गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.Monday, October 4, 2021

श्रेष्ठ कलाकार,श्रेष्ठ माणूसही...दिलीप पांढरपट्टे
     सुधाकर कदम यांचा माझा स्नेहसंबंध सुमारे पंधरा वर्षांचा आहे आणि दिवसेंदिवस हा स्नेह वाढतच आहे हे मी सुरुवातीलाच आनंदाने सांगू इच्छितो.
माझ्या आठवणीप्रमाणे ते मुंबईत बांद्र्याला झालेल्या गझल संमेलनात मला पहिल्यांदा भेटले.
     यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीहून ते लांबलचक आणि खडतर प्रवास करून मुंबईच्या या संमेलनात गझल सादर करण्यासाठी आले होते. त्यांची ही तळमळ आणि गझलसाठी प्रसंगी शारीरिक आणि मानसिक त्रास सोसण्याची तयारी मला तेव्हा खूपच भावली होती.
(त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास तेव्हाही होता, हे लक्षात घेतले तर त्यांच्या या प्रवासातले त्यांचे धाडस लक्षात येते.)
     त्याच संमेलनात 'शब्द झाले सप्तरंगी' या माझ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन झाले होते. तो संग्रह मी त्यांना आवर्जून भेटही दिला होता.या घटनेला सात-आठ वर्षे उलटून गेली आणि सुधाकरजींचा एके दिवशी
अचानक फोन आला. दरम्यानच्या काळात ते निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले होते आणि माझ्या
काही गझलांना त्यांनी चाली लावल्या होत्या हे मला त्यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणातून कळले. त्यांच्या गायनाबद्दल आणि संगीतकार म्हणून असलेल्या त्यांच्या मातब्बरीबद्दल मला आधीपासूनच आदर होता. त्यामुळे या फोनमुळे मी साहजिकच हरखून गेलो आणि त्यांच्या चालींमध्ये त्यांच्याच आवाजात त्या गझला ऐकण्याची उत्सुकता वाटू लागली. यथावकाश आमची भेटही झाली; आणि त्या भेटीची मैफल कशी झाली ते कळलेच नाही. पुण्यातल्या वारजे इथल्या
त्यांच्या घरी पुढे अशा अनेक मैफली जमल्या. त्यांच्या कुटुंबियांच्या स्नेहशील स्वभावामुळे त्यांच्या घरी बसलो की, वेळ कापरासारखा उडून जातो हा अनुभव मला नेहमीच येतो.
     सुधाकरजी हे केवळ गायक व संगीतकार नाहीत; तर ते एक चांगले वाचक आणि लेखकही आहेत. 'फडे मधुर खावया' या त्यांच्या छोटेखानी गद्य पुस्तकात अनेक खुमासदार लेख आहेत. त्यातून त्यांच्या बहुश्रुतेचे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याच्याउमद्या वृत्तीचे प्रत्यंतर येते.
     'काट्यांची मखमल' आणि 'तुझ्यासाठीच मी' या दोन गझल अल्बममध्ये माझ्या गझलांना त्यांनी संगीतबध्द केले आहे. सुरेश वाडकर आणि वैशाली माडे या लोकप्रिय गायक-गायिकांनी या गझल गायिल्या आहेत. सुधाकरजींनी या दोघांकडून ज्या कौशल्याने या गझला गाऊन घेतल्या आहेत, ते केवळ थक्क करणारे आहे. त्यांच्या आजवरच्या संगीतसाधनेचा आणि व्यासंगाचा पुरा अर्क या गझल अल्बममध्ये उतरला आहे असे निश्चितपणे म्हणता येते.
     यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात बहुतेक सर्व आयुष्य व्यतीत झाल्यामुळे त्यांना मुंबई-पुण्याचा फारसा 'वारा' लागलेला नाही हे त्यांना भेटल्यावर एक-दोन मिनिटांतच कुणालाही सहज पटेल. प्रसिध्दीची फारशी सोय नसल्याने आणि त्यासाठी अंगी असावे लागणारे 'तंत्र' ही त्यांच्याकडे नसल्याने ते म्हणावे तितके प्रसिध्दीच्या झोतात आले नसतीलही, पण तो त्यांचा 
पिंडच नाही असे मला वाटते. त्याची त्यांना फार खंतही नाही.कारण तो त्यांचा स्वभाव नाही. जीवन समरसून जगण्यावर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे आयुष्यात काय मिळाले, काय नाही याचा ते फारसा विचार करीत नाहीत, कधी केलाच,तर तो स्थितप्रज्ञतेने किंवा साक्षीभावानेच करताना ते दिसतात.
'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया,
हर फिक्रको धुएँमे उडाता चला गया'
अशा भावनेने जगणारा हा कलंदर कलावंत आहे. 
म्हणून मला ते एक श्रेष्ठ कलाकार वाटतात आणि एक श्रेष्ठ माणूसही!
---------------------------------------------------------------------
●डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित गझलगंधर्व सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून...


 

 

Thursday, August 26, 2021

गझल गायकीचा वारकरी...डॉ.किशोर सानप


      सुधाकर कदम, १३ नोव्हेंबर १९४९ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दोनोडा या खेडेगावी जन्मलेला एक उमदा गायक माणूस. बाप पांडुरंग, वारकऱ्याचं घराणं. खुद्द पांडुरंग बाप अनवट चालीत भजनं गात असे. गायनाचा पांडुरंगी गळा आणि वारकरी गायनाची परंपरा सुधाकरला बाळकडूच्या रूपातच मिळाली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावी संगीत शिक्षकाची नोकरी केली.
आर्णीसारख्या खेडेगावांतून महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्रातल्या रसिकराजांवर गझल गायकीची मोहिनी घालणारा सुधाकर म्हणजे गझलनवाज, #गझलगंधर्व, गझलचा स्वरताज, सुधाकर गझल गायकीसाठी, आपलं अख्खं आयुष्य साधना, तपश्चर्या करून; गझलांना स्वरसाज देताना, धुंदीत आणि गुंगीतच जगला. रमला. खरंतर सुधाकरचा अवतार सुफियाना गायकालाच शोभणारा. चेहऱ्यावर कारुण्यभाव, जगातलं दुःख नष्ट व्हावं ही चिंता. मानेवर वाढवलेल्या केसांच्या बटांची शाही झालर, गहुवर्णी देहयष्टी. जणू आपल्याच धुंदीत गाणारा फकीर, आपल्याच मस्तीत आणि धुंदीत जगला आणि रमलाही. खरंतर सुधाकर म्हणजे, गझल गायकीचा वारकरीच. अजूनही त्याचा रियाज, गायकी आणि गायकीची वारी थांबलेली नाही.

     गायन हा सुधाकरचा श्वास आहे. प्राण आहे. आत्मा आहे. गझलेच्या देहातला श्वास, आत्मा गायनाच्या स्वरानं उजागर करण्याच्याच साधनेत रत असलेला हा कलावंत आहे. म्हणूनच कवी सुरेश भट, संगीतकार यशवंत देव, राम पंडीत, पत्रकार अनंत दीक्षित, कवी श्रीकृष्ण राऊत आदिंसह सर्वदूर रसिकांनीही सुधाकर कदमच्या गझल गायकीला हृदयात अढळ स्थान दिलं आहे. #आद्य_मराठी_गझल_गायक आणि #गझलनवाज म्हणून समाजानं त्याचा गौरवही केला आहे.

     सन १९७५ पासून तर आजतागायत सुधाकर कायम गझल गायकीचा रियाझ करीतच आहे. '#अशी_गावी_मराठी_गझल' या गझल गायनाचे शेकडो धुंद करणारे कार्यक्रम सुधाकरनं आजवर केले आहेत. खुद्द सुरेश भटांनी सुधाकरच्या गझल गायन कार्यक्रमात गझलांचं निवेदन केलं आहे. सुरेश भटांनी गझलेला शब्द दिला. मराठीत गझल अजरामर केली. सुरेश भटांच्याही आधी माधवराव पटवर्धनांनी गज्जलांजली (१९३५) पहिल्यांदा मराठीत आणली. पुढे मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकरांसह अनेक दिग्गज कवींनीही गझलचा प्रभाव लक्षात घेऊन गझल लेखनात उमेदवारी केली. परंतु मराठी रसिकांच्या हृदयावर साम्राज्य केले ते गझलसम्राट सुरेश भट आणि गझलराज कवी श्रीकृष्ण राऊत यांच्या हृदयस्पर्शी गझलांनीच. मराठी गझलला लोकप्रिय आणि रसिकमान्य करण्यात या दोन्ही कवींचं योगदान अनन्यसाधारण आहे. गझलेला दिलेल्या शब्दांना अस्सल स्वरांची गायकी दिली ती #आद्य_मराठी_गझल_गायक सुधाकर कदम यांनी.

     सुरेश भटांची गझल आणि सुधाकरची गायकी, असा दीर्घ प्रवास विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात झालेला आहे. विशेष म्हणजे गझलसम्राट विदर्भपुत्र सुरेश भटांनी गझलेला दिलेल्या शब्दांना स्वरांचा साज चढविण्याचे महत्कार्य विदर्भपुत्र सुधाकर कदमांनीच सुरुवातीच्या काळात केले. सुरेश भटांच्या लोकप्रियतेला सुधाकरनं स्वरांची सलामी दिली. गझल गायकीत सुधाकरने आपले अनन्यसाधारण स्थानही कमावले. मराठी गझल गायकीची सन १९७५ पासूनच सुरूवात करून मराठी गझल गायकीला भूमीही उपलब्ध करून दिली. पुढे विदर्भातील अकोल्याचे गझलनवाज भीमराव पांचाळेनी गझल गायकीत सर्वदूर चार चांद लावले. याच पाऊलवाटेवर राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार, माधव भागवत, रफिक शेख यांनीही गझल गायन क्षेत्रांत गायकी विकसित केली आहे. सुधाकरनं मराठी गझल गायकीची वहिवाट निर्माण केली, हे त्याचे योगदान मराठी गझल गायन क्षेत्रांत अलौकिक मानायला हरकत नाही.

     खुद्द सुधाकर गझल गायनाबाबत म्हणतो, गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकारांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या सुरावटी तयार कराव्या लागतात. संगीत हे केवळ तंत्र नसून अंतर्मनातून स्फुरणारी ती एक शक्ती असून ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. मात्र त्यासाठी
तपश्चर्या करणे आवश्यक असते. कोणतीही कलासिध्दी अंत:करणाला पिळवटून निष्काम साधनेनंच प्राप्त करता येतं. खरंतर कलासाधना ही मुळात ईश्वराचीच भक्ती असते.सुधाकर कलेला ईश्वरप्राप्तीचे साधन मानतो. खरेतर कलेला ईश्वररूप मानणारा हा कलावंत कलेश्वराचाच भक्त आहे. कलेच्या भक्तीतूनच तो कलेचे अद्वैत साध्य करतो.सुधाकरला कलेचे अद्वैत साधले आहे. कलेच्या भक्तीतून गायकीच्या मुक्तीकडे त्याने
आजवर प्रवास केला आहे.

     कलेला पांडुरंग मानणारा हा स्वरांचा वारकरी आहे. पांडुरंगपुत्र आहे. सुधाकरला पांडुरंगानंच जन्म दिला. ज्याचा बापच पांडुरंग, त्याच्या कलाभक्तीला कोण अवरोध करणार? स्वरांचा सुधा-कर कलेचं दैवत पांडुरंगाची भक्ती करतो. गझल गायकीचं पंढरपूर निर्माण करणारा सुधाकर गझलेच्या पांडुरंगाचा निस्सिम वारकरी आहे. केला अभिमान पावठणी, ही वृत्ती अंगी बाणल्यामुळे कमालीची नम्रता, लिनता त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देताना दिसते. कलावंताला अभिमानच पचवता येत नाही. अभिमान सोडून बाकीचं सर्वकाही पचवता येतं. सुधाकर कदम हा कलावंतांचं मानबिंदू तर आहेच, परंतु कलासाधक म्हणून तो आजवर जगत आला. जगत राहील यावरही विश्वास आहे..

     कलावंताला पूर्णत्वाचा ध्यास असतो. पावठणी तुडविल्याशिवाय कोणताही कलावंत कलेच्या पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही, सुधाकर कलावंत आणि कलासाधक म्हणून कलेला,

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । 
कर कटावर ठेवोनिया ||

     मानूनच एकाग्रचित्तानं स्वरांची नवनवोन्मेषशाली निर्मिती करतो. शब्दांचे अर्थविश्व स्वरांच्याच नजाकतीतून उलगडून दाखविण्यासाठीही तो कायम साधनारत असतो. सुधाकर कलेला पांडुरंग मानतो.

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार |
मज विश्वंभर बोलवितो ॥

किंवा

माझे सर्व भांडवल ।
बोलविले बोल पांडुरंगे ।।

     असंच मानतो. म्हणूनच, कलेचे अद्वैत किंवा कलेच्या पूर्णत्वाला पोहोचण्याची कलासाधकाच्या मुक्तीची वाट त्याला सापडली आहे. सुधाकर गायन कलेचा वारकरी आहे. कलामुक्तीच्या परमोच्च वाटेवरून प्रवास करणारा अस्सल कलासाधक आहे.

     सन १९८० ते १९८३ या चार वर्षात सुधाकर कदम आणि कवी सुरेश भटांनी 'अशी गावी मराठी गझल' हा तीन तासांचा गझल गायनाचा कार्यक्रम पहिल्यांदा सुरू करून सर्वदूर लोकप्रिय केला. संगीतकार यशवंत देव यांनी आणि अनेक गझलकार, कवी, पत्रकार, चाहत्यांनी सुधाकरचा गौरवही केला. सन १९८१ मध्ये गझल गायनाची पहिलीवहिली ध्वनिफित भरारी या नावानं आली. सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, सतीश डुंबरे यांच्या गझलांना नव्यानव्या चाली आणि स्वरांजली देऊनच; अणूरेणू या थोकडा, सुधाकर आकाशाएवढा अशी भरारी सुधाकरनं संगीत आणि गायन क्षेत्रात घेतली. सुधाकरनं अनेकांच्या गझलांना स्वतःच्या चाली दिल्या. स्वयंभू स्वरही दिले. बहुतांश सुधाकरनं सुरेश भटांच्या गझलांना मात्र स्वरसाज चढविला. मराठीत ताकदीनं गझल लिहिणाच्या श्रीकृष्ण राऊतांच्याही गझलांना स्वर आणि आवाज दिला. कवीच्या शब्दांच्या खोलीत दडलेला आशय आणि अर्थाना, सुधाकरनं गायकीतून उजागर केले. कवीच्या शब्दतळाशी जाणे सोपे नव्हते. सुधाकर कवींच्या शब्दतळाशीच नव्हे तर शब्दडोहापर्यंत पोहून येतो. नंतरच तो शब्दांना स्वर आणि सांगितिक रचनांचा ईश्वरी सांजशृंगार चढवून रसिकांसमोर सादर करतो. मंत्रमुग्ध होणे कसे असते? हे सुधाकरच्या गझल गायकीने मैफिलींनी मराठी रसिकांना शिकविले. सुधाकर हा गझलेच्या सुरांनी संबंध परिसराला रोमांचित करणारा आणि मंत्रमुग्ध करणारा कलावंत आहे.

     सुधाकर कदम गेल्या चाळीस वर्षांपासून अथकपणे जीवाची आणि तब्यतेची पर्वा न करता कलासाधना करीतच आहे. नव्या चाली आणि नवे सूर देण्याची त्यांची तळमळ अस्सल असते. सुधाकरच्या गायकीचा आजवर मोठा गौरवही झाला आहे. स्वरराज छोट्या गंधर्वांनी सन १९७५ मध्येच, मराठी गझल गायकीच्या नवीन वाटेचा वाटसरू संबोधून चाळीस वर्षांपूर्वीच सुधाकरचं कलावंतपण उमेदीतच भक्कम मानलं होतं. पंडित जितेंद्री अभिषेकींनी, सुधाकरच्या सातत्य आणि परिश्रमपूर्वक कलासाधनेला यशाची गुरुकिल्ली मानली. गझलसम्राट कवी सुरेश भटांनी सन १९८१-८२ मध्येच सुधाकरला 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन' आणि 'गझलनवाज' ह्या मौलिक उपाधींनी गौरविले. गजानन वाटवेंनी, 'मला आवडलेला गझलिया', तर डॉ. यु. म. पठाणांनी, 'मराठी गझलेस स्वरसाज चढविणारा कलावंत' म्हटले. मा. सुधाकरराव नाईकांनी, 'शब्दस्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार' म्हणून गौरव केला. समाजाच्या आणि संस्कृतीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सुधाकरच्या गझल गायकीचा आजवर गौरवच केला आहे.

     सन १९८३ ते आजतागायता सुधाकरला अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनीही गौरवांकित केले गेले. समाजगौरव पुरस्कार, संगीतभूषण पुरस्कार, मॅन ऑफ दि इअर, आऊटस्टँडिंग यंग पर्सन, कलादूत, कलावंत, शान-ए-गझल, गझलगंधर्व, गझल गंगेच्या तटावर, भट गझल पुरस्कार, महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार. सुधाकरचे म्युझिक अल्बमही दरम्यानच्या काळात गाजले. खपलेही. भरारी (मराठी गझलांचा पहिला अल्बम), झुला (पाठ्यपुस्तकातील कविता), अर्चना (भक्तिगीत), खूप मजा करू (बालगीतं), काट्यांची मखमल (मराठी गझल) तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी गीतांची स्वरलिपी, फडे मधुर खावया (विविध विषयांवरील ललित लेखसंग्रह) ही पुस्तकेही सुधाकरच्या कलासाधना आणि कलालेखणीतून साकार झाली आहेत.

     गौरवानं धुंद होण्यापेक्षा सुधाकरला कलासाधनेतच धुंद होता आलं. गौरव आणि मानसन्मानांनी सुधाकर मोहरला नाही. उलट सुधाकरचे स्वर अधिक मोहरले. कलावंताला गौरवानं मोहरण्यापेक्षा कलेतच अधिकाधिक मोहरता-फुलता-बहरता आलं पाहिजे. सुधाकरला हे जमलं. सुधाकरला कलेची वारी करणारा वारकरी होणं जमलं. खूप कलावंतांना कलावंत तर होता येतं. परंतु कलेचा वारकरी होणं नाहीच जमत. सुधाकर याही अंगाने स्वतःचं वेगळेपण जपत आला आहे. कलेशी कुठलीही तडजोड त्याने केली नाही. कलावंत म्हणून तो कधी याचक बनला नाही. सुधाकर कलासाधकच बनला. कलावंतांच्या तडजोडी कायम नाकारत कलेच्या धुंदीत, गुंगीतच आपल्या स्वरांचं अस्सल इमान त्याला एकाकीपणातही जपता आलं. इमान जपणारा कलावंत आजच्या मानसन्मानासाठी हपापलेल्या कलावंतांच्या जगात शोधूनही कुणी सापडत नाही. सुधाकर त्याला अपवाद आहे.

      सुधाकर हा जसा एक लोकप्रिय गायक आणि कलावंत आहे. तसाच तो अत्यंत हळवा.. संवेदनशील, कनवाळू माणूसही आहे. बरेचदा कलावंतांना आपलं माणूसपणच टिकवता येत नाही. कला आणि अहंकार टिकविता टिकविता माणूसपण केव्हा गळून पडले, हेही कळत नाही. सुधाकरने माणूसपणही टिकविल. माणूस म्हणून कुटुंबावर-समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटूंबावर समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटुंबावर अगाध प्रेम केलं. या माणसाला कधी राग येतो का? कधी अहंकार जागा होतो का? कधी हा कलेचं मार्केटिंग करू शकतो का? असे अनेक प्रश्न आम्हा मित्रमंडळीत कायम उपस्थित होतात. अस्सल वैदर्भिय वऱ्हाडी बोलीतून, काय गड्या किती दिवसांनी तुला भेटता आलं? अशी सुरूवात करणार. समाजातल्या सर्वच स्तरांतल्या लोकांशी जवळीक साधून, सुधाकर असंच अघळपघळ बोलून, गळ्यात हात टाकणार. पाठीवर शाबासकी देणार. सर्व बिरूदे विसरून प्रेम करणे सुधाकरला जमले.

     सुधाकर म्हणजे बोलघेवडा. पटकन् लहान मुलासारखा घरात विरघळून जाणार.. लेकराबाळांसह सर्वांशीच युगायुगाचे नाते मानून बोलणार. सुधाकरच्या अंत:करणात एक कुटुंबवत्सल माणूस आणि निरामय प्रेम करणारा सहोदर मित्र दडलेला आहे. जिवघेण्या आजारातून परतल्यावर तो गंमतीनेच मृत्यूच्या दाढेने काबूत घेतल्यावर आपण कसे मृत्यूशी झुंजलो आणि मृत्यूला पराभूत करून मित्रांना भेटायला आलो, हेही सांगणार. सुधाकर कदम म्हणजे एक आनंद. आनंदाचे डोह, आनंदाची पर्वणी, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. सुधाकरच्या मुली, पत्नी, निषादही सुधाकरचेच शोभणारे वत्सल आणि प्रेमळ रूप. सबंध महाराष्ट्रातच सुधाकरचे मैत्रमंडळ. जेथे जातो तेथे तूच माझा सांगाती, हीच वृत्ती सुधाकरला जगण्याची ऊर्जा देणारी आहे.

     सुधाकरने गझल गायनाची सार्वजनिक सुरूवात सन १९७५ नंतर केली. सन १९८० ते १९९० पर्यंत सुधाकर गझल गायक म्हणून गझलनवाज, शान-ए-ग़ज़ल बनला. सन १९९० नंतर गझल गायनाच्या क्षेत्रांत अन्यही अनेक कलावंत उमेदवारी करू लागले. सुधाकरला उमेदवारी करण्याची आणि टिकविण्याची गरजच नव्हती. सुधाकर तर मराठी गझलांना स्वरसाज देणारा आद्य अभिजात कलावंत माणूस. गझलांना चाली, ताल, लय, अर्थघनता, नवस्वर देणारा स्वरसम्राट. गायकाच्या जातकुळीत जन्मून, कलेची वारी करणारा पांडुरंगमय कलासाधक. कलेचा वारकरी जेव्हा कलासाधनेतून पांडुरंगमय होतो, तेव्हाच कला आणि कलावंताचं अद्वैत साकार होते. कोणत्याही कलावंताचं अंतिम ध्येय कलेच्या मुक्तीचा आनंद अनुभवणे असते.

आनंदाचे डोही आनंद तरंग । 
आनंदचि अंग आनंदाचे ॥
काय सांगो झाले काहीचियेबाही ।
आता पुढे चाली नाही आवडीने ॥ 

     या अद्वैतानंदाच्या स्थितीत कलासाधनेचा आनंद लुटणे, हे परमभाग्य ज्याला मिळाले, त्या कलावंताचे नाव आहे, गझलनवाज, गझलगंधर्व, गझलस्वरताज, गझलगायक सुधाकर कदम. कलेचा परम वारकरी. गझल गायकीचाही पांडुरंगमय पांडुरंगपुत्र सुधाकर कदम.
------------------------------------------------------------------

*डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी  मधून...


 

 

Wednesday, August 25, 2021

पत्र...सुरेश भटांचे.

.      सुरेश भट आर्णीला माझेकडे आले की 'रिलॅक्स' व्हायचे.छान मूड लागायचा व गझला लिहायचे... 
१९८० च्या त्यांच्या खालील पत्रावरून कळेलच...
------------------------------------------------------------------
प्रिय सुधाकरराव,
दि.१६ रोजी सायंकाळी साडेचारला सुखरूप पोहोचलो.घरी पोचताच मुलगा परत आल्याचे कळले.फार मोठे दडपण नाहीसे झाले.
मी दि.२१ ला नागपूर सोडत असून चंद्रपूर व मूल 
आटोपून दि.२९ ला परत येईन.
     तुमच्या घरी तुम्ही सर्वांनी  मला फारच आराम दिला.सौ.सुलभाने माझी फारच सेवा केली.असह्य मानसिक दडपण असताना मी कसातरी दिवस काढत होतो.हे दडपण काही अंशी तुमच्या घरी हलके झाले.
जानेवारी महिनाही दौऱ्याचा आहे.२९ व ३० डिसेंबरला नागपूरमध्ये आहे.
     खूप तयारी करा.मुलांना आशीर्वाद.शेखरला (त्या वेळचा तबला वादक) नमस्कार.

तुमचा 
सुरेश भट
---------------
*मानसिक दडपणातून मुक्त झाल्याबरोबर मूल येथे झालेली 'हूल' ही गझल स्वरबद्ध करण्यासाठी पोस्टाने आर्णीला पाठवली होती. ती पण खाली  दिली आहे. 

Sunday, August 8, 2021

गझलगंधर्व - मयूर महाजन    संगीताचा ध्यास बाळगणारे अनेक कलाकार संगीत जगताला लाभले आहेत.त्यापैकी एक उल्लेखनीय नाव म्हणजे मराठी गझल गायक व संगीतकार सुधाकर कदम होय.मराठीतील आद्य गझलकार म्हणून जसे सुरेश भटांचे नाव येते, तसेच मराठीतील आद्य गझल गायक म्हणून सुधाकरजींचे नाव येते. फक्त गझलच नाही तर शास्त्रीय गायन, सरोद वादन, मेंडोलिन वादन, सुगम संगीत गायन या सोबतच स्वररचनाकार व संगीतकार म्हणूनही त्यांनी अतिशय मोलाचे कार्य संगीत क्षेत्रात केले आहे. त्यांच्या स्वररचनांमधून ज्या वेगवेगळ्या सुरावटी रसिकांसमोर आल्या त्यावरून त्यांचे या क्षेत्रातील कौशल्य व शास्त्रीय संगीताचा गहिरा अभ्यास स्पष्टपणे दिसून येतो.
     शास्त्रीय संगीत हे मुख्यत्वे स्वरप्रधान संगीत आहे.भावगीत वा गझल  गाताना त्यातील शब्दप्रधानता प्रकर्षाने जाणवते.त्यातल्या त्यात गझलगायन प्रकारामध्ये संगीत, काव्य व लयकारी याचा समसमा आनंद घेता येतो. याबाबतीत पं. रामकृष्णबुवा वझे म्हणतात...'गझल गायकीला आपले असे स्वत:चे  एक आगळे वेगळे अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असले आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझलगायनातून ख्यालगायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभरीत्या रसिकांपर्यंत पोहचू शकते.'
     सुधाकर कदमांच्या  बाबतीत ज्येष्ठ भावगीत गायक स्व.गजानन वाटवे यांनी काढलेले 'मला भावलेला मराठी गझल गायक' (त्यांच्या रोजनिशीत नमूद करून ठेवलेले) उद्गार सार्थ ठरतात.याचे कारण त्यांच्या स्वर-रचनांना  असलेली शास्त्रीय संगीताची पक्की बैठक आणि काव्यानुरूप स्वररचना हे होय.खरे तर सुगम संगीत हे नावालाच सुगम असते, प्रत्यक्षात ते सुगम नसते.सुधाकर कदमांच्या मी ऐकलेल्या रचना या प्रकारातीलच आहेत.पं.शौनक अभिषेकी व अनुराधा मराठे यांनी गायिलेल्या 'अर्चना' या अल्बममधील रचनांचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला तेव्हा निवेदिकेने या दोघांना सुधाकरजींच्या स्वर-रचनांबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'रचना ऐकायला सोप्या पण गायला कठीण .' यावरून त्यांची संगीतकार म्हणून एक वेगळी हुकमत दिसून येते.
     एकदा आम्ही सहज बसलो असता त्यांनी ११ मात्रेच्या (सवारी) तालात स्वरबद्ध केलेली मराठी गझल ऐकवली. माझ्या माहितीप्रमाणे मराठी व हिंदी सुगम संगीताच्या क्षेत्रातील ही पहिलीच रचना असावी.नेहमीप्रमाणे केरावा, दादरा, रूपक, व्यतिरिक्त चाचर-सवारीसारख्या तालाचा सुगम संगीताकरीता वापर करून मूळ बोलाव्यतिरिक्त तेवढ्याच मात्रात विविध बोल बसवून रचनेला उठाव देणे, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.
     संगीतकाराला काव्याचेही सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.सुरेश भटांच्या दीर्घ सहवासामुळे त्यांचा हा अभ्यासही मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शब्दातील भाव सुरावटीतून व्यक्त करण्याची हातोटी त्यांना साध्य झाली आहे. 

     'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ' 

     ही गझल त्यांनी मारवा या रागात स्वरबद्ध केली आहे. पण 'एकदा तुटलो असा कि मग पुन्हा जुळलोच नाही' या दुसऱ्या ओळीतील 'तुटलो' या शब्दासाठी मारव्यात नसलेला कोमल मध्यम व 'जुळलोच' या शब्दाकरिता केलेला कोमल धैवताचा प्रयोग अतिशय समर्पक असल्यामुळे 'दाद लेवा बन गया !' गझलगायकीचे हेच वैशिष्ठ्य असावे.काव्य जसे आपला आशय घेऊन चालते तशीच स्वररचनाही  त्या आशयाला अधिक स्पष्ट करत चालते. 'साईन लाईन व क्रॉस लाईनचा संबंध प्रत्येक कडव्याशी सतत येत असतो. हा संबंध सांगीतिकदृष्ट्याही टिकविणे ही संगीतकाराची फार मोठी जबाबदारी असते.असा सुसंवाद त्यांच्या अनेक रचनातून जाणवतो.

      'दिवस हे जाती कसे अन ऋतू असे छळतात का ?'

     या गझलमध्ये मुखडा षड्ज व त्याभोवती ठेवलाय तर पुढची ओळ मध्यम व त्याच्या आसपासच्या स्वरांभोवती फिरते.त्यामुळे या दोन्ही ओळी संपतात तेव्हा या दोन्ही ओळींना सांगीतिक पूर्णत्व आलेले असते. या गझलेकरिता त्यांनी भीमपलासी , मधुकौंस या रागांचे मिश्रण केले आहे, पण आशयाशी सुसंगतच. काव्यातील भावार्थानुसार बदलत जाणारी स्वररचना हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य...

     'कुठलेच फूल आता मजला पसंत नाही.'

     'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा.'

     'घाव ओला जरासा होता.'

      'शक्ती दे तू आज मजला .'

      'हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही.'

     अशा अनेक रचना भूपाली, बिहाग, भीमपलासी, यमन, कौशीकानडा, मालकौंस, भूपेश्वरी, मारवा, भैरवी, पहाडी, (त्यांचा स्वत:चा) 'मध्यमी' वगैरे रागांचा उपयोग करून त्यांनी स्वरसाज चढविला आहे.
     मराठी भाषेचे व साहित्याचे सखोल ज्ञान त्यांना आहेच, पण त्याचबरोबर उर्दूचाही अभ्यास करून उर्दू गझलाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने स्वरबद्ध केल्या आहेत.हे त्यांनी हाथरसच्या (उत्तर प्रदेश)  'संगीत' मासिकामधील 'नग़्म-ए-ग़ज़ल' या सदराकरीता केलेल्या स्वरलिपीवरून व वेगवेगळ्या गायकांकडून गाऊन घेतल्याने कळून येते.
     त्यांनी स्वरबद्ध केलेले व सुरेश वाडकर,अनुराधा मराठे, पं.शौनक अभिषेकी, वैशाली माडे अशा अनेक गायक-गायिकांनी गायिलेले 'भरारी', 'खूप मजा करू', 'अर्चना', 'काट्यांची मखमल', 'तुझ्यासाठीच मी...' इत्यादी अल्बम रसिकप्रिय झाले आहेत.ते स्वत: कवी, लेखक आहेत. अशा बहुआयामी कलावंताला दीर्घआयुरारोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून संपवतो.

*डॉ.#श्रीकृष्ण_राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' २०१८ मधून ...


 

 

संगीत आणि साहित्य :