गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, July 30, 2026

रे मना !

 

रे मना! तुज काय झाले सांग ना

का असा छळतो जिवाला सांग ना


हारण्याचीही मजा घे एकदा

जिंकुनी तुज काय मिळते सांग ना


हासुनी हसवायचा हा मंत्र घे

दुःख का कुरवाळतो तू सांग ना


सूर लावुन गुणगुणावे गीत हे

ते नि तू का वेगळा रे सांग ना

             ●●●

     मुंबईच्या डॉ.राम पंडितांसारख्या अनेक विद्वान व  रसिक मित्रांनी माझ्या कविता स्वतः स्वरबद्ध करण्याविषयी आग्रह केल्यामुळे अनेक वर्षांनंतर #रे_मना! हा अल्बम तयार झाला.यातील गीत-गझलांना विविध वाद्यांच्या सहाय्याने साजेसे संगीत नियोजन मिलिंद गुणे यांनी केले.यातच मिलिंदच्या आग्रहावरून ग्रूप व्हायोलिन्सचा प्रथमच प्रयोग केला.हा अल्बम युट्युब, स्पॉटिफाय सारख्या जगातील सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असून, त्याला हजारो रसिकांनी आपली पसंती दिली आहे. .त्यातीलच मयुर महाजनने गायिलेले 'रे मना!' हे अतिशय सुंदर असे शीर्षक गीत सादर करीत आहे.या रचनेचा बेस तसा 'बिलासखानी तोडी' हा राग आहे.पण सुगम संगीतामध्ये गीताला अधिक आकर्षक करण्या करीता वेगवेगळ्या सुरावटींचा प्रयोग करून त्याचा गोडवा वाढविल्या जातो.तसेच काहीसे यात केल्या गेले आहे.मुळात ही बंदिश अनेक वर्षांच्या चिंतनानंतर आलेली असल्यामुळे 'दिल को सुकून देनेवाली है' असे मला वाटते..यातील अभिषेक बोरकर यांचे सरोद तर अफलातूनच आहे.आपण ऐका व आनंद घ्या! आवडल्यास प्रतिक्रिया द्या!



Wednesday, July 29, 2026

इतना मुझे चाहा करो ना...उर्दू ग़ज़ल

जनसंमोहिनी  राग पर आधारित यह उर्दू ग़ज़ल आपको ज़रूर पसंद आएगी। इस बंदिशी की विशेषता है छंदों में उच्च स्वरों का प्रयोग। इसे सुनिए...


इतना मुझे चाहा करो ना, इस के मैं क़ाबिल नही

मुझ सा कोई संगदिल न हो, तुम सा कोई बिसमिल नही


अपनी जगह तुम हो सही, अपनी जगह मैं ठीक हूँ

शिकावे-गिले जायज़ मगर,शिकवो से कुछ हासिल नही


चलना ही है ज़िंदादिली चलते रहो चलते रहो

मंज़िल सबब रुकने का ले,बेशक वो ज़िंदादिल नही


मौजे तमन्ना थाम ले कब तक कहाँ तक ऐ 'समीर'

दिल का समंदर है अजीब,इस का कोई साहिल नही

                              ●●●

कलावती और जनसंमोहिनी रागों के बारे में संक्षिप्त जानकारी।

कलावती और जनसंमोहिनी राग इतने मिलते-जुलते हैं कि आम आदमी के लिए इनमें अंतर करना मुश्किल है! दोनों राग बहुत मधुर हैं। ये दोनों राग दक्षिण भारतीय संगीत प्रणाली (कर्नाटक संगीत) से हैं। अपनी मधुरता के कारण ही ये उत्तर भारतीय संगीत प्रणाली में भी लोकप्रिय हुए। इनका थाट खमाज है और निषाद को छोड़कर बाकी सभी स्वर शुद्ध हैं। कलावती राग में ऋषभ नहीं होता। कलावती राग में ऋषभ का प्रयोग करने पर जनसंमोहिनी राग बनता है। इसमें ऋषभ का प्रयोग कल्याण अंग के साथ किया जाता है। जनसंमोहिनी राग का मूल नाम 'शिव कल्याण' भी कहा जाता है।

'कोई सागर दिल को बहलाता नहीं' - यह गाना फिल्म 'दिल दिया दर्द लिया' से है, जिसने मेरे ऑर्केस्ट्रा में रहने के दौरान अपार लोकप्रियता हासिल की। ​​मैं इसे अपने घर के संगीत कार्यक्रमों में गाया करता था। अगर मेरे सामने युवा लड़कियां होतीं, तो मैं इसे बड़े जोश से गाता था। तभी मुझे बुनियादी जानकारी मिली कि यह गाना कलावती राग में है। मुझे बहुत बाद में पता चला कि इस में जनसंमोहिनी राग भी है। इसके बाद, फिल्म 'मुंबईचा जवाई' से रामदास कामत द्वारा गाया गया गाना 'प्रथम तुज पाहता, जीव वेडावला' हम (उस समय के) युवाओं को दीवाना बना दिया था। कई वर्षों तक, मैं इन दोनों गानों को  घर के संगीत कार्यक्रमों में गाता रहा। लेकिन कलावती का असली अर्थ प्रभा अत्रे की 'तन मन धन तो पे वारू' इस बंदिश से। एकताल राग की यह रचना बारहवें छंद से शुरू होती है। सम के ऊपर का 'न' श्रोता को मंत्रमुग्ध कर देता है।उपरोक्त रचना श्रोता को मंत्रमुग्ध कर देती है। उनकी गायन शैली और गीतों से निकलने वाली मधुरता बेहद आकर्षक है। आज भी यह गीत युवा लगता है। इसके अलावा, डॉ. वसंतराव देशपांडे द्वारा गायी गई झपतालकी बंदिश 'ये हो कहे' भी मेरी पसंदीदा थी, क्योंकि यह बहुत ही सुरीली थी।

Monday, July 27, 2026

वेदनेचा सूर...

 


पंडित जसराजजींनी गायिलेल्या राग 'बागेश्री कानडा'

 रागावर आधारित गझल...

वेदनेचा सूर देउन काळजाला

लाविले आयुष्य मी माझे पणाला


गात जातो गोडवे जो तो स्वतःचे

झेलले ज्याने कधी ना वादळाला


न्याय,नीती,रीत आता वेगळी रे

नेमका अंदाज ना ये आपणाला


का दुरावा आपल्या दोघात आला

काय द्यावी करणे या कारणाला


माझिया ओठास जेव्हा स्पर्श केला

पौर्णिमेचे चांदणे आले उशाला


गायक - मयूर महाजन

शब्द आणि संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम

संगीत संयोजन - मिलिंद गुणे

ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.



गझलेचं गाणं होताना....

           एखादी साहित्यकृती एखाद्या रचनाकाराने निर्मिलेली जरी असली तरी ती रचना त्याची रहात नाही. त्या रचनेवर  रसिक श्रोते, प्रेक्षकांचा हक्क व्हायला लागतो. त्या साहित्यकृतीत रसिक श्रोते, प्रेक्षक इतके समरसून जातात, की त्यांना स्वतःचंही भान रहात नाही. ते त्या रचनेमध्ये गुंतून जातात, ती रचना त्यांच्या आयुष्याचा भाग बनते. 

            आता गझलेचंच बघा ना! कित्येक रसिकांना काही गझला जणूकाही आपल्यासाठीच बनल्यात अस वाटत. प्रत्येक श्रोत्याला ह्या गझला आपल्याशा वाटतात.

निदा फाजलींची "होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है" जावेद अख्तरांची "तुमको देखा तो ये ख्याल आया"सुरेश भटांची "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे""भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले"इलाही जमादारांची "अंदाज आरशाचा वाटे खरा असावा" अशी बरीच उदाहरणे देता येतील. 

            अगदी तशीच दिलीप पांढरपट्टेनी शब्दबद्ध केलेली, सुधाकर कदम यांनी संगीत स्वरबद्ध केलेली आणि सुरेश वाडकर, वैशाली भैसने माडे यांनी गायिलेली  अप्रतिम गझल 

"#तू_हासलीस_की_सगळ्या_काट्यांची_मखमल_होते". 

     ही गझल रसिक श्रोत्यांची झाली, या गझलेने कित्येकांच्या हृदयावर अधिराज्य केलं. मला ह्या गझलेचं वेड लागलं ते माझा मित्र विद्यासागर कोळीमुळे.  अभ्यासाच्या मधल्या break मध्ये आमच्या शेती, छंद, गाणं, आरोग्य, मित्रमैत्रिणीबाबत चर्चा व्हायच्या. त्यावेळी तो, सुधाकर कदम काका, भैरवी कदम, रेणू चव्हाण यांच्या आठवणी नेहमी सांगायचा. ही गझल त्यानेच मला ऐकवली. आणि मी सहजच गझलकार पाहिले तर ते होते दिलीप पांढरपट्टे. पांढरपट्टे साहेब आमच्या जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी होते. परंतु त्यावेळी गझलेची जाण नसल्यामुळे त्याना फारस ऐकता आल नाही पण ज्यावेळी ही गझल ऐकली आणि या गझलेच्या प्रेमात पडलो. नव्हे, ह्या गझलेच वैशिष्ट्यच अस की ती प्रत्येकाला नक्कीच प्रेमात पडायला भाग पाडते. तुम्ही नक्की ऐका....

दिलीप पांढरपट्टे सरांची गझल "तू हासलीस की सगळ्या #काट्यांची_मखमल होते"

-राजेश देवरुखकर

---------------------------------------------------------------------

● मराठी गझलच्या इतिहासातील पहिली #युगल_गझल  

#सुरेश_वाडकर  आणि #वैशाली_माडे  यांच्या आवाजात...


तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते

तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते


एकाच तुझ्या स्पर्शाने मन फुलते चंचल होते

ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते


तू येत रहा रे दुःखा आता न दुष्मनी माझी

तू भेटलास की माझे गुणगुणणे अवखळ होते


येताच तुझा सांगावा येतात फुले अन गाणी

येतेस एकटी तरीही ही वर्दळ वर्दळ होते


मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करते

प्रत्येक वेदना माझाही अलबेली मैफल होते


समजूनच आला नाही दुःखाचा गनिमी कावा

जी झुळुक वाटली छोटी ते मोठे वादळ होते


-गझलगंधर्व सुधाकर कदम

Saturday, July 25, 2026

जीवनाची एकतारी,पंढरीच्या महाद्वारी...


 

मन होतसे चकोर...



 काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर

व्याकुळले गात्र गात्र होई थेंबास आतूर


करो लागता गजर टाळ वाजतो मृदंग 

पान्हारते चंद्रभागा चोरुनिया अंग अंग


असे सावळे मंथर न्याहाळता इंद्रधनू

मातीतून फुटाळतो शकुनाचा अणू-रेणू


घरघरुनी उठता जात्यामधून विठ्ठल

कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परिमल


शाश्वतच्या ललाटाला सटवाईच गोंदते

उतरणीवरतीच अंगा अंगाला शेंदते


शब्द आणि संगीत- गझलगंधर्व सुधाकर कदम

गायक-मयूर महाजन



Monday, July 20, 2026

सरणावर कळले होते...



 .  आज पुनः #सुरेश_भट  आठवले...😢


इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते


ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते


गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या

पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते


घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली

जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते


मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो

मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते


■ जुन्या कॅसेटवरून उतरवलेले.

Live 1980 ●headphone Please

Sunday, July 19, 2026

या नवा सूर्य आणू चला यार हो...

 

.                       साठवणीतील आठवण

१९८० मध्ये जेव्हा सुरेश भट आणि मी मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार,प्रसारासाठी महाराष्ट्राच्या भ्रमंतीवर निघालो होतो, तेव्हाच्या अगदी सुरवातीच्या काळात सुरेश भटांच्या उपस्थितीत गायिलेली ही गझल आहे. मी स्वतः हार्मोनियम वाजवून गात असल्यामुळे त्या काळी तबला वादक तालमणी प्रल्हाद माहुलकर आणि मी,असे दोघे मिळून कार्यक्रम करायचो.त्यावेळच्या ध्वनिव्यवस्थापकाने कॅसेटवर  हे ध्वनिमुद्रण केले होते. कॅसेटवरून कसेबसे कॉम्प्युटरवर उतरवले.ते आपणासमोर सादर आहे.आवडण्या न आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे.चांगली असो वा वाईट,आपली प्रतिक्रिया मात्र आवश्यक.


सूर्य केव्हाच अंधारला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो


हे नवे फक्त आले पहारेकरी

कैदखाना नवा कोठला यार हो


जे न बोलायचे तेच मी बोलतो

मीच माणूस नाही भला यार हो


ओळखीचा निघे रोज मारेकरी

ओळखीचाच धोका मला यार हो


आज घालू नका हार माझ्या गळा

मी कुणाचा गळा कापला यार हो


-#सुरेश_भट


●heasphone please...

Friday, July 17, 2026

पोवाडा...महाराष्ट्र मायभू आमुची...शाहीर अण्णा भाऊ साठे●

 


क्रांतिकारी शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...🌹🙏🌹



Wednesday, July 15, 2026

'लाजणे बरे नाही' सुरेश भट,सुधाकर कदम.

 




      ●अशी गावी मराठी गझल●

सुरेश भट यांच्या निवेदनासह त्यांचीच गझल...

महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे.१९८२


"हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही

चेहरा  गुलाबाने  झाकणे  बरे नाही"


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे 

मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा 

आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही


जाहली न कोणाची आज राख रांगोळी 

आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही


आज मोकळे  बोलू, आज मोकळे होवू ! 

जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


कालचा तुझा माझा, चंद्र वेग‌ळा होता 

हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही


मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली 

हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही


गझल - सुरेश भट

गायक - सुधाकर कदम


● old live... headphon please

वारकरी


 

जगत मी आलो असा (लेखांक ३७)



   ●अरुणावतीच्या तीरावर (भाग १)●

     आर्णीच्या नोकरीबद्दल मागील एका लेखात आलेच आहे. संगीत शिक्षक म्हणून नाईलाजाने का होईना एकदाचा रुजू झालो. वर्ष होते 1972. त्यावेळी संस्थाध्यक्ष होते चिद्घनानंद भारती. ही संस्था माहूरचे महंत श्री दत्तराम भारती यांच्या योगदानातून उभी राहिली होती. त्यामुळे श्री महंत दत्तराम भारती नावानेच ही शाळा ओळखली जात होती/आहे. जसा चिद्घनानंद भारतींचा आर्णी, माहूर परिसरात दरारा होता तसा यवतमाळ जिल्हाभर या शाळेचा दरारा होता. स्वच्छ पारदर्शी व्यवहार, कडक शिस्त, नावाजलेले हुशार असे शिक्षक, अतिशय मृदू पण शिस्तीचे कडक असे मुख्याध्यापक हे या शाळेचे वैशिष्ठय होते. शंकरराव बुटले हे त्यांचे नाव. पांढरे शुभ्र धोतर, पांढराच शर्ट व पांढरी टोपी ही त्यांची वेशभूषा. उत्तम शिक्षण, खेळ, कला, संगीत, नाटक व विविध शालेय उपक्रम यामुळे त्यांच्या कार्यकाळात शाळा खूप नावारूपाला आली होती. मी रुजू झालो तेव्हा त्यांनी मला खूप सहकार्य केले. संगीत क्षेत्रात जरी मी नाव कमावले होते तरी पण एक शिक्षक म्हणून मी शून्य होतो. पण बुटले गुरुजींनी माझ्यातील गुण-दोषासह मला स्वीकारले व मार्गदर्शन केले. सुरूवातीला प्रत्येक तासिकेला वर्गावर जाऊन संगीताची तासिका घ्यावी लागायची. पण माझ्यातील तडफ व संगीताविषयीची आत्मीयता पाहून त्यांनी मला वेगळा संगीत कक्ष दिला. त्यावेळी माझ्याकडे हार्मोनियमसुद्धा नव्हती. शाळेची हार्मोनियम घेऊन कार्यक्रम करण्याची परवानगी दिल्यामुळे माझे कार्यक्रम सुरू होते. वेतन इतके कमी की, कसेबसे घर चालायचे. त्यामुळे हार्मोनियम घेण्याचा प्रश्नच नव्हता. यवतमाळला असेपर्यंत ऑर्केस्ट्राची हार्मोनियम वापरायचो. यवतमाळलाही माझ्याकडे स्वतःची हार्मोनियम नव्हती. असे असतानाही मी हार्मोनियमचा हात कसा तयार केला असेल याचा विचार करावा. असो!

     बुटले गुरुजींनी संगीत कक्ष दिल्यानंतर मी त्या कक्षात सायंकाळी संगीताचे वेगळे वर्ग घेऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्याल मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार संगीताचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. हे पाहून बुटले गुरुजींनी मला 'गायनाव्यतिरिक्त काही वाद्य शिकविता येईल काय' असे विचारले. मी हो म्हणताच त्यांनी शाळेच्या फंडातून हवी ती वाद्ये आणायची परवानगी दिली. त्यांनी परवानगी देताच मी मुंबईला जाऊन सतार व संतूर ही दोन वाद्ये आणली. आणि स्वतः प्रॅक्टिस करून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. यवतमाळचा नेहरू युवक केंद्राच्या प्रेरणा युवा मंचाच्या सांस्कृतिक विभागात तबला वादन करून सहकार्य करणारा मित्र शेखर सरोदे, उस्ताद शेख दाऊद खान यांच्याकडे तबल्याच्या उच्च शिक्षणासाठी हैदराबादला गेला होता. तेथे माझी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची एक मैफिल आयोजित केली होती. त्या निमित्त हैदराबादला गेलो असता तेथून एक स्वरमंडळ घेऊन आलो. त्याचेही पैसे मला शाळेकडून मिळाले. माझी मेहनत हळूहळू रंग भरत होती. शाळेतील 26 जानेवारी म्हणजे तीन दिवसांचा नृत्य, नाट्य, संगीत महोत्सवच असायचा. या तिन्हीमध्ये माझा सहभाग अनिवार्य असल्यामुळे आर्णी व परिसरातील रसिकांची ओळख व्हायला लागली. म्हणून मी गावातील रसिक, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर मित्र मिळून 'स्वर-गंगा' नावाची (बिन पगारी, फुल अधिकारी) संस्था स्थापन केली.या संस्थेचे उद्घाटन अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख, उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबांचे शिष्य पं. मनोहरराव कासलीकर यांच्या गायनाने केले. या कार्यक्रमाला आर्णी व परिसरातील रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम बुटले गुरुजींच्या परवानगीने शाळेच्या विज्ञान भवनात आयोजित केला होता. एकीकडे यवतमाळचा ऑर्केस्ट्रा, दुसरीकडे माझे सोलो कार्यक्रम या व्यतिरिक्त शाळा व संगीत वर्ग अशी खूप ओढाताण होत होती. पण जिद्द आणि मेहनत करण्याची मानसिक तयारी हे सर्व माझ्याकडून करून घेत होती. वरील सगळ्या बाबींमुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींप्रमाणेच माझ्यातील नसलेल्या चुका दाखवून मुख्याध्यापक व संस्थेतील पदाधिकाऱ्यांकडे चुगल्या करणारी मंडळी पण तयार होऊ लागली. पण हे प्रमाण कमी होते. तसेच मुख्याध्यापक आणि संस्थाध्यक्ष माझी ससेहोलपट बघत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत कुठलेच प्रकरण आले नाही. माझी कार्यशैली, स्वच्छ चारित्र्य, स्वाभिमानी स्वभाव, शाळेतील शिक्षक म्हणून ठेवलेली आब याबद्दल संस्थाध्यक्ष माझ्या बाबतीत अत्यंत उदार धोरण ठेवून होते.

000000

क्रमशः

---------------------------------------------------------------------

दै. विदर्भ मतदार,अमरावती. रविवार दि.१३ जुलै २०२६

प्रमाण व बोली भाषा...



   महाराष्ट्रात विविध बोली भाषा बोलल्या जातत.या विविध बोलीभाषेतूनच प्रमाण भाषा निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रमाण भाषेच्या अत्याभिमानी (दुराभिमानी) लोकांनी बोली भाषेचे आभार मानायला हवे.'पानी' या शब्दावरून हिणवणाऱ्या विद्वानांना विदर्भ हा मध्यप्रदेशात होता.त्यामुळे तेथील बोलीभाषेत पाण्याला हिंदी प्रमाणे पानी उच्चारल्या गेले.अजूनही बरेच ग्रामीण लोक असाच उच्चार करतात.ही त्यांची चूक नाही.विदर्भातीलच झाडीपट्टीच्या भागात अजूनही'ज' चा उच्चार 'ज्य' असाच करतात.अकोल्याकडे 'ळ' चा उच्चार 'ड' सदृश्य होतो.बहिणाबाईंचे काव्य प्रमाण भाषेत नाही म्हणून ते टाकावू ठरते काय?महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्यांच्या भक्तीगीतांमधून बोलीभाषेतील अनेक शब्द वापरले आहेत.लीळाचरित्र,ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वऱ्हाडी शब्द आले आहेत.मग लीळाचरित्र, ज्ञानेश्वरीकडे पण तुच्छतेने बघाल काय?महाराष्ट्रातील बोली भाषेची अशी शेकडो उदाहरणे देता येईल.असो!

"अति शहाणा त्याचा बैल रिकामा" ही म्हण उगाच पडली नसावी.

'प्रार्थना' वंदना विटणकर


     वंदना विटणकर यांची ही कविता महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच (पुणे) विभागा करीत स्वरबद्ध करून पुण्यातील अनेक प्रशिक्षण वर्गातून महाराष्ट्रातील संगीत शिक्षकांना शिकविली होती.आर्णीच्या माझ्या संगीत विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केली होती तो व्हीडिओ मिळाला...सादर आहे.


हे प्रभो जगदीश्वरा स्वीकार आमुची प्रार्थना

सन्मती देई सदा फुलवी मनी सद्भावना...


प्रेममय रूपे तुझी विश्वात साऱ्या व्यापली

जीवनाची धारणा चरणी तुझ्या सामावली

थोर हा महिमा तुझा गण्यास देई प्रेरणा..


झळकसी गगनातुनी हसतोस तू सुमनातुनी

होऊनी जलधार तू देतोस रे संजीवनी

सर्वदा आनंददाता तूच देवा पावना...


लोपवी अज्ञान हे सृजनत्व देई ईश्वरा

हो कृपेची साउली सकलास तू करुणाकरा

उजळुनी अंधार ने तेजाकडे जनजीवना...

डावीकडून...तबला - निषाद कदम,,गायक - सच्चिदानंद डाखोरे,रेणू कदम,भाग्यश्री जाधव.साईड रिदम - किशोर कोरडे.हार्मोनियम - अस्मादिक.


●headphone please


'काळोखाच्या तपोवनातून' काव्यसंग्रह समीक्षा.


 .                       '#काळोखाच्या_तपोवनातून' 

    सुधाकर कदम ह्यांची जीवननिष्ठा जपणारी कविता.


        मराठीचे आद्य गझलगायक  असलेले आणि #गझलगंधर्व  या नावाने ओळखले जाणारे सुधाकर कदम  यांच्या कवितांची ओळख  महाराष्ट्रातील काव्य रसिकांना '#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा' ह्या संग्रहा द्वारे झालेलीच आहे. मुळात गायक-संगीतकार असलेले सुधाकर कदम #गीतकार, #गझलकार, #अभंग रचनाकार, सशक्त #विडंबनाकार अशा सर्व पातळीवर आपल्याला पुन्हा भेटतात ते त्यांच्या  काळोखाचा तपोवनातून ह्या दुसऱ्या काव्यसंग्रहातून, या संग्रहात सुधाकर कदम यांनी मराठीतील जवळपास सर्व काव्यप्रकार हाताळले आहेत हे विशेष.  दीर्घ आणि व्यापक असा अनुभव, सकारात्मक विचारशैली,  उस्फुर्त सृजनशीलता, शब्द सौंदर्य ह्या सोबत नेमक्या सुरांची साथ त्यामुळे कवितेला लाभलेली लयबद्धता ह्या सर्व अनुषंगाने सुधाकर कदम यांची कविता काव्य रसिकांना आकर्षून घेणारी ठरते.  पुण्यासारख्या आधुनिक शहरामध्ये राहत असले तरीही मूळ विदर्भातील रहिवासी असलेल्या सुधाकर कदम यांना ग्रामीण भागात जगणाऱ्या शेतकऱ्याच्या दुःखाची आणि वेदनेची जाणीव आहे. आपल्या कवितेमधून शेतकऱ्यांचे दुःख मांडतांना कवी म्हणतात,


 चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात

 राबतो शेतात। सालोसाल...

 जीवापलीकडे। मेहनत करी

 तरीही भाकरी। मिळेचि ना...

  ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी

 लिही कादंबरी। मुंबईत...


      वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून  आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर  व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा कादंबरी कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून  त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा विरोधाभास आपल्या कवितेतून व्यंगार्थ स्वरूपात सुधाकर कदम यांनी चपखलपणे व्यक्त केला आहे. सुधाकर कदम यांचे शेती जीवनाविषयीचे निरीक्षण फार उत्तम आहे. जेव्हा शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करतो त्यावेळी शेतकऱ्याची पत्नी  किंवा ग्रामीण शेती मातीतील स्त्री जे काम करत असते त्याबद्दल ते म्हणतात,


 घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल

 कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल


      शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या  वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती  म्हणून संबोधने हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये  सुधाकर कदम यांनी पहिल्यांदा केले असावे. सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती ह्या शब्दासोबत स्त्रीसाठी पहिल्यांदा 'कष्टवती' हा शब्द  वापरून मराठी भाषेत नव्या शब्दांची भर टाकत भाषेला समृद्ध करण्याचे कामही सुधाकर कदम करत आहेत असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरते.  कष्ट करून शेतकऱ्याला समर्थ साथ देणाऱ्या स्त्री बद्दल बोलताना म्हणतात,


 किती संकटे येऊ दे

 दूर ठेऊया दुःखाला

 तू  असता संगे माझ्या

 घरपण येई घरट्याला


       फक्त शेतकऱ्यासंदर्भातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या अर्धांगिनीच्या कार्याचा गौरव  करत स्त्रीचे महत्त्व अधोरेखित करणारी घरपण ही कविता आहे असे आपल्या लक्षात येते.सुधाकर कदम यांचे निसर्गभान खूप लाघवी आहे. आपल्या कवितेमध्ये आपल्या शब्दातून त्यांनी अतिशय विलोभनीय असा निसर्ग टिपला आहे. शेती आणि निसर्ग यांचा समन्वय आपल्या शब्दातून मांडताना कवी म्हणतात,


अवघं लाघव हिरवं तुडुंब

द्यावी वाटे येथे मनालाही डूब

भरल्या  शेताच दर्शन घडता

सृष्टीपुढे झुके आपसुक माथा


      बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून  ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गावरील अनिल कविता या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. अनवट सूर सारख्या कवितेमधून वर्षा ऋतूचे वर्णन श्यामरंग सारख्या कवितेतून  निसर्ग, प्रेम, राधाकृष्ण अशा अलवार संदर्भातून कवी आपला मनोभाव उलगडतात.  पाऊस,चैत्रपालवी, निसर्ग किमया अशा रचनांमधून तर जिवंत निसर्ग आपल्या शब्दातून कवींनी रेखाटला आहे. आठवण सारख्या कवितेमधून संध्या समयीच्या कातर आठवणी असताना विविध ऋतूंचे रंग पृथ्वीचे अंगण सजवतात आणि आठवणीचा न्यारा श्रावण  व्याकूळ करतो अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गाचे हे अल्हाददायक रूप असे वाचकाला भुरळ घालते.  तसेच रणरणत्या उन्हात निसर्गाचे भयावह रूप सुद्धा कधी कधी दिसून येते. रखरखत्या उन्हात दिसणारा निसर्ग टिपताना सुधाकर कदम म्हणतात,


 वेदनेला येई। उदयास्ती रंग

 रोजची दुपार। पेटवीते अंग

 देहा फुटे झरा। पाणी शोधताना

 कोस कोस धाव। वेगाने घेताना

 डोळ्यावर दाटे।  कारूण्याचे धुके

 जनावरांचेही। हंबरणे मुके


      उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी होणारी तगमग, जीवाची होणारी लाहीलाही, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल प्रवास करणारी जनता, पाण्यावाचून जनावराचे हंबरणे हे सर्व अंगावर येणारे दाहक वर्णन निसर्गाचाच एक भाग आहे. तोही तितक्याच प्रभावीपणे चितारण्याचे काम कवींनी केलेले दिसून येते. अर्थात  जिथे पाण्याचे दुर्भिक्ष  आपल्या कवितेमधून दाहकतेने कवी मांडत असतात त्याच वेळी,


डोईवर एक। दुजी कटीवर

घेउनी घागर। सुंदरी ही...


      अशा शब्दात पाणी भरायला निघालेल्या रमणीचे वर्णन सुद्धा कवी तितके स्थापनेने करत असतात. सुधाकर कदम यांनी नजाकत भरल्या अश्या प्रणय रचना काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहातून काव्यरसिकांच्या समोर ठेवल्या आहेत. कल्लोळ सारखी  प्रणयरम्य कविता गणितीय भाषेत जाते. पूर्णत्वा, वर्तुळ, लांब त्रिज्येला जोडता  अशा शब्दात  प्रणयाचे पूर्णत्व कवींनी अधोरेखित केले आहे. प्रणयरम्य कवितेमध्ये गणितीय भाषा हा एक वेगळाच प्रयोग सुधाकर कदम यांनी या कवितेत केलेला दिसून येतो. ताळेबंद, प्रेमामध्ये, अत्तराचा फाया, रेशीम रात, भुलवा अशा अनेक कविता या संग्रहात प्रणयाच्या नवीन, अल्लड आणि आल्हाददायक भावभावनासह आलेल्या आहेत.


 नसे तू राधिका। नसे मीही कृष्ण

 बासरीची तान। नसे तेथे...

 (भुलवा)


 किंवा


 ना मी कृष्णा ना तू राधा

 का व्हावी गे सावळ बाधा ?


      असे प्रश्न विचारत कवींनी राधा-कृष्णाची प्रीत शब्दांकित केली आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेत फार सहजतेने केलेला दिसून येतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार ह्याबाबत बोलत असताना कवी म्हणतात,


 ना महाभारत, न रामायण तरीही

 जानकी अन् द्रोपदी लागे पणाला


      असे सांगून मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे  असेल तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी  आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते असे ते निक्षून सांगतात. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू असल्याचे कवी आपल्या कवितेचे सांगताना म्हणतात,


सासुरवासिनी 

चाहूल घेऊन 

सडासंमार्जन 

करो लागे...


      या कडव्यामध्ये एक स्त्री आपले घर-अंगण सारवते आहे सजवते आहे. असे वर्णन दिसत असले तरी सासुरवाशीण ह्या एकाच शब्दात सासूच्या दडपणाखाली, धाकाखाली काम करणारी स्त्री आपल्या समोर उभी राहते. स्त्रीवरील अन्याय आणि अत्याचार  याप्रमाणेच आपल्या समाजातील जातिभेद अजूनही कायम आहेत. त्यालासुद्धा सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेतून वाचा फोडली आहे.


 किती प्रबोधन केले तरीही

 जात नसे त्या असती जाती


       या ओळी मधून संत काळापासून तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक विभूतींनी  जात हे संबोधन नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.  मात्र तरीही या समाजातील जातीभेद संपला नाही. 'नाठाळाचे माथी लाठी' अशी भूमिका घेतली तरी  तुकारामाचे कुणी ऐकले नाही. आणि जीवनभर विठ्ठल विठ्ठल करणाऱ्या चोखामेळ्याला जिवंतपणी तर गाभाऱ्यात प्रवेश मिळालाच नाही. आणि  मरणोत्तर  पायरीवर जागा मिळाली म्हणून धन्यता मानावी लागली. ही सर्व शोकांतिका सुधाकर  कदम यांनी आपल्या रचनेत कधी व्यंगात्मक रीतीने तर कधी सरळसोट हल्ला चढवत मांडली आहे. देवाधर्माच्या नावाने जो व्यवहार या जगात चालू आहे त्याच्यावर अनेक ठिकाणे कवींनी  शाब्दिक हल्ला चढविला आहे.


 विश्वात्मकतेला

 चौकटीत कोणी

 बांधतो अज्ञानी

 न्यूनगंडे...


       अशा अभंगरचना मधून आज अज्ञानी लोक संपूर्ण  विश्व भावनेला चौकटीमध्ये बंदिस्त करत आहे. ही जाणीव कवींना अस्वस्थ करते. जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे कवीला आवर्जून वाटते. तशी ती जाणीव त्यांनी 'रे मना' या कवितेमध्ये व्यक्त सुद्धा केलेली दिसून येते. एकंदर समृद्ध काव्यानुभूती, विविध प्रतीके प्रतिमांचा वापर, समर्पक आणि चपलख उदाहरणे, सकारात्मक जीवननिष्ठा ह्या सर्वांचा एकत्रित दस्तावेज म्हणजे काळोखाच्या तपोवनातून  हा संग्रह आहे असे म्हणावे वाटते. स्वयं प्रकाशन पुणे त्यांनी प्रकाशित केलेल्या ह्या सुंदर संग्रहाचे मुखपृष्ठ यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे प्रा.अविनाश वानखेडे यांनी तयार केलेले असून, ते अगदी समर्पक असे आहे. राम पंडित यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाची श्रीमंती वाढवते. कवितेचे बहुतांश प्रकार सुधाकर कदम यांनी या संग्रहात हाताळले आहेत. मात्र मुक्तछंद हा काव्यप्रकार यात दिसून येत नाही. कवी मुळात गायक असल्यामुळे आपल्या कविता लयबद्ध कशा होतील याचा विचार त्यांच्या अंतर्मनात असल्याने  तसे घडले असावे असे वाटते. कवी शब्दाचे ऋण मानतात, शब्द आणि कविता त्यांच्यासाठी काय आहे ते त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,


 आकळेल अर्थ

 घालता आवर्त

 एका एका आर्त

 शब्दाचा तो...

 शब्दाचा तो भाव

 समजून घेता

 संपेल आर्तता

 मनातील...


      शब्दांचा भाव म्हणजेच अर्थ समजून घेतला म्हणजे मनातील  सर्व जळमटे आणि दुःख नष्ट होतील अशी अपेक्षा कवी सुधाकर कदम यांनी व्यक्त केली असून ती यथार्थ पणे योग्य आणि रास्त आहे यात शंका नाही. सुधाकर कदम यांच्या काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!


 -किरण शिवहर डोंगरदिवे

 वॉर्ड नंबर 7 समता नगर मेहकर

 ता मेहकर जि बुलढाणा 443301

मोबा 7588565576


 काळोखाच्या तपोवनातून ( कविता)

 सुधाकर कदम  मो.8888858850

 स्वयं प्रकाशन पुणे

 पृष्ठ 96, किंमत 150

---------------------------





संगीत आणि साहित्य :