गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, June 11, 2026

राग-रंग...मल्हार




बहुत प्रकार अपुल्या देशी मल्हाराचे
मज वेड असे पण आंनद मल्हाराचे
 -सुधाकर कदम

     मल्हार प्रकार वर्षाकालीनआहे असे मानतात.पण का? याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.या राग प्रकाराचा पाऊस किंवा पावसाळ्याशी तसा काहीच संबंध नसावा असे मला वाटते.'दीप' रागाच्या संदर्भात जशी मिथके पेरली तशीच मल्हार प्रकारामध्ये सुद्धा पेरल्या गेली आहेत.जर 'मल्हार' प्रकारातील गायनामुळे पाऊस पडत असेल तर अवर्षणग्रस्त भागात जाऊन कुणी मल्हार गाऊन पाऊस का पाडत नाही?आणि हा प्रकार पावसाळ्यातच का गातात? इतर ऋतूमध्ये तो गायिल्या जात नाही काय?असे अनेक प्रश्न मला पडले आहे.(दीप राग गायिल्याने दिवे पेटतात, अंगाचा दाह होतो आणि मेघमल्हार  गायीला की दाह शांत होतो.तसेच ताना-रिरी नावाच्या दोन भगिनी नदीवर घागर भरताना झालेल्या डुबुक डुबुक आवाजातून मेघ मल्हाराचे स्वर मिळणे', हे वैज्ञानिक कसोटीवर कसे तोलायचे? रागांना काळ-वेळात बांधणे मला अनैसर्गिक वाटते.तानसेन 'संगीत सम्राट' होते हे मान्य! (मी ग्वाल्हेरला जाऊन त्यांच्या मजारी समोर नतमस्तक झालो होतो.) पण त्यांचा मोठेपणा अधिक गडद करण्यासाठी असली मिथके तयार करणे मला तरी योग्य वाटत नाही.बरे, तानसेनाच्या अगोदर किंवा नंतर हा चमत्कार घडल्याचा कुठेच उल्लेख नाही.) मुळात कोणताही राग व सुरावटी भक्कम तयारीनिशी केव्हाही चखलपणे गायिल्या/वाजविल्या गेल्या तर त्या गोड वाटणारच! तसे नसते तर सुगम संगीतात झालेल्या अनेक रचना बारमाही गोड वाटल्याच नसत्या.यावर शास्त्रीय संगीतातील शास्त्री सहमत होणार नाही.पण त्यांनीही यावर जरा डोळसपणे विचार करायला हरकत नाही.यात मी शास्त्रीय गायकांना किंवा अभ्यासकांना कमी लेखतो असा गैरसमज कोणी करून घेऊ नये.कारण इतर गायनशैली सुद्धा शास्त्रीय संगीताचाच आधार घेते हे खरे आहे. पण शास्त्रीय संगीताची निर्मिती लोकसंगीतामधूनच झाली हे पण तेवढेच सत्य आहे.आणि ते केव्हाही गोडच वाटते.
     मल्हाराचे अनेक प्रकार आहेत.शुद्ध मल्हार,पट मल्हार,मेघ मल्हार,सूर मल्हार,गौड मल्हार,नायकी मल्हार,कानडा मल्हार,मीराबाई की मल्हार,धुलिया मल्हार,चरजू की मल्हार वगैरे वगैरे. 'मियाँ की मल्हार' त्यातीलच एक पण लोकप्रिय राग आहे.मल्हार 'देस अंग','कानडा अंग','गौड अंग' अशा तीन अंगाने गातात.दक्षिण भारतीय मल्हारचा उत्तर भारतीय मल्हारशी स्वरांच्या दृष्टीने तिळमात्रही संबंध नाही.मल्हार प्रकारावर अनेक प्रबंध लिहिल्या गेले. संशोधन झाले.या संदर्भात संशोधकांनी आपापली मते मांडली.'मेघ' रागासोबत 'मल्हारी' हे नाव पण समोर आलेले दिसते.तसेच महाराष्ट्रात 'मल्हारी मार्तंड' नावही प्रचलित आहे.पण या दोन्हीचा मल्हार राग प्रकाराशी तसा काहीही संबंध नाही.
     मल्हार प्रकारातील अनेक मल्हार लोकप्रिय आहेत.पण मला अतिशय भावला तो किशोरी आमोणकरांचा 'आनंद मल्हार.' आणि तो त्याच गाऊ जाणे.पंडित भीमसेन जोशींचा मियामल्हार ऐकणीयच... मोठा ख्याल झाल्यावर छोट्या ख्यालामधील विजेच्या गडगडासारख्या कडकडणार्‍या ताना आणि स्वरांचे बेहेलावे एखाद्या धबधब्याखाली बसल्यावर अंगावर पडणार्‍या जलप्रपाताप्रमाणे चिंब-चिंब करून टाकायचे.पण तेथे चिंब होण्याकरीता ’चातक’ बनून वाट बघावी लागायची.सुगम संगीत वा गझल गायन ऐकताना ही वाट बघण्याची प्रक्रिया म्हणा किंवा अंतराय म्हणा कमी लागतो.अर्थात सुगम संगीत वा गझल गायकी आणि शास्त्रीय गाणे बजावणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.पण गझल गायकी म्हणजे 'गागर मे सागर' असे मोठमोठे गायक सुद्धा म्हणायचे.
    
     आता हेच बघा ना ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल मेहदी हसन यांनी मियामल्हार मध्येच त्यांच्या ढंगात पेश केलेली गझल असो वा जगजीत सिंग यांची 'फिर पानी दे मौला' असो...दोघांचाही बाज वेगवेगळा आहे.या दोन्ही गायकांची खासियत म्हणजे त्यांचा खर्ज.मंद्र सप्तकातील त्यांची कारागिरी सरळ हृदयाला भेदून जाणारी आहे.मग जगजित यांचे ’फिर पानी दे मौला’ असो की मेहदी हसन यांचे’मुझसे खफा हो बैठा’ इथे मात्र एकदम बरसातच!असो...
 ●हिंदी
          चित्रपटांमध्येही या रागाचा तुरळक प्रयोग झालेल आहे.वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं,वाणि जयराम यांनी गायिलेल गुड्डी चित्रपटातील ’बोल रे पपीहरा..’ हे अतिशय सुंदर आणि लोकप्रिय झालेलं गाणं...परंतू मला मन्ना डे यांच्या प्रायव्हेट अल्बमधील ’नाच रे मयूरा...’हे गीत अतिशय आवडतं.'लपक झपक तू आ रे बदरवा' (मल्हार रागावर आधारित मन्ना डेंनी गायिलेले विनोदी गीत) चित्रपट-बुटपॉलिश.'ना ना ना बरसो बादल' (मियाँ मल्हार) चित्रपट-सम्राट पृथ्वीराज चौहान. 'भय भंजन वंदना सुनो हमारी' (मियाँ मल्हार) चित्रपट-बसंत बहार.'करो सब निछावर'(मियाँ मल्हार) चित्रपट-सह्याद्री की लडकी. 'नाच मेरे मोर जरा नाच' (मियाँ मल्हार) चित्रपट-तेरे द्वार खडा भगवान. 'बरसो रे बरसो रे' (मेघ मल्हार) चित्रपट-तानसेन.'दुख भरे दिन बिते रे भैय्या' (मेघ मल्हार) चित्रपट-मदर इंडिया.'तन रंग लो जी आज मन रंग लो' (मेघ मल्हार) चित्रपट-कोहिनूर.'हाले दिल युं उन्हें सुनाया गया' (मियाँ मल्हार) चित्रपट-जहांआरा. 'अंग लग जा बालमा' चित्रपट-मेरा नाम जोकर.'छायी बरखा बहार,पडे अंगना फुहार' (सूर मल्हार) चित्रपट-चिराग.'बोल रे पपिहरा' (मियाँ मल्हार) चित्रपट-गुड्डी. 'कहां से आये बदरा' (मेघ मल्हार)
'बिजुरी चमके बरसे मेहा' (मियाँ मल्हार)'बरसों रे मेघा मेघा (मेघ मल्हार) चित्रपट-गुरू. 'घिर घिर आये बदरिया' (मियाँ मल्हार) चित्रपट-सरदारी बेगम. 'बादल उमड बढ आये' (मियाँ मल्हार) चित्रपट-साज.'काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ'...लगान.'मल्हार' (अल्बम) मियाँ मल्हार,
गायक-मामे खान,मनीषा अग्रवाल.'मेरे ती गिरीधर गोपाल' लता मंगेशकर. (मियाँ मल्हार).'घन गरजत बादर आये'
(मियाँ मल्हार,कोक स्टुडिओ) आयेशा ओमर,फ़रिहा परवेज,झारा मदानी.
●मराठी
'आज कुणीतरी यावे' (मियाँ मल्हार) चित्रपट- मुंबईचा जावई. 'घन घन माला' (मियाँ मल्हार) चित्रपट-वरदक्षिणा. 'जन पळभर म्हणतील हाय हाय' (मियाँ मल्हार) भावगीत.
'जिवलगा कधी रे येशील तू' चित्रपट-सुवासिनी.'सावन घन गरजे बजाये' नाटक पंडितराज जगन्नाथ,गायक-प्रसाद सावकार. 'माना मानव वा परमेश्वर' (मियाँ मल्हार) सुधीर फडके.(याचे गीतकार आणि संगीतकार विदर्भातील अमरावतीचे मनोहर कवीश्वर होते.) 'कुहू कुहू कुहू येईल साद' अनुराधा पौडवाल. 'मेघा नको बरसू अता' जयंत मल्हार रागावर आधारित अप्रतिम मराठी गीत.अल्बम-घन घुंघुरवाळा आला.गायिक-अपर्णा बिवलकर. वरील सर्व गाणी मल्हार प्रकारांवर आधारित आहेत.
      आज आपण जगगितसिंग यांनी गायिलेली निदा फाज़ली यांची ’गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला’ ही गझल ऐकू या...यातील व्हायोलिन आणि बासरी या दोनच वाद्याचा वापर हे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.त्यातल्या त्यात व्हायोलिन तर थेट भिडणारेच...तसेच नेहमीचा केरवा ताल येथे वेगळ्या पण गझलेला पूरक पद्धतीने शब्दांसोबत चालत (ठुमकत-ठुमकत) आपल्या समोर आलेला दिसून येतो.हे ही जग्गूभाईंचे वैशिष्ठ्य आहे...
       याच रागातील मेहदी हसन यांनी गायिलेली  फरहत शहज़ात यांची अतिशय सुंदर अशी  ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल ज्यांना रागविस्ताराच्या आलापासह (Live) ऐकायची असेल युट्युबवर जाऊन सर्च करावी व आनंद घ्यावा.
       
(शास्त्रीय गायक/वादकांची 'स्पेसिफिक' अशी नावे सांगण्याची गरज नाही.कारण नेटवर सहज सापडतात.पण सुगम संगीतातील नावे सांगावी
लागतात.)
-------------------------------------------------------------------------
● दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी.



आसवांचे जरी हसे झाले

       १९८० मध्ये सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले असताना रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर गप्पा सुरु असताना एकदम काय झाले माहीत नाही.एक गझल मला लिहून घ्यायला सांगितली व जरा यमनच्या स्वरात गुणगुणून दाखवता काय? (ही विनंतीवजा आज्ञाच होती) असे विचारले. मतला होता... 


आसवांचे जरी हसे झाले

हे तुला पाहिजे तसे झाले


यमन हा दोघांच्याही आवडीचा राग...त्यांनी सहज म्हटले व मी पण सहज गंमत म्हणून हार्मोनियम घेऊन यमनची सुरावट छेडत बसलो. चाल बसवणे हा उद्देश नसताना आणि निव्वळ फावल्या वेळेतील गप्पा सुरू असताना यमन छेडता छेडता सहजच सुचलेली सुरावटीत त्यांना ऐकविली.लगेच "व्वा! क्या बात है कदम साहेब" अशी मजेशीर दाद देऊन ते पलंगावर पहुडले. आम्ही पण झोपण्याची तयारी करायला लागलो.पाच-दहा मिनिटातच 'ती जरा पुन्हा एकदा ऐकवता काय?' अशी विचारणा केली.मी पुनः हार्मोनियम काढली व सुरावट आठविण्याचा प्रयत्न करायला लागलो.कारण गंमत म्हणून सहज गुणगुणलो होतो.बऱ्याच प्रयत्नानंतर थोड्या फार फरकाने आठवली.आणि जशी आठवली तशी भटांना ऐकवली.त्यानंतर ते व आम्ही निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.


     आज हे आठविण्याचे कारण म्हणजे जीर्ण झालेली जुनी डायरी...मी सध्या मुलीकडे नांदेड सिटीला मुक्कामी आहे.१४ तारखेला सुरेश भटांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छोटीशी मैफल जमवावी म्हणून मयूर, प्राजक्ताला फोन केला.


     मयूरकडे सुरेश भटांच्या शिकविलेल्या माझ्या बंदीशींच्या  बऱ्याच गझला आहेत.अनेक कार्यक्रमातून त्याने सादर केल्या आहेत.पण प्राजक्ताकडे माझ्या बंदीशीची सुरेश भटांची एकही गझल नव्हती.म्हणून मग वारजे येथील माझ्या निवास स्थानावरून निषादला डायरी पाठवायला सांगितली.तर त्याने सगळ्या डायऱ्या पाठवून दिल्या.माझ्या शेवटच्या (म्हणजे मी कार्यक्रम करीत असतानाच्या वेळची) डायरीतील दोन गझला मोबाईलवर गाऊन तयार करण्यासाठी प्राजक्ताला पाठविल्या.नंतर १९७५ पासूनची जुनी डायरी चाळायला लागलो.त्यात ही गझल दिसली.व जुनी 'आठवण' ताजी झाली.बस्स!इतकेच... 


आसवांचे जरी हसे झाले,

हे तुला पाहिजे तसे झाले


चंद्र आला निघूनही गेला

ऐन वेळ असे कसे झाले


शोधुनी मी तुला कुठे शोधू

चेहऱ्यांचेच आरसे झाले


संपले हाय बोलणे माझे

जे तुझ्याशी कसे बसे झाले

दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.रविवार दि.८/६/२०२६

इतना मुझे सोचा करो ना

 


सुरेशजीने अपने खास अंदाज़ में गायी हुई समीर की यह उर्दू ग़ज़ल मुझे बहुत पसंद है।क्यों की ग़ज़ल, गायन और बंदिश सभी दिल लुभानेवले है।यह ग़ज़ल जनसंमोहिनी राग पर आधारित है।लेकिन इसके शेरों में आनेवाला तीव्र मध्यम मन को मोह लेता है। इसे एकदम गले से उतारना मुश्किल था।लेकिन सुरेशजीने इसे बखुबी उतारकर चार चांद लगा दिए है।

आप भी सूनकर लुत्फ़ उठाईएगा...पसंद आए तो डॉ शब्द लिखीएगा।

आठवण...मित्रवर्य वामन तेलंग यांची

     माझ्यातील गायक/संगीतकारावर प्रेम करण्या सोबतच माझ्यातील कवी/लेखकास हेरून प्रोत्साहित करणारे नागपुरच्या  तरुण भारत या दैनिकाचे माजी संपादक मित्रवर्य #वामन_तेलंग  यांना जाऊन बघता बघता तीन वर्ष झालीत.त्यांच्या जाण्याने वैयक्तिक माझे खूप नुकसान झाले आहे.... ते जर माझ्या आयुष्यात आले नसते तर माझ्यातील कवी/लेखक लोकांना माहितीच झाला नसता...

     '#फडे_मधुर_खावया...' हे 'निवडक विषयांतराचे' पुस्तक त्यांच्यामुळेच प्रकाशित झाले.या पुस्तकाला प्रस्तावना पण त्यांचीच आहे...ती खाली देत आहे.

-------------------------------------------------------------------------

.                      आर्णीच्या मातीचा गंध 

                                        -

     माझे मित्र सुधाकर कदम यांचे नाव प्रामुख्याने संगीतकार म्हणून आणि विशेषत्वाने मराठी गझल गायक म्हणून सर्वविख्यात आहे़. आर्णी-यवतमाळच्या भागात संगीत शिक्षक म्हणूनही ते अनेकांना परिचित आहेत़. त्यांचे एकूण व्यक्तिमत्व संगीताच्या दुनियेशी मेळ खाणारे आहे़. म्हणजे असे की भरपूर उंची, गोरापान रंग, नीटस नाक-डोळे आणि डोक्यावरील कुरळ केस असे त्यांचे दर्शन आहे़. त्यावरून सहजपणे कुणालाही वाटून जावे की, हा माणूस नक्कीच गायक-कलावंत असणार! फार कमी लोकांना अशी एकरूपता लाभत असते़. आपण पाहतोच ! निसर्गाने ज्यांच्या कंठामध्ये मधाचे पोवळे ठेवले आहे त्यांना रंग आणि रूप देतांना मात्र त्याने फार कंजूषपणा केलेला आहे़. अर्थात यालाही-अपवाद असतोच़. विशेषतः जे गझल गायक-कलावंत असतात ते तर निश्चितच याला अपवाद दिसून येतील़. सर्वच कसे देखणे, रुबाबदार! सुधाकर कदम हेही त्याच मालिकेतले़. आर्णीसारख्या आडगावात राहूनही त्यांनी गायकीचा रंग-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला़. संगीताच्या प्रसारासाठी संगीताची शाळा काढली़. स्वतःच्या पदराला खार लावून घेत कार्यक्रम केले़. आपले आणि आपल्या वाद्यवृंदाचे वेगळेपण ठसविण्यासाठी गझल या प्रकारातील गीतांची निवड केली़. ती करतानाही त्यांनी अनवट अशी वाट निवडली़. ‘मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला़. हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे़. हिंदी, उर्दू-हिंदूस्थानी, मराठी या केवळ भाषा नाहीत़. भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते़. संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यामुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो. गझल च्या संदर्भात ते अधिकच खरे आहे़. कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे़. अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाऴ. अव्वल इंग्रजीच्या काळात केव्हा तरी मराठीने गझलचे वृत्त-लेखन स्वीकारले़. त्या सर्व तपशिलामध्ये जाण्याचे येथे कारण नाही़. सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले़. ही वाट वहिवाट नव्हती़. हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती़. सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला़. कित्येक वर्ष तो या खटाटोपीच्या मागे होता़. पुढे त्याने स्वर-लेखन केले़. त्याचा अर्थ असा की तेथे स्वर हा घटक प्रधान होता़. ‘लेखन’ ही दुय्यम बाब होती़. त्याच्या कार्यक्रमातही ‘गझल’ हा प्रकार प्रधान होता; ‘मराठी’ हा त्याचा पेहराव होता़. कित्येक वर्ष तो या केंद्राभोवती घुटमळत रमला़. अगदी परवा परवा पर्यंत त्यात अंतराय असे आले नव्हते़. मराठीतील कवी आणि त्यांच्या रचना यांचेशी त्याची सलगी होती खरी, पण त्यामागचा हेतू ‘गझल रचना मिळणे’ हा होता़. कदाचित्‌ त्या जोशाजोशात त्याने कविता-लेखनही करून पाहिले असेल, पण तेही पुन्हा गाण्यासाठीच होते़. असे असताना, माझ्या समजुती प्रमाणे, तो अचानक स्फुट लेखनाकडे वळला़. योगायोगाने त्याच वेळी नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकामधून त्याच्या संपादकीय पृष्ठावर ‘विषयांतर’ हा स्तंभ येत होता आणि त्यातील हलक्या-फुलक्या लिखाणामुळे तो स्तंभ वाचकांच्या व लेखनाची सुरसुरी असणार्‍यांच्या आवडीचा स्तंभ झाला होता़. सुधाकरने अलगद त्या स्तंभावर झेप घेतली आणि गायनीकळा लाभलेला सुधाकर कदम लेखन-कलेने बाधित झाला!

 सुधाकर कदम यांच्या गायक असण्याचा, तो शिक्षक असण्याचा, वाद्यवृंद संघटक असण्याचा वर मी थोड्या अधिक तपशिलाने उल्लेख केला आहे़. त्याला तसेच कारण आहे़. आयुष्याची मोलाची बरीच वर्षे या क्षेत्रामध्ये झिजतांना माणसांचे जे चित्रविचित्र नमुने आणि अनुभव त्याच्या गाठी जमा झाले होते; त्या अनुभवांना त्याच्या ‘विषयांतर’ मधील स्फुट-लिखाणाने एक चांगला पाट मिळाला आहे़. संगीताची जाण ठेवणार्‍यांना आणि विशेषतः गीत-गायकांना कवितेची-काव्याची व बर्‍या-वाईट साहित्याची ओळख असायलाच हवी असते़. सुधाकरच्या ठिकाणी ती ओळख पिण्डतःच होती़. त्याच्या या पुस्तकात संग्रहित झालेल्या स्फुट-लेखांवरुन वाचकांना त्याची सहजच कल्पना येईल़. उदाहरणावरून यातील शीर्षकाचा स्फुटलेख पहा़. त्याची सुरवातच श्री़. म़. माटे आणि त्यांच्या ‘भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी’ या पाठाच्या उल्लेखाने होते़. जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर ‘माटे मास्तरांचा हा धडा’ अनेकांनी अभ्यासिला असेल़.परंतु नेमक्या ठिकाणी त्याचा संदर्भ देण्याचे कसब त्यातल्या फारच थोड्यांना साधले असेल़. मुळात साहित्य व त्याची आवड असेल तरच पाठ्यक्रमातून जाणारे असे संदर्भ संबंधिताला आठवतील, ही बाब येथे लक्षात घेण्यासारखी आहे़. स्फुटासाठी सुधाकरच्या कामी हा संदर्भ जसा हुकुमासारखा येतो त्याचप्रमाणे गायकी कलेतील प्रत्यक्षातला अनुभवही कामाला येतो़. हे अनुभव इतर सामान्य अनुभवापेक्षा वेगळे असतात, आणि लेखकाच्या हातोटीमुळे ते पैलूदार बनतात़. त्याचाही प्रत्यय या संग्रहात वाचकांना ठिकठिकाणी आल्याखेरीज राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो़.

      सुधाकर कदमचे हे लिखाण अर्थातच स्फुट स्वरूपाचे आणि विरंगुळ्यासाठी केलेले लिखाण आहे़. अशा लिखाणाची खुमारी त्याच्या मांडणीत, आणि लेखकाचे ठायी असणार्‍या निरीक्षणाच्या ताकदीत सामावलेली असते़. तसे त्यातले अनुभव, त्यातले प्रसंग, प्रसंगविशेषी दिसून येणार्‍या व्यक्ती, त्यांचे स्वभाव, त्यांचे वर्तन, त्यांचा व्यवहार आपल्या नित्याच्या अवलोकनाचाही असतो़. परंतु त्याकडे आपले लक्ष जातेच असे नाही़. लेखक आणि वाचक यांच्यात हीच एक रेषा असते़. वाचक जेव्हा ही रेषा ओलांडतो तेव्हा तोही लेखक होऊ शकतो़. ज्यांना ती रेषा पार करता येत नाही त्यांना या प्रकारच्या लेखनामुळे एकप्रकारचा विविध पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो़.

     सुधाकर कदमच्या या पुस्तकातून त्याच्या वाचकांना असा आनंद मिळेलच याविषयी मला मुळीही शंका नाही़. अशी शंका नसणे हे लेखक म्हणून सुधाकरचे यशच मानले पाहिजे़.


-वामन तेलंग, 

संपादक,दैनिक तरुण भारत.

नागपूर : कार्तिक एकादशी / १९९८)



 





संगीत आणि साहित्य :