गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, July 29, 2023

राग-रंग...लेखांक १७



     कलावती आणि जनसंमोहिनी हे दोन राग इतके जवळचे आहेत की,सर्वसामान्यांना या दोहोतील फरक कळणे कठीणच! दोन्ही राग अतिशय गोड आहेत.हे दोन्ही राग दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमधील (कर्नाटक) आहेत.
यांच्या गोडव्यामुळे हे दोन्ही राग उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये स्वीकारल्या गेले व लोकप्रियही झालेत.यांचा थाट खमाज असून निषाद सोडून बाकी स्वर शुद्ध आहेत.कलावतीमध्ये रिषभ नाही.कलावतीमध्ये रिषभ घेतला की जनसंमोहिनी होतो.यात रिषभाचा प्रयोग कल्याण अंगाने होतो.जनसंमोहिनी रागाचे मूळ नाव 'शिव कल्याण' असल्याचेही बोलल्या जाते.
       'कोई सागर दिल को बहलाता नहीं' मी ऑर्केस्ट्रामध्ये असतानाच्या काळातील अफाट लोकप्रियता मिळविलेले 'दिल दिया दर्द लिया' या चित्रपटातील हे गीत.घरगुती मैफलीमध्ये मी हमखास गायचो. समोर तरुण मुली असल्या तर एकदम आर्तपणे गायिल्या जायचे. हे गाणे कलावती रागात असल्याचे प्राथमिक ज्ञान तेव्हा मला मिळाले.यात जनसंमोहिनी राग पण आहे हे मला फार उशिरा कळले.या नंतर मुंबईचा जावई या चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता,
जीव वेडावला' या रामदास कामतांनी गायिलेल्या गाण्याने आम्हा (त्या काळातील) तरुण मंडळींना वेड लावले होते.कित्येक वर्षे ही दोन गाणी घरगुती मैफलीत हमखास गायचोच.पण खऱ्या अर्थाने मला कलावती कळला तो प्रभा अत्रे यांच्या 'तन मन धन तो पे वारू'या चिजेने.
एकतालातील ही चीज बाराव्या मात्रेपासून सुरू होते.'न' वरील सम ऐकणाऱ्यास एकदम बांधून ठेवते.त्यांची गाण्याची पद्धत आणि चिजेतील बोलाप्रमाणे येणारी सुरावट अत्यंत मोहमयी.आजही ती चीज तरुणच वाटते.तसेच डॉ.वसंतराव देशपांडे यांनी गायिलेली झपतालातील 'ये हो काहे' सुद्धा अतिशय श्रवणीय असल्यामुळे ती माझी आवडती होती.आलापी,
सरगम,तानांचा अतिशय योग्य वापर करून समेवर येण्याची त्यांची पद्धत अतिशय वेगळी होती.ताल त्यांच्या अंगात इतका भिनला होता की, कुठल्याही मात्रेपासून तान सुरू करुन तबलजीला इशारा करून त्यालाही मोकळे सुटायची खूण करायचे.आणि दोघेही जेव्हा धाडकन समेवर यायचे तेव्हा 'जोर का झटका जोर से'च लागत होता.तालाशी मस्तवालपणे खेळत गाणे ही त्यांची खासियत होती.तबला वादक पांडुरंग मुखडे आणि वसंतरावांची अशी जुगलबंदी सवाई गंधर्वमध्ये मी ऐकली आहे.दोघेही समेवर आले की अंगावर सर्रर्रर्रर्रर्रकन काटा यायचा. त्यावेळी ते नटभैरव गायिले होते.त्यानंतर काही महिन्यातच हे जग सोडून गेले.अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायिलेली 'शिवनंदन गजानन' ही रुपकमधील चीज सुद्धा माझी आवडती आहे.कलावती आणि जनसंमोहिनी राग अनेक गायक/गायिकांनी गायीला व वादकांनी वाजविला आहे.पं. रवीशंकर (सतार) पं. हरिप्रसाद (बासरी) झरीन दारुवाला (सरोद) यांचा जनसंमोहिनी श्रवणीय आहे.तसेच
हरिप्रसाद चौरसिया और झाकिर हुसैन (बासरी-तबला),कृष्णा भट आणि झाकीर हुसेन (सतार-तबला), संदीप मिश्रा,अमित मिश्रा (सितार - सारंगी)'जोनाथन वोयर और शॉन मेटिवत्स्की (संतूर आणि तबला), उस्ताद रफाकत अली खान आणि छोटा उस्ताद बख्त अली खान यांनी गायिलेल्या कलावतीमध्ये छोट्या बख्त अलीने कमाल केली आहे. नुसरत फतेह अली खान यांनी कलावती रागात गायिलेल्या 'तन मन तुम पे वारू' या त्रितालातील बंदीशीत घेतलेल्या विविध प्रकारच्या तिहायासह,वेगवान सरगम अत्यन्त आश्चर्यकारक आणि श्रवणीय आहे.हे तेच करू जाणे!

चित्रपटातील गाणी वा भावगीते एक विशिष्ठ रागात पूर्णतः बांधलेली नसतात.ती केवळ त्या रागावर आधारित असतात.खालील गाण्यांमध्ये काही कलावती रागावर तर काही जनसंमोहिनी रागावर आधारित आहे.या रागातील स्वरांव्यतिरिक्त इतर स्वरांचाही वापर रंजकता वाढविण्यासाठी या गाण्यांमध्ये केला जातो.
● चित्रपट गीते...
'पिया नहीं आये',अमानत अली,नूरजहां. चित्रपट-
दरवाजा.'हाये रे वो दिन क्यों ना आये', लता.संगीतकार-पं. रवी शंकर,चित्रपट-अनुराधा.'आयी परी रंगभरी किसने पुकारा', आशा भोसले.चित्रपट-दो फूल.'आ जा रे मेरे प्यार', लता.चित्रपट-ऊंचे लोग. 'कोई सागर दिल को बहलता नहीं', (जनसंमोहिनी आणि कलावतीचे मिश्रण) रफी.चित्रपट-दिल दिया दर्द लिया.'सुन चंद मेरी ये दास्तान', मुकेश.चित्रपट-नागज्योती.'काहे तरसाये जियरा', आशा भोसले,उषा मंगेशकर.   चित्रपट-चित्रलेखा.'ना तो कारवां की तलाश है' (या कव्वालीच्या फक्त सुरवातीलाच कलावती दिसतो,कडव्यांमध्ये विविध रागांचा प्रयोग केला आहे.) रफी,मन्ना डे,आशा भोसले,सुधा मल्होत्रा.चित्रपट-बरसात की रात.'सुबह और शाम काम ही काम',लता.चित्रपट-
उलझन.'कभी तो मिलोगे जीवन साथी', चित्रपट-सती सावित्री.'वही उड़ी उड़ी घटाएं हैं एक तुम नहीं हो तो कुछ नहीं', मुकेश.चित्रपट-मेरा घर मेरे बच्चे.'सनम तू बेवफा के नाम से मशहूर हो जाये', लता.चित्रपट-खिलौना.'भजन बिना चैन न आये राम', चित्रपट-रफु चक्कर.'अगर दिलबर की रुसवाई'लता.चित्रपट-खिलोना.'मै का पिया बुलावे अपने मंदिरवा', लता.चित्रपट-सूर संगम.'वो घटा सावरी थोडी थोडी बावरी' चित्रपट-अभिनेत्री.'है अगर दुश्मन  दुश्मन जमाना गम नहीं' रफी,लता.चित्रपट-हम किसी से कम नहीं.'ये तारा वो तारा हर तारा', उदित नारायण.
चित्रपट-स्वदेस'जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो' रुपकुमार राठोड,सोनू निगम.चित्रपट-सरफरोश.
● मराठी गाणी...
'अनंता अंत नको पाहू' -माणिक वर्मा.'भाव विणेवर आठवणींच्या तारा मी छेडिते' -सुलोचना चव्हाण.
'प्रथम तुज पाहता', रामदास कामत. चित्रपट-मुंबईचा जावई.'प्रिया आज माझी नसे साथ द्याया' -सुधीर फडके.
'दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी' -आशा भोसले.'गोविंदा निन्ना' -उन्नीकृष्णन (कर्नाटक)
        ● जनसंमोहिनी रागावर आधारित मी एक माझीच गझल स्वरबद्ध केली आहे.गायक आहे मयूर महाजन.पहिल्या ओळीत जनसंमोहिनी स्पष्ट दिसतो.पुढे वेगवेगळे राग दिसायला लागतात.
जीवना सांभाळतो मी तू दिलेल्या प्राक्तनाला
का उगाची दुःख सारे दाखवावे या जगाला

मांडलेला डाव सारा पाहिला मोडून मी ही
अन् समोरी येत गेला जीवनाचा रंग काळा

सोबती गेले जिवाचे राहिलो मी एकटा
लागता झड आठवांची दाटुनी येतो उमाळा

जीवघेणे वागताती आपुले परके असे का
वंचना साऱ्या जगाची सोसवेना काळजाला

युट्युब लिंक....
https://youtu.be/99hi7chw-Aw
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'मंथन' पुरवणी,रविवार दि.३० जुलै २०२३.


 

No comments:





संगीत आणि साहित्य :