाधिदेब मोहदेब,सबसे आनंद करो.● कुक्कुभ बिलावल-कोथाय तुमी अमी.● लच्छासाख बिलावल-बोहे निरंतर अनंता.● नट बिलावल-मोन जेन मनोमोहोन.●शुक्ल बिलावल-
नित्यो नबो सत्यो ताबो.● मिश्र बिलावल-शुनेचे तोमर नाम, सोखा हे की दिये आमी.● मिश्र अलैह्या/मिश्र केदार-काचे चिली ड्यूरे.

      'बिलावलके प्रकार' म्हणून प्रो.बी.आर.देवधर यांचे दीड तासाचे ध्वनिमुद्रण युट्युबवर उपलब्ध आहे.यात बिलावल रागाच्या सर्व प्रकारावर सविस्तर चर्चा व गायन आहे. युट्युबवरच 'राग बिलावल राग अल्हैया बिलावल पर गुणीजनो के अपने अपने विचार' या शीर्षकांतर्गत पंडित श्रीकृष्ण नारायण रातांजनकर, पंडित गजानन जोशी, पंडित रामाश्रय झा, पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर, प्रो.बी.आर.देवधर, पंडित कुमार गंधर्व यांचेही ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे.गांधर्व महाविद्यालय दिल्ली द्वारे आयोजित .'भारतीय शास्त्रीय संगीत चर्चा' म्हणून 'राग बिलावल विचार गोष्ठी' (१९५४-१९६०) आयोजित करण्यात आली होती.यात पंडित विनयचंद्र मौदगल्य, पंडित यामध्ये  पं.  श्रीकृष्ण नारायण रातांजनकर, उस्ताद विलायत हुसेन खान, प्रो.बी.आर.देवधर, पंडित विनायकराव पटवर्धन, पंडित व्ही.आर.आठवले, उस्ताद चांद खान, उस्ताद मुश्ताक अली खान हे सहभागी झाले होते.ही चर्चा पण अभ्यासकांसाठी युट्युबवर उपलब्ध आहे. याशिवाय उस्ताद विलायत हुसेन खान (यांचे १९३४ मधील ध्वनिमुद्रण), पंडित भीमसेन जोशी,  अजय चक्रवर्ती यांनी गायिलेले बिलावल प्रकार ऐकू शकता.

● बिलावल थाटावर आधारित गाणी...

'ऐ दिल है मुश्किल जीना यहां' रफी,गीता दत्त.चित्रपट-सी. आय.डी. संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५६). 
'उडे जब जब जुल्फे तेरी' आशा,रफी. चित्रपट-नया दौर.संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५७). 
'दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा' लता.चित्रपट-मधुमती.संगीत-सलील चौधरी (१९५८). 
'लग जा गले के फिर ये हसीन रात हो ना हो' लता. चित्रपट-व ह कौन थी.संगीत-मदन मोहन (१९६४). 
'इक प्यार का नगमा है' लता,मुकेश. चित्रपट-शोर. संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७२). 
'भोर आई गया अन्धियारा' मन्ना डे, किशोर कुमार,लक्ष्मी शंकर.चित्रपट-बावर्ची. संगीत- आर.डी. बर्मन (१९७२). 
'सारे के सारे ग म को लेकर गाते चले' आशा भोसले,किशोर कुमार. चित्रपट-परिचय. संगीत-आर.डी. बर्मन (१९७२). 
'मै जट यमला पगला' रफी.चित्रपट-प्रतिज्ञा. संगीत- लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७५). 
'छुकर मेरे मन को किया तूने क्या इशारा' किशोर कुमार.चित्रपट-याराना.संगीत-राजेश रोशन (१९८१). 
'जिंदगी गम का सागर भी है' किशोर कुमार.
चित्रपट-सौतन.संगीत-उषा खन्ना (१९८३). 
'गली में आज चांद निकला' अलका याज्ञिक.
'दिल है छोटा सा,छोटीसी आशा' मिनमिनी.चित्रपट-रोजा. संगीत-ए.आर.रहमान (१९९२). 
चित्रपट-जख्म.संगीत-एम.एम.करीम (१९९८)
'कौन कहता है कि भगवान आते नही' भक्तीगीत-मीनाक्षी मुकेश वर्मा.संगीत-मॅक व्ही (२०२२)
'ओम् जय जगदीश हरे' आरती-अनुराधा पौडवाल.

बिलावल रागावर आधारित सगळ्यात जास्ती गाणी तामिळ चित्रपटात आहेत.
__________________________________________

दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी,रविवार दि.८ ऑक्टोंबर २०२३.


 

Saturday, October 7, 2023

आठवणीतील शब्द-स्वर....


                      ● फिक्कर कराची नाय! ●

    १९६८ ची गोष्ट आहे.आमच्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा रोडवरील मोहदा या खेडेवजा गावात होता.त्यावेळी आजच्यासारख्या सुबक गाड्यांची भरमार नव्हती.खाजगी बस वाहतूक बंद झाल्यामुळे त्यातील एक खटारा गाडी यवतमाळच्या वाणिज्य महाविद्यालयाने (दाते कॉलेज) विद्यार्थिनींकरिता 'कॉलेज बस' म्हणून घेतली होती.ही खेकडा छाप बस आम्ही बाहेरगावच्या कार्यक्रमासाठी भाड्याने घ्यायचो.तिच्या वेगाची लिमिट जास्तीत जास्त तासी चाळीस किलोमीटर इतकी असल्यामुळे बाहेर गावी जायचे म्हटले की,आम्ही लवकर निघत असू.तर अशी ही बस घेऊन आम्ही थोडे उशिराच मोहद्याला पोहोचलो.उशीर झाल्यामुळे गेल्या गेल्या कार्यक्रम सुरू करावा असे ठरले.त्याप्रमाणे गावात पोहोचल्या बरोबर 'स्टेज'ची चौकशी करून बस तेथे लावली.वाद्य उतरवायची सुरवात होत नाही तो आयोजकांपैकी एकजण जवळ येऊन म्हणाला,
 'तुमचा पुंगी पेटारा गाडीतच राहू द्या.पयले जेवन कराले चाला!' 
मी म्हटले 'अगोदरच उशीर झाला आहे तर कार्यक्रम झाल्यावर जेवू!' 
पण तो काही ऐकायलाच तयार मव्हता, म्हणतो कसा 'उशिराची फिक्कर कराची नाय, पयले जेवन मंग कारेकरम!' 
(मी मनात म्हटले जास्तच उशीर झाला तर लोक आमचे 'क्रियाकर्म' केल्याशिवाय राहणार नाही.) शेवटी नाईलाजाने मुक्कामाच्या ठिकाणी गेलो.तिथली व्यवस्था पाहून आम्ही सर्वजण थक्कच झालो. सोयरे असल्याप्रमाणे गेल्याबरोबर पाय धुवायला पाट-पाणी-साबण,टर्किशचा नवा कोरा टॉवेल, बसायला गाद्या, टेकायला लोड-तक्के इतकी चांगली व्यवस्था असूनही कार्यक्रमाचे टेन्शन असल्यामुळे मी आयोजकांना पुन्हा पुन्हा कार्यक्रमाचे सांगायला लागलो तर तेही  म्हणाले, 'फिक्कर कराची नाय,पयले जेवन मंग कारेकरम!' 
मी म्हणालो 'लोकं?' 
उत्तर आले 'लोका-बिकायचं पाहून घेवू पण तुमी फिक्कर कराची नाय!' 
शेवटी सगळी काळजी बाजूला ठेवून पाहुणचारासारखे असलेले चारी ठाव जेवण चापून जेवलो.तोपर्यंत अकरा वाजत आले होते. म्हणून पुनः आयोजकांना म्हटले 'कार्यक्रम?'.....'फिक्कर कराची नाय!' 
या उत्तरानंतर मात्र मी मनात म्हटले यांना जरी 'फिक्कर' नसली तरी कार्यक्रम तर आपल्याला करायचा आहे.म्हणून हळूच सर्व वादक मंडळीला घेऊन स्टेजजवळ उभ्या असलेल्या गाडीतून वाद्य उतरवून स्टेजवर घेतली व स्वरात मिळवणे सुरू केले.वाद्य लावून होईपर्यंत सर्व कलाकार स्टेजवर आले.त्यावेळी अकरा वाजून गेले होते.समोर दहा-पंधरा श्रोते! म्हटलं दहा पंधरा तर दहा पंधरा!'टायटल' ट्यून सुरू केली की येतील हा विचार करून साउंड सिस्टिमवाल्याला माईकची अरेजमेंट करायला सांगितली.त्याने बाबा आदमच्या काळातील आगपेटीच्या आकाराचा काळ्या रंगाचा चपटा चौकोनी माईक समोर ठेवला.
मी म्हटले,'आम्हाला सहा माईकची गरज आहे.एका माईकने भागणार नाही!' 
यावर म्हणतो कसा,'साहेब ,सहा माईकची बरोबरी ह्या एकलाच करते.आतापावतर या माईकवर नाटकंचे नाटकं काहाडले.तुमचा ऑर्केस्ट्रा म्हंज्ये का?' 
आणि तुच्छतेची एक नजर आमच्यावर टाकून एम्प्लिफायर जवळ जाऊन त्याचे कान पिळत बसला.मी आपल्या डोक्यावर हात मारून घेत प्रेक्षक जमा करण्याकरीता टायटल ट्यून सुरू केली.जशी टायटल ट्यून सुरू झाली तशी  आयोजक मंडळी धावत-पळत स्टेजवर आली व त्यापैकी म्होरक्याने रागावून ट्यून बंद करायला सांगितले. 
मी चिडून म्हटले, 'राजेहो, रात्रीचे बारा वाजायला आले व तुम्ही कार्यक्रम करू देत नाही!' 
यावर तोच उसळला व म्हणाला 'तुमी का आमले मार खाले लावता का राजे हो?' (मला कळेना की, कार्यक्रम सुरू करण्याचा व मार खाण्याचा संबंध काय!) 
'म्या मंघानीच सांगितलं ना का कारेकरमाची फिक्कर कराची नाय म्हनून!' 
'रात्रीचे बारा वाजत आले ना,नंतर लोक येणार नाही!' मी.
'लोकं बिकं येतेत, तुमी जरा दम धरा अन् आमी सांगू तवा कारेकरम सुरू करा,आमचं 'पॅक' हाये!' आयोजक.
'पॅक?' मी.
'हो' आयोजक.
'म्हणजे' मी.
'म्हंज्ये असं का,आमच्या गावतनी दोन गनपती मंडय हायेत.दोनी मंडयाचं 'पॅक'हाये.यक दिवस त्यायचा कारेकरम आदुगर होते न दुसऱ्या दिवसी आमचा! आज त्यायचा दिवस हाये.थे तिकून कीर्तन आयकू येते ना?थे खतम झालं का आपला कारेकरम सुरू कराचा!' आयोजक.
'पण कार्यक्रम ऐकायला लोकं लागतील ना!' मी.
'तिथल्ला कारेकरम झाला का सारे लोकं इकडं यिवून बसतीन.म्हनून मी मंघानपासून सांगून राह्यलो का 'फिक्कर कराची नाय' म्हनून!' आयोजक.
तर मंडळी नंतर आम्ही 'फिक्कर' न करता दोन तासात कार्यक्रम गुंडाळून वापस आलो.


 





संगीत आणि साहित्य :