माझ्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकिर्दीचा प्रारंभ वयाच्या सोळाव्या वर्षी (१९६५) ऑर्केस्ट्रा पासून सुरु झाला.सध्या २०२६ सुरू आहे.म्हणजे ६० वर्षे उलटलीत.या प्रवासात मराठी/हिंदी मिळून जवळ जवळ ३५० स्वर रचना झाल्या आहेत.त्यातील काही उत्तर प्रदेशातील #हाथरस येथून प्रकाशित होणाऱ्या '#संगीत' मासिकात स्वरलिपीसह उपलब्ध आहेत.तर काही... कॅसेट्स,सीडी,युट्युब वा अन्य 'ऑडिओ प्लॅटफॉर्म्स'वर पद्मश्री सुरेश वाडकर,अनुराधा मराठे,पं. शौनक अभिषेकी,वैशाली माडे,वैशाली सामंत,रसिका जानोरकर,मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे,राधिका ताम्हणकर देशपांडे,गायत्री गायकवाड गुल्हाने,नेहा दाऊदखाने,कल्पिता उपासनी,उत्कर्षा शहाणे,दिनेश अर्जुना,भैरवी कदम,रेणू कदम,प्रशांत कदम,आदित्य फडके,अविनाश जोशी,वैशाली पुल्लीवार,रफिक शेख,डॉ. सुशील देशपांडे, मोहन भिवरकर,सचिन डाखोरे या गायक/गायिकांच्या आवाजात उपलब्ध आहेत.नागपूर आकाशवाणीवरून सादर झालेल्या सर्व रचना रसिकांपर्यंत पोहोचल्या असतील असे नाही.ज्या रचना रसिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत,त्या पोहोचवण्याचा प्रयत्न संगीतकार म्हणून सध्या सुरू आहे.
खालील रचना ऑर्केस्ट्रामध्ये असताना १९६५ मध्ये स्वरबद्ध झाली.माझ्या आयुष्यातील ही पहिली स्वर रचना होय.
चल आपण दोघे लहान होऊ या
बालपणीचा काळ सुखाचा फिरुनी पाहू या
तुझे नि माझे जग ते सुंदर होते त्या वेळी
नभी विहरती स्वैर पाखरे चिंता ना कसली
कळ्या फुलांशी कुजबुज हितगुज
फिरुनी चल करू या...
किती कहाण्या गेल्या रंगुन, गच्चीवर गप्पा
कवितांच्या कोड्यात कितीदा येत लारीलप्पा
भातुकलीचा खेळ मजेचा, फिरुनी खेळू या...
घेऊन हाती हात उपवनी स्वच्छंदे फिरलो
उन्हात वणवण कधी भटकलो पावसात भिजलो
तरुण मनाला अजुन आवडे गारा वेचाया...
-कवी अज्ञात
(त्यावेळी कवीचे नाव लिहून ठेवावे, ही पण अक्कल नव्हती.😊)
