गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, December 29, 2011

’एक प्रार्थना...’

         आमच्या गझल कट्ट्यात सादर झालेली डॉ.  .अनंत ढवळे यांची खालील गझल माझी अतिशय आवडती आहे.माझ्या दृष्टीने शब्द आणि स्वरांचा सुंदर मेळ यात जमला आहे.ध्वनिचित्रमुद्रण इतके चांगले नाही परंतू कळण्या इतपत नक्कीच आहे.या गझलची बंदिश तयार झाल्याबरोबर दोन-तीन दिवसातच सादर केल्यामुळे सादरीकरणात कच्चेपणा आहे.कारण सतत गात राहिल्या शिवाय पक्केपणा येत नाही.आणि दर महिन्यात नविन रचना देण्याचे आव्हान संगीतकट्ट्यामुळे गझलकार,संगीतकार आणि गायकांसमोर असायचे. यामुळे प्रत्येकाला,आपल्याला काहीतरी नविन द्यायचे आहे या प्रेरणॆने कोणाचे लिहून व्हायचे,कोणाची चाल बसवणे सुरू असायचे.कोणाची गाण्याची तयारी सुरु असायची.या निमित्ताने सर्वजण एकत्र यायचे.सगळे काही नविन असल्यामुळे त्यातल्या त्रुटी कळायच्या,एकमेकांशी चर्चा व्हायची.एकूणच बढीया माहौल तयार झाला होता.पण.....

          उत्स्फुर्तपणे झालेली या गझलची बंदिश कोण्या एका रागात आहे असे सांगता येत नाही.कारण कुठे-कुठे शब्दागणिक तर कुठे-कुठे ओळींगणिक वेगवेगळ्या सुरावटी यात आलेल्या आहेत.माझ्या बहुतेक चाली आतून आलेल्या आहेत.कधी त्या एखाद्या रागाला धरुन तर कधी उन्मुक्त....ही चाल उन्मुक्त आहे.कुठे पटदीपरागाचा भास होतो.तर लगेच भीमपलासीचीछाया त्यावर पडलेली दिसते.मध्येच तीव्र मध्यमचमकुन जातो.अंतर्‌यामध्ये आणखीनच वेगळी सुरावट येऊन सरोवराचे गूढउलगडण्याचा प्रयत्न केल्या जातो.’पाऊस आलाह्या शब्दांसाठी झालेला कोमल धैवताचा प्रयोग लक्षणीय वाटतो.’फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा" या शब्दांची आर्तता स्वरांद्वारे व सुरांद्वारे दाखविण्यासाठी केलेला भैरवीचा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहे,असे या कार्यक्रमाचे सूत्र संचलन करणारे पुण्यातील सुप्रसिद्ध गझलकार म.भा.चव्हाण यांनी यावेळी काढले.हे माझ्यासाठी संगीतकार म्हणून प्रेरणा देणारे होते.

         माझ्या दोन्ही मुली भैरवी आणि रेणू लग्न होऊन दिल्ली,कानपुर येथे स्थायिक झाल्या.जावई समीर चव्हाण गणित विश्वात रमणारे असूनही मराठी गझल लिहिण्याचा त्यांचा व्यासंग कौतुकास्पद आहे.ते पुण्यात असेपर्यंत निषाद आणि ते गझल कट्ट्याचे आयोजनाकरीता झटायचे.समीर IIT कानपुरला प्रोफेसर म्हणून रुजू झाले नि गझलकट्टा बंद पडला.पुन्हा सुरु व्हावा ही ईच्छा आहे.परंतु एका व्यक्तीच्या इच्छेने होणारी ही गोष्ट नाही.जगन्नाथाच्या रथाप्रमाणे सगळ्यांचे हात लागले तरच हे शक्य आहे.असो...

गझल ऐकू या.....................................................




एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली


काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली



कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले


प्रतिबिंबाची वलये नुसती हलत राहिली



जुन्या दिसांची साद घेऊनी पाऊस आला


गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली



फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा


दिवस मात्र वर्षांची शकले फुटत राहिली




गायिका-भैरवी कदम देव

गझलकार-डॉ.अनंत ढवळे

संगीत-सुधाकर कदम

तबला-निशाद कदम

व्हायोलिन-प्रमोद जांभेकर

हार्मोनिअम-दस्तुर्खुद्द




         

No comments:





संगीत आणि साहित्य :