गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, October 14, 2023

पुरस्कार...



     आयुष्यात आपली वाहव्वा व्हावी, सत्कार व्हावा, एखादा तरी शासकीय पुरस्कार मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते.नुसतेच वाटत नसते तर प्रत्येकजण या सुखाकरीता आसुसलेला असतो.परंतू काही खास लोकच पात्र ठरतात, त्याला आपण काय करू शकतो ?
     खरे म्हणजे शासकीय पुरस्कारासाठी पात्र होणे ही एक फार मोठी कला आहे.ती साऱ्यांनाच जमते असे नाही.ज्याला जमली त्याला जमली.येऱ्या गबाळ्याचे ते काम नोहे.आमचा एक साहित्यिक मित्र हा खेळ करण्यात पटाईत होता.(पण....अती पटाईत असल्यामुळे कुठेच काही जमले नाही.) कोणत्या तरी मंडळाच्या अध्यक्ष पदाची संधी मिळून सन्मानित व्हावे यासाठी निळ्या टोपीचा आश्रय घेऊन  काँग्रेसशी अंग-संग सुरू केला.दलितोद्धारक अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी नको नको ती सोंगे केली.पण दलित काही फसले नाही.व काँग्रेसवाल्यांनीही धतुरा दाखवला.तरी पण काँग्रेसचे शासन असेपर्यंत त्याचे लांगुलचालन सुरूच होते.पुढे काँग्रेसचे शासन जाऊन युतीचे सरकार आले.आमच्या या मित्राने लगेच कोलांटउडी घेऊन भगवी पताका खांद्यावर घेतली.व सेना भवनाच्या वाऱ्या करून 'कीर्तन' करणेही सुरू केले.इतकेच नव्हे तर काँग्रेस पक्ष किती वाईट होता यावर साहित्य निर्मितीही सुरू केली.हे सगळे कशाकरीता तर मान-सन्मान, अध्यक्षपद, सत्कार,पुरस्कार या 'आत्मिक' सुखाकरीता. पण भगवे सरकारही याला पूर्णपणे ओळखून असल्याने त्याची कुठेच वर्णी लागली नाही.थोड्याच दिवसात हा 'वार'करी भगवी पताका उतरवून संयुक्त मोर्चाची पंचरंगी पताका खांद्यावर घेऊन फिरायला लागला...तर मंडळी शासकीय पुरस्काराची लालसा माणसाला किती लाचार बनविते हे आपल्या लक्षात आलेच असेल!
     आदर्श संगीत शिक्षकाचा राज्य/राष्ट्रीय पुरस्कार मिळावा असे आम्हासही वाटत होते.पण त्याकरीता करावे लागणारे लांगुलचालन न जमल्यामुळे जिल्हा समितीने निवड केल्यावरही आम्हाला टाळण्यात आले.खोलात जाऊन चौकशी केल्यावर कळले की,आर्णीत शिवजयंती उत्सव सुरू केल्यामुळे लागलेल्या कलमांमुळे पुरस्कारापासून वंचित करण्यात आले.
आपल्याच महाराष्ट्रात छत्रपतींची जयंती साजरी केल्यामुळे आपल्यावरच कलमा लागतात व न्यायालयाचे खेटेही घ्यावे लागतात हे कळले.तसेच साध्यासुध्या किरकोळ कलमा लागल्यामुळे आपल्या देशात पुरस्कारापासून वंचित केल्या जावू शकते,पण ३०२,४२० वगैरे पर्यंतच्या कलमा लागलेली व्यक्ती मात्र आमदार, खासदार,मंत्री होऊ शकते. हे पाहून आम्हाला आमच्या शिक्षकी पेशाची लाज वाटायला लागली.व आपण शिवजयंतीसारखे समाजविघातक काम करण्यापेक्षा खून,मारामाऱ्या,बलात्कार,जाळपोळ वगैरेंसारखी 'राष्ट्रीय' कार्ये केली नाही याचे वैषम्य वाटायला लागले.या सगळ्या अनुभवामुळे पुरस्कार मिळविणे ही सुद्धा एक कला आहे हे आम्हाला पटायला लागले.ज्याने काहीही न करता फक्त 'कलाबाजी' केली तो जिंकला.व जो नुसतेच 'कार्य' करत राहिला तो हरला.
      शासकीय पुरस्कार मिळविण्यासाठी समोरची व्यक्ती आदर्शच असली पाहिजे असे काही नाही.ती फक्त मालदार व 'दर्शनीय' असली तरी चालते.एक तर त्या व्यक्तीला चांगले राजकीय वजन हवे.किंवा राजकीय वजन पेलण्याची क्षमता तरी हवी.तसेच लाळघोटेपणा हा दुसरा गुणही त्याच्या रोमारोमात भिनलेला असायला हवा.हे दुसरे 'क्वालिफिकेशन' यात अतिशय महत्वाचे असते.अर्थात योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळतच नाही,असेही नाही.कधी-मधी, चुकून-माकून अनेक योग्य व्यक्तींनाही पुरस्कृत केल्याचे दिसून येते.पण अशी उदाहरणे कमीच!
     पुरस्कार मिळल्यावरही कधी कधी काय गंमत घडते बघा! १९९६ मध्ये आर्णीतील (यवतमाळ) माझ्या सर्वंकष कार्याबद्दल तसेच संगीत व मराठी गझल गायन क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मा. बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा कै. मोतीलालजी बंग हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा  पुरस्कार (मानपत्र व ५००० रुपये रोख) माझ्या नावे जाहीर झाला.पुरस्कार वितरणाचा नयनरम्य सोहळा आर्णीतच झाल्यामुळे पाहुणा व यजमान अशी दुहेरी भूमिका वाटयाला आली. सरस्वती स्तवन,स्वागतगीत आम्हीच सादर केले.व थोड्याच वेळात पुरस्कार घ्यायलाही पुढे आलो.त्यामुळे आपल्या लग्नात आपणच बँड वाजवण्याचा आनंद काय असतो तो आम्हाला उपभोगायला मिळाला.
      पुरस्कारामुळे व्यक्तीचे मोठेपण वाढते की, व्यक्तीमुळे पुरस्काराला मोठेपणा येतो हे अजूनपर्यंत आम्हाला कळले नाही.कारण काही सामान्य व्यक्ती पुरस्कारामुळे मोठ्या झाल्याचे तर काही पुरस्कार व्यक्तींमुळे मोठे झाल्याचे आम्ही पाहिले आहे.थोर समाजसेवकाला दंगली घडवतांना पाहून, आदर्श शिक्षकाला मद्यपान करून गटारात लोळताना पाहून, गुणवंत कामगाराचे अवगुण पाहून, समजगौरवाचा 'माज' पाहून, देशबंधूंच्या देशविघातक कारवाया पाहून, हरिभक्तपरायणाची स्त्री भक्ती पाहून, वनमित्राची आरामशिन पाहून, पर्यावरणवाद्याचा (वृक्षमित्र) लाकडाचा धंदा पाहून, सर्वोदयवाद्याच्या अनेक खाजगी संस्था व जमवलेली माया पाहून, वेदशास्त्रसंपन्नाचे बायाबापड्यांना नादी लावणे पाहून, व्यसनमुक्तीवाल्याचे दारूकाम पाहून उपाध्या व पुरस्कार किती तकलादू असतात ते कळले.तरी पण त्याची ओढ मात्र कमी होत नाही.

-सुधाकर कदम


 

No comments:





संगीत आणि साहित्य :