गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, August 16, 2026

'खुसखुशीत' कं-दर्प

      सध्या भाव पडल्यामुळे कांदा या विषयाने उग्र रूप धारण केलेले दिसत आहे.भारत सरकारच्या तळ्यात-मळ्यात धोरणामुळे कधी निर्यात बंदी तर कधी निर्यातीला परवानगी देऊन भरपूर कर लावणे या प्रकारामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे. 

     कांदा हा गरिबांच्या जेवणातला अनिवार्य घटक आहे. भाव वाढले की कांदे घरात असणे ही तालेवार
समजल्या जाण्याची लक्षणे मानल्या जातात.. झुणका-भाकर आणि कांदा म्हणजे वऱ्हाडी लोकांची खास 'डिश' आहे. मधल्या काळात युतीच्या राज्यात झुणका-भाकरीला राजाश्रय मिळाल्यामुळे सरकार-दरबारीही तिचे वजन वाढले होते. झुणका-भाकरीची खरी मजा कांद्याशिवाय येत नाही. पण कांदा महागला की झुणका-भाकर खाणे गरिबांना परवडत नाही. उच्चभ्रू मंडळी मात्र या खास 'डिश'ची सामूहिक मजा घ्यायला लागली आहे.
      १९९७ मध्ये मुंबईच्या विधानभवनात कांदा प्रकार खूप गाजला. काही 'फेक्या' लोकांनी कांद्याचा चेंडू बनवला व सदैव स्वयंपाकघरात मुक्कामी असणाऱ्या कांद्याला विधानभवनात नेऊन 'एक कांदा फेकू बाई, एक कांदा झेलू' या बायकी खेळाचा शौक पुरा केला आणि तेव्हापासून कांद्याला चांगले दिवस यायला लागले. युती सरकारने तेव्हाच, कांद्याचे भाव वाढणार हे समजून घ्यायला हवे होते. पण असे घडले नाही व परिणाम काय झाला हे तेव्हाच्या सरकारने पहिलेच आहे.
     कांद्याला दुसरे नाव आहे कंदर्प ! कंदर्पातील दर्प काही लोकांना सहन होत नाही. पण स्वतःचा 'दर्प' मात्र कायम ठेवणे या लोकांना आवडते. चातुर्मासात चार महिने कांद्याचे दर्शनही न घेणारे, स्वभावातील 'दर्प' मात्र दूर करू शकत नाहीत. त्यामुळे जवळच्या लोकांना जगणे असह्य होते.
     स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची चळवळ राबविणाऱ्यात जसे दोन गट होते तसेच जहाल व मवाळ... तसे कांद्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. जहाल कांदा त्याचेवर हल्ला करणाऱ्याला रडवून 'दे माय धरणी ठाय' करून सोडतो, तर मवाळ कांदा मात्र कसेही वागलात तरी लाडीगोडी लावत असतो. स्वयंपाक घराशी माझा कधीच संबंध येत नसल्यामुळे जहाल कांद्याचे फार कौतुक वाटते. कारण माझ्या समोर सदैव नखं काढून डरकाळणारी,  वाघिणीच्या कुळातली बायको जेव्हा 
कांद्यासमोर गोगलगाय बनून अश्रू ढाळत बसते तेव्हा मला आसुरी की कोणता तो आनंद उपभोगायला मिळतो.
       दर्प म्हणजे वास. तसेच दर्प म्हणजे गर्व हाही अर्थ निघतो. कांदा आणि दर्प याचा जसा जवळचा संबंध आहे तसा माणूस आणि गर्व याचा आहे. 'गर्वाचे घर खाली', 'गर्व माणसाला धुळीत मिळवतो' हे माहिती असूनही प्रत्येक माणसाला कशाचा ना कशाचा गर्व असतो. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार हे लक्षात असूनही मीपणा काही सुटत नाही. माणसांचे एक सोडा ! पण सध्याचे आचार्य, भगवान, महंत स्वामी हे सुद्धा 'मी'च्या दर्पातून सुटले नाहीत. 'हा माझा आश्रम आहे!', 'मी जगाचे कल्याण करतो!', 'हे  विश्व (त्याच्या मठापुरते) मी निर्माण केले आहे!', 'मला शरण या!', 'मी चमत्कार करतो!', 'मी लोकांना मार्ग दाखवितो!' या 'मी' चा दर्प  कं-दर्पापेक्षाही भयानक आहे.
     कांदा तसा बहुगुणी आहे. उन्हाळ्यात कांदा जवळ ठेवला तर ऊन लागत नाही. मिरगी येऊन पडल्यास फोडलेला कांदा हुंगवला की शुद्ध येते. कसेही ऊन लागलेले असो कांद्याचा रस त्याला आराम देणारच. तसेच कांदा हा बलवर्धकही आहे. एका दीर्घायू माणसाने तर आपल्या मुलाखतीत, दीर्घायुष्याचे रहस्य रोज एक कांदा खाणे असल्याचे ठासून सांगितले. औषधी गुणांसोबतच कांद्याची भजी, कांद्याचे पिठलं, कांद्याचा झुणका, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचे लोणचे हे खाद्य पदार्थ खवैयांच्या जिभेला चाळवल्याशिवाय राहत नाही. दररोज एक कांदा खाल्ल्याने जर दीर्घायुष्य लाभत असेल तर आपला कांद्याविषयीचा 'दर्प' बाजूला ठेवून प्रत्येकाने कांदा खायला काय हरकत आहे ?

-सुधाकर कदम

दै.विदर्भ मतदार, अमरावती.१५ ऑगस्ट २०२६


विनम्र अभिवादन!...


    आज १७ ऑगस्ट, पंडित जसराज यांचा स्मृतिदिन  !   

           पंडितजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

                               🌹🙏🌹

     स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. 

     पंडित जसराज हे ७० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. पं.जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते स्वत: तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे  गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे. 

     पंडित जसराज म्हणत असत की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे.  माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा. पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे ते, जय हो. पं. जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील होते. पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) ११ नोव्हेंबर २००६ रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजसराज” असं नाव दिलं, असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार होते. साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानायचे. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल की जसराज हे व्ही. शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या. 

     भारत सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन जसराज यांना गौरवले होते. केवळ भारतच नव्हे तर इतर देशांमध्येही त्यांचे चाहते होते. पं. संजीव अभ्यंकर, कला रामनाथ आदी शिष्य त्यांनी घडवले आहेत.झाले.त्याचप्रमाणे अमेरिका आणि कॅनडामध्ये त्यांचे शिष्य आहेत. आपल्या कुटुंबासह अमेरिकेत मुक्कामी असताना १७ ऑगस्ट २०२० रोजी यांचे अमेरिकेत निधन झाले.





संगीत आणि साहित्य :