Tuesday, August 18, 2026
आबालवृद्धगीत...पोलिसदादा.
(हे गीत सर्वच पोलीसांना लागू नाही,याची कृपया नोंद घ्यावी.)
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
चौकाच्या कोपर्यात,बकरा शोधुनी,हलाल करतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
तक्रार घेण्या,टेबलाखालुनी,लाचही घेतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
सराव म्हणुनी,लाठीमार करतो,टाळकी फोडतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
गुत्यावर जातो,लायसन बघतो,फुकटची पितो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
गुंडांना आवतन,सभ्यांना पायतन,दाखवीत फिरतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
गोळ्या मी झाडतो,गरीबांना झोडून,अंग झटकतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
चोरांशी दोस्ती,करून मस्ती,गस्तही घालतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
’माडी’वर जातो,’शौक’ही करतो,हप्ता मी घेतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
कोर्टात जातो,’सॅलूट मारतो,खोटेही बोलतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
ठाण्यात अबला,येताच जमल्यास,अब्रुही लुटतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
हॉटेलात जातो,रुबाब कसतो,फुकटचे खातो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
चोरीचा माल,सापडला तर,वाटून खातो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
हेलमेट न घालता,’टिब्बलसिट’ जातो,नियमही मोडतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
चोरीची तक्रार,घेऊन येता कोणी,दमदाटी करतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
नगद नारायन,दिसताच पटकन,सक्रीय होतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
पदपथा वरती,दिसता पथारी,दुर्लक्ष करतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
मोठ्यांचे रक्षण,छोट्यांचे भक्षण,आणि राजकारण जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
राजकारण्यांच्या,पुढे मागे फिरूनी,शेपुट हलवतो जरा जरा !
पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?
’सद्निग्रहार्थ’,’खलरक्षणार्थ’,ब्रीदाला जागतो जरा जरा !
● गायकांसाठी सूचना...
(हे गीत "इंजिन दादा इंजिन दादा काय करता" या चालीवर म्हटल्यास अपरिमितानंद मिळून पोलीसानंदी टाळी लागते.)
सुधाकर कदम