हिरवे हिरवे गर्द चिमुकले,दाट धुक्याने हळु पांघरले
बेट नव्हे हते नंदनवन जणु निळ्या जांभळ्या जळात वसले
त्या बेटाचा समुद्र गहिरा,लाटांमधुनी खेळे वारा
हलती होड्या डुलती नौका सोडुनी थोडा दूर किनारा
तिथली झाडे अन् फुलवेली,रंग सृष्टीचे मोहक ल्याली
क्षणात हसती क्षणी कुजबुजती जाणुन पक्षांची मधुबोली
मेघ चुंबितो त्याचे शिखर,सुंदर तिथला अवघा डोंगर
पायथ्याशी त्या घरे चिमुकली,पलीकडे ते पवित्र मंदिर
गायिका-नेहा दाऊदखाने (नेहा सिन्हा)
गीत-मीरा सिरसमकर
संगीत-सुधाकर कदम
ध्वनिमुद्रण - एल्कॉम स्टुडिओ,पुणे
हे एक निसर्ग गीत असून याची बंदिश #वृंदावनी_सारंग या रागात आहे.याचे आरोहावरोह असे...सा रे म प नि सां,सां नि प म रे सा.असे आहेत.अवरोहात नि हा स्वर कोमल आहे.दुपारी गायिला जाणारा हा एक गोड राग आहे. आणि याचाच भाऊ मधमाद सारंग या रागात अनेक चित्रपट गीते,भावगीते,भक्तिगीते आणि गझल आहेत.
’जादुगर सैयाँ,छोड मोरी बैयाँ’ हे ’नागिन’ (१९५४) या चित्रपटातील हेमंतकुमार यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लताबाईंनी गायिलेलं त्या काळात अतिशय गाजलेलं गाणं वृंदावनी सारंग या रागातच आहे.’रानी रुपमती’ (१९५९) या चित्रपटातील एस.एन.त्रिपाठी यांनी संगीतबद्ध केलेले भरत व्यास यांचे ’आ लौटके आजा मेरे मीत...’ हे गीत मधमाद सारंग या रागात आहे.याच चित्रपटातील रफी-लता यांनी गायिलेले ’झननन झन झननन झन बाजे पायलिया...’ हे अती सुंदर गीत वृंदावनी सारंग रागात आहे. ’संथ वाहते कृष्णा माई...’ हे ग.दि.मां.चे.दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेले आणि सुधीर फडके यांनी गायिलेले सर्वांगसुंदर गीतही वृंदावनी सारंग या रागात आहे.एवढेच नव्हे तर ’कजरा मोहब्बतवाला,अखियों मे ऐसा डाला...’ हे ’किस्मत’ (१९६८) या चित्रपटातील ओ.पी.नैय्यर यांनी संगीत दिलेलं आणि आशाबाईंनी गायिलेलं धडकेबाज गाणंही वृंदावनी सारंग याच रागात आहे.
'कोंपले फिर फूट आयी शाखपर कहना उसे' ही मेहदी हसन यांनी गायिलेली गझल मूर्च्छना पद्धतीच्या बंदीशीचे साक्षात उदाहरण आहे.'महाफिल में बार बार किसी पर नजर गयी' ही गुलाम अलींनी गायिलेली गझल सुद्धा सारंग रागावरच आधारित आहे.
मी सुद्धा कमी वाद्यमेळात थोडा वेगळा प्रयत्न करून पाहिला...आवडल्या नावडल्याचे कळवावे!
●headphone please
