गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, March 9, 2024

राग-रंग (लेखांक४२) नंद

दो मध्यम अरु शुद्ध स्वर, गावत राग आनंद । थाट कल्याण षाडव संपूर्ण, प्रथम रात्री सुखचंद ।। एखाद्या चित्रपटातील गाण्यामुळे एखाद्या रागाची माहिती व्हावी म्हणून लेख लिहावासा वाटणे हे त्या चित्रपटगीताचे,त्या संगीतकाराने केलेल्या कामाचे श्रेय आहे असे मला वाटते.'मेरा साया' या चित्रपटातील 'तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा' हे ते गाणे होय. त्यावरून नंद रागावर लिहायची तीव्र इच्छा झाली. संगीतकार होते मदन मोहन.मदन मोहन यांची बहुतेक गाणी कुठल्या ना कुठल्या रागावर आधारित असायचीच.प्रत्येक रागातील स्वरांच्या आरोहावरोहाचा एक नियम असतो.आणि या नियमांना धरूनच संगीत रचना केल्या जातात.निदान पहिली ओळ तरी त्या रागाचे रूप दाखवीत असते.पुढे संगीतकाराचा कलाविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आयाम देत रचना खुलवित जातो.पाश्चात्य संगीतात याला "improvisation" असे म्हणतात. नंद हा राग कल्याणजन्य राग आहे,यात दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.बाकी स्वर शुद्ध आहेत.जाती षाडव संपूर्ण असून गानसमय रात्रीचा प्रथम प्रहर आहे.यालाच कुणी आनंदी, आनंदी कल्याण, नंद कल्याण असेही म्हणतात.हा राग बिहाग, गौड-सारंग ,हमीर, कामोद या रागांना अतिशय जवळचा आहे.सा ग म प नी सा,सां नी ध प...हे बिहाग अंग,अवरोहात सां ध नि प ध तीव्र म प ग...गौड सारंग अंग, ग म ध प...हमीर अंग, तीव्र म प ध तीव्र म प ग...कामोद अंग स्पष्टपणे दिसून येते.ह्या सुरावटी घेतल्यानंतर प्रत्येक वेळी 'ग म ध प रे सा' हे स्वर घ्यावेच लागतात.तेव्हा नंद राग स्पष्ट होतो. या रागाचा विस्तार मध्य आणि तार सप्तकामध्ये अधिक प्रमाणात केल्या जातो. कल्याण परिवारातील शृंखलेतील आवडता राग म्हणून याचा उल्लेख करता येईल. हा राग ऐकणारे बरेच असतील पण गाणारे मात्र कमीच दिसून येतात. या रागाच्या उत्पत्तीबद्दल अनेक प्रवाद आहेत.ते शोधणे कठीण आहे. तरी पण असे म्हणतात की,या रागाची कल्पना १९०० च्या दशकात सुचून प्रत्यक्षात आली असावी.कारण बऱ्याच कालावधीपासून मेहबूब खान (दरसपिया) द्वारा रचलेला विलंबित ख्याल 'ए बारे सैंय्या तोहे सकल बन ढूंढू' लोकप्रिय झालेला दिसून येतो. दरसपिया हे तानरसखान यांचे शिष्य व 'आफताब-ए-मोसिकी' फैयाज खान यांचे सासरे होते. त्या कालावधीमध्ये अत्रौली (जयपूर) घराण्याचे संस्थापक अल्लादिया खान आणि आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक/वादकांमध्ये संगीत शास्त्रावर चर्चा होऊन विचारांच्या आदान-प्रदानाची प्रक्रिया सुरू होती.या प्रक्रियेतूनच दरसपिया यांची रचना दोन्हीकडील उस्तादांनी आपापल्या घराण्याच्या यादीमध्ये सामील करून घेतल्यामुळे सर्वत्र पसरली.आज सर्वच घराण्यात या रागाला मान्यता आहे.आग्रेवाले उस्ताद विलायत हुसेन खान (प्राणपिया) द्वारा रचित सुरवातीची बंदिश 'अजहूँ न आए श्याम,बहुत दिन बीते' आजही लोकप्रिय आहे. 'जाने दो मुझे जाने दो' आशा भोसले. संगीत-आर.डी. बर्मन.गझल. 'धन्य तूचि कांता' नाट्यगीत,नाटक-अमृत सिद्धी.गायक-गंगाधर लोंढे. संगीत-मास्टर कृष्णराव. 'एन्ना पलिसु' enna palisu पं. भीमसेन जोशी. पुरंदरदासांच्या या रचनेची सुरवात नंद रागाने होते.पुढे विविध सुरावटी दिसतात. 'आनंद सुधा बरसे' नाट्यगीत.गायक- रामदास कामत, संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी.नाटक-मीरा मधुरा. 'पाखरा जा त्यजुनीय' नाटक-संगीत वाहिनी,मूळ गायक-पु.ल. आणि अर्चना कान्हेरे. संगीत-श्रीधर पार्सेकर. ----------------------------------------------------------------------------- 'दैनिक उद्याचा मराठवाडा', रविवार दि.१० मार्च २०२४




संगीत आणि साहित्य :