गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, September 28, 2026

हृदयी फुलली फुले...

 


.                            हृदय दिनानिमित्त एक आठवण...                   

     सत्तरच्या दशकात दहावी लोअर व अकरावी हायर मॅट्रिक असल्यामुळे दहावी नंतर सरळ महाविद्यायात प्रवेश मिळायचा.पहिल्या वर्षाला 'प्रि युनिव्हर्सिटी' म्हणायचे.त्यावेळी यवतमाळला दोन महाविद्यालये होती.१.अमोलकचंद महाविद्यालय व २.वाणिज्य (हे दाते कॉलेज म्हणून प्रसिद्ध होते) महाविद्यालय.माझी दहावीतील हुशारी पाहून (म्हणजे आत्मपरीक्षण करून आपल्या लायकीप्रणे) अमोलकचंद महाविद्यालयात प्रवेश घेतला.कारण बावाजी दातेंचे महाविद्यालय अत्यंत कडक शिस्तीचे असल्याचे संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होते. माझा व शिस्तीचा बालपणापासूनच छत्तीसचा आकडा होता.अर्थात अमोलकचंदमध्ये शिस्त नव्हती असेही नाही.त्यावेळी खेरकर नावाचे प्राचार्य होते.अतिशय कडक.राउंडवर निघाले की कॉरिडॉर मधील विद्यार्थ्यांना कुठे लपावे ते कळत नसे.सारे दानाफान व्हायचे.

    तर अशा पद्धतीने माझे ऑर्केस्ट्रा सोबतच महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले.माझे नशीब चांगले की माझ्यासारख्या टारगट विद्यार्थ्याला कळणावत सरांसारखे मराठी शिकविणारे प्राध्यापक मिळाले.त्यांच्या शिकविण्याच्या हातोटीमुळे इतर विषयांपेक्षा मराठीच्या तासिका मला आवडायच्या. मला वाचनाची आवड बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांनी लागलीच होती.ती कळणावत सरांमुळे सर्वंकष होत गेली.त्यावेळी वाचनभूक भागवायचे साधन म्हणजे जिल्हा ग्रंथालय वा महाविद्यालयीन ग्रंथालय.माझा दोन्हीकडे थोडा-फार वावर असायचा. संगीत,वाचन,ऑर्केस्ट्रा यामुळे महाविद्यालयीन अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे.त्याचा परिणाम असा की दर वर्षी इंग्रजीत अनुत्तीर्ण, इतर विषयात जेमतेम व संगीत विषयात प्रथम क्रमांकाचे गुण मिळून दर वर्षी प्रि युनिव्हर्सिटीचा गड कायम आपल्या हातात ठेवण्यात यशस्वी व्हायचो.दोन वर्षांनंतर आमच्या वर्गात सुलभा चांदेकर (स्व.दत्तात्रय उर्फ मामासाहेब चांदेकरांची कन्या आणि प्रसिद्ध शेतीतज्ज्ञ स्व.आनंदराव सुभेदारांची सख्खी मामेबहीण )नामक एकदम साधी सुधी दिसणारी ब्राह्मण कन्या आली.ऑर्केस्ट्राच्या बहुतेक कार्यक्रमात हजेरी लावणारी तिच्या मैत्रिणींची एक टोळी होती.टोळी प्रमुख होती रिता वर्मा (आताची सौ. संगीता सिडाना,अमृतसर).ही टोळी कॉलेजमध्ये पण होती.त्यांनी आमचे काहीही संबंध नसताना उगीचच फिरक्या घ्यायच्या म्हणून चिडवणे सुरू केले. सुलभाची आई,म्हणजे माझ्या सासूबाई सुंदर गायच्या. त्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या.स्नेहसम्मेलनात 'डोलकर' या गाण्यावर त्यांनी मुलींचे नृत्य बसविले होते.आणि हे गाणे त्यातील संगीतासह वाजविणारा यवतमाळात मी एकटाच.त्यामुळे अल्पशा मानधनावर (घरची परिस्थिती इतकी चांगली नसल्यामुळे अशीच छोटी मोठी कामे करून मी माझा खर्च चालवायचो) हे काम स्वीकारले.सोबतच त्यांना गाणे शिकविण्यासाठी घरी जाणे सुरू झाले.सुलाभाशी प्रत्यक्ष बोलणे होऊ लागले.हळू हळू ओळख वाढत गेली. व या ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले कळलेच नाही.या काळात मला या ना त्या निमित्ताने नवनवीन स्वररचना करण्याची संधी मिळायचीच.कधी नाटकाला संगीत देण्यामुळे तर कधी महाविद्यालयीन स्नेहसम्मेलनामुळे वगैरे वगैरे.याच काळात एका मासिकात की वर्तमानपत्रात खालील कविता मला मिळाली.प्रेमाची धुंदी होतीच.त्या धुंदीतच ही स्वरबद्ध झाली.वर्ष ६७/६८ असावे.म्हणून ही रचना सुलभाला अर्पण करीत आहे...

आपणही गोड करून घ्यावी!


काल अचानक सायंकाळी 

सखे तुला पाहिले

शामले, हृदयी फुलली फुले...


निळसर डोळे सरळ नासिका

घेती कुंतल स्कंधी झोका

कर्ण भूषणी हिंदोळ्यावर

मन माझे बैसले, शामले..


अवगुंठीत तू कळी कर्दळी

कशी अभावीत पूर्ण उमलली

अबोध माझे प्रीत पाखरू

प्रतीक्षेत राहिले, शामले...


भेटशील का पुन्हा अचानक

हसतील का ते डोळे भावुक

तनुतनूवर स्पर्श भासती

जे स्वप्नी पाहिले, शामले...


कवी अज्ञात

-सुधाकर कदम

●mobile REC... headphone please





संगीत आणि साहित्य :