गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, October 9, 2023

उत्कट भावनेची सर्वस्पर्शी कविता

                  #काळोखाच्या_तपोवनातून

     विदर्भातील सुधाकर कदम हे प्रामुख्यानं संगीतकार, गझलगायक म्हणून सर्वविदित असले तरी एक कवी, गझलकार, गीतकार, विडंबनकार, देखील आहेत. 'मीच आहे फक्त येथे पारसा' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. प्रदीर्घ कालावधीनंतर आता त्यांचा 'काळोखाच्या तपोवनातून' हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशीत झालाय्. त्यात त्यांनी गझल, कविता, अभंग, द्विपदी, मुक्तछंद आदी काव्यप्रकार हाताळले आहेत. चिंतनात्मक कवितेबरोबरच, वरवर हलकाफुलका वाटणारा परंतु अंतर्मुख करायला लावणारा हजल विडंबन हा काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच सहजतेनं मिश्कील शैलीत अक्षरबद्ध केलाय्. त्यांच्या हजलमधील नर्मविनोद वाचकांना आवडणारा आहे. तपस्वी असल्याशिवाय काळोखाच्या तपोवनातून प्रवास नाही करता येत. भरजरी दुःखाचे चांदणे लेवून वेदनेची कोजागरी साजरी करण्याची कवीला हातोटी लाभलीय्. चिंतनाची डूब असणाऱ्या कविता अन् खट्याळपणाचा बाज या दोन्ही निरनिराळ्या बाजू एकाच वेळी वाचकांसमोर येतात. हे कदमांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे.
     गझलसम्राट सुरेश भटांचा सहवास लाभल्यानं गझलेची खरी ताकद काय असते, गीतातील तरलता, मनाला स्पर्शून जाणारा भाव याचा आदमास कवीला आलेला आहेच. कदम मुलत: संगीतकार असल्यानं गझल, गीताचा फार्म समजून घेण्याचा त्यांना फारसा प्रयास करावा लागला नाही. फाॅर्म्स हाताळताना त्यातील काव्यमूल्य हरवणार नाही. याची त्यांनी कवी म्हणून काळजी घेतलीय्. राजकीय, सामाजिक आशयाच्या कवितेबरोबरच नातेसंबंधावरही भाष्य करणाऱ्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत. निसर्गाची टवटवीत शब्दचित्रंही त्यांनी रेखाटली आहेत. जगाकडे, स्वतःकडे अन् निसर्गाकडे पाहण्याची सहजदृष्टी काळोखाच्या तपोवनातून प्रतिबिंबित होते.
     एका माणसाचं पुढं जाणं, त्यानं प्रगती करणं, दुसऱ्या माणसाला रुचत नाही, पचत नाही. त्याचे पाय ओढण्याची त्याच्यात ईर्षा असते. माणसाची जात अन् खेकड्याची जात यात फारशी तफावत नाही. इथूनतिथून त्यांची चाल वाकडीच असते. त्यात शिकार होते ती सरळमार्गी माणसाची. राजकारण असो की समाजकारण त्यातल्या चढाओढी, ओढाओढी नित्यनेमानं निदर्शनास येत राहातात. दिवसेंदिवस माणूस आत्मकेंद्रीत होत चाललंय् याची कितीतरी उदाहरणं पाहावयास मिळतात. 'छोटी बहर' मध्ये कदम म्हणतात.

माणसातील खेकडे
चालताती वाकडे

राजकारणात ज्या हवे
तेच बनती माकडे

     देवधर्म श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत कदमांची मतं अगदी ठाम अन् परखड आहेत. देवाचा निवास दगडी मंदिरात नसतो तर तो माणसाच्या हृदयमंदिरात असतो. परंतु त्याचा कुणीच शोध घेण्याचा प्रयत्न नाही करत. काबा असो की काशी, देवाला शोधण्यासाठी त्यांची निरंतर पायपीट सुरूच असते. देवाच्या शोधार्थ सुरू असलेल्या भटकंतीत देव कधीच गवसत नाही. फक्त दिखाव्याला तो बळी पडतो. अन् स्वतःची फसगत करून घेतो. 'तुझे आहे तुजपाशी' याचा त्याला नेहमीच विसर पडत आलाय. हातचं न राखता कवितेतून सत्य सांगणं, अनुभवाचं बोल पोटतिडकीनं मांडणं हे कवीचं आद्य कर्तव्यच ठरतं. अनुभवातून प्रकट झालेला हा शेर अध्यात्माचं सध्यात्म सांगणारा आहे.

काबा-काशी फिरून पाहिले
सारा फक्त दिखावा आहे

     देवाच्या अन् दैवाच्या नावानं माणसाचं शोषण केलं जातं. धनाच्या, कष्टाच्या रूपानं हे शोषण अव्यहात होत राहतं. यावर रिकामटेकडे भरपेट खात राहातात. हा अभंगही अंतर्मुख करून जातो.

रिकामटेकडे/ फुकाचे खाती
कष्टकऱ्या हाती/ टाळ देती//

     जो माणूस माणसाला प्रेम अर्पितो, दीनदुःखितांच्या व्यथांना आपल्या ओंजळीत घेतो, त्यांची फुले करतो, त्यांना दिलासा देतो, मनात मानवतावाद सदैव जिवंत ठेवतो त्यालाच चारीधामंच दर्शन घरबसल्या होतं. इथं प्रदर्शन नसतं. संताची शिकवणही याहून निराळी नाही. याच पायवाटेवरून जाणारा हा अभंग.

दीन दु:खितांना/ मदत जे करी
तेणे मुक्ती चारी/ साधियेल्या//

     माणसाला सप्तरंगी इंद्रधनुष्याचं मोठं आकर्षण असतं. त्याचं जीवन कधी एकाच रंगात रंगू नाही शकत. प्रत्येकाच्या जीवनाचे रंग निराळे, विश्व निराळे असते. जीवनात शुभ्र अन् काळा रंग सुखदुःखाचं प्रतीक म्हणून येतात. माणूस सुखाशी जसा लळा लावतो तसा दुःखाशी नाही लावत. शुभ्रता तर सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. पण दुःखाची, काळोखाची गर्द छाया नको नकोशी वाटत राहाते. माणसाला काळोखाच्या तपोवनातूनही प्रवास करता आला पाहिजे. असं कवीला वाटत राहातं.

असा कसा तुझा रंग जीवना तुझा निराळा
कधी हवासा, कधी नकोसा शुभ्र व काळा

     मातीच्या, आकाशाच्या, पाण्याच्या, हवेच्या जातीची विचारपूस माणूस नाही करत. परंतु माणसाच्या जातीची चौकशी तो हस्ते परहस्ते करत राहतो. जाती-धर्माची ठावठिकाणी ठाऊक करून घेतल्याशिवाय पुढची वाटचाल नाही करता येत. तो जात विरहीत समाजरचनेवर बोलत राहिला तरी जात त्याला गोचिडासारखी चिकटलेली असते. जातीच्या चक्रविवाहातून त्याची कधी सुटका नसते. समाजातील भयाण वास्तवाची जाणीव कदम त्यांच्या शेरातून करून देतात.

मानतो कोठे खरे तर जात आपण?
चिकटुनी बसते किती ती जन्मतः पण

     मातीतून फुल उगवते. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. आपण त्या सुगंधानं मत्त प्रसन्न होऊन जातो. परंतु हा सुगंध वाटण्यासाठी याला किती यातना कराव्या सहन लागतात. याकडं आपलं लक्ष नाही जात फुलाच्या रोपाला आधी मातीत गाडून घ्यावं लागतं. मातीचं अस्तर फाडून त्याला वर यावं लागतं. फुलांवरती हा एक प्रकारचा सुगंधी कहर असतो. निसर्गाच्या संबंधात तत्वज्ञानाची जोड देत ही सष्टाक्षरात कविता कदम अशी लिहितात.

मातीचे अत्तर
त्यास ना उत्तर
फुलांच्या वरती
सुगंधी कहर

     गझल अन् अभंगातून सामाजिक आशयाची भरगच्च मांडणी करणाऱ्या कदमांनी प्रेम या सदाबहार विषयातली चिरतरुण उत्कटताही सहजस्फर्तपणे अविष्कृत केलीय्. प्रेमामध्ये किती किती तरी तऱ्हा असतात त्या त्यांनी द्विपदीतून नेमकेपणाने सांगितल्यात.

प्रारंभाला उधळण तुझी सवय ही जुनी
झेपावते विजेसम नागमोडी कल्लोळुनी

     '#काळोखाच्या_तपोवनातून' जीवन रसाचे उत्कट दर्शन घडविताना अनेक कविता वाचकांशी सुसंवाद साधतात त्याचं कारण कदमांच्या कवितेत गेयता, प्रासादिकता अधिक प्रमाणात आहे.
     व्यंग विडंबनेतूनही समाजाचं दुःख प्रभावीपणे मांडता येतं. लोकांना जेव्हा सत्य थेटपणानं सांगण आवडत नाही तेव्हा रचनाकाराला उपरोधिक शैलीचा वापर करावा लागतो. विडंबनकार हा भाष्यकार असतो. त्याच्या भाष्याने हास्य निर्माण होत असले तरी त्यातील सल अन् पीळ कटूसत्याचा असतो. विडंबनकार अशा सत्याची रुजवात करत असतो. विडंबनात्मक हजलेचे हे शेर पाहा.

कणव न येई शेतकऱ्यांची
असले नेते त्यांच्या गाठी

आर्त भक्त म्हणावया
भोंग्यावरती 'कल्लोळे'

    सुधाकर कदमांनी जवळपास सर्वच काव्यप्रकार सैल हाताने लिहिले आहेत. गीत संगीताचं सांगीतिक नातं अतूट असतं. हे स्वतः गीतकार संगीतकार असूनही गीतांच्या बाबतीत त्यांनी हात आखडता का घेतला हे कळायला मार्ग नाही.

काळोखाच्या तपोवनातून (काव्यसंग्रह)
कवी: सुधाकर कदम
प्रकाशक: स्वयं प्रकाशन पुणे
पृष्ठे: ९५ मूल्य: १५०

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
'उत्सव' पुरवणी
दैनिक सामना,
रविवार दि.८ ऑक्टोंबर २०२३.


 

1 comment:

Prashant's creation said...

वाह खूपच छान 👌☝👍🙏





संगीत आणि साहित्य :